बंधन भाग 86

Social Love

भाग 86
( गेल्या भागात स्नेहसंमेलनाचा कार्यक्रम संपल्यानंतर विक्रम  तिला बाहेर फिरायला घेऊन जातो. तिची रात्रीची भिती दूर करायची त्याने ठरवलेल असतं. त्याच्यासोबत अस रात्री बाहेर फिरताना तिला बरं वाटतं आणि रात्रीचं सौंदर्यसुद्धा समजतं पाहूया पुढे )

नव्या वर्षाची सुरुवात आनंदात झाली. नवं वर्ष आपल्यासाठी नवी स्वप्नं, नव्या आशा- आकांक्षा घेऊन येणार याची त्या दोघांनाही कल्पना होती. आदल्या वर्षीच्या त्या धक्क्यातून तिचे आईबाबाही आता बर्‍यापैकी सावरले होते. त्या वर्षाची सुरुवातच इतकी अनाकलनीय आणि दुःखद झाली होती की पुढे आता काय काय पाहाव लागणार आहे या भितीने आणि काळजीने तिच्या घरच्यांचा जीव व्याकुळ व्हायचा पण मार्चमध्ये तिचं विक्रमसोबत लग्न झालं ती राजेशिर्केंची थोरली सुनबाई झाली आणि कुमुद, श्रीधर थोडे सावरले. तिचा भूतकाळ काही असेना निदान तिला कुणीतरी समजून घेणारी आणि भल्या विचारांची मंडळी भेटली यातच त्यांना समाधान होतं. तिला साजेश्या मुलासोबत एवढ्या मोठ्या घटनेनंतरही तिचं लग्न झालं आणि तिचा संसार सुरळीत सुरु आहे यामुळे ते खूश होते. गेल्या वर्षभरात लग्नानंतर विक्रमने तिला त्यातून बाहेर काढण्यासाठी आणि पुन्हा स्त्री म्हणून स्वतःच्या नजरेत उभं करण्यासाठी, माणूस म्हणून आयुष्याकडे पाहाण्याची तिची नजर बदलण्यासाठी जे प्रयत्न केले होते त्याला आता बरचस यश मिळालं होतं आणि त्याचा परिणाम म्हणजे त्यांचं नातं अजून घट्ट झालं होतं. नवरा बायको पेक्षाही एकमेकाचे साथीदार म्हणून ते एकमेकाकडे पाहायला लागले होते. तिला त्याचा स्वभाव, सवयी, आवडीनिवडी सगळं अक्षरशः तोंडपाठ झालं होतं. तो सोबत असणं हा तिच्या आयुष्याचा अविभाज्य भाग बनला होता. राजेशिर्केंच्या घरातही ती विरघळून गेली होती आणि तिच्यातला हा बदल आत्या आणि भाऊसाहेबांना जाणवत होता. नितू आणि जितेंद्रला तर वहिनीशिवाय करमायचं नाही. विक्रमने तर स्वतःच्या मनाशी कधीचच मान्य केलं होतं, आपल्याला तिच्याशिवाय राहणं अवघड जाईल त्यामुळेच तो तिच्यासोबत आधीच्या सगळ्या गोष्टींविषयी बोलण्यासाठी वेळ घेत होता. त्याला तिला शांतपणे ती दुखावली जाणार नाही, तिला धक्का बसणार नाही मुळात तिचा गैरसमज होणार नाही अश्या पद्धतीने त्याला सगळं सांगायचं होतं. तो सद्या याच एका विचारात होता बाकी डॉ. विशालने दिलेल्या सुचना, सल्ले सगळ्याचं पालन आता करुन झालेलं होतं. आता तिची पुरुषांविषयीची भिती, अनोळखी माणसांबद्दलची भिती, स्पर्शाची घृणा, रात्री बाहेर पडण्याचं भय, स्वतःबद्दल वाटणारी असुरक्षीतता, स्वतःच्या शरिराचा तिरस्कार आणि सतत विचार करणं, अस्वस्थ होणं त्यातून येणारे पॅनिक अॅटॅक हे सगळं आता मागे पडलं होतं. तिच्यासाठी सगळं मळभ दूर झालं होतं आणि आता आकाशातलं इंद्रधनुष्य स्पष्ट दिसत होतं. त्यातले त्यांच्या प्रेमाचे आणि नव्या नात्यांचे रंग खुणावत होते. त्या घटनेनं उन्मळून पडलेली ती आता पुर्णपणे सावरली होती. आजूबाजूच्या जगाकडे, माणसांकडे नव्या चांगल्या नजरेने पाहू लागली होती. कोणाला आपल्या दिसण्यावरून, बोलण्यावरून काय वाटेल यापेक्षा स्वतःला जे वाटतं तेच ती करायची जो तिचा आधीचा स्वभाव होता तो पुन्हा परत आला. तिचा आत्मविश्वास पुन्हा मिळाला. आरश्यात स्वतःकडे पाहताना जुन्या आठवणी डोळ्यात येईनाश्या झाल्या. बर्‍याचश्या गोड आठवणी मनात तरंगायच्या ज्यात तिला फक्त विक्रम दिसायचा. तिने ठरवलं होतं, आता आपल्याला काहीही नकोय. खूप काही मिळालय आपल्याला! आपल्यावरती भरभरून प्रेम करणारा, आपल्या मनाचा, शरिराचा आदर करणारा, आपली काळजी करणारा, आपल्या पाठिशी असणारा नवरा मिळावा हीच प्रत्येकीची इच्छा असते जी पुर्ण झाली आपल्या बाबतीत. आता अजून आपल्याला काही नको ना महागड्या भेटवस्तू, दागदागिने, उगीचच मिरवण्यासाठी घरातले अधिकार काही नको फक्त त्याची सोबत हवी. आता तो कधी चुकला कधी रागावला कधीही काही झालं तरी आपण समजूनही घ्यायला हवं आणि आयुष्यात कधीही त्याच्यासोबत भांडायचं नाही! त्याचा स्वभाव आपल्याला माहीत आहे न मग झालं तर एखादेवेळी काही खटकलं, मतं नाही जुळली, निर्णय नाही आवडले तर शांतपणे बोलायचं, त्याला समजवायचं थोडं आपण समजून घ्यायचं पण अस काहीही वागायचं नाही की लग्नासारखं बंधन पणाला लागेल! कारण आपल्याला या लग्नातून खरं प्रेम मिळालय आणि खरं प्रेम हे आयुष्यात वारंवार नाही येत!

