बंधन भाग 30

Love, Social Issues

भाग 30

( गेल्या भागात बेशुद्ध अवस्थेत असलेल्या अनघाला तपासण्यासाठी डॉक्टर घरी येतात. काय घडलं असेल याची साधारणतः कल्पना डॉक्टर तिच्या आईबाबांना देतात. त्यांना धीर देतात. रात्री उशीरा राजेश त्याच्या घरी पोहचतो. सामंत सर त्याच्यावरती भडकतात पण त्यांना तो कोणतीच उत्तरं देत नाही. विक्रमलाही घरी पोचल्यावरती गंगाआत्या उलट सुलट प्रश्न विचारते. पण सारवासारव करीत तो उत्तरं देतो. थोड शांत झाल्यावर त्याला घडलेलं आठवुन स्वतःचा राग येतो पाहुया पुढे)

" आई, ताई " रिया बेडवरती पडलेल्या थोडीशी हालचाल करणार्‍या अनघाकडे पाहत आईला म्हणाली.आई बेडला टेकुनच फरशीवरती बसली होती. रिया आणि आई दोघीही रात्रभर तिला शुद्ध येण्याची वाट पाहत होत्या. पहाटे आईचा जरा डोळा लागला. रियाही बेडवरती अनघाच्या उश्याशी बसली होती. तिला जाग आली आणि तिने पाहिलं तर अनघाला हळुहळु जाग येत होती. रियाच्या आवाजाने आईही डोळे चोळत उठली.

" अनु बाळ बरं वाटतय का ?" आईने तिच्या कपाळावरती हात फिरवत विचारलं. तिने आईचा कपाळावरून फिरणारा हात आपल्या हातात गच्च पकडला आणि ती ढसाढसा रडु लागली. 

" ताई शांत हो डोळे मिटना थोडा वेळ " रिया तिचा हात हातात घेत म्हणाली. तिने आईला नजरेने खुण केली. आत्ता त्या तिथे थांबल्या तर ती बोलायला लागेल आणि शांत करणं कठीण होईल. त्यामुळे दोघींनी रुममधुन जायचं ठरवलं.

" अनु मी येते हा बाबा खाली थांबलेत हा" आई तिच्या हातावरती थोपटत म्हणाली. कुमुद बाहेर गेली तशी रियाही न बोलता आईच्या मागोमाग बाहेर पडली.

...................

तिथून हॉलमध्ये आल्यावर मात्र आईच्या अश्रुंचा बांध फुटला. 

" कुमुद तिच्यासमोर नको ना " श्रीधर तिला म्हणाले.

" आई मॅडमना कॉल करुन तिच्या  रजेचं पाहावं लागेल ना"

रियाने महत्त्वाचा मुद्दा काढला. हे कोणाच्या लक्षातच नव्हत आलं. तिला लगेच घराबाहेर पडण्याएवढ त्राणच नव्हतं. त्यात चेहर्‍यावरच्या खुणा, मानेवरचे व्रण काय काय सांगणार कुणी विचारलं तर. त्यांनी अजुन तरी कोणालाच याविषयी सांगितल नव्हतं निदान तिच्या कॉलेजमध्ये, शेजार्‍यांमध्ये हे आता कळायला नको होतं. अनेक सहानुभुतीचे फोन, आडुन आडुन चौकश्या हे सगळ झेलण्यासाठी अजुन त्यांची मानसिक तयारी नव्हती. शेवटी तिघांनी ती आजारी आहे अस कॉलेजमधून कुणीही फोन केला तरी सांगायचं ठरवलं. रियाने खंदारेमॅडमना फोन करुन ताई आजारी आहे त्यामुळे तिला दहाएक दिवस बेडरेस्ट सांगितली आहे असं सांगितलं. त्यावर मॅडमनीही काय झालं, काही सिरियस नाही ना, मी येउ का असे शंभर प्रश्न रियाला विचारले. सुचेल ते सांगून तिने वेळ मारून नेली. खंदारेमॅडमनी  दुसर्‍या दिवशी अनघाची रजा प्राचार्यांकडून मंजुर करुन घेतली आणि त्याप्रमाणे रियाला फोनही केला. त्यांना अनघासोबत बोलायचं होत पण ती झोपलीय अस सांगून तिने वेळ मारून नेली. मॅडमना मात्र वाटलच इतकी आजारी कशी पडली ही अचानक पण त्यांनी रियाला जास्त काही विचारणं टाळलं.

