बंधन भाग 87

Social Love

भाग 87
(  गेल्या भागात अनघाला घरी येताना रस्त्यात शेजारची छोटी मुलगी भेटते आणि तिला भेटल्यावर पुन्हा ती बाळाचा विचार करायला लागते आणि आता त्याच्याशी याविषयी बोलायचं ठरवते. दुसरीकडे राजेशच्या बोलण्यामुळे विक्रम पुन्हा अस्वस्थ होतो पाहूया ती आता हा विषय कसा काढणार ते )

अनघा आता विक्रमची सोबत, तिचं कॉलेजचं काम आणि तिच्या या नव्या घरातली माणसं यांच्यापलिकडे काही विचार करत नव्हती. विक्रमसोबतचा प्रत्येक दिवस तिला आता आनंदात घालवायचा असायचा. लग्नानंतरचे बरेच महिने तो आपल्यासोबत बोलण्याचा प्रयत्न करत होता, आपल्या आजूबाजूला थांबण्याचा प्रयत्न करत होता, आपल्याही नकळत आपली काळजी घेत होता ते सगळं तिला आता आठवायचं आणि वाटायचं त्याच्या आयुष्यातले लग्नानंतरचे बरेचसे दिवस आपली काळजी करण्यातच गेले. त्याला आपल्यासोबत छान वेळ घालवायला मिळालाच नाही अगदी गोव्याला गेल्यानंतरही तीच परिस्थिती होती त्यामुळे आता त्याच्यासोबत आपण जास्तीत जास्त वेळ घालवायचा असं तिने ठरवलं. त्यातून काही दिवसांपूर्वी शेजारच्या बंगल्यातली छोटी मुलगी तिला भेटल्यापासून तर तिला त्याच्याशी बाळाच्या विषयावर बोलावस वाटत होतं. तिने मनापासून आता हे लग्न स्विकारलं होतं. त्याच्यावरती तिचं प्रेम होतं आणि आता इतका वेळ या नात्याला दिल्यानंतर आता हे नातं नव्या वळणावरती जावं अशी तिची मनापासून इच्छा होती. तिच्या मनात हे सगळे नव्या नात्याचे विचार सुरु होते आणि दुसरीकडे त्याला मात्र याची काहीच कल्पना नव्हती. त्याला लवकरात लवकर तिला सत्य सांगायचं होतं पण कधी आणि कस सांगावं जेणेकरुन तिला फार धक्का बसणार नाही आणि आपल्याला तिची समजूत घालणं सोप जाईल याच विचारात तो होता. तो फोनवरून डॉ.विशालसोबत याविषयी बोलला आणि त्याने जयपूरला जायचं ठरवलं. काहीतरी कारण सांगून जयपूरला येत्या दोन दिवसात जायलाच हवं आता फार उशीर करुन चालणार नाही या विचारात तो होता त्यात शनिवार रविवारची सुटीही आली. येत्या आठवड्यात जयपूरला जायला निघायचं त्याने ठरवलं. ती मात्र रविवार असला की उत्साही असायची. रविवारचा दिवस तिला घरीच थांबायचं असायचं आणि त्यानेही घरी थांबावं, सगळ्यांसोबत बोलावं, सुटीच्या दिवशी तरी सगळ्यांसोबत नाश्ता, दुपारचं जेवण घ्यावं अशी तिची इच्छा असायची. 
ती दर रविवारप्रमाणे आजही थोडीशी उशीरा उठली. फ्रेश होऊन छान तयारी झाली आणि खाली स्वयंपाकघरात आत्याकडे गेली. तिथे थोडावेळ रेंगाळली आणि नाश्ता बनवण्यात आत्याला मदत करुन पुन्हा वरती खोलीत आली. खोलीचा दरवाजा लोटून आत आली तर चक्क विक्रम आरश्यासमोर उभा ! त्याने वॉर्डरोब उघडलं आणि हातात घड्याळ घातलं. पर्फ्युम ब्लेझरवरती मारणार इतक्यात ती आश्चर्याने पुढे आली.

