बंधन भाग 16

Love, Social Issues

भाग 16
( गेल्या भागात आपण पाहिलं कॉलेजच्या वार्षिक परिक्षा संपुन आता मे महिन्याची सुटी पडली. या सुट्टीचा फायदा करुन घ्यायचा आणि विक्रम समिहाची ओळख वाढवायला मदत करायची, ते सारखे भेटतील असं काहीतरी करायचं असा अरुंधतीने विचार केला पण त्याआधीच विक्रमने मे महिन्याची सुट्टी मित्रांसोबत नैनितालला घालवण्याचा प्लॅन केला. तो सगळ्यांना बाय करुन ज्या दिवशी ट्रिपला जाण्यासाठी निघाला त्याच दिवशी समिहा नेमकी विक्रमच्या घरी पोहचली आणि दरवाज्यावरच त्यांची भेट झाली. समिहाला पहिल्या भेटीतच विक्रम आवडला पाहुया पुढे)

" समिहा चल येतेस ना आत " अरुंधती तिच्या खांद्यावर हात ठेवत म्हणाली.
" हो हो येते ना " ती सावरुन म्हणाली आणि अरुंधतीसोबत आतमध्ये गेली.
....................
" ये ये बस समिहा आमच्याकडे पहिल्यांदाच आलीस ना तु वेलकम" अरुंधती तिला बसायला सांगत म्हणाली. ती सोफ्यावर बसली आणि बसल्या बसल्या संपूर्ण बंगल्यावरुन तिने नजर फिरवली. तेवढ्यात गंगाआत्या पाण्याचा ग्लास घेउन आली. ती थोड पाणी प्यायली. मात्र तिचा तो शॉर्ट वनपिस, कलरिंग हेअर, मेकअप, हे सगळं आत्याच्या पसंदीपलिकडचं होतं. याबद्दल लवकरात लवकर भाऊसाहेबांच्या कानावर घातलं पाहिजे असं तिला वाटु लागलं. तिने पाण्याचा ग्लास आत्याच्या हातातील ट्रेवरती ठेवला तशी आत्या किचनमध्ये निघून गेली.
" मग कसं आहे आमचं घर " अरुंधतीने तिच्याकडे मोर्चा वळवला.
" मस्तच एकदम " ती सगळीकडे नजर टाकित म्हणाली. त्यांच्या गप्पा सुरु होत्या तोच निता आणि जितेंद्र एकमेकांची मस्करी करित भांडत त्यांच्या वरच्या रुममधुन बाहेर आले. निता धावत ओरडत जिन्यावरुन खाली पळणार इतक्यात जितेंद्रने तिला हाताला धरुन आत खोलीत ओढलं.
" ए खाली नको जाऊ "
" का पण ?" तिने आश्चर्याने म्हटलं.
" मम्माला नाही आवडणार खाली ती समिहा आलीय ना " तो  रुमच्या दारातूनच खाली पाहत हळु आवाजात तिला सांगत होता.
" ए कोण समिहा ?" निता मोठ्याने म्हणाली.
" तुझी वहिनी " जितेंद्र नाईलाजाने तिच्या शंकांना उत्तर म्हणून बोलून गेला.
" काय ? " निता पुन्हा आश्चर्याने म्हणाली.
" हो ते चंद्रकांत ज्वेलर्सवाले त्यांची मुलगी मम्माला आवडलीय " तो म्हणाला
" आणि दाद्याला " ती नाराजीने म्हणाली.
" डोन्ट नो मम्मा बोलणारय म्हणालेली बघु " त्यावर निता नाराज होऊन आत आली.
" एक सांगू काय ?" तिने जितेंद्रकडे पाहत विचारलं तो खाली हॉलमध्ये समिहा अरुंधतीमधलं बोलणं ऐकु येतेयं का ते पाहत होता.
" काय बोल ना " त्याने म्हटलं.
" मला नाही पटलं हे म्हणजे समिहा आणि दाद्याची बायको!"
