बंधन भाग 33

Love, Social Issues

भाग 33
( गेल्या भागात भाऊसाहेब अनघाच्या घरी जातात. त्यांना या घटनेविषयी तिच्या आईवडिलांकडून समजत.इकडे अरूंधती आणि समिहा न्यु इयर पार्टिचं प्लॅनिंग करतात पण विक्रम त्यात इंन्टरेस्ट दाखवत नाही. गेल्या भागाच्या शेवटी श्रीकांतची आई साखरपुड्याची खरेदी करण्यासाठी अनघाच्या आईला फोन करते पाहुया पुढे)

कुमुदने श्रीधररावांना श्रीकांतच्या आईने फोन केल्याचं सांगितलं. साखरपुड्याची तयारी आता वझेमंडळी करायला घेतील याची कल्पना त्यांनाही होतीच पण पुढे येणारी परिस्थिती कशी हाताळायची याविषयी त्यांनी विचार केला नव्हता. नव वर्ष त्यांच्या आणि त्यांच्या लेकीच्या आयुष्यात इतकी प्रश्नचिन्ह घेऊन उभं असेल याची त्यांनी कल्पनाच केली नव्हती. पण जे घडलं होतं ते कटु असलं तरी सत्य होतं  त्याच्यापासुन पळुन जाणं शक्य नव्हतं. गॅदरिंगच्या त्या रात्रीपासुन अनघा घरीच होती. जानेवारीचा पहिला आठवडाही हा हा म्हणता संपत आला. तिची दहा दिवसाची रजाही आता संपत आली होती. बाबांनी यावरुन तिच्याशी बोलायचं ठरवलं.
" बाबा या ना " ती हातातलं पुस्तक बाजुला ठेवत म्हणाली. वाचनात नाहीतर अभ्यासात गुरफटुन घेतल कि आजूबाजूला काय चाललय त्यातून मनाला थोडी विश्रांती म्हणून ती मन गुंतवण्याचा प्रयत्न करायची.
" काही नाही ग निर्मलाताईंचा फोन आलेला." बाबा बेडवरती तिच्यासमोर बसत म्हणाले. फारच थकलेले वाटले तिला ते.
" बाबा त्यांना हे सगळ माहितीय का?" तिने थेट विचारलं.
" नाही अजून नाही सांगितलंय त्यांना. श्रीकांतचे फोन आलेले मध्ये रियानेच रिसिव्ह करुन काहीतरी कारण सांगुन वेळ मारून नेली." ते म्हणाले.
" बाबा त्यांना सांगायला हवं उगीच त्यांची फसवणुक नको वाटायला त्यांना." ती डोक उशीला टेकवत छताकडे पाहत निर्विकार नजरेनं बोलली.
" हो ग बाळा मी भेटून येतो जयंतरावांना. बरं तु कॉलेजचं काय ठरवलयस? रजा वाढवून घेऊयात का भाऊंना सांगून." 
" नको बाबा मी जाणार आहे कॉलेजला कधीतरी जावच लागेल ना!" ती म्हणाली.
" ह तेही आहेच म्हणा बर आराम कर तू आता." बाबांनी तिच्या डोक्यावरून हात फिरवला आणि ते उठले. पहिल्यांदाच इतकं खचलेलं ती पाहत होती त्यांना. घरी राहून रडत बसण्यापेक्षा तिने कॉलेजला जायचं ठरवल.
.....................
रजा संपली आणि तिने कॉलेजला पुन्हा जायला सुरुवात केली. मात्र गेल्या दहा पंधरा दिवसात तिचं अख्ख आयुष्यचं उलटुन पालटुन गेलं होतं. तिने आईबाबा, रिया समोर कितीही स्वतःला खंबीर भासवुन पोलीस स्टेशनला तक्रारीसाठी जाणे, कॉलेजला जायला सुरु करणे असे खंबीरपणे निर्णय घेतले असले तरीही ती आतून पुरती उन्मळुन पडली होती. स्वतःच्याच शरिराची तिला भिती वाटायची. स्वतःचाच चेहरा आरश्यात पाहताना वाटणारा आनंद वाटेनासा झाला. साडी नेसल्यावर पुन्हा पुन्हा कॉलेजला निघण्याआधी आरश्यात स्वतःला निरखणं, हलकासा मेकअप करणं, कानांतल्या इयरिंग्ज पासुन ते साडीला लावायच्या पिनपर्यंत प्रत्येक गोष्टीकडे लक्ष देणं. कधीतरी स्वतःलाच आरश्यात पाहत स्माईल देणं, एखाद दुसरा सेल्फि काढणं किंवा रियाकडून  स्वतःचे फोटोज काढुन घेणं आणि ते फेसबुकला टाकणं सगळच आता नकोस वाटत होतं. स्वतःच्या शरिराला सजवण्याची नटवण्याची इच्छाच मरुन गेली होती. ड्रेसिंग टेबलवरचे मेकअप किट, वेगवेगळ्या शेडच्या लिपस्टिक, साडीला मॅचिंग