बंधन भाग 6

Love

भाग 6( पाचव्या भागात तुम्हाला कथेतील बरिचशी पात्रं भेटली आणि बर्‍याच गोष्टी राजेशिर्के कुटुंबाविषयी समजल्या असतील. भाऊसाहेब त्यांची पत्नी अरुंधती, गंगाआत्या, तीन मुलं निता,जितेंद्र आणि विक्रम असा हा परिवार आहे. यातली निता सोशल वर्कर आहे, जितेंद्र कारखान्याचा चेअरमन म्हणून काम पाहतो आणि मोठा मुलगा विक्रम 'गुरुकुल ' या शिक्षणसंस्थेचा मॅनेजिंग डायरेक्टर आहे. प्रो.सामंत सर आणि विक्रम एकमेकांना ओळखतात हे तुम्हाला कळलं असेल पाहूया पुढे काय होतंय)

 रात्री सगळ्यांची जेवणे आटोपली. भाऊसाहेबांनी रात्री विक्रमला खोलीत बोलावून घेतले.
" बाबा, आत येऊ ?" दारातूनच त्याने विचारलं.
" अरे ये ये " भाऊसाहेब आरामखुर्चीत बसुन त्याचीच वाट पाहत होते.
" ये, बस ना " भाऊंनी त्याला बसायला सांगितलं. तो बेडवर बसला. 
" काय मग कश्या झाल्या दुपारच्या मुलाखती ?" त्यांनी विषयालाच सुरुवात केली.
" छान मस्त चांगले कँन्डिडेंटस होते सगळे. आपल्या शहरात इतकी हुशार मुलं आहेत खरंच बरं वाटलं त्यांच्याशी बोलून." तो सांगत होता. भाऊंनी होकारार्थी मान हलवली आणि ते खुर्चीवर मागे रेलून बसत शून्यात पाहत खिन्नतेने म्हणाले," हो हुशार तर आहेत मुलं पण मुंबई पुण्यासारख्या संधी नाही मिळत या हुशारीला फुलण्यासाठी. आम्ही वर्षानुवर्ष इथल्या ग्रामीण भागातल्या मुलांच्या शिक्षणासाठी प्रयत्न करतोच आहोत आधी तुझे आजोबा करित होते. मीही आयुष्यभर केलं आणि आता तू हे पुढे सुरु ठेवावसं." पुढे होत विक्रमच्या हातावर त्यांनी आपला हात विश्वासाने ठेवला.
" म्हणजे काय बाबा ! नक्कीच करेन तुम्ही 'गुरुकुल ' ची चिंता नका करु आता " त्यांना विश्वासाने सांगत तो म्हणाला.
" हं मला माहित आहे तुम्ही योग्य तेच कराल " भाऊ म्हणाले. त्याने काहीतरी आठवल्यासारखं करित खिश्यातून एक कागद बाहेर काढला. त्यावर यादी होती. तो कागद भाऊंच्यासमोर धरत विक्रम म्हणाला," हि आज मुलाखतीला  आलेल्यांची यादी त्यातली काही नावं मी सिलेक्ट केली आहेत म्हणजे माझ्यासोबत इंन्टिरव्हियु घेणार्‍या बाकी प्राध्यापकांसोबत बोलून कुणाचं सिलेक्शन करायचं ही यादी फायनल केली आहे. तुम्ही बघता का जरा." 
" अरे असु दे असु दे त्यात मी काय पाहणार मी काही दुपारी तिथं नव्हतो तुम्ही इंन्टिरव्हियु घेतलेत तर तुम्हालाच त्यातलं जास्ती माहित पण सकाळची यादी मी कन्फर्म केलीय ती उद्या  प्राचार्यांकडे  पोचेल ही यादी द्या तुम्ही प्राचार्यांना." 
"हो बाबा बरं पण तुम्हाला पहायच असेल तर पहा " तो आग्रहाने म्हणाला.
" नको आता बरं खूप वाजलेत झोपायला जा आता." 
"हो बाबा, गुड नाईट येतो " भाऊसाहेबांना 'गुड नाईट ' म्हणून तो तिथून स्वतःच्या रुममध्ये निघून गेला. भाऊसाहेबही निर्धास्तपणे झोपी गेले.
..................

