बंधन भाग 122

Social Love

भाग 122
( गेल्या भागात अनघा त्याला हॉस्पिटलला भेटायला जायला निघाली पण घरच्यांपुढे तिचा नाईलाज झाला. अरुंधतीच्या शब्दासाठी भाऊसाहेब हॉस्पिटलला आले. त्यांनी त्याच्यासाठी रक्तदान केलं पाहूया आता या घटनेनंतर बाकी कोण काय काय करतायत.)

                   भाऊसाहेब हॉस्पिटलला नक्की येतील याची अरुंधतीला खात्री होती. तिच्या पेक्षा त्यांचा जीव जास्त आहे विक्रम वरती हे तिला ठाऊक होतं. तो जे काही वागला होता ते सगळ्यांना जसं अनपेक्षित होतं तस त्यांच्यासाठीदेखील होतं. त्यामुळे ते कितीही नाराज असले त्याच्यावरती तरीसुद्धा तो निगरगट्ट, पूर्णपणे चुकीचा, निर्दयी नाही आहे हे भाऊसाहेबांनाही  मनातून आतून कुठेतरी जाणवत असेल आणि म्हणून ते त्याला पाहायला हॉस्पिटलला येतील असा अरुंधती चा विचार होता त्याप्रमाणे ते हॉस्पिटलला आले. रक्तदान सुद्धा केलं तसा तिचा जीव भांड्यात पडला. थोड्यावेळाने ती त्यांच्यासाठी ज्युसचा ग्लास घेऊन आली. ते शांतपणे वेटींग चेअर वरती बसले होते. तिने हातातील ज्यूस चा ग्लास त्यांच्या समोर धरला तस त्यांनी वरती पाहिलं.

" घ्या बरं वाटेल."   ती छानसं हसली. त्यांनी ग्लास हातात घेतला आणि घोटभर ज्यूस प्यायले तस त्यांना बरं वाटलं.

" रणजीत थँक यु सो मच."   ती त्यांच्या बाजुला बसली.

" का बरं इतके आभार!"    ते नेहमीच्या सुरात बोलले तसं ती हसली.

" असंच तुम्ही तुम्ही त्यांच्याशी बोलत नाही आहात इतके महिने नी साहजिकच आहे म्हणा त्यांनी जे काही केलं त्याला माफी असूच शकत नाही आणि तुम्ही सुद्धा त्यांना अजून नाही न केलेलं माफ!"   ती त्यांच्या चेहऱ्याकडे पाहत जरासा अंदाज घेत म्हणाली.

" हं, खरय गुन्हा हा गुन्हाच असतो." 

 ते थोड्याशा विचारी नजरेने म्हणाले तसे तिचे डोळे पाणावले. गेले इतके महिने प्रत्येक जण आपल्या मुलाला चांगलं वागूनही राक्षस, गुन्हेगार, नालायक अशी विशेषणं लावून शिव्याशाप देतोय याने तिचं मन गलबलून आलं तसं त्यांनी तिच्या डोळ्यांकडे पाहिलं.

" अरु, तुला काय वाटतं आम्हाला काहीच काळजी नाही का विक्रमची!   असं कसं असेल. आपल्या प्रेमाचं प्रतिक आहे ते !  आपल्या घरात दुडुदुडु धावणारं, मला बब्बा अस गोड आवाजात हाक मारणारं आपलं पहिलं बाळ!  नंतरही  इतक मोठं वादळ आपल्या आयुष्यात आलं तरी त्यांच्यामुळे आपण जोडून राहिलो. आई बाप सुद्धा लहान मुलांसारखं वागतात, भांडतात, रडतात, एकमेकावर रुसतात पण मुलं आई-वडिलांना जोडून ठेवतात. आपलही तसंच आहे. त्यांच्याकडे बघून आपण नव्याने सुरुवात केली होती आणि काय हल्लीची मुलं म्हणतात तसं नात्याला नवी संधी देणं, एक चान्स देणं नात्याला तसंच काहीसं झालं आपलं." 

 ते बोलत होते तसा त्यांचा गळा दाटून आला. तिने उजवा हात त्यांच्या हातांवर ठेवला.

" ते बरे होतील. तुम्ही नका त्रास करून घेऊ आणि आणि खरं सांगायचं तर त्यांचं हसणं, रडणं, सावरणं सगळं एका व्यक्ती पासून सुरू होतं आणि त्याच व्यक्तीपाशी थांबतं." अरुंधती म्हणाली.

