बंधन भाग 25

Love, Social Issues

भाग 25
( गेल्या भागात भाऊसाहेब उत्कृष्ट अध्यापक पुरस्कारासाठी अनघाची निवड करतात. त्यासोबतच तिला पहायला श्रीकांत येणार असल्याची बातमीही घरी तिला आईबाबांकडून मिळते. त्यामुळे ती खुश आहे. पण दुसरीकडे विक्रमला भाऊसाहेबांचं सतत अनघाचं कौतुक करणं खटकत. तिच्यामुळे झालेली पोलखोल तो विसरु शकत नाही. त्यामुळे राजेशच्या मदतीने अनघाने माफी मागावी म्हणून तो एक प्लॅन तयार करतोय पाहूया पुढे)

रविवार सकाळ पासुनच कुमुद आणि श्रीधरची लगबग सुरु झाली. कुमुदने पटकन थोडी साफसफाई केली. नाश्ताही सगळ्यांनी पटकन आटोपला. श्रीकांत आणि त्याचे आईबाबा येणार म्हणून कुमुदने त्यांच्या पाहुणचारासाठीही काहीतरी बनवाव म्हणून थालीपिठ करायला घेतली. रिया तर श्रीकांतला भेटून त्याची मस्करी करण्यासाठी खुप एक्साइट झाली होती. तिच्याही अॉफिसला सुट्टी पण अंथरुणावर लोळत न पडता तिनेही तिचं सगळ पटकन आवरलं आणि अनघाला मदत करायला तयार झाली. साड्या नेसण्याची तिला कॉलेजला जाण्यामुळे सवय झाली होती. रियाची आंघोळ होण्याआधी अनघा साडी नेसून तयार होती मग रियाने तिला ज्वेलरी, मेकअप यासाठी मदत केली. तोपर्यंत आई खालून त्यांच्या रुममध्ये आली आणि श्रीकांत आल्याचं तिने त्यांना सांगितलं.अनघाला अशी छान तयार झालेली पाहून तिला एकदम भरुन आलं जणू काय आजच ती लग्न करुन जाणार आहे इतकी आई तिच्याकडे पाहून भावूक झाली. अनघाने आईला नमस्कार केला आणि तिघीजणी रूममधून जिन्याने खाली आल्या.
" बघा आली आमची अनघा " श्रीधर हॉलमध्ये पाहुण्यांसोबत बोलत होते. कुमुद आणि मुली खाली आलेल्या पाहून लगेच त्यांनी असं म्हटलं आणि श्रीधरसमोर च्या सोफ्यावर बसलेल्या श्रीकांत आणि त्याच्या आईबाबांचं लक्ष पटकन तिच्याकडे गेलं. 
व्यवस्थित इन केलेला अॉफ व्हाईट रंगांचा शर्ट, जिन्सचीपँन्ट , पायात बूट पाहता क्षणी कोणाच्याही लक्षात आलं असत मुलगा प्राध्यापक आहे. थोडासा गव्हाळ वर्ण, अनघा इतकीच जवळपास उंची आणि प्रसन्न चेहरा असा श्रीकांत. अनघा पुढे आली तसा तो तिच्याकडे पाहतच राहिला. चॉकलेटी कलरची साडी, हातात तश्याच कलरच्या बांगड्या, चॉकलेटी कलरची नेलपेंन्ट, गळ्याभोवती नाजूकसा नेकलेस, त्याचप्रमाणे कानातले, मोकळे सोडलेले केस, हलकासा मेकअप त्यातही कपाळावर चंदेरी कलरची छोटीशी टिकली, डोळ्यांतल काजळ आणि अगदी हलक्या हाताने ओठांना लावलेली लिपस्टिक तो तसाच तिच्याकडे एकटक पाहत राहिला. तो काहीच बोलत नाही हे पाहून त्याच्या आईबाबांनी एकमेकांना नजरेने खूणा केल्या.आता एकुलत्या एका लेकाला मुलगी पसंद असेल तर आपण काय बोला म्हणून तेही गप्प राहिले. श्रीकांतचं असं तिच्याकडे पाहणं तिच्या लक्षात आलं तशी ती पुढे आली आणि वाकून तिने त्याच्या आईबाबांना नमस्कार केला तसे तिचे मोकळे केस वाकताच दोन्ही खांद्यावरती पुढे आले. 
" आयुष्यमान भव " श्रीकांतचे आईबाबा एका सुरात म्हणाले. मग ती बाबांच्या शेजारी येऊन बसली. आई आणि रियाने पाण्याचे ग्लासेस तोपर्यंत ट्रेमधून आणले होते आणि त्याचे आईबाबा काय बोलतायत ते ऐकण्यासाठी त्याही दोघी अनघाच्या बाबांशेजारी उभ्या राहिल्या.
" आमचा श्रीकांत आपल्याच शहरातल्या कॉलेजला आहे प्रोफेसर ह्यालाही ह्याच्याच क्षेत्रातली जोडीदार हवी होती. आम्ही नावनोंदणी केली आणि वंदनाताईंनी तुमचं स्थळ सुचवलं." श्रीकांतची आई म्हणाली.
