बंधन भाग 133

Social Love

भाग 133
( गेल्या भागात विक्रम हॉस्पिटलमधून घरी आला. ती घरी सगळ्यांना भेटायला आली. भाऊसाहेबांनी श्रीधरसोबत बोलून तिच्या घरी येण्याविषयी त्यांच्या कानावरती घातलं आणि नाराज असलेल्या श्रीधरनी भाऊसाहेबांकरता तिला त्या घरी पाठवण्याची सहमती दिली.)


             हॉस्पिटल मधून घरी आल्यानंतर त्याला बरं वाटत होतं. मनाला शांत वाटत होतं. आता कसला ताण नव्हता मनावरती. भविष्याचे कसले विचार नव्हते. सगळं सुरळीत होणार आहे आणि इथून पुढे आता भूतकाळाची दारं कायमस्वरूपी साठी बंद होणार आणि भविष्याच्या खिडकीतून फक्त आनंदाचे कवडसे दोघांच्या, आपल्या सोबत आपल्या सगळ्या माणसांच्या आयुष्यात येणार ही खात्री त्याला होती. भूतकाळाच्या सावल्या भविष्यावरती, वर्तमानावरती पडणार नाहीत याची आपण काळजी घ्यायची असं त्याने मनोमन ठरवलं. ती घरी आल्यानंतर मात्र पुन्हा हतबल झालेली, स्वतःच्या निर्णयाचा, आपल्यावरती विश्वास ठेवल्याचा पश्चात्ताप वाटणारी,  लग्नाच्या बंधनावरचा विश्वास उडून गेलेली ती त्याला नको होती! आणि आता तर तिच्या आईवडिलांसमोर स्वतःला माणूस म्हणून, चांगला नवरा म्हणून सिद्ध करण्याची शेवटची संधी आहे याची देखील त्याला जाणीव होती. त्यामुळे आता आपण कमी पडलो तर कदाचित तिच्यासाठी या घराचे दरवाजे तिचे आई-वडील बंद करतील याची भीती सुद्धा होतीच!  हॉस्पिटलमधून घरी आल्यापासून असंच काही ना काही त्याच्या मनात सुरू असायचं  जे सगळं तो तिला फोनवरुन सांगायचा. ती घरी येऊन जायची तेव्हाही त्यांच्या बोलण्यात तिच्या घरच्यांचा विषय असायचा. मग चिडून ती तिच्या घरी निघुन जायची. पुन्हा संध्याकाळी तिचे कॉल्स असायचे. रात्रीही बराचवेळ मेसेजेसवरुन ती बोलत राहायची. त्याच्याकडे तिचे आई-बाबा, त्यांची माफी, त्यांची प्रतिक्रिया, रियाचं चिडणं हे विषय असायचेच.पण तिला काही फरक पडायचा नाही. ती त्या सगळ्याचा विचार करायची नाही. तिला खूप बोलायचं असायचं.  त्यांच्या दोघांबद्दल, दोघांच्या भविष्याबद्दल, सुट्टीत फिरायला कुठे जायचं इथपासून खोलीचं इंटिरियर कस असावं इथपर्यंत. साड्या, शॉपिंग पासून ते त्याला तिखट वाटणारा तिचा स्वभाव, तिचे मूड्स, तिच्या सवयी, तिचे पिरियड्स इथपर्यंत. तिला खूप काही बोलायचं असायचं. तिच्या भारंभार बोलण्याने त्याच्या मनातले विचार कधी पळून जायचे त्याचं त्यालाही कळायचं नाही. अर्थात सकाळपासून दिवसभर छान, शांतपणे बोलणं व्हायचं असं नाही. त्याने दोन रिंगमध्ये फोन न उचलणे, गोळ्या औषध न घेणे, एखाद्या वेळी खोलीत तास तास एकट्यानेच बसून राहणे, मेसेजेसना उशीरा रिप्लाय देणे असं एखादं कारणही तिला चिडायला पुरे असायचं आणि मग तिला समजावता समजावता त्यांची त्रेधातिरपीट उडायची.
...................................................

