बंधन भाग 20

Love,Social Issues

भाग 20
( गेल्या भागात खंदारे मॅडम अनघाला काळजी नको करु असं सांगतात आणि हि मुलांच्या अचानक फीवाढीची गोष्ट पहिल्यांदा प्राचार्यांच्या कानावर घालतात.प्राचार्यांनाही हा धक्का असतो या सगळ्याचं गांभीर्य लक्षात घेउन प्राचार्य भाऊसाहेबांना फोन करतात. भाऊसाहेबांना खूप वाईट वाटतं ते कॉलेजला येतात आणि स्वतः सगळे रेकॉर्ड चेक करायला अॉफिसमधुन मागवून घेतात. सामंतसरांना कॉलेजमध्ये भाऊसाहेबांचं येण ठिक वाटत नाही ते लगेच फोन करुन विक्रमला कॉलेजला पोहचायला सांगतात.)

भाऊसाहेबांनी सांगितल्याप्रमाणे अॉफिसमधुन त्यांना हवे ते सर्व रेकॉर्ड असणार्‍या फाईल्स केबिनमध्ये पाठविण्यात आल्या. प्राचार्यांनी स्वतः भाऊसाहेबांना एकेक फाईल उघडुन दाखवायला सुरुवात केली. कॉलेज सुरु होऊन अजुन आठवडाही झाला नव्हता. द्वितीय आणि तृतीय वर्षाच्या विद्यार्थ्यांच्या प्रवेशप्रक्रिया पुढच्या आठवड्यात संपणार होत्या. त्यांनी पहिल्यांदा डिपार्टमेंन्ट प्रमाणे प्रत्येक विभागात दुसर्‍या व तिसर्‍या वर्षाला किती विद्यार्थी आहेत त्यातील उत्तीर्ण झालेले किती आहेत हे आधी पाहून घेतलं. प्रत्येक डिपार्टमेंन्टच्या जुन्या विद्यार्थ्यांच्या अॅडमिशन्स बर्‍यापैकी संपत आल्या होत्या. मॅनेजमेंन्ट विभागामध्ये हा फिवाढीचा घोळ झाल्यामुळे त्यांनी आधी दुसर्‍या आणि तिसर्‍या वर्षाला अॅडमिशन्स घेतलेल्या मॅनेजमेंन्ट स्टडीच्या विद्यार्थ्यांची यादी पाहिली आणि त्यांना धक्काच बसला त्या सगळ्या विद्यार्थ्यांनी जवळपास पस्तिस हजार रु फि प्रत्येकी भरुन प्रवेश घेतला होता. फि भरण्याची प्रोसेस अॉनलाईन असल्याने त्याचे डिटेल्स मात्र कोणाला बदलता येणं शक्य नव्हतं त्यामुळे ही गोष्ट भाऊसाहेबांच्या लक्षात आली. त्यांनी ती फाईल करंबेळकर सरांसमोर ठेवली.
" हे पहा सर " भाऊसाहेब म्हणाले तसे प्राचार्यांनी फाईल स्वतःकडे घेतली.
" बापरे ! साहेब मला खरंच यातलं तसुभरही माहित नाही हो." करंबेळकर सर आणि निंबाळकर सरांना घाम फुटण्याची आता वेळ आली होती. दोघांचा यात काहीच दोष नसताना या सगळ्याची उत्तरं त्यांना द्यावी लागणार होती. भाऊंनी शांतपणे पुढची फाईल उघडली जी आता प्रथम वर्ष मॅनेजमेंन्टची चालु अॅडमिशन्सबद्दलची होती. गेल्या चार पाच दिवसात या विभागात आतापर्यंत चाळीस एक अॅडमिशन्स झाल्या होत्या. त्यांच्याकडुन घेतलेली फिदेखील पस्तीस हजार होती. त्यातले दहा विद्यार्थी बारावी कॉमर्सला तब्बल नव्वद टक्क्यांहुन जास्त मार्क्स मिळवुन इथे अॅडमिशन्स घ्यायला आले होते. त्यामुळे त्यांना कॉलेजकडुन होतकरु विद्यार्थी स्कॉलरशीप दिली जाणार होतीच पण त्याआधीच त्यांच्याकडुन एवढी रक्कम प्रवेशासाठी उकळली गेली याचं भाऊसाहेबांना दुःख वाटलं. 