" हो ना निर्मलाताई आम्हाला पण वंदनाताईंनी खूप मदत केली म्हणून तर आपली भेट होऊ शकली." कुमुद आनंदाने बोलली.
" बरं पण अजून एक सांगायचं म्हणजे अनघाने खूप मेहनतीने 'गुरुकूल ' मधला जॉब मिळवलाय. तिचं स्वप्नच होतं ते त्यामुळे तिला लग्नानंतर नोकरी " श्रीधररावांचं हे बोलण ऐकून त्यांना मध्येच थांबवत त्याचे वडिल म्हणाले.
" अहो असु दे की लग्नानंतर एवढी शिकलेली पोरगी घरी बसवून ठेवायची होय तिला इच्छा आहे मग करु दे ना जॉब" त्यांच्या या बोलण्याने तिच्या आईबाबांनाही धीर आला.
" बरं बाकी बोलू आपण तोपर्यंत यांना बोलू दे का?" अनघाची आई बोलली. त्याबरोबर श्रीकांतच्या आईनेही हो म्हटलं. कुमूदने रियाचा हात ओढून तिला इथेच थांबायला सांगितलं. अनघा आणि श्रीकांत उठले आणि बाहेर गार्डनमध्ये आले.
...................
श्रीकांत - "हुश्श सुटलो बुवा एकदाचे " बाहेर आल्यानंतर सभोवार नजर फिरवीत श्रीकांत म्हणाला यावर ती हसली.
अनघा - " का ? एवढंही काही बोअरिंग नाही बोलत ते !" ती म्हणाली.
श्रीकांत - " असेल पण आपल्याला बोलायला चान्सच नाही दिला " तो हसत म्हणाला.
अनघा - " हो ना त्यांनी तर तयारीच सुरु केली "
श्रीकांत - " मग करु देत ना तयारी " तो तिच्या नजरेत पाहत म्हणाला.
अनघा - " हे सांगणं आहे का विचारणं " ती पुन्हा हसली.
श्रीकांत - " विचारणं समज मग चालेल ना !" त्याने पुन्हा विचारलं तसं तिने लाजत होकारार्थी मान डोलावली.
श्रीकांत - " बाकी तुमचं कॉलेज काय म्हणतं "
अनघा - " मस्त आहे " 
श्रीकांत - " विक्रम साहेब आहेत ना सद्या एम.डी. स्ट्रीक्ट आहेत ना ते!" 
अनघा - " नाही, म्हणजे कामाच्या बाबतीत हो "
श्रीकांत - "हं मागे आमच्या कॉलेजला प्रोग्रामला आले होते साडेदहाचा प्रोग्राम दहापन्नासला सुरु झाला म्हणून ते चिडलेले प्राचार्यांनी कशीबशी समजूत घातली." तो बोलत होता. दोघे चालत चालत गार्डन पाहत पुढून मागच्या दारी आले. अनघाच्या आईने किचनच्या खिडकीतून दोघांना बोलताना पाहिलं. किती छान दिसतात एकत्र दोघे असा विचार करित पाहुण्यांना देण्यासाठी फ्रिजमधून मिठाई बाहेर काढली. इतक्यात अनघाचा आवाज आला. ते दोघे गार्डनमधल्या एका झाडापाशी खाली वाकून काहीतरी पाहत असल्यासारख तिला दिसलं.
" अनु काय झालं गं ?" आईने मोठ्याने किचनमधून विचारलं.
" आई बघ ना चिमणीचं घरटं होतं या झाडावर आणि त्यात छोटस पिल्लू होतं ते खाली पडलं." तिच्या आवाजात व्याकुळता होती. श्रीकांतने खिश्यातून रूमाल काढला आणि तिने अलगद त्या पिल्लाला त्यावर ठेवल. थोडीशी धुगधुगी होती ती संपली आणि त्याने प्राण सोडला.
" अनघा It' ok आपण त्याला या झाडाखालीच छोट्याश्या खड्य्यात पुरूयात " त्याची संवेदनशीलता पाहून तिला बरं वाटलं. आई हे सगळ खिडकीतून पाहतच होती. एवढ्या शुभ प्रसंगी अस कस झालं! तिला खूप विचित्र वाटलं बिच्चारा छोटासा जीव तिने मनातून विचार केला आणि मघाचा प्रसंग विसरायचा प्रयत्न करुन मिठाई प्लेटमध्ये काढायला घेतली.
..........,,,,,,.........