.............

विक्रम सकाळी उठला तोपर्यंत नऊ वाजत आले होते. त्याचं डोक गच्च झाल्यासारख त्याला वाटलं. आज नेहमीसारखं सकाळी लवकर उठुन आवरुन जिमलाही तो गेला नाही. जे काही घडलेल होतं त्याचेच विचार रात्रभर डोक्यात घोळत होते. अनघाचं रडणं- ओरडणं त्याच्या कानात घुमत होतं. तो तसाच फ्रेश होऊन खाली हॉलमध्ये आला. आज कॉलेजला सुटी आहे यामुळे त्याला बरं वाटलं कारण कॉलेजला जायची त्याची इच्छाच नव्हती आज. 

" या दादासाहेब आज जीमचा प्रोग्रॅम नाही वाटत तुमचा?" तो डायनिंगटेबलपाशी येताच नितू त्याची मस्करी करित म्हणाली.

" काहीपण नीतू , रात्री कॉलेजचा प्रोग्रॅम लेट संपला असेल हो ना रे ?" जितेंद्र प्लेटमधले पोहे चमच्याने घोळवत म्हणाला.

" अ हा हो " विक्रमने खाली नजर करित प्लेटमधला चमचा हातात घेतला.

" हो ना उशीरा आला रात्री " आत्या अरुंधतीच्या प्लेटमध्ये पोहे वाढत म्हणाली. 

" बर विक्रम, आज सुटी आहे कॉलेजला तर टेक रेस्ट की अस करतोस का माझ्या मैत्रीणीची बर्थडेपार्टी आहे येतोस का मला सोडायला?" अरुंधतीने विचारलं. तिथे समिहा येणार हे अरूंधतीला माहीत होतं त्यामुळे विक्रमला सोबत न्यायचा तिचा प्रयत्न होता.

" नाही नको You carry on " तो निरिच्छेने म्हणाला तसा अरुंधतीचा मुड अॉफ झाला.

विक्रमला नाश्ताही करावासा वाटेना. एक दोन घास खाल्ल्यानंतर बरं पुरे आत्या मला असं बोलून तो उठला.

" दाद्या तुझं लॉकेट कुठेय ?" नितूच्या या प्रश्नाने त्याने पटकन गळ्याला हात लावला तर लॉकेट नव्हतं.

" काय रे पडलं कि काय कुठे कि हरवलं?" जितेंद्रने त्याच्या चेहर्‍यावरचे भाव पाहत म्हटलं.

" न नाही बाथरुममध्ये असेल म्हणजे आहे " विक्रम बोलायच म्हणून बोलून गेला.

" हरवेल कसं भाऊसाहेबांनी खास बनवुन घेतलं होतं विक्रमच्या दहाव्या वाढदिवसाला आणि स्वतःच्या हाताने गळ्यात घातलं होतं."  अरुंधती म्हणाली.

" हो आणि साहेब म्हणाले होते, ' पोरा मोठ्ठा हो खुप पण मीपणाचा वारा अंगी लावू नकोस ' " आत्या अधुंकस हसत म्हणाली. आत्याच्या त्या वाक्याने त्याला धस्स झालं मनातून. 

तो तसाच तिथुन बाहेर पडला.

" का ओ आत्याबाई कुठे गेला हा?" अरुंधती घास तोंडात टाकत बोलली.

" कुणास ठाउक " आत्या म्हणाली. पण त्याच हे वागणं तिला विचित्र वाटलं.

