बंधन भाग 73

Love Social

भाग 73
(  गेल्या भागात दोघं फार्महाऊसवरुन घरी आले आणि रात्री अनघाने त्याला छोटस keychain गिफ्ट दिलं आणि त्याने तिला बरचस समजावलं तरीही बर्‍याच दिवसांपासून त्याला  श्रीकांतबद्दल तिच्याशी बोलायचं होतं जे तो लगेच दुसर्‍या दिवशी बोलतो आणि तिही त्याला स्पष्टपणे सगळं सांगते त्यामुळे आता श्रीकांतचा मुद्दा संपलाय.पाहूया पुढे)

सप्टेंबर आता सुरु झाला होता आणि पावसाचा जोरही बर्‍यापैकी ओसरला होता. कॉलेजच्या तृतीय वर्षाच्या विद्यार्थ्यांचे निकाल काही दिवसांपूर्वी लागले होते त्यामुळे कॉलेजमध्ये उत्साहाचं वातावरण होतं. प्राचार्यांनी सगळ्या प्राध्यापकांची मिटींग स्टाफरुमला घेऊन सर्वांचं उत्तम रिझल्टबद्दल अभिनंदन केलं. खंदारेमॅडमच्या विभागाचा निकाल शंभर टक्के होता आणि अनघाच्या दोन्ही विषयात टि.वाय.च्या सगळ्याच विद्यार्थ्यांना छान मार्क्स मिळाले होते त्यामुळे तीही खूश होती आणि रिझल्ट ऐकून पहिल्या आणि दुसर्‍या वर्षाचे विद्यार्थीही खूश होते. सगळ्या विभागांचे रिझल्ट्स पाहण्यासाठी आणि प्राचार्यांचं अभिनंदन करण्यासाठी भाऊसाहेब कॉलेजला गेले. विक्रमचं त्यांनी घरी अभिनंदन केलच होतं पण प्राचार्यांसमोरही त्यांनी विक्रमचं कौतुक केलं त्यामुळे तो अजूनच खूश होता आणि त्याच खूशीत तो केबिनमध्ये येऊन बसला इतक्यात डॉ.विशालचा मेसेज आला. त्याने विशालला व्हिडीओकॉलवरती बोलूया अस सांगितलं होतं त्याप्रमाणे फ्री झाल्यानंतर विशालने त्याला मेसेज टाकला होता. त्याने लगेच विशालला व्हिडीओ कॉल केला.
" हॅलो, My friend कसा आहेस ?"  पलिकडून विशाल नेहमीच्या उत्साहाने कॉलवरती आला.
" Fine रे बाकी तू ?"  त्याने विचारलं.
" ओये माझं राहू दे...Have you asked her? " विशालने एक्साईट होत विचारलं तसा तो सूचक हसला.
" वाव! सांगण्याची गरज नाही रे तुझ्या मूडवरुन समजलं हा! बाकी Congrats "  विशाल हसत बोलला.
" हं...थँक्स पण अजून नॉर्मल नाही झालेलं काहीच. ती अचानक दचकते किंवा व्हाईलन्ट होते म्हणजे ते पर्फ्युमचं सांगितलं न तुला तसच " विक्रम म्हणाला तस विशालमधला डॉक्टर बोलायला लागला,
" हं...अरे सपोज एखादी दुःखद घटना घडते तेव्हा त्याच्याशी रिलेटेड छोट्या गोष्टी समोर आल्या तरी आपण प्रेझेंन्ट विसरतो आणि आपल्या Subconscious mind मधल्या त्या वस्तूशी संबंधित ज्या वाईट, सॅड आठवणी असतात त्या क्षणभर जाग्या होतात तसच आहे ते....त्या घटनेशी संबंधित छोट्या गोष्टी असल्यातरी त्या तिला त्याच घटनेची आठवण करुन देतील मग पर्फ्युमचा वास असेल किंवा तू म्हणतोस तस घरातही तिला रात्रीची भिती वाटणं असेल किंवा एखादी बंद खोली किंवा पडकी जागा तिने पाहिली तरीसुद्धा भिती वाटू शकते!"
" ओके मग काय करु I mean "  त्याने विचारलं.
" इट्स ओके Cool down आणि शक्यतो त्या दिवसाशी रिलेटेड गोष्टींपासून तिला लांब ठेवण्याचा प्रयत्न कर आणि हळुहळु वेळ जाईल तस होईल सगळ नॉर्मल"  विशाल त्याला धीर देत म्हणाला.
