बंधन भाग 3

Love, Social Issues


बंधन 3
( दुसर्‍या भागात आपण अनघाची मुलाखत पाहिली. सगळेच तिच्या उत्तरांवर इंमप्रेस झाले आता तिला 'गुरुकुल' मध्ये जॉब मिळतो का ते कळेलच पण त्याआधी गेल्या भागाच्या शेवटी आपण कॉलेजमधले शिपाई एकमेकांशी भाऊसाहेबांच्या केबीनबाहेर बोलत होते ते पाहिलं आणी तुम्हाला त्यावरुन काही प्रश्न पडले असतील पाहुया पुढे काय होतंय आणि आज कोणती पात्र आपल्याला भेटतायत.)

" Congratulations मॅडम !" खंदारे मॅडमचं अभिनंदन करित काळे सर म्हणाले.
" थँक्यु थँक्यु " मॅडम हसत म्हणाल्या. खंदारे मॅडम मॅनेजमेंन्ट विभागाच्या एच.ओ.डी. झाल्याची बातमी एव्हाना सगळ्या प्राध्यापकांपर्यंत पोहचली होती. त्यामुळे मॅडम दिसतील तिथे कुणीही प्राध्यापक कितीही घाईत असले तरी पाच मिनिटं थांबून त्यांचं अभिनंदन करत होते. आताही मॅडम लायब्ररीच्या दिशेने जिना चढत होत्या तर लायब्ररीतून खाली येणार्‍या काळेसरांनी त्यांना हाक मारली.
" मॅडम You deserve this " प्रो.काळे पुढे म्हणाले. आपल्यापेक्षा सिनिअर असणार्‍या एका प्रामाणिक व्यक्तीची एका विभागाच्या एच.ओ.डी. पदी नियुक्ती झाली याचा त्यांना आनंद झाला होता. आपलं काम चोख करायचं आणी योग्य व्यक्ती पुढे जात असेल तर त्याला सपोर्ट करायचा हा त्यांचा स्वभाव. त्यात त्यांना विशेष आनंद या गोष्टीचा झाला होता कि ' बॅचलर अॉफ मॅनेजमेंन्ट ' डिपार्टमेंन्टचे ' हेड अॉफ दि डिपार्टमेंन्ट प्रो.सामंत होते आणि त्यांना त्या जागेवरुन बाजूला करून भाऊसाहेबांनी खंदारे मॅडमची नियुक्ती केली होती. 
" मॅडम पार्टि पाहिजे हा " सर हसत त्यांची मस्करी करित म्हणाले.
" हो पण आधी मला या आनंदी धक्क्यातून सावरु तर द्या. मला खरंच कल्पना नव्हती आज भाऊसाहेब असा काहीतरी डिसिजन घेतील. सगळ्यांचे इंन्टरव्हियु संपल्यावर त्यांनी थांबवलं होतं आम्हाला आणि अचानक प्राचार्यांना सांगूनच टाकलं. मीही अवाक झाले पण प्राचार्यांना बहुतेक याची कल्पना असावी असं मला वाटलं." मॅडम खुलासा करित म्हणाल्या.
" ते काहीही असु द्या हो. एका स्वच्छ माणसाची नेमणूक झाली हे महत्वाचं." काळेसर बोलण्याच्या ओघात म्हणाले.
" म्हणजे !" सरांचं बोलणं न कळल्याने त्या म्हणाल्या.
" काही नाही ओ आपलं सहजच बरं इंटरव्हियु कसे झाले?" सरांनी विषय बदलला त्यावर मॅडम त्यांना सकाळच्या मुलाखतींविषयी सांगु लागल्या.
.....................
   भाऊसाहेब आपल्या केबिनमध्ये निवांत बसले होते. सकाळी मुलाखतींकरता आलेल्या उमेद्वारांची वैयक्तिक माहिती एका फाईलमध्ये होती. त्यात त्यांची नावे, फोटोज, पत्ते, पालकांची माहिती, छंद अशी सगळी मूलभूत माहिती ते नजरेखालून घालत होते. त्यांनी फाईल मिटुन टेबलवरती ठेवली. डोळ्यांवरचा चष्मा काढून टेबलवर ठेवला आणि ते खुर्चीवर मागे टेकले. त्यांनी बसल्या बसल्या सभोवार नजर फिरवली. त्यांच्या उजव्या बाजूला लाकडी कपाट होतं त्यात संस्थेशी संबंधित काही जुने दस्ताऐवज होते. संस्थेच्या प्रशंसेकरिता आलेली थोरामोठ्यांची पत्रं होती. पंधरा वर्षांपुर्वी 'गुरुकुल ' ची उभारणी भाऊसाहेबांनी केली. त्यावेळचे संस्थेच्या उद्गघाटनाचे फोटोज, संस्थेच्या वर्धापन दिनाचे फोटोज, कॉलेजच्या शिरपेचात तुरा खोवणारे अनेक प्रसंग आजवर या संस्थेच्या भिंतींनी पाहिले होते. कॉलेज दुमजलीवरुन सहा मजली बांधावं लागलं. विद्यार्थ्यांची संख्या वाढली शेवटी वसतिगृह सुद्धा बांधण्याची वेळ आली. या सगळ्याचं श्रेय भाऊसाहेब प्राध्यापकांना आणि इथल्या विद्यार्थ्यांना देत असतं. त्यांना जुने दिवस आठवले. भाऊसाहेबांचे वडिल श्रीपाद राजेशिर्के हे एक सेवाव्रती होते. स्वातंत्र्ययुद्धाच्या रणधुमाळीत अनेक आंदोलनांमध्ये त्यांनी लहान