बंधन भाग 61

Love, Social

भाग 61

(  गेल्या भागात विक्रम अनघा रिसॉटला पोहचले. त्याने चर्चपासून ते बिच पर्यंत अशी द. गोव्यातली बरीच पर्यटनस्थळं तिला दाखवली. तिने ते गोव्यात असेपर्यंत तरी जास्त विचार करु नये, आनंदी राहाव अशी त्याची इच्छा होती. पाहूया आज दोघे कुठे कुठे जातायत)

सकाळी अनघाला लवकर जाग आली. विक्रमच्या घरी आल्यापासून त्या घराची,  विक्रमच्या रुमची तिला सवय झाली होती. त्यातून दररोजच सकाळी उठल्यावरती फ्रेश होऊन खाली हॉलला आलं की आत्या प्रसन्न चेहर्‍यानं घरभर वावरताना दिसायच्या. त्यांच्याकडे पाहिलं की तिला आधार वाटायचा. नितू आणि जितेंद्रची मस्ती चाललेली असायची. भाऊसाहेबांना भेटायला येणार्‍या लोकांची, कार्यकर्त्यांची लगबग बंगल्यावरती असायची. ते घरात नसले तरीही वटवृक्षासारखं छत्र धरुन कुणीतरी पाठीशी उभं आहे अस वाटायचं तिला! त्यांच्या विश्वासावर तर ती विक्रमला लग्नासाठी हो म्हणाली होती. गेले दोन- तीन दिवस ते गोव्यात होते पण तिला घराची आठवण येत होती. तिलाच आश्चर्य वाटलं तिचं, दोन महिने झाले नाहीत आपल्याला विक्रमच्या घरी येऊन आणि इतके आपण त्यांच्यात रमलो. याच विचारात ती रिसॉटच्या त्यांच्या रुमच्या गॅलरीत उभी होती. 

" कॉफी "  कॉफीचा मग विक्रमने तिच्यासमोर धरला आणि तिचं मन सांगलीतून पुन्हा गोव्यात आलं. 

" थँक्यु "  तिने कॉफीमग हातात घेतला.

" तुम्ही फारच मनावर घेतलत इथे उभं राहून कॉफी प्यायची ते!"  ती कॉफीचे घोट घेत बोलली.

" हो, मी म्हटलं होतं तुम्हाला कालच! म्हटलं आज वेळ आहे आणि तुम्ही पण उभ्या आहात इथे तर कॉफी घेऊया म्हणून अॉर्डर केली."  

" हो का बरं " 

" Coffee is more intoxicating than hard stuff " त्याने कॉफी पिता पिता पटकन असं म्हटलं.

"वाव!  Nice lines ! कुठे वाचल्यात. " तिला खूप आवडलं त्याचं बोलणं.

" छे! सहज म्हटलं हो " तिने असं कौतुक केल्यावरती त्याने जरा वेळ जाऊ दिला आणि कॉफी पित खाली नजर टाकली. त्याला माहित होतं, ती कुतुहलाने पुन्हा विचारणार,' अस का म्हणता पण तुम्ही '  आणि तसच झालं! तिने पुढच्या सेकंदाला लगेच विचारलं,

" पण....असं म्हणण्यामागचं रिजन काय? तुम्हाला इतकी आवडते कॉफी?" 

" अ...ह...सगळ्यांनाच आवडू शकते कारण कॉफी अशी निवांत घ्यायची असते. कॉफी म्हटलं कि खूप गप्पा, आठवणी  nostalgic करण्याची आणि एखाद्याला बोलतं करण्याची ताकद सुद्धा कॉफीत असते. " त्याने त्याचा कॉफीचा शेवटचा घोट घेतला. तिच्या मगमधली कॉफी त्याचं बोलणं ऐकता ऐकता संपलीसुद्धा! तिच्या लक्षातही नाही आलं. त्याने तिच्या हातातून रिकामा कॉफीमग काढून घेतला.

" आणि सोबत कुणी असेल तर कॉफीची टेस्ट अजून छान होते." दोन्ही मग हातात घेऊन तो आत जायला वळताना बोलला. त्याच्या या बोलण्यावर काय रिअॅक्ट व्हावं ते तिला कळलं नाही. ती काही बोलेपर्यंत तो आतमध्ये तोपर्यंत निघून गेला.