" आणि One more important thing कुठलीही मुव्ही, वेबसीरीज अस काहीही बघताना Be careful त्यात छेडछाडीचे सिन किंवा अगदीच बोल्ड सिन असणार नाहीत त्याची शक्यतो काळजी घे कारण दृश्य माध्यमाचा परिणाम मनावरती पटकन होतो मग एखादवेळी एकदम बिथरेल ती आणि साहजिकच असेल ते काहीच महिनेच झालेत आतासे त्या घटनेला बाकी थोडा काळ गेला की ठिक होईल सगळं ."
" हं.....बरं बरं I'll take care of it " विक्रमने सगळं आपल्याला कळलय असा चेहरा केला तसा विशाल म्हणाला,
" अरे Don't worry मित्रा Everything'll be ok " 
" थँक्स रे विशाल तुझ्यासोबत बोलल ना कि मन हलकं होतं."
" मग म्हणूनच लोक माझ्याकडे येतात ना नाहीतर क्लीनिक बंद करावं लागेल मला " विशाल मस्करीत म्हणाला तस विक्रमलापण त्याचं हसू आलं. " बरं तू पण बिझी असशील आणि घरी तुझ्यासोबत बोलतानाही येत नाही. ती आजूबाजूलाच असते सो " 
" हं.....असणारच आता काय बुवा तुझी प्यारवाली लव्हस्टोरी " विशाल त्याला चिडवत हसत म्हणाला.
" गप रे तू पण काय सुरु होतोस त्या नितूसारखा " 
" ओके ओके चल बाय आणि जयपूरला आलास की बोलू " 
" ओके बाय बाय " म्हणत त्याला टाटा करुन विक्रमने कॉल ठेवला. त्याने फोन ठेवला मात्र वेगळीच चिंता त्याला सतावत होती, तो पहिल्यांदा विशालला भेटून आल्यानंतरच्या काही महिन्यात दोन तीनवेळा तो जयपूरला विशालला भेटायला गेला होता. क्लिनिकमध्ये प्रत्यक्ष त्याला भेटल्यावरती त्यांच्यात अनघाच्या मानसिक स्थितीविषयी बरीचशी चर्चा व्हायची. विशाल तश्या प्रकारच्या इतर त्याच्याकडे आलेल्या केसेसविषयीसुद्धा बोलायचा. त्यातून काही क्लू मिळायचे. एका सेशनमध्ये असच विशाल त्याला बोलला होता, She needs someone special in her life असा माणूस जो इतरांपेक्षाही चार गोष्टी फक्त तिच्यासाठी म्हणून करेल आणि अश्या केसेसमध्ये इमोशनल सपोर्टची मुलींना गरज असते. विक्रमला आठवलं, आपण विशालला म्हटलं होतं तेव्हा मी देईन न तिला आधार आणि त्यानंतर आपण तिला जास्तीत जास्त समजून घ्यायचा प्रयत्न केला पण आपलं हे विशालकडे जाणयेणं तिला माहित नाही आणि आता ती आपल्याशी इतकं बोलत असते की विचारेलच ती हल्ली सारखा का जातोस तू जयपूरला मग काय सांगायचं तिला याचाच विचार तो करु लागला.
......................


दुपारी कॉलेज सुटल्यावरती तो नेहमीप्रमाणे गाडी पार्किंगस्लोटमधून बाहेर काढून तिची वाट पाहत कॉलेजच्या गेटबाहेरच्या आवारात थांबला होता. विद्यार्थ्यांचे घोळके गेटमधून आतमध्ये जात होते. दुपारसत्राची मुलं ग्रुपने थट्टामस्करी करीत बाहेर उभी होती. कोणी एकमेकाच्या प्रॅक्टिकलच्या नोटबुक्स पाहत ग्रुपने उभे होते. काही प्राध्यापक बाहेरच्या आवारातच गप्पा मारत उभे होते. त्याने रिस्टवॉचमध्ये पाहिलं. ' छे! इतका वेळ लागतो खाली 
यायला ' तो मनातून म्हणाला. तो गाडीतच बसला होता आणि तिची वाट बघत होता इतक्यात ती खंदारेमॅडमसोबत चालत बाहेर आली. मॅडम त्यांची कार काढण्यासाठी पार्किंगमध्ये जाणार इतक्यात दहा पंधरा मुलामुलींचा घोळका त्यांच्याभोवती गोळा झाला. त्या विद्यार्थ्यांच्या हातात पेढ्यांचे बॉक्स होते. पाऊस बर्‍यापैकी कमी आला होता त्यामुळे चांगले मार्क्स मिळालेले आणि कँपस प्लेसमेंन्टमध्ये सिलेक्शन झालेले विद्यार्थी आता प्राध्यापकांना भेटायला येत होते. काही विद्यार्थ्यांनी खंदारे मॅडमना वाकून नमस्कार केला आणि अनघासोबत बोलायला लागले. मॅडम सगळ्यांची चौकशी करत होत्या मधूनच शिस्तीने वागा अभ्यास करा असेही सल्ले देत असाव्यात असे त्यांचे हावभाव पाहून विक्रमला वाटलं. मुलांनी त्यांना पेढे दिले आणि थोडा वेळ बोलून मुलं कॉलेजमध्ये गेली. मॅडमने हसून तिला बाय म्हटलं आणि त्या गाडीजवळ गेल्या. पेढे हातात घेऊन ती चालत आली.
