बंधन भाग 77

Love Social

भाग 77
(  गेल्या भागात विक्रमच्या समजावण्यामुळे ती पुन्हा पहिल्यासारखं राहायचं ठरवते आणि त्या घटनेनंतर पहिल्यांदाच ती मेकअपसुद्धा करते. इतके महिने तिच्यामागे तिच्याविषयी उलटसुलट बोलणार्‍या तिच्या सहकार्‍यांना पहिल्यांदाच ती स्वतःहून उत्तरं देते पाहूया पुढे)

कॉलेजमध्ये आपल्याविषयी कोणी उलट बोलत असेल तर आता गप्पपणे ऐकून घेऊन स्वतःच्या मनाला कोचत बसण्यापेक्षा समोर जाऊन आपल्याला जे वाटत ते शांतपणे बोलून मोकळं व्हायचं आणि आपण काही चुकीचे वागलेलो नाही मग का घाबरुन ऐकून घ्यायचं अस अनघाने आता मनाशी ठरवलं होतं. सकाळी आपण इतक्या महिन्यानंतर पहिल्यांदाच आपल्यासाठी आपल्या बाजूने आपण कोणाशी तरी बोललो, कोणाला तरी विरोध केला आपण सहन नाही केल या भावनेनेच तिला छान वाटलं. गॅदरींगच्या त्या घटनेपासून आपण कोणी बोललं, चुकीचं वागलं आपल्याशी तर विरोध करायचा हेच जणू ती विसरली होती आणि विरोध करायला आपण खूपच छोटे आहोत अगदी एखाद्या बिंदूइतके आणि कुणीही येऊन आपल्याला चिरडुन आपलं अस्तित्व पुसुन टाकेल असच तिने मनात घेतलं होतं नी याच भितीच्या छताखाली ती इतके महिने वावरत होती पण आज इतक्या महिन्यानंतर सकाळच्या कॉलेजमधल्या घटनेनं तिला बरं वाटलं आणि त्यावर विक्रमही खूश झाला ते पाहुन तिला खात्रीच पटली आपण त्यांना बोललो हे योग्यच होतं. दिवसभर ती याच खूशीत होती.
..................................
संध्याकाळी फार काही कॉलेजचं काम नव्हतं. त्यामुळे आत्याशी मनसोक्त गप्पा मारायच्या आणि रात्रीच्या जेवणासाठी आपणसुद्धा काहीतरी बनवूया अस तिने ठरवलं. ती रुममधुन हॉलमध्ये आली तर खाली जितेंद्र सोफ्यावरती बसून कसल्याश्या फाईल्स चाळत होता. अनघा खाली आली आणि किचनमध्ये जायला वळली तोच त्याचं लक्ष गेलं.
" वैनी "  तो सोफ्यावरुन उठून तिच्यासमोर आला. 
" ऐका ना मला एक महत्त्वाचं बोलायचं होतं "
" महत्त्वाचं माझ्याशी !"  ती आश्चर्याने म्हणाली
" हा म्हणजे कारखान्याबद्दल...."  त्याचं पुढचं बोलणही न ऐकून घेता ती बोलली, " कारखान्याबद्दल! सॉरी पण भावोजी तुम्ही साहेबांशी बोला नाहीतर विक्रम सरांना विचारा काय ते " इतकच बोलून ती जायला वळली. अजूनही जितेंद्रसोबत बोलायचं म्हटलं की ती अवघडायची. नीतूशी मोकळेपणाने वागण वेगळ आणि जितेंद्र परकाही नाही आणि मोकळेपणाने वागाव इतका त्यांचा संवादही नाही त्यामुळे त्याच्याशी कस वागाव तिला कळत नव्हतं. सद्या तरी विक्रम शिवाय इतर कोणाशी तिला मैत्री करण्यात आणि जवळीक वाढवण्यात रस नव्हता आणि तिच्या मनातली भितीही पूर्णतः गेली नव्हती पण आपल्या वहिनीच्या आयुष्याबद्दल आणि मानसिक अवस्थेबद्दल जितेंद्र मात्र अनभिज्ञच होता. कशाचीच कल्पना नसलेला जितेंद्र मात्र वहिनी आपल्याशी बोलत नाही, नीट वागत नाही म्हणून नाराज असायचा.
" हो पण तुम्ही जरा मदत...." तो पुन्हा बोलला.
