बंधन भाग 38

Social Issues.

भाग 38

(  गेल्या भागात अनघा कॅफेशॉपमधुन घरी येते. विक्रमचं तिला तिथे सोडून निघून जाण्याने ती दुखावते. फार अपेक्षा ठेवुया नको असा विचार करितच ती लग्नाला होकार देते. अरुंधतीला मात्र भाऊसाहेबांनी विक्रमच्या लग्नाचा परस्पर निर्णय घेतल्याने धक्का बसतो. पण नितू आणि जितेंद्र वहिनी येणार म्हणून खूश आहेत पाहूया पुढे)

अनघाच्या वडिलांनी फोन करुन तिचा होकार कळवला हे भाऊसाहेबांकडून दुसर्‍या दिवशी कळल्यावर विक्रमचा जीव भांड्यात पडला. ती आपल्या पदाकडे, राजेशिर्केंच्या घराण्याकडे किंवा आपल्या पर्सनॅलिटीकडे बघुन इतर मुलींसारखी इंप्रेस होणार्‍यातली नव्हे हे त्याला माहीत होतं त्यामुळे ती नकारही देईल अशी भिती त्याला मनातून वाटत होती.  कुणास ठाऊक आपण अश्या परिस्थितित हो म्हणून तिच्यावरती उपकार करतोय आणि मला कुणाच्याही सहानुभुतीची गरज नाही असा पवित्रा तिने घेतला तर याचीही त्याला धाकधूक होती. ती किती स्वाभिमानी आणि ठामपणे निर्णय घेणारी जिद्दी मुलगी आहे हे त्याला गॅदरिंगच्या रात्री कळलंच होतं. त्यामुळे तिचा होकार आहे हे कळल्यानंतर त्याला जरा बरं वाटलं. तिला थँक्यु म्हणावं म्हणून त्याने तिला मेसेजही केला.

' Thank youu तुमच्या 'हो ' साठी.' 

त्यावरती तिने पलिकडून 'Its Ok' म्हटलं. त्याने पुन्हा ' Good Morning आणि स्टिकर सेंण्ड केला. पुन्हा तिने पलिकडून ' Gm ' चा रिप्लाय दिला. त्याच्या चेहर्‍यावरती स्माईल पसरलं. ती जास्त काही बोलली नव्हती तरिही तिच्या मेसेजमधले दोन शब्दपण त्याला खूप वाटले. मोबाईल टेबलवरती ठेऊन उत्साहाने त्याने कॉलेजला जायची तयारी केली.

...................

भाऊसाहेबांनी इथवर सगळं जूळवून आणलं होतं आता यात काही अडचण नको यायला एवढीच त्यांची इच्छा होती. यावेळी हे सगळं जुळवून आणलेलं आयत्या वेळी विस्कटलं असतं तर अनघा पुन्हा कधीच लग्नासाठी तयार होणार नाही आणि श्रीधर कुमुदला प्रचंड मनस्ताप मिळेल याचीही त्यांना कल्पना होतीच. मनातलं हे सगळं कुणापाशी तरी मोकळं करावं म्हणून त्यांनी आत्याला खोलीत बोलावून घेतलं.

" साहेब काही काम आहे का ?"

" अगं ये काही काम नाही म्हटलं गप्पा मारु तसही हल्ली वेळ कुठे मिळतो."  ते खुर्चीत बसत म्हणाले.

" बरं बोला ना " ती समोर बसत म्हणाली.

" लहानपणी आपण किती गप्पा मारायचो नाही. खेळायचो हसायचो अगदी आई ओरडेपर्यंत." ते असे जुन्या आठवणीत रमलेले पाहून गंगाआत्या म्हणाली.

" काय झालय? असं आडून आडून का बोलताय?" त्यांना काहीतरी बोलायचं आहे ते तिच्या लक्षात आलं.

" एक बोलायचं होतं विक्रमच्या लग्नाविषयी." ते हळु हळु विषय काढत म्हणाले.

