बंधन भाग 120

Social Love

भाग 120
( गेल्या भागात अनघा आशिषला भेटते आणि अंगठी परत करते. पण आशिषचा अहंकार दुखावतो आणि त्याचं खरं रुप तिच्यासमोर येतं. पाहूया पुढे)

              अनघा आशिष ला भेटून घरी परतली तीच चिडून आणि घरी आल्या आल्या तिने आशिषला नकार दिल्याचं स्पष्टपणे श्रीधर नी कुमुदला सांगितलं होतं. त्या दोघांना त्यानंतरही तिने दिवसभर तिच्या मनात नेमकं काय सुरू आहे हे कळू दिलं नाही. आशिषसोबतच्या तिच्या भांडणाचं कारण तिने त्यांना सांगितलं नव्हतं.मग न राहून श्रीधरने हरीश ला फोन केला. आशिष कॅफे मधून रागातच घरी गेला होता. अनघा कशी आपल्याला फाडफाड बोलली हे त्याने हरिशला सांगितलं आणि आपल्याला ही मुलगी नको या शब्दातच त्याने आपल्याला अनघा सोबत लग्न करण्यात काही स्वारस्य नाही असं हरीशला बजावलं. आशिष च्या सांगण्यावरून हरीशला ही एक गोष्ट समजली, ही मुलगी आपल्याला वाटतं तितकी साधी भोळी, गरीब स्वभावाची नाही. अजून लग्नाच्या गोष्टी पुढे गेल्या नाहीत तर ती आशिषला इतकं बोलू शकते तर प्रत्यक्ष त्याच्या आयुष्यात आली तर काय होईल! या विचाराने हरीशच्या तोंडचं पाणी पळालं. त्यांनी मग कशीबशी श्रीधरची समजूत काढली. आशिषच्या मनात काय सुरू होतं. त्या दोघांमध्ये नक्की काय बोलणं झालं हे आपल्यालाही ठाऊक  नसल्याचं त्यांनी श्रीधरला सांगितलं. तो चिडलेला होता. आपण त्याला कसं समजावलं. पण तो काही ऐकूनच घ्यायला तयार नाही असं काहीबाही सांगून हरिशने श्रीधरला गप्प केलं. तिने दुसरं लग्न नको असे ठामपणे पहिल्यांदाच म्हटलं होतं. त्यावर श्रीधर नी कुमुदला काही कळेना. ती असं का बोलली आणि तिच्या मनात काय सुरु आहे त्याचा अंदाज त्यांना येत नव्हता. अशा वेळी त्या दोघांनी परस्पर आशिषला फोन करून काही विचारण टाळलं. तीही आपलं डोक दुखतय सांगून उरलेला दिवस गप्पच राहिली. विक्रमच्या घरी जाऊन यावसं वाटलं तिला. बाहेर पाऊस थांबायला तयार नव्हता त्यामुळे आता आई बाहेर जाऊ देणार नाही हे तिला माहीत होतं. तिला आता फक्त त्याच्याशी बोलायचं होतं. त्याला फोन करण्याचंही एक-दोनदा मनात आलं. पण आज इतक्या महिन्यानंतर बोलायचं! इतकं सगळं घडून गेलंय, इतकं काही झालंय. आपण एकमेकांना बोललो, ते वेडिंग एनिवर्सरी ला साखळ्या परत देणं असेल, ती प्रेस कॉन्फरन्स डिव्होर्स पेपर्स, मध्येच आशिषचं आपल्या आयुष्यात येणं इतकं काही झाल्यानंतर आता बोलायचं! काय नी कुठून सुरुवात करायची तिला काहीच सुचेना. तसं तिने दुसऱ्या दिवशी प्रत्यक्ष भेटण्याचं ठरवलं.
........................................................


" दादा तुमची चाय."   रघुने चहाचा कप जितेंद्र च्या हातात दिला.

" हं, थँक्स."    तो सोफ्यावरती बसला होता. निवांतपणे टीपॉयवरची वृत्तपत्रं चाळता चाळता त्याने चहाचा कप हातात घेतला.

" हा, तुमचे सायेब दिसत नाहीत. उठले नाहीत वाटत अजून!"  त्याने सहज म्हटलं.

" काय म्हाईत बुवा!  दिसलं नाही सकाळपासन कुठं! बाहिर गेल आसतील."   रघुने म्हटलं.