" मी मी काय मदत I mean मला काही फार कारखान्याच्या बाबींबद्दल माहिती नाही ना "  ती पुन्हा तेच बोलली मग नाईलाजाने त्यानेही बरं म्हणून मान डोलावली आणि ती किचनमध्ये निघून गेली.
..........................................
अनघाने काहीच न ऐकून घेतल्यामुळे जितेंद्र नाराज होऊन पुन्हा सोफ्यावरती त्याचं काम करत बसला. थोड्या वेळाने विक्रम खाली आला आणि जितेंद्रला असा बसलेला बघून तोही गप्पा मारायला येऊन तिथे बसला.
" काय मग चेअरमन साहेब काय चाललय तुमच्या राज्यात?" विक्रमने बसल्या बसल्या त्याची थट्टा करायला सुरुवात केली.
" काहीही नाही स्पेशल नेहमीचच आपलं आणि आमच्याकडे काय स्पेशल! शेतकरी माणसांमध्ये रमणारी आम्ही माणसं. आम्ही काय तुमच्या सारखी हाय एज्युकेटेट नव्हे " जितेंद्र फाईलची पानं पलटत बोलला तसा त्याचा उतरलेला चेहरा विक्रमच्या लक्षात आला.
" काय रे अस का म्हणतोस! What'd happened ?" विक्रमने विचारलं तस जितेंद्रने विषय बदलायला सुरुवात केली.
" कुठे काय! नथिंग " 
त्याचा चेहरा नाराज पाहून विक्रमने पुन्हा म्हटलं," बरं नसेल बोलायचं तर इट्स ओके "
" च्च तस नाही यार " जितेंद्रने हातातली फाईल बाजूला ठेवली आणि डोक सोफ्याला टेकलं. " या वैनी रे "
" काय झाल ?"  विक्रमने पटकन नजर वरती वळवली.
" त्या बोलत का नाहीत रे नीट माझ्याशी बघ ना नितू, आत्या त्यांच्याशी बोलत असतात. मी बोलायचा प्रयत्न केला की मला टाळतात त्या " जितेंद्र अस स्पष्टपणे बोललेला बघून विक्रमला काय यावरती बोलाव सुचेना. तिचं जितेंद्रसोबतच वागण विक्रमच्या लक्षात येत होतं आणि जितेंद्र एक दिवस हा विषय काढणार याचा त्याला अंदाज होता.
" अरे इट्स ओके, एवढं काय मनावर घेतोस ! आणि तुला वाटत तस काही नाही रे. तुला मुद्दामहून टाळेल कश्याला ती! आणि तसही तुमचं जास्त बोलणं नाही होत आणि नितू काय कधी पण आमच्या रुममध्ये पडीक असते सो तुला वाटत त्यांचं चांगल जमतं इतकचं. चल डोन्ट व्हरी " अस म्हणून तो उठला.
" हं असेल कदाचित तू बोलतोस तस " जितेंद्रही विचार करत म्हणाला आणि तेवढ्या वेळापुरतं तरी विक्रमचं म्हणणं त्याला पटलं. विक्रमने मात्र ठरवलं, याबद्दल तिच्याशी बोलायला हवं. तिच्यामधलं आणि जितेंद्रमधलं अवघडलेपण आता हळूहळू कमी व्हायला हवं.
........................
रात्री सगळ्यांची जेवणं आटोपली.  विक्रम, नितू, जितेंद्र तिघही जितेंद्रच्या रुममध्ये मस्ती करत बसले होते. अनघा खाली आत्याला किचन आवरायला मदत करत होती. घरात नोकरमंडळी असतानादेखील अनघा दररोज तिला वेळ मिळेल तशी किचनमध्ये येते, आपल्यासोबत गप्पा मारते, मदत करते याचं आत्याला कौतुक असायचं.अनघाच्या इतक्या महिन्यांच्या बोलण्या वागण्यातून तिचा स्वभाव बर्‍यापैकी आता आत्याला कळायला लागला होता. आत्याला समजल होतं, ती जितकी हुशार आणि नव्या विचाराची आहे तितकीच मनमेळावू, हळवी आणि लाजाळू आहे पण कोणाचं ऐकुन घेऊन मुळूमळू रडणारी अजिबात नाहीय. इतक्या मोठ्या प्रसंगातून ती सावरली आणि त्याचा तिने तिच्या करियर आणि कामावरती परिणाम नाही होउ दिला. ती फार जिद्दी आहे आणि तिला पटतं तेच ती करते, लग्नाआधीही तिने भाऊसाहेबांना सर्व गोष्टीची कल्पना दिली आणि मगच लग्नाला तयार झाली हे सगळ आत्याला माहित होतं आणि या सगळ्यामुळेच आत्याला तिचं कौतुक वाटायचं आणि आत्यासोबत बोलल की तिला तिच्या आईचा भास व्हायचा. कधी कधी आश्चर्य वाटायचं, लग्नाच्या दिवशी घरुन निघताना किती मनाची कालवाकावल होत होती आणि आता या सगळ्यांना सोडून कुठे जावस वाटत नाही. याच विचारात ती रुममध्ये आली आणि गॅलरीत उभी राहिली इतक्यात मोबाईल वाजला आणि नंबर बघून तिने आनंदाने फोन उचलला,
" हॅलो आई! कशी आहेस शंभर वर्ष आयुष्य !" 
