Oct 31, 2020
कथामालिका

बंधन भाग 56

Read Later
बंधन भाग 56

भाग 56

(  गेल्या भागात नताशा राजेशच्या घरी जाते आणि त्याला फोटोज देते. ते कसले फोटोज आहेत ते काही समजत नाही पण राजेश त्यामुळे खूश होतो. गेल्या भागात विशालने म्हटल्याप्रमाणे विक्रम त्याच्याकडून तरी तिच्यासाठी मैत्रीचा हात पुढे करतो पाहूया पुढे  )

 

सकाळी कॉलेजला जाण्यासाठी घरुन एकत्र निघण्याची आता अनघाला सवय होऊ लागली होती. तिची निघण्याची तयारी होईपर्यंत तो खाली हॉलमध्ये न्युजपेपर वाचत बसायचा आणि ती खाली आली की दोघे एकत्र निघायचे. गाडीत बसल्यानंतरही दोघांच्यात फारसं बोलणं व्हायचं नाही खरतर अनघाला विक्रम किंवा इतर कोणाशी मोकळेपणाने बोलायला अवघडल्यासारखं जात होतं. आधीच त्यांचं मोठ घर, वेगवेगळ्या स्वभावाची माणसं, नव वातावरण या गोष्टी होत्याच शिवाय तिच्या बाबतीत आधी जे काही घडलं होतं त्यामुळे ती मनाने विझून गेल्यासारखीच होती. ना कशाचा उत्साह ना कसली उमेद होती. पण या तिच्या सगळ्या पुर्वायुष्याची कल्पना आत्या आणि भाऊसाहेब सोडून घरी कोणालाही नव्हती त्यामुळे जितेंद्र नी नीतू कायमच तिच्याशी मोकळेपणाने वागायचे, हसायचे, रुसायचे. त्यांची नेहमीची मजामस्ती सुरु असायची. एका सकाळी अनघा तयार होऊन कॉलेजला जायला बाहेर आली.  दरवाजासमोरच्या पायर्‍या उतरत ती खाली येत होती. विक्रम गाडीपाशी तिची वाट पाहत उभा होता. गार्डनमध्ये नीतू नी जितेंद्रची मस्करी सुरु होती. जितेंद्र नीतूला अविनाशवरुन नेहमीप्रमाणे चिडवत होता.

" ए नीट पाणी घालायचं झाडांना! " पाईपने झाडांना पाणी देणार्‍या नीतूशेजारी जितेंद्र उभा होता.

" तू काय अॉर्डर सोडायला थांबलायस का इथे?" तिने विचारलं.

" अॉर्डर नाही ग आतापासून काळजी घ्यायला तुला शिकवतोय!" तो हसत म्हणाला.

" कसली काळजी!" काही न कळुन तिने पाईप दुसरीकडे वळवत विचारलं.

" बागेची ग नी बागवाल्याचीसुद्धा !" एवढं बोलून तो खोखो हसायला लागला.

" काय म्हणालास !" नीतुने पाईप हातातनं खाली टाकला नी जाऊन त्याचा कान पकडला.

" आ.......अगं माझा काय दोष ! मी बिच्चारा खर तेच बोललो! " जितेंद्र कळवळून म्हणाला.

" काही नाही! सारखा तुला अवि बरा दिसतो!" ती रुसुन बोलली.

" आता तुला त्याच्याशिवाय दुसरं कोण दिसतं नाही ना!" जितेंद्र चिडवत तिला म्हणाला.

" तु लय मार खाशील हा!" ती चिडली आणि त्याला ठोसे मारायला लागली.

" अग हळुहळु.....बघ कोण दिसतय तुला?" 

" दाद्या आहे बघ तिकडे गेटजवळ !" ती विक्रमकडे बोट दाखवीत बोलली.

" हो ना! मग आपल्याशी पंगा नही लेने का नायतर आत्ता जाऊन सांगतो " म्हणत जितेंद्र गेटकडे पळायला लागला आणि नीतू त्याला थांबायला मागून पळायला लागली.

" जित्या थांब हा! थांब आत्ता बघते तुला!" नीतुने जमिनीवरचा टाकलेला पाईप हातात घेतला आणि जितेंद्रवरती पाण्याचे फवारे उडवायला सुरुवात केली.