" का तुला काय झालं आणि तुम्ही मुली सारख्या काय एकमेकीला पाण्यात बघता गं कधीतरी कौतुक करा की एकमेकीचं तो अविनाश तुला कसं सहन करतो डोन्ट नो" तो मागे वळुन म्हणाला.
" तसं नाही रे आणि त्याचं काय तो मित्र आहे हा माझा उगीच पिडू नकोस आणि आपण विक्रम दादा बद्दल बोलतोय ना दाद्याजी बायको एकदम भारी असायला हवी बघ म्हणजे आपले लाड करणारी, घरातल्या सगळ्यांचा रिसपेक्ट करणारी ती समिहा माहितीय ना कसं वागते ती माणसांशी! दाद्यावर वेड्यासारखं प्रेम करणारी वहिनी हवी मला. छानशी हसणारी लाजणारी गोड नाजूक अशी कुणीतरी. तुला वाटतं का बाबांनी जे इतकं केलंय ते सांभाळणं समिहाला जमेल! यार तिचं प्रोफेशनपण बघ ना ती काय आपलं ' गुरुकुल ' सांभाळणार"  नितू चिडत म्हणाली.
" हं पण मम्मापुढे आपण काय बोलणार आणि विक्रम मम्माच्या शब्दापुढे नाही आणि तो हो म्हणाला तर भाऊसाहेब फार ताणून धरणार नाहीत " जितेंद्र म्हणाला.
" ते काहीही असो पण माझी तर विश आहे समिहा या घरात दाद्याची बायको म्हणून येऊ नये."
" hope for best " जितेंद्र मान डोलावत म्हणाला.
..................
उन्हाळी सुट्टीत अनघा आणि रिया दोघींनी मिळून धमाल करायचं ठरवलेलं होतं. पहिल्यांदा दोघींनी मिळून घरची साफसफाई केली. मग सिनेमा, आईसक्रीम खाणे, घरी बाबांसोबत कॅरम खेळणे, पत्त्यांचा डाव मांडणे, जवळच्या नातेवाईकांच्या लग्नसमारंभांना जाणे असे सगळे उद्योग सुरु झाले. अनघाला कॉलेजला जॉब लागून जुनला एक वर्ष पुर्ण होणार होतं तेव्हा आता जॉबचा प्रश्न तर मिटला आता हळुहळु स्थळं पाहायला सुरुवात करावी असं अनघाच्या आईला वाटु लागलं तसा तिने एके संध्याकाळी निवांत बसलेल्या श्रीधरकडे ( अनघाच्या बाबांकडे ) हा विषय काढला.
कुमुद - " अहो अनुला चांगला जॉबसुद्धा मिळाला आता हळुहळु आपण तिच्यासाठी स्थळं पाहायला सुरु करुयात का?"
श्रीधर - " अगं हो पण तिला विचार मग बघु आणि आता पुढच्या महिन्यात कॉलेज सुरु होईल पावसाळ्याचे चार महिने जाऊ देत आधी मग दिवाळीच्या आधी वधुवरसुचक मंडळात नाव नोंदणी करूयात."
कुमुद- " असं म्हणता बरं, पण विसरु नका "
श्रीधर - " नाही गं बाई " 
त्यांच्या या गप्पा खाली सुरु होत्या. रियाच्या कानावर अनघाचं लग्न हा शब्द पडला आणि तिने कान टवकारुन सगळं ऐकलं होतं. ती धावतच किचनच्या कोपर्‍यातुन आईबाबांचं लक्ष नाही ना ते पाहत जिन्याने अनघाच्या खोलीत गेली.
" ताई ताई तुला माहितीय का आईबाबा काय बोलतायत खाली ?"  तिने एक्साईट होत अनघाला विचारलं.
 " हो हो पण धावायला झालं काय आणि शहाणे चोरुन ऐकलंस " अनघा तिच्यावर रागवल्यासारखं दाखवत म्हणाली.