..........................

तिची तयारी होईपर्यंत तो खाली रिसॉटच्या आजूबाजूचा निसर्गरम्य परिसर पाहत थांबला. ती खाली आली आणि दोघे तिथून फिरायला बाहेर पडले.

" कुठे जायचं ?"  त्याने कार स्टार्ट केली आणि तिने विचारलं. आजही काहीतरी छान पाहायला मिळणार म्हणून ती उत्सुक होती. 

" नाव नाही सांगत आत्ताच. गेल्यावरती कळेलच." त्याने तिची उत्सुकता वाढवीत म्हटलं तशी ती ओके म्हणून गाडीच्या काचेतून बाहेर पाहू लागली.

...............................

सुमारे अर्ध्या पाऊण तासानंतर त्याने गाडी एका मंदिरापाशी थांबवली. ती उत्सुकतेनं तो उतरण्याआधीच गाडीतून उतरली. तिने इकडे तिकडे पाहिलं पण कुठे आलोय, कुठलं मंदिर ते कळेना. 

" सर कुठलं मंदिर हे! मला मंदिरं पाहायची होती. इकडची मंदिर ऐतिहासिक आणि प्रसिद्ध आहेत." ती बोलेपर्यंत तो गाडीतून उतरुन तिच्या बाजूला आला आणि त्याने मंदिराच्या एका दर्शनी भिंतीकडे बोट दाखवलं. त्यावर ठळक अक्षरात लिहिलं होतं, '  श्री शांतादुर्गा विजयते '

" नाव ऐकलं असेलच तुम्ही! गोव्यातल्या जुन्या आणि प्रसिद्ध मंदिरांपैकी हे एक ' शांतादुर्गा मंदिर ' " तो तिला म्हणाला. कधीतरी वाचलेली, ऐकलेली गोष्ट प्रत्यक्ष पाहायला मिळते तेव्हा जो आनंद होतो तोच आनंद तिला झाला.

" खरंच! किती सुंदर आहे हे मंदिर. " 

" हो ना, याची गोष्ट पण भारीच आहे नाही, भगवान श्रीविष्णु आणि शिवशंकर यांच्यामध्ये म्हणे युद्ध झालं आणि ते थांबवण्यासाठी ब्रम्हदेवांनी पार्वतीमातेकडे विनवणी केली. तिने त्याकरता शांतादुर्गादेवीचा अवतार घेतला आणि युद्ध थांबवलं."  विक्रम मंदिराकडे पाहत बोलला तस तिही त्याला दुजोरा देत म्हणाली,

" हो ना, मीही वाचलीय ही गोष्ट. जगदंबादेवीचं शांत रुप म्हणजेच शांतादुर्गा हो न." 

" हो अगदी करेक्ट. चला आतमध्ये जाऊ." तो म्हणाला आणि दोघे चालत देवालयाच्या आवारात आले. 

कौलारू पूर्वाभिमुख देवालय, तोच कौलांचा छान लालसर रंग संपूर्ण देवालयाच्या भिंतींवर चौकोनी नक्षीलाही होता आणि सोबत पांढरारंग.  समोर पांढर्‍याशुभ्र रंगातला दीपस्तंभ मंदिरासमोर उभा होता. मंदिराच्या गर्भागृहाच्या घुमटावरचा घूड आकाशाला टेकल्याचा भास होत होता इतका तो उंच होता. त्यांनी चप्पल बाहेर काढले आणि दोघं मंदिराच्या पायर्‍या चढून आतमध्ये गेले.

.......................

बाहेरुन मंदिर जितकं आकर्षक होतं तितकच आतमधून होतं. पिवळसर, पांढर्‍या , काळ्या रंगांच्या पट्ट्यांत सजलेले भरीव खांब आणि त्यावर लाकडी मजबूत छप्पर.

 कोकण आणि गोव्यातल्या सगळ्या मंदिरांमध्ये जशी शांतता, मनाची स्थिरता जाणवते तशीच तिथेही जाणवत होती. कौलारु छत, खेळती हवा, मंदिराच्या आजूबाजूला झाडांची दाटी, शुद्ध हवा यामुळे पर्यटकांचे पाय आपसूक या मंदिरांकडे वळतात याला हे मंदिरही अपवाद नव्हतं. विदेशी पर्यटकही मंदिरात उत्सुकतेने सगळ्यां गोष्टींचं निरिक्षण करताना दिसत होते.