" सर,आपले द्वितीय वर्षाचे मॅनेजमेंन्टचे एकशेसत्तर विद्यार्थी, आता तृतीय वर्षाला गेलेले दिडशे विद्यार्थी ह्या सगळ्यांनी पस्तिस हजाराप्रमाणे फि भरलीय म्हणजे आपल्या कॉलेजच्या फिपेक्षा प्रत्येकी दहा हजार जास्त एकुण रक्कम बत्तीसलाख होते सर आणि आताचे फस्ट इयरचे चाळिस विद्यार्थी त्यांचे चारलाख बघा किती पैसे उकळले गेलेत!  या प्रत्येकाकडे दहा हजार वाढीव मागितले असले तरी बघता बघता ही रक्कम किती झाली पहा एवढा मोठा आर्थिक घोळ तोही आपल्या 'गुरुकुल' मध्ये!" ते खुर्चीत मागे टेकुन बसले आपण मुलांचं मोठं आर्थिक नुकसान केलय बिच्चारी मुलं असे बरेच विचार त्यांच्या मनात सुरु होते. गेल्या पंधरा वर्षात कॉलेजच्या स्थापनेपासुन एक रुपयाची अफरातफर कधी झाली नव्हती आणि आज अचानक एवढी मोठ्ठी गोष्ट घडली याने त्यांना धक्का बसला होता. काही क्षण तसेच शांततेत गेले आणि त्यांनी स्वतःहून विक्रमला फोन लावला आणि केबीनमध्ये यायला सांगितलं. करंबेळकर सर, निंबाळकर सर अजुनही त्या फाईल्स चाळत बसले होते. नजरचुकीने काहीतरी घोळ झाला असेल अशी भाबडी आशा अजुन त्यांना होती.
...................
" या विक्रम " भाऊसाहेबांच्या केबिनचं दार लोटुन विक्रम आतमध्ये येताच बसल्या खुर्चीवरुन भाऊसाहेब म्हणाले. तो आत आलेला पाहून करंबेळकर सरांनी निंबाळकर सरांकडे पाहिलं. आता काय होणार याचा तणाव दोघांच्याही चेहर्‍यावर होता. विक्रम भाऊसाहेबांसमोरच्या खूर्चीत बसला. भाऊंनी एकही शब्द न बोलता निंबाळकरांकडे पाहिलं. साहेबांना फाईल्स हव्यात ते त्यांच्या लक्षात आलं. दोघांनी हातातल्या उघड्या फाईल्स भाऊंच्या हातात दिल्या. भाऊसाहेबांनी पुन्हा त्यातल्या आकड्यांवरुन नजर फिरवली आणि अक्षरशः त्या फाईल्स टेबलवर विक्रमसमोर अापटल्या.
" बघा 'गुरुकुल ' मध्ये काय चाललय! ह्या सगळ्याची कल्पनाच कधी केली नव्हती आम्ही विक्रम " ते आता रागाने बोलत होते. विक्रमने एकामागोमाग एक फाईल्स पहायला सुरुवात केली. ज्या मुलांच्या अॅडमिशन्स झाल्या होत्या त्यांनी नक्की किती फि भरली होती ते रेकॉर्डला होतं पण प्रवेशप्रक्रियेच्या माहितीपत्रकावरची फी कमी होती. क्वचित एखाद्या पालकांना शंका आली तर लायब्ररी,ग्राहकभांडार, स्पोर्टस यासाठीचे ते चार्चेस आहेत अस सांगा आणि यात कुठेतरी वाढीव फि दाखवा अस अॉफिसच्या स्टाफला सांगण्यात आल होतं त्या प्रमाणे त्यांनी केल होतं आणि पंचवीसचे पस्तिस हजार कुणाच्याही लक्षात न येणारा असा तो फरक होता पण भाऊसाहेबांनी रेकॉर्डच तपासायला काढले त्यामुळे विक्रमकडेही बोलायला काही उरलं नव्हतं. तोही आपल्याला यातल काहीच माहीत नाही अस दाखवत आश्चर्याने फाईल्स चाळत होता.
" O My God! मोठा स्कॅम आहे हा! कॉलेजच्या व्यवहारात एवढी अफरातफर होत होती आणि आपल्याला साधी कल्पनाही नव्हती !" विक्रम काळजीच्या सुरात प्राचार्यांकडे पाहत बोलू लागला. त्यावर प्राचार्य लगेच म्हणाले,
" Sorry to say विक्रम सर पण मला किंवा निंबाळकरसरांना यातील काहीच माहीत नव्हतं. अहो BBA चं एकच डिपार्टमेंन्ट थोडी ना आहे सोबत Bsc IT, Msc IT, B.com, MCA, Computer Sci बरेच विभाग आहेत दरवर्षी कितीतरी अॅडमिशन्स होतात त्यामुळे प्रत्येक डिटेल्स आम्ही स्वतः चेक करणं नॉट पॉसीबल त्यामुळे कुणीतरी फायदा घेतलाय करुन." करंबेळकर सर म्हणाले त्यावर विक्रमने हो म्हटलं. चला म्हणजे प्रिन्सिपल किंवा व्हाइज प्रिन्सिपलने हा सगळा प्रकार एक्सपोज केलेला नाही आहे तर असा विचार विक्रमच्या मनात आला. 
" विक्रम हे अस इथुन पुढे घडता नये याची दक्षता घ्या आणि हा फसवाफसवीचा उद्योग कुठल्या कर्मचार्‍यांनी केलाय तेसुद्धा शोधुन काढा " भाऊसाहेब म्हणाले.