" सॉरी सॉरी पण ऐक ना Do you know आईबाबा तुझ्या लग्नाविषयी ओ माय गॉड कसलं भारी "
" हं आणि भारी काय गं !" अनघा हसत तिला ओरडत म्हणाली.
" ए ताई सांग ना तुझ्या जिजुविषयीच्या अपेक्षा तुला काय वाटतं?" रिया तिला बोलते करण्यासाठी प्रयत्न करित होती.
" काही नाही साधा सरळ स्वभावाचा छान फॅमिली असलेला सगळ्यांशी छान वागणारा " ती म्हणाली.
" बस इतकंच काय टिपिकल उत्तर आहे हे राव! छे! मला तर वाटतं एकदम डॅशिंग,  कॉन्फिडन्ट, हँन्डसम,चटपटीत इंग्लीश बोलणारा अगदी तो समोर आला तरी सगळे तनतरले पाहिजेत असा कुणीतरी पाहिजे मला जिजु " रियाचे ते हावभाव बघुन अनघाला हसु आलं.
" ओ बाई हे सगळं ना एखाद्या सिरियल मध्ये ठिक आहे प्रत्यक्षात असं काही होत नसतं हा पण तुझ्यासाठी आपण शोधु हा असा कुणीतरी " अनघा तिला चिडवीत म्हणाली.
" माझं सोड गं आपण तुझ्याबद्दल बोलतोय ना ए पण खरंच असं व्हायला पाहिजे ना वैसे भी हमारी दिदी क्या कम खुबसुरत है !" ती अनघाचे गाल ओढत म्हणाली आणि दोघी हसु लागल्या.
........................ 
श्रीधर - " अगं कुमुद तु नको इतका विचारु करुस अनुला चांगलंच स्थळ मिळेल ती इतकी शिकलेली आहे, हुशार आहे चांगला जॉब आहे शिवाय सुंदरही आहेच कि " श्रीधर हसत म्हणाले.
कुमुद - " होय ओ पण तुम्ही नावनोंदणी करा म्हणजे लवकर एखादं चांगलं स्थळ आलं तर जानेवारीपर्यंत साखरपुडा करता येईल मग मे चा मुहुर्तही मिळेल " ती त्यांना समजावित म्हणाली आणि देवासमोर दिवा लावायला उठली. देव्हार्‍यातला दिवा पेटवून तिने मनोभावे देवाला नमस्कार केला आणी मागे वळुन पुन्हा बोलायला लागली.
श्रीधर - " अगं आधी हा मे तर संपु दे पुढच्या वर्षीचं कुठे प्लॅनिंग करतेस आणि चार महिन्यांनी पाहु करु नोंदणी काही सात आठ महिन्यात आभाळ कोसळणार नाही." यावर ती पुन्हा देव्हार्‍याकडे वळली.
कुमुद - " हो तर आणि छे मध्येच वारा कुठून सुटला " तिने देव्हार्‍यातील दिव्याची वात दोन्ही हातांनी झाकण्याचा प्रयत्न केला तरी दिवा विझुन गेला.
" अहो दिवा विझला काही होणार नाही ना!" ती मागे वळुन चिंतीत चेहर्‍याने म्हणाली.
" अगं वारा सुटला त्यात काय असो सोड तो विचार " श्रीधर हसत तिला म्हणाले तरी कुमुद त्या विझलेल्या दिव्याकडे पाहतच राहिली.
क्रमशः

पंधरावा भाग वाचल्यानंतर बर्‍याच वाचकांच्या लक्षात आल असेल कि कथा मोठी आहे आणि पुढे बरंच काही घडणार आहे. ईरावर सद्या काही कथा खूपच लोकप्रिय झाल्यात. त्यातील पात्र सुद्धा तुमच्या मनात घर करुन आहेत पण ही कथा नक्की फॉलो करत राहा एक वेगळी आणि सुंदर कथा वाचल्याचं समाधान शेवटी तुम्हाला शंभर टक्के मिळेल याची खात्री सो भेटुया पुढील भागात

🎭 Series Post

View all