" बापरे एवढं! बर बर असु देत काय म्हणताय मॅडम आणि विसरलाबिसरलात की काय आम्हाला! "  कुमुदने मस्करीत बोलायला सुरुवात केली.
" नाही ग आई  विसरेन कशी ! आणि रियाला मेसेजेस करते मी. विचार तिला!" 
" हो का नी तुमच्या त्या वॉटसअॅपचं काही सांगू नका मला! माणसांशी बोलायला नको म्हणून ते गुडमॉर्निंग, गुडनाईट म्हणत रहायच रोज आणि त्याला तुम्ही बोलणं म्हणता!" कुमुद भडाभडा नेहमीसारखं बोलायला लागली आणि अनघाला वाटलं आपण आपल्याच घरी आहोत क्षणभर!
" हो ग बरं आता तुला कॉल करेन हा रोज " अनघाने म्हटलं तस पलिकडुन कुमुद म्हणाली, " हं...बघु लक्षात ठेवलस तर आम्हाला " 
" ए काय ग आई, बरं आता माझी थट्टा पुरे. तुम्ही कसे आहात सगळे ?"
" आम्ही उत्तम तू कशीयस ?  येत जा ग अधूनमधून बाबांना पण बर वाटेल. आम्हाला येते ग आठवण पण तिथे बंगल्यावरती सारखं येणं बरं नाही वाटतं आणि विक्रम त्यांच्या सोबत बोलायचं काय हेही समजत नाही ! अॉकवर्ड वाटत मग " 
" हो ग आई मीच येते. आता मे चा महिना अर्धा परिक्षांमध्ये गेला नंतर आम्हीच गोव्याला गेलो मध्ये येणार होते ते राहिलं मग कॉलेजची अॅडमिशन्स आणि नंतर रेग्युलर लक्चर्स..." 
" पुरे ग बाई तुझं पुराण! तुला ना कामाशिवाय काही सुचत नाही बरं मग येत्या रविवारी येताय का दोघं ?" कुमुदने विचारल तस अनघाने पटकन म्हटलं,
 " नाही! आयमिन एक काम आहे अग सो...."
" बरं, मग केव्हा येतेस ?" कुमुदने आता हाथ टेकले आणि तिलाच विचारलं,
" आई ग ऐक ना आता दिवाळीपण जवळ आलीय तर येतो ना तेव्हाच "
" हो ग दहा दिवसांवर आली की दिवाळी! बघ तु घरुन गेल्यापासून सणांचा पण काही उत्साह राहिला नाही " कुमुद भावूक होत म्हणाली.
" आई रडू नको आणि येते मी नक्की. सर पण येतील खूश आता " 
" हो या या आम्ही वाट बघतो बरं टेक केअर " खूशीत आता कुमुद म्हणाली.
" हो आणि छान तयारी सुरु करा आता दिवाळीची बरं गुडनाईट आणि बाबांना मिस यु सांग "
" हो गुडनाईट " बोलून पलिकडून आईने फोन ठेवला. बर्‍याच दिवसांनी आईशी बोलून तिलाही छान वाटलं.
........

तिने उत्साहाने मागे वळून पाहिलं इतक्यात विक्रम आत आल्याची चाहूल लागली. 
" काय मग सर, झाल्या का गप्पाटप्पा ?" तिने मस्करीला सुरुवात केली.
" हो झाल्या हा गप्पा. तू का नाही आलीस ?" त्याने बेडवरची उशी उचलत म्हटलं.
