बंधन भाग 36

Love Story, Social Issues

भाग 36

( गेल्या भागात ज्याची अनघाच्या आईबाबांना भिती होती तेच घडतं, तिचा साखरपुडा मोडतो. पण हे सगळं पाहून भाऊसाहेब दुःखी होतात. घरी विक्रम त्यांना साखरपुड्याविषयी विचारतो तेव्हा ते घडलेलं सगळ सांगून त्याला अनघाचा विचार करायला सांगतात. गॅदरिंगच्या त्या प्रकारापासून अस्वस्थ असणार्‍या त्याला भाऊसाहेबांचं म्हणणं पटतं. पाहूया आज काय होणार )

विक्रम कॉलेजमधुन दुपारी लवकर घरी पोहचला. फ्रेश होण्यात वेळ न घालवता तो थेट भाऊसाहेबांना भेटायला त्यांच्या रुममध्ये गेला. ते सकाळपासुनच्या दगदगीनंतर नुकतेच येऊन निवांत बसले होते. तो धावतच आत आला.

" येऊ का ?" त्याने दारातूनच विचारलं.

" या ना ! तुम्ही लवकर आलात कि काय आज ?" त्यांनी विचारलं तस त्याने वाक्यांची जुळवाजुळव करायला सुरुवात केली. 

" अ हो म्हणजे तुमच्यासोबतच बोलायचं होतं." तो समोर येऊन त्यांच्यासमोर बसला.

"हा बोला ना. "

" मी तुमच्या रात्रीच्या त्या बोलण्याचा खरंच शांतपणे विचार केला. " 

" ते आम्ही भावनेच्या भरात बोलून गेलो. शेवटी तुमचं आयुष्य आहे. तुमच्याही जोडीदाराच्या अपेक्षा असतील, स्वप्नं असतील. एखाद्या वळणावर कुणीतरी आपलं म्हणावं असं भेटलंही असेल. आम्ही असं तडकाफडकी लग्नासारख्या विषयावर तुमच्यासोबत बोलणं योग्य नव्हतं."

भाऊसाहेब बोलत होते. त्यांना त्यांच्या बोलण्याचा पश्चात्ताप झाल्याचं विक्रमला जाणवलं.

" No No असं काहीच नाही आहे. खरंतर मला तुमचं म्हणणं पटलय. मी तयार आहे या लग्नासाठी. तुम्ही तिच्या Sorry, I mean मॅडमच्या घरच्यांशी बोला आणि ठरवा काय ते."  तो बोलून मोकळा झाला आणि त्याला हलकं वाटलं. तो जायला उठला तसे भाऊसाहेब ऊठले आणि त्याच्या खांद्यावरती त्यांनी हात ठेवला. तो मागे वळला तर त्यांनी त्याला आलिंगन दिलं. मुलाबद्दलचा किती विश्वास आणि अभिमान होता त्या मिठीत. त्यांना अनपेक्षित होता हा त्याचा निर्णय. आपण शंभर टक्के नाही एक टक्का तरी बरे संस्कार केले म्हणून इतकी गुणी मुलं आपल्याला देवाने दिली असं त्यांना वाटतं होतं. विक्रमला त्यांच्या डोळ्यात पाहताना मनातून स्वतःचीच लाज वाटली. त्यांना एकदाच सत्य काय ते सांगून टाकावसं त्याला त्या क्षणी वाटलं पण तो अविचार वाटला त्याला! त्यामुळे त्यांना धक्का बसलाच असता पुन्हा अनघा तिने तर खरं काय ते कळल्यावर या लग्नालाच नकार दिला असता. कुठली मुलगी स्वतःवरती अत्याचार करणार्‍या मुलाशी लग्नाला तयार होईल! जॉबही सोडेल ती उगीच सगळ्यांनाच मनस्ताप होईल आणि साध्य काहीच होणार नाही. आता अनघाच्या आईबाबांना तिच्या लग्नाची चिंता सतावतेय पहिली ती सोडवली पाहिजे आणि त्यासाठी हे लग्न व्हायलाच हवं या विचाराने त्याने स्वतःला सावरलं आणि इट्स ओके म्हणून तो तिथून बाहेर गेला.