रात्री मोबाईलची रिंग वाजली तसं सामंतांनी बेडला लागूनच ठेवलेल्या कॉर्नरपिस वरच्या घड्याळाकडे पाहिलं. साडेबारा वाजले होते आता कोणाला झोपमोड करावीशी वाटली. सामंतांनी वैतागत शेजारचा मोबाईल हातात घेतला आणि स्क्रिनवरचं नाव पाहताच गडबडीने पांघरुण बाजूला सारत फोन उचलला," बोला बोला साहेब, काय झालं इतक्या रात्री फोन केलात ?" सामंत सरांनी घाबरुन विचारलं.
" काय होणार आहे सामंत काहीसुद्धा झालेलं नाही !" विक्रम शांतपणे म्हणाला.
" मग " सामंतांना प्रश्न पडला.
" आपण दुपारी तयार केलेली लिस्टच फायनल करा आणि हो तुम्ही त्यांच्याशी बोला आपल्या अटी मान्य असतील तर त्यांना अपॉंइंन्टमेंन्ट लेटर देऊन टाका " 
" काय !!!!! पण तुम्ही भाऊसाहेबांशी बोलणार होता ना !" आश्चर्याने त्यांनी विचारलं.
" हो आणि बोललो सुद्धा त्यांना काय सांगायचं ते मला बरोबर माहीत आहे आणि त्यांनी यादी पाहिली नाही तुम्हीच ठरवा म्हणालेत." तो हसत म्हणाला
" हो का असं आहे तर बरं साहेब मी बघतो काय ते पण आपली अट ते दोघे तीघेजण मान्य करतील ना !" सामंतांनी शंकेने विचारलं.
" मान्य न करुन काय करतील बिच्चारे ! गरजवंताला अक्कल नसते नाही का !" कुत्सितपणे हसत तो म्हणाला.
" होय साहेब मी बघतो काय ते ओके बाय " सामंतांनी खूश होत फोन ठेवला. विक्रमने त्या यादीवरुन हात फिरवत हसतच ती यादी टेबलवरच्या पुस्तकात ठेवली.
.........................
दुसरा दिवस दुपार
 " आत्या गंगा आत्या लवकर वाढ भूक लागली " जितेंद्र कारखान्यावरुन आला होता. हातपाय धुवून तो डायनिंगटेबलवर बसला होता आणि गंगाआत्याला हाका मारित होता.
" हो आले आले " आत्या किचनमधून गरमागरम पोळ्या भांड्यात घेऊन बाहेर आली.
" जरा धीर नाही रे तुम्हा मुलांना " आत्या लटक्या रागाने जितेंद्रला ओरडली. आत्येमागून एका नोकराने येऊन गरम भाजी,आमटी ची भांडी आणून टेबलवर ठेवली.
" बघ आत्या तु एवढा भारी स्वयंपाक करतेस ना म्हणून मी दुपारी कारखान्यातून घरी जेवायला येतो." तो आत्येचं कौतुक करत म्हणाला. "हो का " त्याच्या गालावरुन प्रेमाने हात फिरवत आत्या म्हणाली. इतक्यात अरुंधती तिथे आली. जितेंद्रचं बोलणं तिच्याही कानावर पडलं होतं. घसा खाकरतच तिने त्या दोघांचं लक्ष आपल्याकडे वेधून घेतलं तशी आत्या म्हणाली," या ना बाईसाहेब बसा. जितु तुमचीच वाट पाहत होता." आत्यांच्या बोलण्यासरशी ती डायनिंगटेबलची खूर्ची ओढून बसली. आत्याने त्यांना वाढायला सुरुवात केली. दुपारच्या वेळी घरी जेवायला फार कुणी नसायचं. भाऊसाहेब सकाळी नाश्ता करुन गेले कि कधी 'गुरुकुल ' ला जात असतं, कधी शाळेत मिटिंगना त्यांना जावं लागे,कधी शहरात उद्गाघटनाचे कार्यक्रम,कुठे सत्कारसमारंभाला प्रमुख अतिथी म्हणून हजेरी कधी मुंबईला दौरा अनेक व्याप त्यांच्यामागे असायचे. त्यामुळे दुपारचं जेवण त्यांचं घरी होणं म्हणजे दुर्मिळ.