" हे काय! आज सुटी ना कुठे जातोयस ?" तिने विचारलं तसा तो आरश्यात पाहून हसला.
" मॅडम सुटी तुम्हाला! आम्हाला कसली सुटी ! मी थोडी ना आठवडाभर तुमच्या सारखी लेक्चर्स घेतो आणि मला कोण देणार सुटी? आराम करत बसलो तर साहेब कायमची सुटी देतील मला " तो हसत मागे वळला.
" काहीही काय ! एका दिवसाने काही होणार नाही " ती म्हणाली तसा तो अजून हसला.
" तू पण ना घरी असलीस की खरंच ' बायको ' सारखं वागतेस "  त्याने वॉलेट खिश्यात ठेवत म्हटलं.
" असु दे पण कुठे जातोयस आता ?" 
" अग.....जातोय म्हणजे येईनच की परत जाणार कुठे? माझी कुठे एवढी डेअरिंग तुला शेंड्या लावून पसार होण्याएवढी "  
" गप रे, मी काय रिंगमास्टर आहे !"  ती हिरमुसली.
" नाही ग मी कुठे म्हणालो असं "  तो मोठ्याने हसला तशी ती हिरमुसुन ओढणीच्या टोकांशी चाळा करत म्हणाली,
" सांग ना अर्जंन्ट आहे काही !"
" हो ग ट्रस्टची मिटिंग आहे " तो सहज मोबाईल खिश्यात ठेवत बोलला. ती चालत थोडी पुढे आली.
" जायलाच हवं का " तिने डोक त्याच्या छातीपाशी टेकलं.
" अरे! काय हे अस अचानक रोमँन्टीक मूड " तो हसत तिला चिडवत म्हणाला. तिला आज खरच त्याच्याशी बोलायचं होतं पण त्याला काहीच कल्पना नव्हती त्यामुळे त्याने मस्करी सुरु केली. दोन क्षण तसेच गेले. ती अशीच गप्पपणे उभी होती.
" अनु " त्याने तिच्या पाठीवरुन हळूवारपणे हात फिरवला तशी ती विचारातून बाहेर आली.
" काय ग गप्प का झालीस!" त्याने तिचा चेहरा आपल्या ओंजळीत धरत म्हटलं. तिने नुसतीच नकारार्थी मान हलवली.
" काय झालं बरं नाही वाटतं का ?" त्याने काळजीने म्हटलं.
" नाही,  I'm fine " ती खाली मानेनच म्हणाली.
" मग ग आईची आठवण येतेय का ? जाऊन येतेस का घरी " त्याने पुन्हा म्हटलं.
" नको " ती पुन्हा त्याच्या मिठीत आली. " विक्रम थांब न तू!"
" अग महत्त्वाची मिटींग आहे जावं लागेल ना " त्याने पुन्हा तिला समजावलं तरी ती तशीच उभी होती. तिचे आपल्याभोवती असणारे हात, तिच्या मऊ केसांचा स्पर्श, ओढणीची लेस, तिच्या पर्फ्युमचा गंध सगळं त्याला हवहवस वाटायचं पण तिचा अजून विश्वासघात करुन हे नातं त्याला पुढे न्यायचं नव्हतं. आपल्या हातून भावनेच्या भरात एखादं पाऊल पडलं आणि त्यानंतर जेव्हा तिला कधी खरं कळेल तेव्हा तिला काय वाटेल? तेव्हा तिच्यावरती आपण अत्याचार केला शिवाय लग्नानंतरसुद्धा खोटं बोलून तिच्या प्रेमाचा गैरफायदा घेतला. नाही ! आपलं प्रेम खरय मग आता तिचा पुन्हा विश्वासघात नको! या विचारानेच त्याने तिचे हात थोडेसे बाजूला केले.
" चला मॅडम उगीच टाईमपास नको..." तो कसनुस हसला. त्याच्या मिठीतला आपला चेहरा तिने बाजूला घेतला तरी हात अजूनही त्याच्या गळ्याभोवतीच होते.
" काय ग मला जाऊच नाही देणार का आज !" तो पुन्हा हसला. ती क्षणभर त्याच्याकडे पाहतच राहिली. तिला आजूबाजूचं भानच नव्हतं. तिने नकळत आपले ओठ पुढे केले. क्षणभर त्याच्या लक्षातही आलं नाही इतका तो तिच्या डोळ्यांत हरवून गेला. तिने अलगदपणे आपले ओठ त्याच्या ओठांवरती टेकवले. आज इतक्या महिन्यानंतर पहिल्यांदाच त्याचं मन म्हणालं, ' तिला काहीही कळलं नाही तर...नको काहीच सांगायला तिला ! ' त्याला हा क्षण हातात घट्ट पकडून ठेवावासा वाटत होता. त्याने नकळत आपले हात तिच्याभोवती लपेटून घेतले. दुसर्‍याच क्षणी ती थोडीशी बाजूला झाली. दुसर मन त्याला म्हणालं, ' हा विश्वासघात आहे ! ' तस त्याने स्वतःला सावरलं आणि तिला पटकन बाजूला सारलं.
" अग.......लेट होईल ना मला " तिच्या गालांवरती आपले दोन्ही हात ठेवत तो हसला.
" हं........बरं " तीही बाजूला झाली. तो जायला वळला तस ती म्हणाली, " विक्रम ऐक ना "
" काय ग "
" आपण बाहेर जाऊयात का दोन तीन दिवस कुठेतरी मला बोलायचं पण आहे तुझ्यासोबत थोडं " 
" बाहेर ! न...नाही ग इतक्यात पॉसिबल " त्याने कशीबशी शब्दांची जुळवाजुळव केली. आता इतक्यात तरी त्याला कुठेच जायचं नव्हतं फक्त डॉ.विशालला भेटण्याशिवाय त्याच्या डोक्यात दुसरा विचारच नव्हता.
" हं.......ओके " ती म्हणाली.
" ओके बाय हा डिअर " तो दरवाजापाशी गेला. मागे वळून तिला बाय म्हटलं आणि निघून गेला. 
........................................

