बंधन भाग 83

Social Love

भाग 83
( गेल्या भागात अनघा नवीन काहीतरी शिकण्याचं ठरवते आणि त्यासाठी विक्रम तिला मदत करेन अस म्हणतो. ती आता बर्‍यापैकी जुन्या आठवणींमधून सावरलीय पण आपण खरं काय ते तिला सांगत नाही तोपर्यंत आपलं नातं पुढे न्यायचं नाही अस तो ठरवतो पाहूया पुढे)

अनघाला आता विक्रमच्या घराची, घरातल्या माणसांची आणि विक्रमच्या सोबतीची सवय झाली होती. भाऊसाहेब, अरुंधती, आत्या, तिचे भावोजी आणि लाडकी नीतू यांच्या अवतीभवती असण्याने तिला एकदम सुरक्षित वाटायचं. यांच्याशिवाय आपल्याला करमणारच नाही हे तिच्या मनाशी आता पक्क झालं होतं अगदी घरी गेल्यानंतरही आपल्या जीवाला चैन पडत नाही हेही तिला माहीत होतं. यावरून नीतूसुद्धा तिला चिडवायची पण ती हसून सोडून द्यायची. तिला माहीत असायचं, आपल्याला विक्रम आजूबाजूला असण्याची, त्याच्यासोबत बोलण्याची इतकी सवय झाली आहे की तो नसेल तर मन त्याच्याभोवतीच घुटमळत राहतं. तिला त्याचं लग्नानंतरचं या वर्षभरातलं कोणतच वागणं कधी खटकलं नव्हतं. त्याने अगदी तिला रितसर ' प्रपोज ' करण्याआधी ते जेव्हा एकमेकाशी अंतर ठेवून वागायचे तेव्हाही तिला त्याचं सगळचं वागण आवडायचं. त्याचं समजावणं आवडायचं. त्याचं बोलणं ऐकत राहावस वाटायचं. त्यांच्यात मैत्री झाली आणि दोघांनी एकमेकांना मनाने आपलसं मानल्यानंतर तर तिला त्याची स्वप्नं, त्याची मेहनत, त्याची हुशारी कळली. त्याचा आई, आत्या आणि एकुणच भाऊसाहेब, नीतू, जितेंद्र सगळ्यांवरतीच किती जीव आहे ते कळलं. ती कॉलेजला जेव्हा रुजू झाली तेव्हापासून तो स्ट्रिक स्वभावाचा, अॅटीट्युड असणारा आणि कामाचं आणि परफेक्टनेसचं जणू व्यसन असणारा अशीच त्याची प्रतिमा सगळ्या कॉलेजमध्ये होती. तीसुद्धा कॉलेजच्या स्टाफमधली त्यामुळे तिलाही तसच वाटायचं पण लग्नानंतर कळलं, महत्त्वाकांक्षी, आत्मविश्वास असणारी आणि जबरदस्त व्यक्तीमत्व असणारी सगळीच माणसं दुसर्‍यांना कमी लेखणारी, अहंकारी आणि स्वतःच्या बुद्धीचा, दिसण्याचा, श्रीमंतीचा, प्रतिष्ठेचा टेंभा मिरवणारी नसतात पण तिला हेदेखील माहित होतं, त्याला कामात आणि वेळेच्या बाबतीतली दिरंगाई चालत नाही मग तो समोरचं माणूस कोणीही असलं तरी बोलणार. त्याला आपल्या दोघांमधल्या पर्सनल गोष्टींवरून टिंगल केलेली आवडत नाही आणि कोणत्याही नवरा बायकोच्या नात्यातल्या वैयक्तीक गोष्टींवरूनची चेष्टा मस्करी त्याला पटत नाही मग तो चिडतो. त्याला फारस रोमँन्टिक बोलता येत नाही जो त्याच्यातला दुर्गुण तिला आधी आवडायचा नाही पण एकाच माणसामध्ये सगळे चांगले गुण कसे मिळतील