बंधन भाग 118

Social Love

भाग 118
( गेल्या भागात आशिषचं वेगळच रुप आपण पाहिलं. आशिष तिच्यासोबत बोलण्याचं ठरवतो आणि दुसरीकडे विक्रम तिला पत्र लिहून तिच्याशी बोलण्याचा शेवटचा प्रयत्न करतो पाहुया पुढे)

              दुपारी कॉलेजमध्ये दिनेशने लिफाफा तिला आणून दिल्यापासून ती बेचैन होती. तिने तो लिफाफा पर्समध्ये ठेवून दिला. लगच्या लगेच उघडून त्यात काय आहे ते पाहावस  तिला वाटत होतं. पण घरी आल्यानंतर पाहू या विचाराने ती शांत राहिली. कॉलेजमधून घरी आल्यानंतरही ती गप्प गप्पच होती. चार दिवसांपूर्वी रात्री तो घरी तिला सोडायला आला होता तो प्रसंग आठवला तिला. त्या दिवशीचा त्याचा चेहरा नजरेसमोरून जातच नव्हता. तो लिफाफा उघडून पाहण्याची हिम्मत होईना. काय असेल त्यात! डिव्होर्स पेपर्स पुन्हा पाठवले असतील का की आपल्याला जॉब वरून काढणार असल्याची नोटीस तर नसेल ना या शंकेने तिचं मन अजून व्यथित झालं. शेवटी रात्री खोलीत आल्यानंतर झोपण्यापूर्वी तिने कपाटातील पर्स बाहेर काढली आणि तो बंद लिफाफा हातात घेतला. क्षणभर त्यावरून नजर फिरवली आणि तो उघडला. आत व्यवस्थित घडी घातलेला कागद होता. तिने कुतूहलाने कागदाची घडी उलगडली आणि पहिल्या दोन शब्दांवरती नजर पडली. 'प्रिय अनु.' अधाशासारखी तिची नजर झरझर ते शब्द वाचू लागली. वाचता वाचता कधी तिच्या चेहऱ्यावरती हसू फुललं तिचं तिलाही कळलं नाही. शेवटचे शब्द तिने पुन्हा पुन्हा वाचले. त्यावरून अलगद हात फिरवला इतक्यात उघड्या खिडकीतून जोराची वाऱ्याची झुळूक आली. ती तशीच हातातलं पत्र घेऊन धावत खिडकीपाशी गेली. वाऱ्याचा जोर अजून वाढला. गेल्या दहा- पंधरा दिवसांपासून रखरखीत ऊन पडलं होतं जणू पावसाळा संपला असं वाटू लागलं होतं. आणि आज अचानक रात्री असा वारा सुटला. तिने खिडकीतून बाहेर डोकावण्याचा प्रयत्न केला. जोराचा पाऊस येणार असं वाटू लागलं. तिने खिडक्यांची तावदाने बंद केली आणि ती पुन्हा बेडवरती उशीला टेकुन बसली. हातातल्या पत्राकडे पुन्हा लक्ष गेलं. एव्हाना बाहेर विजांचा कडकडाट सुरु झाला होता. तिने डोळे मिटले, पुन्हा उघडले तर समोर खिडकीपाशी कोणीतरी उभं होतं. व्हाईट शर्ट, ब्लॅक ट्राऊजर, अंगात जॅकेट. पाठमोरी असणारी ती व्यक्ती पाहून ती हळूहळू उठली आणि पुढे गेली.

" विक्रम!"  तिने त्याच्या खांद्यावर हात ठेवला तशी त्याने मान वळवली.

" तू इथे काय..... I mean लेट झालाय खूप न." तिने म्हटलं.

" हं, खूप लेट झालाय सगळ्यासाठीच! "  त्याने तिच्या चेहऱ्याकडे पाहत म्हटलं तशी तिने मान खाली घातली.

" प्लीज नको तो विषय."  ती म्हणाली.

" हं, तसही मी किती काही म्हणालो तरी ते तुझ्यापर्यंत नाही पोचणार. खूप लांब निघून गेलीयस तू !" 

" असं असं काही नाहीये."  ती चाचरत म्हणाली त्यावरती तो किंचित हसला.

" हसलास का ?"  तिने विचारलं.