तो बाहेर निघूनही गेला. ती मात्र स्तब्धपणे पाहतच राहिली. नंतर बेडजवळच्या खिडकीपाशी येऊन ती उभी राहिली. मघाचं त्याचं अस तिला दूर लोटणं तिच्या मनाला दुःखी करुन गेलं. तिच्या डोळ्यात अश्रु उभे राहिले. तिला वाटलं, फार्महाऊसला त्याने आपल्यावरचं त्याचं प्रेम शब्दांत व्यक्त केलं त्यानंतर तर आमचं नातं किती घट्ट झालं पण......आणि आता तर आपण मनापासून हे नातं स्विकारलय जे त्याला माहित आहे तरीही मी अनोळखी असल्यासारखं का वागतो माझ्याशी! कधी कधी त्याचं एखाद्या पाहुण्यासारखं अति फॉर्मल वागणं नकोस वाटतं. आज इतके महिने आम्ही एकमेकासोबत छान वागतो, हसतो बोलतो, कामाच्या ताणापासून ते त्यात मिळालेल्या यशापर्यंत सगळं एकमेकाशी शेअर करतो तरीही आजवर एकदाही त्याने स्वतःहून आमचं नातं पुढे नेण्याचा विषय काढला नाही ना एखादं पाऊल पुढे टाकलं. का ? माझ्या बाबतीत जे घडलं त्यात माझा काय दोष ? मी त्यावेळी स्पष्टपणे सगळ्या गोष्टींची कल्पना दिली होती आणि तरीही माझ्या शरीराची लाज वाटत असेल तर ठिकय....बास झालं आता मी पण तो जसा वागतो तसच वागणार ! ' तिच्या मनात हेच विचार सुरु होते आणि डोळे ओलावले होते.
............................................
तो बंगल्याच्या आवारात आला. त्याने एकवार पुन्हा मागे वळून पाहिल. मघाचा तो क्षण त्याच्या डोळ्यांसमोर अजूनही तरळत होता. तिला आपण अस दूर लोटलं काय वाटलं असेल तिला! असा विचार लगोलग त्याच्या मनात आला. त्याला काय करावं सुचेना, त्याला तिला नसत्या भ्रमात ठेवून भविष्याची स्वप्न दाखवायची नव्हती आणि असं अनपेक्षितपणे तिला सगळं सांगून तिला धक्का बसेल असही वागायचं नव्हतं. तिच्या सोबत वेळ घालवण्याची हल्ली त्याला भिती वाटायची! आपण तिच्या प्रेमाचा गैरफायदा घ्यायचा नाही. आपलं नातं इतकं सुंदर आहे आणि तिच्या विश्वासाला तडा जाईल अस काही व्हायला नको अशी त्याची इच्छा असायची. तो पुढे चालत गाडीपाशी गेला तरी पुन्हा वाटलच, काहीही असलं तरी ती मनाने आपल्यापासून आता दूर जायला नको......
..............................................
खिडकीपाशी डोक टेकून ती उभी होती. ' आपल्या जिवापाड प्रेमाची आता त्याला सवय झालीय. एखादी गोष्ट माणसाजवळ नसते तेव्हाच त्या गोष्टीला महत्त्व असतं, किंमत असते. एकदा का ती गोष्ट मिळाली कि त्याची कदर नाही उरत ' हा विचार तिच्या मनात आले आणि तिने स्वतःचेच डोळे पुसले इतक्यात मागून कुणीतरी खांद्यावरती हात ठेवला. तिने मागे वळून पाहिलं,

" तू ! "  तिच्या चेहर्‍यावर आश्चर्य होतं.
" का ! नको हवं होतं यायला " त्याने मंदस हसत म्हटलं. 
" कशाला आलास आता ! जा गुडबाय " ती खिडकीजवळून बाजूला होत म्हणाली.
" अनु ऐक तरी " त्याने तिचा मागून हात धरला. तिने तो झटकला आणि दोन पावलं पुढे गेली.
" चिडलीस की काय ! मला वाटलं रडत असशील म्हटलं डोळे पुसावे म्हणून आलो " तो मंदसं हसला.
" काही गरज नाही आणि मी रडणार्‍यांपैकी नव्हे रडवणार्‍यांपैकी आहे " ती म्हणाली तसा तो हसला.
" हो का बरं ! " ती पुढे जायला लागली तोच त्याने मागून तिच्या जाळीदार दुपट्ट्याचं टोक आपल्या हातात घेतलं. ती पुढे झाली.
" विक्रम काय !"  ती खांद्यावरचा दुपट्टा सावरत थोडीशी मागे वळली.  तो दोन पावलं पुढे आला.
" सोड ते टोक आधी " तिने त्याच्या हातातून दुपट्ट्याचं टोक ओढून घेतलं. तो तसाच तिच्या चेहर्‍याकडे पाहत राहिला.
" विक्रम तू का आलायस जा न " तिने लाजून चेहरा वळवला.
" असच सहज आलो. आजची सकाळ इतकी गोड झाली म्हणून तुला थँक्स म्हणायला आलो " त्याने तिच्या खांद्यावरुन पुढे आलेले केस कानामागे सारत म्हटलं.
"अच्छा हो का चल Go मग कळलं तुझं थँक्स मघाशी " तिचा स्वर जरासा रागावलेला आणि दुःखी होता.
" अनु I'm sorry " त्याने आपले दोन्ही हात तिला मिठीत घ्यायला पुढे केले. ती मात्र त्याच्याकडे पाठ वळवून उभी राहिली. 
" विक्रम, मला दूर लोटलस आज तू ! काय माहित तुझ्या आयुष्यातून पण कधी पुढे......"  तिचे डोळे भरून आले.
" अनु काहीही बोलू नकोस. अस कधीच नाही होणार. माझ्यावरती नाही का विश्वास " त्याने तिला हाताला धरुन आपल्या समोर उभं केलं. 
" अग बघ तरी "  तिचे डोळे पुसत तो म्हणाला.
" आणि मॅडम मी थँक्स म्हणायला आलो होतो " त्याने आपले दोन्ही हात तिच्याभोवती लपेटून घेतले.
" कळलं ते ऐकलं हा मी थँक्स " ती रुसून म्हणाली.
" हो का " त्याने क्षणभर तिच्या डोळ्यात पाहिलं. 
" काय ! " तिचे ओठ किंचितसे  त्याच्या डोळ्यात पाहताना हसले. त्याने थोडस हसून मानेनेच ' नथिंग ' म्हटलं आणि अलगदपणे आपले ओठ तिच्या ओठांवरती टेकवले. ती लाजली आणि त्याचे आपल्याभोवतीचे हात बाजूला करु लागली.
" तू पण ना.....जा न तु मिटींगला " ती लाजत होती आणि गालात गोड हसतही होती.
" नको....पोस्टपोन्ड केली. म्हटलं घरी थांबू " त्याने सहज म्हटलं.
" नको.....जा तू "  तिने त्याचे हात बाजूला केले. ती हसून वळली. तो मागेच उभा होता. 
" मॅडम ऐका तरी "  तो मागून म्हणाला. 
" काय ? " तिच्या चेहर्‍यावरती हसू पसरलं होतं. तो तिच्यामागे येऊन उभा राहिला. 
" अनु तुझे केस असे वन साईड जास्त छान दिसतात " त्याने अलगदपणे तिचे केस खांद्याच्या एका बाजूला घेतले. त्याच्या बोटांच्या स्पर्शाने तिला किचिंत गुदगुल्या झाल्या.
 

