बंधन भाग 37

Love, Social issues

नमस्कार, वेबसाईटचे काम सुरु असल्याने Ac ओपन होत नव्हत आणि नवीन वेबसाईटवरती बंधनचे आधीचे सर्व भाग आणि जून्या कथा पुन्हा पोस्ट केल्यात आता सहज तुम्ही वाचू शकाल. Its nt safe to post on Fb म्हणून फेसबुकला पेजला पोस्ट केलं नाही. पुन्हा तेवढं सगळं पोस्ट ब्लॉगला करणं अवघड जातं. तुमच्या प्रतिसादाबद्दल धन्यवाद पण फक्त चार - पाच दिवस गॅप गेला तर तुम्ही इतके वैतागलात...पण तुमच्या या प्रचंड प्रतिसादाची वाट मी गेले दोन महिने पाहत होते. ईतका वेगळा विषय आशय असुनही फक्त 4-5 हजार views असायचे आणि तूमच्या या प्रतिसादासाठी तिसावा भागापर्यंत मी वाट पाहिली.....इतक्या सर्व लोकप्रिय कथांमध्ये 'बंधन' ला टिकवून ठेवून लेखन 'continue' करणं सोप नव्हतं...एखाद्या लेखकाला जर वेगळा विषय - आशय आणि लेखन असुनही तुम्ही नाकारत असाल तर हे लेखकांचं अपयश का वाचकांचं याचाही विचार व्हायला हवा. पण दोन महिन्यानंतरच्या या तुमच्या भरघोस प्रेम व प्रतिसादासाठी आभार. कथेचा शेवटचा भाग नाही हा अजून बरच काही बाकी आहे गैरसमज नको.

बंधन भाग 37

( गेल्या भागात भाऊसाहेब अनघाच्या आईबाबांना फोन करून विक्रमसाठी अनघाचा हात मागतात. त्या दोघांना आश्चर्य वाटतं. अनघा मात्र विक्रमला भेटून स्वतः बोलण्याचं ठरवते त्याप्रमाणे ते कॅफेमध्ये भेटतात. तिची अवस्था पाहून त्याला वाईट वाटतं. पाहुया पुढे)

विक्रमने कॅफेशॉपमधुन बाहेर पडल्यानंतर घरी निघण्यासाठी कारचा दरवाजा उघडला इतक्यात त्याच्या लक्षात आलं अरे आपण कॅफेमधुन स्वतःच्याच विचारांच्या नादात बाहेर आलो तिला बायही म्हटलं नाही. तो धावतच आत कॅफेमध्ये गेला. ते ज्या टेबलला बसले होते तिथे पोचला तर तिथे खुर्चीत कुणीही नव्हतं. त्याने इकडे तिकडे पाहिलं पण ती त्याला कुठेच दिसेना. समोरून येणार्‍या वेटरला त्याने लगेच हटकलं.

" Hello इथे ब्लॅकड्रेसमधल्या एक मॅडम बसल्या होत्या कुठे गेल्या ?"

" हा त्या मघाशीच गेल्या." वेटर म्हणाला.

" Ok. Thanks " 

" Most welcome " म्हणत वेटर चेहर्‍यावरती स्माईल ठेवुन निघून गेला.

...............

तो पुन्हा कॅफेबाहेर आला. त्याने इकडेतिकडे पाहिलं पण ती कुठेच नव्हती. त्याच्या मनात आलं, ' असा कसा मी एकटाच निघून आलो. आज दुसर्‍यांदा मी तिला अस रस्त्यात अर्धवट सोडलं. त्या रात्रीसुद्धा आणि आताही ! How irresponsible I'm ! अंधारपण पडत आला. तिला घरी ड्रॉप करायला हवं होतं. छे! तिचा मोबाईल नंबर पण नाही. ' या विचारातच कुणाकडून तरी तिचा नंबर घ्यावा म्हणून त्याने काळेसरांना फोन लावला आणि घरी जाण्यासाठी कार स्टार्ट केली.

.................

तो काहीही न बोलता निघून गेला. ती काही क्षण तशीच विचार करित बसून राहिली. एकमेकांचे हात हातात घेऊन बसलेली इतर कपल्स पाहून तिला त्यांचा हेवा वाटला. ती तशीच उठली. हातात पर्स घेतली आणि कॅफेबाहेर पडली. बाहेर आल्या आल्या समोरून येणारी रिक्षा तिने हाताने थांबवली आणि गप्पपणे ती घरी निघून आली.