" या मॅडम " त्याने ड्रायविंगसीटवरुनच पुढे सरकत दरवाजा उघडला तशी ती आतमध्ये बसली.
"  सॉरी सॉरी ते मुलं बोलत राहिली मग लेट झाला." ती आत बसल्या बसल्या म्हणाली.
" इट्स ओके तुमचे स्टुडंन्ट्स आले म्हटल्यावरती काय बोलणार आम्ही ! तुम्ही फेवरेट आहात मुलांच्या " तो चेष्टेने बोलला आणि गाडी स्टार्ट केली.
" अस काही नाही....." तिने पर्समधून एक लन्चबॉक्स बाहेर काढला साधारणतः अंगणवाडीतली मुलं खाऊसाठी जसे रंगीबेरंगी प्लॅस्टिक डबे नेतात तसाच तो डबा होता आणि त्याच्या झाकणावरती 'डोरेमॉन ' चं कार्टून होतं. तिने तो उघडला त्यात अजून पेढे होते. तिने तिच्या हातातले चार पाच पेढे त्यात ठेवले. तो ड्रायविंग करता करता हे सगळं आश्चर्याने बघत होता आणि तो कार्टुनचा डबा बघून त्याला हसूही येत होतं.
" हसायला काय झालं ?" तिने विचारलं तस तो मोठ्यानेच हसला.
" तू लहान मुलांसारखा लन्च बॉक्स !"
" का! छान आहे की आणि नेहमीच मोठ्यांसारख वागाव अस थोडीच आहे ! कधी कधी वागाव लहान मुलांसारखं " ती  म्हणाली आणि तिने लन्चबॉक्स त्याच्यासमोर धरला.
" घे न पेढा "
" नको....थँक्स " 
" घे न एकदा गोड खायला काय " तिने पटकन एक पेढा उचलला आणि त्याच्या तोंडात अक्षरशः ढकलला.
" अग काय हे! " त्याच्यावरती ती फसकन हसली.
" तू पण ना बरं खाल्ला खूश "
" हं....नी तुला स्वीट डीश का नाही आवडत ?" तिने बॉक्स बंद केला.
" असच.....नाही आवडत आणि अस प्रेमाने कोणी भरवलं पण नाही कधी " तिच्याकडे पाहत तो म्हणाला तस तिने गालात हसत विन्डोंतून बाहेर पाहिलं.
..........................
" हॅल्लो यायचं का आमी " रुमचा दरवाजा लोटून नीतू आत आली आणि मागून जितेंद्रसुद्धा. 
" या ना तसही आपल्याला कुठे परमिशन लागते नाही!" विक्रम बेडवरती लॅपटॉप घेउन बसला होता आणि हे दोघ आतमध्ये आले. 
" ए वैनुडी काय करतेस ?" नीतू धावत अनघाच्या स्टडीटेबलपाशी गेली.
" काही नाही नोट्स नेहमीच काम " ती तिच्या कामात व्यग्र होती. तिथून नीतूचं लक्ष बेडवरती गेलं.
" हा काय करतोय !" 
" काय करणार अग काहीतरी काम करत असतील " ती पुस्तकं चाळत होती.
" होय काय मग मोबाईल समोर कश्याला रे !" नीतूने पटकन म्हटलं. त्याच्यासमोर लॅपटॉप होता नी हाताच्या अगदीच बाजूला मोबाईल होता नी वॉलपेपरला अनघाचा फोटो ते नीतूच्या लक्षात आलं तस ती त्याला चिडवायला लागली.