" हा मी पण आत्यांसोबत बोलत होते. आपण सगळे बोलतोच की त्यांच्यासोबत गप्पा मारायला कोणी नसत ना !" ती पुढे आली. हातातला मोबाईल कॉर्नरपिसवर ठेवून दिला आणि स्टडीटेबल आवरायला गेली. 
" हो ग ते पण राईट. आपण दिवसभर बाहेर असतो आणि मम्मा तिच्या मैत्रीणींमध्ये रमलेली असते बर दोघी घरात असल्या तरी दोन टोकाचे दोघींचे स्वभाव " तो बिछाना तयार करत बोलत होता.
" हं पण का अस? I mean मम्मा आणि आत्यांचं फारस पटत का नाही ? बघ ना मम्मांचा जितका तुझ्यावरती जीव तितकाच आत्यांचासुद्धा तरी तुझ्याबाबतीत काय कराव हे ठरवताना पण दोघींचं एकमत नसतं "  अनघा हसत अस बोलली आणि तिच्या बोलण्याचा रोख कोणत्या दिशेला होता ते त्याच्या लक्षात आलं. त्यांच्या लग्नावरुन आत्या आणि अरुंधतीचं एकमत नव्हत यावरुनच ती बोलत होती तसा त्याने विषय बदलला,
" हं असो स्वभावाला औषध नसतं " तो बोलला आणि उशी बिछान्यावर टेकवली. इतक्यात तीही झोपण्यासाठी जायला वळली.
" अनु " त्याने तिचा हात धरला तशी ती थोडी पुढे आली आणि त्याच्या समोरुन येउन बिछान्यावरती बसली.
" हं बोला सर " ती हसत म्हणाली. त्याला जितेंद्रबद्दल बोलायच होतं आणि तिला समजावायचसुद्धा होतं पण सारख तिला हे कर नी ते कर अस सांगणं म्हणजे उपदेश केल्यासारख वाटेल तिला असही त्याच्या मनात आलं. त्यातून ती सकाळपासून खूश होती पण जितेंद्रने आज इतक्या महिन्यात पहिल्यांदाच त्याची खंत बोलून दाखवली. त्यामुळे तिचं आणि जितेंद्रमधलं नातं सुधारणं आता गरजेच होतं. 
" नथिंग ! तुला कोणी सांगितलं मला बोलायच होतं " त्याने तिचे रबरने गुंडाळलेले केस सोडत म्हटलं.
" ए काय तू! अस मला पिडायला बोलवलस इकडे " ती नाक फुगवून म्हणाली.
" अरे ! आता तसही झोपायला जातेस न सो म्हटलं बस थोडावेळ माझ्याजवळ असो जा तू गुडनाईट " त्याने चेहरा दुसरीकडे वळवला.
" अरे बापरे ! खरच चिडलास कि काय !" तिने हसतच त्याचा हात आपल्या हातात घेतला.
" गुडनाईट " त्याने एकच शब्द म्हटला आणि तिच्याकडे न पाहताच तो बिछान्याला टेकणार इतक्यात ती पुढे सरकली.
" बोल ना आता " त्याच्या मिठीत येत तिने म्हटलं. तिने नजर वरती वळवली. " बोल न, तु बोलत असलास की छान वाटत ऐकायला आणि You know ना You're my best friend. " त्याच्या डोळ्यात पाहत ती बोलली.
" हं.....I know ग " त्याने त्याचे दोन्ही हात तिच्या भोवती लपेटुन घेतले. ती अशी त्याच्या मिठीत आली की क्षणभर त्याचं सतत अस्वस्थ असणार मन शांत व्हायचं. त्याच्या सगळ्या चुका त्या मिठीत क्षणभर विरघळून गेल्यासारख्या वाटायच्या त्याला.
" पण आता जरा सगळ्यांशीसुद्धा मैत्री करायला हवी न" तो म्हणाला.
" म्हणजे ?" तिने आश्चर्याने म्हटलं.
" म्हणजे हेच आपल्या घरात इतकी माणसं आहेत नीतू, आत्यासोबत तुझं छानच जमतं पण बाकी आपली नोकर मंडळी आहेत झालच तर आपला जितेंद्र !" त्याने हळुहळु विषय काढला.
" अरे हा मी विसरलेच ते भावोजी काहीतरी बोलत होते कारखान्याबद्दल पण मला कुठे त्यातल माहीत मग मी म्हटलं त्यांना तस म्हटलं " तिने मघाचा प्रसंग सांगितला.