असही तिला वाटायचं त्यामुळे त्याचा जसा स्वभाव आहे कोणाला तो अॅटीट्युडवाला वाटायचा, कोणाला अजून काही पण तिला तो जसा आहे तसाच आवडायचा आणि त्याचं कारण होतं, त्याच्या स्वभावात कुठेही स्त्रियांबद्दल, त्यांच्या करीयर संसाराविषयी नको ती मानसिकता नसणं. तो तिला तिची 'स्पेस ' द्यायचा, तिचे निर्णय तिला घ्यायचं स्वातंंत्र्य होतं, तिला तो कधीही कमी लेखायचा नाही ना हुशारी, ना दिसण्याबाबत ना करियरबाबत. तिच्या हुशारीची आणि मेहनतीची कदर त्याला होती. तो तिच्याकडे आपली ' हक्काची बायको ' अस पाहण्यापेक्षाही आपली ' पार्टनर ' म्हणून पाहायचा. कधीकधी कॉलेजविषयीही तिच्यासोबत बोलायचा, तिची मतं घ्यायचा. तिच्याशिवाय घरातल्या इतरजणींना सुद्धा तो छान वागवायचा. तिची काळजी घ्यायचा आणि हक्क गाजवण्यापेक्षा तिच्यावरती प्रेम करायचा जे तिला खूप आवडायचं मग ती सारखी त्याला पिडत राहायची. त्याच्याकडून हट्ट पुरवून घ्यायला तिला आवडायचं. तिला त्या घटनेनंतर कधीच वाटलं नव्हतं, आपल्या शब्दाची किंमत ठेवणारा, आपले हट्ट पुरवणारा आणि आपले रुसवेफुगवे काढणारा एखादा माणूस आपल्या आयुष्यात येईल पण त्याच्या या गोड वागण्याने तिला आपण ' प्रिन्सेस ' असल्यासारख वाटायचं एका अत्याचाराने होरपळलेल्या मुलीसाठी याहून तो वेगळा आनंद काय !
त्या दिवशीच्या दुपारच्या त्याच्या वागण्याने तर ती मनातून हरखून गेली होती. त्या रात्रीच्या जखमा तिला सतत स्वतःकडे पाहताना त्या घटनेची आठवण करुन द्यायच्या. तिला ते आपल्या शरिरावरचे डाग वाटायचे आणि नकोसा जीव वाटायचा पण तो अस प्रेमाने वागला की मग त्या जखमासुद्धा तिला गोड वाटायच्या. त्या दिवशीचं दुपारचं त्याच वागणं आणि तिला समजावणं तिच्यासाठी अनपेक्षित होतं. त्याच्या त्या एका कृतीने तिला ते व्रण सुद्धा गोड वाटायला लागले आणि आता स्वतःला आरश्यात पाहताना तिच गोड आठवण आधी मनात तरंगायची. तिला त्या घटनेमुळे स्पर्श या भावनेचा तिरस्कार वाटायचा, किळस वाटायची. एखाद्याचा स्पर्श म्हणजे फक्त ओरबाडणं, आपलं वरून सुंदर दिसणार शरिर, चेहरा याची हाव वाटू शकते कोणालाही बाकी प्रेमबिम काही नसतं हेच तिने डोक्यात घेतल होतं पण विक्रमच्या मिठीत तिला छान वाटायचं, त्याच्या स्पर्शातली निरागसता, काळजी तिला जाणवायची. तिला हेही जाणवायचं, त्याला आपल्यावरती कसलाच हक्क नसतो गाजवायचा फक्त इतकच सांगायचं असतं, मी आहे ना सोबत. त्याच्यासमोर वावरताना त्याच्या नजरेत तिला काहीच वेगळ वाटायचं नाही उलट ती हसताना, सजताना तो खोलीत असला तरी छानसं हसत तिच्याकडे पाहत राहायचा.