" चल मला कामं आहेत खाली. टाईमपास ला नो टाईम " ती तिच्या गालापर्यंत आलेल्या केसांच्या बटा हाताने किंचित बाजूला सारत म्हणाली.
" अरेवा! मॅडम बिझी! का ते ?  काय आज स्पेशल लन्चला " त्याने आपले हात तिच्याभोवती गुंफले.
" असच तुझी फेवरेट डीश एखादी " ती स्वतःला त्याच्या मिठीतून सोडवायचा प्रयत्न करत होती. तो हसला.
" काय अरे ! तू मला त्रास द्यायला परत आलास की काय !" ती गालात हसत म्हणाली.
" हो, तुच म्हणतेस ना माझं लक्ष नसतं मग जरा सिरियसली विचार केला आणि वाटलं खरंच की इतक्या सुंदर मॅडम घरी आहेत आमच्या मग थोडस लक्ष द्यायला काय हरकत आहे " 
" सुंदर कुठे ! काहीपण  हे मी काय स्वर्गातली अप्सरा थोडी ना आहे ! माझ्यापेक्षाही कितीतरी जणी सुंदर असतात त्यात काय अरे ! "  तिने नजर खाली झुकवली. त्याने पाहिलं तर तिच्या कानाजवळ अगदी छोटूसा काळा तिळ होता. त्याला मनातून हसू आलं आणि वाटलं उगीचच कॅफेमध्ये काजळाची तिट लावली आपण! 
" असु देत.....माझ्या आयुष्यात मला एकच सुंदर मुलगी भेटली तीसुद्धा किती लेट !" तो तिच्या डोळ्यांत पाहत होता.
" तू असा नको न बघूस......" तिने लाजून दोन्ही हात तिच्या चेहर्‍यासमोर धरले.
" अरे बापरे! असो ठेव असेच पण मग मीच दिसणार नाही तुला! सो किती वेळ असे हात समोर ठेवणार !" तो अस बोलला तसे तिने हात चेहर्‍यावरुन खाली आणले.
" चल आता मला......." ती पुन्हा म्हणाली. 
" नको....अशीच रहा माझ्या हृदयाजवळ " तिच्या गालावरुन हात फिरवत तो बोलत होता.
"चल काहीतरी सुचतं......जा ना तू मिटींगला " तिला काय बोलावं सुचत नव्हतं इतक ती लाजत होती.
" नको न.....तुला अस लाजताना बघतच राहावस वाटतं " तो हसला. 
" नको.....जा तू......नंतर बोलूया "
" खरंच... डिनरला बोलशील ना "    त्याने पुन्हा विचारलं.
" हो......." ती हसली.
" ओके......बरं आता तू म्हणतेस तर जातो " त्याने तिचे दोन्ही हात आपल्या हातात घेतले.
" हो, जा लवकर " ती त्याच्या मिठीतून बाजूला झाली आणि त्याला हसर्‍या चेहर्‍याने बाय म्हटलं. 
......................................
तो जड पावलांनी खोलीबाहेर आला. डोळ्यात पाणी तरळलं. ' I'm Sorry अनु मी आजसुद्धा खोट बोललो. तुला बरं वाटावं म्हणून मिटींग कँन्सल केल्याची थाप मारली मी ! मला माहीत होतं, तु मला जायला सांगशील ! काम सोडून मी वेळ वाया घालवलेला तुला नाही आवडतं I know that ' तो विचार करत तिथून तसाच बाहेर आला. गाडीचा दरवाजा उघडणार इतक्यात सेक्रेंटरींचा फोन आला.

" हॅलो बोला " त्याने मनातले तिचे विचार निकराने बाजूला सारले.
" हॅलो सर तुम्ही येताय ना? सगळे आलेत एव्हाना, तुम्ही नसाल येणार तर पोस्टपोन्ड करु का ?" पलिकडून ते म्हणाले.
" नाही, मी मिटींग्ज कँन्सल करत नाही  You know that " तो ताठर सुरात बोलला.
" नाही म्हणजे सन्डे आहे नी " पलिकडून सेक्रेटरी पुन्हा नरमाईने बोलले.
" असो.....कामाचे सगळे दिवस सारखेच असतात...इतक्या वर्षात कधी मिटिंग्ज कँन्सल झालेल्या नाहीत. त्यांच्या चहापाण्याचं पहा. येतोय मी पंधरा मिनिटांत " 
" आ....हा हा येस  येस सर " त्यांनी बिचकतच फोन ठेवून दिला. त्याने सगळे विचार बाजूला ठेवले आणि गाडी स्टार्ट केली.
.......................................
तो गेल्यानंतर तिने खोलीतला पसारा आवरायला घेतला. स्टडीटेबल, तिचं वॉर्डरोब व्यवस्थित लावून ठेवलं. रविवार असला की हे काम ठरलेलं असायचं तिचं. थोड्यावेळाने खाली जाऊन आत्याला थोडी मदत केली. नितू आज घरीच होती. बर्‍याच दिवसांनी ती स्वतःहून नितूच्या रुममध्ये गेली.
" काय सोशलवर्कर मॅडम येऊ का आम्ही " ती आत आली तर नीतू आरश्यासमोर उभी होती. तिने बेडवरती चार पाच ड्रेस लटकवलेले हँगर्स ठेवले होते आणि एकेक ड्रेस हातात घेऊन तो आपल्याला कसा दिसेल ते आरश्यात पाहत होती. अनघाचा आवाज ऐकून ती पटकन पाठी वळली.