तिच्या मनात हल्ली त्यांच्याविषयी, त्यांच्या नात्याविषयी बरेचसे विचार सुरु असायचे. भविष्याची गोड स्वप्नं रंगवण्यात ती हरवून जायची. नववर्ष सुरु होऊन आता पंधरवडा होत आला होता तरीही स्नेहसंमेलनाचा तो दिवस खासकरुन ती रात्र तिच्या नजरेसमोरून हलत नव्हती. त्या रात्री कार्यक्रमादरम्याने प्राचार्यांच्या मिसेस आणि खंदारेमॅडम जे बोलल्या ते मात्र तिच्या मनात घर करुन राहिलं आणि पाहता पाहता बाळाच्या गोड विचाराने तिच मन व्यापून टाकलं. एक दिवस ती ड्रायवरकाकांसोबत गाडीने घरी येत होती. त्यांनी नेहमीप्रमाणे गाडी बंगल्याच्या आधीच्या चौकातून पुढे वळवली आणि अचानक करकचून ब्रेक दाबल्याचा आवाज आला. तिने डोक सिटला टेकलं होतं आणि डोळे मिटले होते. अचानक गाडी थांबल्याची चाहूल लागली आणि तिने पटकन डोळे उघडले समोर पाहते तर एक पाच सहा वर्षाची छोटी गाडीसमोर होती !

" वहिनी , ते ती अचानक अशी समोर आली....." ड्रायवरकाकांनी स्पष्टीकरण द्यायला सुरुवात केली.
" असु द्या असु द्या थांबा " ती पटकन गाडीतून उतरली आणि त्या रस्त्यात बसलेल्या मुलीसमोर जाऊन गुडघ्यावरती बसली. पिवळ्या रंगाचा जाळीदार फ्रॉक, गोरा गोरा वर्ण, गोबरे गाल आणि दोन्ही कानांवर रबरने बांधलेले छोटुसे बो अशी ती छोटी खाली बसलेली.
" काय ग लागलं का तुला बघू बघू गुडघ्याला खरचटलं का " अनघाने पटकन तिच्या गुडघ्यावरती फुंकर मारली तशी ती छोटी खुदकन हसली.
" नायी नायी माझा बॉल त्याला माती लागली " तिने आपल्या बॉलला लागलेली माती तिच्या छोटुश्या हातांनी झटकली. अनघाने तिचे गाल ओढले.
" शहाणी बॉल ला माती लागली ! अस येतात घरातून बाहेर पडलीस मग कुठे " 
" हा हा मी नाही पडत....." ती खुदकन हसत म्हणाली.
" बरं काय नाव तुझं ?" अनघाला वाटलं तिच्यासोबत बोलतच राहावं. तिने तिच्या फ्रॉकला लागलेली माती हाताने झटकत विचारलं.
" परी तुझं ? " त्या छोटीने विचारलं.
" माझं नाव अनु " ती तिच्या दोन्ही हातांनी त्या परीला उठवत म्हणाली.
" हा "
" बरं कुठे तुझं घर ? " अनघाने विचारलं तस तिने समोरच्या बंगल्याकडे बोट दाखवलं.
" हं...गुड चल आपण तुझ्या घरी जाऊ " तिने तिचा बॉल तिच्या हातात दिला इतक्यात रस्ता क्रॉस करत एक मध्यमवयीन गृहस्थ त्या बंगल्यातून बाहेर आले.
" परी ताई इथं हायसा व्हय किती हुडकायचं तुमास्नी " गुडघ्यापर्यंत धोतर त्यावर सदरा, पायात कोल्हापुरी चपला अश्या पेहरावातले ते गृहस्थ त्या मुलीला पाहून धावत तिथे आले होते. त्यांच्या सुरकुतल्या चेहर्‍यावरची काळजी तिला दिसली.
" हा मी खेळत होते माझा बॉल इकडे आला ना " ती परी हातातल्या बॉलकडे पाहत म्हणाली.
" बरं चला आई वाट बघतिया " त्या गृहस्थांनी तिचा हात पकडला. त्यांच्या चेहर्‍यावरची काळजी अनघाने पाहिली.
" सॉरी अहो ते आमच्या गाडीसमोर " 
" असु द्या आमच्या परीताई लयी मस्ती करत्यात बगा बरं निगू आमी " ते कौतुकाने बोलले.
" हो या या " ती म्हणाली तसे ते गृहस्थ तिला घेऊन जायला वळले. रस्ता क्रॉस करुन ते बंगल्याच्या फाटकापाशी गेले. त्या परीने मागे वळून पाहिलं आणि हसून अनघाला टाटा केला. अनघाने नकळत तिच्यासारखा हात उंचावून तिला बाय केलं. ते दोघं आतमध्ये जाईपर्यंत अनघा तिच्याकडे पाहत राहिली.
......................,.,...........
 