" हो या घटनेने ही एक गोष्ट चांगलीच समजली......" ते स्वतःला शांत ठेवत म्हणाले.

" मला लक्षात येत होतं सुनबाई शिवाय त्यांचं आयुष्य नीट चालू शकणार नाहीये. रादर मध्यंतरी तिची जागा भरून काढण्याचा एक प्रयत्न समिहाच्या रूपाने करून पाहिला होता मी पण..... पण तो निष्फळ ठरला." ती दुःखीकष्टी सुरात बोलली.

" अरू,  मला वाटत नाही का त्यांनी पुन्हा एकत्र यावं. पण आपण नाही ना यात बोलू शकत. आपण आपल्या घराण्याची प्रतिष्ठा सांभाळण्यासाठी, विक्रमला वाचवण्यासाठी हे नातं टिकवण्याचा प्रयत्न करतोय असा समज झाला असता सुनबाईंच्या घरच्यांचा किंबहुना त्यांचासुद्धा. त्यातून ती  मध्यमवर्गीय माणसं. त्यांचे लेखी आपण पद, प्रतिष्ठा, पैसा असणारी बडी मंडळी! काहीही झालं तरी हा फरक मिटणार नाहीय त्यामुळे आपण त्यांच्यावर दबाव टाकतोय किंवा काय असही त्यांचं मत होऊ शकलं असतं म्हणून निर्णय घ्यायची मुभा मी त्यांना दिलेली. मध्यंतरी श्रीधररावांनी तिच्यासाठी कोणी मुलगा पाहिल्याचं कानावरती घातलेलं आमच्या. त्यातून ते घटस्फोटाचे कागद विक्रमनी पाठवलेले. बरं, सुनबाई घर सोडून गेली ते आज इतके महिने व्हायला आले तरी माघारी वळून पाहिलं ही नाही तिने! मग काय बोलावं आपण तरी म्हणून तुला, आत्याबाईंना शांत राहायला सांगितलं मी. शेवटी आयुष्य त्या दोघांचं आहे. नी आता ही त्यांना ठरवायचं आहे काय करायचं ते." 

ते शांतपणे म्हणाले तसं तिने होकारार्थी मान हलवली.

" आणि अरू, त्या दोघांचं माहित नाही. पण आपण तेव्हाही सोबत होतो. आताही आहोत आणि पुढेही असू त्यामुळे हे असं आभार मानू नका आणि डोळ्यातून पाणीही नको यायला." 

 ते थोडस हसत म्हणाले तसं तिच्या चेहऱ्यावरती स्मितहास्य पसरलं.
...................................................


                आत्या नितुच्या बाजूला येउन बसली. शांतपणे झोपलेल्या तिच्याकडे पाहून आत्याला थोडं बरं वाटलं. विक्रमची सकाळची अवस्था पाहून त्यालाही काही सुचत नव्हतं. त्यात नीतू चक्कर येऊन कोसळली आणि सगळ्यांची धावपळ उडाली. कोणी कोणाला सांभाळाव, धीर द्यावा हाच प्रश्न होता तरी जितेंद्र आणि अरुंधतीने सगळी धावपळ केली. त्याला काय करू, काय नको तेच कळेना.
 बंगल्यावरती दररोजची घाई गडबड सुरू होती आणि त्यातून तासाभरातच पत्रकार, न्यूज चॅनेल्सच्या लोकांनी अक्षरशः गर्दी केली. सगळच गोंधळाचं वातावरण झालेलं. जशी बातमी बाहेर सगळ्यांपर्यंत पोचली तसे गुरुकुल मधूनही प्राध्यापकांचे फोन यायला सुरुवात झाली. सगळंच इतक्या अचानक घडत होतं की काही विचार करायलाही कुणाला वेळ नव्हता. एकमेकांशी बोलायला ही वेळ नव्हता. पक्षाचे काही पदाधिकारी, कार्यकर्ते, सुरक्षारक्षक सगळ्यांनी परिस्थिती बर्‍यापैकी आटोक्यात आणली. जितेंद्र पत्रकारांशी बोलला तस थोडा गोंधळ कमी झाला. नीतुला डॉक्टर तपासून गेले. त्यांनी इंजेक्शन दिलं तसं तिचा डोळा लागला. भाऊसाहेब घरी आले. त्यांना पाहून आत्याला जीवात जीव आल्यासारखं वाटलं. अरुंधती चा फोन आला तसे ते हॉस्पिटलला गेले. आता जितेंद्रने तिकडून फोन करून सगळं ठिक असल्याचं कळवलं तसं आत्याचं घाबराघुबरं मन जरा शांत झालं.  नीतुला जाग आली तर उगीच आकांडतांडव सुरू होईल तिचा म्हणून आत्या तिच्या बाजूला येउन बसली. थोड्यावेळाने तिने डोळे उघडले न इकडे तिकडे नजर फिरवली.

