बंधन भाग 24

Love, Social Issues

भाग 24
( गेल्या भागात अनघाचे आईबाबा तिचं नाव ठरल्याप्रमाणे वधुवरसूचक मंडळात नोंदवतात. मुलगा आपल्याच शहरातील असावा आणि अनघाला लग्नानंतर नोकरी सोडायला लागू नये या त्यांच्या अटींमुळे काही स्थळांना ते नकार देतात. पण महिन्याभरातच त्यांना पाहिजे तसा मुलगा भेटतो. फोटो पाहताक्षणी श्रीकांत अनघासहीत तिच्या आईबाबांनाही आवडतो. पाहूया आजच्या भागात ही लग्नाची बोलणी पुढे कुठवर जातायत.)

कॉलेजमध्ये डिसेंबरच्या अखेरीस होणार्‍या वार्षिक स्नेहसंमेलनाची तयारी सुरु झाली.असायमेंन्ट्स, सबमिशन च्या ओझ्याने कंटाळलेली मुलं कॉलेजमध्ये कार्यक्रम असले की उत्साहाने पुढे असायची. लायब्ररी,लॅब इथे बसुन शांतपणे अभ्यास करणारी मुलं हिच का असा प्रश्न पडावा इतपत विद्यार्थ्यांचा कल्ला सुरु व्हायचा. सांस्कृतिक विभाग पाहणार्‍या प्राध्यापकांना तर मुलं स्वस्थ बसुच द्यायची नाहीत. कुणाला ग्रुपने परफॉर्म करायच असायचं तर कुणी सोलो परफॉर्मन्स करणारं त्या सगळ्यांना कार्यक्रमाचे नियम सांगा, त्यांची सादरीकरणं पाहून त्यात निवड करा, बरं निवड झालेल्या विद्यार्थ्यांच्या वेगळ्याच समस्या वाद्यवृंद, परफॉर्मन्ससाठीचे कपडे एक ना अनेक शंका घेऊन मुलं सांस्कृतिक विभागाकडे धावायची. विद्यार्थ्यांची अशी तयारी सुरु असताना भाऊसाहेबांनी दरवर्षीप्रमाणे सर्वोत्कृष्ट अध्यापनाचा पुरस्कार कोणाला द्यायचा याविषयी चर्चा करण्यासाठी एक मिटिंग बोलावली.स्नेहसंमेलनाची तयारी कशी चाललीय त्याचा पहिल्यांदा आढावा घेतला आणि मग हा विषय काढला,
" तर दरवर्षीप्रमाणे आपल्याला यंदा कॉलेजमधील एका प्राध्यापकांना हा पुरस्कार द्यायचा आहे. तुम्हाला काही नावं सुचवायची आहेत का?" भाऊसाहेब म्हणाले.
" गेल्या वर्षी काळेसरांना मिळाला होता.यंदा कोणाला ?" प्राचार्य निंबाळकर सरांकडे पाहत म्हणाले.
" अजून बरीचजण आहेत पण असं एकाच नाव पटकन नाही घेता येत" निंबाळकर सर म्हणाले.
" तुम्हाला काय वाटत विक्रम ?" बराच वेळ गप्प असलेल्या विक्रमला भाऊसाहेबांनी विचारलं.
" मला वाटतं निकम सरांचा विचार करायला काय हरकत आहे!"  निकमसर कंप्युटर सायन्स चा विभाग व्यवस्थित सांभाळतात ते सगळ्यांनाच माहित होतं शिवाय ते सिनिअरही होते.
" हं छान नाव सुचवलत " साहेब विक्रमला म्हणाले त्यावर तो थँक्यु बोलण्याआधी त्यांनी पुढे बोलायला सुरुवात केली.
" पण माझ्या मते आपण नव्या प्राध्यापकांचाही विचार करायला हवा. सिनिअर प्राध्यापकांचं कौतुक आपण नेहमीच करतो शिवाय कॉलेजबाहेरही सेमिनार, कार्यक्रमांसाठी ते जात असतात पण नव्यांपैकी कोणाला हा पुरस्कार मिळाला तर हुरुप येईल त्यांना काम करायला शिवाय आपल्या कॉलेजमध्ये आपण सिनिओरिटी प्रमाणे गोष्टी ठरवत नाही गुणवत्तेला प्राधान्य असतं. निकम सरांना देऊ कि आपण नंतर " भाऊसाहेब बोलले आणि विक्रमनेही मान डोलावली.
" मला वाटत आपण कारखानीस मॅडमना द्यावा हा पुरस्कार." आणि त्यांचे हे शब्द ऐकून विक्रमला मनातून जूनच्या अॅडमिशन्सची आठवण झाली.
" भलेही ती नवीन आहे इथे पण जूनमध्ये तिने जे काम केलं ते खरच उत्तम होतं. फक्त शिकवणं आणि घरी जाणं एवढच शिक्षकाचं काम नसतं तर मुलांची काळजी घेणं त्यांच्या कष्टाला न्याय देणं, त्यांच्या स्वप्नांना जपणं हेही काम असतं. अनघामुळे कितीतरी विद्यार्थ्यांचं नुकसान टळलंय त्यामुळे तिचं कौतुक व्हायला हवं." भाऊचं हे बोलणं करंबेळकर आणि निंबाळकर सरांनाही पटलं. मग विक्रमलाही नाईलाजाने हो म्हणावं लागलं आणि तो पुरस्कार अनघाला देण्यावरती शिक्कामोर्तब झालं.
.....................