"ए येडे थांब! ए विक्रम ही बघ यार!" तो दोन्ही हात वरती करुन पाण्याचे शिंतोडे थांबवत होता नी विक्रमला हाका मारित होता तस दादा इकडे येईल म्हणून तिनेच पाईप खाली टाकला आणि ती धावत गेटकडे गेली. जितेंद्रचं काही ऐकु नकोस हेच तिला त्याला सांगायचं होतं. ती गेटकडे धावली तस जितेंद्रने फिटंफाट करायला पाईप उचलला नी नितू पळत होती त्या बाजूने पाण्याचे फवारे उडवायला लागला नी अचानक अनघा मध्ये आली. त्याचं लक्ष नीतूकडे होतं नी चुकुन तिच्या साडीवर जितेंद्रने पाण्याचे शितोंडे उडवले. 

" भावोजी! तुम्ही....." ती असं बोलली नी त्याने पाईप पटकन घाबरुन खाली टाकला.

" अरे वहिनी! मी...ते नीतू......सॉरी आय एम सॉरी " म्हणत जितेंद्र समोर आला.

" वहिनी सो सॉरी.....तुमच्या हातातली पुस्तकं ओली झाली कि काय ! थांबा मी " म्हणत त्याने खिश्यातून रुमाल काढला नी तिच्या हातातून पुस्तकं काढून घ्यायला त्याने हात वरती केले,

" असु द्या भावोजी "

" असु द्या कसं! मी पुसुन देतो एका फटक्यात " म्हणत त्याने हात पुढे केले नी त्याच्या हातांचा स्पर्श तिच्या हातांना झाला तशी ती विजेचा शॉक लागल्यासारखी पटकन मागे सरकली. त्याला क्षणभर कळलच नाही काय झालं.

" मॅडम....चला लेट होईल " जितेंद्रच्या मागे विक्रम येऊन उभा राहिला तसा तो पटकन विक्रमकडे वळत त्याला सॉरी बोलला. 

" It's ok , मॅडम चला " विक्रमने न रागवता जितेंद्रकडे पाहत म्हटलं. 

" राहु द्या भावोजी, आता लेट होईल " ती म्हणाली नी जितेंद्रकडे न पाहताच विक्रमच्या मागून चालू लागली. ते दोघे गाडीत बसेपर्यंत जितेंद्र पाहत राहिला.

" कमाल आहे या वहिनींना नितूशी तेवढं बोलायचं असतं. आमच्याशी कुणी बोलतच नाही राव! " तो हसतच खांदे उडवित स्वतःशीच पुटपुटला.

........................

गाडीचा मागचा दरवाजा तिने उघडला तोच विक्रम पुढे होत म्हणाला,

" मागे कश्याला बसता! Please " म्हणत त्याने कारचा पुढचा दरवाजा ओपन केला नी छानस हसत हाताने तिला त्याच्या शेजारच्या सीटवरती बसायला सांगितलं. नाही कसं म्हणणार त्याला म्हणून ती गप्पपणे बसली. तो ड्रायविंग सीटला बसला आणि त्याने कार स्टार्ट केली. त्याला मघाचच्या जितेंद्र नी नीतूच्या वागण्यावर काहीतरी बोलावस वाटत होतं पण तो शांत राहिला. जितेंद्रचं वागणं तिला पटलेलं नाही हे त्याच्या मघाशी लक्षात आलं होतं. तिच्या मधली आणि जितेंद्रमधली दरी मिटायला हवी. नितूसारखं तिने जितेंद्रसोबतही मोकळेपणाने बोलाव अस त्याला मनातून वाटत होतं पण तिच्याकडे याविषयी बोलूनही उपयोग नव्हता कारण या सगळ्याची कल्पना डॉ.विशालने त्याला दिलीच होती. त्यामुळे तिच्या मनातली इनसिक्युरीटीची भावना आपण कमी करायला प्रयत्न केले पाहिजेत अस त्याला वाटायला लागलं. या सगळ्या विचारातच त्याने गाडी 'गुरुकुल ' समोर थांबवली. ती गाडीतून खाली उतरली.

" तुम्ही नाही येत !" तिने तो न उतरलेला पाहून विचारलं.

" हो....म्हणजे नंतर येईन. शाळेत आज जायचय मुख्याध्यापकांना भेटायला. तिकडचं काम झालं की येईन." 

" थँक्स, मला ड्रॉप करायला तुम्हाला इकडे यावं लागलं." तिच्या या बोलण्यावर त्याला पुढे बरचस बोलावस वाटलं पण तो फक्त बरं म्हणाला.

" हं....ओके...See You " त्याने मंदस हसतच गाडी स्टार्ट केली.

..........................