" अय्या वैनुडी ये ये बरं झालं आलीस ते! मला जरा हेल्प कर"  तिने हातातला ड्रेस बेडवर टाकला.
" कसली हेल्प! तुम्ही लोकांना हेल्प करता की मग मी कसली हेल्प करावी म्हणता तुम्हाला "  ती हसत बेडवरती येऊन टेकली.
" काय ग इतके सगळे ड्रेसेस !" अनघाने आश्चर्याने म्हटलं.
" हा....मी ना ते उद्या अविसोबत लन्चला जाणारय म्हणून " ती नाक मुरडत एकेका ड्रेसकडे बघत होती. तिला अस बघून अनघाला हसू आलं. 
" हसतेस काय !"  नीतू फुरगटून म्हणाली.
" अग तू हे असे ट्रेडीशनल ड्रेस कुठे वापरतेस! तुझी जिन्स टॉपवाली फॅशनच छानय " 
" ए काय ग वैनी! सांग ना " 
" बरं बरं, तो बघ व्हाईटवाला " अनघाने सहज त्यातल्या व्हाईट चुडीदार ड्रेसकडे बोट दाखवलं. 
" वैनी मला ना अविनाशला भेटायला जायचय तुझ्या सरांना नाही काही !"  नीतू हसून बेडपाशी गुडघे टेकून बसली.
" चल काहीही....." 
" च्या मारी कसली भारी लाजतेस तू! मला पण शिकव ना " 
नीतूने नेहमीसारखी तिची मस्करी केली.
" अस काही नाही....." ती सारवासारव करत बोलली.
" हो का तस नी अस I don't know हा पण हल्ली तुला मी दिसतच नाही हा वैनुडी! नेहमी मी बापुडी तुझ्यासोबत बोलायला येते. इकडे तू कधी फिरकतच नाही हल्ली " 
" अग वेळ नाही मिळत मग " अनघा म्हणाली.
" हो का काय ग दुपारपासून घरी आल्यानंतर ते रात्रीपर्यंत वेळच नाही मिळत तुला! " नीतू गालात हसत म्हणाली.
" अग तस नाही काही!"
" मग ग, दाद्या सोडत नाही का ! " नीतू डोळे मिचकावत म्हणाली.
" ए काहीही मार खाशील आता! तुला त्यांच्याशिवाय दुसरं सुचत नाही का काही " ती लाजली तशी नितू हसायला लागली.
" यार खरच हा तू अशी लाजत राहिलीस ना तर एखाद्याचा ' दि एन्ड ' करुन टाकशील. बघ ना मला नाही येत अस लाजता. मला सगळे ' भाई ' बोलतात मग अवीपण मला ' डॉन ' म्हणतो "  ती नाक फुगवून बोलली. अनघाने आपल्या बोटाच्या चिमटीत तिच्या नाकाचा शेंडा पकडला.
" मग काय झालं! आहेसच तू डॉन आणि असच राहायला हव ग " तिला क्षणभरासाठी ती घटना डोळ्यासमोर आली.
" ए हॅलो......." नीतूने तिच्या खांद्यावर हात ठेवला तशी ती भानावर आली.
" काय ग किती विचार करतेस दाद्याचा पण काय ग हल्ली एकदम खुशीत का ते ? विचारेन विचारेन म्हटलं पण राहिलं " नीतूने तिच्या चेहर्‍यावरचं हसू पाहून विचारलं.
" असच.,......" अनघा हसून म्हणाली.
" सांग सांग काय ?" तिने पुन्हा खोदून विचारलं तस अनघाला वाटलं, सांगावं नीतूला! ती आपल्यासोबत सगळं शेअर करते ना.
" हा हा पण सांगू नको हा कोणाला " 
" हा बोल बोल नाही सांगत प्रोमिस " नीतू म्हणाली.
" I'm thinking about our relation, I mean नेक्स्ट स्टेप expecting a baby...."
" ओह.....वाव! गुड ग "  नीतूने तिचे हात हातात घेत म्हटलं.
" मग काय म्हणाले साहेब ?" तिने कुतूहलाने विचारलं.
" नाही, अजून काही बोलणं नाही झालं बघू " 
" ओके, बोल बोल. वैनी किती मस्त ना ! आणि तुमचं बाळ अस हुशार आणि क्युट असेल बघ "  नीतू तिचा चेहरा हातात  घेऊन म्हणाली. अनघा खूश असली की नीतूला छान वाटायचं. तिला पहिल्यापासूनच अनघा आवडली होती त्यामुळे त्यांच्यात आता छान मैत्री झाली होती.
" हं......बरं चल तुझ्यासाठी ड्रेस चुज करुया " अनघा विषय बदलत म्हणाली.
" हो हो चल " नीतूने वेगवेगळे ड्रेसेस तिला दाखवायला सुरुवात केली. ती सुद्धा ते पाहण्यात आणि नीतूची बडबड ऐकण्यात रमून गेली.
.................................................. 
दुपारच्या जेवणासाठी तिने आत्याला मदत केली. आज ती खूश होती. दुपारी स्वयंपाकघरातही आत्याला मदत करताना आत्याच्याही ते लक्षात आलं पण नीतूसारख तिने आत्याला काही सांगितलं नाही. उगीच इकडची तिकडची कारणं दिली पण आत्याच्या लक्षात आलच आज ती जरा जास्त खूश आहे. तिने त्याच्या आवडीचा पदार्थ बनवलाच शिवाय आत्यालाही नेहमीच्या जेवणात मदत केली. जितेंद्रच्या लक्षात आलं तस त्याने नीतूला विचारलच, वहिनी आज जरा वेगळ्याच वाटतायत नाही! नीतूनेसुद्धा जितेंद्रला थापा मारल्या ज्या त्याला नेहमीप्रमाणे पटल्या. दुपारच्या जेवणानंतर छान झाली होती डिश असही म्हणायला तो विसरला नाही नाहीतर त्यावर पुन्हा ती रागवायची. तो नेहमीसारखच वागत होता. त्याच्या ध्यानीमनीही नव्हतं ती आज कोणता पेच त्याच्यासमोर उभा करणार याची! ती मात्र सकाळच्याच विचारात होती. सकाळचं त्याचं ते पुन्हा मागे येणं, आपल्या मनातलं ओळखणं यामुळे तिचा त्याच्यावरचा विश्वास मात्र वाढला होता. तिला वाटलं, आपण विक्रमबद्दल असा विचार करुच कस शकतो! त्याला आपल्या सोबतीची लाज वाटत असेल, कमीपणा वाटत असेल हा विचार आपल्या मनात यायला नको होता मग तिने मनातूनच त्याला ' सॉरी ' बोलून टाकलं. प्रत्यक्ष बोललो तर उगीच भाव खाईल त्यापेक्षा आपणच आपलं मनातून ' सॉरी ' बोलायचं तिने ठरवलं पण सकाळच्या त्याच्या हक्काने वागण्यामुळे ती पुन्हा नव्याने त्याच्या प्रेमात पडली. तिला वाटू लागलं, आपण आयुष्यभर असच हट्ट करायचे, त्याच्यावरती रुसायचं आणि त्याला आपल्याला मनवायला लावायचं. आपण आयुष्यभर ' राणी ' सारखंच राहायचं. त्याच्यावरती खूप प्रेम करायचं. त्याच्या पाठीशी नेहमी उभं राहायचं. त्याची साथ कधीच सोडायची नाही आणि त्यासाठी त्यांचं नातं अजून घट्ट व्हावं असं तिला वाटत होतं.
..............................................