" असंच, तू काही ऐकून घ्यायचं नाही ठरवलं म्हटल्यावर काय बोलणार आता मी."

" तू तू घरी जा नाही तर थांबतोस का थोडावेळ बाहेर पाऊस..."

" जाईन मी.... तसही इथे थांबण्याचा काही हक्क नाही मला. तुझ्या आई-बाबांना चालणार नाही उगीच नसते वाद." त्याच्या डोळ्यात पाणी आलं.

" विक्रम "   ती त्याच्या खांद्यावर हात ठेवणार इतक्यात तो पुढे म्हणाला,
"  मी ठरवलय इथून पुढे तुझ्या घरच्यांना माझ्यामुळे त्रास नको. तुला ही नको."

" म्हणजे ?"

" हेच की, मी तुझ्या वाटेतून बाजूला होण्याचं ठरवलय. उगीच तेच ते वाद, ती भांडणं किती दिवस, किती महिने सुरू राहणार हे ! नी तुला काही ठरवता येत नसेल तर मी तरी माझ्या पुरता निर्णय घेऊच शकतो."  तो शांतपणे म्हणाला.

" पण...... काय नी कुठे जाणार आहेस तू ?" तिने विचारलं तर तो काही न बोलता जायला वळला.

" विक्रम, सांग ना विक्रम ऐक माझं. मला सांग आधी. थांब." ती मागून बोलत होती काकुळतीने पण तो निघून गेला होता.

" विक्रम "


" ताई, अग ए काय झालं!" रिया दारातून धावत तिच्या बेडपाशी आली.

" काय गं काय झालं ?" ती धावत आली. तिच्या बाजूला येउन बसली.

" विक्रम विक्रम..... ते आलेले ना! " तिने इकडे तिकडे पाहत म्हटलं. ती बेडवरून उठून खिडकीजवळ गेली. इकडे तिकडे खोलीभर फिरली.

" ताई Calm down कोणीही नाहीय इथे!"  रिया उठून तिच्याजवळ आली.

" असं कसं! अग आलेले ना. इथे होते आत्ता मी सांगते ना." तिने पुन्हा खिडकी उघडली.

" ताई काय बडबडते ! सांगते ना मी कोणी नाही म्हणून." रियाने मागून जाऊन तिचा हात धरला.

" म्हणजे मी मी काय मेंन्टल आहे! वेड लागलय का मला ?" ती रियावरती ओरडली.

" ताई तू तू आधी शांत हो. ये इकडे. किती आरडाओरडा करतेस. आई बाबा झोपलेत ना." 

रिया तिला हाताला धरून बेड जवळ घेऊन आली. टेबल वरल्या तांब्यातील पाणी ग्लास मध्ये ओतून तिला प्यायला दिलं.

" ताई, शांत हो आधी. रिलॅक्स. स्वप्न पडलं असेल तुला. हा रिलॅक्स."  रिया तिच्या कपाळावर आलेला घाम पुसत म्हणाली.

" अग पण......"  पुन्हा तिने रियाकडे बघत म्हटलं.

" ताई वाजलेत बघ किती ते! एक वाजून गेलाय रात्रीचा. बाहेर पाऊस पण आहे."

" आ हा हा.....तू  तू इकडे कशी ?"  भानावर येत तिने रियाला विचारलं.

" हा, ते मी किचनमध्ये गेलेले पाणी प्यायला. तुझ्या रूमचे लाइट सुरू दिसले. आले तर दार पण उघडं होतं आणि तू अशी........."

" हं "  रियाचं सगळं ऐकल्यावर ती म्हणाली.

" बरं, झोप आता उद्या बोलु." रिया तिच्या पायावरती ब्लॅंकेट पांघरत म्हणाली. 

रियाच्या समजावण्याने तिने शहाण्या मुलीसारखी पाठ टेकली.

" गुड नाईट."  रिया हसून म्हणाली.

" हं."  तिने डोळे मिटुन घेतले तसा रियाने सुटकेचा श्वास घेतला.

 तिला वाटलं आता आई-बाबा उठून वरती येतात की काय! ती खिडकीपाशी गेली. खिडकी नीट बंद आहे का त्याची खात्री केली. तिची पर्स उचलून टेबलवर ठेवली. इतक्यात बेडवरती तिचे लक्ष गेलं तर एक कागद दिसला. तिने पुढे होऊन तो कागद हातात घेतला. त्यावरचे सुरुवातीचे शब्द आणि शेवटी विक्रम ची सही पाहून तिच्या रागाचा पारा चढला.