घरी आल्यानंतर ड्रायवरकाकांनी गाडी व्यवस्थित पार्क केली. ती त्या परीच्याच विचारात होती. घरी आल्यानंतरही ती इकडेतिकडे कोणाशी न बोलता सरळ खोलीत निघून आली. तिने पर्स वॉर्डरोबमध्ये ठेवली. वॉशरुमला न जाताच ती काहीतरी पटकन लक्षात आल्यासारख्या आविर्भावात स्टडीटेबलची खुर्ची ओढून बसली. तिने हातात पेन घेतलं आणि समोरचा कोरा कागद ओढून घेतला. पेन हनुवटीला टेकवत थोडासा विचार केला आणि कागदावरती एक नाव लिहिलं,  '  अन्वी ' 
' अन्वी किती गोड ना! अनघा आणि विक्रम दोघांना जोडणारी छोटीशी परी अन्वी! आमच्यामध्ये छोटी अनु आली तर तिचं नाव ' अन्वी ' ठेवणार मी....मी म्हणजे विक्रमला पण आवडेल की हे नाव ' मग तिच्या मनात अजून एक विचार आला, हा पण छोटा विक्रम असेल तर.....तर काय बरं ठेवायचं नाव ? तिने पुन्हा विचार केला आणि हसत दुसरं नाव लिहिलं, ' अन्वय ' 
त्या नावांवरून तिने अलगद हात फिरवला. पण हिरमुसून तिने हातातला पेन खाली ठेवला. ' हे किती काही आपल्याला वाटत असलं तरी विक्रमसोबत बोलायला तर हवं आधी. आम्ही मनाने जवळ असलो तरीही आमचं नातं अजून आहे तिथेच आहे ते निदान एक पाऊल पुढे तरी जायला हवं. आमच्यातला दुरावा संपायला हवा आता. ' ती या विचारात होती इतक्यात तो आत आला. तिला अस स्वतःशीच हसताना त्याने पाहिलं.

" काय मॅडम कुठल्या विचारात! आल्या आल्या काय काम घेऊन बसलीस ! " तो नुकताच कॉलेजमधून आला होता. त्याने ब्लेझर काढून बाजूला ठेवला. त्याच्या बोलण्याने ती भानावरती आली.
" आ.....नथिंग असच अरे! झाली तुझी मिटींग " तिने कागद पटकन पुस्तकात लपवला.
" हा झाली " तो वॉशरूमकडे जायला वळला.
" विक्रम, ' अन्वी ' नाव कसं वाटतं तुला ?" तिने खुर्चीतूनच मागे वळून विचारलं.
" छान आहे ! का ग " त्याने सहज म्हटलं.
" असच.....सहज एका न्यु फ्रेंन्डचं आहे " तिने कारण ठोकून दिलं.
" हा बरं "  त्याला तिच्या डोक्यातल्या इतक्या पुढच्या विचारांची अजिबात कल्पना नव्हती. तिला मात्र मनातून हसू येत होतं. 
....................................
नव्या नवलाईचा जानेवारी आता थोड्याच दिवसांनी संपणार होता. सगळ्यांना ' हॅपी न्यु इयर ' म्हणता म्हणता जानेवारीचा पंधरवडाही उलटून गेला होता. आता सगळे पुन्हा पटापट लेक्चर्स घेण्याकडे लक्ष द्यायला लागले. पाहता पाहता फेब्रुवारी मार्च जवळ येईल आणि परिक्षांचे वेध लागतील त्यामुळे सगळ्यांनी आता आपापला अभ्यासक्रम पुर्ण करायला कॉलेजमध्ये सुरुवात केली होती. अनघाने आता  घर आणि विक्रमसोबतच्या भविष्याच्या तिच्या रोमँन्टिक कल्पनांना जरा वेळ बाजूला ठेवून आता विद्यार्थ्यांकडे लक्ष द्यायचं ठरवलं. गुरुकुल मध्ये रूजु झाल्यापासून आणि खास करुन या शिक्षकीपेशात काम करत असताना तिच्या एक गोष्ट लक्षात आली होती. आपलं वैयक्तीक आयुष्य छान चाललेलं असो वा बिघडलेलं ते विचार डोक्यात घेऊन कामावरती जायला आपण काही एखाद्या अॉफिस वा कॉर्पोरैट ठिकाणी काम करित नाही की कामाचे तास भरले की निघा घरी जायला. आपल्याला मुलांना शिकवायचय ज्यावर त्यांचं भविष्य अवलंबून आहे त्यामुळे आपल्याकडून विद्यादानासारख्या कामात तरी चूक होता नये. आपण आपल्याकडून शंभर टक्के विद्यार्थ्यांना द्यायला हवं तेव्हाच त्यांच्या गुणपत्रिकांच्या रुपात आपल्याला हजार टक्के समाधान मिळेल. आपण जेव्हा इतरांना कॉलेजविषयी आणि विद्यार्थ्यांच्या भल्याविषयी तत्वज्ञान सांगत असतो तेव्हा आपणही तस वागायला हवं याच विचाराने ती आता पुन्हा झपाटून कामाला लागली. यावर्षीही आपल्या विषयाचे निकाल शंभर टक्के यावेत यासाठी तिने प्रयत्न करायचे ठरवलं मग ज्यादा लेक्चर्स घेणं असो की मुलांना ज्यादा नोट्स देणं असो, मुलांच्या काही वैयक्तीक अडचणी असतील तर त्याबद्दल चौकशी करुन माहिती ठेवणं असो ती तिच्या परीने प्रयत्न करत होती आणि तिच्या या कामाबद्दलच्या डेडीकेशनचं विक्रमला भारी कौतुक असायचं. कधी कधी तर तो झोपायला गेला तरीही ती रात्रीची जागी राहून कॉलेजचं काम करत असायची मग मधूनच तो उठला की तिला कॉफी करुन द्यायचा. कधीकधी तर ती टेबलला डोक टेकून पुस्तकं वाचता वाचता झोपून जायची मग तिला उठवून झोपायलाही त्यालाच आणावं लागायचं. 
एकदा रात्री ती अशीच दुसर्‍या दिवशी शिकवायला सुरु करायच्या टॉपिकच्या नोट्स काढत बसली होती.  त्याला एक दोन मेल्स पाठवायचे. ते काम त्याने पटकन आटोपलं आणि लॅपटॉप बंद केला.
" चला संपलं हे एकदाचं " 
" काय रे काय संपलं ?" ती स्टडीटेबलला बसली होती.
" हेच ग इमेल्स पाठवायचे " 