" काय ग लवकर आलीस ? आले होते ना सर ?" घरी पोचल्याक्षणी आईने प्रश्नांची सरबत्ती सुरु केली. ती बाहेरच झोपाळ्यावरती बसली होती. अनघा रिक्षातून उतरली तशी ती उठुन पुढे चालत आली.

" अ हो भेटले ना! बर मी जरा फ्रेश होते." म्हणत ती जड पावलांनी तिच्या रुममध्ये गेली. तिचा उतरलेला चेहरा पाहून कुमुदला अनेक शंका आल्या. देवा! आता काही प्रोब्लेम नको होऊ दे काय झाल काय माहित? त्यांनी सगळ तिच्या तोंडूनच ऐकल्यावर नकार नसेल ना दिला कि काही उलटसुलट बोलले तिला कि फक्त भाऊसाहेबांसाठी ते भेटायला तयार झाले होते असे बरेच विचार कुमुदच्या मनात यायला लागले.

.................

 अनघा फ्रेश होऊन तिच्या बेडवरती येऊन शांतपणे बसली. आता तिला जरा बर वाटलं. विक्रमला सगळ सांगितल्यामुळे तिचं मनही आता हलकं झालं होतं. आता पुन्हा कुणी आमची फसवणुक झाली अस म्हणायला नको होतं तिला. तिने डोकं मागे भिंतीला टेकलं. आता मात्र तिला राहवेना तिच्या डोळ्यांत पाणी तरळलं. विक्रम सर तुम्ही भाऊसाहेबांचा मुलगा म्हणून भेटला असतात तर मला जास्त बर वाटलं असतं पण माझ्यासमोर होता तो फक्त एका मोठ्या पदावरचा एक माणूस ! तुमच्या मॅनेजिंग डायरेक्टरच्या खूर्चीतूनच तुम्ही माझ्याशी बोललात आज तसच रूक्ष आणि तेवढचं मुद्देसुद! मी मात्र तुमच्या ' गुरुकुल' ची प्रोफेसर म्हणून नव्हे तर अनघा म्हणून तुम्हाला भेटायला आले होते! तुम्ही मला धीर वगैरे द्यायला दोन शब्द बोलावेत अशी अपेक्षा नव्हतीच माझी पण निदान तुमच्या डोळ्यावरच्या गॉगलच्या काळ्या काचेआड तुमच्या डोळ्यात माझ्याबद्दल काय भावना आहेत ते तरी समजून घ्यायचं होत मला पण तस काहीच नाही झालं. तुम्ही आलात आणि दोन शब्द मोजून बोललात. एम.बी.ए.चा माणूस अजुन काय करणार म्हणा! तुम्ही एक बिझनेस डिल करायला आला होतात फक्त भाऊसाहेबांच्या शब्दासाठी! तुमचं बोलून झालं तुम्ही निघून गेलात बाकी माझ्यासाठी मागे वळून तुम्हाला का पाहावस वाटेल! तशी अपेक्षा मी करणं चुकच आहे.' तिचे हे विचार सुरु असतानाच श्रीधरराव आणि कुमुद आतमध्ये आले.

" काय ग अनु आल्यापासून गप्प आहेस. काय झालं?" श्रीधरनी समोर बसत विचारलं.

" अनु तुला काही बोलले का ते उलटसुलट?" कुमुदने विचारलं.

" अ नाही ग आई. ते का बोलतील काही." ती शांतपणे म्हणाली.

" मग काय झालय?" श्रीधरनी पुन्हा विचारलं.

" काही नाही ग चिंता करण्यासारखं! मी सगळ सांगितलय त्यांना. ते हो म्हणाले तरीही!" 

" काय सांगतेस खरंच !"  कुमुदला प्रचंड आनंद झाला.

" अनु तुझा होकार आहे ना मग ?" श्रीधरनी तिचं मतही विचारलं.

" हो बाबा तुम्ही कळवा साहेबांना तसं." ती निर्विकारपणे बोलली.