विक्रम कॉलेजला असायचा आणि नीता तिच्या'सोशल वर्क ' मध्ये बिझी असायची. त्यामुळे घरी फक्त अरुंधती, गंगाआत्या आणि नोकर मंडळी एवढीच माणसं दुपारी असायची. अरुंधतीला एकटीला जेवावं लागायचं त्यामुळे जितेंद्र आईसोबत जेवायला घरी यायचा आणि त्यालाही घरचं गरमागरम जेवायला मिळायचं. 
" आत्या तूही बस ना आमच्या सोबत " जितेंद्रने आत्याला आपल्यासोबत बसुन जेवण्याचा आग्रह केला. जितेंद्रच्या या वाक्यावर अरुंधतीने चमकून त्याच्याकडे पाहिलं. तिला काय म्हणायचंय ते जितेंद्रच्या लक्षात येऊनही त्याने न समजल्यासारखं केलं पण आत्याच्या नजरेतून अरुंधतीच्या नजरेतले भाव सुटले नाहीत. तिने लगेचच जितेंद्रच्या आग्रहाला 'नको रे तुम्ही जेवा ' म्हटलं. त्यावर जितेंद्रने आईकडे एक कटाक्ष टाकला. पण अरुंधती खाली मान घालून गप्पपणे ताटात वाढलेलं जेवत होती. तिने जितेंद्र आणि आत्याच्या कडे लक्ष दिलं नाही. 
" बरं बरं आम्ही जेवतो आधी. बरं टि.व्ही. लाव ना आत्या " तो आत्याकडे पाहत म्हणाला आणि त्याने जेवायला सुरुवात केली. जितेंद्रला आवडायचं असं टि.व्ही. पाहत निवांतपणे जेवायला पण रात्री जेवताना भाऊसाहेब असले कि ते शक्य व्हायचं नाही. दुपारी कोणी नसलं तर तो टि.व्ही.पाहत जेवायचा. आत्या सोफा सेट समोर गेली आणि टि.व्ही. अॉन केला आणि रिमोटकंट्रोल हातात घेऊन बातम्यांचं चॅनेल लावलं. आत्याला तेवढंच जमायचं बाकी रिमोटकंट्रोलमधलं तिला काही समजायचं नाही. इतक्यात आत्याचं लक्ष नसतानाच जितेंद्र मोठ्याने तिला म्हणाला,
" थांब थांब आई बघ आपली नितू "
" कुठे आहे ?" आईने इकडे तिकडे पाहत विचारलं. तिचं टि.व्ही.कडे लक्ष नव्हतं. टि.व्ही.समोर उभं राहून आत्या रिमोटकंट्रोलची बटण दाबत होती इतक्यात तो ओरडला.
" आत्या बाजूला हो जरा " जितेंद्र असा मोठ्याने ओरडल्यावर आत्याचंही रिमोटवरुन टि.व्ही.च्या स्क्रिनकडे लक्ष गेलं तर खरंच नीता आणि तिच्या एन.जी.ओ.ची मंडळी दिसत होती. मोठा मोर्चा निघाला होता ज्यात शाळकरी मुली,महिला दिसत होत्या. हातात ' हमे न्याय चाहिए ',' We want justice ', ' सिर्फ फाँसी ' अश्या घोषणांचे फलक त्यांच्या हातात होते. नितू सोबत त्यांच्या संस्थेच्या काही महिला मोर्चाच्या पुढे चालत होत्या आणि पत्रकार आपले माईक घेऊन त्याच्यांशी बोलण्याचा आटापिटा करित होते. 
" मॅडम तुम्हाला काय वाटतं अश्या मोर्चांमुळे न्याय पटकन होईल ?" एका पत्रकाराने नितूला विचारलं.