प्राचार्यांनी खंदारे मॅडमच्या कानावर ही गोष्ट घातली. सर्वोत्कृष्ट अध्यापनाच्या पुरस्कारासाठी अनघाच्या नावाचा विचार भाऊसाहेबांनी केला हे ऐकल्यानंतर त्यादेखील खूश झाल्या. ही गुड न्युज त्यांनी लगेचच अनघाला सांगितली. ते ऐकुन तिला हात आभाळाला टेकल्यासारखे वाटले. आपल्या प्रामाणिकपणाचं कॉलेजकडून इतकं कौतुक होतय हे पाहून तिला बर वाटलं. तिने मॅडमचे खूप आभार मानले. कधी एकदा ही बातमी आईबाबांना सांगते असं तिला वाटलं.
...................
अनघा दुपारी घरी आली ती धावतच पटकन रिक्षा ड्रायव्हरला तिने हातात आधीचे काढून ठेवलेले पैसे दिले आणि दुसर्‍या हातातील पर्स सावरत ती धावत आत किचन मध्ये आली आणि आईला बिलगली.
" अगं हो हो काय झालय उड्या मारायला?" तिचा मस्त मूड पाहून आईने विचारलं.
" माहितीय आज कॉलेजला काय झालं."
" घ्या आता तू सांगितल्याशिवाय कस कळणार आम्हाला !" आई बेसिनचा नळ सुरु करित म्हणाली.
" हा तेच सांगतेय ना! यावर्षीच्या उत्कृष्ट अध्यापक पुरस्कारासाठी कॉलेजने माझी निवड केली." 
" काय सांगतेस अभिनंदन " आई मागे वळुन तिचे हात हातात घेत म्हणाली. इतक्यात श्रीधरही अनघाचा किचनमधला आवाज ऐकून तिथं आले.
" ऐका ना अनुला बेस्ट टिचर चा पुरस्कार मिळाला " कुमुद श्रीधरना म्हणाली.
" अरे वा! कॉंग्रॅटस अनु " बाबांनीही पुढे येत तिचं अभिनंदन केलं.
" आमच्याकडेही तुझ्यासाठी एक गुड न्युज आहे म्हटलं." आई लगेच म्हणाली.
" काय गं सांग ना!"  उत्सुकतेनं तिने आईकडे पाहत म्हटलं.
" येत्या रविवारी श्रीकांत आणि त्याचे घरचे येणार आहेत तुला भेटायला " बाबा म्हणाले.
" काय रविवारी एवढ्या लवकर !" ती आश्चर्याने बोलली.
" फक्त भेटायलाच येतात बघ भेटून तरी घे." आई म्हणाली त् तिलाही त्याला भेटण्याची इच्छा होतीच त्यामुळे तीही फार आढेवेढे न घेता तयार झाली.
.........,,,,,,,...........
विक्रमला हे  भाऊसाहेबांनी अनघाची पुरस्कारासाठी शिफारस करणं अजिबात पटलेलं नव्हतं. अनघाच्या हुशारीमुळे जर भाऊसाहेबांनी अजुन अॅडमिशन्सच्या प्रकरणात लक्ष घातलं असतं तर कॉलेजच्या इंन्टिरव्हियुजमध्ये नव्या उमेदवारांकडे नोकरीसाठी पैश्याची मागणी केली जाते हे प्रकरणही उघडकीस आल असतं. सामंतसरांवर आधीच भाऊसाहेब खूश नव्हते आणि त्यातून यातही त्यांचा हात आहे हे समजल असतं तर त्यांची खैर नव्हती. तो चांगलाच पेचात पडला असता पण ते प्रकरण त्याने कसबस निभावून नेलं होतं पण भाऊसाहेब तिचं अस कौतुक करित बसले तर ही मुलगी या प्रकरणाचा शोध घेईल आणि आपल्यापर्यंतही पोहचु शकेल याची धास्ती होती. हे सगळे विचार सुरु असतानाच त्याच्या डोक्यात एक प्लॅन तयार होत होता. त्याने रात्री राजेशला फोन केला.
राजेश - " हा बोल रे विक्रम "
विक्रम - " ती अनघा यार दिवसेंदिवस डोईजड होत चाललीय ती!" तो वैतागून म्हणाला.
राजेश - " का ? आता काय केलं तिने ?" राजेशने पटकन विचारलं.
विक्रम - " बेस्ट टिचर अॅवॉर्डसाठी भाऊसाहेबांनी निवड केलीय मॅडमची. बेस्ट टिचर काय तर म्हणे कर्तव्यदक्ष My foot " तो चिडून बोलत होता.
राजेश - " Ok Ok Cool Down पण विक्रम ही मुलगी अशीच उडत राहिली ना तर कठीण होऊन बसेल सगळच" तो कळकळीने बोलला.
विक्रम- " हं नाही, तिचे पंख कसे कापायचे ते बघतो मी. नाही तिला माफी मागायला लावली तर बघ. ओके ऐक मी जे सांगतोय ते लक्षात ठेव बाकी प्लॅन नंतर सांगेन." असं बोलून त्याने त्याचा प्लॅन राजेशला सांगायला सुरुवात केली. सगळा प्लॅन ऐकल्यानंतर राजेश कुत्सितपणे हसत ओके डन    म्हणाला आणि विक्रमने त्याला थँक्स म्हणत फोन ठेवून दिला.
क्रमशः

🎭 Series Post

View all