" बरं, जा तू."  जितेंद्र म्हणाला तस तो ' व्हय दादा ' म्हणून निघून गेला इतक्यात नीतु तिच्या खोलीतून खाली आली. त्याचं लक्ष समोरून येणाऱ्या तिच्याकडे गेलं तसं तो म्हणाला,

" काय, नीतू भाई तुमचे दादा साहेब कुठयत ?"  त्याने मुद्दामहून तिला डिवचलं.

" मला काय माहित!"  जितेंद्रला टाळून ती पुढे जायला लागली.

" नाही, तुझी रूम लागूनच आहे त्याला म्हणून विचारलं. जस्ट."     दोन्ही खांदे उडवत तो म्हणाला तशी ती त्याच्या समोर येऊन उभी राहिली.

" जित्या, हा प्रश्न गेले सात-आठ महिने तु मला रोज विचारत असतोस दिवसातून एकदा तरी! नी माझं रोजचं उत्तर हेच असतं मला माहित नाही मग कसली वाट बघतोयस?" 

 ती दोन्ही हातांची घडी घालीत म्हणाली.

" तुम्ही दोघं बोलण्याची! गेले आठ महिने याच तर आशेवर मी तुला हा प्रश्न विचारतो."  तो हसत म्हणाला तसा तिच्या नाकाचा शेंडा लाल झाला.

" जित्या, मी कितीदा तरी सांगितलंय तुला मला त्याच्याशी...."

" नाही बोलायचं हो ना!  माहितीये मला ते. पण बोल निदान वहिनींशी तरी बोल."

" काय बोलू तिच्याशी? नी कोणत्या तोंडाने? कोणत्या तोंडाने त्याची तरफदारी करायची तिच्यासमोर."

" तरफदारी नको करू पण निदान हे असले सेपरेट होण्याचे सल्ले तरी देऊ नकोस ना."  तो म्हणाला तसं ती खवळली.

"म्हणजे...... मला काही हौस नाहीय या सगळ्याची."

" तसं नाही ग. पण त्यांना तुम्ही हे सगळं सांगण्यापेक्षा त्यांच्याशी बोला गं. वर्षभर एका घरात राहिलेत, वर्षभर संसार केलाय त्यांनी. तो कसाही असेल, आपल्यासमोर त्याची काहीही बाजू येवो पण एक नवरा म्हणून तो कसा आहे हे  फक्त त्याचं सांगू शकतील ना! नीतू मूर्खासारखं करू नकोस ग. तुझ्या जागी मी असतो ना तर आधी त्यांना जाऊन हे विचारलं असतं. मी नाही विचारू शकत पण तू तर बोलू शकतेस ना. बोल त्यांच्याशी. काय माहित वर्षभरात कितीतरी घटना अशा घडल्या असतील ज्या आपल्याला माहीतही नाहीत. कितीतरी त्यांचे स्वतःचे असे क्षण आलेच असतील ना त्यांच्या आयुष्यात. फक्त एकदा जाऊन त्यांना भेट नी काय काय घडलं होतं ते त्यांच्या तोंडून ऐक. त्यांना काय वाटतं ते जरा जाणून घे." 

तो पोटतिडकीने बोलत होता ती खाली मानेनं आता शांतपणे ऐकत होती.

" हं " ती काहिश्या निर्धाराने तिच्या खोलीकडे जायला वळली.

" होप, सगळं ठीक होऊ दे."  तो दीर्घ श्वास घेत स्वतःशीच म्हणाला.
....................................................

                ती डोळे चोळत अंथरुणातून उठली. चेहऱ्यावरती दोन्ही हात फिरवले. हातांनी डोकं गच्च धरलं तर थोडं गरगरल्यासारखं वाटू लागलं. तिने घड्याळात पाहिलं. आठ वाजत आलेले. ' बापरे!  इतके वाजले. लेट होणार कॉलेजला जायला.'  ती ब्लँकेट दूर सारत बेडवरुन उठली आणि खिडकी उघडली.  सकाळचे आठ वाजलेले पण सूर्य दिसतही नव्हता इतकं मळभ पसरलं होतं. 
' कदाचित आजही पाऊस पडणार!'  तिने मनाशी म्हटलं.' हो पण आज कॉलेजला जायला हवं ती पुन्हा स्वतःशीच पुटपुटली. तिने अंधारल्या आभाळा वरून एक नजर फिरवली.दूरवरून एक घार आभाळभर गोल गोल हिंडत होती. कावरीबावरी झाल्यासारखी! तिचं ते आभाळभर घिरट्या घालणं पाहून तिचं मन अस्वस्थ झालं तशी जोराची उबळ आली. ती धावत बेसिनपाशी गेली. बेसिनचा नळ सुरु  केला. सटासटा उलट्या झाल्या तिला.  इतक्यात रिया धावत आली.