ती कॉलेजच्या आवारातून चालत पुढे आली तस लायब्ररीमधून जिना उतरत खाली येणार्‍या सामंतसरांच तिच्याकडे लक्ष गेलं. गेले बरेच दिवस विक्रम आणि अनघा एकत्र कॉलेजला येतात एकत्र घरी जातात हे सगळं ते पाहत होते. विक्रमचं अनघाप्रती बदललेलं वागणं त्यांची अस्वस्थता वाढवत होतं. हा असाच गोड गोड वागत राहिला नी एखाद्या क्षणी याने कॉलेजच्या सगळ्या व्यवहारांविषयी खरं सांगून तिची वा भाऊसाहेबांची माफी मागितली तर आपण यात अडकू नी उगीच भाऊसाहेबांच्या नजरेतून उतरु हि भीती त्यांना होती. त्यातून अनघा स्वतःला फार शहाणी समजते असा ग्रह त्यांचा पहिल्यापासूनच होता.

" ओ सर....उतरा पायर्‍या भरभर " मागून फाईल्स हातात घेऊन शिवा आला तसे सामंतसर बाजूला सरकले.

" का ओ इतका कसला विचार करताय ?" शिवाने त्यांचा चिंताग्रस्त चेहरा पाहून विचारलं.

" नाही रे तुमच्या या नव्या डायरेक्टर मॅडम !" 

 " कोण? कोण? "  शिवाने आश्चर्याने त्यांना म्हटलं.

" ह्याच रे कारखानीस मॅडम ! हल्ली विक्रमसाहेब बराचवेळ त्यांच्यासोबतच दिसतात." 

" कमाल आहे सर! आता नवरा बायको म्हटल्यावर एकत्रच दिसनार हा पण हल्ली विक्रमसाहेब सगळं त्यांना सांगून विचारुन करतात असं मला पण वाटाय लागलय अहो सगळ्या स्टाफमध्ये तिच चर्चा आहे सद्या! " शिवाने ज्यादाची माहिती त्यांना पुरवली.

" हं......"  सर उसासा टाकत म्हणाले जणू आता हे असच घडणार असे भाव त्यांच्या चेहर्‍यावर होते. ते पाहून शिवाने त्यांच्या डोक्यात अजून काहीतरी भरवलं.

" आता बघा कॉलेजमध्ये पटापटा बदल होतील अनघा मॅडमच्या म्हणण्याप्रमाणं !" तो हळु आवाजात म्हणाला. सामंतांनाही त्याचं बोलणं पटलं.

.......,,,,,,...........

विक्रम शाळेतून मुख्याध्यापकांना भेटून पुन्हा कॉलेजला आला. कॉलेजचं सगळ कामकाज पाहून पुन्हा शारदादेवी राजेशिर्के प्रशालेच्या कामाकडे लक्ष देणं, राजेशिर्के ट्रस्टचं काम व्यवस्थित सुरु आहे का ते बघणं आणि स्वतः बाहेरच्या कॉलेजेस मध्ये लेक्चर्स साठी जाणं हे सगळ एकहाती सांभाळताना त्याला अजिबात कंटाळा यायचा नाही ना या जबाबदारीचं ओझं कधी त्याने वाटून घेतलं. त्याला हे सगळं काम आवडायचं आणि त्यासाठी कितीही मेहनत घ्यायची त्याची तयारी असायची. ' गुरुकुल ' सारखीच त्यांची राजेशिर्के प्रशालाही शहरातली एक नावाजलेली आणि उत्तम शाळा व्हावी या दृष्टीने आता त्याचे प्रयत्न सुरु होते. या सगळ्या धावपळीत आता नवीन जबाबदारी त्याच्यावर होती ती अनघाला पुन्हा उभं करण्याची. अनघाच्या विचारात कॉलेजला आपण कधी पोहचलो ते त्यालाही कळलं नाही. त्याने गाडी पार्किंग स्लोटकडे वळवली तोच ड्रायविंग सीटसमोरच्या काचेत त्याला एक साधारणतः पंचवीशीचा  मुलगा दिसला. तो बाईक कॉलेजच्या रस्त्याच्या विरुद्ध दिशेला थांबवून बाईकवरतीच बसला होता. बाईक थांबवली होती पण हेल्मेट बाजूला केलं नव्हतं. विक्रम पाच मिनिटं थांबला आणि गाडीतून खाली उतरला. त्याने मागे वळून पाहिलं नाही तरी तो मुलगा तिथेच बाईक थांबवून होता. विक्रमला विचित्र वाटलं जरा ते म्हणून तो चालत मुद्दामहून कॉलेजच्या गेटपर्यंत गेला आणि तो मुलगा बेसावध असताना विक्रम पुन्हा मागे वळला नी पटापट चालत चालत रस्त्यापर्यंत आला तोच काही क्षणात आपण पाठलाग करतोय हे त्याच्या लक्षात येईल या भीतीने त्या मुलाने बाईक स्टार्ट केली आणि सुसाट तो विक्रमसमोरनं निघून गेला. इतकं मोठं कॉलेज त्यातून इतके विद्यार्थी म्हटल्यावर असेल कुणाचा तरी मित्र किंवा काय माहित कॉलेजचा स्टुडंन्ट पण असेल आपण ओरडू या भितीने पळाला असेल असा विचार करत शेवटी विक्रमने या प्रकाराकडे दुर्लक्ष केलं आणि शांत मनाने तो कॉलेजच्या गेटमधून आत आला.