" आ.....त्या "    ती कशीबशी उठून बसली.

" काय ग बरं वाटतया न्हव."   आत्याने तिला हाताला धरून बसवलं.

" हा थोड डोकं जड झाल्यासारखं......"

" ते डाकटर आलेल न. त्येनी इनजीशन दिलया म्हनून वाटत अासल..."

" हा......"    ती नुसतीच हुंकारली. सकाळचं ते त्याच्या खोलीतील दृश्य तिच्या नजरेसमोर उभ राहिलं.

" किती वाजले ?" 

" दुपार व्हाया आली ग."

" आत्ये दादा दादा कसा आहे? कुठेय ?  मला घेऊन चल ना त्याच्या कडं."

" तू जरा शान्त व्हतीस काय. हास्पिटलात हायेत ना समदी. जितेंद्र, वैनीसाब न सायेब बी तिकडच हायेत."

" तरी पण मला पण जायचय. मला भेटायचय त्याला. बोलायचय त्याच्याशी. तू चल."  ती गडबडीने उठू लागली तसं आत्याने तिच्या खांद्यावर हात ठेवला.

" आर थांब कि. तिथं जावन काय करनार हाइस?  त्येला शुध आली का कळल की! आन तस बी त्येला जवा बोलायचं व्हतं तवा तर तुमास्नी  ऐकायचं न्हवतं. म्या बोल्ली तर आत्येला त्येचा पुळका येतोया अासं वाटायचं तुमास्नी."

 आत्या म्हणाली तसं ती आत्याला बिलगुन रडु लागली.

" आत्या, सॉरी खरंच. तुझं, जित्याचं मी ऐकायला हवं होतं. मला वाटलं की, स्वतःला बाबांपासन वाचवण्यासाठी, शिक्षा होण्यापासून वाचण्यासाठी म्हणून त्यान तिच्याशी लग्न केलं. तिची जबाबदारी कायदेशीर मी घेतली अस चित्र तयार करून स्वतःला वाचवायचं असं काहीतरी...... त्यातून लग्नानंतर सुद्धा वर्षभर वहिनीशी खोटं बोलला. आपल्याला अंधारात ठेवलं."

" आरं तेची तेची बी कायतर कारनं असल्याल की. तुमी समदी तुमास्नी वाटतया तसच अासल अासं मनाशी धरून बसलाय. तुझी वैनी पन तशीच. तिला तिचा आनंदाचा इचार कर म्हनलेलं म्या आता तिला तिचा आनंद कशात हाय ते बी वळखता येईना. तिचं ठीक हाय ग. त्याच्यामुळे तिन लई भोगलया पन तुमी तुमी तरी निदान त्यो काय म्हनतो ते ऐकाया पायजे व्हतं."

" सॉरी चुकलं माझं."

" पोरी ही अाशी तोडन्याची भाषा करून नाती न्हाई टिकत ग." आत्याने तिच्या डोक्यावरून हात फिरवला.

" आत्या खरच सॉरी. मी काय बोलू याशिवाय."

" बरं आता रडू नगस."  आत्याने तिचे डोळे पुसले.

" आत्या मी राखी नाही बांधली म्हणून झालं का असं!"

" अार देवा, येडी का खुळी! अासं कुठं असतंया व्हय. राखीचं काय ग, भावा भनिचं एकमेकावरल प्रेम दाखवायचा तो दिस. धागा बांधला काय किंवा न्हाई बांधला काय परिम कमी होत नसतया."   आत्या तिच्या प्रश्नावरती हसली.

" हा....... दादा होईल ना ठीक. पहिल्यासारखा. मला तो तसाच आवडतो."

" व्हईल ग  समदं ठिक."  आत्याने तिच्या गालांवरून हात फिरवला तसं ती हसली.
.........................................................