एकदाची संध्याकाळ झाली. बाहेर अंधार पडू लागला. तिने उत्साहाने बाहेर जाण्यासाठी तयारी करायला सुरुवात केली. आज ड्रेस की साडी नेसावी इथपासून सुरुवात झाली. सगळं वॉर्डरोब न्याहाळून झालं मग त्यानेच खरेदी करुन दिलेल्या साड्यांपैकी फिकट गुलाबी रंगाची शिफॉनची साडी तिने नेसली. त्यावर नेहमीचं त्याच्या आवडीच्या डिजाईनचं मंगळसूत्र, कानात छोटेसे गुलाबी इयरींग्ज, साडीच्या रंगाला साजेश्या दोन्ही हातात दोन दोन बांगड्या, बोटात साखरपुड्यादिवशीची त्याने घातलेली अंगठी, चंदेरी रंगाची टिकली, हलकासा मेकअप आणि खांद्यांवरती रुळणारे मोकळे केस अश्या छानश्या पेहरावात ती आरश्यासमोर उभी राहिली आणि स्वतःला आरश्यात पाहून छानस स्माईल दिलं. तिच्या लक्षात आलं, यात आपल्या आवडीचं काहीच नाही! साडीचा प्रकार त्याच्या आवडीचा, रंगही त्याच्या आवडीचा, अंगठीही त्याने  घातलेली, मंगळसूत्रसुद्धा त्याच्या आवडीचं! तस तिला हसू आलं, आपण मला जे वाटतं तेच मी करणार म्हणता म्हणता त्याच्या आवडीचच सगळं करत असतो. ती अशी हसत होती इतक्यात तो मागे येऊन उभा राहिला तस ती आश्चर्याने मागे वळली.

" वाव! छान दिसतोयस आज...बघ मी म्हटलं होतं की नाही व्हाईट शर्ट आणि ब्लॅकेट जॅकेट छान कॉम्बीनेशन " त्याने तिने दिवाळीभेट म्हणून दिलेला व्हाईट रंगाचा शर्ट आणि त्यावर ब्लॅक रंगाचं जॅकेट घातलं होतं.
" हो का छान हा थँक्यु " तो म्हणाला आणि त्याने कारची चावी हातात घेतली.
तिला वाटलं, आपल्याला म्हटलं सुद्धा नाही ह्याने छान दिसतेस. ती बोटांची चाळवाचाळव करत उभी होती.
" चला मॅडम निघूया का?" 
" हो "  ती हिरमुसुन म्हणाली.
" चला आता, छान दिसतायत मॅडम " त्याच्या या बोलण्याने तिची क्षणात कळी खुलली.
" थँक्यु "  ती लाजून म्हणाली.
" चला अश्या लाजत राहिलात तर मी इथेच राहिन मग डिनर राहिलं बाजूला " तो हसला तशी तीही हसली आणि ते एकत्र बाहेर पडले.
..............................................
गाडीत ती नेहमीप्रमाणे गप्पा मारत होती. तो शांतपणे तिचं ऐकत होता, मधून मधून ड्रायविंग करता करता बोलत होता. आपल्याला त्याच्याशी बोलायच आहे याच विचाराने तिचं मन व्यापलं होतं आणि अचानक त्याने कार एका रेस्टॉरंटसमोर थांबवली. 