" ताई, काय होतंय?  अॅसिडिटि झाली का ?" 

 ती तिच्या पाठीवरून हात फिरवत म्हणाली. गेल्या दोन दिवसांपासूनची अनघाची अवस्था पाहून रियाला काही सुचत नव्हतं.

" आ.......Don't know मी..... मी फ्रेश होते. मला कॉलेजला....."  

ती भिंतीला हात टेकून वॉशरूम कडे जायला वळली.

" ताई राहू दे आज. रेस्ट घे ग तू."   रियाने आपला हात तिच्या मनगटा भोवती धरला.

" अग काय.....  अंग किती तापलय तुझं!  तू.....ये इकडे.  बस आधी."   ती तिला हाताला धरून बेडपाशी घेऊन गेली.

" म.....ला जायचंय......"

" ताई, बस तू. एका दिवसाने काही होत नाही." 

 तिने तिला बसवलं आणि पाण्याचा ग्लास भरुन दिला.

" ताई, काय अवस्था करून घेतलीयस तू. त्या लेटरमुळे झालय हे सगळं. मी आई-बाबांना सांगायला हवं होतं तेव्हाच ."   ती रागावून म्हणाली.

" नाही....ग त्यात काय सांगायचं."   ती पाणी पीत म्हणाली.

" अग तुझ्या मनात काय चाललेलं असतं. सारखा तोच विचार करून झालंय हे सगळं."   रिया म्हणाली तसं तिने डोकं मागे भिंतीला टाकलं.

" न......नाही ग तसं."  तिने इतकीच प्रतिक्रिया दिली. कालपासून आपल्या डोक्यात काय सुरुय हे सांगण तिने आताही टाळलं.

" बरं रेस्ट घे जरा. मी आईला सांगते नी जाऊ नको कुठे. थांब मी आले."  तिला समजावत रिया म्हणाली त्यावर ती हुंकारली.

' ताई इतकी कशी अडकलीस त्यांच्यात! काय करून घेतलयस हे स्वतःचं. काय आहे इतकं त्या माणसात कि तू  स्वतःला पण त्रास.....'    रिया मनातून बोलत दारापाशी गेली आणि तिने मागे वळून तिच्याकडे पाहिलं. पुर्वीसारखी हसणारी, बोलणारी, घरातल्यांमध्ये मिळून मिसळून वावरणारी आपली ताई कधी आपल्याला पाहायला मिळेल हाच प्रश्न होता तिच्या मनात.
..................................................

