बंधन भाग 119

Social Love

भाग 119
( गेल्या भागात तिने त्याचं पत्र वाचलं. पण तिला पडलेल्या स्वप्नामुळे ती पॅनिक झाली जे रियाच्या लक्षात आलं. रियाने त्याला फोन करुन बरंच ऐकवलं.पण दुसर्‍या दिवशी अनघाने उठल्यानंतर काहीतरी ठरवलेलं आहे पाहुया.)

             तिने कॉलेजला जाण्यासाठी नेहमीप्रमाणे तयारी केली. सकाळी उठल्यापासून मन लागत नव्हतं कश्यातच! अजूनही रात्रीच्या पत्राचा विचार तिच्या मनात घोळत होता. मघाशी उठल्यानंतर कितीतरी वेळ ती तशीच आरशासमोर उभी होती स्वतःच्याच नादात! आताही कॉलेजला जाण्यासाठी तयार झाली पण जायचं मन होईना. पिवळ्या रंगाची सुती साडी, चेहऱ्याला हलकासा मेकअप, दोन्ही हातात दोन सोन्याच्या बांगड्या आणि कानातले इयरिंग्ज नेहमीप्रमाणे पाठीवरती मोकळे केस. इतक्या दिवसानंतर पहिल्यांदाच तिला वाटलं तो मागून यावा आणि छान हसून आरशातल्या तिच्याकडे पाहत त्याने म्हणावं, ' चला मॅडम निघुयात का!' ते जुने दिवस आणि त्या घरातली तिची सकाळ आठवली आणि डोळ्यात टचकन पाणी आलं. माझा स्वाभिमान, माझ्यातल्या स्त्रीचा आत्मसन्मान, माझ्यावरच्या अन्यायाचा बदला, माझ्या वेदना आणि या सगळ्यासाठी पेटून उठून मी घेतलेले निर्णय. दिवसेंदिवस बिकट झालेली परिस्थिती आणि आज खचलेला, हतबल झालेला तो!  एका अर्थी मी जिंकले पण..... पण मी खुश नाहीये ना! मला त्याला शिक्षा द्यायची होती जी मी दिली किंवा परिस्थितीने ती त्याला दिली. पण त्याला नाही पचवता आलं हे सगळंच. का? त्याच्यात प्रामाणिकपणाचा थोडा तरी अंश असेल का! त्याचं एकदा ऐकून घ्यावं का? घ्यायला हवं. त्याला असं या अवस्थेत पाहण जड जातय आपल्याला. नी अश्या स्थितीत आशिष सोबत बोलणं भेटणं नाही जमणार. उगीच त्याला अाशेला लावण्यात अर्थ नाहीये. त्याने रिंग देऊनही महिना झालाय. त्याला उत्तर द्यावं लागेल आता याच विचारात तिने प्राचार्यांना रजेचा ई-मेल करण्यासाठी लॅपटॉप उघडला इतक्यात फोन वाजला.

" हॅलो "

" हॅलो अनघा, आशिष हिअर."

" हा बोला, ऐका ना आपण भेटूयात का?"  तिने क्षणाचाही विलंब न करता म्हटलं तसा त्याच्या चेहऱ्यावरती आनंद पसरला. त्यालाही आज तिला भेटायचं होतं.

" भेटूया ना. मी पिकअप करतो तुम्हाला कॉलेज सुटल्यावरती."

" नाही, नको म्हणजे मी रजा घेतेय आज." ती म्हणाली.

" हं,ओके मग भेटूयात. मी ऍड्रेस नी टाईम मेसेज करतो." त्याने उत्साहाने म्हटलं.

" हा बाय."  तिने पलिकडून फोन ठेवून दिला तसा त्याचा चेहरा आनंदला. आज तिच्यासोबत नेहमी सारखं गोड न बोलता स्पष्टपणे बोलण्याचं त्याने ठरवलं. 
....................................................


" अनु ,  काय ग कुठे निघालीस ? कॉलेजला जात नाहीस मग साडी तरी चेंज कर."  कुमुदने नाश्त्याच्या रिकामी प्लेट्स एकत्र करत डायनिंग टेबलपाशी उभी होती.

" आ.....ते मी जरा जाऊन येते."  कुमुदच्या नजरेला नजर न देताच ती खांद्याला पर्स अडकवित म्हणाली.

" हा, बरं पण कुठे निघालीस ? कधीपर्यंत येणार? जेवणाच्या वेळेपर्यंत ये म्हणजे झालं! रात्रीपासून पाऊस सुरुय." 

