बंधन भाग 2

Love, Social Issue

बंधन 2
( गेल्या भागात आपण आपल्या नव्या कथेतल्या अनघाला भेटलो. तिचे आईबाबा, धाकटी बहिण या तिच्या छोट्या कुटुंबात वाढलेली अनघा हुशार आहे. एम.बी.ए. झालेली ती जिथून तिने शिक्षण घेतलं त्या 'गुरुकुल ' कॉलेजला मुलाखतीसाठी जाते. आता पुढे पाहुया ' गुरुकुल ' मध्ये काय होतंय)

" काय रे दिनेश अरे पळतोस काय असा वाघ मागे लागल्यासारखा " भाऊसाहेबांनी खंदारे मॅडम आणी उपप्राचार्यांना बोलावण्यास सांगितलं होतं. त्यासाठी तो स्टाफरुममध्ये गेला तर कळलं खंदारे मॅडम लेक्चरला गेल्या आहेत म्हणून तो मॅडमना निरोप द्यायला घाईत निघाला होता. त्यांचं पावणेनऊचं लेक्चर संपायला दहाच मिनिटं उरली होती. खंदारे मॅडम अगदि शिस्तप्रिय, त्यातून आपल्या कामात चालढकल करणे त्यांना अजिबात आवडायचे नाही. तास चुकवणे, उशीरा लेक्चरला पोचणे, लवकर लेक्चर आटोपतं घेऊन वेळेआधीच क्लासमधून निघणे अश्या सवयी त्यांना नव्हत्या. वरिष्ठ प्राध्यापकच असं वागायला लागले तर ज्युनिअर माणसांकडून कसल्या अपेक्षा करायच्या असं त्यांचं मत होतं. शिपायांपासुन ते कॉलेजच्या अॉफिसातील क्लार्क पर्यंत सगळ्यांनाच प्रत्येक प्राध्यापकांचे स्वभाव माहित होते. त्यातून भाऊसाहेब कॉलेजला आले कि सगळ्या गोष्टी शिस्तित व्हायच्या. आता धावत निघालेला हा दिनेश प्रो. काळेंची हाक ऐकताच थांबला,
" हा, भाऊसाहेब आलेत ना, इंन्टिरव्हुय आहेत आज. खंदारे मॅडमना निरोप द्यायचा आहे."
" हो इंटिरव्हुय नाही का आज ! बरं पळ पळ नाहीतर मॅडम स्टाफरुमला जातील." सर त्याच्या धावण्यावर हसत म्हणाले.
" हसता काय सर बरं तुम्ही हसा मी निघतो." दिनेश पटापट पावलं टाकत निघाला. मॅडमचं लेक्चर संपतच आलं होतं. त्यांनी लेक्चरविषयी काही सुचना विद्यार्थ्यांना दिल्या. टेबलवरचं जाड पुस्तक उचलून हातात घेतलं आणी त्या क्लासबाहेर आल्या तसा ताटकळत उभा असलेला दिनेश लगेच पुढे आला," मॅडम, भाऊसाहेब आलेत."
" हा ते इंटरव्हियुचं आहे माझ्या लक्षात तू हो पुढे मी हे स्टाफरुममध्ये ठेवून येते." एवढं बोलून त्या पुढे गेल्या आणी दिनेशने सुटकेचा निःश्वास टाकला.
......................