                   तो शांतपणे बेडवरती बसला होता एकटक समोरच्या भिंतीकडे पाहत. किती वेळा पासून ते त्याचं त्यालाही माहीत नव्हतं. मांडीव चा लग्नाचा अल्बम त्याने बाजूला केला. रुमच्या मोठाल्या खिडकीचे पडदे दररोज सकाळी तो दूर सारायचा. बाहेरची हवा, सूर्यप्रकाशाची किरणं खिडकीच्या काचांमधून त्याच्या बेड वरती पडायची. छान वाटायचं त्याला ते! आज पडदेही दूर सारलेले नव्हते. झोपेचं, खाण्यापिण्याचं सगळंच गणित बिघडलेलं. एखाद्या यंत्रासारखी दिवसभरातली कामं तो करायचा. सकाळी फ्रेश होणं, नेहमीप्रमाणे छान तयार होऊन नाश्ता करणं आणि कॉलेजला जाणं. पण भाऊसाहेबांनी म्हटल्याप्रमाणे कॉलेजच्या जबाबदारीतून त्याला मोकळं करण्याचं त्यांनी ठरवलं होतं आणि काही दिवसांपूर्वीच भाऊसाहेबांनी तुम्ही अमेरिकेला गेला तरी चालेल आता असं म्हटलं आणि त्याच्या पायातलं बळच निघून गेलं. ती  आणि कॉलेज दोन्हीत त्याचा जीव अडकलेला. या दोन्ही गोष्ट सोडून जायच्या कल्पनेने त्याला खचून गेल्यासारखं झालं होतं. त्याने तिचं वॉर्डरोब उघडलं.  तिच्या साड्या, ड्रेसेस जसेच्या तसे हँगरला अडकवलेले होते. ती घर सोडून जाण्या आधी तो जयपुर ला गेला होता तेव्हा तिचा शेवटचा हात या वस्तूंवरून फिरला असेल! आज किती महिने उलटून गेले होते. रोजचा दिवस, रोजची आशा. पण आता सगळच अर्थहीन वाटू लागलं होतं. स्वतःच्या मनाला समजावत राहणं म्हणजे शब्दांचे बुडबुडे उडवण्या सारखं वाटत होतं.  वॉर्डरोबच्या कोपऱ्यात त्याचं लक्ष गेलं. घडी घातलेली हिरवी साडी त्याने बाहेर काढली. जयपूरहून येताना तिच्यासाठी आणलेली! त्यादिवशी त्याच्यावरती चिडून तिने ती हातातून फेकून दिली होती. त्याने त्यावरुन हात फिरवला. ड्रॉवर उघडला तर त्यात तिचं मंगळसूत्र होतं. त्याच्या आवडीच्या डिझाईनचं. ' सौंदर्य काही आमच्या गळ्यावरती डिपेंड नसतं. जो माणूस ते प्रेमाने आमच्या गळ्यात घालतो ना त्याचं सगळं अस्तित्व त्यात सामावलेलं असतं म्हणून ते क्युट दिसतं.' त्याने मंगळसूत्र हातात घेतलं तसे तिचे शब्द आठवले. ती निघून जाताना म्हणाली होती, ' जे नातंचं खोटेपणाच्या पायावरती तू उभं केलस मग अशा खोट्या माणसासाठी मी कशाला हे गळ्यात बांधून घ्यायचं.'  तीचं ते बोलण आठवून त्याचे डोळे भरून आले. ते त्याने ड्रॉवरमध्ये ठेवून वॉर्डरोब बंद केला. रूमवरून एक नजर फिरवली. भिंतीकडे नुसतं पाहिलं तरी डोळ्यांसमोर अंधारी यायची त्याच्या. सगळ्यांचे चेहरे समोर उभी राहायचे. जो तो त्याच्याकडे बोट दाखवून त्याला जाब विचारतोय, त्याला सुनावतोय हेच चित्र उभ राहायचं.
' माझ्या आयुष्याची वाताहत व्हायची ती झालीच ना मग का घ्यायचं ऐकुन तुझं मी?'  हाच प्रश्न गेले आठ महिने त्याला विचारणारी ती आणि बाकी सगळे. त्याने एक दीर्घ श्वास घेतला आणि तो बेड वरती येऊन बसला. हताश, थकलेला बरंच काही बोलावसं वाटणारा. एवढ्या मोठ्या बंगल्यात भरलेल्या घरात त्याचा एकटेपणा वाटून घेणार कोणी नव्हतं. त्याचे दोन शब्द ऐकून घेणारं कुणी नव्हतं. शरीराच्या वेदनां पेक्षा भयंकर त्रास मनाला होतो हे समजून त्याच्याशी प्रेमाने वागणारं कोणी नव्हतं. एक शेवटचा प्रयत्न त्याने तिला पत्र लिहून करून पाहिला पण त्याचं उत्तरही आलं नव्हतं.

" अनु, चुकलोय मी. I know मी खोटं बोललो पण तू म्हणतेस तसा मी खोटारडा नव्हतो. मला नाही माहित मी माणूस म्हणून चांगला की वाईट ते! पण माझं चुकलं आणि माझ्या चुका मला मान्य आहेत. ज्यांना गुन्हे मान्य नसतात त्यांच्यासाठी शिक्षेची जरुरी असते. त्यांना कोर्टाची शिक्षा देण्याची गरज असते. पण मला तर माझा गुन्हा कबूल आहे. मला नाही सांगायचं मी कसा बरोबर आणि बाकी सगळे कसे चूक आहेत. मला माझं समर्थनही नाही करायचं. नाही तुझ्या वरती कसले शिंतोडे उडवायचे. मला शिक्षा झाली तर तुझ्या मनाचं समाधान होईल. तुला तुझ्यातली स्त्री, तुझा लढा जिंकल्याचं समाधान मिळेल. तुझं पुढचं आयुष्य मार्गी लागेल. मी तुझ्या मार्गातून बाजूला झालो तर तुझे प्रश्न सुटतील.नी कोणीतरी मला शिक्षा द्यायची गरज नाहीय. मी माझ्या चुकांची जबाबदारी घेतली, निर्णयांची घेतली आणि शिक्षा सुद्धा माझी मीच देईन मला.' त्याच्या डोळ्यांतले अश्रू  त्याच्या हातांवरती पडले.
...............................................