" बर तू आराम कर. मी भाऊसाहेबांशी बोलतो हा नंतर." ते तिच्यासमोरून उठत म्हणाले तशी कुमुदनेही होकारार्थी मान हलवली. श्रीधरनाही आनंद झाला पण त्यांनी तो चेहर्‍यावरती दाखवला नाही. त्यांना आनंदाच्या बातम्या साजर्‍या करायची आता भितीच वाटायला लागली होती. त्यांनी भाऊसाहेबांना फोन करून सविस्तर आता बोलण्याचं ठरवलं. ते दोघे रुमच्या बाहेर आनंदाने गेले. तिला वाटलं, अजून आईबाबांना त्रास देण्यापेक्षा विक्रमला हो म्हटलेलं बरं तसही प्रेमबिम हे सगळ आत्ताची जनरेशन पाहते पुर्वीच्या काळी ठरतच होती ना लग्न एका फटक्यात! भेटणं बोलणही तेव्हा दुरची गोष्ट होती. असो आईबाबा खूश आहेत आणि भाऊसाहेबांच्या भावनांचा पण आदर ठेवला आपण बस पुरे या लग्नातून अजून काही अपेक्षा नकोच करायला आता! या विचारात ती दुसर्‍या दिवशीच्या लेक्चर्सच्या नोट्स काढायला उठली.

............

रात्री श्रीधरनी भाऊसाहेबांना अनघाचा होकार कळविण्यासाठी फोन केला. श्रीधर आणि कुमुद या बातमीने आनंदी होते. आता तरी लेकीच्या बाबतीत काहीतरी चांगलं होईल अशी आशा दोघांनाही होती. 

" हॅलो साहेब मी श्रीधर बोलतोय."

" हो बोला ना श्रीधर काय म्हणताय?" 

" काही नाही आज अनघा विक्रम सरांसोबत बोलली या विषयावर. त्यांनीही तिचं सगळं सविस्तर ऐकुन घेतलं. त्यांचा होकारच होता. इतकं सगळ समजल्यावरही ते तयार झाले हिच आमच्या साठी मोठी गोष्ट आहे हो!" श्रीधर कृतज्ञतेने बोलत होते.

" अहो असु द्या त्यात मोठ असं काय! बरं अनघाशी बोललात का ? काय म्हणाली ती ?" त्यांनी विचारलं.

" हो तिनेही होकार दिला हा! हीच आनंदाची बातमी कळवायची होती तुम्हाला." श्रीधररावांचे ते शब्द ऐकून भाऊसाहेब खुश झाले. त्यांना खरतर ती मनापासून सुनबाई म्हणून पसंतच होती. तिच्या कामाचं, प्रामाणिकपणाचं, हुशारीचं त्यांना नेहमीच कौतुक वाटायचं.

" हो पण साहेब तुमच्या घरची मंडळी म्हणजे विक्रमच्या आई त्यांना चालेल का हे सगळं?" श्रीधरनी महत्त्वाचा मुद्दा काढला.

" तुम्ही नका चिंता करु श्रीधर. मी पाहतो ते सगळं. बरं तुम्ही चहापाण्याला तरी घरी येऊन जा आमच्या. त्या निमित्ताने ती घरही पाहील आणि तुमचीही सगळ्यांसोबत ओळख होईल. मग साखरपुड्याचंही ठरवु आपण." भाऊसाहेबांच्या घरी येण्याच्या विनंतीने श्रीधरना अगदी संकोचल्यासारख झालं.

" हो हो आम्ही येऊ नक्की." श्रीधर म्हणाले.

" हो बरं आता ठेवतो शुभरात्री तुम्हाला." भाऊसाहेबांनी आनंदाने फोन ठेवला.

....................

रात्री सर्वांची जेवणं आटोपली. सगळे आपापल्या रूममध्ये झोपायलाही गेले. अरुंधतीला मात्र चैन पडेना. विक्रमने समिहाचा विचार सोड असं तिला सांगितल्यापासून तिची झोपच उडाली होती. तरी तिने अजुनही राजेश्वरीकडे विक्रमचा नकार कळवला नव्हता. विक्रमच्या डोक्यात नेमकं काय चाललय त्याचाही तिला अंदाज येईना.भाऊसाहेबांशी एकदा बोलून तर घेऊ असं तिने शेवटी ठरवलं आणि ती स्टडीरुममध्ये गेली. ते नुकतेच येऊन पुस्तकं चाळत बसले होते. त्यांचं अरुंधतीकडे लक्ष गेलं.

" साहेब जरा बोलायचं होतं." 

" हं बोला ऐकतोय." पुस्तकांची मुखपृष्ठ न्याहाळत ते म्हणाले.

" तुम्हाला एक सांगायचं होतं."  तिने हळुहळु बोलायला सुरुवात केली.