" हो, इथुन पुढे काळजी घेतलीच पाहिजे बघतो मी " विक्रम निश्चयाने म्हणाला आणि निघण्यासाठी उठला. तेवढ्यात भाऊसाहेब विचार करित म्हणाले,
" विक्रम, हे सगळ लवकरात लवकर निपटुन टाका कस आहे ना तुमच्यावर विश्वास टाकून 'गुरुकुल ' तुमच्याकडे सोपवलय." या वाक्यावर त्याची नजर पटकन त्यांच्याकडे वळली. कॉलेजची जबाबदारी त्याच्याकडे आल्यापासुन पहिल्यांदाच आज विक्रमने त्यांच्या नजरेत त्यांच्या या निर्णयाविषयी प्रश्नचिन्ह पाहिलं होतं. भाऊसाहेबांची ती नजर पाहून त्याने होकारार्थी मान हलवली आणि तो केबिनमधुन बाहेर पडला.
..................
थोड्यावेळाने करंबेळकर सर आणि निंबाळकर सरही केबिनमधुन बाहेर आले. भाऊसाहेब एकटेच आत बसले होते. ते पुन्हा पुन्हा त्या फाईल्स चाळत होते आणि विचार करत होते मग त्यांनी खंदारे मॅडमना निरोप देऊन आत बोलावलं. त्यांची बराच वेळ प्राचार्यांसोबत मिटिंग सुरु होती ही गोष्ट मॅडमच्याही कानावर गेली होती. काय झालं असेल ते जाणून घेतल्याशिवाय त्यांनाही चैन पडणार नव्हती. त्या भाऊसाहेबांना भेटण्यासाठी गेल्या. पहिल्यांदा भाऊसाहेबांनी मॅडमचे आभार मानले त्यांच्या सतर्कतेमुळे आज हा गोंधळ समोर आला होता नाहीतर मुलं बिच्चारी फि भरत राहिली असती आणि हे विद्यार्थ्यांना फसवण्याचं चक्र सुरुच राहिलं असतं असं त्यांना वाटलं. मॅडमनेही मोठ्या मनाने यात आपलं काहीही श्रेय नाही हे सगळं अनघामुळे शक्य झालं असं सांगितलं तेव्हा भाऊसाहेबांनाही आश्चर्य वाटलं आणि कॉलेजला नव्याने जॉईन झालेले प्राध्यापक इतकं मन लावून काम करतात याचा आनंदही झाला. त्यांनी अनघालाही शाबासकी देण्यासाठी बोलावून घेतलं. 
" सर तुम्ही बोलावलत ?"
" हो ये ना " 
" पोरी धन्यवाद तुझे खुप " अनघा खुर्चीत बसताच भाऊसाहेब म्हणाले. त्यांच्या अश्या अाभार मानण्याने ती अवघडली.
" धन्यवाद कश्याबद्दल ?" तिने विचारलं.
" तो फिवाढीचा प्रकार तुझ्या लक्षात आला म्हणून बरं झालं कितीतरी मुलांचं नुकसान आज टळलं. मीही आधी यावर विश्वास ठेवला नाही पण स्वतः रेकॉर्ड तपासले तेव्हा लक्षात आलं. खरच थँक्यु" ते म्हणाले.
" अहो थँक्यु काय त्यात मी याच कॉलेजला शिकले आणि आता शिकवतेसुद्धा मग इथल्या मुलांचं नुकसान होऊ नये म्हणून मी फक्त काळजी घेतली इतकच. ह्यातली कितीतरी मुलं सांगलीच नव्हे आपल्या बाजूच्या जिल्ह्यांमधुन इथं शिकायला येतात. कितीतरी जण ग्रामीण भागातले आहेत हाडाची काडं करुन त्यांचे आईवडिल त्यांना शिकवतात आणि या मुलांना नाही शक्य मुंबई पुण्याला जाऊन एम.बी.ए. बी.एसस्सी किंवा एमसीए करणं तेवढं त्यांना परवडत असतं तर ते इथे का आले असते मग अश्यावेळी आपण त्यांच्या गरजेचा गैरफायदा घ्यायचा का ?" ती तळमळीने बोलत होती आणि भाऊसाहेब, खंदारे मॅडम कौतुकाने तिच्याकडे पाहत होते.
" वा ! बेटा अगदी खरं बोललीस बरं वाटलं तुमच्या सारखे प्राध्यापक आपल्या कॉलेजला आहेत." भाऊसाहेब म्हणाले.
"बरं मी विक्रमना हा प्रकार सांगितलाय ते घालतील लक्ष यात  आणि पुढचे प्रवेश सुद्धा नीट होतील." भाऊसाहेबांनी दोघींना चिंता न करण्यास सांगितलं. अनघाला आता कुठे समाधान वाटलं भाऊसाहेब म्हणालेत म्हणजे आता सगळ नीट होईल याची तिला खात्री होती.
क्रमशः

🎭 Series Post

View all