त्याने लॅपटॉप उचलून टेबलवरती ठेवून दिला.
" काय मॅडम झोपताय की कामच करणार !" त्याने बेडवरची आपली उशी व्यवस्थित करत म्हटलं.
" आ......हो झोपते थोडा वेळ तू झोप ना " ती पुस्तकात मान खुपसून बोलत होती.
" ओके गुडनाईट स्वीट ड्रीम्स मला झोप आलीय खूपच " त्याने उशीला डोक टेकलं आणि जरा बरं वाटलं. आता मस्तपैकी झोपायचं या विचारात त्याने पटकन डोळे मिटले. 
.........................................
 पंधराएक मिनिटं अशीच गेली. ती शांतपणे वाचत होती, काही पाँईंन्ट्स हायलाटरने अधोरेखित करत होती आणि सहज तिने खुर्चीतून मागे वळून पाहिलं, तो शांतपणे झोपला होता. ती गालाला हात टेकुन पाहत होती आणि अचानक काहीतरी तिच्या डोक्यात आलं आणि ती हसली.
" विक्रम उठ ना " तिने खुर्चीतूनच त्याला हाक मारली.
" उठ ना....लवकर " तिने पुन्हा म्हटलं.
" काय ग....." त्याने डोळे न उघडताच कूस बदलली.
" उठ ना....." ती पुन्हा बोलली तसे त्याने डोळे उघडले.
" काय झोप आता लवकर " तो अजून उठला नव्हता.
" नाही, आधी कॉफी " ती म्हणाली तसा तो कंटाळलेल्या चेहर्‍याने म्हणाला, " काही नाही कॉफीबिफी झोपा आता नी मलापण झोपू द्या " 
" उठ ना रे "
" अनु झोप एक वाजला " 
" ज्जा तुझं प्रेमच नाही माझ्यावर विक्रम "  तिने नेहमीच अस्त्र बाहेर काढलं. ते शब्द ऐकून त्याने पटकन डोळे उघडले आणि तो उठून बसला.
" काहीही काय ग ! " तो म्हणाला आणि त्याच्याकडे बघून ती फसकन हसली.
" हा हा आता कसा उठलास आता लवकर लवकर कॉफी बनव " 
" हं........" तो तिने केलेल्या मस्करीने चिडला होता.
" सॉरी " तिने आपले दोन्ही कान पकडले तसा तो हसला आणि दरवाजा उघडून बाहेर गेला. थोड्यावेळाने
तिने उठून बेसिनजवळ जाऊन चेहर्‍यावरती पाण्याचे हबकारे मारले तस बरं वाटलं आणि डोळ्यांवरची झोपही पळाली. ती पुन्हा खुर्चीत येऊन बसली. टेबलवरचा पुस्तकांचा आणि कागदांचा पसारा तिने आवरायला घेतला इतक्यात टेबलवरती त्याने कॉफीमग टेकवला.
" अरेवा झालीसुद्धा कॉफी " तिने गरमागरम कॉफीच्या वाफा पाहत म्हटलं आणि मग हातात घेतला.
" सांगा कशी झाली ते आता इतक्या मेहनतीने बनवलीय तर" त्याने स्वतःचा कॉफीमग हातात घेत म्हटलं.
" आ....नाईस हा " तिने कॉफीचा एक घोट घेतला. " पण साखर कमी पडली " 
" हो का नाही ग कमी कशी असेल! "  त्याने आश्चर्याने पटकन आपल्या हातातल्या कॉफीमगमधल्या कॉफीचे घोट घेतले.
" काहीही याच्यापेक्षा गोड! अनु तुला स्वीट डिश का ग इतक्या आवडतात ?" त्याने म्हटलं आणि त्याला काही कळायच्या आत तिने पटकन त्याच्या हातातला कॉफीमग आपल्याकडे घेतला.
" अग ए दोन कप एकटीने...This's not good " तो फार हुशार असल्याच्या आविर्भावात बोलला. ती नुसतच हसली आणि त्याच्या कपमधल्या कॉफीचे दोन घोट प्यायली.
" हं......आता झाली की नाही गोड!" ती हसत म्हणाली. तो तिच्या खुर्चीच्या बाजूला उभा होता. ती हसली अन तो खुर्चीमागे येऊन उभा राहिला आणि अलगदपणे त्याने आपले हात तिच्या गळ्याभोवती गुंफले.
" अनु.....तुला इतक गोड आवडत मला नव्हतं हा माहीत! बरं आता मी मिठाईपेक्षासुद्धा गोड वागेन हं....." त्याने अलगदपणे तिच्या कानावरच्या केसांच्या बटा बाजूला सारल्या.
" काही नको......झोप तू " तिने लाजत नजर खाली वळवली.
" बघ हा नक्की!" 
" हो " त्याच्या हातांवरती तिने आपले हात ठेवले होते.
" बरं, पण मला सोडशील तर जाईन ना " तो हसत म्हणाला तसे तिने पटकन तिचे हात बाजूला केले त्यावर तो अजून हसला.
" काय ग अनु तू !  माझी वेडाबाई चला कॉफी पी थंड होईल " त्याने तिच्या गळ्याभोवतीचे हात बाजूला केले.
" या कपमधली कोण पिणार ?" ती हिरमुसून म्हणाली.
" हो हो घेतोय " त्याने तिचा कॉफीमग आपल्या हातात घेतला आणि हसतच ओठाला लावला. 
" हं.....खूपच गोड आहे !" त्याने हसत तिच्याकडे पाहत म्हटलं.
......................................
कॉलेजमध्ये सगळं नेहमीप्रमाणे सुरळीत चाललं होतं. त्याचा अनघासोबतचा, घरच्यांसोबतचा दिवसही नेहमीप्रमाणे छान जायचा. दररोज कॉलेजला एकत्र जाणं एकत्र येणं, संध्याकाळी कॉलेजचं काम करताना एकमेकांना मदत करणं, तिचे छोटे छोटे हट्ट पुरवणं, मधूनच नीतू किंवा जितेंद्रची चिडवाचिडवी सगळं छान सुरु होतं तरीही एक अनामिक भिती त्याच्या मनात होती. गॅदरिंगचा दिवस छान गेला होता. रात्र तर तिच्यासाठी फार सुंदर होती तरीही राहून राहून राजेशचं बोलणं त्याला मधूनच आठवायचं आणि मनात धस्स व्हायचं. त्याने हल्ली  राजेशचे फोन उचलणं बंद केलं होतं. त्याच्या मेसेजेसनाही विक्रम कधीतरी उत्तर द्यायचा. राजेशच्या बोलण्याची पहिल्यासारखी भिती त्याला वाटेना. त्याला वाटायचं, तेव्हाची परिस्थिती वेगळी होती. तेव्हा तिला हे सगळं खरं समजणं तिच्यासाठी चांगलं नव्हतं. तिचं मन अजून कोलमडून गेलं असतं पण आता तस नाही होणार. आपण तिच्यासोबत असणार आहोत आणि प्रेम तर आहेच फक्त आपल्याला खरं बोलायचं आहे आणि तेही लवकरच आणि सगळ्यात महत्त्वाचं होतं ते विश्वास! त्याने जणू मनाशी खात्रीच केली होती, आपण सत्य सांगितल्यावरती ती चिडेल पण आपण आपल्या चुका मान्य केल्या आणि आपण खरं बोलतोय म्हटल्यावरती तिला बरं वाटेल उलट. हाच विचार तो करत होता त्यामुळे राजेशकडची अॉडीओ क्लीप आणि त्याचे परिणाम याची त्याला आता भिती नव्हती तरीही हल्ली दोन तीन दिवसात राजेशने पुन्हा त्याला फोन केले त्यावर एकदाच शेवटचं राजेशला भेटायचं त्याने ठरवलं. ते भेटणार होते त्या दिवशी सकाळीच राजेश मात्र तावातावाने गुरुकुलला आला.