असताना सहभाग घेतला होता. अनेक नेत्यांची भाषणे ऐकण्यासाठी ते जात असत. त्याचा त्यांच्यावर प्रभाव पडला. त्यानंतर  संयुक्त महाराष्ट्र चळवळीतही त्यांनी सक्रिय सहभाग घेतला. आपण आपल्या गावासाठी काहीतरी केलं पाहिजे या भावनेतून त्यांना विद्यादानाची संकल्पना सुचली आणि पत्नी शारदा हिच्या मदतीने त्यांनी घराच्या एका खोलीतच छोटी शाळा सुरु केली. सुरुवातीला हे  कुणी फारसं मनावर घेतलं नाही मात्र हळूहळू मुलांची संख्या वाढू लागली. शेवटी भाडेतत्वावर घराजवळच एक छोटी जागा त्यांनी घेतली आणि शाळा सुरु झाली. महिन्याच्या पगारातले अर्धे पैसे शाळेसाठीच खर्च व्हायचे पण शारदाबाईंनी कधी नाराजी दाखवली नाही. त्या स्वतः मुलांंना शिकवण्याचं काम करित. म्हणून भाऊंच्या वडिलांनी श्रीपादरावांनी शाळेला शारदादेवी राजेशिर्के असं नाव दिल. हळूहळू सांगलीतल्या धनिकांची, राजकीय पुढार्‍यांची मदत मिळू लागली. आणि इ.पहिली ते चौथी पर्यंतची ती शाळा आज पहिली ते दहावी पर्यंत झाली. कै.शारदादेवी राजेशिर्के प्रशाला म्हणून दिमाखात ती उभी आहे.आई- वडिलांच्या निधनानंतर शाळेची घडी त्यांनी व्यवस्थित बसवली आणि लोकांच्या आग्रहाखातर भाऊसाहेब राजकारणात उतरले आणि दोनवेळा आमदार म्हणून निवडूनही आले पण पदासाठीचं राजकारण त्यांना कधीच रुचलं नाही. शेवटी राजकारणातून ते थोडे बाजूला झाले आणि पुन्हा घरातील विद्यादानाची परंपरा सुरु ठेवण्यासाठी ' गुरुकुल ' ची स्थापना पंधरा वर्षांपुर्वी केली. शारदादेवी प्रशाला, गुरुकुल सगळ्या कारभारासाठी त्यांनी उभारलेल्या 'राजेशिर्के ट्रस्ट' कडून मदत मिळायची. त्यासोबतच इतरही छोटीमोठी समाजकार्याची कामं व्हायची. जुन्या आठवणीत ते हरवले होते इतक्यात केबिनच्या दरवाज्यावर टकटक झाली. 
" हा या कोण आहे ?" म्हणताच खंदारे मॅडम दरवाजा ढकलून आत आल्या. 
" मॅडम तुम्ही ! या या बसा." भाऊसाहेबांच्या बोलण्यावर मॅडम समोरच्या खुर्चीत बसल्या आणि त्यांनी बोलायला सुरुवात केली," भाऊ, धन्यवाद तुमचे."
" कशाबद्दल एवढे धन्यवाद म्हणताय?" भाऊंनी विचारलं.
" तुम्ही मला आमच्या विभागाचं एच.ओ.डी. म्हणून नेमलंत."
" अहो त्यात आभार कसले! तसंही तुम्ही प्रा.सामंतांपेक्षा अनुभवाने आणि वयाने सिनिअर आहात.मी काही वेगळं केलं नाही." भाऊंनी त्यांच्या निर्णयाचा खुलासा केला.
" हो पण प्रो.सामंत " मॅडम पुढे काही बोलणार तोच भाऊसाहेबांना मॅडमना काय सांगायचंय ते लक्षात आलं.
" मला माहित आहे मॅडम, आपल्या कॉलेजात कोणीही सिनिओरिटी प्रमाणे पुढे जात नाही.गुणवत्ता आणि शिक्षण असेल तोच इथे मोठा असतो. सामंतसरांविषयी बोलायचं झालं तर ते एम.बी.ए. प्लस एम.सी.ए. आहेत. इथे जॉबला लागल्यानंतरही त्यांनी हल्लीच्या विद्यार्थ्यांकरता जे तुम्ही काय म्हणता 'ट्रेडिंग ' समजले जाणारे नवेनवे कोर्सही ते करत असतात. एकंदरितच परिस्थितीप्रमाणे नवीनवीन शिकण्याची त्यांची इच्छा असते.पण त्यांच्या या ज्ञानाचा विद्यार्थ्यांना पण उपयोग व्हायला हवा ना ! तुमच्या विभागाच्या मुलांकडून काही तक्रारी आल्यात माझ्या कानावर हा त्या डिपार्टमेंन्टच्या अॅक्टिव्हिटिजविषयी असल्या तरि मुलांच्या तक्रारी येणं चांगलं नव्हे."
" हो पण डायरेक्टर साहेब काय म्हणतील" मॅडम म्हणाल्या.
" मी पाहतो ते तुम्ही नका विचार करु आणि तसंही सामंतांनी एच.ओ.डी. म्हणून बरीच वर्ष काम केलंय आता तुम्ही करा. ते तुम्हाला सहकार्य करतील." भाऊ हसत म्हणाले तेव्हा मॅडमना बरं वाटलं. 
" बरं, पण थँक्यु पुन्हा एकदा बरं मी निघते. सकाळच्या मुलाखतींचा अहवाल प्राचार्यांना द्यायचा आहे." मॅडम म्हणाल्या. भाऊंनी हसत बरं म्हणून मान डोलावली आणि त्या बाहेर पडल्या.
..............................