" हं पण अस थोडीच आहे आता तुझ्यासोबत बोलायला आला म्हटल्यावरती त्याला वाटलं असेल त्याचं जे काम आहे त्यात तू हेल्प करु शकतेस मग समोरच्याचं ऐकून घ्यायला कितीसा वेळ जातो !"   तिच्या पाठीवरुन हळुवार थोपटत तो बोलत होता.
" हो रे सॉरी हा मी उगीच लगेच ' नाही ' म्हटलं अॅटलिस्ट ऐकून तरी घ्यायला हव होतं " ती समजूतदारपणे बोलली. 
" हं दॅट्स गुड...नी आता अस नव्हे ग एकदंरीतच मी बोललो. You know ना तुझं नितूसोबत छान पटतं पण जितेंद्रची सुद्धा तू वहिनीबाई आहेस न मग त्याच्यासोबत सुद्धा बोलायला हव आणि त्याचा स्वभाव तुला कळलाच असेल की किती रिसपेक्ट करतो तो तुझा. तुमच्यातही छान मैत्री होऊच शकते की " 
" हं.....आणि मला समजत रे मी भावोजींशी काही फार बरी वागत नाही पण....." ती त्याच्या मिठीतच होती आणि बोलत होती. तिच्या रेशमी मृदु केसांचा स्पर्श त्याच्या हातांना जाणवत होता. अत्तराच्या सुवासासारखा तिच्या पर्फ्युमचा गंध, विश्वासाने, आपुलकीने तिने त्याच्या छातीपाशी टेकलेल डोकं, बोलताना तिच्या ओठांची होणारी हालचालसुद्धा त्याला जाणवत होती. त्याने मंदस हसत म्हटलं, " अनु, तू नेहमी जवळ रहा अशी "
" हो का " ती हसत त्याच्या मिठीतून थोडी दूर झाली.
" बरं आता गुडनाईट झोप लवकर उद्या कॉलेज आहे "
" हो गुडनाईट. See you in dreams " त्याने उशीला टेकलं.
" हो गुडनाईट " त्याच्या कपाळावरून तिने हलकेच हात फिरवला आणि त्याने डोळे मिटून घेतले. थोड्या वेळाने ती उठून बेडवरती गेली. झोपताना तिच्या मनात आलं, खरच आपण आपल्याच दुःखात इतके अडकलो आहोत की आजूबाजूला माणसं आहेत हेसुद्धा विसरुन गेलो होतो. भावोजींसोबत बोलायला हवं तसही प्रत्येक पुरुष त्या ' निर्दयी माणसा ' सारखा नसतो. आता विक्रमचं किती चांगला आहे आणि अशी चांगली माणसंही असतातच की !' याच विचारात ती झोपी गेली.
....................................
सकाळी ती उत्साहाने कॉलेजला जायला तयार झाली. आदल्या दिवशीचं विक्रमचं बोलणं तिने खरच मनावरती घेतलं आणि छान मेकअपसुद्धा केला. आज वेळेत कॉलेजला पोहचायचं म्हणून तिने पटापट तयारी केली. तो खाली नेहमीप्रमाणे गाडीपाशी तिची वाट पाहत उभा होता. त्याने मोबाईल दोन तीनदा चेक केला. अस्वस्थ होऊन तो येरझार्‍या घालत होता इतक्यात मेसेज आला.
' Thanks पैसे मिळाले ' राजेशच्या त्या मेसेजने त्याचा जीव भांड्यात पडला. राजेशने पुन्हा पैसे मागितले होते आणि जर दुसर्‍या दिवशी पर्यंत अमाउंन्ट ट्रान्सफर झाली नाहीतर अनघाला सगळ खर सांगेन हा नेहमीचा मुद्दा त्याने वापरला आणि पुन्हा पैसे मागितले होते. ती आता कुठे थोडीथोडी सावरतेय त्यात ही नसती आफत ओढवायला नको म्हणून नाईलाजाने त्याने राजेशला पैसे दिले होते. अनघाला या सगळ्यातून लवकरात लवकर बाहेर काढायचं. तिचा स्वतःच्या नजरेतला स्त्री म्हणून असलेला सन्मान तिला पुन्हा मिळवून द्यायचा आणि नंतर स्वतःहून तिची माफी मागून सत्य काय ते सांगायचं अस त्याने ठरवल होतं पण तिला यातून बाहेर काढण्यासाठी त्याला वेळ हवा होता आणि त्यासाठी राजेशने जरा शांत बसणं गरजेचं होतं. आत्ता ती किती खूश असते त्यात जर सगळ्या खर्‍या गोष्टी तिला समजल्या तर ती अजून कोशात जाईल. माणसांवरचा, नात्यावरचा विश्वासच उडेल जे खूप भयानक असेल त्यापेक्षा सद्या अज्ञानातच तिचं सुख आहे हा विचार करुन तो राजेशसमोर शांत रहायचा.