 त्याचं अजूनही खाली बिछाना अंथरणं तिला आता नको वाटायचं मग तिने उगीचच वाढत्या थंडीचं कारण शोधून काढलं. एकदा रात्री जेवणं आटोपून खोलीत आल्यावरती त्याने नेहमीप्रमाणे बिछाना अंथरायला घेतला,
" चला मॅडम झोपा लवकर " त्याने बेडवरची उशी उचलली आणि अंथरलेल्या मॅट्रेसवरती नेऊन टेकवली. ब्लँकेटची घडी मोडली.
" काय ग अशी काय बसलीस !" ती बेडवरती विचार करत बसलेली पाहून तो ब्लँकेट पायावरती घेताना म्हणाला.
" नथिंग, ऐक ना " तिने बोटांची चाळवाचाळव केली.
" काय बोला बोला फास्ट " तो उशीला पाठ टेकणार इतक्यात ती म्हणाली, " ऐक ना, तू इथे का नाही झोपत ?" 
" कुठे! "  तो आश्चर्याने म्हणाला.
" इथे म्हणजे इथे " तिने बेडच्या एका टोकाला हात टेकवला.
" नको नको I mean इकडे ठिकय ग " तिच्या या अनपेक्षित बोलण्याने त्याच्यावरती बॉम्ब पडल्यासारखच त्याला वाटलं.
" हा.....,पण आधी तुला सवय नव्हती ना फरशीवरती झोपायची सो किती झोप होत असेल तुझी नीट काय माहीत !"  तिने कसनुस हसत म्हटलं.
" अरे नो प्रोब्लेम आता झाली सवय डोन्ट व्हरी झोप तू " तो संकोचत म्हणाला.
" हा......पण थंडी आहे न खूप You know winter days  सो " ती पुन्हा आपल्या बोटांशी खेळत म्हणाली.
" हा पण.....तुला भिती I mean are you comfortable  ? " 
त्यावर तिने कसनुस हसत होकारार्थी मान हलवली. तिने म्हटलं तर होतं पण अचानक आपल्याला भितीबिती वाटली तर ही शंका होतीच तिच्या मनात. आता ती आग्रह करत होती म्हणून त्याने बिछाना आवरून न ठेवता फक्त उशी उचलली आणि वरती बेडवरती ठेवली. तिच्या इच्छेसाठी म्हणून तो आला पण तिला मध्येच जाग आली, भिती वगेरे वाटली तर खाली जाऊन झोपू या विचारानेच तो तिच्या बाजूला येऊन बसला.
" थँक्स " ती हसली आणि तिच्या उशीवरती तिने झोपण्यासाठी डोक टेकवलं. तो अजून बेडवरती बसूनच होता तिच्या शेजारी.
" जाऊ नको हा " ती लहान मुलांसारखं बोलली.
" हो ग आहे हा मी झोपा उद्या कॉलेज आहे " त्याने आपला हात तिच्या कपाळावरती ठेवला आणि हलकेच थोपटलं. तिने त्याचा हात आपल्या हातात घेतला आणि डोळे मिटले. थोडावेळ तो तसाच तिच्या उश्याशी बसून राहिला नंतर तिच्या अंगावरती ब्लँकेट पांघरलं. तिला शांत झोप लागलेली पाहून त्यानेही उशीला डोक टेकलं. त्याला आपण स्वप्नात असल्यासारखं वाटत होतं. त्याच्या ध्यानीमनीही नव्हतं, ती आपल्याला इथे झोपण्यासाठी बोलावेल. त्याने कूस वळवली आणि तिच्या चेहर्‍याकडे पाहायला लागला. त्याला वाटलं, आज खूप भारी वाटतय आता विशालशी बोलता आलं असतं तर त्याला समजू शकलं असतं मला किती शांत वाटतय, समाधान वाटतय आज. याच विचारात तिच्याकडे पाहता पाहता त्याला झोप लागली.
.................................................
सकाळी मोबाईलच्या अलार्मने त्याला जाग आली. त्याने डोळ्यांवरून हात फिरवला आणि एका हाताने बेडजवळच्या कॉर्नरपिसवरचा मोबाईल हातात घेतला पावणेसहा झालेले. त्याला आवरून जीमलासुद्धा जायचं होतं. त्याने मोबाईल ठेवून दिला आणि उठणार इतक्यात त्याने स्वतःकडे पाहिलं तर हातभर अंतर ठेवून झोपलेली ती चक्क त्याच्या कुशीत होती ! तिचा एक हात त्याच्या हातावरती होता. तिची जाळीदार ओढणी अक्षरशः त्याच्या गालापर्यंत पसरली होती. त्याने मान वळवली तर तिच्या मऊमुलायम केसांचा स्पर्श मानेला झाला. दुपट्ट्याची लेस त्याच्या गालाला टोचल्यासारखी वाटली. तिचे मोकळे विस्कटलेले केस, तिचा त्याच्या छातीवरती टेकलेला हात त्याला क्षणभर वाटलं, हा क्षण हातात घट्ट पकडून ठेवावा. त्याने पडदे मिटलेल्या खिडकीकडे पाहिलं आणि अचानक गोव्यातला समुद्रकिनारा आठवला ! त्यावेळी तिच्यासोबत सुर्यास्त पाहताना त्याने मनाशी म्हटलं होतं, एक दिवस सुर्याची किरणं खिडकीतून डोकावतील आणि माझी परी माझ्या कुशीत असेल तो दिवस आशेचा नवा किरण घेऊन येईल अस त्याला त्या गोव्यातल्या समुद्रकिनार्‍यावर वाटलेल जे आज खरं झालं होतं. इतकी सुंदर सकाळ असु शकते याची कल्पनाच नव्हती केली त्याने.   स्वतःला सावरत तिची झोप न चाळवता त्याने उठण्याचा प्रयत्न केला. शर्टच्या बटणात अडकलेली दुपट्याची लेस अलगद बाजूला केली.
" अनु, चला नीट झोपा उठू दे आता मला " त्याने तिचा हात हलकेच बाजूला केला आणि तो उठला. निघताना तिची उशी व्यवस्थित केली. तिच्याकडे पाहून छानस हसला.
..............................................