            जितेंद्रने हातातला पेपर टीपॉय वरती ठेवला आणि आळस देत तो सोफ्यावरुन उठला इतक्यात वरून गोपाळ खाली आला. त्याच्या हातात ट्रे होता आणि कॉफी मग.

" अहो दादा, सायेब बघा ना खोलीचं दार उगडत न्हाईत."

 त्याने ट्रे डायनिंग टेबलवर ठेवला आणि तो धावत जितेंद्र समोर येऊन उभा.

" काय! अरे पण ते घरी नाहीयेत ना मघाशी रघु म्हणाला तसं. "  जितेंद्र घाबरला गोपाळचं बोलणं ऐकून.

" नायी हो सकाळपास्न दार उघडलंच नाही तर!"

" काय,  काय झालं ?"    अरुंधती किचनमधून बाहेर आली.  तिच्या कानावरती त्याचे शब्द पडले.

" थांब, आत्ये, विक्रम गेला का कॉलेजला?" 

 घराबाहेर पडताना आत्याला भेटून तो जातो ते जितेंद्र ला माहित होतं.

"न्हाई रं बाबा. सकाळपास्नं दिसलाच न्हाई कुठं!" आत्या बाहेर आली तसं सगळेच एकमेकांकडे पाहायला लागले. 

" कमाल आहे!  नीतुला पण नाही माहित ग!" 

 जितेंद्र बोलला तसं सगळ्यांच्या चेहऱ्यावर प्रश्नचिन्ह उभं राहिलं. तो तसाच धावत वरती त्याच्या रूमपर्यंत आला. मागून बाकी सगळे ही आले.

" विक्रम अारं जायचं न्हाई का कालीजला?"  आत्याने हाक मारून पाहिलं तस अरुंधतीने दरवाजा ठोठावला.

" विक्रम दरवाजा उघड. बरं वाटत नाहीये का?"  तरी आतून काहीच उत्तर आलं नाही.

" अरे दरवाजा उघड ना."  जितेंद्रने अरुंधती कडे पाहिलं. बंगल्यातल्या सगळ्या खोल्यांना मास्टर की सिस्टीम होती.

" मम्मा कीज "  भीतीने तिचं हृदय धडधडायला लागलं आता. ती धावत तिच्या रूम मध्ये गेली.
.....................................................

              जितेंद्रचं मघाचं बोलणं नीतुच्या मनात घोळत राहिलं. अनघा घर सोडून गेल्यापासून प्रत्येक वेळी त्याला विक्रम वरून बोलण्याची संधी नितुने सोडली नव्हती. पुरुष एकमेकांच्या चुकांवर पांघरूण घालतात. एकमेकांची बाजू घेतात असा तिचा ग्रह होता त्यामुळे जितेंद्र काहीही बोलला तरी ते नीतुला पटायचं नाही. तो विक्रम ची बाजू घेतो असं तिला वाटायचं. पण त्याचं आजचं बोलणं तिला मनातून पटत होतं. खरंच की वहिनी सोबत आपण बोलायला हव होतं. तिला सल्ला देण्यापेक्षा तिला काय वाटतंय ते पडताळून पाहायला हव होतं या विचारासरशी तिला आठवलं, घर सोडून गेल्यानंतर पहिल्यांदा तिला भेटायला नीतु कॉलेजला गेली होती. त्या दिवशी सुद्धा तिला जाणवलं होतं आपली वहिनी त्याला विसरू शकत नाही! तो जे वागला त्यामुळे ती नक्कीच दुखावलीय. पण म्हणून त्याला आयुष्यातून वजा नाही करू शकत ती! ती असं करण्याचं आजही टाळतेय. इतके महिने झाले तरी तिला ते जमत नाही याचा अर्थ एकच तिला, तो आजही तितकाच आवडतो. तितकाच हवाहवासा वाटतो या विचाराने तिने डोक्याला हात लावला. खरं आहे असंही काही असू शकतं याचा विचारच केला नाही आपण! तिच्याशी बोलायला हवं. तिने हातातल्या मोबाईल मधला नंबर डायल केला आणि फोन कानाला लावला तसं बाहेर काहीतरी गोंधळ, आरडाओरड सुरु असल्याचं तिच्या लक्षात आलं. ती तशीच धावत बाहेर आली तर विक्रमच्या रूम समोर घरातल्यांची गर्दी! ती धावत पुढे आली. जितेंद्र चावीने दरवाजा उघडत होता. एकदाचा दरवाजा उघडला गेला तस त्याने सगळ्यांकडे पाहिलं. धडधडत्या छातीने त्याने दरवाजा लोटला.