 काळजीच्या सुरात तिने सूचना द्यायला सुरुवात केली.

"हा हो आई, काय लहान मुलींना सांगतात तसं सांगतेस!"  ती दारापाशी जात म्हणाली.

" बरं, नाही सांगत. जा लवकर नी लवकर ये. उशीर व्हायला नको."  कुमुदने शेवटचं म्हटलं.

" हा उशीर नको व्हायला!"  ती सँडल्स पायात घालत पुटपुटली. मनाशी काहीतरी ठरवून बाहेर पडली.
.........................................................

" May I Come in Sir ?"  दिनेश ने केबिनचा दरवाजा लोटत विचारलं.

" हा, Come."

दिनेश काही फाईल्स घेऊन आत मध्ये आला. त्याने त्या फाईल्स टेबल वरती ठेवल्या. त्याला कामात व्यस्त असलेला पाहून तो जायला वळला.

" हा दिनेश." 

" काय सर ?"  तो पटकन थांबला.

" काल तू मॅडम ना  लिफाफा दिलास का ?" 

" हा कालच दिला की! बघते म्हणाल्या."  दिनेश आपण काम फत्ते केल्याच्या आविर्भावात बोलला.

" हा, बरं आल्यात का त्या ?" त्याच्या या प्रश्नावर दिनेश ला आश्चर्य वाटलं.

" असं का विचारताय ? तुमच्यासोबत येतात ना त्या!" तो शंकीत नजरेने म्हणाला.

" हो, पण त्यांच्या घरी जरा मेडिकल इमर्जन्सी आहे. तिकडे पण राहायला जातात त्या हल्ली. आज तिकडून येणार होत्या म्हणून विचारलं."  त्याने कसबस त्याला स्पष्टीकरण दिलं तसा तो बरं म्हणाला आणि त्याच्या शंकेचं समाधान झाल्याचं त्याच्या चेहऱ्यावर दिसलं.

" हा काय. पण आज नाही दिसल्या त्या सकाळपासन म्हन्जे नसतील आल्या कदाचित."  दिनेश म्हणाला तसं त्याने होकारार्थी मान हलवली.

" हा सर तुम्हाला बरं वाटत नाहीये का ?" तो त्याचा चेहरा न्याहाळत म्हणाला.

" आ नाही असं काही. आय एम फाईन."

" नाही, असंच जरा दमल्यासारखे वाटताय म्हणून विचारलं."

" ओके बरं जा तू." 

" बरं सर."   म्हणून दिनेश निघून गेला.

समोरच्या लॅपटॉपच्या स्क्रीन वरती त्याचं लक्ष होतं. पण डोक्यातले विचार सर सर धावत होते. याने पत्र दिलं. तिने घेतलं असं म्हणतो मग अजून वाचलं नसेल का! की वाचूनही तिला त्यातलं काही पटलं नसेल! रियाचा रात्री फोन आलेला. तिने वाचण्यापूर्वी रियाच्या हातात पडलं असेल तर गोंधळ झाला असेल. ती फाडून तरी टाकील नाहीतर आई-बाबांना तरी सांगेल. काय झालं असेल काय माहित. इतका गोंधळ झाला असता तर चिडून तरी तिने फोन केला असता ना! त्याला काहीच अंदाज येईना. त्याने कसेबसे सगळे विचार बाजूला सारले आणि हातातल्या कामाकडे लक्ष द्यायचं ठरवलं.
......................................................

           ती ठरलेल्या वेळेत ' सनशाइन कॅफे ' मध्ये पोहोचली. तिने इकडे तिकडे नजर फिरवली. हाच कॅफे.  इथूनच सुरुवात झाली होती. आजवरच्या काही महत्त्वाच्या घटनांच्या साक्षीदार आहेत या भिंती. आजही आपल्या आयुष्यातील मोठी घटना याच भिंती पाहणार आहेत! आता उद्यापासून सगळं बदललेलं असेल! ती चालत आत मध्ये आली. तो समोरच्या टेबलावर बसलेला दिसला. ती पुढे आली आणि त्याच्या समोरच्या खुर्चीत बसली.

" या मॅडम! मी म्हटलं येता की नाही."  तो जरासा हसत म्हणाला.

" असं का वाटलं तुम्हाला ?" 