" हा बोला की. अहो आपल्याच कालेजातली आहे ना पोरगी मग आणि तुम्हीच म्हनलात छान आहे, गुणी आहे मग." आत्याने विचारलं कारण अनघा घरी निमंत्रणपत्रिका घेऊन आली होती तेव्हा त्यांची दोघींची भेट झाली होती. तिच्या साखरपुड्याविषयीही आत्याला माहित होतं अश्यावेळी अचानक अनघा आता आपली सुन होणार हे सगळ्यांदेखत कसं सांगायचं हा प्रश्न होताच त्यामुळे त्यांनी फक्त आपल्या कॉलेजमधलीच मुलगी आहे एवढच सांगितलं होतं तिला! 

" हो पण तिचं नाव माहितीय?" भाऊसाहेब म्हणाले.

" कोण?" 

" अनघा...... कारखानीस " ते शांतपणे एकेक शब्द उच्चारित म्हणाले तशी आत्या गोंधळली.

" पण तिचा तर साखरपुडा..." तिला थांबवत ते म्हणाले.

" मोडला आणि त्याचं कारण काही दिवसांपुर्वी....काही दिवसांपुर्वी तिच्यावरती एका नालायक.." भाऊसाहेब रागाने म्हणाले तसा आत्याला हे ऐकुन धक्का बसला.

" काय!!! बिच्चारी पोरं. किती गुणी पोर आहे ओ ती.. वागण्या बोलण्यावरुन माणूस कळतं ना!" आत्या म्हणाली तसे भाऊसाहेब तिच्याकडे वळत म्हणाले.

" ताई मी विक्रमसाठी तरीही तिचा विचार केला काही चुकलं का माझं ?"  ते भावूक झालेले पाहून ती म्हणाली,

" नाही ओ, घडलय त्यात तिची काय चुकी ! पण वहिनीसाब." तिने शंका बोलून दाखवली.

" नाही ठाऊक तिला आणि हे लग्न सुरळीत व्हायचं असेल तर न सांगितलेलच बरं." ते निर्धाराने बोलले.

" हं " आत्या मानेनच हो म्हणाली.

" बरोबर करतोय ना हे...."  ते पुन्हा साशंक होत बोलले. आत्या उठली.

" तुम्ही विक्रमसाठी आणि आपल्या घरासाठी घेतलेले निर्णय बरोबरच असतात. पंचवीस वर्षांपुर्वीही तुमचा निर्णय बरोबरच होता आणि आजही बरोबरच आहे फरक इतकाच वहिनीसाहेबांना ते समजण्याएवढी ताकद तेव्हाही नव्हती आजही नाही." भाऊसाहेबांनी तिच्याकडे पाहिलं. त्या तिच्या बोलण्याने त्यांना धीर आला.

.......................... 

ठरल्याप्रमाणे पुढच्या चार - पाच दिवसांनी भाऊसाहेबांनी कारखानीसांना घरी बोलावलं. ते घरी येणार म्हणून त्यांनी बाहेर कुठेही कार्यक्रमांना, मिटिंग्जना जाणं त्या दिवशी टाळलं. सगळे घरी थांबा म्हणूनही सगळ्यांना सांगितलं. पहिल्यांदा वहिनीला भेटता येणार म्हणून नितू खूप खूश होती. विक्रमने सांगितल्याप्रमाणे जितेंद्र किंवा नितू अनघाला त्या फोननंतर अजिबात भेटायला वगैरे गेले नव्हते. त्यामुळे तर तिला कधी एकदा भेटतेय असं नितूला वाटत होतं. राजेशिर्केंकडे जायचंंय याचं नाही म्हटलं तरी श्रीधर आणि कुमुदला दडपण आल होतं. या आधी आमदार सोडाच कधी साध्या नगरसेवकाच्या घरीही श्रीधर गेले नव्हते तशी कधी वेळच आली नव्हती आणि आत्ता एका आमदार आणि ज्यांच्या नावाला, घराला भाऊसाहेबांच्या वडिलांपासून लोक मान देतात, त्यांच्या कार्याचा सांगलीच नाही तर आजूबाजूच्या जिल्ह्यांमध्येही गाजावाजा आहे अश्या घरात आपल्या मुलीच्या लग्नाची बोलणी करायला जाणं याचं त्या दोघांनाही टेन्शन आलं होतं. रिया मात्र खूश होती. मागे एकदा तिने अनघाच्या मोबाईलमधले कार्यक्रमांचे ग्रुप फोटोज पाहिले होते तेव्हाच विक्रम तिला आवडला होता आणि तिची आधीही इच्छा होतीच आपला जिजू भारी असला पाहिजे फक्त अश्या प्रसंगाने तिची इच्छा पूर्ण व्हायचा योग येईल याची तिने कल्पनाच केली नव्हती. राजेशिर्केंच्या घरी जायच्या दिवशी तिने हट्टाने अनघाला नवीकोरी साडी नेसायला लावली. रियाची खूप इच्छा होती ताईला सजवावं छान मेकअप करावा, तिच्या केसांची हेअरस्टाईल करावी केसात मोगर्‍याच्या फुलांचे भरगच्च गजरे माळावेत, दागिन्यांनी तिला सजवावं पण अनघाची या सगळ्यासाठी अजिबात तयारी नव्हती आणि इच्छा तर मुळीच नव्हती. गेल्या वेळीही ती अशीच सजली होती आणि ज्या कारणासाठी इतक सगळं केलं होतं त्यांनीच साखरपुडा मोडला होता. आता पुन्हा तस काही झालं तर या भितीने तिने काहीच तयारी केली नाही. आईबाबा आणि रियासोबत मुकाटपणे रिक्षात बसुन ती त्यांच्या घरी पोहचली.