          तिने म्हटल्याप्रमाणे चार-पाच दिवस भुर्रकन उडून गेले आणि  निघण्याचा दिवस येऊन ठेपला. श्रीधर, कुमुद, रिया तटस्थ असल्यासारखेच होते. तिला स्पष्टपणे 'नको ' असंही त्यांना सांगता येईना आणि उत्साहाने, आनंदाने तिला निरोप द्यायला देखील मन तयार होईना. त्यांच्यासमोर जायचं कसं ही चिंता जशी त्याला होती तशीच तो घरी येईल तेव्हा कसं वागावं, काय बोलणार आपण हा विचार चार दिवस त्यांचं डोकं पोखरुन काढत होता. ती मात्र उत्साहाने घरभर भिरभिरत होती. निघण्याच्या दिवशी सकाळी लवकर उठून, आवरून छान तयार झाली. इतक्या महिन्यानंतर त्या घरी जायचं तेही पुन्हा असं महिनोन् महिने माघारी न येण्यासाठी. गेल्या वर्षीचे त्याच्यासोबतचे दिवस पुन्हा जगण्यासाठी जायचंय या कल्पनेने तिचा वेळ सरायचा मात्र निघण्याच्या दिवशी सकाळपासूनच मिनिटंन् मिनिट तिला जड वाटू लागलं. अॉफव्हाईट रंगाची साडी, चेहऱ्याला छानसा मेकअप करून ती तयार झाली. तिथून येताना काही साड्या, ड्रेसेस तिने बॅगेतुन आणलेल्या होत्या त्याही बॅगेत भरून टाकल्या. तो दुपट्टा सुद्धा आठवणीने बॅगेत भरला. मोबाईल मध्ये पाहिलं तर त्याचा सकाळचा दोन तासांपूर्वीच गुड मॉर्निंग चा मेसेज होता. आदल्या दिवशी मी येईन उद्या हा असं दहादा त्याने तिला सांगितला होतं आणि आज ' कधी येणार, ' सकाळी म्हणजे नक्की किती वाजेपर्यंत ' ह्याची उत्तरं मात्र तिच्याकडे नव्हती. आनंदाचा भर ओसरला तसं तिच्या ते लक्षात आलं मग खट्टू चेहऱ्याने ती तशीच खिडकीतून खाली डोकावत राहिली. उभ्या उभ्या तिने सगळ्या गोष्टींवरून एक नजर फिरवली. आता पुन्हा इथे येताना हसत हसतच यायचं असं स्वतःला तिने समजावलं. मघाशी नाश्त्याच्या वेळी तेवढं  ' आज येणार आहेत ना ते!' इतकंच कुमुदने विचारलेलं. श्रीधर मात्र शांतच होते. रियाला वाटलेलं एकदा ताईच्या रूम मध्ये जाऊन पहावं काय चाललंय ते पण तीही शांत होती.

तिला वाटायला लागलं उगीच सकाळपासून आपण असे तयार होऊन बसलो. उभं राहून तिला कंटाळला आला होता. इतक्यात गेटपाशी गाडी थांबल्याचा आवाज आला. तिने मान उंचावून गेटपर्यंत नजर टाकण्याचा प्रयत्न केला. तिला शांत बसवेना. ती तशीच रूममधून धावत हॉलमध्ये आली. तिथं कुणीही नव्हतं. श्रीधर त्यांच्या खोलीत होते आणि कुमुद किचन मध्ये! आपण लहान मुलासारखं वागतोय ते पाहून आई-बाबांना काय वाटेल असं मनात आलं तिच्या. तरीही ती पटकन समोरच्या दोन- तीन पायर्‍या उतरून गेटपाशी पोचली देखील! तो गाडीतून खाली उतरला आणि तिच्या नजरेसमोर त्यांची कॅफेशॉपमधली ती पहिली भेट उभी राहिली. तिने निरखून पाहिलं त्याच्याकडे. नेव्ही ब्ल्यू रंगाचा कॅज्युअल वेअर ब्लेझर,व्हाईट शर्ट, लाईट ब्लू रंगाची ट्राऊजर, Rolex रिस्ट वॉच, Persol चे इटालियन ब्रँडेड सनग्लासेस आणि तो परफ्युमचा गंध! ती तशीच स्तब्ध उभी होती.

" Hello, Good morning Sunshine! "

" गुड मॉर्निंग."  ती भानावरती येत म्हणाली.

" आई बाबा दिसत नाहीत कुठे!" 

तो नेहमीप्रमाणे बोलत तिच्यासमोरुन गेटमधून आत मध्ये आला. ती मात्र तिथेच उभी राहिली आता स्वतःलाच न्याहाळत! आपण इतके छान तयार झाला आहोत हे त्याच्या लक्षातही आलं नाही का, काहीच नाही म्हणाला तो, असा कसा पुढे निघून गेला अशी चलबिचल तिच्या मनात सुरु झाली.