" असंच पाऊसही आहे आणि तुम्ही काही सहजासहजी मला भेटायला तयार होत नाही म्हणजे  फार उत्सुक नसता ना तुम्ही माझ्यासोबत यायला!"  त्याने बोलण्याची सुरुवातच  तिरकस रीतीने केली.

" आ...... नो असं काही नाही."  ती बोटांची चाळवाचाळव करत म्हणाली.

" ओके ओके जस्ट गमतीत म्हटलं."   त्यानेही मग त्याचं बोलणं सावरून घेतलं.


" ओके पण आज तुम्हीच भेटायचं म्हणाला होतात कॉलवर. काही बोलायचं होतं का ? " त्याने जरा अंदाज घेत बोलायला सुरुवात केली.

" हा म्हणजे......"  ती काही बोलणार तोच तो अत्यानंदाने म्हणाला.

" Yes Yes I can guess तुम्हाला माझ्या प्रश्नाचं उत्तर द्यायचय का?  मग कधी करूयात एंन्गेजमेंट ?" तो प्रफुल्लित चेहऱ्याने म्हणाला.

" हा मला त्याविषयीचं बोलायचं होतं !"   ती म्हणाली.

" हा, बोला ना मग."   त्याच्या हृदयाची धडधड वाढत होती. तिच्या तोंडून एकदा ' हो '  हे उत्तर आलं की मग तो बोलणार होता जे तिने ऐकून घ्यावं अशी त्याची अपेक्षा होती.

" एक मिनिट हा." 

 तिने हातातली पर्स उघडली नि अंगठी चा बॉक्स बाहेर काढला नी त्याच्यासमोर ठेवला. तो पाहतच राहिला. कमालीची निश्चल दिसत होती ती. आतून खूप शांत. कसली चलबिचल नव्हती आता तिच्या मनात.

" आशिष आय एम एक्स्ट्रीमली सॉरी बट....." 
 ती बोलू लागली.

" But  काय ? "  त्याच्या कपाळावरती आठ्यांचे जाळे पसरले.

" I can't accept this! I know त्यादिवशी तुम्ही हि रिंग मला दिलीत. उत्तराची वाट पाहीन मी असं म्हणालात  त्यामुळे माझं उत्तर ' हो ' च असणार आहे असं तुम्हाला वाटणं चुकीचं नाही. पण...... पण मी हे नवीन नातं स्वीकारू शकत नाही. आय एम सॉरी. तुम्ही हर्ट नका होऊ. तुम्हाला एखादी चांगली मुलगी......."  

ती बोलत होती तशी त्याने जोरात टेबल वरती मुठ आपटली तशी ती दचकलीच.

" Sorry, My Foot कोण समजता ओ तुम्ही! गेले चार-पाच महिने तुमच्या मागे मागे काय फिरायला लागलो स्वतःला ग्रेट समजायला लागला का तुम्ही!" 

तो रागाने बोलायला लागला तस तिला काहीच कळेना. ती आश्चर्यचकित नजरेने त्याच्याकडे पाहू लागली.

" आशिष तुम्ही हे......."

" खरं तेच बोलतोय. नाही, तुम्ही काय नी कश्या आहात ना ते हळूहळू कळायला लागलं होतं मला. आता काय विक्रम कडे परत जायचं असेल नाही का! अरे वा, त्यांनी एक मिठी काय मारली लगेच विरघळलात तुम्ही!  काय सांगत होते ते तुम्हाला. दहा एक मिनिटं तुमचा रोमान्स सुरू होता. मला डोळे नाहीयेत असं वाटतं का तुम्हाला. तुमच्यातलं मिस अंडरस्टँडिंग मिटलं तेव्हा आशिषला काय कसही गुंडाळता येईल. असाच प्लॅन होता नाही का तुमचा!" 

" आशिष काय बोलताय तुम्ही हे......"  ती बोलली तसं तिला हातानेच थांबव तो पुढे बोलू लागला.

" खरंतर, आज मीच बोलणार होतो हा विषय. आता का त्रास होतो! त्या दिवशी संध्याकाळी तुम्ही गेला होतात तुमच्या मॅडम कडे नी रात्री नऊ वाजता घरी आलात तेसुद्धा विक्रम सोबत!  याआधीही मी तुम्हाला एकत्र पाहिलं होतं. त्या दिवशी भर पावसात तुमच्या आई-बाबांच्या अपरोक्ष ते घरी आले होते तुमच्या तेव्हाच समजलो होतो मी काय समजायचं ते! "

" हे पहा तुम्हाला जे काही बोलायचं ते स्पष्ट बोला." थोडासा आवाज चढवत ती म्हणाली.