डिसेंबरचा पंधरवडाही आता संपत आला होता. कॉलेजमध्ये सगळेजण महिनाअखेरच्या गॅदरींगच्या कार्यक्रमाच्या तयारीला लागले होते. विक्रमने मिटींगमध्ये सांस्कृतिक विभाग पाहणार्‍या प्राध्यापकांना कार्यक्रमाच्या तयारीविषयी सुचना दिलेल्या त्याप्रमाणे सगळे जोमाने तयारीला लागले. डिसेंबर जवळ आला की कॉलेजच्या मुलांमध्येही वेगळाच उत्साह संचारायचा. कार्यक्रमात सादर करायच्या नाटुकली, डान्स, कॉमेडीस्कीट्स ची तालिम करण्यात, त्याच्या वेशभूषा, मेकअप याची तयारी करण्यात मुलं व्यस्त व्हायची. हॉस्टेलवरची मुलं तर रात्री जागून कार्यक्रमातल्या करायच्या सादरीकरणाची तयारी करायचे. वेळ मिळेल तिथे आणि होईल तसा अभ्यास करणारे, पटापट एकमेकांच्या नोट्स खरडणारे, एकमेकांच्या नावाने लायब्ररीतून पुस्तकं उचलणारे विद्यार्थी आणि कधी ओरडणारे तर कधी गो अहेड म्हणून लेक्चर चुकवलं तरी समजून घेणारे असे प्राध्यापक असं चित्र दरवर्षी दिसायचं. वार्षिक स्नेहसंमेलन म्हटलं की कॉलेज वेगळ्याच रंगात रंगून जायचं इतकं की प्राध्यापकांनाही त्यांचे कॉलेजचे दिवस आठवायचे. विद्यार्थ्यांची पळापळ, घाईगडबड पाहताना मजाही वाटायची. 
.........................................
स्नेहसंमेलनाचा कार्यक्रम जवळ येऊ लागला तस भाऊसाहेबांना मात्र गेल्या वर्षीची अनघाची अवस्था आठवायला लागली. गॅदरिंगच्या कार्यक्रमाआधी दोन तीन दिवस किती खूश होती ती! त्यानंतर आपण जानेवारीत  तिच्या साखरपुड्यासाठी म्हणून गेलो आणि जे घडलं ते आठवून त्यांना वाईट वाटलं. तिची तेव्हाची अवस्था, गलितगात्र शरीर आणि मलून चेहरा पाहावासादेखील वाटेना बिच्चारी पोरं पण आता हल्ली किती आनंदात असते ती हादेखील विचार ते करायचे तरीही त्यांनी याबद्दल विक्रमसोबत बोलायचं ठरवलं. रात्रीची जेवणे आटोपली आणि त्याला त्यांनी स्टडीरुमला भेटायला बोलावलं.