" मॅडम या ना."   त्याने मागे वळुन तिला बोलावलं.

साडीच्या पदराच्या टोकाशी चाळा करीत ती चालत त्याच्या पाशी आली. तिला क्षणभर वाटलं पटकन त्याला सांगावं, मी रागवलेय तुझ्यावरती. निदान बघ तरी माझ्याकडे जरा स्थिर उभा राहून.

" वाट बघत होते मी केव्हाची." तिने एकेक शब्द उच्चारत बोलायला सुरुवात केली.

" हा, But मी सांगितलं होतं न I'll come."

 दारापाशी नजर टाकत तो म्हणाला. त्याचं आपल्या बोलण्या कडे लक्ष नाही हे पाहून तिनेही मस्करीच्या सुरात म्हटलं,

" मी बाहेर आले तर मला वाटलं आशिष आला की काय यु.एस. वरून म्हणजे लूकवरुन असं वाटलं हा!"

" Oh Really!  अच्छा पण तुमचा लूक आज वेगळा आहे नेहमीपेक्षा का बुवा?"  त्याने गालात हसत म्हटलं.

" असच..... आज मी घरी येणार ना."  ती लहान मुलासारख्या भाबड्या नजरेने म्हणाली तसा तो थोडासा हसला.

" कधी ठरलं हे!"

"  का! असं काय हॉस्पिटल मधून आपण घरी आलात त्या दिवशी म्हणालेलात मी घ्यायला येईन." ती आश्चर्याने म्हणाली.

" हा, ते होय! बोल्ललो न पण कधी येईन ते नव्हतं सांगितलं."

" म्हणजे!"

" म्हणजे हेच कि, आज तुमच्या आई-बाबांशी बोलायला आलोय मी! बाकी ते घरीबीरी जायचं  पुढे पाहू."

 तो पुढे जाणार इतक्यात ती ताठ सुरात म्हणाली,

" पुढचं पुढे म्हणजे केव्हा?  आपण मुहूर्त सांगितला तर बरं होईल."

" बघु पण आज तरी  आई-बाबांशी बोलू दे मला! नंतरच पाहू."

" म्हणजे अजुन किती दिवस राहायचं या आशेवरती मी. आणि दहा वेळा घरी येऊन गेले मी तेव्हाच हे सगळं क्लियर करायला हवं होतस निदान मी अशी ताटकळत तरी बसले नसते."


" अरे काय आहे हे! मी येईन इतकच बोललो होतो. Be ready असं नव्हतं म्हणालो नी अनु गेल्या चार-पाच दिवसांपासून काय हॉस्पिटल ला आली होतीस तेव्हा पासून बघतोय चिडचिडत असतेस आणि समोरच्याचं काही ऐकून  घ्यायचं नसतं तुला. This's not fair. कोणाचं ऐकून घ्यायची सवय नाही विक्रमला! Remember it त्यामुळे जशास तसे उत्तर दिले जाईल."

"  च्च........सगळा मूड स्पोईल केलास तू!"

" What !  मी काय केलय नी वर्षभर मी वाट बघत होतोच ना."

" बाय मला बोलायचं नाहीये. बाबा आहेत बोला त्यांच्याशी." ती शरणागती पत्करल्यासारखी म्हणाली.

" आता काय झालं चेहरा फिरवून जायला! अनु तुला फक्त पँपरिंग, अटेन्शन, कौतुक हवं असतं माझ्याकडून! ते नाही मिळालं की चिडचिड......सॉरी टु से पण नेहमी ही अपेक्षा नका करु माझ्याकडून."

" वा! छानय लॉजिक आणि कसलं कौतुक नी अटेंन्शन. दोन शब्द गोड बोलताना जीभ जड होते तुझी."

" अरे वा! लवकर कमतरता दिसली माझ्यातली. काल-परवापर्यंत प्रेम ओतू जात होतं नाही का!"

" छे! विक्रम You're imposssible  मला नाही यायचं."

ती चालत पुढे गेली. तो मागून आला. त्याने तिचा हात धरला ती मागे वळली तसा तो दोन पावलं पुढे आला.

" काय ?" 

त्याने नुसतीच मान हलवली. आपला उजवा हात तिच्या गालाला टेकवला.