"अच्छा हिच्या पॅनिक होण्याचं कारण हे होतं तर!"  ती स्वतःशीच पुटपुटली. ताईला शांत झोपलेलं पाहून ती तिथून बाहेर पडली. अनघाच्या रूमचा दरवाजा बाहेरून लोटून घेतला आणि स्वतःच्या खोलीत आली. तिने मोबाईल हातात घेतला आणि एक नंबर डायल केला.

" हॅलो "  पलीकडून पटकन फोन उचलला गेला.


" हॅलो, मी बोलतेय रिया."  तिने थोड्या चिडक्या सुरात बोलायला सुरुवात केली.

" तू!  What happened ? ठीक आहे ना सगळं."  त्याने काळजीच्या सुरात पलीकडून विचारलं.

" ठिक नाहीये म्हणून तर तुम्हाला कॉल केला ना!" 

" म्हणजे! "  त्याने न कळून विचारलं.

" हं,  म्हणजे!  इतक सगळं करून सवरून आपण जणू त्या गावचेच नाही. कसं जमतं तुम्हाला आपण किती सभ्य आहोत हे दाखवणं!" 

" रिया काय बोलतेस तु! आता काय केलं मी ?" 

" काय नाही केलं तुम्ही!  सांगा ना, माझ्या ताईच्या लाईफची पार वाताहत करून टाकलीत. तिचं शरीर, मन, तिची स्वप्नं सगळ्या सगळ्या गोष्टी अशा क्षणात उद्ध्वस्त करून टाकल्यात तुम्ही. तिची एंगेजमेंट मोडली. बलात्कारित बाई  असा शिक्का बसला तिच्या अख्ख्या आयुष्यावर. नी अजून काय बाकी आहे. आता ही असली लव्ह लेटर्स पाठवून तिला अजून इमोशनली त्रास द्यायचा आहे का?" 

" रिया, प्लीज तू तू तरी ऐकून घे ना माझं. इकडे घरी ही कोणी माझी बाजू ऐकायला तयार नाही. तुझी मम्मी नी ताई पण ऐकुन घेत नाहीत निदान तू तरी. I know तू माझं काही ऐकून घेण्याइतकं बोन्डींग आपल्यात नाहीये. पण पण मी तुझ्याशी बोलायला येणारच होतो." तो पलीकडून म्हणाला.

" हे बघा मला नाही ऐकायचय तुमचं नी आईने तुम्हाला इथे यायला मनाई केलीय त्यामुळे तसा विचारही करू नका. तुमच्या वागण्याने आजवर ताईला फक्त त्रास झालाय! एखादी मुलगी तिचं काम प्रामाणिकपणे करते आणि तुमच्यासारख्या बॉस लोकांना डोईजड वाटते तेव्हा तिला रोखण्याचा हा असला मार्ग तुम्ही वापरता. तरी नशीब अजूनही तिने तिच्या सोबत काम करणार्‍या कुणालाही हे सांगितलेलं नाहीये. तिच्या जागी मी असते नी आमच्या ऑफिसात माझ्या सोबत कोणी असं वागलं असतं तर कधीच राजीनामा दिला असता." ती असं म्हणाली तसं तो पटकन म्हणाला,

" रिया मी मी समजू शकतो तुझा राग पण..."

" पण What ?  त्या रात्री तुम्ही तिच्याशी इतकं निर्दयी वागलात. तिला मारलंत. तिला गुंगीचे इंजेक्शन दिलं. त्या कडाक्याच्या थंडीत त्या अवस्थेत इथं दाराशी अक्षरशः गाडीतून ढकलून देऊन निघून गेलात तुम्ही. या जन्मात मी ते विसरणार नाही. मी गाडीचा पाठलाग केलेला रस्त्यापर्यंत त्याक्षणी जरा जरी मला समजलं असतं ना ते तुम्ही....... मला नाही माहिती मी तेव्हा काय केलं असतं.  हे असलं गलिच्छ वागताना ज्या माणसाने आपल्याला जन्माला घातलं त्या वडिलांचा तरी विचार करायचात." 