" कश्याविषयी ?" 

" विक्रमविषयी म्हणजे त्याच्या लग्नाविषयी! स्थळं पाहायला हवीत ना आपण! तस माझ्या पाहण्यात त्याला साजेशी अशी एक मुलगी आहे. समिहा बिराजदार. आपले चंद्रकांत ज्वेलर्स आहेत ना त्यांची कन्या." ती एका दमात सगळं सांगून मोकळी झाली. भाऊसाहेबांनी नजर वरती वळवली. त्यांनी अरुंधतीकडे एक कटाक्ष टाकला. ते असे शांत राहिलेले पाहून तिला काहीच कळेना.

" हं छान कल्पना आहे तुमची! " ते म्हणाले. त्यांचे ते शब्द ऐकून ती आता उत्सुकतेनं त्यांचं पुढचं बोलणं जीव एकवटुन ऐकु लागली.

" पण आम्ही आधीच एक मुलगी पाहिली आहे आणि विक्रमनाही ती पसंद आहे." त्यांच्या या वाक्याने तर ती हडबडलीच. ते काय बोलतायत तेच तिला कळेना.

" कोण ?" तिने धीराने विचारलं.

" आहे एक गुणी हुशार प्राध्यापिका. आनंदाची गोष्ट म्हणजे आपल्या 'गुरुकुल ' मध्येच कामाला आहे."

" काय ! एका सामान्य घरातली आपल्याच कॉलेजमधली साधी प्रोफेसर राजेशिर्केंची सुन होणार!" ती रागाने बोलली.

" काहीही बोलू नका. साध्या घरातली ही माणसंच असतात. ती त्यांच्या हुशारीवरती, गुणांवरती आणि कर्तृत्वावरती मोठी होतात. पण हे सगळं तुम्हाला नाही कळणार कारण पैसा, प्रतिष्ठा, मानमरातब, लोकांच्या नजरेतला आदर एका दिवसात मिळत नसतो त्यासाठी कित्येक वर्ष जातात आणि त्यासाठी वाट पाहावी लागते आणि मुळात आपल्या माणसाला साथ द्यावी लागते अर्थात हे सगळं तुम्हाला नाही कळणार ओ कारण तुम्हाला तर साथ सोडून जायची सवय 

आहे." ते भडाभडा बोलत होते.

" बस बस पुरे आता उगीच जुन्या गोष्टी बोलून काय होणारय आता."  ती  रागाने म्हणाली.

" काही होऊ नये म्हणूनच आम्हाला तीच मुलगी सुन म्हणून हवीय आणि विक्रमनीही हो म्हटलय आता प्रश्नच मिटला तेव्हा तुम्ही किंवा मी बोलून काय उपयोग." ते उपहासाने हसतच चेअरवरती बसले.

" बरं आता तुमचं सगळं ठरलयच तर काय बोलणार." असं बोलून ती जायला वळली.

" कारखानीसांकडची मंडळी यायचीत आपल्याकडे तेव्हा त्यांच्यासमोर तरी वादविवाद नकोत." ते म्हणाले. ती मागे न वळताच फक्त हं म्हणाली.

" आणि हो घराण्याच्या गोष्टी तू नको करुस अरु. घरासाठी काय योग्य अयोग्य ते कळतं मला आणि माझ्या मते विक्रमची काळजी त्यांच्या आईपेक्षा वडिलांनाच जास्त आहे नाही का? " त्यांच्या या बोलण्यासरशी ती झटकन मागे वळली.

" रणजित तुम्ही किती वर्ष तेच ऐकवणार मला. आई आहे मी त्याची तेव्हाही मला काळजी होती आणि आजही आहे."ती नरमाईने बोलली पण तिची नजर आता खाली झुकली होती. मघाचा त्यांना जाब विचारणारा सुर आता नरमला होता. ती निघून गेली. त्यांनी शांतपणे हातातलं पुस्तक वाचायला सुरुवात केली.

.............