................

विक्रमच्या या निर्णयाने मात्र भाऊसाहेबांना आभाळ ठेंगण झालं. त्यांनी घरात अजुन कुणाच्याच कानावरती हा विषय घातला नव्हता. आत्या, जितेंद्र, नितू यांनी अनघासारख्या गुणी, हुशार मुलीला नाकारण्याचं काहीच कारण नव्हतं. उरला प्रश्न अरुंधतीचा तिचे मनसुबे तर गंगाआत्याने त्यांना सांगितलेच होते त्यामुळे सगळं काही ठरल्यानंतरच अरुंधतीला सांगायचं त्यांनी ठरवलं. दुसर्‍याच दिवशी त्यांनी श्रीधरना फोन केला.

" हॅलो बोला साहेब." 

" कशी आहे अनघा आता ?" त्यांनी पहिल्यांदा तिची चौकशी केली.

" हो ठिक आहे. सकाळी उठते, कॉलेजला जाते, घरी येते एवढच आयुष्य झालेल आहे सद्या तिचं." श्रीधर हळहळले.

" हं कल्पना आहे मलाही. श्रीधरराव एक सुचवू का?" 

" काय ? " 

" तुमच्या अनघाचा हात आमच्या विक्रमसाठी द्याल का तुम्ही ?" भाऊसाहेबांनी सलग विचारून टाकलं. पण हा प्रश्न श्रीधरसाठी अनपेक्षित आणि तितकाच आश्चर्यकारक होता.

" काहीतरी काय साहेब! आम्ही साधी सर्वसामान्य माणसं आहोत हो आणि तुम्हाला माहितीय अनघाही तशीच आहे. तुमचं मोठ घराणं त्यात राजकीय वारसा आणि विक्रम तर इतके उच्चशिक्षित परदेशातून शिकून आलेले. शिवाय एवढ्या मोठ्या कॉलेजचे मॅनेजिंग डायरेक्टर! कसं जमणार हे!" श्रीधरने त्यांच्या मनातल्या सगळ्या शंका बोलून दाखवल्या ज्या कितीही नाही म्हटलं तरी खर्‍या होत्या.

" हो तुमचं म्हणणं मी समजू शकतो आणि ते खरंही आहे. आधीच इतके आघात तिच्या मनावर झालेत त्यातून आमचं घर, इथलं वातावरण सगळ्याशीच जुळवून घेणं तिला अश्या परिस्थितित कठीण वाटेल पण विक्रमशी मी बोललोय. त्यांची काहीच हरकत नाही आहे." 

" हो तरीपण तुम्ही कितीही म्हणालात तरी हे आमच्यासाठी जरा कठीणच आहे." श्रीधरराव पुन्हा म्हणाले.

" तुम्ही अनघाशी बोलून तरी पाहा. मग ठरवुया काय ते." भाऊसाहेब शांतपणे म्हणाले. श्रीधरनेही बरं म्हणत फोन ठेवला.

...................

श्रीधरने आधी कुमुदला भाऊसाहेबांच्या फोनविषयी सांगितलं. तिलाही आश्चर्य वाटलं कि भाऊसाहेबांनी असा विचार केला आणि विक्रमनी त्यांना इतक्या सहज होकारही देऊन टाकला तरी म्हणावा तसा आनंद कुमुदला झाला नाही. श्रीधरसारख्याच अनेक शंका तिच्याही मनात आल्या. आपल्या लेकीने राजकारणातल्या एका मोठ्या माणसाची सुन होणं आणि मुळात ती जिथे काम करतेच तिथल्याच उच्च पदावरच्या माणसाची बायको होणं हे त्यांना पचनी पडणं कठीणच होतं. शिवाय लेकीच्या बाबतीत इतका मोठा प्रसंग घडलेला असताना भाऊसाहेबांच्या घरातील मंडळी तिला स्विकारतील का हा प्रश्न होताच. दुधाने तोंड पोळल्यावरती माणूस ताकही फुंकुन पितो याप्रमाणे आधीच वझेमंडळींनी इतकी निराशा केलेली असताना पुन्हा काही तसच घडायला नको अस त्यांना वाटत होतं.