" हं, That's the point. स्पष्टपणेच आज मी विचारणार होतो. तुमचं आणि त्यांचं रिलेशन नक्की कुठपर्यंत पोचलय. नाही, अजूनही तुम्ही भेटता दिवस नाही की रात्र नाही! मग मी काय समजायचं ?" 

" आशिष जस्ट शट अप "

" आता का खरं तेच विचारलं मी!  नाही,  तुम्हीच स्वतःला मी किती बिचारी अत्याचारपीडित म्हणून घेता..... त्यांनी तुमच्यावर अत्याचार वगैरे केले मग तरीही तुम्ही अख्ख्या मीडियासमोर त्यांची बाजू घेतली होती. तुमच्यावरती विक्रमने बलात्कार केला असं जर तुमचं म्हणणं असेल तर हा तुमचा रुबाब, फॅन्सी साड्या, मेकअप हे सगळं काय आहे? अत्याचार झालेल्या मुली अशा मेकअप करून हिंडत नसतात. 
कसय ना तुम्हा हाय क्लास मुलींचं, एखाद्या मंत्री, आमदार, बिझनेस मन, ऑफिसर अशा मोठ्या माशांना गळाला लावायचं. त्यांना प्रेमाच्या जाळ्यात अडकवायचं. मजा मारायची. त्यांचा पैसा उधळायचा नी कंटाळा आला की मग म्हणायचं आमच्यावरती अन्याय झाला. सगळ्यांची सहानुभूती मिळवायची. आणि जोडीला तुमची ती Mee Too Movement. त्याच तर मला  नवल वाटतं, त्यात गरीब, गांजलेल्या, गावातल्या, अडाणी बायका अजिबात नसतात. तुमच्यासारख्याच चटपटीत राहणार्‍या, करकरीत शिकलेल्या हायप्रोफाईल बायका असतात. एक्ट्रेस, लेखिका, कुणी बिझनेसवुमेन कोणी प्रोफेसर्स. अत्याचार काय ते तुमच्यावरती होतात फक्त नाही का!" 

" आशिष बास...... एखादीच्या चारित्र्यावर शिंतोडे उडवताना दहादा विचार करायचा. हे तोंड, ही जीभ नी विचार करणारा मेंदू एका बाईच्या गर्भातच तयार झालाय हे लक्षात ठेवा."  ती चिडून खुर्चीतून उठली.

" खूप ऐकून घेतलं तुमचं! तुम्ही काय रिजेक्ट करणार मला मीच रिजेक्ट करते तुम्हाला!  तुमच्या सारख्या अहंकारी माणसाची दास होऊन जगण्यापेक्षा माझ्या आयुष्याची राणी होऊन जगेन मी. कोणीही माझी जबाबदारी वगैरे घ्यायची गरज नाही. राहिला तुमचा प्रश्न, तुम्हाला काय वाटलं तुम्ही मला माझं पावित्र्य सिद्ध करायला सांगाल नी मी रडून मी किती खरीय हे सांगेन का! गेला तो जमाना. मी सीता नाही, कुंती नाही, द्रौपदी नाही. त्या महान होत्या ओ. त्यांच्या नखाची सरही मला नाही. मी एक सामान्य बाई आहे त्यामुळे अग्निपरीक्षा वगैरे देणं माझ्याच्याने शक्य नाही बुवा! त्यामुळे  ते तुम्ही विसरला. नी अजून एक एखाद्या बाईच्या वैयक्तिक आयुष्यात डोकावण्या पूर्वी आपला स्वतःचा आधी विचार करा." 

" म.......म्हणजे ?"  तो चाचरत  तिच्या नजरेला नजर देण्याचे टाळत बोलला. तिने दोन्ही हातांची घडी घातली आणि त्याच्याकडे पाहिलं.

" म्हणजे हेच, माझं कोणासोबत काय रिलेशन आहे हे चेक करण्याआधी स्वतःकडे जरा पहा. आता प्रत्येकाच्या आयुष्यात काही ना काही असतंच. तुमच्या आयुष्यात नव्हतं का कधीच कोणी! आणि कोणी होतं असेल तर तुमचं रिलेशन कुठपर्यंत......."

" Are you mad ?  मला हे असले प्रश्न विचारण्याची हिम्मत कशी झाली तुमची ?"  तो रागाने खुर्चीतून उठला.