..........................

राजेशिर्केंचा तीनमजली पांढर्‍याशुभ्र रंगाचा तो बंगला. बंगल्यावरती झळकणारं ब्राऊन कलरमधलं नाव ' वात्सल्य'. रिक्षावाल्याला जेव्हा त्यांनी ' वात्सल्य बंगला ' असा पत्ता सांगितला तेव्हा श्रीधरची छाती अभिमाने फुलून आली. आपली लेक भाऊसाहेबांची सून होणार या कल्पनेनच अंगावर मुठभर मास चढलं. रिक्षावाल्याला खाली उतरल्यानंतर त्यांनी पैसे खिश्यातून काढून दिले तेव्हा त्याच्याही डोळ्यात आश्चर्य होतं तेव्हा त्यांना मजा वाटली. बंगल्यासमोर सुशोभित केलेलं भलमोठं गार्डन होतं. तिथे माळी झाडांना पाणी देत होते. बंगल्याला मोठा लोखंडी गेट होता. गेटच्या दोन्ही बाजूला रखवालदार गणवेशात उभे होते. श्रीधररावांनी त्यांच्याकडे आपलं नाव सांगितलं आणि साहेबांनी बोलावल्याचं सांगितलं. त्यातल्या एकाने आतमध्ये फोन केला तस फोनवरल्या माणसाने पाठवा अस सांगितलं असावं पण काही सेकंदात त्या दोघांनी प्रवेशद्वार दोन्ही बाजूने उघडलं आणि ते आत आले. एका कोपर्‍यात एक माणूस टेबल टाकून बसला होता. त्याच्या रजिस्टरमध्ये त्यांनी नाव पत्ता नंबर लिहिला आणि ते चौघे आत आले. श्रीधरने धीराने दरवाजावरची बेल वाजवली. त्यांची छाती त्या सगळ्या वातावरणाने धडधडु लागली. समोरून दरवाजा उघडला गेला. नऊवारी साडीतील, पाठिवरुन पुढे पदर घेतलेली साधारणतः पन्नाशीच्या घरातली एक बाई उभी होती. अनघाकडे पाहून तिने ओळखीचं स्मित केलं.

" नमस्कार श्रीधर कारखानीस " श्रीधर हात जोडत म्हणाले.

" नमस्ते मी विक्रमची आत्या या ना आत. सगळे वाट पाहतायत."  गंगाआत्याने सगळ्यांना आतमध्ये बोलावलं.

आईबाबांच्या पाठुन अनघा शांतपणे आतमध्ये आली. रियाने बंगल्यावरुन एक नजर फिरवली आणि ती मनातून नाचायला लागली. भाऊसाहेब सोफ्यावरतीच बसले होते. ते उठुन पुढे आले. आत्याने नोकराला नजरेनच अरुंधतीला बोलवायला सांगितलं. नितू आणि जितेंद्र वरती विक्रमला पिडत बसले होते. खाली कुणीतरी आल्याची चाहूल लागली तशी नितू जितेंद्रला ओढत घेऊन खाली आली. इतक्यात खोलीतून अरुंधती बाहेर आली.