" येऊ का ? " त्याने दारातूनच विचारलं.
" हो , या ना " तो येऊन त्यांच्यासमोर बसला. एक दोन क्षण तसेच शांततेत गेले.
" काही काम होतं का ? " त्यानेच बोलायला सुरुवात केली.
" हं.....काम अस नव्हे पण जरा बोलायचं होतं " ते अस बोलले आणि त्याला मनातून धस्स झालं. 
" काय ओ ! अचानक गप्प झालात काळजी करु नका काही गंभीर नाही " ते हसत म्हणाले तसा त्याचा जीव भांड्यात पडला.
" बरं तर काय म्हणते कार्यक्रमाची तयारी ? " त्यांनी मांडीवरचं पुस्तक बाजूला ठेवलं.
" छान चाललीय....."  तो म्हणाला.
" बरं, सुनबाई बर्‍या आहेत ना नाही जुन्या आणि त्यातून भयानक आठवणी आहेत त्या. अस सहजच पुसुन नाही टाकता येणार त्यांना मनातून " भाऊसाहेबांनी हळूहळु विषय काढला.
" हो.....पण ठिक आहेत त्या " त्याने कशीबशी शब्दांची जुळवाजुळव केली.
" हं.....तस असेल तर बरंय पण काळजी घ्या त्यांचा जीवाला आधीच कमी ताप झालेत का आणि अजून त्रास नको. बिचारी पोरं या यातनांपेक्षा मरण बरं वाटतं मुलींना " त्यांनी डोक आरामखुर्चीला टेकलं. 
" नाही नाही अस काही नाही होणार....अनु....I mean त्या होतील ठिक आणि वेळ जाईल तश्या या जखमाही भरुन निघतील. त्या रडत बसणार्‍या नाहीयत शांतपणे समजावलं कि बरं वाटतं त्यांना तश्या स्ट्राँग आहेत मनाने " त्याने म्हटलं तस त्यांनी त्याच्या डोळ्यांत पाहिलं. 
" हं.....मग ठीक आहे पण या थोड्या दिवसात जरा त्यांच्याशी बोलत राहा नाहीतर जुन्या आठवणींनी स्वतःशी कुढत बसतील तेव्हा काळजी घ्या " 
" हो नक्की बरं येऊ ? " त्याने म्हटलं तस त्यांनी होकारार्थी मान हलवली. तो जायला उठला.
" विक्रम, खरतर तुमचे आभार तुम्ही लग्नाला तयार नसता झालात तर काय माहीत काय झालं असतं आमच्या शब्दासाठी तुम्ही....थँक्यु आमच्यावरती विश्वास ठेवलात " ते  म्हणाले. त्याला मागे वळून त्यांच्या नजरेला नजर द्यायची हिंम्मत होईना.
" काहीही काय साहेब उलट मी तुमचे आभार मानायला हवेत तुमच्यामुळे ती माझ्या आयुष्यात आहे...." एवढं बोलून तो तिथून बाहेर पडला. त्याच्या या वाक्यावर ते अंधुकसं हसले.
" विक्रम हे अस वेड्यासारखं प्रेम करता ते तुमच्या डोळ्यातसुद्धा दिसतं. तुम्हाला काय वाटतं, ती खूश आहे याचं कारण आम्हाला कळतं नाही का! कोणावरती तरी प्रेम करणं काय असतं हे चांगलं माहितीय मला ! " ते स्वतःशीच विशादाने हसले.
.........................................