...................

आई आणि रिया गेल्यानंतर ती जराशी उशीच्या आधाराने बेडला टेकून बसली. शांत स्तब्ध. तिच्या डोळ्यांतून अश्रु ओघळू लागले. त्या हुंदक्यांचा आवाजही आता बंद झाला होता. तिने तिची गच्च धरलेली मुठ अलगद उघडली. गोल्डन लॉकेट! ती एकटक त्या लॉकेटकडे पाहत राहिली. कोण होता तो आणि त्याचा आपल्या कॉलेजशी काय संबंध असेल? ती बंदिस्त खोली कुठली होती? कुणाच्या तरी सांगण्यावरुन नसेल ना त्याने हे अस केलं फक्त पैश्यासाठी म्हणून ? अनेक प्रश्न तिच्या डोक्यात येत होते ज्याचं आत्ता एकच उत्तर होतं काय माहित हेच. तिने जिकिरिने ते लॉकेट तिच्या अंगावर पडलं त्याक्षणीच हातात गच्च धरून ठेवलं. आता हाच काय तो एकमेव पुरावा होता.बाकी तर ती हॉस्टेलला गेली आणि तिथून बाहेर आल्यावरती तिला राजेश भेटला इतकच तिला आठवत होतं. नंतर ती अंगावर काटा आणणारी बंदिस्त अंधारी जागा आणि तो बाकी ती जागा कुठली आहे, कुठल्या रस्त्याला आहे काही काही तिला बेशुद्ध असल्याने आठवत नव्हतं.ती घरी कशी पोचली हेही तिला माहित नव्हतं आणि आईबाबांनीही तिला फार काही सांगितलं नाही. तिने ते लॉकेट उशीच्या खाली ठेवून दिलं आणि तिने पुन्हा डोळे मिटले.

.....................

विक्रमने गाडी थेट जुन्या गोडाऊनच्या रस्त्याला वळवली. रात्री भकास, निर्मनुष्य दिसणारा तो रस्ता आता सकाळी मात्र गजबजलेला आणि ताजातवाना दिसत होता. त्याने गाडी अरुंद रस्त्याने आत वळवली आणि अर्ध्या एक तासात तो त्यांच्या कारखान्याच्या त्या जुन्या गोडावूनपाशी पोहचला. काही वर्षांपुर्वी शेतमाल ठेवण्यासाठी त्या गोडावूनचा वापर होत होता मात्र आता कारखान्यापासुन कमी अंतरावर गोडावुन्स असली तर वाहतुकीला बर त्यातून ते शहरापासुन लांब अंतरावर होतच शिवाय रस्ताही कच्चा होता  म्हणून जितेंद्र कारखान्याचा चेअरमन झाल्यापासुन त्यानं हे गोडावुन बंदच ठेवलं होतं. कॉलेजला अनघाला गाठुन काही बोलण म्हणजे सगळीकडे बोंबाबोब त्यापेक्षा हा मार्ग बरा त्यातून गॅदरिंगच्या रात्री कॉलेजला तिला याव लागेल आणि सगळेच कॉलेजवरती असल्याने कोण कुठे आहे, कुठे जातय याकडे कोणाच लक्ष नसणार हा सगळा विचार करुन त्यांनी प्लॅन बनवला होता. विक्रमला राजेशसोबतच बोलणही आठवत होतं आपल्याला तिला काहीही करायच नाही अस आपणच त्याला बजावल होतं आणि आपण स्वतःच नको ती चूक केली असे विचार एकामागोमाग एक त्याच्या डोक्यात येत होते. गाडी गोडावुन दिसताच त्याने थांबवली आणि गाडीतून उतरुन कुणी आजुबाजुला नाही ना हे पाहत कुलुप उघडुन तो आत गेला. आता मात्र खिडकीतून, दारातून सकाळची किरणं आत डोकावत होती. त्याने इकडेतिकडे पहायला सुरुवात केली पण लॉकेट कुठेच दिसेना. त्याची नजर फरशीवरती पडली कोपर्‍यात तोच तो पाण्याचा फेकलेला ग्लास त्याला दिसला. एका कोपर्‍यात एक वेलबुट्टीची एब्रॉयडरी असणारा दुपट्टा पडला होता. दुपट्ट्याच्या काठाला चिकटवलेली लेस तुटली होती. त्याने ती ओढणी हातात घेतली आणि त्याला स्वतःच्याच वागण्याची किव करावीशी वाटली. तो उभा राहीला तर बुटाखाली काहीतरी लागलं त्याने वाकून पाहिल तर ते कानातले डुल होते. छान, नाजुकसे ते कानातले त्याची डिझाईनही आता खराब झाली होती आणि आता ते त्याच्या बुटांमुळे चिरडले  गेले आणि मोडले होते. लॉकेट शोधूनही सापडलं नाही पण हे सगळ बघून त्याला तिथून लांब पळून जावस वाटत होतं. तो तिथून बाहेर पडला त्या वस्तू तश्याच तिथे टाकून. भाऊसाहेबांच्या पवित्र हातांनी गळ्यात घातलेल ते लॉकेट अश्या घाणेरड्या प्रसंगात आपली कशी साथ देईल असा विचार त्याने गाडी स्टार्ट करताना केला.