" तु जा..... मला नाही बोल.." ती बोलेपर्यंत त्याने तिच्या गालाला टेकवलेला हात तिच्या पापणी समोर नेला. ती गोंधळून त्याच्याकडे पाहत राहिली. त्याच्या बोटाला लागलेला तिच्या डोळ्यातल्या काजळाचा ठिपका त्याने तिच्या कानामागे टेकवला. ती छान हसली आणि पाठमोरी वळली.

" अनु गुलाब नेहमी सुंदरच दिसतात. त्यांच्या सौंदर्याची तारीफ करण्यापेक्षा पाहत राहावं नुसतं. डोळ्यांना तेवढाच आनंद!"

ती खाली पाहत गोड लाजली. तस मघाचं त्याचं बोलणं तिला आठवलं.

" काही नको मस्का. मघाशी इतकं ऐकवलस मला." त्यावर तो किंचित हसला.

" अग खर तेच म्हणालो. मी जरा दुर्लक्ष केलं की लगेच चिडचिड होते तुझी. तुला इनसिक्युअर वाटतं की काय!"

" का?"

" हेच मी लक्ष दिलं तुझ्याकडे तरच तुझी पर्वा मला.... नाही तर मला काही वाटत नाही तुझ्याविषयी असं काही. अनु , शब्द फक्त माध्यम आपल्या भावना समोरच्यापर्यंत पोचवायचं आणि शब्दातून बोलण्यापेक्षा कृती महत्त्वाची."

" हं." ती खट्टू चेहऱ्याने म्हणाली. 

तो पुन्हा हसला. त्याने आपला उजवा हात पुढे केला. आता मात्र तिच्या चेहऱ्यावर हसू पसरलं. तिने तिचा हात त्याच्या हातात दिला आणि दोघं पायऱ्या चढून दारापाशी आले इतक्यात समोरून कुमुद आली. त्याने तिच्या हातातून आपला हात बाजुला केला. तो कुमुदच्या समोर येऊन उभा राहिला. ती त्याच्या मागेच उभी होती. दोन वर्षांच्या सगळ्या घटना एका क्षणात कुमुदच्या नजरेसमोर उभ्या राहिल्या. 

'या घराचे दरवाजे तुमच्यासाठी बंद झालेत.' ' तुम्ही निघा आता तिच्या आयुष्यातून कायमचे '

' कितीही कागदी घोडे नाचवा, कितीही स्थळं आणा. तुम्हाला नाही माहित तुमची मुलगी माझ्या साठी किती वेडी आहे ते.' त्याचे ते शब्द तिच्या कानात पुन्हा घुमु लागले.


" येऊ का आत?"  तो म्हणाला तशी ती भानावर आली. तिने होकारार्थी मान हलवली. तो उंबरठा ओलांडून आत मध्ये आला तशी त्याच्या मागोमाग तीही गप्पपणे आत आली.

" मी बोलावते यांना....."  कुमुद ओशाळल्या चेहऱ्याने आत मध्ये गेली. वातावरणातला ताण पाहून अनघाला काही सुचेना. तिने त्याच्याकडे पाहिलं.

" Don't worry."   तो आश्वस्त नजरेने म्हणाला.

" आले मी.."    ती बॅग आणण्यासाठी तिच्या खोलीत निघून गेली. हॉलमध्ये तो एकटाच उभा होता इतक्यात रिया तिच्या खोलीतून ऑफिसला निघण्यासाठी खाली आली. तो येणार आहे ते माहीत होतं तिला. पण अचानक इतक्या महिन्यांनी तो समोर आल्यामुळे तिला अवघडल्यासारखं वाटलं. ती समोर आली. त्यांची नजरानजर झाली पण काय बोलावं तिला सुचेना.

" हॅलो कशीयस?"  तो शांतपणे बोलू लागला.

" ठीक."    ती बोटांची चाळवाचाळव करत म्हणाली.

" बसा तुम्ही."   तिने सोफ्याकडे हात दर्शवत म्हटलं.

" नाही थँक्स.  त्या आल्या की निघू आम्ही!"

" हं."   रियाला काय बोलावं की असंच निघून जावं ते समजेना. तिला सांगावसं वाटलं, काळजी घ्या तिची. तिचं मन जपा असं बरंच काही पण ती गप्प उभी राहिली. तेवढ्यात श्रीधर आले. तो दोन पावलं पुढे सरकला.

" आई-बाबा मी त्यांना घरी....."

" सांगितलं तिने आम्हाला." श्रीधर उद्गारले.