" ए तुला बर्‍या चौकश्या ग " जितेंद्र तिला म्हणाला.
" तस नाही रे माणूस समोर असेल तर मन भरेस्तोवर बघत बसावं मोबाईल कश्याला " नीतू पुन्हा बोलली तस विक्रमने तिला हातवारे करुन गप्प बसायला सांगितलं.
" ए तिचं काही ऐकू नको तुमचं अभिनंदन रिझल्टबद्दल नी त्याच्यासाठीच आलेलो आम्ही " जितेंद्रने मुद्द्याचं बोलून टाकलं.
" थँक्यु भावोजी " 
" हो वैनी तुझंपण अभिनंदन " तिच्या खांद्यावरती हात ठेवत नीतू म्हणाली.
" अरे माझं कसलं अभिनंदन सरांमुळे आम्ही चांगलं काम करतो आणि त्यांचे एफर्ट्स पण असतातच न वर्षभर " अनघा पुस्तकाची पान परतत नकळत बोलून गेली. विक्रमने पटकन तिच्याकडे पाहिलं पण तिच लक्ष नव्हतं.
" हो ग हो.....बरं तुम्ही करा कामं आम्ही निघतो " नीतू म्हणाली तसा जितेंद्रही हो चल म्हणून जायला वळला. ती जाताना पटकन विक्रमजवळ आली.
" सेक्रेटरी भारीच आहे हा! लगेच बाजू घेते "
" नीतू मार खाशील " तो बोलला तशी ती पटकन ठेंगा दाखवून पळाली पण अनघाने त्यांच्यासमोर आपलं कौतुक केलेलं बघून त्याला मात्र खूप आनंद झाला.
........................
कॉलेजच्या चांगल्या निकालांमुळे सगळेच खूश होते आणि अनघाला याचा जास्त आनंद होता की मुलांच्या वार्षिक परिक्षांच्या आधी तिची मनःस्थिती ठिक नव्हती. डिसेंबरच्या त्या घटनेमुळे ती उन्मळून पडली होती आणि अश्यातच विक्रमने मिटिंमध्ये सगळ्या स्टाफसमोर तिला तिच्या शिकवण्यावरुन झापलं होतं आणि कामाकडे लक्ष द्यायला सांगितलं होतं. इतका ताण मनावरती असुनही तिने मुलांना जे शिकवलं होतं त्यात ती स्वतः तिच्या कामात शंभर टक्के पास झाली याचीच पोचपावती म्हणजे तिच्या विषयाचे चांगले रिझल्ट्स होते त्यामुळे ती विक्रमसमोर जरा भाव खायची मग त्यानेही तिला मिटिंगमध्ये ओरडल्याच्या प्रकारावरुन सॉरी बोलून टाकलं. माणसाचं वैयक्तीक आणि प्रोफेशनल आयुष्य दोन्हीकडे चांगल्या घटना घडत असल्या की माणूस नेहमीच खूश असतो सद्या तिच्याहीबाबतीत असच झालं होतं. त्यामुळे तिच्या आनंदाला पारावार नव्हता. तिने जरा अभ्यास, कॉलेजचं काम अस सगळ थोडावेळ बाजूला ठेवून स्वतःसाठी वेळ काढायचा ठरवला. तिनेही छान छान रोमँन्टिक कादंबर्‍या वाचायला सुरुवात केली. मोबाईलमध्ये गेम्सपण डाऊनलोड केले. प्रेरक भाषणांचे व्हिडीओज लॅपटॉपमध्ये घेतले आणि सोबतच काही हिंदी मुव्हिजसुद्धा !
.............................
" काय मॅडम काय एवढं लक्ष देऊन बघताय लॅपटॉप उघडुन?"  विक्रम रुमचा दरवाजा लोटुन नुकताच कॉलेजमधून आला होता.
" झाली का मिटींग ?" तिने लॅपटॉपची बटणं दाबतच मानसुद्धा वरती न करता विचारलं.
" हो झाली तसही दुपारसत्राचे प्राध्यापक शिस्त वगेरे पाळतात सो त्यांना काही रागवाव वगैरे लागत नाही!" तो हसून बोलला तसे तिने कान टवकारले.
" हो का असु दे हा " ती त्याच्यासोबत फार बोलण्याच्या मुडमध्ये नव्हती कारण तिचं सगळ लक्ष लॅपटॉपमध्ये होतं तस त्याने विचारलं.