" ए दिनेश इकडे ये जरा " समोरून येणार्‍या कार्ले मॅडमनी दिनेशला हाक मारली.
" येस मॅडम "
" हे बघ, ही सामंतसरांची दोन पुस्तकं आहेत मी प्रिंटआउट्स काढायला घेतली होती. त्यांची वैयक्तीक आहेत नाहीतर लायब्ररीत नेऊन देशील. सरांकडे दे." कार्ले मॅडमनी दोन जाडजूड पुस्तकं दिनेशच्या हातात ठेवली.
" बरं मॅडम " तो पुस्तकं हातात घेत म्हणाला.
" आठवणीने दे हा " मॅडम म्हणाल्या आणि पुढे गेल्या.
त्याने दोन्ही पुस्तकं हातात धरली नी चाचपडून पाहिली. इतक्यात त्याला बाहेर गार्डनच्या कोपर्‍यात शिवा दिसला. दिनेशने हाक मारली पण त्याला ऐकु गेली नाही. ह्याच्या हातातच हे सोपवावं म्हणजे चिंता नाही म्हणून तो गार्डनमध्ये आला. 
" ए शिवा काय करतोस "
" दिसत नाही झाडांना पाणी देतोय "
" होय पण तुझा चेहरा का सुकलेला !"दिनेश त्याची खेचत म्हणाला.
" मला काय धाड भरलीय !" शिवाने दुसर्‍या झाडापाशी पाईप नेत म्हटलं.
" नाही ना मग कार्ले मॅडमनी हि पुस्तकं दिलीत सामंतसरांना द्यायला. हि घे मला कंम्युटरलॅबला जायचंय बर्वेसरांनी बोलावलंय " म्हणत दिनेशने पुस्तकं पुढे केली.
शिवाने पाईप झाडांमध्ये सोडला आणि पुस्तकं हातात घेतली. 
" काय रे तुझे सामंतसर आहेत कुठे, सकाळपासुन दिसले नाहीत." दिनेशने विचारलं.
" मला काय म्हायत !" तो पुस्तकं हातात नीट धरत म्हणाला.
" नाही, खंदारे मॅडम एच.ओ.डी झाल्याचं कळलं कि नाही त्यांना !" दिनेशने विचारलं.
" तुला का नसत्या चौकश्या ? जा आता मी पोचवतो हे सरांकडे." शिवा रागाने म्हणाला तसा दिनेश हसत निघून गेला. त्याला सकाळपासुन हि बातमी सरांच्या कानावर घालायची होती. पण कसं सागांयचं ते त्याला कळत नव्हतं. तो आधीच घाबरट स्वभावाचा होता. तरि त्याने धीर करून सरांना आता फोन लावला.

क्रमशः

टिप - हे लेखन व याआधीचे सर्व लेखन कॉपीराईटकायद्याअंतर्गत सुरक्षीत आहे. नावासह शेअर करावे. कॉपीपेस्ट करणे वा निनावी शेअर करणे गुन्हा आहे. कृपया  या लेखनाचा स्वतः आनंद घ्याच, शेअरसुद्धा खूप करा पण लेखकांना लेखनाचे क्रेडिट द्या,नावांसह पोस्ट शेअर करा.

🎭 Series Post

View all