प्राचार्यांसह उपप्राचार्य निंबाळकर, खंदारे मॅडम भाऊसाहेबांच्या केबीनमध्ये पोहचले. चार पाच जणांचं पॅनेल बसु शकेल अश्या तर्‍हेने खुर्च्यांची मांडणी आज केलेली होती. मध्ये भाऊसाहेब बसले होते. शेजारी प्राचार्य करंबेळकर, त्यांच्या शेजारी उपप्राचार्य निंबाळकर आणि भाऊसाहेबांच्या डाव्या बाजूच्या खुर्चीत मॅडम बसल्या. समोर काचेचं टेबल होतं. त्यावर पाण्याच्या बोटल्स ठेवलेल्या होत्या. प्राध्यापकांनी आपापल्या हातात रायटिंगपॅडसह कागद, पेन घेतले होते. समोर उमेद्वाराला बसण्यासाठी चेअर होती. सगळे स्थानापन्न झाल्यानंतर बाहेरुन एकेकाला आत पाठवायचं का विचारण्यासाठी शंकर आत आला. सगळे ' रेडि' च्या आविर्भावात बसले. शंकरच्या हातातही उमेद्वारांची नावं, पत्ते,फोन नं यांची लिस्ट होती त्याप्रमाणे एकेक उमेद्वार आत पाठवायला त्याने सुरुवात केली. कुणी उशीरा पोचलं तर त्यांच्या नावासमोर त्यांची सही घेणे, कुणाला अगदीच अडचण असेल तर लवकर आत पाठवणे अशी कामं त्याची सुरु होती. अनघा शांतपणे आपल्या नंबरची वाट पाहत बसली होती. बसल्या बसल्या सभोवार निरिक्षण करणं सुरु होतं. तीन- चार वर्ष झाली ग्रॅज्युएशन पूर्ण करुन एम.बी.ए. साठी आपण मुंबईला गेलो. इथे एम.बी.ए. ची फॅसिलिटी असती तर बरं झालं असतं. असो आता तेहि सुरु होईल असं सगळे म्हणतायत. पण कॉलेज अजून आहे तसंच आहे. किती बरं वाटतं इथे ! भाऊसाहेब खरंच ग्रेट आहेत. एवढी मोठी संस्था चालवणं आणि गरिब, होतकरु मुलांना फि सवलत देणं, स्कॉलरशीप देणं, मुलांना राहण्यासाठी हॉस्टेल हा सगळा डोलारा चालवणं सोपं नव्हे ! तिच्या मनात असे विचार सुरु होते तोच ' मिस अनघा कारखानीस ' असं नाव शंकरने पुकारलं आणी ती उठून उभी राहिली. त्याने केबिनचा दरवाजा उघडला. ती आत गेली.
" Welcome  Be Seated " मॅडम म्हणाल्या. थोडासा ताण तिच्या चेहर्‍यावर आला. ती खूर्चीत बसली. मॅडमनीच पहिल्यांदा प्रश्न विचारायला सुरुवात केली. एम.बी.ए. च्या अभ्यासावर असलेल्या त्यांच्या प्रश्नांची उत्तरं तिने व्यवस्थित उदाहरणासह दिली. तोपर्यंत भाऊसाहेबांनी तिची सर्टिफिकेट्स पाहिली आणि प्राचार्यांच्या हाती दिली. मुंबई सोडून पुन्हा गावी का यावंसं वाटलं या उपप्राचार्यांच्या प्रश्नावर 'आपल्याला आपलं कुटुंब, शहर आवडतं आणी आपल्या शिक्षणाचा फायदा इथल्या मुलांना व्हावा अशी आपली इच्छा आहे असं खरं उत्तर तिने दिलं ते सगळ्यांनाच आवडलं. सगळ्यांचं सगळं विचारुन झालं होतं प्राचार्यांनी 'ओके ' ची खूण दोघांना नजरेने केली. भाऊसाहेब मघापासुन तिची उत्तरं ऐकत होते. ते पुढे सरसावत म्हणाले, " तू जर समजा इथे प्राध्यापिका म्हणून रुजू झालीस तर तुझं स्वप्न पुर्ण होईल पण तुझं स्वप्न पुर्ण झाल्यावर तू काय करशील? म्हणजे शिकवशील तर उत्तमच पण इथल्या विद्यार्थ्यांसाठी अजून काय करशील ?" भाऊसाहेबांच्या या प्रश्नावर ती शांतपणे म्हणाली," मी ह्या कामाकडे ' जॉब ' म्हणून मुळात पाहणारच नाही. मला खेडोपाड्यांतून येणार्‍या मुलांना ' बेस्ट ' द्यायचं आहे. आपल्या 'गुरुकुल ' चे विद्यार्थी फक्त मार्क्स मिळवून इकडून केवळ डिग्री घेऊन न बाहेर पडता त्यांना त्यांच्या विषयातलं पूर्ण ज्ञान मिळालं पाहिजे. जेणेकरुन ते बाहेर कुठल्याही कंपनीमध्ये गेले तरी त्यांच्या गुणवत्तेवर त्यांची निवड व्हायला हवी. आणी यासाठी लेक्चर सोबतच पर्सनॅलिटी डेव्हलेपमेंन्ट, कम्युनिकेशन याचीही तयारी त्यांच्याकडून करुन घ्यायला हवी." 
" वा ! छानच " भाऊसाहेब तिच्या उत्तराने खूश झाले.
" थँक्यु सर "
" ओके, You may go now, We will inform you later " मॅडम म्हणाल्या तशी ती खूर्चीतून उठली आणी " थँक्यु मॅम, थँक्यु सर " म्हणून केबिनबाहेर पडली.त्यानंतर उरलेले काही कँडिडेक्ट्स एकामागोमाग एक आत जाऊन आले. 
......................