....................

 अनघाचा साखरपुडा मोडल्याच्या प्रसंगाला चार- पाच दिवस उलटले होते तसा तिचा मुड पाहून श्रीधर आणि कुमुदने तिच्याकडे भाऊसाहेबांनी सांगितलेला विषय काढला. आईबाबा काय बोलतायत ते ऐकुन सुरुवातीला तिला धक्काच बसला.

" काहीही काय आई बाबा ! भाऊसाहेब कितीही म्हणाले तरी हे शक्य नाही ते तुम्हालाही माहितीय." ती मांडीवरली उशी बाजूला ठेवत म्हणाली.

" अग हो मीही तेच बोललो त्यांना पण त्यांनी तुझ्यासोबत बोलायला सांगितलय आम्हाला." श्रीधर बेडवर तिच्या समोर बसत म्हणाले.

" बाबा तुम्हाला माहितीय साहेब भल्या स्वभावाचे आहेत. कोणाला दुःखी नाही पाहवु शकत ते शिवाय श्रीकांतचे घरचेच त्यांना इतकी बोलले म्हटल्यावर त्यांना वाईट वाटणही साहजिक आहे. आपण दुसर्‍यांना उपदेश करण्यापेक्षा आपण स्वतः त्याप्रमाणे का वागू नये अस वाटलं असेल त्यांना."  ती बाबांकडे पाहत म्हणाली. कुमुद शांतपणे उभी होती.

" हो ग बरोबर आहे तुझं पण विक्रमशी ते केव्हाच बोललेत अगं आणि त्यांनी सगळं समजूनही होकार दिला त्यांना!" बाबा म्हणाले तशी तिची नजर पटकन वरती वळली. हा तर तिला आश्चर्याचा धक्का होता.

" What ! पण कस शक्य आहे हे! बाबा तुम्ही विक्रम सरांना पाहिलं नाहीय म्हणून म्हणताय. He is so smart & good- looking man. त्यांना कितीतरी हुशार, स्मार्ट, सुंदर मुली भेटू शकतील." ती म्हणाली तस श्रीधरने कुमुदकडे पाहिलं.

" अनु पण जरा साहेबांच्या म्हणण्याचा विचार करायला काय हरकत आहे ?"  कुमुद आता म्हणाली.

" नाही ग आई, मलाच कल्पना करवत नाही मी आणि विक्रम सर कसं शक्य आहे हे!" 

" बर तु मग विक्रमसरांसोबतच बोलून घे. त्यांना सविस्तरपणे तुला जे जे वाटतय ते सांग मग पाहू त्यांचा निर्णय. सद्या काहीच बोलायला नको आणि उगीच कुणाला आधी सांगायलाही नको." श्रीधर म्हणाले.

" हो बाबा, आता प्रत्यक्ष भेटूनच बोलाव लागेल. निरोप निरोप खेळणं नको आता त्याचे परिणाम काय होतात ते पाहिले. असो Ok मी भेटते त्यांना." ती बोलली आणि आईबाबांनी सुटकेचा निःश्वास टाकला.

................... 

दुसर्‍या दिवशी तिने विक्रमला फोन करण्याचं ठरवलं पण त्याचा मोबाईल नंबर तिच्याकडे नव्हता. कुणाकडे मागणही बरोबर वाटलं नसतं. खंदारे मॅडमकडुन नंबर घ्यावा का मागून असा विचार आला पण त्यांना कारण काय सांगणार हा प्रश्न होताच. बाकी काही सिनियर प्राध्यापकांकडे भाऊसाहेब आणि विक्रमचे नंबर्स होते पण तिने कुणालाही काही विचारलं नाही. कॉलेजच्या लँण्डलाईनवरूनच तिने त्याच्या केबिनमध्ये कॉल केला.