नेलपेंन्ट्स च्या बॉटल्स, फेसपॉवडरचे डबे, कॉमपॅक्ट, त्वचा उन्हातून काळसर पडु नये म्हणून वापरायची मॉच्शरायझर हे सगळं उचलावं आणि बाहेर कचराकुंडीत फेकून द्यावस तिला वाटत होतं. चारजणांनी उगीच वळुन वळुन पाहायला कश्याला म्हणून तिने यातलं काहीच वापरायला नको अस ठरवलं. फक्त कडक इस्त्रीची सुती साडी, फुल स्लिव्हजचा पाठही झाकली जाईल असा ब्लाउज, हातात घड्याळ, क्लिप लावुन अंबाड्यासारखे वरती टांगलेले केस, पायात साध्याश्या चप्पल, खांद्याला पर्स अश्या वेशात तिने कॉलेजला जायला सुरुवात केली. निस्तेज चेहर्‍याची मरगळलेली अशी अनघा पाहुन कॉलेजमध्येही सगळे अवाक झाले. तिच्यातला हा बदल अगदी विद्यार्थ्यांच्याही लक्षात आला. प्राध्यापकांच्या नजरेतही बरेच प्रश्न असत पण आपल्याच सहकारी स्त्रीला तिच्या वैयक्तिक आयुष्याबद्दल विचारणं बर दिसत नाही म्हणून प्राध्यापकांनी तिला काही विचारण टाळलं. तरि काळेसरांनी कशी आहेस तब्येत खराब झाली काही टेन्शन आहे का म्हणून चौकशी केलीच पण तिने त्यांनाही ताकास तूर लागू दिलं नाही मात्र सोबतच्या प्राध्यापिकांनी तिला प्रश्न विचारायला सुरुवात केलीच मग काय उन्ह वाढलय म्हणून सुती कपडे, केस खराब होतात म्हणून असे बांधले तर कधी चेहर्‍यावरती 
मुरुमं उठली म्हणून म्हटल चेहर्‍याला काही लावूया नको इतपर्यंतची कारणं तिच्याकडे त्यांना सांगायला असायची आणि अश्या 'लॉजीकल रिझन्स ' मुळे तिच्यासोबत अस काही घडलय याचा कुणाला अंदाजही आला नाही. स्वतःला तिने अभ्यासात आणि कामात गुंतवून घेतलं. सकाळी वेळेत कॉलेजला जायचं आणि लेक्चर्स संपली की रिक्षाने घरी यायचं. घरीही ती एकटीच रूममध्ये बसुन रहायची. पहिल्यासारख फार बोलायची नाही. श्रीकांतसोबत इतके दिवस वाॅट्सअॅपवरुन रियाच अनघा म्हणून रिप्लाय द्यायची. ती काॅलेजला जायला लागली आणि रियाने तो जुना हँण्डसेट ज्यावरुन ती श्रीकांतशी बोलायची तो अनघाला देऊन टाकला. त्यामुळे त्याचे कॉल आले तर आता अनघा त्याच्याशी मोजकं बोलायची. त्यांच्या गप्पा म्हणजे कशी आहेस घरचे काय म्हणतायत अश्याच असायच्या. बस एवढच सद्या तिचं आयुष्य झालं होतं. त्यात ना कसली उमेद होती, उत्साह होता ना नव्या नात्यांची हुरहुर होती ना प्रेमाचे रंग होते. विक्रमने बर्‍याच दिवसानंतर कॉलेजमधुन बाहेर पडताना तिला पाहिलं. तो त्याच्या कारने घरी जायला निघाला होता. गाडी पार्किंग स्लोटमधुन बाहेर वळवताना सहजच त्याच गेटमधुन बाहेर पडणार्‍या तिच्याकडे लक्ष गेलं. काही दिवसांपुर्वीची ती आणि आताची या अवतारातली ती पाहताना त्याला मोठा बदल वाटला तिच्यात. ती त्याच्या डोळ्यांसमोरून सरकन चालत निघून गेली. तो ती दिसेनाशी होइपर्यंत पाहत राहिला.
..................
श्रीकांतच्या आईने फोन केल्यामुळे अनघाचे बाबा श्रीकांतच्या घरी त्यांना भेटायला गेले. हे नात पुढे जाण्याआधी जे वादळ येऊन गेलं होतं त्याची कल्पना श्रीकांतच्या घरच्यांना देणं महत्वाचं होतं. त्यांना अंधारात ठेवुन हे नात पुढे जाणं अनघालाही आवडलं नसतं.
" बोला श्रीधरराव तुम्ही एकटेच आलात! कुमुदताई आल्या असत्या तर अनघासाठी आम्ही केलेली खरेदी दाखवली असती त्यांना." जयंतराव म्हणाले.
" हो येणार होती ती पण राहिलं कामांमुळे म्हटलं आपण यावं भेटून." श्रीधर म्हणाले.
"हो बर झाल आलात ते  " श्रीकांतची आई म्हणाली.
