बंधन भाग 8

Love, Social Issues

भाग 8
(सातव्या भागात आपण पाहिलं मुलाखतीच्या दिवसापासुन कॉलची वाट पाहणार्‍या अनघाला एकदाचा कॉलेजमधून कॉल आला. तिचं इंन्टिरव्हियु मध्ये सिलेक्शन झाल्याने तिचे आईबाबा खूश आहेत. पण तिच्या मुलाखतीच्या दिवशीच दुपारीही काही मुलाखती कॉलेजकडून होत्या. ज्या मुलाखती विक्रम, प्रो.सामंत यांनी प्राचार्यांसोबत घेतल्या पण यात काहीतरी गोंधळ नक्कीच झालेला आहे असं वाटतंय. या सगळ्यात विक्रम विद्यादानापेक्षा गुरुकुलकडे बिजनेस म्हणून पाहतोय पाहुया पुढे काय होतंय )

सकाळी कॉलेजला जायला अनघा लवकर उठून तयार झाली.आज तिचा कॉलेजमधला प्रोफेसर म्हणून पहिला दिवस होता. आकाशी रंगाची साडी, कानाबरोबर चमकणारे इअरिंग्ज,गळ्यात नाजूकशी चैन, क्लिपने व्यवस्थित बांधलेले केस गालावर येणारी बट, हलकासा मेकअप आणी खांद्यावर लटकवलेली पर्स खरंच कॉलेजमधल्या ' मॅडम ' सारखाच पेहराव दिसत होता तिचा. ती समोर आली आणि आईने खूश होऊन लेकीची दृष्ट काढली.
" बेस्ट लक बरं का कारखानीस मॅडम" रिया खोलीतून बाहेर येत म्हणाली. तिचं अॉफिस दहाचं असल्यानं तिला बराच वेळ सकाळी अंथरुणात लोळायला मिळायचा.पण काल रात्री रियाबाईंनी चक्क अलार्म लावला होता. ताईच्या जॉबचा पहिला दिवस म्हणून ती अलार्मच्या पहिल्या गजरासरशी उठली तर ताई कुठे दिसेना म्हणून डोळे चोळत बाहेर आली. पाहते तर अनघा तयार होऊन निघालीसुद्धा होती.
" काय गं हे मॅडम वगैरे !" अनघा तिला म्हणाली
" मग काय ताई तुला कॉलेजमध्ये सगळे अशीच हाक मारणार कानांना सवय करुन घे." रिया जांभई देत म्हणाली.
" हो बाईसाहेब निघू मी आता तुम्ही जास्ती ताप करुन घेऊ नका झोपा हा !" तिला चिडवीत अनघा म्हणाली.
" हं बाय ताई " रिया म्हणाली आणि रुममध्ये जाऊन पुन्हा बेडवर पडली. आईबाबा पेंगुळलेल्या रियाला रुममध्ये जाताना पाहून हसु लागले.
" बरं तू निघ पहिल्या दिवशी उशीर नको " बाबा तिला म्हणाले.
" हो बाबा आई चल येते " 
" सावकाश जा गं " 
" हो आई  " ती दोघांना बाय करित घराबाहेर पडली.
...........................
कॉलेजमध्ये सगळ्यांनी नव्याने रुजु झालेल्या वेगवेगळ्या डिपार्टमेंन्ट्सच्या प्राध्यापकांचं स्वागत केलं. प्राचार्यांनी सकाळीच पहिल्यांदा स्टाफरुममध्ये सगळ्यांना एकत्र जमण्याची सुचना शिपायांकरवी दिली त्याप्रमाणे सकाळशीप चे जुने - नवे प्राध्यापक स्टाफरुममध्ये वेळेत हजर झाले. इतक्यात प्राचार्य आले त्यांच्यासोबत उपप्राचार्य निंबाळकरही होते. शंकरने मागोमाग हातातून ट्रे आणला त्यात गुलाबाची फुलं होती. त्याने तो ट्रे डेस्कवरती ठेवला. प्राचार्य प्रसन्न चेहर्‍याने बोलू लागले," Good Morning all तर आज आपल्या गुरुकुलच्या परिवारात काही नवे सदस्य आलेत. तुम्ही सर्वजण कुणी पाच वर्ष,दहा वर्ष इथे काम केलं आहे. आपल्यातली काही प्राध्यापकमंडळी तर 'गुरुकुल ' च्या स्थापनेपासुन भाऊसाहेबांशी जोडली गेलीत. आज आलेल्या नव्या प्राध्यापकांनाही तुम्ही सर्व तुमच्यात सामावून घ्याल आणि एकमेकांना सहकार्य करत आपण गुरुकुलच्या प्रगतीसाठी प्रयत्नशील राहुयात अशी मी अाशा करतो. आता आपल्या नव्या सहकार्यांचं गुलाबपुष्प देऊन स्वागत करावं अशी विनंती मी निंबाळकर सरांना करतो " प्राचार्यांच्या विनंतीवरून निंबाळकर सरांनी सगळ्या नव्या प्राध्यापकांना नावाने ओळख करुन देत समोर बोलावून गुलाबपुष्पे दिली. सगळ्यांनी टाळ्या वाजवून नव्यामंडळींचं स्वागत केलं.