" Hello, Vikram here, Who's speaking ?" दोन रिंगमध्येच कॉल पलिकडून उचलला गेला. पण काय बोलायचं तेच तिला कळेना. दोन मिनिटं शांततेत गेली. पलिकडून काहिच रिसपोन्स नाही हे पाहून तो चिडला.

" Hello ,  If you don't want to talk then why are you waisting my time. " इतकं बोलून त्याने फोन कट केला. 

तिने पुन्हा ट्राय केला.

" Hello , Hey look you " तो पुढे काही बोलण्याआधीच ती पलिकडून बोलली.

" Hello सर मी अनघा बोलतेय." ते वाक्य ऐकून त्याला आश्चर्य वाटलं. तो थोडा सावरला आणि तिचं बोलणं तो लक्ष देऊन ऐकायला लागला.

" Hello बोला ना कारखानीस मॅडम." त्याने शांतपणे म्हटलं आणि तिच्या बोलण्याची तो वाट पाहत होता.

" सर मला भेटायचं होत तुम्हाला ! ते भाऊसाहेब माझ्या बाबांकडे...... I mean तुमच्याविषयी." ती शब्दांची जुळवाजुळव करित होती.

" हो I know that. Ok मग कुठे भेटायचं?" त्याने पटकन असा प्रश्न विचारला. तिला काही सुचेना.

" अ..... Sunshine Cafee ला संध्याकाळी साडेपाच." ती म्हणाली. खरतर तिला दुपारी कॉलेज सुटल्यावरतीच म्हणायचं होतं पण मग कॉलेजमधून एकत्र बाहेर पडताना कुणी पाहिलं तर उगीच चर्चा नको म्हणून तिने संध्याकाळची वेळ सांगितली.

" Ok then I'll come sure " त्याने इतकं म्हटलं.

 " बरं Thank you. Bye." म्हणून पलिकडून तिने फोन ठेवला. 

ती अजुन काही बोलेल असं त्याला वाटलं म्हणून तिने बाय म्हणण्याची त्याने वाट पाहिली. तिने फोन ठेवल्यानंतर त्याने टाईमिंग लक्षात रहावं म्हणून साडेपाचचा अलार्मही मोबाईलला लावला.

...................

संध्याकाळी कॅफेला लवकर पोहचावं म्हणून तो संध्याकाळी पाचलाच तयारी करुन बाहेर पडला. फोरव्हिलरचा दरवाजा उघडणार इतक्यात खांद्यावरती मागून कुणीतरी हात ठेवला. त्याने मागे वळून पाहिलं तर नितू डोळे मिचकावत उभी होती.

"  काय बेहनजी झाली वाटतं भटकंती." नुकतच एन.जी.ओ. मधून आलेल्या नितूला त्याने मस्करीत विचारलं तशी ती हाताची घडी घालीत म्हणाली.

" ए मी काय तुझ्यासारखी शायनिंग मारत फिरत नाही बाहेर. एन. जी. ओ. मधून आत्ता येतेय." 

" हो का बर बर " तो हसत म्हणाला आणि पुन्हा गाडीकडे वळला.

" एक एक मिनिट चाल्लायस कुठे नक्की तू ! Don't tell me तू कुठल्या मित्राला भेटायला निघालायस." ती दात मिचकावत म्हणाली.

" तुला काय वाटतं." त्याने विचारलं.

त्याला स्वतःलाही माहित होतं नितू उगीच मस्करी करित नाही आहे. रेमंण्डचा नेव्ही ब्लू कलरचा कॅज्युअल वेअर ब्लेझर, हातात Rolex चं रिस्ट वॉच, त्याचा आवडता Nautica Blue च्या पर्फ्युमचा गंध, Persol चे इटालियन branded सनग्लासेस त्याच्या एकंदरीत ड्रेस कडे पाहून कुणीही नितूसारखच म्हणालं असतं.