" हॅलो My friend " विक्रमच्या केबिनचा दरवाजा लोटत त्याने कुत्सिकपणे हसत म्हटलं. राजेशच्या आवाजाने त्याने फाईलमधून नजर पटकन वरती वळवली.

" राजेश तू !  What're you doing here इथे का आलायस तू ?"  तो पटकन चेअरवरून उठला.
" अरे Wait Wait आत तर येऊ दे मला " राजेश पुढे आला आणि केबिनचा दरवाजा त्याने लावून घेतला.
" तू इथे का आलायस ? आपण भेटणार होतो ना आज! इथे यायची काय गरज होती "  
" अरे यार बाहेर काय आणि इथे काय बोलणार तर आपण सेमच टॉपीक ना ' तुझी अनघा ' " तो कुत्सिकपणे हसला. त्याने रागाने राजेशकडे पाहिलं.
" अरे हो हो किती चिडतोस विक्रम! मला बोलू तर दे...." 
" राजेश इथून पुढे एक रुपयाही मिळणार नाहीय तुला " विक्रमने रागाने म्हटलं तस राजेश मनातून म्हणाला, ' अरे मित्रा, पैसे हवेत कुणाला मला फक्त तुला बरबाद झालेलं बघायचय '

" हो आणि तीच आठवण करुन द्यायला आलोय तुला. तू आपल्यात काय डील झालं होतं ते विसरलास विक्रम. तू जर पैसे दिले नाहीस तर ती आपल्या कॉनव्हरसेशनची अॉडीओक्लीप " 
" मी नाही घाबरत तुझ्या धमक्यांना! तेव्हा माझे हात दगडाखाली होते रादर मला गरज होती त्या वेळेची म्हणून मी शांतपणे तुझं ऐकून घेत आलो बट Don't get me wrong तुला काय वाटलं, तू हे उठसूट येऊन मला ब्लॅकमेल करशील नी मी घाबरून राहिन " त्याने म्हटलं तसा राजेश समोर आला.
" हो का मग त्या अॉडीओक्लीपचं काय? ती तर खरीय ना हे बघ विक्रम, ती तुझ्या या गोड वागण्याला आणि स्मार्ट चेहर्‍याला फसली असेल पण खरं काय आहे ते त्या अॉडीओक्लीपमध्ये आहे सो ठरवं " 
" राजेश मला काही फरक पडत नाही....." विक्रमने त्याला निःक्षून सांगितलं.
" हो का मग ती क्लीप तिच्यापर्यंत पोचवायची मी व्यवस्था करतो बघू हा प्रेमाचा रंग किती दिवस टिकतो ते!" राजेश म्हणाला तसा तो ठामपणे उत्तरला,
" त्याची गरजच नाही उरणार राजेश! कारण मीच माझ्या तोंडून सत्य काय आहे ते सांगणारय. Do you understand " त्याच्या या बोलण्यावर राजेश खो खो हसत सुटला.

" विक्रम, Are you mad ? O My God ! अरे काय हे विक्रम तुझा रूबाब हा कॉलेजमधला दरारा,  तुझा अॅटीट्युड त्या पोरीसमोर कुठे जातो तेच मला आजपर्यंत कळलेलं नाही! क्या बात त्या एका रात्रीत एवढी जादू झाली की "
" Just shut up राजेश " 
" अरे ! आता खरं तेच बोललो की बघ ना एका मुलीसाठी किती न काय काय केलयस तू! आधी काय तर म्हणे तिचा सूड घ्यायचा होता मग काय तुला ते काय रिग्रेट वाटला म्हणून तू लग्न केलंस मग काय तिच्याच प्रेमात पडलास वा! एखादी मुव्ही नक्कीच बनेल यावर " 
" राजेश तुझी बडबड ऐकायला I've no time " 
" ऐकावं लागेल विक्रम, ऐकावच लागेल त्या पोरीपायी तु माझ्यावर हात उगारलास आपली फ्रेन्डशीप तोडलीस मला त्या रात्री गोडावूनमधून हाकलून दिलस काहीही विसरलेलो नाहीय मी आणि तुला काय वाटतं रे तू सत्यवचनी होणार मग काय ती तुला माफ वगेरे करणारय का!" राजेश हसत म्हणाला.
" ते माझंं मी बघून घेईन नी परिणामांची चिंता कधी केली नाही नी करणारही नाही. कोणाला काय वाटतं याच्याशी मला देणघेणं नाही तेव्हा  नकळत माझ्या हातून जे घडलं त्याची रिसपोन्सिबीलीटी मी घेतली तेव्हाही मी कसली पर्वा केली नव्हती नी आताही करत नाही "
" विक्रम यार एवढा प्रामाणिक कधी पासून झालास तू!" राजेश त्याच्या बोलण्याची खिल्ली उडवत म्हणाला.
" विक्रम मुर्खपणा केलायस तू या लग्नाने बाकी नथिंग स्वतःच्याच पायावरती कुर्‍हाड मारून घेण्याचा प्रकार आहे हा. एक दिवस त्या पोरीपायी स्वतःला पणाला लावशील तू!"
" हो हो मी तेही करेन वेळ आलीच तर " तो ठामपणे बोलला.
" हं करा काय ते! मलाही बघायचं तुझं हे सोकॉल्ड प्रेम किती दिवस टिकतं ते! गुडबाय " राजेशने हसून म्हटलं आणि केबिनचं दार उघडून तो बाहेर पडला.