अरुंधती भाऊसाहेबांशी बोलली पण ती त्यांच्यावरती आणि विक्रमवरतीसुद्धा चिडली होती. ' काय केलं यांनी हे! दोघा बाप- लेकांनी मिळून अक्षरशः पानं पुसली आमच्या तोंडाला! तरीच मला शंका आली होती विक्रम सावलीसारखा भाऊसाहेबांसोबत असतो त्यामुळे ते एखादी शोधणारच नाहीतर असं तर नसेल विक्रम त्या पोरीच्या प्रेमात नसेल ना पडला आणि त्याने स्वतःहून भाऊसाहेबांना सांगून लग्नासाठी त्यांना राजी केलं. तरी ती नितू बडबडतच असायची काहीबाही ती पण सामील असणार त्यांना! इतक्यात घराचे खिडक्या दरवाजे नीट लावलेत का नाही पाहायला आत्या बाहेर आली. ' घ्या आल्या ह्या. आत्याबाईपण न बोलून शहाण्या आहेत. यांनाही विक्रमने सांगितलच असेल फक्त मलाच एवढी मोठी गोष्ट सांगायची गरज नाही वाटली त्याला.' हे सगळे विचार मनात घेऊनच ती विक्रमच्या रुमकडे वळली.

.................

त्याने काळेसरांना काम आहे म्हणून सांगून अनघाचा मोबाईल नंबर घेतला होता. रात्री झोपण्याआधी तिला मेसेज करुया म्हणून त्याने text message केला. ती तिच्या रुममध्ये बसली होती. संध्याकाळी भाऊसाहेबांचा फोन येऊन गेल्यामुळे तिचे आईबाबा आणि रिया खूश होते. ती मात्र तिच्याच विचारात दंग होती. आईबाबा खूश आहेत म्हणून बर्‍याच दिवसांनी आज तिने नीट दोन घास खाल्ले नाहीतर खाण्यापिण्याची इच्छाच मरुन गेली होती. इतक्या रात्री कुणाचा मेसेज म्हणून तिने मोबाईल पाहिला.

' Hi, This's my personal no.

   From Vikram '

तिने मेसेजला लगेच ' Okk ' असा रिप्लाय दिला. इतक्या पटकन रिप्लाय त्याला अपेक्षित नव्हता. त्याने पुन्हा टाईप केलं.

' Whatsapp सुरु आहे का?' त्यावर तिने पलिकडून हो म्हटलं. त्याने पटकन त्याच वाॅट्सअॅप ओपन केलं.

' Ok ' असा मेसेज टाकला. 

'Ok Gud nyt ' तिने मेसेज केला. त्यावर मोबाईलकडे पाहत त्याने स्माईल केलं आणि तिला ' Gud nyt ' चा रिप्लाय दिला. अरुंधती रुमच्या दरवाजातच उभी होती. ती आल्याची चाहूलही त्याला लागली नव्हती. त्याचं मोबाईलमध्ये पाहत हसणं तिच्या जीवावरती आलं. तिने रागाने त्याच्या हातातला मोबाईल काढून घेतला.

" मम्मा काय ?" तो पटकन म्हणाला.

" मी इथे उभी आहे धडधडीत तरी तू त्या मोबाईलमध्येच डोकं खुपसुन एवढं काय सांगायचं असतं रे तिला." अरुंधती चिडत म्हणाली तसा तो पटकन हसला.

" मम्मा chill काय गं मी काय दहावी बारावीला आहे का तशीच वागतेस."  तो हसत म्हणाला.

" विक्रम तू स्वतः इतका मोठा निर्णय घेतलास मला सांगावसही नाही वाटलं. साहेब बोलले आता तेव्हा कळलं मला. नशिब लग्नाच्याच दिवशी पत्रिका नाही माझ्या हातात ठेवलीत."  ती रागात म्हणाली.

" काहीही काय बोलतेस मम्मा. अगं सगळच घाईत ठरलं." तो गॅलरीकडे जात म्हणाला.

" हो ना आणि तसही तुला ते जास्त जवळचे." 

" मम्मा तस काही नाही. तू , आत्या, साहेब सगळेच माझ्या जवळचे आहात." त्यावर ती अजून चिडली.

" आत्याबाईंचं नाव घेतलचं पाहिजे का ?" 

" ओके सॉरी but मम्मा You know I love you माझी लाडकी मम्मा ना तू!" तो आईला मस्का मारत होता. त्यावर ती म्हणाली.

" हो ना मग कश्याला त्या प्रोफेसरच्या नादी लागतोस." ती त्याचे हात हातात घेत म्हणाली.

" सॉरी मम्मा मी त्यात नाही बदल करु शकत. भाऊसाहेबांनी शब्द दिलाय त्यांना प्लीज." तो तिला मनवत म्हणाला. त्यावर आता काही बोलण्यात अर्थ नाही असं तिला वाटलं.