................... 

दुसरीकडे कुठेही न जाता त्याने गाडी बंगल्याच्या दिशेने वळवली. बंगल्याच्या आत जाताना रस्त्याला एक गल्ली होती. तिथे एक मुलगा आणि मुलगी त्याला उभे दिसले. ती मुलगी बहुतेक त्या मुलावरती चिडली असावी आणि ती त्याला काही बोलू नकोस, मला तुझं काही ऐकायचं नाही असच काहीतरी चिडून बोलत असावी असं तिच्या एकदंरीतच हावभावावरुन त्याला वाटलं. तरी तो मुलगा ऐकत नव्हता त्याचं बोलण संपतच नव्हतं. त्याने गाडी थांबवली आणि पाठिमोरी उभी असणार्‍या त्या मुलीचा चेहरा त्याला दिसला तर ती चक्क निता होती! त्या मुलाने आता तर ती ऐकत नाही म्हटल्यावर मागून तिचा हात धरला. कोण हा मुलगा आणि नितूच्या मागोमाग का येतोय त्याला त्याचा राग आला.  त्याने डोळ्यांवरचा गॉगल बाजूला केला आणि कारचा दरवाजा उघडून तो ते दोघे उभे होते तिथे गेला. तो मुलगा बोलत होता इतक्यात त्याच्या खांद्यावर विक्रमने थाप मारली.

" ओ मिस्टर काय प्रोब्लेम काय आहे तुझा नक्की ?" विक्रमचा आवाज ऐकून नितू अवाक झाली. बापरे! हा कसा इथे आता काही खर नाही अविनाशचं! तिच्या मनात आलं. दादाचा नक्की गैरसमज झालाय पण त्याला काय सांगायच असा विचार करित नीतू हाताची नखं कूरतडत काय होतं ते आता बघायला लागली.

" ए तू कोण मला विचारणार आणि आमच्यात पडु नकोस उगीच!" अविनाशने धीराने शुरपणाचा आव आणित म्हटलं. अविनाश असा घाबरलेला बघून नितूला मजा वाटली आणि ती गप्प उभी राहून काय होतय ते बघू लागली.

" पडु नकोस काय रस्त्यावर मुलींचे हात धरतोस सांगते ना ती तिला नाही बोलायचय मग गुपचुप निघायचं इथुन " विक्रम चिडून बोलला.

" ए हिरो कोण रे तू ? तुझा काय संबंध मी काहीही करेन" ते वाक्य ऐकून विक्रमने अविनाशची कॉलरच धरली.