" काय शंकर्‍या काय करतोस ? सकाळी सकाळी प्रिन्सिपलनी काम लावलं वाटतं." समोरुन हातात चहाचा ट्रे घेऊन येणारा प्युन शिवराम शंकरजवळ येत म्हणाला.
" काम मग मी काय तुझ्यासारखा नाही. आज नव्या प्राध्यापकांच्या मुलाखती आहेत ना! त्याचंच काम चाललंय." तो हातातली लिस्ट पाहत त्यावर पेनने खूणा करित म्हणाला.
" मग झाल्या का मुलाखती तुमच्या ?" शिवरामने त्याला टोमणा मारित विचारलं.
" हो आताच संपल्या." 
" काय रे कोण कोण आहे आत ?" शिवरामने उत्सुकतेनं विचारलं.
" भाऊसाहेब आलेत. प्राचार्य, निंबाळकर सर आणि खंदारेमॅडम " 
" होय काय बरं बरं पण काय रे इतकी काय खलबतं चाललीत आत ?" शिवरामचा केबिनच्या दाराकडे पाहत प्रश्न.
" शिवा,  तू जातोस का आत ? जाऊनच बघ आता." शंकरने त्याला दरवाजाजवळ ढकललं.
" ए काय करतोस ! " शिवराम मोठ्याने दारावर आपटता आपटता वाचला.
" ए तुम्हा दोघांना काय कामं नाहीत वाटतं ?" दिनेश तिथे या दोघांना पाहून त्यांच्यापाशी येत म्हणाला.
" अरे,बघ ना मघापासुन हा शिवा डोक खातोय माझं. आत मिटिंग चालू आहे भाऊसाहेबांची तर म्हणतो काय चाललंय आत." शंकरने दिनेशला सविस्तर सांगितलं.
" मला वाटतं प्रोफेसर सामंतांविषयीच काहीतरी बोलत असतील !" दिनेश म्हणाला तसा शिवा चपापला आणि म्हणाला, " का रे काय झालं?"
" झालं कुठे काय नेहमीचंचं प्रो. सामंतांचे उपदव्याप काय कमी असतात जसं तुला काय माहितचं नाही ना का रे शिवा !" दिनेश शिवाला टोला मारित म्हणाला.
" मला मला काय माहित " शिवाने स्वतःला सावरत नजर चुकवत म्हटलं. इतक्यात आतून केबिनचं दार उघडण्याचा आवाज झाला तसे तिघेही आपापल्या कामाला पळाले.

क्रमशः

🎭 Series Post

View all