" चला, आलो आपण मॅडम " त्याने म्हटलं. तिने काचेतून उत्सुकतेने बाहेर पाहिलं तर ते एक चक्क इटालियन रेस्टॉरंट होतं आणि त्याचं नावही अजबच होतं. ' Winterfall Italian Finest ' रेस्टॉरंटवरती झळकणारं ते नाव पाहून ती कुतुहलाने खाली उतरली. तिने जरा आजूबाजूला पाहिलं.

" हे काय ! आपण सांगलीतच आहोत ना !" 
" हो ! "  तो हसत म्हणाला, " चल चल गंम्मत दाखवतो 
तुला "  तो तिचा हात धरत म्हणाला.
" हो हो येते मी " ती इकडेतिकडे नजर टाकत हसली तस त्याने पटकन तिचा हात आपल्या हातातून सोडला. उत्साहाच्या भरात आजूबाजूला येणारी जाणारी लोकं आहेत याकडे त्याचं लक्षच नव्हतं. तो मग शहाण्या मुलासारखा पुढे चालायला लागला. ती स्वतःशीच हसली आणि त्याच्यासोबत चालू लागली.
............................
ते मुख्य गेटमधून आत रेस्टॉरंटमध्ये आले. प्रसन्न चेहर्‍याने वावरणारे तिथले वेटर्स, स्वच्छ लखलखीत टेबल्स, पदार्थ सर्हव करणार्‍या वेटर्स च्या हातातील डिशेश मधून येणारा पदार्थांचा घमघमाट, रंगीत भिंती आणि या सगळ्याला चार चाँद लावणारं धीम्या मधूर स्वरातील इटालियन संगीत ते सगळं पाहून तिला खरोखरच इटलीमधल्या एखाद्या हॉटेलात गेल्यासारखं वाटलं. ते वातावरण पाहून तिने पुन्हा रेस्टॉरंटच्या प्रवेशद्वारापाशी कटाक्ष टाकला आणि खात्री झाली आपण सांगलीतच आहोत! 
" वाव ! किती मस्त आहे हे सगळं ए मला माहीतच नव्हतं असली भारी रेस्टॉरंट आपल्या सांगलीतपण आहेत ते !" 
" हो न अॅक्चुयली त्याच्यासाठी खवय्या असावं लागतं. आमच्या मॅडम मोजूनमापून खातात " तो तिला चिडवत म्हणाला.
" ए अस काही नाही हा, आणि तू काय मोठा पहिलवान आहेस का! असु दे काही मुलं असतात हँन्डसम म्हणून त्यांना वाटतं आपण म्हणजे भारीच एकदम "  ती गालात हसत त्याला टोमणे मारीत म्हणाली.
" ए काहीही काय अनु " 
" ओके ओके, चल आता डिनर ला आलोय ना " ती हसली आणि दोन पावलं पुढे जाऊन टेबलपाशी थांबली.
" ये ना "  तिने त्याच्यासाठी चेअर ओढली.
" तू बस ना ग आधी " 
" नको " ती खुर्चीला टेकून उभी राहिली तसा तिच्या हट्टामुळे तो आधी चेअरवरती बसला. ती मग हसली आणि त्याच्या समोरच्या चेअरवरती गालाला हात टेकवून बसली.
" Just two minutes जरा हँन्ड्स " तो बेसिनकडे जाण्यासाठी उठत म्हणाला. 
" ओह शुअर " ती वाटच पाहत होती तो थोड्यावेळासाठी बाजूला जाण्याची ! तिने आपल्या हँन्डबॅगमधून एक छोटस कार्ड काढलं आणि कलरपेन! थोडासा विचार केला आणि त्यावर शब्द लिहिले, 
' Feeling gratified in your arms
My Sweetheart '
ते कार्ड उचललं आणि तिने त्याच्यासमोरच्या पाण्याच्या ग्लास खाली ठेवून दिलं. पाच एक मिनिटांत तो येऊन पुन्हा बसला.
" काय मॅम, काय अॉर्डर करताय ?" त्याने तिच्या हातातलं मेन्युकार्ड पाहत म्हटलं.
" तू सांग ना! I can't even pronounce these names "  तिने हसत मेन्युकार्ड त्याच्या हातात दिलं तोपर्यंत वेटर तिथे पोहचला.
" हॅलो सर, हॅलो मॅम " त्याने हसत दोघांकडे पाहिलं.
" हॅलो "  तो मेन्युकार्डवरती नजर टाकत बोलला.
" सर, अॉर्डर प्लीज " 
" हा...येस वन Calzone, Risotto आणि डेझर्टमध्ये Crostata and Gelato "  त्याने पटापट अॉर्डर सांगितली तसा वेटर ओके म्हणून आत निघून गेला. अनघा क्या बात असे हावभाव करुन गालाला हात टेकवून ऐकत होती.
" काय ग " तो आता तिच्याकडे लक्ष देऊन बोलायला लागला. त्याने बोलता बोलता पाण्याचा ग्लास उचलला आणि पाणी पिणार इतक्यात छोटं कार्ड दिसलं. त्याने ग्लास खाली ठेवला आणि कार्ड उत्सुकतेनं उघडून पाहिलं. त्यातल्या शब्दांवरती त्याची नजर गेली आणि तो गालात हसला. 
" Same to you and thank you so much dear "  तिच्याकडे पाहत तो म्हणाला.
" आता हे माझ्याकडेच ठेवणार हा " त्याने कार्डकडे नजर टाकत म्हटलं.
" हो ओके " ती हसून म्हणाली. तिने पाहिलं तर वेटर्स समोरून येत होते. त्याने कार्ड आपल्या जॅकेटच्या खिश्यात ठेवलं. वेटर्सने डिश टेबलवरती व्यवस्थित ठेवल्या आणि त्यांचं काम संपवून ते एन्जॉय युवर डिनर म्हणून निघून गेले.