" हो ना त्या दिवशी आम्ही तुमच्याकडे येऊन गेल्यापासुन आपल तस काही बोलणचं झाल नाही." जयंतरावांनीही श्रीकांतच्या आईच्या बोलण्याला दुजोरा दिला.
" बरं जयंतराव मला एका महत्वाच्या विषयावर बोलायचं होतं तुम्हा दोघांशी इन फॅक्ट श्रीकांतही भेटले असते तर." श्रीधर म्हणाले.
" अहो तो बाहेर गेलाय तुम्ही बोला ना काय म्हणताय अहो तुम्ही मानपानाचं नका हो टेन्शन घेऊ. सगळ आपण मिळून करु की." जयंतराव हसत बोलले तशी निर्मिलाताईंनीही होकारार्थी मान हलवली.
" नाही हो तुम्ही त्यावरून हटून बसणार नाही याची कल्पना आहे आम्हाला." श्रीधर म्हणाले.त्यांना कसा विषय काढावा तेच समजत नव्हतं.
" मग ओ बोला बोला जे काही असेल ते " जयंतराव त्यांना धीर देत बोलले.
" अ जयंतराव, वहिनी तुम्हाला लग्नाआधी ही गोष्ट माहित असणं खुप गरजेचं आहे. आमच्या अनुच्या आयुष्यात या आधी जे काही घडलय त्याने ती खचुन गेलीय हो. कस सांगु आता तुम्हाला." श्रीधर हातांच्या बोटांशी चाळवाचाळव करित म्हणाले.
" अहो श्रीधरराव तुमची अनु आम्हाला सुन म्हणून पसंद आहे. तिच्या आयुष्यात आधी काय मोठ किंवा छोट घडलय याच्याशी आम्हाला नाही घेणदेणं. या अश्या गोष्टींमध्ये पुरुषाचीच जास्त चुक असते पण समाज स्त्रीच्या माथी सगळा दोष मारून मोकळा होतो." जयंतराव समजुतदारपणे बोलले.
" हो ना पण सगळेच नाही ना समजुन घेत." श्रीधर म्हणाले.
" अहो असु द्या. आम्हाला किंवा श्रीकांतला काहीही प्रोब्लेम नाही. तुम्ही साखरपुड्याच्या तयारीला लागा बघु." 
" होय ओ जयंतराव थँक्यु सो मच. मोठं ओझं उतरलं आज माझ्या मनावरचं." त्यांचे आभार कोणत्या शब्दात मानावेत ते श्रीधरना समजत नव्हतं इतका त्यांना आनंद झाला होता.
" अहो आभार कसले त्यात तुमची इतकी सदगुणी आहे, हुशार आहे, सुंदर ही आहेच की मग अश्या गोष्टींना महत्त्व देऊन इतकं छान स्थळ नाकारायला आम्ही काय वेडे आहोत." जयंतराव हसत म्हणाले.
" बर आता आम्हीही लागतो तयारीला." त्यांचा निरोप घेऊन
निर्धास्त मनाने ही आनंदाची बातमी घेऊन ते घरी गेले.
..................
" अगं ऐकलस का कुमुद लवकर बाहेर ये." श्रीधरच्या मोठ्याने हाका मारण्याने कुमुद धावतच बाहेर हॉलमध्ये आली.
" का ओ काय झाल? काय म्हणाले श्रीकांतचे बाबा, निर्मिलाताई भेटल्या का आणि श्रीकांत." 
" अग हो हो मी सांगितलं त्यांना पण ती माणसं इतकी लाखमोलाची आहेत सांगू म्हणतात तिच्या आधीच्या आयुष्याशी आम्हाला देणघेणं नाही. बर मानपानाची पण काळजी करु नका म्हणालेत." श्रीधरचे डोळे आनंदाने चमकत होते.
" काय सांगता खरच हो खुपच मोठ्या मनाची माणसं म्हणायची." आई देवघरासमोर जाऊन हात जोडून उभी राहिली. कितीतरी दिवसांनी आज आनंदाची बातमी ऐकत होती ती. 
 " देवा माझ्या अनुला लढायला बळ दे. तिच्यावरती खरखुरं भरभरुन प्रेम करणार्‍या, तिला फुलासारखं जपणार्‍या माणसाची गरज आहे तिला आत्ता एवढ तरी निदान कर." कुमुद मनापासुन प्रार्थना करित होती.
" हो ग होईल ठिक सगळं." श्रीधर तिच्या हातांवर आश्वासकपणे थोपटत म्हणाले. 

क्रमशः
  श्रीकांतच्या घरचे तर या लग्नासाठी तयार झालेत. त्यामुळे तिचे बाबा खुश आहेत. एकाकी आणि खचलेल्या अनघाच्या आयुष्यात श्रीकांत हिच एक आशा आहे. पाहुया पुढच्या भागात श्रीकांतची साथ अनघाला मिळते का आणि त्यांची कहाणी प्रेमात रुपांतरीत होते का ते. 

🎭 Series Post

View all