ती तयार होऊन खाली आली.
" चलो निघूया " तिने गाडीचा दरवाजा उघडला तरी तो राजेशच्या विचारात होता.
" हॅलो " तिने पुन्हा हाक मारली.
" अ येस...निघूया "  तोही आत बसला.
" काय झालं? एनी टेन्शन " तिने त्याच्याकडे पाहत विचारलं.
" नो.....टेन्शन कसलं !"  त्याने चेहर्‍यावरचा ताण दुर झटकला आणि चेहरा हसरा ठेवून कार स्टार्ट केली.
...........................
राजेश स्वतःशीच हसत मोबाईलच्या मेसेजबॉक्समधला मनी ट्रान्सफर झाल्याचा मेसेज पाहत होता. विक्रमला काहीही करुन आपण नमवलं आणि आता तो पुर्णपणे आपल्या प्लॅनमध्ये अडकत चाललाय याचा आसुरी आनंद त्याच्या चेहर्‍यावरती होता. ' विक्रम त्या पोरीसाठी तू गॅदरिंगच्या रात्री मला अक्षरशः गोडावूनमधनं हाकलून दिलसं. मोठ्या बाता मारत होतास, ' राजेश शट अप आपण काहीही करणार नाही आहोत तिला ' आणि शेवटी काय झालं! जे व्हायचं होतं तेच झालं ना तरी मी आपली फ्रेन्डशीप टिकवली पण तुला त्या अनघाचाच पुळका आलेला आणि माझा इतका इन्सल्ट केलायस ना तू मी इतकं सहजासहजी तुला सुखी होऊ देणार नाहीय लक्षात ठेव. तुम्ही पोलिक्ट्सवाले स्वतःला काय समजता रे च्यायला तुम्ही कायीपण करायचं आणि बाहेर 
' प्रतिष्ठीत, जनसेवक ' म्हणून फिरायचं ' त्याचे हेच सगळे विक्रमबद्दलचे विचार सुरु होते इतक्यात सामंतसरांच्या आवाजाने तो भानावर आला.
" राजेश "
" आ येस येस डॅड....काय म्हणता ?" त्याने मोबाईल पटकन खिश्यात टाकला आणि चाचरतच तो सोफ्यावरुन उठला.
" अरे दचकायला काय झालं ?" सामंतांनी त्याचा गोंधळलेला चेहरा पाहून विचारलं.
" दचकलो मी! छे कुठे काय तुम्ही काय म्हणत होता ?" त्याने स्वतःला सावरत म्हटलं.
" ओके, मी दोन दिवस सेमिनारसाठी चाललोय कोल्हापूरला युनिव्हरसिटीला " 
 " हो का अच्छा! बरं बरं "  त्याला मनातून ते नसणारयत याचा आनंदच झाला होता.
" हं...घराकडे लक्ष दे नी हो तो संदिप कश्याला आला होता काल? मला रोडवरुन पास झाला "  सामंतसरांनी संदिपचा विषय काढला तसा राजेश चांगलाच गोंधळला. आता यांना काय सांगावं तेच त्याला समजेना. त्यांच्या मागे आपले चाललेले उद्योग त्यांना न कळलेलेच बरे त्यातून आपल्या आणि विक्रमधल्या भांडणाची आणि या पैश्यांच्या डिलचीसुद्धा त्यांना कल्पना नाहीय ' राजेशच्या विचारांचं चक्र भराभर धावत होतं. त्यांना काय सांगायचं, की मी नी विक्रमने अनघाला किडनॅप करण्याचा प्लॅन केला आणि गॅदरिंगच्या रात्री तुम्ही कॉलेजच्या कार्यक्रमात होतात तेव्हा आमचे वेगळेच उद्योग चाललेले.' छे! यातलं त्यांना काहीही कळता नये ती व्हिडिओ क्लिप आपण दाखवली तेव्हा कसे रिअॅक्ट झालेले ते आणि त्यात आपण सामील होतो हे कळल्यावर त्यांच्यातला ' डॅड नी प्राध्यापक ' दोघेही जागे होतील त्यापेक्षा जे चाललय तेच बरय असा विचार करुन त्याने उत्तर दिलं,
" ते...हा हा तो संदीप तो आलेला तुम्हाला भेटायला नोट्स च काहीतरी काम होतं त्याचं "  राजेशने थाप ठोकून दिली.