" तस नाही. आज समथिंग स्पेशल हा. आज सगळ branded आहे बुवा नेहमीपेक्षा थोडस एक्स्ट्रा काहीतरी." ती गालात हसत म्हणाली.

" अस काहीही नाहीय." तो नजर हसत दुसरीकडे वळवत म्हणाला.

" मग माझ्याकडे बघून सांग ना!" तिने पुन्हा म्हटलं. इतक्यात त्याच्या मोबाईलचा सकाळी अनघाचा फोन आल्यानंतर सेट केलेला अलार्म वाजला.

" बघ बघ Waiting हा. जा जा असं कुणाला वाट बघायला लावू नये." 

" नितू You're mad " म्हणत त्याने कारचा दरवाजा उघडला आणि कार स्टार्ट केली.

" She will be lost in your eyes हा " ती पुन्हा कारच्या विंन्डोपाशी येत त्याच्याकडे पाहत डोळे मिचकावित मंद हसत म्हणाली. यावेळी ती मस्करी नव्हती. तिने अंगठा उचलून बेस्ट लक दिलं. त्याला वाटलं आपली नितू किती भारी आहे न सांगताच तिला सगळं कळतं.

" Shut up " म्हणत हसत त्याने गाडी बाहेर वळवली.

..................

ती कॅफेमध्ये टेबलला बसली होती. तिने मोबाईलमध्ये पाहिलं तर पावणेसहा होत आले होते. आजूबाजूच्या टेबलवरती सगळी कपल्स आपापल्या विश्वात दंग होती. तिने एकवार सगळीकडे नजर फिरवली. तिला कौतुक वाटलं त्यांचं आणि स्वतःच्या अशा अवस्थेचं दुःखसुद्धा. आपल्या आयुष्यात हे असे क्षण कधीच येणार नाहीत. इतक भारी वाटत का प्रेमात पडल्यावरती तिने स्वतःलाच विचारलं. मन म्हणालं, ' Don't know आपल्याला नाही माहित आणि पुढे कधी तो आनंद मिळेल का हेही माहित नाही.' तिचे हे विचार सुरु असतानाच पटकन तिचं लक्ष समोर गेलं. समोरून विक्रम तडफदार आणि प्रचंड आत्मविश्वासाने चालत आत आला तश्या दोघीतिघींच्या नजरा त्याच्याकडे वळल्याचं तिच्या लक्षात आलं. दोन क्षण ती भान विसरून पाहतच राहिली त्याच्याकडे. 

" Hiii Glad to meet you " तो समोर येऊन उभा राहिला तशी ती भानावरती आली.

" Hii " ती चेअरमधून उठत म्हणाली.

"Please have sit " तो चेअर सरकवून बसत म्हणाला.

तिला त्याच्यासमोर आपण अगदीच काकूबाईच्या अवतारात आल्यासारख वाटलं. तिने ब्लॅक कलरचा कॉटनचा चुडीदार घातला होता. केस क्लिप लावून वरती टांगले होते साधारणतः घरात किंवा किचनमध्ये वावरताना मुली बांधतात तसेच केस वाटत होते ते. चेहर्‍याला मेकअप वगैरे करणं तर तिने सोडूनच दिलं होतं. सोबत आणलेली छोटीशी क्लच तिने टेबलवरती ठेवली होती. तिचे दोन्ही हात तिने टेबलवरती समोर ठेवले तस त्याच लक्ष तिच्या हाताच्या बोटांकडे गेलं. त्याच्या बुटांमुळे चिरडलेली तिची बोटं अजूनही सुजलेली होती. तो प्रसंग त्याला आठवला. त्याने आज पहिल्यांदा त्या घटनेनंतर तिचा चेहरा पाहिला. निस्तेज, कोमेजलेला, त्याने त्या रात्री हाताने मारलेल्याच्या खुणा अजूनही तिच्या गालावरती दिसत होत्या. डोळ्यांच्या कडेच्या बाजुला चेहर्‍यावर काळसर डाग पडले होते. गळ्यापाशी उठलेले व्रण तिच्या गळ्याभोवती पांघरलेल्या दुपट्यामुळे झाकले गेले होते. डोळे रडुन रडुन सुजले होते. ' काय हे! मलम तरी लावायचं ना!' तो मनातून म्हणाला. आपण इतके एखादीशी क्रूर, निर्दयी कस वागू शकलो असाही विचार मनात आला. शेवटी ती बोलत नाही म्हटल्यावरती त्यानेच बोलायला सुरुवात केली.