' विक्रम तू तिच्या प्रेमात इतका वाहावत गेलायस ना तुझी बुद्धीपण काम करेनाशी झालीय. अरे माझ्या डॅडचा पैसा दोन्ही हातांनी मी उधळला तरी मला कोण जाब विचारणारय मला काय रे पैश्यांची गरज सो मलाही हे डील कंटीन्यु करण्यापेक्षा मोडण्यातच जास्ती इंन्टरेस्ट होता त्याशिवाय मी तुझ्या लाडक्या बायकोला खरं कस सांगणार! आता बघ पुढे काय होतय ते! आता जो भूकंप होईल ना त्याचा आवाज भाऊसाहेबांच्या कानापर्यंत पोचेल. नाही तुझ्या या सोकॉल्ड प्रेमाची आणि या प्रतिष्ठेची लक्तरं सांगलीच्या वेशीवर टांगली तर राजेश नाही मी ' मनाशी हाच विचार करुन तो तरातरा तिथून बाहेर पडला.
................................................
दुपारी कॉलेज सुटण्याची वेळ झाली. अनघा शेवटचं लेक्चर आटोपून खंदारे मॅडमच्या केबिनमध्ये बसली होती. क्लास टेस्टच्या पेपर्स बद्दल त्या बोलत होत्या. मॅडमनी घड्याळात पाहिलं तर साडेबारा झालेले.
" ओके आता बाकी उद्या पाहूया " त्यांनी पेनड्राईव तिच्या हातात दिला.
" ओके मॅम थँक्स हा " ती खुर्चीतून उठली आणि केबिनचा दरवाजा बाहेर जाण्यासाठी लोटला. दोन पावलं चालली इतक्यात सँडलचे पट्टे तुटले.
" च्च आता !" 
" काय ग थांबलीस का!" मॅडमने बाहेर लक्ष टाकत म्हटलं. तिने खाली पायांकडे नजर टाकली तस मॅडमच्या लक्षात आलं.
" ओके ओके ठेव आता काढून ते अशी लंगडत पायर्‍या उतरणारायस!" त्या आतून म्हणाल्या.
तिने थोडस चालायचा प्रयत्न केला, जमेना मग तशीच मागे वळली आणि आत आली.
" बाहेर जाणार आहात का " मॅडमने विचारलं.
" नाही ओ आता घरीच " ती सँडल्स कोपर्‍यात काढून ठेवत बोलली.
" हो न मग असो राहु दे " 
" हं.....ओके बाय " ती अनवाणी पायानेच तिथून बाहेर पडली.  
.........................................
ती पायर्‍या उतरुन खाली आवारात आली. सगळीकडे टाईल्स बसवलेल्या होत्या त्यामुळे तिला अस अनवाणी चालतानाही बरं वाटलं. ती चालत चालत पार्किंगस्लोट च्या दिशेनं येत होती. इतक्यात मागून दोन तीन विद्यार्थी धावत आले.
" मॅडम मॅडम " त्यांच्या खांद्यावरच्या सॅक आणि हातातल्या जर्नल्स सावरत ते तिच्यामागून धावत आले.
" काय रे "  ती मागे वळली.
" सबमिशन साइन प्लीज " त्यांनी पटापटा जर्नल्स उघडून तिच्या हातात दिल्या. तिने पटापटा सह्या करुन टाकल्या.
"थँक्यु मॅडम "  मुलं एका सुरात बोलली आणि तशीच पळत कॉलेजमध्ये गेली. 
आता उन्हही तापायला लागलं होतं. तिला कधी एकदाचं गाडीत जाऊन बसतो अस वाटलं. तिने इकडेतिकडे पाहिलं तर तो नव्हता. ती पाच दहा मिनिटं तिथेच त्याची वाट पाहत उभी राहिली. नंतर गेटबाहेर तिची नजर गेली तर तो कार वळवून बाहेर थांबलेला. ती धावत जाणार तोच तिथे प्राचार्यांची आत येणारी गाडी थांबली आणि ते उतरले आणि त्याच्याशी बोलायला लागले. तिचे पाय भाजून निघाले. ती चालत चालत गेटमधून बाहेर आली. बाहेर आवारात सिमेंन्ट खडीचं क्राँक्रिट होतं. 