" बाबा I know  तुम्ही नाराज आहात  इन फॅक्ट माझं त्यांच्या आयुष्यात असणं तुम्हाला रुचणार नाहीय हो न आई?"    त्याने कुमुदकडे नजर टाकत म्हटलं.

" पण बाबा तुम्ही नका काळजी करू. I know हे असं सांगणं सोपय पण मनाला समजावणं कठीण..... पण बाबा मी त्यांची साथ नाही सोडणार.  माझ्या आयुष्यातली, माझ्या घरातली, माझ्या मनातली त्यांची जागा दुसर्‍या कुणासाठी कधीच नव्हती आणि इथून पुढेही नसेल. त्यांच्या या निर्णयाचा त्यांना कधी पश्चात्ताप वाटणार नाही. त्यांना माझा नवरा म्हणवून घेण्याची लाज वाटणार नाही ही जबाबदारी माझी."   

ती बॅग हातात घेऊन खाली आली आणि त्याच्या बाजूला येऊन उभी राहिली. सगळ्यांचे चेहरे तिने न्याहाळले.

" बाबा मग तुम्ही......"

" या तुम्ही! घरी वाट पाहत असतील सगळे."

 ते म्हणाले तसा तिचा चेहरा आनंदाने फुलला.

" बाबा खरं."   ती पुढे आली. दोघांनी श्रीधरना वाकून नमस्कार केला.


" अखंड सौभाग्यवती भव।"  तिच्या  डोक्यावरती त्यांनी हात टेकवला.  त्यांच्या डोळ्यांच्या पापण्या ओलावल्या. दोघांनी कुमुदलाही नमस्कार केला.

"निघू आई ?"    तिने शेवटचं कुमुदला विचारलं. तिने होकारार्थी मान हलवली. ती रिया समोर आली. तिने तिचे हात हातात घेतले.

" रियू टाटा टेक केअर. बोलू कॉल वरती हा."

" ताई मिस यु. काळजी घे."   तिने ताईला मिठी मारली.   

" काळजी घ्या सर तिची." विक्रमकडे पाहत तिने म्हटलं.

"  तुझ्या ताईने तक्रार केली तर ओरड जीजुला ओके."

 तो म्हणाला तशी ती हसली.

" आई-बाबा निघू ?" तिने बॅग हातात घेतली तशी श्रीधरने होकारार्थी मान हलवली.

 दोघ जायला वळले तसे श्रीधर, कुमुद, रिया दारापाशी त्यांना निरोप द्यायला आले. तिने एकदा मागे वळून हात हलवून सगळ्यांना बाय केलं आणि दोघं गाडीत बसले. श्रीधर पायरीवरती उभे होते नी कुमुद दारापाशी! काही क्षणात गाडी नजरेसमोरून दूर गेली. श्रीधर पाणावल्या डोळ्यांनी धुरळा उडवत दूर गेलेल्या गाडीकडे पाहत राहिले. रिया किचन मध्ये गेली होती. तिला ऑफिसला जायला उशीर होईल म्हणून कुमुदही आत जायला वळली.

' विक्रम निदान आज तरी तुम्ही बोलायला हवं होतं....' तिचं मन बेचैन झालंच. ती मागे वळली. श्रीधर पायरीवरती उभे होते.

" अहो गेली ती...."    कुमुद पुटपुटली तसे ते मागे वळले.

" हं......गेली ती."  एक दिर्घ श्वास घेत त्यांनी म्हटलं.


क्रमशः

मागचे काही भाग लहान होते हा सुद्धा! निरोपाची वेळ जवळ आली त्यामुळे उगीच तिचं तिचं वर्णनं, पात्रांची मानसिकता, दोन पात्रांमधले संवाद हे सगळं अॉलरेडी आलेलय. पुन्हा पुन्हा तेच तेच लिहण्यात अर्थ नाही म्हणून जितकं गरजेचं आहे तितकचं लिहिलेल आहे. मागचे काही भाग, गोवा ट्रीप, अरुंधतीचा भूतकाळ, गॅदरिंगची रात्र असे बरेच पार्ट्स मोठे होते तेव्हा ती गरज होती. आता उगीच भारंभार लिहायची आवश्यकता नाही आणि मोठा पार्ट साठी सगळे महत्वाचे प्रसंग एका पार्टमध्ये दिसले तर प्रसंग पुढे पुढे ढकल्याचा फील येईल वाचताना म्हणून लहान पार्ट.....

Keep Reading अगदी शेवटचे काही भाग

134 गुरुवारी रात्री

🎭 Series Post

View all