" हं.....ओके बघतो मी " आणि ते जायला वळले नी पुन्हा थांबले. " हा अरे विक्रमशी काही बोलणं झालं का तुझं ?" त्यांनी विचारलं.
" आ....नो म्हणजे आम्ही भेटलोय कुठे हल्ली तो बायकोसोबत बिझी असतो. पहिल्यासारख्या व्हेकेशन ट्रिप वगैरे नसतात आमच्या फ्रेंड्सच्या आता " राजेशने त्यांना पटेल अस कारण सांगितलं.
" हं....ते आहेच....अनघा असतेच हल्ली त्याच्या सोबत असो मी मागे बोललो होतो त्याच्याशी बट त्याचं पर्सनल लाईफ आहे मी तरी काय बोलणार !"  सामंतांनी दिर्घ श्वास घेतला. विक्रमचं सतत अनघाला काय वाटेल याचा कॉलेजच्या बाबतीतसुद्धा विचार करणं सामंतांना आवडलेल नव्हतं पण सध्या शांत रहायचं त्यांनी ठरवलेल होतं.
" ओके चल मी निघतो लेक्चरला जायचंय " 
" हं बाय डॅड " 
ते बाहेर गेले आणि राजेशने सुटकेचा श्वास घेतला. संदिप, नताशा, विक्रमसोबतचं भांडण या सगळ्याची कल्पना त्यांना नसलेलीच बरी या विचारातच तो हसला.
...............................
दुपारी जितेंद्र नेहमीप्रमाणे जेवण्यासाठी घरी आला. फ्रेश होऊन तो एकटाच डायनिंगटेबलला बसला होता. आत्या किचनमध्ये होती. इतक्यात अनघा रुममधून खाली आली. त्यांची नजरानजर झाली. जितेंद्रने कसनुस हसत मान खाली घातली. तिला वाटलं आपण खूपच फटकून वागलो काल जितेंद्रसोबत. याच विचारात ती किचनमध्ये गेली.
" आत्या काय करताय ?" 
" जितेंद्रसाटी ताट वाढतेया का ग तु बी जेवनारायस ना " आत्याने ताटात चपात्या ठेवता ठेवता विचारलं.
" अ....हो नंतर सर आले की कॉलेजमधनं " ती बोटांशी चाळवाचाळव करत बोलली. आत्याने ताट व्यवस्थित वाढलं. अनघा थोडासा विचार करत म्हणाली, " आत्या ऐका ना मी नेऊ का त्यांच्यासाठी जेवण ?" 
" हा ने की त्यात काय इचारायच !" आत्याने वाढलेलं ताट तिच्या हातात दिलं.
" थँक्यु  " ती हसत ताट हातात घेत म्हणाली.
" आगं त्यात काय एवढं! तुमी पोर पन ना कश्याला बी काय ते ठंकु म्हनता "  आत्या हसत बोलली. अनघानेही हसतच ताट हातात घेतलं आणि ती बाहेर गेली.
..................................
जितेंद्र पेपर चाळत बसला होता. त्याचं लक्षच नव्हतं इतक्यात तिने त्याच्यासमोर टेबलवरती ताट ठेवलं. त्याने दचकून पेपरमधून नजर वरती वळवली.
" वैनी तुमी ! तुम्ही कश्याला उगीच...आत्या आहे न आत"
तिने अस जेवण वाढून आणलेल त्याला अनपेक्षित होतं.
" हो पण म्हटलं आज आपण नेऊ. आत्यांना बाकी कामं पण आहेतच ना " ती म्हणाली.
" ओके नी मम्मा....नाहीय का ?"  तो इकडेतिकडे नजर फिरवत म्हणाला.


" नाहीयत, त्या मैत्रीणीकडे गेल्यात त्यांच्या. बाकी नीतू एन.जी.ओ. च्या कामाला "  ती सविस्तर बोलत होती ते पाहून त्याला आणखी नवल वाटलं.
" अच्छा बरं "  तो जेवायला सुरुवात करणार इतक्यात तिच्याकडे त्याच लक्ष गेलं. 
" तुम्ही उभ्या का ? जेवणं झाल का तुमचं ?"  त्याने विचारलं.