" चला मॅडम, आजच डिनर आवडेल तुम्हाला ओरीजिनल इटालियन फुड " त्याने आपल्या डिशमधला चमचा हातात घेतला आणि पहिला घास तिला भरवला.
" हो बघू तुझा चॉईस म्हटल्यावर आवडेल " तिनेही हाताने नाईसची खूण केली आणि जेवायला सुरुवात केली. दोन तीन क्षण असेच गेले. तो जेवत होता मधूनच तिलाही घास भरवत होता.
" विक्रम, I want to talk something.... " तिने बोलायला सुरुवात केली.
" Yeah बोल ना, You'd to say something काय ते " त्याने विचारलं. 
" I don't know whether it's right or wrong म्हणजे मी काही बोलणं I mean......"  तिचं अस आडून आडून बोलणं पाहून तोच म्हणाला,
" अनु काहीही,  बोल ना मला आवडण्या न आवडण्याचा काय प्रश्न ! " 
" Ok,  नाही, तस अॅक्चुयली मी बोलणारच आहे फक्त आधी कल्पना दिलेली बरी म्हणून ते..." 
" बरं "  तो शांतपणे म्हणाला.
" विक्रम, I think we should move forward with our relation,  I mean it's been a long time we're together right ?" 
" Yes....it's about 8-9 months "  तो शांतपणे तिचं ऐकून घेत म्हणाला. त्याला थोडस मनातून धस्सही वाटलं पण तिचं म्हणणही त्याला पटत होतं.
" I know तू म्हणाला होतास की माझ्या इच्छेशिवाय आपलं रिलेशन पुढे नाही जाणार. But now everything is fine ना "  ती बोलत होती.
" हो बट....." त्याने बोलायचं म्हटलं तस ती त्याला थांबवत पुन्हा बोलायला लागली.
" I know you care for me but I'm mentally prepared now आणि I'm sure it'll be beautiful moments between you and me " ती इतक्या ठामपणे बोलत होती. ते पाहून त्याला जाणवलं तिचा किती विश्वास आहे त्याच्यावरती आणि या नात्यात ती किती गुंतली आहे हेही जाणवलं.
" I can understand अनु I'm happy with you ग सो I don't wanna force you for anything " तो शांतपणे तिच्या डोळ्यात पाहत म्हणाला.
" हं....but it's my wish now अँन्ड I'll so glad to have a baby " ती शांतपणे, संयमाने बोलत होती. त्याला वाटलं, किती स्पष्टपणे बोलली ही! आपण किती नशिबवान आहोत ना इतक्या प्रगल्भ विचारांची आणि स्वतःच्या मतांवर ठाम असणारी साथीदार आपल्याला मिळाली.
" अनु,  खरंच I'm very glad to have you. बघ ना आपण मुलीचं मॉर्डन असणं हे तिच्या मॉर्डन कपड्यांवरुन ठरवतो आणि लग्नाआधी काय किंवा नंतर काय मुलींना छान राहायचं, चारचौघात अदबीने बोलावागायचं ते शिकवतात आणि आहेच स्वयंपाकपाणी, सणवार नी आपल्या रुढी याच्या पुढे गाडी जातच नाही पण खरंच आपला जोडीदार, रिलेशन, करियर किती काय काय असतं नाही ! तू अशी कशी ग एकदम वेगळी...मला तर सारखं वाटतं तू माझ्यासाठीच बनली आहेस " तो हसत तिच्या गालावरती हात ठेवून कौतुकाने म्हणाला.
" हो न मग I'm waiting for your answer...अस काही नाही Take your time " ती हसली. त्याने ठरवलं आता लवकरच जयपूरला जाऊन विशालला भेटायला हवं आणि तिला खरं सांगूनच पुढे न्यायचं हे नातं. त्याने तिच्या डोळ्यात पाहिलं. तिचे डोळे त्याच्या उत्तराची वाट पाहत होते. त्याने हळूच आपला हात तिच्या हातावरती ठेवला.
" वेट कशाला !  इतकं गोड गोड कार्ड देऊन विचारल्यावर मी ' नो ' म्हणेन का! " तो  मंदस हसत म्हणाला तस ती आपला हात त्याच्या हातावरती ठेवत गोड हसली. 

क्रमशः
आजच्या भागातला सुरुवातीचा सगळ्यात सुंदर क्षण होता ज्याची बर्‍याच भागांपासून तुम्ही वाट पाहत होतात. प्रत्येक प्रसंगाची योग्य वेळ यावी लागते. पात्रांना त्यांचं काम करु द्यावं, चांगल वाईट, चूक बरोबर त्यांना रिअलाईज होऊ द्यावं. मलाही लिहताना वाटतं, किती वेळ जातोय पण काहीच पुढे होत नाही......तिला सगळं कळेल साधारणतः 81-82 भागात असा अंदाज होता खरतर मलाही माहित नसतं पुढल्या भागात काय होणार ते लिहताना, कारण पात्रांना काय वाटतं, ते काय विचार करतात ते महत्त्वाचं. त्यामुळे धीर धरा. पेशन्स राखा.
भेटू नव्या भागात. 

🎭 Series Post

View all