कुठे मातीचा लवलेशही नव्हता. ती चालत चालत पुढे आली.
तो प्राचार्यांसोबत बोलण्यात गुंतला होता. त्याचं लक्षही नव्हतं. ती समोरून चालत आली.
" बघा मॅडम आल्या " करंबेळकर सर म्हणाले. ती तशीच त्याच्या बाजूला येऊन हसून उभी राहिली.
" ओके येऊ मी? मॅडम तुम्हीही या आमच्या लेकीची एन्गेजमेंन्ट आहे पुढच्या महिन्यात "
" हो हो नक्की " ती छानस हसत म्हणाली.
" ओके सर येऊ आम्ही " विक्रम म्हणाला तस प्राचार्य ओके बोलून पुन्हा गाडीत बसले. 
त्यांची गाडी पुढे गेली तसा तिने सुटकेचा श्वास घेतला. तिच्या पायांना उन्हाचे चटके बसत होते. 
" काय हे किती वेट करायचा !" तो रागावला आणि ड्रायविंगसीटला येऊन बसला.
" सॉरी " ती दरवाजा उघडून गाडीत बसली. त्याने घराकडे गाडी वळवली.
.................................................
थोड्याच वेळात ते घरी पोहचले. गाडीत बसल्यानंतरही ती  आपण असे अनवाणी उन्हात उभे राहिलो याबद्दल काही बोलली नव्हती. नेहमीसारख्या गाडीत तिने गप्पा मारल्या.  त्याने गाडी पार्क केली.
" चला पोचलो एकदाचे किती ऊन आहे नाही!"  त्याने गाडीतून उतरत म्हटलं.
" हं....." तीही खाली उतरली आणि पुढे चालायला लागली. 

" काय ग चेहरा का असा ! " त्याने मागून येत विचारलं. ती पुढे चालत होती.
" कुठे काय नथिंग! लेक्चर्स एक्स्ट्रा होती न सो " ती कसबस म्हणाली. कॉलेजमध्ये प्राचार्य त्याच्याशी बोलत होते तिथे उगीच आपण त्याला ' माझ्या सँडल्स तुटल्या ' सांगणं तिला कसतरी वाटलं. चारचौघात तिला अजिबात त्याने तिच्यासाठी काही करणं आवडायचं नाही. उगीचचा प्रेमाचा शो अस वाटायचं तिला ते! आताही तो पटकन तिच्या पायाशी वाकेल आणि म्हणेल बघू पायाला लागलं का जे तिला नको होतं. त्याला कुणी तिच्यावरून काही बोललेलं आवडायचं नाही. त्याला बाहेर इतका आदर आणि मान सन्मान आहे मग आपणही चारचौघात तो राखायला हवा अस तिला वाटायचं. माझ्या नवर्‍याचं माझ्यावर किती प्रेम आहे पहा अस तिला मिरवणं अजिबात आवडायचं नाही. ती तशीच गप्पपणे चालत पुढे गेली. त्यालाही आश्चर्य वाटलं मग वाटलं रागवली असेल कदाचित. 
................................
थोड्यावेळाने तो रुममध्ये आला. दरवाजा लोटून आत आला तर ती फ्रेश न होता तशीच बेडवरती बसली होती आणि हातात कसलीशी क्रिम होती. ती पायाच्या तळव्यांना खाली मानेन स्वतःच्याच तंद्रीत मलम लावत बसली होती. तिचे मोकळे केस खाद्यांवरून पुढे आले होते. तो आत आला आणि क्षणभर तिच्याकडे पाहत राहिला मग लक्षात आलं तिच्या हातात कसलस क्रिम आहे.

" अनु काय ग काय झालं ?" तो पटकन पुढे आला आणि तिच्या समोर बसला. तिच्या पायांना उन्हाने भाजल्याच्या खूणा होत्या.
" काय हे बघू " त्याने अलगदपणे पायांवरून हात फिरवला.
" अरे काही नाही जस्ट सँडल्स तुटल्या खंदारे मॅडमच्या केबिनमध्येच मग एवढ्या पायर्‍या उतरून कुठे लंगडत खाली येऊ म्हणून अनवाणी....."
" काय हे मला सांगायचस तरी " तो काळजीने  पायांवरुन हात फिरवत म्हणाला तशी ती फसकन हसली.
" तू ! तुला सांगून काय होणार ! ते डेलिसोपमध्ये दाखवतात तस उचलून आणणार होतास का मला " 
" तस नाही नवीन सँडल्स "
" असु दे....घरी आहेत ढिगभर दहा मिनीटांचा रस्ता त्याच्यासाठी नसता खटाटोप कशाला " ती हसत म्हणाली.
" असु दे हसू नकोस " त्याने क्रिम तिच्या हातातनं काढून घेतलं.
" बघू " त्याने हळूहळू तिच्या पायाच्या तळव्यांना मलम लावायला सुरुवात केली तेवढ्यात तिच्या उजव्या पायाच्या अंगठ्याकडे लक्ष गेलं तर चक्क तिथे छोटूशी बँन्डेजपट्टी !
" अग काय हे! हे कधी लागलं?" त्याने आश्चर्याने विचारलं.
" ते तुझ्या तायक्वाँदो चे परिणाम! एवढं हट्टाने पाठवलस न मला ! " ती रुसून म्हणाली.
" हा कधी लागलं हे पण " 
" ते असच परवा क्लासला असु दे आता ठिकय " ती हसली.
" सांगायचस तरी अजून कुठे लागलय का बघू " त्याने बिचार्‍याने काळजीपोटी मलम लावता लावता सहज म्हटलं.
" हा......तू लावणार मग मलम !" तिने डोळे मिचकावले आणि त्याचीच थट्टा सुरु केली.

" सॉरी तस नाही मिन्स....I mean to say की " तो पटकन स्वतःचे शब्द मागे घेत म्हणाला. त्याचा चेहरा ओशाळल्यासारखा झाला.
" ओके ओके " ती हसली.
" हसायला काय झालं! " त्याने हातातलं क्रीम बाजूला ठेवलं.
" आता थांबा जरा वेळ " तो तिथून उठला आणि ब्लेझर काढलं.
" अनु तुला कसला सिरियसनेसच नाही. पायाला लागलेलं माहीत होत ना तुला मग का उन्हातनं चाललीस अॅटलिस्ट कॉल करायचास माझ्या केबिनला तरी थांबायचस येऊन. मी नविन सँडल्स घेऊन आलो असतो नी अचानक घरी न येता बाहेर जायला लागलं असतं मग काय करणार होतीस !" तो वॉर्डरोब उघडत म्हणाला.
" अरे It's ok आता आलोत ना घरी ! नी मला नाही करेक्ट वाटलं ते उगीच कॉलेजमध्ये तुला अस काहीतरी काम सांगणं" 
" तू पण ना खरच असो पण take care आता " 
" हा " ती पायांकडे पाहत म्हणाली. त्याने खिश्यातला मोबाईल कॉर्नरपिसवर ठेवला आणि लक्षात आलं खिश्यात एक डेअरीमिल्कची कॅडबरी आहे! सकाळी नीतूने त्याला दिली होती. तिच्या एन.जी.ओ.ला म्हणे मोठा फंड मिळाला कुठल्यातरी व्यापार्‍याकडून म्हणून खूशीत तिने दोन कॅडबरीज आणल्या होत्या. एक स्वतःसाठी आणि दुसरी अनघासाठी! त्याला चिडवून चिडवून तिने ती त्याला दिली आणि तुझ्या हाताने तिला भरवलं म्हणून त्याला चिडवून ती पसार झाली तो प्रसंग त्याला आठवला आणि हसू आलं.