" श्रीधर या विक्रमच्या आई." अरुंधतीची भाऊसाहेबांनी ओळख करुन देताच कुमुद त्यांच्याकडे पाहून छानस हसली. अरुंधतीनेही मग चेहर्‍यावरती खोटं का होईना हसु आणलं.

" आणि मी नीतू हा जितेंद्र दादा." धावत अनघाजवळ येत नितू म्हणाली तसे साहेब हसले.

" आणि ही माझी बहीण आणि यांची लाडकी आत्या!" साहेब आत्याकडे लक्ष देत म्हणाले तसा श्रीधर कुमुदने त्यांना हात जोडून नमस्कार केला.

" बरं ही अनघाची आई कुमुद आणि ही तिची धाकटी बहिण रिया आणि ही आमची अनघा." श्रीधरने सगळ्यांची ओळख करुन दिली त्यासरशी पहिल्यांदाच अरुंधतीचं अनघाकडे लक्ष गेलं. तिच्या चेहर्‍यावरचे काळसर डाग, रबरने बांधलेले केस, साडी अनघाकडे एकंदरीतच तिने पाहिलं आणि तिचा मुड गेला. ' काय हा अवतार केलाय! आपण कुणाच्या घरी जातोय बरं लग्नाची बोलणी करायला जातोय कसं गेलं पाहिजे याचही साधं भान नाही! आईवडिलांकडे चार दागिनेही नाहीत का पोरीच्या अंगावर घालायला. काय पण घर शोधलय ह्यांनी. विक्रमने तरी काय पाहिलं हिच्यात देव जाणे! यापेक्षा समिहा कित्येकपटींनी सरस आहे. हिची तुलना तरी मी काय समिहाशी करतेय! तिच्या नखाची सर सुद्धा नाही हिला!' अरुंधतीने मनातल्या मनात सगळा राग बोलून टाकला. अनघा चालत पुढे आली आणि साहेब, आत्याच्या पाया पडली. अरुंधतीसमोर ती पाया पडायला वाकली पण तिने पाय मागे सरकावले आणि नजर दुसरीकडे वळवित, ' सुखी भव' म्हटलं. 

" तुम्ही उभेच आहात बसा ना " आत्या म्हणाली तसे श्रीधर कुमुद, रिया सोफ्यावरती बसले. त्यांच्यासमोर भाऊसाहेब बसले. अरुंधती, आत्या उभ्याच होत्या. नितू जितेंद्र एकमेकांशेजारी उभे होते. इतक्यात पायर्‍या उतरत विक्रम रुममधुन खाली आला. त्याने चॉकलेटी कलरचा लॉंग स्लिव्ह कुर्ता - पायजमा असा पारंपरिक पोशाख केला होता. तो समोरुन आला आणि रिया आ करुन त्याच्याकडे पाहत राहिली. 'My God !!!! sooo charming देवा मला अस्साच जिजू हवा होता. ताई आणि विक्रमसर किती छान दिसतील ना एकत्र!' तिने मनातच ताईच्या लग्नाची स्वप्नं रंगवायला सुरुवात केली. सगळी मंडळी बोलायला सुरुवात होण्याआधी विक्रमकडे बघुन नितू म्हणाली,

" वहिनी चल ना घर नाही पाहायचं तुला ?" त्यासरशी रिया लगेच " हो हो चल ना मला सगळं बघायचय " म्हणाली. अनघाने काही बोलण्याआधीच नीतूने भाऊसाहेबांकडेनजर टाकली. ते नजरेनेच हो म्हणाले त्यासरशी ती रिया आणि अनघाला घेऊन बाहेर आली. त्यांच्यामागोमाग जितेंद्रसुद्धा गेला. ते सगळे बाहेर गेले आणि बाकी मंडळी बोलायला लागली.

....................

" ये ना आपण गार्डनमध्ये फेर्‍या मारू या." अनघाचा हात धरून तिला ओढत नीतू म्हणाली. नीतू आणि जितेंद्र तिची पाठ सोडायलाच तयार नव्हते म्हणून तिला अवघडल्यासारखं झालं.