           दुपारी हॉस्पिटल मधून घरी येण्यापूर्वी भाऊसाहेबांनी डॉक्टरांना भेटून घेतलं. काही तासांनी तो शुद्धीवर येईल असे डॉक्टर म्हणाले तसे त्यांनी डॉक्टरांचे आभार मानले. पण तिथून त्यांचा पाय निघेना. उद्या येऊन घरातले भेटू शकतील असेही डॉक्टर म्हणाले. पण त्याला एकदा तरी पाहिल्याशिवाय त्यांना चैन पडणार नव्हती मग त्यांच्या आग्रहाखातर डॉक्टरांनी त्यांना त्याला भेटण्याची परवानगी दिली. ते नर्ससोबत डॉक्टरांच्या केबिन मधून बाहेर आले.

" साहेब या."   नर्स प्रसन्न चेहऱ्याने म्हणाली तसं ते मनावरचा ताण थोडासा झटकून तिच्यासोबत चालू लागले.

 काही सेकंदातच ते सेकंड फ्लोअर ला पोहोचले. काही सुरक्षारक्षक तिथे उभे होते. भाऊसाहेबांना पाहताच ते दरवाजापासून बाजूला सरकले. हॉस्पिटलमध्ये पत्रकारांनी गोंधळ घालू नये आणि आणि खबर्‍या काढत हिंडणारी त्यांची माणसं आत पोचू नयेत याची व्यवस्था जितेंद्रने आधीच केलेली होती. यावेळी न डगमगता शांतपणे ही सगळी परिस्थिती त्याने हाताळलेली पाहून भाऊसाहेबांना निर्धास्त झाल्यासारखं वाटलं. आणि काही क्षणांसाठी विक्रम डोळ्यांसमोर उभा राहिला. न घाबरणारा, कशानेही न अस्वस्थ होणारा, एक हाती एखादं काम दिलं तर ते ' मॅनेज ' करण्यात पटाईत असणारा.

" तुम्ही या भेटून. मी आहे. शुद्धीवर आले तर सांगा."

" बरं."    ते स्तब्धपणे रूमच्या दरवाजाकडे पाहात राहिले.
................................................


           नर्स निघून गेली. दरवाजा लोटून ते आत आले. समोर बेडवरती डोळे मिटलेला तो! ते हळुहळु चालत पुढे आले आणि त्याच्या हातापाशी बसले. बँन्डेजच्या पट्ट्यांनी गुंडाळलेला त्याचा हात, दुसऱ्या हाताला सलाइन. त्यांनी एक दीर्घ श्वास घेतला. घरातलं पहिलं बाळ म्हणून किती कौतुक असायचं त्यांना त्याचं! त्यानंतर अरुंधती घर सोडून गेल्यानंतर तो आजारी पडला. त्याच्या डोक्याला जखम झाली तेव्हा मात्र डॉक्टरांनी त्याच्या आईला बोलावून घ्या तर त्याला बरं वाटेल असं म्हटलेलं. जुने दिवस त्यांच्या नजरेसमोर उभे राहिले. तेव्हापासून त्याला साधसं खरचटलं  तरी त्यांना भीती वाटायची. आपण विनाकारण अति चिंता करतो हे त्यांचं त्यांनाच जाणवायचं तरीही त्याच्यांसाठीची त्याची  काळजी, माया सगळं  तसच होतं अगदी तो मोठा झाला तरी! त्यांना उगीच वाटलं, तेव्हा अरुंधती जशी धावत त्याच्यासाठी आली होती तशीच अनघा आली तर! पण त्यांच्या विचारांचं त्यांनाच वैषम्य वाटलं. आपल्या मुलाची अशी अवस्था झाली आता म्हणून तिने गेल्या दोन वर्षांच्या तिच्या यातना, तिच्या आयुष्याची विस्कटलेली घडी हे सगळं विसरावं का असा प्रश्न त्यांच्यातल्या नेत्याने बापाच्या हृदयाला विचारलाच. त्यांनी आपला हात त्याच्या डोक्यापाशी नेला. त्याच्या कपाळावरून हात फिरवला. त्यांचे डोळे पाणावले. त्यांना वाटलं, तो आता उठून उभा राहील त्यांच्यासमोर नी म्हणेल, ' साहेब What happened ' मग  आपण म्हणू, 'तुम्ही असं करायला नको होतं.  आम्हाला अजिबात पटलेलं नाहीय.' मग तो नेहमीच्या त्याच्या ताठ सुरात म्हणेल, ' असो मला जे योग्य वाटेल ते मी केलं.'