" अनु इकडे बघ " तो तिच्या समोर येऊन बसला.
" काय अरे " तिने सहज वरती पाहिलं. त्याने तिच्या समोर आपल्या हाताची मूठ उघडली तर त्यात कॅडबरी होती.
" वाव! डेरीमिल्क " तिने पटकन ती आपल्या हातात घेतली आणि पटापट रॅपर उघडायला लागली. तो तिच्या चेहर्‍यावरचा आनंद पाहत होता. 
" घे न " तिने ती त्याच्यासमोर धरली.
" नको नको तू घे " तो हातानेच नको म्हणाला.
" भरव ना तुझ्या हातांनी " ती हट्टाने म्हणाली. त्याने कॉर्नरपिसवरचा नॅपकीन ओढला आणि हात पुसले.
" ओके ओके " त्याने छोटूसा तुकडा मोडून तिला भरवला. ती हसली.
"थँक्यु " तिने अजून एक छोटूसा तुकडा मोडला आणि त्याच्या ओठांसमोर धरला.
" प्लीज प्लीज " ती हसून म्हणाली मग त्यानेही तो छोटासा कॅडबरीचा तुकडा खाल्ला.
" विक्रम थँक्यु बघ मी म्हणते ना तू सोबत असलास कि उन्हातसुद्धा तुझ्या सावलीने मला बरं वाटतं " तिने आपले दोन्ही हात त्याच्याभोवती गुंफले.
" हं.....थँक्स हा पण अनु या कॅडबरीपेक्षापण तुझी मिठी जास्त गोड असते माहितीय " तो हसत म्हणाला.
" चल काहीही सुचतं " ती लाजली तशी त्याने आपले दोन्ही हात तिच्याभोवती लपेटून घेतले. त्याला सांगावस वाटलं तिला, ' अनु आयुष्यात पुरुष कसेही वागले तरी उन्हाच्या झळा तुमच्याच वाट्याला येतात. आपल्या नात्यात तर तुला अजून बरेच चटके सहन करायचेत पण मी सोबत असेन. तु नको काळजी करु. ' 

क्रमशः
नमस्कार, कालपासून बरीच प्रतिक्षा केलीत तुम्ही I know...तर कथा जितकी सुंदर आणि पोझिटिव्ह आहे तितकं माझं प्रत्यक्ष आयुष्य अशांत,अस्थिर आहे......त्याचा परिणाम इथे होऊन नये एवढीच इच्छा असते म्हणून उशीर भाग कालच लिहून झाला पण शेवटचा पॅराग्राफ तयार नव्हता आणि उगीचच लिहायचं म्हणून नुसते शब्द मांडण्यात काही अर्थ नसतो अर्थात ईरावरची कुठलीही कथा तुम्हाला ती तितकीच सुंदर वाटते जितकी ही कथा पण कथालेखनाच्या सौंदर्याच्या माझ्या व्याख्या वेगळ्या आहेत ज्यात माझं लेखन मी बसवण्याचा प्रयत्न करते अर्थात मी इतकी मेहनत घेतली आणि जानेवारी पासून ही कथा लिहतेय प्रत्यक्ष कथा ब्लॉगवर मार्चला आली नी हा सप्टें 2020 आहे तब्बल आठ नऊ महिने झालेत मी दुसरं काहीही लिहलेल नाहीय या कथेशिवाय म्हणून प्रतिसादाचा विचार केला तर तो काही फार आहे असही नाही तरीही मी माझं बेस्ट द्यायचा प्रयत्न करेन आणि त्याकरता माझ्या वैयक्तीक गोष्टींचा परिणाम लेखनावरती आतापर्यंत झाला नव्हता,आताही होऊ नये अस वाटतं...बाकी आता आजचा भाग मुद्दामहून उन्हाचा संदर्भ घेतलेला आहे. ऊन, पाऊस,रात्र हे प्रतिकात्मकरीत्या इथे येतात अगदी त्याच्या गळ्यातील लॉकेट सुद्धा त्यामुळे लॉकेटचं पुढे काय ते कळेल....गेल्या भागात पुन्हा तो तिला मंदिरात घेऊन जातो तुम्हाला वाटत असेल सारखं मंदिर का! ते इतर ठिकाणी का नाही जात तर त्यांच्यातलं पवित्र नातं आणि त्याला वाटणारा त्या नात्याचा आदर हे सगळ दाखवण्यासाठी शांत वातावरण गरजेचं असतं आणि मंदिर किंवा मागे चर्चचाही संदर्भ आला होता ते त्यासाठीच. तिचं मंगळसूत्र, वटपौर्णिमा किंवा लग्नाचं सविस्तर वर्णन दाखवण्याचं कारण हेच होतं.....बाकी गोव्याचे भाग बरेच झाले ज्यात मूळ कथा बाजूला पडली की काय असं ते वाचताना वाटलं असेल तर त्याचंही उत्तर गेल्या भागात होतं, तिला आजूबाजूच जग सुंदर आहे हेच दाखवायचा त्याचा प्रयत्न म्हणजे गोव्याची ट्रिप.....चला भेटू लवकरच नव्या भागात.
Thank You

🎭 Series Post

View all