"बाय द वे काय करतेस ?" 
" मुव्ही बघतेय माधुरीची मस्तय ! अॅक्चुली मला 90s च्या मुव्हिज खूप आवडतात. I love Madhuri. किती दिवसात एक पण पिक्चर नाही पाहिला. माहितीय मी नी रिया सुटीतनं कितीतरी वेळा जायचो थिएटरला." ती उशी पोटाशी घेऊन खूश होत बोलली.
" हो का बघू ना मलापण " तो पुढे आला तसे तिने बेडवरती दोन्ही बाजूला हात ठेवले.
" ए Go to washroom आधी फ्रेश हो मग ये "
" अरे बाई बसत नाही ग मी. जस्ट " तो जरा लॅपटॉपकडे पाहत बोलला.
" Noo जा फ्रेश हो आधी मग आपण कॉफी आणि चिप्स घेऊ आणि पुढचे दोन तास no calls, no work हा!" तिने एवढा सगळा प्लॅन ठरवलेला बघून मग ओके म्हणण्याशिवाय त्याला पर्यायच नव्हता.
" बरं बरं मी येतो फ्रेश होऊन तू बस " इतक बोलून तो विचारातच वॉशरुमकडे गेला. त्या दहा पंधरा मिनिटात माधुरीच्या बर्‍याच सिनेमांची नावं त्याच्या नजरेसमोर आली पण आपण उगीच घाबरायला नको, विशालचं दोन तीन दिवसांपूर्वीचं बोलणं काही लगेच खर होत नाही असा एक विचार मनात आला आणि शांत वाटलं.
.........................


थोड्यावेळाने तो फ्रेश होउन बाहेर आला तस तिचं त्याच्याकडे लक्ष गेलं.
" ब्लॅक! ब्लॅक शर्ट्स इतके आवडतात तुला ?" ती मस्करित लॅपटॉपमध्ये पाहत बोलली.
" नाही ग असच actually मला ना " तो पुढे बोलणार इतक्यात चेअरवरचा मोबाईल वाजला.
" थांब हा Only five minutes करंबेळकर सरांचा " तो फोनवरती बोलत गॅलरीत गेला. ती लॅपटॉपमध्येच त्या सिनेमात गुंतली होती. 
.............................
दहा पंधरा मिनटं गेली. त्याचं फोनवरचं डिस्कशन सुरुच होतं इतक्यात ती मोठ्याने किंचाळली.
" आई........." 
तिच्या ओरडण्यासरशी त्याने पटकन कॉल यु बॅक म्हटलं नी फोन कट केला आणि धावतच तो आत आला.
" अनु अग...." त्याला लग्नाच्या दिवशीची रात्र आठवली आणि तिला आलेला पॅनिक अॅटॅक. ती हातपाय पोटाशी घेऊन घाबरुन बेडच्या कोपर्‍यात बसलेली. तिचं शरीर भितीने थरथरत होतं. तो पटकन पुढे आला.
" अनु काय झाल आ बघ इकडे " तो असा समोरुन येउन बसला आणि ती लहान मुलासारखी रडत त्याला बिलगली. तिच्या शरिराचे कंप त्याला जाणवले इतके तिचे हात थरथरत होते. त्याने एका हातानेच लॅपटॉपवरच्या किज दाबल्या तसा पिक्चर स्टॉप झाला. त्याला भिती होती तेच झालं होतं त्याच्या दुर्दैवाने माधुरीचे एवढे रोमॅन्टिक सिनेमे सोडून तिचा 'प्रेमप्रतिज्ञा ' पाहायची तिला दुर्बुद्धी झाली. सिनेमाच्या नावात 'प्रेम ' असलं तरी त्यातली लक्ष्मी म्हणजेच माधुरी गरिबवस्तीत राहणारी मुलगी असते जी त्या एरियाच्या एका मोठ्या गुंडाच्या तावडीत सापडते आणि तो गुंड तिच्यावरती बलात्कार करतो आणि हा तोच पिक्चर होता ज्यात तिच्या अभिनयाची कसोटी लागली आणि तो रेपसिन अगदी खराखुरा वाटावा असा पडद्यावरती दिसला. ती सिननंतर रडली किंवा शॉकमध्ये होती अश्याही चर्चा त्या पिक्चरबद्दल केल्या जातात. विक्रमला डोक्याला हात लावावासा वाटला आणि वाटलं आपण का अस निष्काळजी वागलो इथेच थांबायला हव होतं.