 नोकर माणसांना बाजुला करत ती जितेंद्रच्या बरोबरीने आत मध्ये गेली. समोरचं दृश्य बघून सगळ्यांच्या पायातलं त्राण निघून गेलं.

 गेल्या इतक्या महिन्यांच्या, जवळपास वर्षभराच्या त्याच्या यातना, त्याचे अश्रु,  प्रत्येक क्षणाला दुखत राहणार त्याचं मन, आपल्या माणसांच्या मागे धावून धावून त्यांना हर तऱ्हेने समजावून थकलेलं त्याचं शरीर, त्याच्या चुका, त्याचे गुन्हे, त्या चुकांसाठी त्याला वाटणार वैषम्य, त्याची सल, त्याचा पश्चात्ताप सगळं त्याने संपवून टाकलं होतं. आपल्या माणसांचा थोडासा विश्वास आणि कणभर प्रेम ही त्याची अपेक्षा त्याने संपवून टाकली होती. त्याची मोठी स्वप्नं, भविष्याच्या महत्त्वाकांक्षा, त्याच्या इच्छा आणि यासोबतच त्याचा स्वाभिमान, अहंकार, इतरांच्या नजरेतला त्याचा अतिआत्मविश्वास. त्याचा रुबाब सगळं संपवून टाकावं असं वाटलं त्याला. त्याने चुका केल्या, जबाबदार्‍या घेतल्या, कर्तव्य बजावली, प्रेम केलं. जीव लावला फक्त प्रायश्चित्त घेण्याची एक संधी त्याला हवी होती. दोन प्रेमाच्या शब्दांसाठी, आपल्या माणसांच्या मायेसाठी अासुसलेला जीव.... ज्या व्यक्तीसाठी  दीड दोन वर्षे इतकी गोळाबेरीज केली, तिच्या असण्यासाठी सारा अट्टाहास केला ती व्यक्ती त्याच्या निर्णयाच्या या क्षणी त्याच्या सोबत नव्हती. शेवटच्या क्षणापर्यंत तिच्या आठवणी, खोलीच्या चार भिंती, त्याच्या मनात भरून राहिलेले तिचं अस्तित्व इतकंच त्याच्यापाशी उरलं होतं जे डोळ्यात साठवत त्यानं सगळ्याला पूर्णविराम देण्याचं ठरवलं.
 रक्ताच्या थारोळ्यात निश्‍चल असलेलं त्याचं शरिर, हातातून वाहणारं रक्त, मिटल्या ओठाआडचे आजूबाजूच्या माणसांपर्यंत आजवर न पोचू शकलेले शब्द, त्याच्या शरीरात असलेलं चार माणसांसारखच नाजूक मन सगळंच शांत होतं आता...........

' एखादीचं आयुष्य बरबाद करणार्‍या हातांकडून मला माझ्या रक्षणाची अपेक्षा नाहीय.'   ते रक्षाबंधनाच्या दिवशीचे शब्द तिला आठवले आणि इतक्या महिन्यात बोलला गेला प्रत्येक शब्द तिच्या कानात घुमू लागला.


"  दाद्या...... मी....... मला सोडून कसा......."

ती धावत त्याच्या पाशी जायला पुढे झाली नी धाडकन फरशीवर चक्कर येऊन कोसळली.

क्रमशः

               

🎭 Series Post

View all