तिच्या शब्दा शब्दातला संताप त्याला ऐकताना जाणवत होता. तो गप्पपणे तिचं ऐकून घेत होता.

" तुम्ही प्लीज आता तरी पिच्छा सोडा तिचा. झाले न डिव्होर्स पेपर्स पाठवून मग संपलं आता सगळं. आता तरी दूर व्हा तिच्या आयुष्यातून बाय."  एवढं बोलून तिने फोन कट केला. त्याच्या डोळ्यात पाणी आलं.

" हॅलो हॅलो रिया."   तो बोलत होता पण पलिकडून फोन कधीच कट झाला होता. तो मटकन बेड वरती बसला. रियाचं बोलणं त्याच्या कानात घुमत राहिलं.
................................................

            सकाळी तिला लवकरच जाग आली. डोळे चोळत ती उठली. पायांवरचं ब्लॅंकेट बाजूला केलं तोच तो कागद दिसला. त्याचं ते पत्र!  तिने ते पुन्हा हातात घेतलं तस तिला आठवलं रात्री आपण इथे वाचत बसलो होतो आणि....... तो इथे!  काय होतं ते ? वाचता-वाचता डोळा लागला नी स्वप्न पडलं की भास झाला आपल्याला!  काय माहीत, पण त्याचे शब्द आठवले तसं तिला कसंतरीच वाटलं. ती अंथरुणातून उठली. एक नजर खिडकीपाशी गेली. तिने पुढे होऊन खिडकी उघडली. बाहेर पावसाची अजूनही रिमझिम सुरू होती. रस्त्याला लागून असलेलं एक वडाचं मोठं झाड रात्रीच्या वादळाने उन्मळून पडलं होतं. त्याच्या फांद्या तुटून पडल्या होत्या. चिखलाने पानांचा चोळामोळा झाला होता. रस्त्यावरून जाणारे येणारे एक नजर टाकून पुढे जात होते.तिला दया आली त्या वृक्षाची! 


' इतका मोठा वृक्ष असा कसा पडला नाही! किती भक्कम वाटतात पाहताना!'  तिच्या मनात आलं. आता चारचाकी, दुचाकी येऊन तिथं थांबल्या. बहुधा पालिकेचे कर्मचारी किंवा विद्युत मंडळाचे अधिकारी असावेत. ती खिडकीजवळून बाजूला झाली. मागे वळली नी ड्रेसिंग टेबल पाशी येऊन उभी राहिली.

बदामी रंगाचा सलवार कमीज, अंगावरती लपेटून घेतलेली ओढणी, पाठीवरती रुळणारे केस. तिने आरशात स्वतःला न्याहाळलं तस तिची नजर भागातल्या कुंकवा वरती स्थिरावली.