" What do you mean काहीही करेन. माझ्या बहिणीच्या केसाला जरी हात लावलास ना तर तुझे डोळे काढून तुझ्याच हातात देईन. पुन्हा दिस तू तिच्या आजूबाजुला मग तू आहेस आणि मी आहे." विक्रम चिडून बोलला आणि मघापासून मजा वाटणार्‍या नितूला मारामारी होईल दोघांची म्हणून भीती वाटली तशी ती धावत मध्ये पडली.

" दाद्या सोड सोड त्याला "

" तु नको मध्ये पडूस " तो म्हणाला.

 माझाच फ्रेंड आहे तो! तो मस्करी करित होता फक्त तुला वाटल तस काही नाही आणि I can take care of myself" नीतू अविनाशकडे पाहत विक्रमवरती ओरडली. तसं त्याने अविनाशची कॉलर सोडली आणि तडातडा तो तिथून घरी गेला.

" Thank God हा होय तुझा विक्रमदादा Dangerous आहे यार हा! जितेंद्र बरा मग " अविनाश शर्टची कॉलर ठिक करित म्हणाली.

" मग आहेच तो भारी! " ती हसत म्हणाली.

" हो गं बाई आणि बोलायला काय झालेलं गं मी ढगातच गेलो असतो आता." तो बोलला तशी ती फसकन हसली.

" ओके सॉरी चल निघूया आता." ती म्हणाली.

" हो ना चल तुझ्यासाठी अजुन काय बघाव लागणार " तो स्वतःशीच पुटपुटला तशी ती मागे वळून काय बडबडतोयस म्हणाली " नाही गं काही " असं बोलून तो तिच्या मागून चालू लागला.

 अविनाश तेरेदेसाई निताचा चांगला मित्र होता. साध्यासरळ स्वभावाचा अविनाश त्यालाही तिच्यासारखी समाजउपयोगी कामाची आस याच दुव्यामुळे नीताच्या एन.जीओ च्या कार्यक्रमात दोघांची ओळख झाली आणि मग मैत्री पण अविनाश नीताच्या धाडसी, बेडर स्वभावाच्या आपसुकच प्रेमात पडला पण हे त्याने अजून सांगितलेलं नव्हतं. 

मुलीला पटवण्यासाठी तिला भाऊ असेल तर त्याच्याशी आधी दोस्ती करावी हा फंडा त्यानेही वापरला आणि जितेंद्रशी ओळख नीतूकडूनच करून घेतली. जितेंद्रचा स्वभावही अविनाशसारखाच त्यामुळे दोघांची मैत्रीही झाली. त्याने जितेंद्रला त्याच्या मनातल बोलून दाखवलं होतं यावर जितेंद्रने त्याला गो अहेडचा सिग्नल दिला. त्याला माहित होतं अविनाश चांगला मुलगा आहे भाऊसाहेब विरोध नाही करणार! मम्माही ग्रीन सिग्नल देईल कारण अविनाशचे वडिल शहरातले मोठे बागायतदार होते. त्यांच्या शेतीतील फळ, फुलं परदेशात विक्रीला जायची आणि हा सगळा व्यवसाय वडिलांसोबत आता अविनाश सांभाळत होता. त्यामुळे अरूंधती विरोध करणार नाही हे जितेंद्रला पक्क ठाऊक होतं. फक्त त्याने विक्रम वा नीताला काहीच सांगितल नव्हत कारण तिच्याशी बोलायला अविनाशला थोडा वेळ हवा होता. एकदा तिचा होकार मिळाला कि सांगु असा त्याने विचार केला पण त्याआधीच अविनाशची आणि विक्रमची अशी भेट झाली.

क्रमशः

ज्या विक्रमने अनघाचं सगळ आयुष्य उलटुन टाकलं. तोच माणूस स्वतःच्या बहिणीसाठी मात्र इतका व्याकुळ झाला. याच्या अर्धाटक्का चांगुलपणा त्याने तिच्याबाबतीत दाखवला असता तर असो पाहुया पुढे काय काय होतय. Do Follow

🎭 Series Post

View all