" का ? आला ना राग. तुमचा अहंकार दुखावला. प्रश्नाचा राग आला की एका बाईने हा प्रश्न विचारला याचा राग आला."

तिच्या या बोलण्यावरती त्याने शरमेने मान खाली घातली. आपल्या आयुष्यात ही एक मुलगी होती. तिच्या सोबत आपण लिव इन रिलेशन मध्ये राहत होतो हे कबूल करण्या इतपत धैर्य नव्हतं त्याच्याकडे. त्याला तो त्याचा एका बाई समोर अपमान वाटला असता. त्याचा उतरलेला चेहरा पाहून ती हसली.

" उत्तर मिळालं मला माझं! गुडबाय मिस्टर अशिष. आपलं कधीच जमू शकत नाही. आताही नाही आणि भविष्यातही नाही."

 इतकं बोलून तिने पर्स खांद्याला लावली आणि आत्मविश्वासाने तिथून बाहेर पडली. तो निःशब्द होऊन रुबाबात चालत जाणाऱ्या तिच्याकडे ओशाळल्या नजरेने पाहतच राहिला.
..................................................


      पावसाची एक जोरदार सर नुकतीच बरसुन गेलेली. आता पुन्हा रिमझिम पाऊस सुरू झाला. ती कॅफे बाहेर पडली आणि छत्री उघडून चालू लागली. मनावरती एकामागोमाग एक विचार आदळत होते. समोरून येणाऱ्या रिक्षाला तिने हात दाखवला. एव्हाना दुपार होत आली होती. आई काळजीत असेल या विचाराने ती रिक्षात बसली. मघाचं आशिषचं बोलणं, वागणं तिच्यासाठी धक्कादायक होतं. तसही आपण त्याला नकार द्यायच्या हेतुनेच आज आलो होतो. पण त्याचा हा चेहरा अनोळखी होता आपल्यासाठी. ' मोठ्या माश्यांना गळाला लावायचं, त्यांना प्रेमाच्या जाळ्यात ओढायचं.'  हे शब्द तिच्या कानात घुमत राहिले. हो मान्य आहे. असतातही काही जणी अशा!पण......पण प्रत्येक मुलगी काही तशी नसते ना! प्रत्येक माणूस वेगळा असतो. विक्रम म्हणालेला तसं! हा खरय, प्रत्येक मुलगी सारखी नसते मग सगळे पुरुष सारखेच अस आपण तरी का म्हणतो! श्रीकांत, आशिष, विक्रम तिघं किती वेगळे होते! त्यांच खूप चुकलं हे मान्य पण आपलही थोडस तरी चुकलचं ना! आपण ऐकून घ्यायला हवं त्याचं. गुन्हेगाराला सुद्धा कोर्टात बाजू मांडण्याची संधी मिळतेच ना...... जाऊया का घरी, नाही नको! तो घरी असेल का काय माहित नी अस अचानक आपण गेल्यावरती सगळ्यांचे शंभर प्रश्न! त्यापेक्षा उद्या कॉलेजलाच भेटूया. आधी त्याच्या सोबत तरी बोलूया. कोणाला काही सांगायला नको. घरी कळलं तर उगीच गोंधळ होईल नी आता माझ्या निर्णयावरती पुन्हा कोणाची खलबतं नकोयत. हो, उद्या होईल सगळं ठीक.' तिचं मन म्हणालं तसं तिला आज इतक्या महिन्यानंतर शांत वाटलं.
......................................................


             " अहो कुठे राहिली ही मुलगी. दोन वाजत आले तरी पत्ता नाही हिचा!" 

 शोकेस मधल्या शोपीस वरून नॅपकिनने हात फिरवत, त्यावरची धुळ झटकत कुमुद बोलत होती.

 श्रीधर दारातून सोपा पर्यंत नी सोफ्यापासुन दारापर्यंत येरझाऱ्या घालताना तिने पाहिलं तस तिनेच विचारलं.

      " हो येईल ग."

" मला तर काळजीच वाटते तिची! कधी काय येईल तिच्या डोक्यात तिचं तिला माहित."

" काही होत नाही. तू उगीच नसतं डोक्यात...." ते म्हणाले.

" नको ते नाही हो. मी........."   ती मान मागे वळवून एका हाताने नॅपकीन शोपीस वरती फिरवत होती आणि तिच्या हाताचा धक्का लागला तस एक शोपिस खळ्ळकन फरशीवरती पडलं.