" अनु शांत हो.....Cool down बघ कोणी नाहीय की नाही....मी आहे न " त्याने पाठीवरुन थोपटलं तस शांत होऊन तिने नजर वरती केली. त्याने अलगदपणे तिचे अश्रु पुसले. 
" चलो Cool down चल चल मी कॉफी आणि चिप्स घेऊन येतो."  तो पुन्हा उत्साहाने म्हणाला तस ती निस्तेज चेहर्‍याने बोलली, " नको..मी....मी झोपू का थोडावेळ " 
त्याला तिचं शांत राहणं किंवा एकटीने राहणं नको होतं. तिने झोपायचा प्रयत्न केला तरीही डोक्यात मघाचच दृश्य घोळत राहिलं ते त्याच्या लक्षात आलं.
" नाही नाही काही झोपायचं नाही मग एवढा कॉफी नी मुव्हीचा प्लॅन केलास त्याचं काय! नो हा आपण बघुया मुव्ही Wait "  त्याने आपला लॅपटॉप ओपन केला.
" नाही नको....." ती थोडस घाबरुनच बोलली.
" थांब तर माझ्या फेवरेट मुव्हीजपैकी एखादी बघूया ना" आणि त्याने एक मुव्ही सुरु केली.
" बरं...." तिचं आता मनच नव्हतं त्यात तरी ती तो म्हणतोय म्हणून लॅपटॉपकडे पाहत बसली. चित्रपट सुरु झाला आणि समोर ग्रामीण भागातला निसर्ग, झाडांच्या सावलीतून हातात पुस्तक धरुन वाचत आपल्याच नादात चाललेली एक सुंदर, उंचशी ब्रिटीश मुलगी.
" अरे! हे कुठचय ?"  तिने आश्चर्याने विचारलं.
" It's rural England आवडेल तुला Pride & Prejudice तशी जुनी आहे पण मस्तय " तो म्हणाला तशी ती उत्साहाने पुढे येऊन बसली.
" ए छान आहे हे! वाव! " त्या पिक्चरमधल्या बहिणींचे आपापसातले रुसवे फुगवे बघून छान वाटलं तिला आणि तिला अस हसलेल बघून त्याला छान वाटलं. पंधरा एक मिनिटांनी ती मघाच सगळ विसरुन शांत झालीय ते त्याने पाहिलं मग तो रुममधून खाली गेला आणि आत्याकडून पटकन कॉफी बनवून घेतली. कॉफीमग आणि बाऊलमध्ये चिप्स अस सगळ ट्रेमधून घेऊन तो पुन्हा रुममध्ये आला तोपर्यंत ती त्या सिनेमात रमली होती.
" घ्या गरम कॉफी " त्याने समोर ट्रे ठेवला आणि तोही तिच्याशेजारी बसला.
" थँक्यु सो मच " तिने कॉफीमग घेत हसत म्हटलं.
" अरे Welcome मॅडम " 
तोसुद्धा पिक्चर पहायला लागला पण तिचं लक्ष त्याच्याकडे होतं. ती छान हसली आणि त्याच्याजवळ सरकली.
" विक्रम तू असा नेहमी असणार न माझ्यासोबत!" तिने त्याच्या खांद्यावरती डोक टेकलं.
" अरे! असणार ना म्हन्जे काय? असणारच always " तो तिचा हात हातात घेत म्हणाला. आपल्याला त्या घटनेनंतर ज्या आधाराची गरज होती तो देणारा माणूस आपल्याला भेटला आता आपल्या हक्काच कुणीतरी आहे ज्याच्या खांद्यावरती डोक ठेवल्यावरती आपले सगळे त्रास, सगळ्या चिंता क्षणभर आपण विसरु याचच तिला समाधान होतं.

क्रमशः

आजचा भाग मोठा होता सो तुम्ही खूश असाल पण कधी कधी काही भागात खूप सिन असतात काही भागात कमी असतात तर कथेमधले दिवस, महिने लक्षात घेऊन भाग लिहिले जातात त्यामुळे तस होतं. पहिल्या भागापासूनच एक  ' Time span ' आहे कारण कॉलेजचं शैक्षणिक वर्ष आणि कॉलेजमधलं कामकाज सुद्धा दाखवायचं असतं त्यामुळे दिवस, महिने काउंट करतच कथा पुढे जाते आतापर्यंत जवळपास अडीच वर्षाचा कालावधी आपण कथेतून कव्हर केलेला आहे. 

🎭 Series Post

View all