स्वयंपाकघरातली सगळी कामं आटोपली आणि कुमुदने पुन्हा एकदा गॅससिलेंडर बंद आहे ना ते पाहिलं. बेसिनचा नळ भांडी विसळून बंद केला आणि नॅपकीनने हात पुसले. ती बाहेर आली आणि दरवाजे - खिडक्या बंद आहेत का ते पाहिलं.
" अग पुरे काही चोर घुसत नाही ! " श्रीधर सोफ्यावरती बसून  मासिकांची पानं चाळत होते.
" तुम्ही पण ना...आणि शिरला तरी आमच्या रियाबाई डाराडुर झोपलेल्या असतील " कुमुद हसत म्हणाली.
" अग हो आहे कुठे ती ! " 
" झोपल्या बाईसाहेब तरी म्हणतं होती मी आवरते मीच म्हटलं नको. तिचं अॉफिसपण असतं " 
" हो ग बरं तू पण झोप लवकर " श्रीधर सोफ्यावरुन उठले.
" हो " कुमुद म्हणाली पण तिचा चेहरा त्यांना चिंतीत वाटला.
" काय ग कसला विचार करतेस ! हल्ली पाहतोय मी काहीतरी विचार करत असल्यासारखी वाटतेस. लेकीच्या लग्नापासून तर किती खूश होतीस " श्रीधरने म्हटलं.
" नाही हो खूश तर आहेच. अनु आता बर्‍यापैकी त्यातनं बाहेर येतेय पण......" कुमुद काळजीने बोलली.
" पण काय ? " 
" हेच हो तो माणूस आजही उजळ माथ्याने फिरतच असेल ना बाहेर देव न जाणो पुन्हा एखादीसोबत तो असाच...." ती बोलली ते श्रीधरनाही पटलं.
" हो ग तिच चिंता वाटते. तो जर तुरुंगात असता तर तेवढच समाधान असतं ग हा यामुळे आपल्या पोरीच्या आयुष्याचं नुकसान काही भरुन निघणार नाही पण त्याला शिक्षा झाल्याचं समाधान " ते दुःखी सुरात बोलले.
" होय ओ आणि आता वर्ष पुर्ण होईल ना....तो असेल मजेत पण आपल्याला त्याच्यामुळे किती मनःस्ताप झालाय बिचारी माझी पोरं कधी कोणाचं वाईट चिंतलेलं नाही आणि आमच्याच वाट्याला हे असं " तिच्या डोळ्यात पाणी आलं.
" कुमुद रडु नकोस ग आणि तुला काय वाटतं, चांगल्या माणसांचे शिव्याशाप घेऊन तो काय सुखी होणारय का ! " 
" हो, नाहीच होता नये तो सुखी. हाल हाल होऊन मरण यायला हवं त्याला मगच समजतील वेदना काय असतात त्या. "  कुमुदने डोळे पुसले आणि तिच्या नजरेतला अंगार न विझण्यासारखा होता.

क्रमशः

शेवटचा ट्रॅक म्हटल्यावरती आता कधीही अंतिम भाग येईल अश्या मूड मध्ये तुम्ही आहात पण डोन्ट व्हरी...जोपर्यंत कथेतले मुद्दे संपत नाहीत आणि गुंते सुटुन पात्रांचा व्यवस्थित शेवट होत नाही तोपर्यंत कथा संपत नाही.
जुन्या कथा आणि आतापर्यंतचे सर्व भाग खालील लिंकवर
https://www.irablogging.com/profile/sneha-vijay-dongare#album

🎭 Series Post

View all