" हं Good night " बोलून ती बाहेर पडली.

" Good night थँक्यु मम्मा." ती बाहेर जाताना तो म्हणाला त्यावर ती नुसतच हसली.

..........

अरुंधती बाहेर गेली न गेली तोच नीतू आतमध्ये आली. ती खाली भाऊसाहेबांसोबत गप्पा मारित बसली होती नंतर उठुन वरती आली तेव्हा  रुममध्ये जाताना तिचं सहजच विक्रमच्या रुमकडे लक्ष गेलं. दरवाजा सताड उघडा होता आणि मम्मा आणि विक्रम काहीतरी गहन विषयावरती बोलतायत असं तिला वाटलं. ती दाराआड लपून त्यांचं सगळं बोलणं ऐकत होती. त्यावरुन ते काहीतरी लग्नावरुन बोलत असावेत ते तिच्या लक्षात आलं म्हणून ती अरुंधती बाहेर पडल्या पडल्या धावत त्याच्या खोलीत आली.

" ए दाद्या काय काय मला पण सांग!" तिच्या एक्साईट होत ओरडण्याने त्याला आश्चर्य वाटलं.

" तू ! तू काय करतेस इकडे! दुसर्‍यांची बोलणी चोरून ऐकतेस." तो तिचा कान पिरगाळत म्हणाला.

" आ दुखलं सोड आता सॉरी ." त्यावर हसत त्याने तिचा कान सोडला.

" ओके मला सांग आयमिन दाखवं." ती म्हणाली.

" काय ?" त्याने विचारलं तस त्याला काही कळायच्या आधीच तिने त्याच्या हातातून मोबाईल ओढून घेतला.

" हे मला फोटो पहायचेत वहिनीचे. दाखव ना दाखव ना." ती त्याच्या पाठीच पडली. शेवटी प्राचार्यांनी त्याला वॉट्सअॅपला पाठवलेले वेगवेगळ्या कार्यक्रमांचे ग्रुप फोटोज त्याने तिला दाखवले.

" अॅ हे काय ग्रुप फोटोज करायचेत! एखादा सिंगल फोटो नाही का?" ती हिरमुसली नंतर स्वतःच म्हणाली, " ओके I will manage " आणि तिने ते फोटोज पाहायला सुरुवात केली.

" वाव!!!!! She is soooo cute यार." आता तर एक्साईट होऊन ती उड्याच मारायला लागली आणि मोबाईल तसाच हातात घेऊन धावत शेजारी जितेंद्रच्या रुममध्ये गेली तसा तिचा आरडाओरडा थांबवायला विक्रम पण धावत तिच्या मागून गेला.

" ए नीतू दे ना मोबाईल! आगाऊ मुलगी." 

" थांब रे तू! आधीच तू आम्हाला काही सांगितल नाहीस."

" ए मी तुला सांगणारच होतो तुलाच चोरुन ऐकायची घाई झाली ना!" तो म्हणाला.

" ए दादागिरी नही चलेगी हा आता माझी वैनुडी येणार."

" तुला बघतो मी थांब तू!" म्हणत विक्रम तिच्या पाठी लागला आणि ते दोघे जितेंद्रच्या रुममध्ये धावाधाव करायला लागले. 

" ए काय आरडाओरडा लावलाय यार झोपू द्या ना." बेडवरती उपडी पडलेला जितेंद्र मोठ्याने म्हणाला. त्याचे डोळे अजून बंदच होते.

" ए झोपतोयस काय ऊठ ना! एक गंमत बघ." नीतू त्याच्या पाठीवर थापा मारायला लागली.

" नीतू तुला झोप नाही का येत! जा ना." जितेंद्र झोपाळलेलाच होता.

" ए वहिनीचा फोटो बघ." नीतू हातातला मोबाईल त्याच्यासमोर नाचवत म्हणाली तसा तो ताडकन उठला.

" ए कोण वहिनी तुझी कि माझी ? बघु बघु." जितेंद्रनेही मोबाईल हातात घेतला.

" ए तुम्ही द्या तो मोबाईल इकडे?" विक्रम कंटाळून म्हणाला.

जितेंद्रने फोटो पाहिले आणि त्याने त्याचा हात हातात घेत ' Congrats bro ' म्हटलं.

" Happy for you यार." जितेंद्र हसत त्याला बोलला.