............................

 

 

अनघा पहिलं लेक्चर आटोपून एफ.वाय.च्या क्लासमधून बाहेर पडली इतक्यात समोरुन बर्वे सर त्यांचं लेक्चर संपवून बाहेर आले. अनघाचं त्याच्याकडे लक्ष नव्हतं. ती चालत पुढे जात होती तोच शार्दुलने तिला हाक मारली.

" अनघा मॅडम ! लक्ष नाही की काय!" तो समोरुन चालत येत म्हणाला तसं आपल्याच विचारात चालणार्‍या तिने नजर वरती वळवली.

" शार्दुल सर तुम्ही होय! काय म्हणता ?" तिने हसर्‍या चेहर्‍याने विचारलं. ती कितीही विचारात असली तरी आपल्या वैयक्तिक आयुष्याबद्दल आपल्या सहकार्‍यांना काहीच जाणवू द्यायचं नाही असा तिचा प्रयत्न नेहमीच असायचा त्यामुळे ती सगळ्यांसोबत छान बोलायची अगदी चेहर्‍यावरती हसु ठेवून त्यामुळे कोणाला कल्पनाही नव्हती तिच्या हसर्‍या चेहर्‍यामागे काय लपलं आहे याची! आत्ताही तिने बर्वेसरांना हसतच हॅलो म्हटलं तस शार्दुल म्हणाला,

" आम्ही काय म्हणणार! तुम्ही सांगा आता, काय म्हणते तुमची न्यु फॅमिली !"  त्याने हसत विचारलं.

" मस्त. सगळे छान आहेत मग तुमचे कंप्युटर्स काय म्हणतात सद्या काही खबर नाही ?"  तिनेही त्याच्या बोलण्याप्रमाणे थट्टेतच विचारलं.

"मस्त! भाऊसाहेबांच्या आशीर्वादाने !" तो हसत म्हणाला.

" का ओ, कंप्युटर्स मला आठवतय त्याप्रमाणे सरांनी मागवले होते ना गेल्या वर्षी !"  तिने म्हटलं तस शार्दुल फुसकन हसत म्हणाला,

" होय्य पण ते चालवण्यासाठी आम्ही कॉलेजमधले राहिलो ते भाऊसाहेबांमुळे नाहीतर माहितीय ना विक्रमसरांनी निकमसरांची तासमपट्टी " ते सगळं आठवून शार्दुल हसायला लागला आणि ते ऐकून तिलाही हसु आलं. विक्रम त्याच्या केबिनच्या फ्लोअरकडे निघाला होता आणि नेमकं त्याने अनघा आणि बर्वेसरांना असं मध्येच उभं राहून बोलताना पाहिलं. दोघे खळखळून हसत होते. त्याला वाटलं, असं तरातरा जावं नी तिला हाताला धरुन विचारावं, ' मी तू हसावी म्हणून इतकं सगळं करत असतो त्याची तुला काही किंमत नाही नी असं कोणासोबतपण तुला बरं हसायला जमलं.' तो तसाच चालत पुढे आला. 

" कारखानीस मॅडम, Don't you know the value of time वाजले किती! फस्ट लेक्चर संपुन दहा मिनिट झालीत सेकंण्ड लेक्चर नाहीय का तुम्हाला!" त्याने असं विचारल त्यावर दोघेही बिचकले.

" अ हो हो.....टि.वाय. च्या क्लासला " ती नजर खाली वळवित म्हणाली.

" हो न मग Why are you waisting each other's time? आ शार्दुल सर "  त्याने आता शार्दुलकडे पाहत विचारलं.

" I'm sorry Sir ते मीच मॅडमना....." तो पुढे काही बोलण्याआधीच विक्रम बोलला,

" हं.....Ok, You may go now " 

" येस सर " म्हणत शार्दूल तिथून त्याच्या लेक्चरसाठी निघून गेला. ती एकटीच उभी होती. काय बोलावं आता तिला समजेना.

