बंधन भाग 117

Love Social

भाग 117
( गेल्या भागात ती खंदारे मॅडमच्या घरी गेली होती आणि आशिष तिच्या घरी येऊन थांबला होता. रात्री तो तिला सोडायला घरी आल्याचं पाहून आशिषला काही सुचलं नव्हतं. पाहूया पुढे)

             आशिष त्या दिवशी संध्याकाळी मुद्दामहून तिला भेटायला म्हणून तिच्या घरी आला होता. ती घरी नाही म्हटल्यावरती घरी येईपर्यंत तिची वाट पाहत तो थांबला. ती घरी आली ती देखील उशीराने.  रात्रीचे नऊ सव्वा नऊ झाले होते. आशिषने पुन्हा कुमुदकडे तिची चौकशी सुद्धा केली आणि तो बाहेर येऊन तिची वाट पाहत थांबला होता. ती गाडीतून उतरली.  आपण आलोय हे सरप्राईज देण्यासाठी तो आनंदाने पुढे जाणार इतक्यात विक्रमला गाडीतून उतरताना त्याने पाहिलं आणि तो जागीच थबकला. त्यानंतर त्याने जे पाहिलं ते पाहिल्यानंतर मात्र त्याच्या पायाखालची जमीनच सरकली होती. विक्रम असा इथे कसा तेही तिला घरी सोडायला? हा पहिला प्रश्न त्याच्या मनात आला. तिला त्याच्या मिठीत पाहून तर त्याला ती समोर आल्यावरती काय बोलावं तेच सुचत नव्हतं. त्यानंतर कुमुदच्या आग्रहास्तव तो बळेबळे जेवला पण डायनिंग टेबल वरती त्याचं लक्ष मात्र अनघाच्या चेहऱ्याकडे होतं. ती कसल्याशा विचारात वाटली त्याला!  त्यानंतरचे पुढचे चार-पाच दिवस तिच्या घरी तो फिरकला सुद्धा नाही. ना त्याने तिला फोन केले, नाही तो तिला कॉलेज सुटल्यानंतर भेटायला आला. श्रीधर- कुमुदच्या ते लक्षातही आलं नाही. त्या दिवशी रात्री विक्रम सोबत ती घरी आली होती हे त्याने श्रीधर किंवा कुमुदला सांगितलं नव्हतं! ना तो तिच्याशी याबद्दल काही बोलला होता कारण त्याच्या डोक्यात जे सुरू होतं त्याची कल्पना कोणालाच नव्हती !

" छे!  सगळं सगळं दिवसें दिवस कॉम्प्लिकेटेड होत चाललय. सगळा गोंधळ झालेला आहे माझ्या आयुष्याचा! "

 त्याने जोराने बाजूच्या भिंती वरती हात आपटला.

" आशिष Calm down अरे झालंय काय तुला इतकी तणतण करायला! गेले चार दिवस बघतोय एवढ्या तेवढ्या गोष्टींवरून चिडत असतोस! सकाळी त्या भामाबाई बिचार्‍या  केर काढत होत्या त्यांच्यावर पण वैतागलास. झालंय काय तुला?"

" बाबा, होणार काय! ती अनघा ओ......" त्याने तिचं नाव घेतलं तस हरीश हसले.

" हा आमची भावी सुनबाई!  किती रे उतावळा होतोस. अरे देईल ती उत्तर. इतका प्रेम करतोस......."  ते हसले तसं त्याने त्यांच्याकडे पाहिलं.

" बाबा, हसताय काय ओ!  हे हे सगळं तुमच्या सुपीक मेंदूमुळे झालय !   इतका जीव ओतून मी फायनली या पोस्ट पर्यंत पोचलो. मला यु एस ला जायचा चान्स मिळतोय. जाऊ द्या ना सुखासुखी!  का मला या लग्नाच्या नसत्या फंदात पाडताय. बरं, आणि शोधून शोधून कोण शोधली तुम्ही माझ्यासाठी! लग्न झालेली, लग्नाआधी सगळ्याची माती झालेली ही असली असली पोरगी माझ्या गळ्यात बांधताय  तुम्ही!" 