दोघ मंदिराच्या गाभार्‍यापाशी पोहचले. गाभार्‍याच्या दोन्ही बाजूला मोठ्या समई तेवत होत्या. तो प्रकाश देवीच्या मुखावरती पसरला होता. गाभार्‍यात आसनावरती शांतादुर्गादेवीची चतुर्भुज मूर्ती होती. तिने हळकुंकु लावून बाजूच्या परडीतली फुलं देवीला वाहिली. दोघांनी नमस्कार केला. सकाळची वेळ होती त्यामुळे पुरोहितांची नुकतीच देवीची पूजाअर्चा संपन्न झालेली. पुजेचं तबक घेऊन ते तिथे आले. दोघांकडे पाहून त्यांनी स्मितहास्य केलं त्यावर दोघांनीही त्यांना वाकून नमस्कार केला.

" अखंड सौभाग्यवती भव."  त्यांनी आनंदाने अनघाच्या डोक्यावरती आशीर्वादाचा हात ठेवत म्हटलं. 

" गोड दिसता हा दोघं एकत्र." त्यांचं नव नव लग्न गुरुजींच्या लक्षात आलं. त्यांच्या या वाक्यावरती विक्रमला इतका आनंद झाला. त्याने तिच्याकडे पाहिलं. ' हं...एकत्रच छान दिसतो आपण मॅडम म्हणून नेहमी माझ्यासोबतच राहा तुम्ही.' त्याने मनातून हे म्हटलं खरं पण त्याला स्वतःचच हसू आलं.

" गुरुजी, हे मंदिर ऐतिहासिक आहे ना!" अनघा गुरुजींसोबत बोलत होती. तिच्या या प्रश्नाने तो भानावर आला आणि गुरुजींच्या सांगण्याकडे लक्ष देऊ लागला.

" हो अगदी बरोबर, पोर्तृगिजांनी गोवा ताब्यात घेऊन या मंदिरांचा छळ सुरु केला. 1564 ला पोर्तृगिजांनी मंदिर उध्वस्त केलं. भक्तांनी मग देवीचे स्थलांतर फोंडामधुन कवळेला केलं. पुढे छत्रपती शाहूमहाराजांनीही या मंदिराच्या उभारणीसाठी योगदान दिलं." गुरुजींच्या बोलण्यावर विक्रमने विचारलं, " मग इथे यात्रा उत्सव पण साजरे होत असतील ना इतकं मोठ मंदिर आहे तर."

" हो हो अगदी वर्षभर इकडे उत्सवाचं वातावरण असतं. वसंतोत्सव, श्रीरामनवमी, अक्षयतृतीया, नवरात्र, महाशिवरात्र सगळे उत्सव इथे साजरे होतात जितके महाराष्ट्रातल्या मंदिरांमध्ये होतात." गुरुजी समाधानाने बोलले.

" छानच! एकदा यायला हव मग " तो हसत म्हणाला.

" हो हो अवश्य या " गुरुजी दोघांनाही म्हणाले.

" बरं, गुरुजी निघतो आम्ही." ती त्याला नजरेने निघायचं का विचारत बोलली.

" हो येतो गुरुजी आता " त्याने येतो म्हणत हात जोडले आणि ते गाभार्‍यापासून चालत बाहेर आले. मंदिराजवळ अतिथीगृह होतं. दुसर्‍या बाजूला तलावही होता. मंदिरालगत श्रीनारायणाचं छोटस मंदिर होतं. तिथे श्रीगणेशाची मूर्तीही विराजमान होती. तिथेही ते थोडा वेळ थांबले. खूप बरं वाटलं तिला तिथे येऊन. प्रसन्न मनाने दोघं तिथून बाहेर पडले.

..............................

मंदिरातून बाहेर पडल्यावरती त्याने गाडी रस्त्याला वळवली. आता हळूहळू दुपारचे बारा वाजत आले. 

" आता कुठे जायचं ?" तिने उत्सुकतेनं विचारलं.

" चला, तुम्हाला एक रेस्टॉरंन्ट दाखवतो. It's riverside restaurant so it has amazing scenic view." तो ड्राईव करता करता बोलत होता.