" आणि मॅडम तुम्ही, Try to concentrate on your work not other things. आधी लेक्चर्स मग मारा काय त्या गप्पा! " तो असा कडक शब्दात तिच्याकडे पाहत बोलला. 

" सॉरी सर "  ती शांतपणे म्हणाली आणि तिच्या लेक्चरला जायला वळली. तोही त्याच्या केबिनमध्ये गेला.

.................

संध्याकाळी ती नेहमीच्या सवयीप्रमाणे नोट्स काढत बसली होती. ते काम आटोपलं कि किचनमध्ये जाऊन आत्याला रात्रीच्या जेवणासाठी मदत करायची हे तिचं तिनेच ठरवलेलं काम होतं. आपण सकाळी कॉलेजला जायला लवकर बाहेर तर पडतो पण कधी घरी येऊ तिकडून याचा पत्ता नाही. कॉलेजमध्ये कार्यक्रम असले, परिक्षा असल्या कि संध्याकाळसुद्धा घरी यायला होते त्यामुळे आत्याला काहीच मदत होत नाही आपली असा विचार तिच्या मनात असायचा त्यामुळे संध्याकाळी ती तिचं कॉलेजचं काम आटोपून मग किचनमध्ये जायची. तिथे आत्याशी बोलायलाही मिळायचं. दिवसभरात काय काय झालं ते सगळं ती आत्याला सांगायची अगदी आईशी गप्पा मारायची तसचं! अधुनमधुन नीतू लवकर आली तर तीही त्यांच्यात सामील व्हायची. आठ वाजत आले तस तिने स्टडीटेबलवरचा पसारा आवरायला घेतला. सध्या कॉलेजमध्ये वार्षिक परिक्षेचं वातावरण होतं त्यामुळे मुलांच्या सबमिशन्स, प्रॅक्टिकल्स, क्लासटेस्ट बरच काम होतं. ए.स.वाय च्या मुलांचे टेस्टचे पेपर्स चेक करुन तिने आळस देत पेपर्स व्यवस्थित फाईलला लावून ठेवले.

" मॅडम, कॉफी " टेबलवरती कॉफीचा मग तिच्यापुढे ठेवला तस तिने समोर पाहिलं तर विक्रम उभा होता! त्याच्या हातातही कॉफीचा मग होता नी दुसरा त्याने टेबलवरती तिच्यासमोर ठेवला.

" तुम्ही इकडे कश्याला आणलेत मी येतच होते खाली." तिने म्हटलं आणि मग हातात घेतला.

" खाली कश्याला! माझी कंपनी नाही आवडत!" त्याने तिच्याकडे पाहत विचारल. तिला काय रिअॅक्ट व्हाव यावर कळेना.

" नाही....म्हणजे तस नाही काही! " ती कॉफी पीत म्हणाली पण त्याच्याकडे पाहण्याचं तिने टाळलं.

" कशी झाली कॉफी ?" त्याने पुन्हा विचारलं.

" छान झालीय! तुम्ही बनवलीत!"  तिने आश्चर्याने विचारलं त्यावर मंदपणे हसत त्याने हो म्हटलं.

" Thanks for Coffee " तिने रिकामा कॉफीमग खाली ठेवीत म्हटलं. त्याने मनातून म्हटलं, 'Thanks for being with me '  त्याने दोन्ही कॉफीमग हातात घेतले आणि तो किचनमध्ये जायला निघाला.

" सर " तिने चेअरमधून उठत त्याला हाक मारली.

" काय ?"

" मी किचनमध्येच चाललीय. द्या मी नेते " 

" बरं " म्हणत त्याने दोन्ही मग तिच्या हातात दिले. ती निघून गेली नी त्याला वाटलं, अजून थोडावेळ बोलायला हवं होतं पण विशालचे शब्द त्याला आठवले आणि त्याने मन शांत ठेवायचं ठरवलं.

 

क्रमशः

Circle Image

Sneha Dongare

Writer, Freelancer

Hiiii I'm Sneha Dongare. I'm passionate reader, writer & learner. Writing is not only my hobby but my passion so I like to work in the fields related literature. I completed my master degree in English Literature & now trying my best for Research Fellowship. I like to be always creative & energic person. I like to express my thoughts and link more people with me. I started to write from 2009 & currently my writing published in newspapers like Maharashtra Time, Lokmat & Loksatta. I wish you also join this journey with me. So Do Follow my blog & Don't forget to like, comment & share.