" Well, Do you prefer tea or coffee?" त्याने फॉर्मलीच बोलायला सुरुवात केली.

" अ No thanks " ती म्हणाली. त्याने डोळ्यांवरचे सनग्लासेस उतरवून तिच्याकडे निदान पाहून तरी बोलावं अस तिला वाटलं. त्यानंतर तो जे बोलला ते तिला अनपेक्षितच होतं.

" So Why did you call me ? काही बोलायचं होत का तुम्हाला? "  

" अ म्हणजे हो तुम्ही साहेबांच्या बोलण्याला हो म्हणालात अस कळलं मला आईबाबांकडून. तुम्हाला माहितीय ना सगळं. माझ्यावरती " तिला थांबवत तो म्हणाला,

" हो " पण तिच्या नजरेला नजर द्यायची त्याची हिम्मत होईना.

" तरी तुम्ही ! सर तुम्हाला माझ्यापेक्षाही कितीतरी चांगल्या मुली भेटतील. तुम्ही कश्याला इतक्या घाईत निर्णय घेताय. तुम्ही सगळ्याच बाबतीत माझ्यापेक्षा सरस आहात. मी एका साध्या घरातली मुलगी आहे आणि माझी स्वप्नही साधीशीच होती. हा आता त्यातलं काहिच नाही राहिलय ही गोष्ट वेगळी! आता तर सगळच संपलय. श्रीकांतचे घरचे म्हणाले ना तेच बरोबर आहे ओ माझ्यासारख्या मुलीसोबत लग्न करुन का कुणी माझ ओझं स्वतःवरती घ्यावं. कुणाच्या आयुष्यात आनंद भरायला आता माझ्याकडे काही नाही उरलेलं." तिच्या डोळ्यातून घळाघळा अश्रु वाहायला लागले. त्याचा हात खिश्यातल्या रुमालापाशी गेला तस मन म्हणालं,

' काय करतोयस? तुझ्या हाताने तिचे अश्रु पुसायला ती काही एवढी कमकुवत नाहीय. She's strong girl. या सगळ्याला तूच जबाबदार आहेस त्यामुळे उगीच आपण किती ग्रेट आहोत ते दाखवु नकोस.' या विचारासरशी त्याने स्वतःला सावरत टेबलवरचे टिश्यु पेपर्स तिच्यापुढे धरले.

"  हं, Please " तिने त्याच्याकडे पाहिलं. अत्यंत फॉर्मली त्याने समोर धरलेले ते टिश्यु बघून तिला वाईट वाटलं. तिने नो थँक्स म्हणत स्वतःच डोळे पुसले.

" मॅडम काहीही झालं तरी माझा होकारच असेल. You don't worry." म्हणत तो चेअरमधुन उठला आणि निघण्यासाठी वळला. त्याने पाठीवळुन बसलेल्या तिच्याकडे नजर टाकली. ती अजूनही त्याच विचारात बसली होती.

' अनघा, तू रडतेस काय अशी! मी खरतर कमकुवत माणूस आहे. त्या रात्री तूच जिंकलीस ग आणि मी हरलो. तुझं तुझ्या तत्वांवरती ठाम राहून माझ्यासमोर उभं राहणं म्हणजे माझी हार वाटली मला आणि त्याच अहंकाराने माझ्या हातून नको ते घडलं. त्या रात्री मी हरलोच आणि माझ्यामुळे भाऊसाहेबांचे संस्कारपण हरले!' या विचारातच तो तरातरा कॅफेमधुन बाहेर पडला.

क्रमशः

🎭 Series Post

View all