" वाव! मस्तच ! "  ती एक्साईट होऊन बोलली.

" हो and it's also famous for mouthwatering dishes."  

" म्हणजे कूकिंगक्लास आज पण!" 

" हो तस समजा हव तर !"  त्याने हसत म्हटलं.

.........................

त्याने गाडी रेस्टॉरंन्टच्या जवळ पार्क केली. रेस्टॉरंन्टच्या आतमध्ये जायच्या मार्गावर दोन्ही बाजूला झाडं होती. समोर रेस्टॉरन्टच्या नावाची उंच पाटी उभी होती. त्यावर डिजाईनच्या अक्षरात रेस्टॉरंन्टचं नाव होतं,  'The Fishermans Wharf '. ते आतमध्ये आले. मोठ्या रेस्टॉरन्टसारखं ते नव्हतं. लाकडी छत आणि त्यावरती लालसर कौलं! आतमधल्या खांबांनाही मातीचा लालसर रंग होता. काउंटरच्या तिथे सुशोभिकरणासाठी हिरव्यागार दिसतील अश्या आर्टिफिशियल वेली चढवलेल्या होत्या. ते तिथून आतमध्ये आले. ब्लॅक कलरच्या Ladder back chairs आणि चौकोनी छोटी डायनिंगटेबल्स मांडलेली होती. कुठल्याही टेबलला बसलं तरी समोरचं नदीचं डोळ्यांना गारवा देणारं दृश्य दिसू शकत होतं. लहान मूलं बसमध्ये चढल्यावरती खिडकीची जागा पकडतात तस ती धावत जाऊन कडेच्या डायनिंगटेबलला बसली जेणेकरुन  नदीचं विहंगम दृश्य अजून छान दिसेल. प्रत्येक डायनिंगटेबलच्या तिथे खांबाला लँम्प लावलेले होते. त्याकडे पाहत ती म्हणाली,

" संध्याकाळी किती छान वाटत असेल ना इथे !" 

" हो तर! कोणासोबत डेटला यायचं असेल तर nice spot!"  तो चेअरमध्ये बसत बाहेर नदीचं शांत पाणी पाहत सहज म्हणाला. तिने मात्र कान टवकारुन त्याचे शब्द ऐकले. तिला वाटत होतं, मस्करी म्हणून विचाराव, ' तुम्ही आला नाहीत का इथे कोणासोबत आधी!' पण तिने विचारणं टाळलं. इतक्यात वेटर अॉर्डर विचारायला तिथे आला.

" Sir Welcome Welcome Mam, What would you like to order ?" वेटरने छान हसून त्यांचं स्वागत केलं.

तिने मेन्युकार्ड पाहिलं आणि गेले तीन दिवस खाल्लेल्या पदार्थांपैकी मेन्युकार्डमध्ये कोणते आहेत का ते नजर फिरवत पाहायला सुरुवात केली. त्यानेही मेन्युकार्ड हातात घेतलं होतं नी उगीच पानं पलटत तिने बोलण्याची वाट बघत होता. कार्डमध्ये बघताना त्याचं अर्ध लक्ष तिच्या चेहर्‍याकडे होतं. ' तुम्ही करा हो काहीही अॉर्डर...मी तुमच्या प्लेटमधलच घेणार...आज माझ्यासोबत शेअर करा..' त्याच्या मनात हे सुरु होतं तितक्यात तिने अॉर्डर सांगायला सुरुवात केली.

" सर तुम्हाला काय अॉर्डर करायचय " ती अजूनही मेन्युकार्ड पाहत होती.

" तुम्ही सांगा अस काही नाही." तो बोलला त्यावर तिने वेटरकडे पाहत म्हटलं.

" 2 Pork Vindaloo and rice आणि सर डेझर्टसाठी काय ?" त्याच्याकडे पाहत पुन्हा तिने विचारलं आणि तो काही बोलणार इतक्यात स्वतःच वेटरकडे लक्ष देत म्हणाली, 2 Bebinca " 

" नो, Not two, तुमच्यासाठी एक डिश सांगा. actually I don't like sweet dishes." 

" ओके मग 1 Bebinca " तिने त्याच्या बोलण्यावर लगेच वेटरला सांगितलं.