" बाकी काही म्हणा हा I like youuu दाद्याचा चॉइस छान आहे हे माहीत होतं इतका छान आहे हे नव्हतं माहित!" नीतू हसत म्हणाली.

" ए पण विक्रम सर स्मार्ट आहेत हा." रिया बोललीच त्यावर नीतू कॉलर उडवत म्हणाली,

" मग दाद्या कुणाचा आहे. " त्यावरती रिया आणि जितेंद्र हसले.

" बरं वहिनी तुमच्या चेहर्‍यावरती डाग कसले हे! आयमिन काही अॅलर्जी वगैरे आलीय का?" जितेंद्रच्या या प्रश्नावरती अनघा भांबावूनच गेली.

" अ म्हणजे हो अॅलर्जीचं उन्हामुळे." रिया तिची बाजू घेत म्हणाली. त्यावरती जितेंद्र ओके म्हणाला.

" बरं रिया तू काय करतेस कॉलेज कि अॉफीस?" नीतूने विचारलं.

" कॉलेज संपलं गेल्या वर्षी आता जॉब तू गं?" रियाने विचारलं.

" ती ना लष्कराच्या भाकर्‍या भाजते." जितेंद्र हसत म्हणाला त्यावर रियाने म्हणजे काय म्हटलं.

" म्हणजे काही नाही सोशल वर्क." ती रियाला टाळी देत म्हणाली.

" वा म्हणजे साहेबांचा वारसा चालवणार तू." रिया म्हणाली.

" बघु किती जमतय ते." नीतूने आशावादी नजरेने म्हटलं.

" जमेल गं तू छान काम करतेस." तिच्या खांद्यावरती थोपटत जितेंद्र म्हणाला. अनघा मात्र त्यांच्या गप्पांमध्ये शांतच होती.

" वहिनी गप्प का तू Ohhh आठवण येतेय का?" नीतूने हसत विचारलं.

" न नाही असं काही." ती चाचरत म्हणाली. खरतर आतमध्ये काय ठरलं असेल याचीच तिला चिंता होती. नितूने जितेंद्रला आणि रियाला नजरेने खूण केली.

" बरं तुमच्या गप्पा चालू दे मी जरा आत जाऊन येतो." म्हणत जितेंद्र तिथून गेला. 

" ए मी पण जरा बघते हा." सांगून नीतूही आत निघून गेली.

आता रिया आणि अनघा दोघीच उरल्या. इतक्यात रियाला फोन आला आणि ती रेंन्ज नाही सांगून गेटपाशी चालत गेली. नीतूनेच तिला आतमधुन मिसकॉल दिला होता पण अनघाला त्यांच्या मस्करीची काहीच कल्पना नव्हती ती तशीच गार्डनमधल्या एका कोपर्‍यात फुलझाडांचं निरिक्षण करित उभी राहिली. इतक्यात विक्रम आतून बाहेर आला. त्याने बाहेर पाहिलं. ती दिसताच तो चालत तिच्यासमोर आला.

" Hii " त्याने म्हटलं.

" हॅलो "  ती म्हणाली आतमध्ये काय झालं ते तिला जाणून घ्यायचं होतं पण तिने तसं काहीच त्याला विचारलं नाही. ती शांत पाहून त्याने बोलायला सुरुवात केली.

" घर कसं आहे ? I mean आवडलं का?" 

" हं छान आहे." इतकच बोलली ती आणि पुन्हा फुलांकडे पाहायला लागली. तिच्या चेहर्‍यावरची काळजी समजून तो म्हणाला,

" मॅडम Don't worry...Everything is fine छान झाली त्यांची बोलणी." हे ऐकून ती मागे वळली आणि मानेनेच तिने ओके म्हटलं. पण तिच्या चेहर्‍यावरती आनंदच नव्हता. इतक्या सगळ्या घटनानंतर हसणं विसरली होती ती. तिचा चेहरा ही तसाच दुःखीकष्टी, कोमेजलेला दिसत होता.

" बरं अभिनंदन " तो म्हणाला त्यावरती ती सेम टु यु म्हणाली.