" नाही आयमिन सर आले की जेवेन. तुम्ही घ्या जेवून " 
" बरं...."  त्याने इतकच म्हटलं आणि जेवायला सुरुवात केली. तो आपल्याशी फार बोलत नाहीय ते तिच्या लक्षात आलं तसा तिनेच विषय काढला.
" तुम्ही ते काल काय सांगत होता ?" 
" काल ! हा हा ते कारखान्याबद्दलचं का ?" त्याने विचारल.
" हो तेच. मग काय करताय नविन फॅक्टरीत ?" तिने छान हसून विचारलं.
" नविन नाही काही हो. ते आपल्या कारखान्यावर इतक्या कामगार बायका सुद्धा आहेत मग काहीजणींची मूलं लहान आहेत अगदी दोन तीन वर्षाच्या वयोगटातली " 
" हं....मग त्यांच्यासाठी काही करायचं म्हणता का?" तिने विचारलं तस त्याने त्याची कालची नाराजी बाजूला केली आणि तिला सगळ सविस्तर सांगायला सुरुवात केली.
" तर त्यांच्यासाठी बालवाडी सुरु करायची कारखान्याच्या आवारातच "
" अरेवा ! छान आयडीआ आहे हो. Keep it up ! " ती त्याच पुढचं बोलणं ऐकायला डायनिंगटेबलची चेअर ओढून बसली. ती अस मन लावून ऐकतेय म्हटल्यावरती त्यानेही बोलायला सुरुवात केली आणि बरचस तो बोलत राहिला. ती पण तिला वाटतं ते त्याला सुचवत होती. त्यांच्या गप्पा इतक्या  रंगल्या की विक्रम दरवाजातून हॉलमध्ये आल्याची चाहूलही तिला लागली नाही. बर्‍याच महिन्यानंतर ती आणि जितेंद्र इतका वेळ बोलत होते ते दृश्य पाहून त्याला बरं वाटलं. सकाळपासून तो राजेशच्या विचारातच अस्वस्थ होता पण आता समोरचं दृश्य बघून त्याला पुन्हा नवी उमेद मिळाली. सगळं काही ठिक होतय आणि होणारच आहे हा विचार मनात आला आणि थोड्यावेळासाठी का होईना मन शांत झालं.

क्रमशः

तुम्हा सर्वांना एक विनंती, कथेबद्दलच्या तुमच्या कमेंन्ट्स याच कथेच्या कोणत्याही भागांखाली केलात तरी माझ्यापर्यंत पोहचतात शिवाय मेसेंजरवरुनही मी रिप्लाय देत असते. तरीही बरेचसे वाचक इतर लेखकांच्या कथांखाली कमेंन्ट्स करतात. ज्या माझ्यापर्यंत पोचत नाही. मी रात्री एक दीडपर्यंत जरी कमेंन्ट्स आले तरी ते वाचल्याची लगेच रिअॅक्शन असते. बाकी मी इतर कथांच्या कमेंन्ट्स वाचत नाही ना तिथे काही कोणाला बोलायला जात ना इतर लेखकांच्या कथेविषयीचं माझं मत तिथे मांडून मला काहीतरी वेगळ येत हे दाखवायला जातं मला ते पटत नाही पण हल्लीच एक दोन इतर लेखकांच्या कथेखाली मी जाऊन त्यांच्या कमेंन्टबॉक्स मध्ये या कथेविषयी रिप्लाय दिलेले अस वारंवार होता नये. इतर लेखकांना डिस्टरब होता नये याची काळजी घेऊया. बाकी तुम्ही कमेंन्टबॉक्समधून माझ्याशी बोलत असता. तुमचे अनुभव शेअर करता, सजेशन्स देता, पात्रांविषयी बोलता कारण आपल्यातलं ' बंधन ' नेहमीच स्पेशल राहिलयं ते तसच राहु द्या. ज्यांना वाचायचं नसेल त्या वाचकांनी प्लीज माझा पिच्छा सोडा आणि उगीच टिका करण्यापेक्षा इतर कथांचा आनंद घ्या. प्रत्येकवेळी काहीतरी चुका शोधायच्या कधी रोमान्स कमी झाला कधी वास्तववादीच नाही प्लीज तुम्ही इतर कथांचा आनंद घ्या पण माझी लेखनाची मानसिकता बिघडवू नका.
Thank youuuu

🎭 Series Post

View all