" हे पहा न्याय आम्ही देऊ शकत नाही.अहो लोकांच्या हातात न्याय देणं असतं तर हे गुन्हेगार जिवंत दिसलेच नसते तुम्हाला.आमचं काम आहे या यंत्रणांना जागं ठेवणं आणि या घटनांविरुद्ध सतत आवाज उठवत राहणं." ती घामाने डबडबलेल्या चेहर्‍याने तावातावाने बोलत होती.
" पण मॅडम फक्त मोर्चाने काही होईल असं तुम्हाला वाटतं का कडक कायदे व्हायला हवेत त्यासाठी तुम्ही काय कराल?" त्याने पुन्हा विचारलं.ती म्हणाली,
" त्यासाठीही आम्ही लढतोय आणि जर तसा कायदा नाही झाला तर आंदोलनसुद्धा आम्ही करु " ती पटापट पावलं टाकत चालत होती. 
" ओके तर आपण पाहतोय काही दिवसांपुर्वी हिंगणघाटला घडलेल्या दुर्दैवी घटनेच्या निषेधार्थ 'आधार ' या संस्थेने हा मोर्चा आज काढलाय आणि हा मोर्चा आता जिल्हाधिकारी कार्यालयासमोर जाणार आहे. कॅमेरामन योगेशसह मी राहुल एएमन्युज वर्धा " 
 टि.व्ही.वरची बातमी संपली तरी अरुंधती,जितेंद्र आणि आत्या आवासुन टि.व्ही.कडे पाहत होते.
" मम्मा आपली एवढीशी नितू कसली डेरिंगबाज आहे गं !" जितेंद्र म्हणाला अजूनही त्याच्यानजरेसमोरुन नितूचा तो रुद्रावतार जात नव्हता.
" हं पण उन्हातान्हात असे मोर्चे काढून काही होणार आहे का? आरोपीला अटक झालीय, केस कोर्टात सुरु आहे त्यांंना कोओपरेट करा म्हणावं " अरुंधती घास तोंडात टाकत म्हणाली.
" हो गं मम्मा पण आता गेलीय ना ती हे बघ हे सगळं करुन एक मुलगी म्हणून तिला आपण यात खारीचा वाटा उचलल्याचं समाधान मिळणार असेल तर करु दे की !" जितेंद्र बहिणीची बाजू घेत म्हणाला.
" हं म्हणून मीही नाही अडवलं पण असं उठसुट कुठेही जायचं आणि मोर्चे काढायचे,रॅली काढायच्या उद्या काही झालं म्हणजे." अरुंधती त्रासिक होत म्हणाली. नितूने सोशल वर्क करण्याला तिचा विरोध नव्हता पण शहरातल्या आरोग्यसमस्या, शिक्षण अश्या कुठल्याही प्रकारात तिनं काम करावं पण हे असे मोर्चे, आंदोलनं नको असं तिला वाटायचं.
" काही होत नाही मम्मा आणि बायकांनीच बायकांना समजून घ्यायला हवं इथे तुमच्यातच एकजूट नसते." आईला टोमणा मारित तो म्हणाला. मघाशी आत्याने सोबत जेवण घेणं आईला नको होतं याचा राग आलाच होता त्याला त्यावरुन त्याने हा टोमणा मारल्याचं अरुंधतीच्या लक्षात आलं. इतक्यात आत्या म्हणाली, " मी मी कोशिंबीर आणते " आणि ती किचनमध्ये गेली. जितेंद्रने आईकडे पाहत खाली मान घातली.
" जितू ती तुझी आत्या आहे माहितीय मला पण सख्खी नव्हे ना !"  तिने त्याच्या हातावर हात ठेवत म्हटलं. त्याला मनातून याचा राग यायचा पण तो आता भांडण नको म्हणून गप्प बसला. 

क्रमशः

🎭 Series Post

View all