' किती महिने झाले ना घर सोडून! तिथून येताना भलेही मंगळसूत्र त्याच्यासमोर टाकून आलो आपण. आपल्यातला स्वाभिमान, आपल्यातली आजची स्त्री गप्प बसणं तेव्हा शक्यच नव्हतं. एका दिवसात आपण ते घर सोडण्याचा निर्णय घेतला. इथे आलो आई-बाबांकडे तरी तरी तो सोडल्यास घरातल्या कोणावरही आपला राग नव्हता.  साहेब, मम्मा, आत्या, नीतु, भावोजी सगळेच आपल्याला हवेसे वाटतात. त्यांच्यापैकी कोणाशी संबंध तोडणं इतक्या महिन्यानंतरही नाही जमलेलं आपल्याला! भाऊसाहेब आपला आदर्श होते जेव्हा आपण गुरुकुला शिकत होतो तेव्हापासूनच!  कॉलेजच्या काही चांगल्या आणि त्यांच्या दृष्टीने हुषार विद्यार्थ्यांमधे आपणही होतो. कॉलेजच्या बक्षीस समारंभात कितीतरी वेळा त्यांच्या हातून आपल्याला बक्षीसं घेण्याची संधी मिळाली. तेव्हा वाटलंही नव्हतं आपण काही वर्षांनी त्यांच्या सूनबाई वगैरे असू! कुठुन कशा गाठी जुळतील नी कोण कोणाशी बांधले जाईल दैवच जाणे! आपण इथेच नोकरीला लागलो काय नी हे असं सगळं.... आपण कॉलेज नविन जॉईन केलं तेव्हा  विक्रमचं सगळ्यांच्या तोंडून कौतुक ऐकून, त्याच्या कडक शिस्तीबद्दल ऐकुन किती कुतुहल नी कौतुक वाटत होतं त्याचं मनातून! त्याच्याशी बोलण्याची ओढ लागली होती. घरीही आईपाशी आपण त्याचं कौतुक  करायचो. रिया एकदा म्हणाली होती, असा मुलगा हवा जिजु म्हणून! ' खरंच देव ऐकतो का आपलं ?  काय माहित, पण सगळ्यांची आठवण येते. आई -बाबा म्हणतात, सगळं विसरून पुढे जायला हवं पण काय विसरायचं तेच कळत नाही! श्रीकांतसोबतच्या एंन्गेजमेंन्ट कडून किती अपेक्षा होती आपल्याला तेव्हा!  त्याचे आईवडील आपल्या घरात येऊन आपल्याला इतकं सगळं बोलून गेले. तो आपल्या बाजूने जरा तरी बोलेल अशी अपेक्षा होती तेव्हा. पण नाही झालं तसं काहीच! नंतर विक्रम...... ते कटु सत्य का गोड स्वप्न ते अजूनही समजत नाहीय. किती विश्वास होता त्याच्यावरती आपला! आणि आता हा आशिष. आता पुन्हा नव्याने कोणावरती विश्वास ठेवणं नको वाटतं. कोणी सुंदर सुंदर स्वप्न दाखवायला लागलं की भीतीच वाटते पुरुषांच्या औदार्याची. खरंच ती स्वप्नं सत्यात जरी आणली आपल्यासाठी कुणी तरी आपण असु का खूश?  त्यादिवशी आपण आशिषच्या हातून ती रिंग घालून घेतली त्याच्या समोर!  त्याक्षणी तो आणि समिहा त्यादिवशी कॉलेजच्या बाहेर उभे होते ते दृश्य डोळ्यासमोर उभं राहिलंचं. मनातून इतका राग येत होता विक्रमचा! त्याच्या खोटेपणाचा, गॅदरिंगच्या त्या रात्रीचा, दुसऱ्या कोणासोबत तरी तो आहे याचा सगळ्याचाच. का माहित नाही आणि एका क्षणी आपण हात पुढे केला त्या रिंग साठी तरी तरी तो मख्खपणे बसून होता तिथे!  वाटत होतं, त्याने तरातरा पुढे यावं. मला नी आशिषला काहीतरी बोलावं. आशिष सोबत भांडावं. त्याची ती अरेरावीची भाषा, तो मी च बेस्ट चा अॅटीट्युड, त्याचं ठणकावून बोलणं काहीही नव्हतं त्या दिवशी कॅफेमध्ये. परवा रात्रीही तो घरी सोडायला आला तेव्हा असा असा न बोलताच निघून गेला. पण त्याची ती अवस्था पाहून आपल्याला का वाईट वाटतय?  इतकं सगळं घडलेलं असतानाही अजूनही आपलं प्रेम आहे का त्याच्यासाठी! त्यादिवशी आशिष सोबत असताना सुद्धा त्याचा विचार येत होता मनात. नी  रात्री ते पत्र! ते वाचून इतका का आनंद झाला आपल्याला! आपल्यातली स्वाभिमानी बाई जिंकली मग तरीही...... कदाचित कदाचित आपल्यातली प्रेयसी संपली असेल किंवा आपण जाणून बुजून तिला संपवतोय का!  तिने तिचा हात समोर धरला. त्याने साखरपुड्याला घातलेली अंगठी अजूनही होती. तिने टेबलचा ड्रॉवर उघडला आणि छोटा बॉक्स बाहेर काढला तर त्यात अंगठी होती! तिने कॅफेमध्ये आशिष च्या हातून घालून घेतलेली आणि त्याच दिवशी घरी येऊन पुन्हा काढून ठेवलेली ती अंगठी तिने हातात घेतली. 

" आय एम सॉरी आशिष!"  तिने अंगठी बॉक्स मध्ये ठेवून दिली आणि बॉक्स पर्समध्ये ठेवला.

क्रमशः

🎭 Series Post

View all