" ओके मॅम and mocktail ?" वेटरने मेन्यु नोट डाऊन करत पुन्हा विचारलं.

" Two Mojito " त्याने म्हटलं.

" Ok Sir..Just wait for five minuts " म्हणत अॉर्डर नोट डाऊन करुन वेटर निघून गेला.

" तुम्हाला नाही आवडत का गोड पदार्थ!"  तिला तिने बनवलेल्या गोडाच्या शिर्‍याची आठवण झाली.

" हं....म्हणजे अस काही नाही बट I don't eat often!" त्याने कारण सांगितलं.

इतक्यात वेटरनी अॉर्डरप्रमाणे डिश आणून टेबलवरती ठेवल्या.

" Enjoy your lunch " त्याने हसून म्हटलं आणि तो निघून गेला.

" चलो Start " त्याने डिशमध्ये चमचा घोळवत म्हटलं.

" हं.... सर हे Bebinca चे piece " तिने तिच्या प्लेटमधल्या बाऊलकडे पाहत नाराजीनेच म्हटलं.

केकच्या तुकड्यांसारखे छोटे छोटे चॉकलेटी कलरचे तुकडे बाऊलमध्ये होते. तिला वाटलं आपण एकट्याने कसं खायचं. त्याच्या लक्षात आलं पण काहीही कळलेलं नाही अस त्याने दाखवलं. 

" Can I share ?" तिने विचारलं तस तो मनातून खूश झाला पण साधाभोळा चेहरा ठेवत त्याने म्हटलं.

" ओह....Ok Sure " 

तिने तिच्या प्लेटमधल्या दोन चमच्यांनी बाऊलमधले दोन पिस त्याच्या प्लेटमध्ये ठेवले. तिने तिच्या हातांनी तिच्या डिशमधलं शेअर केलं होतं जे त्याने इमॅजिन केलं होतं तसच झालं. त्याने थँक्स म्हणून टाकलं आणि मनातून खूश होत जेवायला सुरुवात केली.

...............................

मे महिना संपायला एक दोन दिवस उरले होते. उन्हाच्या झळा असह्य होत होत्या. अनघाची तब्येत गेल्या काही महिन्यांपासून नाजूक झालेली त्यामुळे दुपारचं बाहेर फिरणं त्याने टाळलं. लन्चनंतर ते रिसॉटला आले. अजून तिला इथला समुद्रकिनारा दाखवायचा होता. तिने कोल्वाच्या बीचबद्दल त्याच्याकडून गेले तीन चार दिवस फक्त ऐकलच होतं त्यामुळे तिची उत्सुकता अजून वाढली होती. शेवटी संध्याकाळी फिरायला बाहेर आल्यानंतर त्याने गाडी समुद्रकिनार्‍याच्या दिशेनं वळवली. रिसॉटपासून बीच साधारणतः एक किमीपेक्षाही कमी अंतरावरती होता. तिला वाटलं, आपण तर चालतसुद्धा आलो असतो! त्याने गाडी जवळच पार्क केली आणि ते चालत पुढे आले. समोर अथांग समुद्र, खळाळत्या लाटा, पांढरीशुभ्र सोनेरी वाळू आणि किनार्‍याला वर्षानुवर्ष साथ देणारी माडाची उंचच उंच झाडं मन मोहवून टाकणारा देखावा होता तो! बाजूच्या कोपर्‍यात लाईफगार्डची केबिन होती. बोटींग, पॅरासेलिंग करणार्‍यांची धांदल होती. कितीतरी फॅमिलिज, कपल्स समुद्राच्या लांटाचा आनंद घेत होते. त्यांच्यासारखी नवीन लग्न झालेली जोडपी एकमेकांचे छान छान फोटोज काढण्यात बिझी होती. लहान मुलं एकमेकांवरती पाणी उडवत खेळत होती. काही हौशी मित्रांचे ग्रुप बोटींग, पॅरासेलिंगचा आनंद घेण्यात मग्न होते. काही विदेशी पर्यटक सनबाथिंगचा आनंद घेत मस्त वाळूत बसले होते. गोव्यातल्या साधारणतः कोणत्याही बीचवरती जी वर्दळ असते, मस्ती असते तसच वातावरण तिथेही होतं. हे सगळ फक्त तिने हिंदी सिनेमांमध्ये पाहिलं होतं. किनार्‍यापासून थोड्याश्या अंतरावरती छोटी छोटी दुकानं होती. लाकडी वस्तू, खेळणी, शंखशिंपल्यांच्या शोभीवंत वस्तू खाटांवरती मांडलेल्या होत्या. विदेशी पर्यटक कुतुहलाने  त्या वस्तू पाहत होते. खरेदी करत होते. पण त्या गर्दीतून त्यांच्याकडे कुणीतरी पाहतय असं त्याला जाणवलं. त्याने निरखून पाहण्याचा प्रयत्न केला पण काही कळलं नाही. त्याला पुन्हा कॉलेजच्या रस्त्यावरती बाईकवर दिसलेल्या त्या मुलाची आठवण झाली तरीही त्याने तो विचार डोक्यातून बाजूला केला.