" थँक्यु जितू " विक्रम त्याला थँक्स म्हणाला पण आपल्याला उशीर झाला असता साहेबांशी बोलायला तर कदाचित आपल्याला हेच वाक्य त्याला बोलावं लागलं असत या कल्पनेनं विक्रमला हसु आलं. तेवढ्यात नितू म्हणाली.

" ए कॉल करुयात काय?"

" काय! आत्ता कुठे नीतू ?" विक्रम नीतूच्या या कल्पनेनं दचकलाच.

" थांब रे तू." म्हणत तिने नंबर डायल केला. पलिकडून दोन तीन रिंगमध्ये अनघाने फोन उचलला.

" Hello बोला सर." तिचा आवाज ऐकून नितूने मोबाईल स्पिकवरती टाकला. ती पलिकडून पुन्हा बोलली, " हॅलो विक्रम सर बोला." तिचा गोड आवाज ऐकून नितू आणि जितेंद्र तोंड दाबून हसायला लागले. मग नीतू हसु आवरत म्हणाली,

" हॅलो वहिनी मी बोलतेय नीतू. तुमच्या विक्रमसरांची सिस्टर." आणि ती हसायला लागली. 

" नीतू दे ना कार्टे इकडे." विक्रमने मोबाईल ओढला तिच्या हातून तर ती मोठ्याने ओरडली.

" ए ह्याला सांग गं."

" कोणाला ?" अनघा पलिकडून म्हणाली.

" तुझ्या विक्रमसरांना गं. त्याला सांग हा आम्हाला पिडू नको." नीतूच्या या बोलण्याने ती भांबावूनच गेली. काय बोलावं तेच कळेना तिला.

" ओके ओके ए आपण कधी भेटूया? मी आणि जितेंद्र येऊ का तुला भेटायला? जितेंद्र म्हणजे माझा सेकंण्ड बंधु हा!" नीतूची बडबड ऐकून विक्रमने पटकन मोबाईल काढुन घेतला. हे लग्न कसं जूळुन आलय याची नितू, जितेंद्रला काहीच कल्पना नव्हती त्यामुळे ते खुश होते. अश्या परिस्थितीत या दोघांनी तिच्या घरी जाणं म्हणजे मोठा प्रोब्लेम होईल या विचारानेच त्याने मोबाईल स्वतःकडे घेतला.

" हॅलो मॅडम तुम्ही यांचं नका ऐकू काही. ओके गूड नाईट." एवढं बोलून त्याने फोन कट केला. अनघाला या सगळ्याची काहिच कल्पना नव्हती. तिने बिचारीने फोन ठेवला आणि ती झोपायला गेली.

...................

" तुम्ही वेडे आहात काय? ही वेळ झाली कोणाला कॉल करायची?" तो रागाने नितूला म्हणाला.

" अरे पण इट्स ओके. झाल काय?" नितूने विचारलं. हे दोघे तिला भेटू नये आणि त्यांना तिच्याबाबतीत जे जे घडलय ते कळू नये म्हणून काहीतरी ठोस करावं लागणार होतं आणि त्याने थाप ठोकून दिली.

" because तिचा काही सेलिब्रेट करण्याचा मुड नाहीय. तिचा साखरपुडा नुकताच मोडलाय." 

" का पण ?" जितेंद्र म्हणाला.

" कारण कारण मुलाकडच्यानी....त्यांनी हुंड्यासाठी आग्रह धरला." तो नजर खाली वळवत म्हणाला. एक खोटं लपवण्यासाठी दुसरं खोटं अशीच त्याची अवस्था झाली होती. पण ते ऐकून नितूला वाईट वाटलं.

" बिच्चारी एवढी प्रोफेसर, छान मुलगी आणि काय नालायकपणा सुचला हा त्या लोकांना ! या असल्या माणसांमुळेच मुलींना जन्मालाच घालू नये अशी मानसिकता वाढतेय."  ती रागात बोलली त्यावर तो फक्त हं एवढच बोलू शकला.

" ओके आम्ही नाही जात भेटायला वगैरे आणि हा विषयही काढत नाही पुन्हा. हो की नाही नीतू?" जितेंद्र बिचारा समजुतदारपणे बोलला त्यावर नितूनेही मान डोलावली. हुश्श सुटलो बुवा असं वाटलं विक्रमला. आता ही तारेवरची कसरत अशीच त्याला करावी लागणार होती.

क्रमशः

🎭 Series Post

View all