" अरे देवा!"   ती भानावरती आली नी पटकन फरशीवरती गुडघे टेकून बसली. त्या शोपिसचे एव्हाना दोन तुकडे झाले होते. तिला मनातून काहीतरी तुटल्यासारखं वाटलं. 

" किती सुंदर पिस होता ओ! अनुच्या प्रिन्सिपल च्या मिसेसनी लग्नात दिलेलं गिफ्ट!  मी म्हटलं सुद्धा होतं त्यांना ते ' ओम शांती ओम ' मधल्या डान्सिंग कपलवाल्या गिफ्ट सारखं दिसतं म्हणून! सुंदर होतं ना!" 

कुमुद दुःखी चेहर्‍याने त्या तुकड्यांकडे पाहत म्हणाली.

" हो ग छानच होतं! असो, तू नको मनाला लावून घेऊ. बघुया जोडता आलं तर....."  श्रीधर कुमुदच्या बाजूला येउन उभे राहत म्हणाले.

" अहो मला ना भीती वाटते खूप."  ती श्रीधर कडे नजर वळवित म्हणाली.

" अगं काय कसली भीती?  तू पण ना." 

" असंच सगळं संपून जाईल की काय असं वाटतं !"  

ती त्या कांचाकडे पाहत म्हणाली इतक्यात दारातून अनघा आत आली.

" ही बघ आली तुझी लेक!" श्रीधर तिच्याकडे नजर टाकत म्हणाले.

" काय ग कुठं होतीस इतका वेळ ?"  कुमुद फरशीवरुन उठली.

" आई-बाबा मला आशिष सोबत लग्न नाही करायचं. मी तसं सांगून आले त्याला! नी आमच्यात वाद पण झाले." 

तिने एकाच फटक्यात सगळं निर्विकार चेहऱ्याने सांगून टाकलं तसा दोघांना धक्काच बसला.

" काय?  भांडण झालं. कशावरुन पण? काय नक्की झालेलं. नीट सांग काय ते."  कुमुद म्हणाली.

" हो ग नीट सांग. काही बोलला का तो तुला ?"  श्रीधरनेही पुढे होऊन विचारलं.

" जाऊ दे ना आई मला कंटाळा आलाय. नंतर बोलूया. डोकं दुखतंय माझं. नी हो पुन्हा माझ्या लग्नाचा विषय नकोय मला." 


ती ठामपणे बोलली नी त्यांच्या समोरून तरातरा तिच्या खोलीत निघून गेली. ते दोघं आश्चर्याने काही न कळून तिच्याकडे पाहतच राहिले.

क्रमशः

या पॉईन्टपर्यंत तिला आणून ठेवणं गरजेचं होतं. तिचा निर्णय तिने घेण अपेक्षित होतं याकरता नताशा नी विशाल चे मदतीचे दोर कापून टाकलेले, आशिष आधी फक्त तिच्या घरी येत होता. रिंगच्या प्रसंगामुळे तो नी तिच्यात एक कमिटमेंन्टचा दुवा तयार झाला जे होणं गरजेच होतं त्यामुळे पुरुषी अधिकारवाणीने तो तिच्यावरती आरोप करु शकला. नी रिंग प्रसंगाने विक्रमच्या ओवरकॉन्डफिन्डसलाही ब्रेक लागला. त्यानंतर ती आपल्याला हवी तशी वागेल हा आशिषचचा अहंकार सुखावला. एखाद्या स्त्रीच्या स्त्रीत्वावरतीच प्रश्न उभा राहतो तेव्हा ती निर्णय घेऊ शकते हे दर्शवण्याचा प्रयत्न....तिने कोणाच्या सांगण्यावरुन विक्रमकडे जाण्यापेक्षा तिचा तिन निर्णय घेणं महत्त्वाचं होतं. त्यामुळे ती शेवटपर्यंत लढली नी जिंकली. तिचा आत्मसन्मान, तिचा स्वाभिमान, तिचं प्रेम सगळंच तिने शेवटपर्यंत अबाधित राखलं....पाहुया विक्रमचं काय होणार......28 नंतरचा सगळ्यात मोठा टर्न....तिसाव्या भागापासून सुरु असणार्‍या त्याच्या पश्चात्तापाचं चक्र 120 मध्ये पुर्ण होईल.....
भेटुया मोठ्याश्या बदलासह नव्या वळणावर.......

🎭 Series Post

View all