" बघा आलो आपण इकडे. किती दिवसांपासून तुम्हाला इकडे यायचं होतं!"  त्याने दोन्ही हात जॅकेटच्या खिश्यात टाकत म्हटलं.

" हं....I've seen these beaches in movies"  ती त्याच्यासोबत चालत होती. दोघांची पावलं वाळूत उमटलेली पाहून छान वाटलं त्याला. इतक्यात समोरुन दोन विदेशी मुली एकमेकींशी बोलत येत होत्या. त्यातली एक तिच्या हातातल्या चार्टवरती बोट दाखवत दुसरीला काहीतरी सांगत होती आणि दुसरी हातवारे करत तिला नाही म्हणत होती.

" Lucy, Don't be panic. Let me ask someone. Yeah. Excuse me Sir " ती समोरुन चालत येत विक्रमला म्हणाली. ती बोलायला पुढे आली तशी तिची मैत्रीणही तिच्यामागून धावत आली.

" Yes ! " त्याने म्हटलं. अनघा त्या दोघींकडे आ वासून पाहत राहिली. त्यांचे स्लीवलेस टॉप्स आणि गुडघ्यापर्यंतच्या पॅन्ट्स, डोळ्यावर सनग्लासेस आणि मागे उभी होती तिने वर्तुळाकार व्हाईटकलरची हॅट डोक्यात घातली होती.  ती शांतपणे आपली मैत्रीण काय विचारते ते ऐकत उभी राहिली. त्या पुढे आलेल्या मुलीने तिच्या हातातला चार्ट त्याच्यासमोर उघडत बोट टेकवलं.

" Where is this temple ?" त्याने ओळखलं. त्यांना मंगेशीचं मंदिर पहायचं होतं. 

" Ok, But It's South Goa..This temple is located at one village. It's called Mangeshi Village in North Goa " त्याच्या या बोलण्यावर त्या मागे उभे असलेल्या मैत्रिणीने मंदिराचं नाव त्यांच्या फॉरेन अॅक्सेन्टमध्ये बोलण्याचा प्रयत्न केला. 'Mon..geh...Shi ' त्यावर पत्ता विचारत असलेली मैत्रिण बोलली.

" Lucy, Just keep quite. I'm asking something..Ok sir, but how should we go there ?" तिने विचारलं.

" I need pen. I'll give proper adress " 

" Oh..Sure. " तिने बॅगमधलं पेन आणि कोरा पेपर त्याच्या हातात दिला. त्याने तिथून जवळच असणार्‍या रेल्वेस्टेशनचा पत्ता त्यांना दिला आणि तिथून मंगेशी देवळाचा पत्ता आणि लक्षात यायला रुटवरच्या एक दोन स्पॉट्सची नावं दिली आणि कागद पेन तिच्या हातात दिला. अनघा मघापासून हे सगळं बघत होती. तिला राग आला होता त्याचा.

" Sir, Thanks a lot ! You people're warmhearted and hospitable people. I've been coming to India since last two years for vacation." ती त्याचे आभार मानत बोलली.

" Oh...That's nice and it's our pleasure " तो हसत म्हणाला.

" Ok...Bye and pleased to meet you." दोघी खूश होऊन म्हणाल्या आणि पुन्हा एकमेकींशी बोलत पुढे निघून गेल्या.

.....................