 त्यांनी त्याच्या चेहऱ्याकडे पाहिलं. निस्तेज आणि थकलेला वाटला तो त्यांना!

" विक्रम काय मिळवलं? काय मिळवलत अस शर्यतीतला ससा होऊन! आपणच जिंकणार याचा अभिमान बाळगणारा, कसलाही विचार न करता धावणारा. त्या त्या सश्यालासुद्धा किंमत चुकवावी लागली होती. आळशीपणाची नाही. स्वतःबद्दलच्या अती अभिमानाची, डोळ्यांना पट्टी बांधल्यासारखं धावत सुटण्याची! विक्रम आम्ही आजवर कधी कशासाठी नाही तुम्हाला टोकलं. तुम्ही, जितेंद्र, नीतु तुम्हाला तुमचे निर्णय घेऊ दिले. तुम्हाला जे काही करायचं त्याचं स्वातंत्र्य दिलं. काही माझा मोठेपणा नाही तुम्हाला ऐकवत. पण तुमच्यावर तिघांवरती केलेल्या संस्कारांवरती विश्वास होता. पण तुम्ही तुम्ही तर त्यालाच धक्का दिलात ओ. तुमची हुशारी, तुमची बुद्धिमत्ता याची कदर आम्हाला होती त्यामुळे तुमची स्वप्नं, ध्येयं मोठी आहेत हे आम्हाला माहीत होतं म्हणून तुम्हाला परदेशात शिकायला पाठवलं.  आपल्या गुरुकुल ची जबाबदारी तुम्ही थोरले आहात म्हणून नाही दिलेली होती. तुमच्या बुद्धी, शिक्षणावर तुम्ही ती मिळवलीत. त्यात अपेक्षा एकच होती आमची, तुम्ही मोठे व्हावं. यश मिळवावं. काय हवा तितका व्याप वाढवावा फक्त जे काय करायचं ते करताना आपले मूल्य, संस्कार त्याला ठेच लागू देऊ नये.पण तुम्ही तेच केलत. एका पोरीचं आयुष्य उद्धवस्त..... बरं, त्या घटनेपासून खोटं बोलत राहिलात आमच्याशी. आत्यांशीसुद्धा. अगदी तुमच्या लग्नानंतरही तेच सुरु राहिलं.  तुमच्या मनात काय सुरू होतं ते काल परवापर्यंतही कळत नव्हतं त्यातून घटस्फोटाचा विषयही तुम्हीच सुरु केलात.....सगळाच मनमानी कारभार.पण हे असं असं हरलेलं तुम्हाला पाहायची सवय नाही ओ म्हणून लवकर बरे व्हा आणि जिंकणार तुम्ही नक्की!"  त्यांनी त्याच्या डोक्यावरती हात ठेवला इतक्यात जितेंद्र आत आला.

" साहेब तुम्ही घरी निघताय न."

" अ......हो "   ते बेडवरुन उठले.

" डोन्ट वरी मी आहे इकडे."    जितेंद्र पुन्हा त्यांच्या चेहऱ्याकडे पाहत त्यांना धीर देत म्हणाला. त्यांच्या चेहर्‍यावरची चिंता त्याला दिसत होती.

" हं, कळवत राहा तुम्ही काय होतय."  त्यांनी निघताना पुन्हा मागे वळून बेडवरल्या त्याच्याकडे नजर टाकली.

" हो, या तुम्ही."   जितेंद्र पुन्हा म्हणाला तस ते जड पावलांनी त्याच्यासमोरून बाहेर पडले.
......,.......................................................