....................
कॉलेजमधल्या उत्साही वातावरणाने अनघा खूश झाली. प्राचार्यांकडून सगळ्यांचं असं स्वागत वगैरे होईल असं तिला वाटलं नव्हतं. ती मॅनेजमेंन्ट विभागाच्या विद्यार्थ्यांना शिकवणार होती त्यामुळे विभागाच्या प्रमुखांशी आधी बोलावं आणि सगळं कामकाज समजून घ्यावं असं तिने ठरवलं. त्यात मॅनेजमेंन्ट विभागाच्या प्रमुख खंदारे मॅडम आहेत हे कळल्याने तिला बरं वाटलं. मुलाखतीदरम्यान त्यांच्याशी तिची तोंडओळख झालीच होती. ती मॅडमला भेटायला त्यांच्या केबिनमध्ये गेली.
" मॅम May I come in ?" 
" या कारखानीस मॅडम " खंदारे मॅडम बसल्या जागेवरुन दाराकडे नजर जाताच हसत तिचं स्वागत करित म्हणाल्या. ती आत आली. बसु का विचारण्याआधीच मॅडमने हाताने तिला खूर्चीत बसण्यास सांगितलं.
" काय मग आज फर्स्ट डे ना ! बेस्ट लक " त्या डोळे मिचकावित तिला चिअरअप करित म्हणाल्या.
" थँक्स मॅडम " ती संकोचत म्हणाली
" आणि कॉलेजविषयी तुला काय सांगणार! तू माजी विद्यार्थिनी आहेस मी फॉर्मवर नाव वाचलं तेव्हाच ओळखीचं वाटलं मला पण नक्की किती सालची बॅच ते आठवत नव्हतं." मॅडम म्हणाल्या.
" It's ok Mam गेल्या कित्येक वर्षात कितीतरी बॅचेस गेल्या असतील त्यातले कितीतरी स्टुंडण्ट्स ! कोणाकोणाला लक्षात ठेवणार !" ती मॅडमचं कौतुक करित आदराने म्हणाली.
" हो ते आहेच बरं तुला कधीही काही मदत लागली काही शंका असली तर जरुर ये."  मॅडम तिला एच.ओ.डी. च्या नात्याने म्हणाल्या.
" हो मॅडम नक्की आणि मीही तुम्हाला मला शक्य होईल ती सगळी मदत करेन तुमच्या सारख्या सिनिअर कडून शिकायला मलाही आवडेल."  अनघा कृतज्ञतेनं म्हणाली.
" बरं मॅडम मी निघू का ? लेक्चर आहे " ती खूर्चीतून उठत म्हणाली.
" Go Go आणि Carry on आता माझी सहकारी शोभतेस!" त्या हसत हाताचा अंगठा उंचावित म्हणाल्या. ती उठली आणि केबिनबाहेर पडली तोच समोरून येणार्‍या एका प्राध्यापकांना तिचा धक्का लागला आणि त्यांच्या हातातले पेपर्स जमिनीवर पडले.
" ओ I'm so sorry " तिने सॉरी म्हणत जमिनीवर विखुरलेले पेपर्स उचलायला सुरुवात केली.
" It's Ok " ते प्राध्यापक म्हणाले आणि स्वतः खाली वाकून पटापट पेपर्स उचलत वरती उठले. इतक्यात केबिनच्या उघड्या दारातून खंदारे मॅडमनी हे पाहिलं. त्या आतूनच म्हणाल्या,
" सामंत सर ह्या अनघा कारखानीस मॅडम आजपासुन रुजू झाल्यात " मॅडमच्या वाक्यासरशी अनघा स्माईल करुन सरांना म्हणाली.
" Glad to meet you Samant Sir " 
" हं Same to you " ते फॉरमॅलिटी म्हणून रुक्षपणे म्हणाले आणि तिथून लगेच निघून गेले. तिला त्यांच्या अश्या विचित्र वागण्याचं कारण  कळलं नाही. तिही तिच्या लेक्चरला निघून गेली.
क्रमशः

🎭 Series Post

View all