रविवारचा अनघाच्या घरचा कार्यक्रम छान पार पडला. श्रीकांतच्या आईबाबांना अनघा पसंद पडली. श्रीकांतला आईबाबांना ती आवडली हे केव्हाच लक्षात आलं होतं त्यामुळे तो खूश होता. त्यांनी साखरपुड्याचा मुहुर्त भटजींना विचारून काढतो असं सांगितलं होतं त्यामुळे आता कुमुद आणि श्रीधर लेकीच्या साखरपुड्याची स्वप्न रंगवत होते. वझेंनी सांगितल्याप्रमाणे चार पाच दिवसात गुरुजींशी बोलून त्यांनी साखरपुड्याची तारीख ठरवली.  सध्या डिसेंबर सुरु होता शेवटच्या आठवड्यात अनघाच्या कॉलेजचं स्नेहसंमेलन त्यामुळे  ती बिझी असणार होती.तसही नववर्ष होतच नव्या नात्याची नव्या वर्षात सुरुवात म्हणून जानेवारीच्या वीस तारखेचा मुहूर्त साखरपुड्यासाठी ठरला. जो सगळ्यांनाच पसंदीस पडला. अनघाने जवळच्या लोकांना साखरपुड्यासाठी निमंत्रण द्यायला सुरुवात केली. भाऊसाहेबांनाही निमंत्रण द्याव म्हणून कॉलेजच्या पारितोषिक वितरण समारंभाच्या आधी दोन दिवस एका संध्याकाळी ती भाऊसाहेबांना भेटायला राजेशिर्केंच्या घरी गेली.
....................
संध्याकाळी साडे सहा सातची वेळ. अंधाराचं जाळं आभाळात हळुहळु पसरु लागलं होतं. गंगाआत्या तबकातून पणत्या घेऊन बाहेर तुळशीपाशी आली. तिने तुळशीवृंदावनाच्या चौथर्‍यावरती एकेक पणती ठेवायला सुरुवात केली. इतक्यात तिच्या शेजारी कुणीतरी उभं असल्याची तिला चाहूल लागली. ती मुलगी हात जोडून डोळे मिटून तुळशीवृंदावनाला नमस्कार करित उभी होती.आत्याचं तिच्याकडे लक्ष गेला. त्या पणत्यांच्या उजेडात तिचा चेहरा तेजस्वी दिसत होता.
" कोण गं तू ?" आत्याने विचारलं तशी अनघा भानावरती आली.
" मी अनघा कारखानीस कॉलेजमध्ये शिकवते. भाऊसाहेबांना भेटता येईल का?" तिने नाव सांगताच आत्यांना भाऊसाहेबांनी मागे एकदा तिचं केलेलं कौतुक आठवलं आणि आत्या तिच्याकडे पाहत राहिली. तिने फिकट पिवळ्या रंगाचा चुडीदार ड्रेस घातला होता त्यामुळे कॉलेजमध्ये जाणार्‍या मुलींसारखी ती दिसत होती. प्रथमदर्शनी ती प्रोफेसर आहे असं आत्याला वाटलंही नाही.
" हो आहेत ये ना " ती तिला घेऊन हॉलमध्ये आली आणि तिने भाऊसाहेबांची स्टडीरुम तिला बोटाने निर्देश करित दाखवली.
" थँक्यु " ती म्हणाली
" पाणी हवय " आत्याने आठवणीने विचारलं.
" नको नको मी भेटते त्यांना " एवढ बोलून ती भाऊसाहेब बसले होते त्या खोलीच्या दिशेने गेली.
" साहेब " या हाकेसरशी त्यांनी पुस्तकातून नजर वरती केली.
" अरे अनघा ये ये. इकडे कशी वाट चुकली आज!" ते चेष्टा करित म्हणाले. तिने साखरपुड्याची निमंत्रण पत्रिका त्यांच्या हाती ठेवली.
" पाहा " ती हसतच म्हणाली.
" वा वा! ठरली का एन्गॅजमेंन्ट येणार नक्की " ते निमंत्रणपत्रिका पाहु लागले." वा! जावईबापू पण प्राध्यापक छान छान. " तिने वाकून त्यांना नमस्कार केला.
" आयुष्यमान भव. अशीच हसत रहा " भाऊसाहेब म्हणाले त्यावर थँक्यु म्हणत तिने मान डोलावली.
..........,,............
भाऊसाहेबांना निमंत्रणपत्रिका देऊन ती बंगल्याबाहेर आली आणि स्कुटी स्टार्ट केली. तेवढ्यात वरती रुमच्या बाल्कनीमधून विक्रमची नजर खाली पडली आणि अनघाला पाहून त्याला आश्चर्य वाटलं. ' ही काय करते इथे! छे! या मुलीला भाऊसाहेबांचे कान भरल्याशिवाय चैनच पडत नाही वाटतं पण आता बास झालं मिस अनघा कारखानीस खूप नुकसान केलय तुम्ही माझं. तुझ्यामुळे भाऊसाहेबांच्या नजरेत माझ्याबद्दल मी प्रश्नचिन्ह पाहिलय आता बघ मी काय करतो ते ' मनातल्या मनात तो विचार करित होता आणि या सगळ्याची पुसटशी कल्पना नसलेली ती स्कुटी स्टार्ट करुन निघून गेली.

क्रमशः

🎭 Series Post

View all