" Ok मी येतो " असं बोलून तो आतमध्ये जायला निघाला. ती पुन्हा त्या फुलझाडांकडे गप्पपणे पाहू लागली. तिला वाटलं 'आपणही असेच आहोत कधीही कोणीही येतं आणि आपल्या भावनांना पायाखाली तुडवून निघून जातं. आपण सगळ्यांवरतीच ओझं झालो आहोत. आईबाबांनीही आपल्याला सावरायला वेळ न देताच भाऊसाहेबांच्या बोलण्यावरती तयार झाले. नंतर विक्रमसरांसोबत आपण किती आशेने बोलायला गेलो. त्यांनी तर दोन शब्दातच आपल्याकडे पाठ फिरवली आणि तिथेच सोडून आपल्याला निघून गेले. कॅफेशॉपमधल्या त्या संध्याकाळनंतर नसतो आपण घरी गेलो दिला असता कुठेतरी जीवबिव तरी कोणाला काय फरक पडणार होता ! आपल्यासाठी रडणारं हक्काने आपल्यावरती ओरडणारं आपल्यासाठी कासावीस होणारं असं कुणीही नाही ना श्रीकांतला काही फरक पडत ना विक्रमसरांना!  तिने त्या फुलांवरुन हात फिरवला. त्याने पुढे गेल्यानंतर मागे वळून पाहिलं. तो मनातून म्हणाला, ' वेडी! त्या फुलांकडे इतकं काय पाहायचं तुझ्यासारखीच आहेत ती छान आणि नाजूकसुद्धा !' त्याच्या या विचारानेच त्याच्या चेहर्‍यावरती हसु पसरलं.

....................

राजेशिर्केंच्या घरी चहापाण्याचा कार्यक्रम छान झाला त्यामुळे अनघाचे आईबाबा खूश होते. त्यांच्या घरी ठरल्याप्रमाणे गंगाआत्याने त्यानंतरच्या चार - पाच दिवसातच भटजींना बोलावून साखरपुड्याचा मुहूर्त काढुन घेतला. अरुंधतीने मात्र या सगळ्यात अजिबात रस दाखवला नाही. कारखानीस मंडळी घरी आलेली होती तेव्हाही ती जेवढ्यास तेवढच बोलली होती. त्यामुळे आत्याने स्वतःहूनच सगळ्यात पुढाकार घेतला. अनघा तसही तिला पहिल्या भेटीतच तेव्हा आवडली होती. आत्याने भाऊसाहेबांना साखरपुड्याचा मुहूर्त सांगितला. त्यांनीही हिरवा कंदील दाखवला त्यामुळे तिने उत्साहाने अनघाच्या आईला फोन करुन साखरपुड्याच्या मूहुर्ताविषयी सांगितलं.

" काय ? पुढच्या आठवड्यात एग्जमेंन्ट ! आत्या कसं शक्य आहे. फेब्रुवारीची दहा तारिख आहे आणि लगेच साखरपुडा तयारीला वेळ नको का ?" आत्याने साखरपुड्याचा मुहुर्त सांगितल्यावरती कुमुदने म्हटलं.

" अहो होईल हो सगळं आणि साखरपुडा लवकर झाला तर लग्नाची तयारीही सुरु करता येईल. साहेब म्हणत होते पुढच्या महिन्यातला मुहुर्त पाहुया का म्हणजे नंतर कालेजच्या परिक्षा पन असतील मग उन्हाळी सुटीला दोघं बाहेर फिरायलापन जातील." आत्या आणि साहेबांनी तर मुलांच्या लग्नापर्यंतच प्लानिंग केलेलं पाहून कुमुदला फार आढेवेढे घेणं नको वाटलं.

" बरं तुम्ही म्हणाल तसं बरं मग आम्ही तयारीला लागतो." कुमुद तयार झाली.

" हो हो बिनघोर रहावा तुम्ही.. कुमुदताई होईल हो सगळं ठीक." आत्याला कुमुदची अवस्था समजत होती. भाऊसाहेबांनी अनघाच्या बाबतीत घडलेलं सगळं तिला सांगितल्यामुळे कुमुदविषयी तिला फार दुःख वाटतं होतं. त्यामुळे तिने कुमुदला धीर द्यायचा प्रयत्न केला. आत्यांनी एवढं सगळं बोलल्यावर कुमुदलाही बरं वाटलं.

क्रमशः

🎭 Series Post

View all