              दिवसभर न्यूजचॅनेल्स वरून याच बातम्या येत राहिल्या. एका आमदाराच्या मुलाने राहत्या घरी आत्महत्येचा प्रयत्‍न करणे ही गोष्टच पत्रकांराकरिता सनसनाटी बातमी होती. त्यातून भाऊसाहेबांचा मुलगा याव्यतिरिक्तही त्याची ओळख होतीच. भाऊसाहेबांच्या शिक्षण संस्थांमध्ये त्याच सक्रिय असणं, त्याच बाबतीत काही महिन्यांपूर्वी झालेले भ्रष्टाचाराचे आरोप आणि त्यावरून रंगलेलं राजकारण या सगळ्याचा काही ना काही संबंध असणारच हे सगळ्यांच्याच लक्षात येत होतं. जितेंद्रच्या पत्रकारांसोबतच्या बोलण्यामुळे बापूसाहेबांनी या प्रकारावरती प्रतिक्रिया देणं टाळलं. असेल त्यांच्या काही घरगुती बाबी, भाऊसाहेबांना तुम्ही विचारू शकता असं काही बोलून त्यांनी यापासून लांब राहणेच पसंत केले. टीव्हीवरून, सोशल मीडिया वरून येणाऱ्या बातम्यांकडे राजेशचं मात्र लक्ष होतं. दिवसभर जे काही चाललं होतं ते तो गप्पपणे पाहत राहिला. सामंत सर अस्वस्थ आहेत याकडे त्याचे लक्षही गेलं नाही. रात्रीच्या बातम्या पाहून त्याने टिव्ही बंद केला. 

" डॅड जेवायचं नाही का? "  तो सोफ्यावरून उठला.

" आ.....नाही. थँक्स. मी जेवतो नंतर तू घे न वाढून." 

डोळ्यांवरचा चष्मा उतरवत ते म्हणाले.

" ओके मी जरा येतो."   तो त्याच्या रूममधे निघुन गेला.
..................................................

                 तो त्याच्या रूम मध्ये आला. काहीशा विचारात त्याने कॉर्नर पीस चा ड्रॉवर उघडला आणि हसतच फोटो बाहेर काढले. त्याच्या चेहऱ्यावरती विजयाचा आनंद पसरला होता.

" विक्रम  So sad रे!  काय मित्रा, माझी मदत घेऊन प्लॅन केलास नी वाटेतला काटा फेकून द्यावा तसं मला बाजूला केलस तू! मी नसतो ना त्या दिवशी तर तुझा प्लॅन फ्लॉप झाला असता. कोणाच्या जरा तरी लक्षात आलं असतं ना तर बदनामी झाली असती ती वेगळीच. माझे उपकार समज, ती त्या दिवशी रात्रीची व्हिडीओ क्लीप, आपल्या प्लॅनची ऑडिओ क्लिप तुमच्या लग्नाआधी तुझ्या हीरोइन पर्यंत पोचवली नाही मी! तसं झालं असतं तर त्या पोरीने काय तुला सोडलं नसतं. तिनं नी भाऊसाहेबांनी मिळून जेलपर्यंत तरी पोचवलं असतंच तुला पण कसय ना ती अनघा फार उडायची.  माझ्या कानाखाली...... विसरलो नव्हतो मी! म्हणून म्हणून तिची मदत होईल असं काहीही मला करायचं नव्हतं उलट ती अडकली तर माझ्यासाठी बरंच होतं. पण काय राव देव कसा असतो ना, तिला पन कोणी सापडला नाही तुझ्याशिवाय! म्हणून म्हटलं राहु दे चालू द्यावी तुमची लव स्टोरी... विक्रम त्या पोरीसाठी माझ्यावर हात उगारलेला तू. आठवतंय ना!

असो The game is over now! आता तुमच्या लुटुपुटुच्या भांडणात मला इंटरेस्ट नाही. मला तुला हरलेलं बघायच होतं. तिनं तुला नजरेसमोरही उभं न केलेलं पाहायचं होतं. ते झालं. आता मला कशाशी काही देणंघेणं नाही. Now, I should concentrate on my career.  विक्रम अनघा बाय-बाय."

 त्याने ते विक्रम नताशा चे फोटो तसेच ड्रॉवर मध्ये ठेवून दिले आणि हसतच एक नंबर डायल केला.

" हॅलो माय डियर."

" हॅलो कोन?"   पलिकडून फोन उचलला गेला.

" अरे यार विसरलीस की काय! राजेश."

" हा "   पलीकडून पुन्हा शांतता.

" हॅलो ओके ओके तू बिझी असशील नाही का! बट लिसन आजची ब्रेकिंग न्यूज विक्रमने सुसाइड....."   तो काही बोलणार तोच पलीकडून बोलणारी व्यक्ती स्तब्ध झाली.

"  What  सुसाईड!"  

" हा........." 

तो पुढे बोलणार तोच पलिकडून फोनच कट झाला.

" अरे,  एवढं काय झालं दचकायला!"  राजेशला आश्चर्य वाटलं मग त्यानेही फोन ठेवून दिला.
................................................