त्या पुढे गेल्या आणि विक्रमने इकडेतिकडे पाहिलं तर अनघा नव्हती. ती पुढे चालत होती एकटीच. 

" अरे बापरे! चिडल्या कि काय " स्वतःशी पुटपुटत तो धावत तिच्या मागे गेला.

" मॅडम, What happened ?" मागून येत त्याने तिला गाठलं आणि पुन्हा तिच्यासोबत चालू लागला. ' संपली वाटतं समाजसेवा !' असं तिला म्हणायचं होतं पण सगळे शब्द तिने गिळून टाकले. तिच्या डोक्यात अजून शंका आली. अमेरिकेत असताना तिकडे अश्या मैत्रीण होत्या असतील! ती समुद्राच्या लाटा पाहत गप्पपणे चालत होती. त्याने बोलूनही काही प्रतिसाद नाही. मग तोही गप्पपणे खाली बघत गालात हसत चालत होता. चालता चालता वार्‍यामुळे तिच्या साडीच्या पदराचं टोक वार्‍यावरती उडत होतं. तिने नेहमीसारखे केस क्लीपने बांधलेले तरी वार्‍यामुळे काही बटा कपाळावरती पुढे आल्याच. त्याचं सगळ लक्ष तिच्याकडे होतं. आजूबाजूला काय चाललय याचही त्याला भान नव्हतं.  ती कशी रागावते आणि रागाच्या भरात किती जळजळीत बोलते याचा चांगलाच अनुभव त्याला गॅदरिंगच्या रात्री आला होता. त्यामुळे गप्पपणे चालूया उगीच हातबित धरुन थांबवायला गेलो तर कानाखाली जाळ निघायचा या विचारातच स्वतःवरती हसत तो चालत होता आणि तिच्या पायाखाली त्याचं लक्ष गेलं. तो क्षणभर थांबला आणि खाली  वाळूत गुडघा टेकून तो वाकला. तिने पाहिलं. क्षणभर तिला काही कळेना. त्याने एक हात पुढे केला आणि तिच्या पायाखालची वाळूतली काच उचलली. वरती पाहिलं.

" My God ! माझ लक्षच नव्हतं " ती पटकन बोलली. त्याने मंदसं हसत हातातला काचेचा तुकडा दूर फेकला आणि उठत तिला म्हणाला,

"  It's ok ! राग येऊच शकतो कधी कधी !" त्यावर तिने पटकन नजर त्याच्याकडे वळवली. तो छान हसला. ' माझ्यामुळे सगळ्याच काचा मिळाल्या तुम्हाला आता एक दिवस फुलं द्यायची संधी द्या.' तो मनातून पुन्हा बोलला. सुर्य हळुहळु क्षितिजाआड चालला होता. त्याचं लांबवर बिंब समुद्राच्या पाण्यात पडलं होतं. केशरी, सोनेरी किरणं पाण्यावरती पसरली होती. ' एक दिवस नक्की उगवेल जेव्हा तू खिडकीतून आत येशील आणि माझी परी माझ्याजवळ असेल......' विक्रमने त्या दुर दुर जाणार्‍या सुर्यबिंबाकडे पाहत मनातून प्रार्थना केली. ते बुडत्या सुर्याचं प्रतिबिंबही जणू त्याच्याकडे पाहून हसतय अस त्याला वाटलं.

क्रमशः

पुढील तीन चार भागात हा ट्रॅक संपेल आणि तुम्ही ज्याची आतुरतेने वाट बघताय ते वळण येईल....साठ भाग झालेत मग कधी संपणार, अजुन किती भाग असे प्रश्न तुम्हाला पडतील पण मी भाग मोजत नाही....कथा सुरु झाली तेव्हा ती कशी पुढे जाईल, कोणती वळणं असतील ते नजरेसमोर होतं त्याप्रमाणे लिहिणं सुरु आहे. कथा जेव्हा संपेल तेव्हाच ती संपवली जाईल पुन्हा त्यात काहीतरी भर टाकून दुसरं पर्व वगैरे येणार नाही.....आणि सगळ मांडल्याशिवाय कथा संपणार नाही...पुढचे भाग interesting असतील. सगळ एकदम मागू नका कारण लिहिणे सुरु आहे त्याप्रमाणे भाग पोस्ट होतायत. 

Like, Comment, Share

🎭 Series Post

View all