              नताशा राजेशचे शब्द ऐकून सुन्न झाली. एक दीर्घ श्वास घेतला तिने. तिच्या डोळ्यातून घळाघळा अश्रू वाहायला लागले. त्या दिवशी पहिल्यांदा ते मंदिरापाशी भेटले होते तो प्रसंग तिला आठवला. तिचा क्षणभर विश्वासच बसेना यावर!

" विक्रम तुमने क्यू किया ऐसा? एक फोन तो कर सकते थे न तुम."    तिने डोळे पुसले. तसच धावत अनघा कडे जावं आणि तिच्या कानाखाली चपराक देऊन  तिला जाग करावस वाटलं तिला. ती स्वतःच्याच विचारात उभी होती इतक्यात एक चारचाकी तिच्या बाजूला येउन थांबली. 

" हॅलो स्वीटहार्ट."  ड्रायव्हिंग सीटवर बसलेल्या एका मध्यमवयीन माणसाने गाडीच्या काचा खाली केल्या.

" चलो. निघूया न."

" मैं मैं नही आऊंगी..... मुझे एक काम है।"  ती खाली मानेनं चाचरत म्हणाली तसा तो हसला.

" अरे कौनसा काम ?  क्यू किसी और के साथ....."

" ऐसा  ऐसा नही है।"   तिनं नजर दुसरीकडे वळवली.

" चुपचाप चलायचं हा..... जास्त नाटकं नको तुझी!" तो जरासा आवाज चढवून म्हणाला.

" कहा ना नही आऊंगी।"   ती ओरडून म्हणाली.

" अरे, मग रात्री  उभी राहून काय करणारयस? ए जास्त शहाणपणा नाही करायचा हा. पैसे मोजतो आम्ही. तुझ्यासारख्या छप्पनजणी....."

" बास पैसा पैसा....."   तिने तिची हॅन्ड बॅग उघडली. रागाने नोटांचे बंडल बाहेर काढून कारच्या विंन्डोतून त्याच्यावरती फेकलं.

"  नही चाहिये मुझे तेरा पैसा ये लो।"  ती चिडून जायला वळली तसा गाडीचा दरवाजा उघडून तो बाहेर आला आणि त्याने तिचा हात पकडला.

" ए  नताशा कोण समजते स्वतःला तू. तुझ्या त्या पब मालकाला पण पैसे खायला घातले मी. काय लायकी काय ग तुझी."

" तुम हात छोड दो मेरा। "  तिनं त्याचा हात झटकला आणि त्याला काही कळण्याआधीच त्याच्या कानशिलात भडकावली.

" ए.......तू "

" रुक जाओ.... आयी समज में मेरी औकात। अब जावो यहॉ से नही तो चिल्लाऊंगी। लोग आयेंगे भिड होगी। तुम्हे लोग पूछेंगे सवाल, बहुत शरिफ आदमी हो ना तुम।"

 ती थोडस हसली तसा तो जागीच थबकला.

" देख लुंगा तुम्हे।"  त्याने दात ओठ खात गाडीचा दरवाजा उघडला. क्षणात गाडी तिच्या नजरे समोरून निघून गेली. तिने बॅग  उघडली फक्त दोनशे रुपये होते त्यात!

" नही, मुझे सांगली जाना है। काय पन करून मी जायला पायजे. अनघा उसे मिलना पडेगा।"  ती निश्चयाने म्हणाली. 

क्रमशः

तुम्ही आतुरतेने पार्टची वाट पाहत असता पण मुद्दामहून तुम्हाला ताटकळत ठेवायच नसतं....एकदा पार्ट पब्लिश झाला की पुढच्या भागाच अक्षरही लिहिलेल नसत. दोन दिवसात कागदावरती लिहून, मोबाईलवरती टाईप करुन, एडिट करुन तो पार्ट तुमच्यापर्यत पोचवायचा असतो....पुढचे भाग तयार नसतात...पार्ट जेव्हा पब्लिश होतो त्याआधी तासभर तो रेडी झालेला असतो त्यामुळे पोस्ट होत नाही याचा अर्थ लिहून झालेल नसत असा असतो....बाकी मी इतरत्र लिहित नाहीय, ईराच्या चालू स्पर्धांमध्येही मी नाहीय....हेतु एकच इकडे दुर्लक्ष होऊ नये...
Thank Youu 
123 रविवार रात्री

🎭 Series Post

View all