" गप्प बैस. ती वेल एज्युकेटेड आहे. सुंदर आहे आणि तिचा हा असला भूतकाळ आहे ते बरंच आहे एका दृष्टीने. मी आधी तुला सगळच सांगितलय. तेच तेच पुन्हा बोलायला लावू नकोस.  तसही तुला लग्नात इंट्रेस नव्हताच ना! मग बरय ना, तु तुझ्या करिअरवर कॉन्सन्ट्रेट कर. ती थोडी ना तिथे जाऊन जॉब करणार आहे!  ती बघेल की घरचं सगळं निमूटपणे. तिथं भामाबाईंसारख्या कामवाल्या नाही मिळत माहितीये ना. त्यापेक्षा हे बर आहे ना आणि आयुष्यभर म्हणशील ते तिला ऐकायला लागेल. इतकं सगळं असूनही तू लग्न करतोयस. असा भूतकाळ असणाऱ्या पोरींना समाज स्वीकारत नाही त्यामुळे आयुष्यभर श्रीधर तुझ्या पायाची पूजा करेल. जावयाचे सगळे लाड पुरवून घेशील. शिवाय आधीचा तिचा पास्ट, त्यात विक्रमने काय दिवे लावलेत ते तिलाही माहितीय आणि तिच्या घरच्यांनाही माहितीय. इतकं सगळं होऊन  गेलय. तुमचं लग्न झालं की पुन्हा ती तुला सोडून कुठे जाणार आहे!  काहीही करून तिला हे लग्न टिकवावं लागेल. तिच्या आईवडिलांसाठी! मुलगी एकदा लग्न तोडून घरी आलेली चालते पण दुसर्‍यांदाही ती येते तेव्हा लोक तिच्यातच खोट काढतात त्यामुळे  यु.एस. वरुन पुन्हा इथं माघारी यायचा ती विचार सुद्धा करणार नाही."


" बाबा पटतय मला सगळं पण हे इट्स ऑल अबाउट फ्युचर. आताच काय?  साधा भाव सुद्धा देत नाही ती मला. काय नाही केलं मी! काका - काकुंचं मन जिंकलं. तिच्या आईच्या सतत पुढे मागे करून तिचा मुलगा व्हायचा प्रयत्न केला. ती रिया, तिच्याशी दोस्ती केली. नाकापेक्षा मोती जड!  रियाच्या शॉपिंग वर पैसे उधळले मी! अनघाला भेटायचा एक चान्स सोडला नाही. मी माझी कामं सोडून हिच्या मागे मागे करतोय इतके महिने! तिला डेटला घेऊन गेलो. रिंग देऊन प्रपोज करून झालं तरी ही बाई ऐकायला तयार नाही. एकदा एक बोलली तर दुसऱ्यांदा काहीतरी भलतच. मला कळतच नाही ती बोलते का तिच्या तोंडून दुसरं कोणी!
काय तर म्हणे रात्री लॉंग ड्राईव्ह ला जायच मस्त! तिची ती प्रेस कॉन्फरन्स पण बघितलेली मी. इतकी स्वतःची इज्जत गेली तरी एवढा ताठा येतो कुठून! नी तसही जे झालं त्याला ती जबाबदार होतीच. उगीच त्या कॉलेजच्या प्रकारात नाक खूपसायची काही गरज होती का! अति शहाणपणा नडला दुसरं काय."

" अरे हातात नोकरी आहे. पैसा आहे म्हणून हा अॅटीट्युड. लग्नानंतर हे काही असणार नाहीये मग तुझा शब्द झेलते की नाही बघ."

" बाबा काय लावलंय. सारखं लग्न लग्न मला माझं करिअर इम्पॉर्टंट आहे सध्या बस."  तो त्यांच्याकडे पाहत म्हणाला.


 "  मूर्खासारखं बोलू नकोस. एकतर या लग्नाच्या विषयाची सुरुवात मी केली होती श्रीधरशी बोलून. तुझ्या या ॲम्बिशन्स गळ्याशी आल्या असत्या! कोण तुझी ती बॉस हा ती श्वेता तिवारी. तुझं प्रमोशन तिच्या हातात म्हणून तू तिला इंप्रेस केलस. प्रेमात पाडलस.  लिव्ह इन मध्ये राहत होता तुम्ही! ती पोरगी इथं सांगली पर्यंत आलेली. तुझ्याशी लग्न करायला हटून बसलेली ती! नशीब ते प्रकरण तिच्याशी बोलून मिटलं.  आणि तिची पण ट्रान्सफर चंदीगडला झाली ते बरंच झालं."

" Come on बाबा, कॉर्पोरेट मध्ये या गोष्टी होतच असतात." तो म्हणाला.

" म्हणून म्हणून ती अनघाच बरी आहे लग्नासाठी."

" हं पण बाबा, माझ्या डोक्यातले प्रश्न ! त्यांची उत्तर मला मिळत नाहीत तोपर्यंत मी या लग्नाला तयार होणार नाही. सीतेला पण अग्निपरीक्षा द्यायला लागलेली तर ही कोण आहे! "

 तो कुत्सिकपणे हसून निघून गेला. हरीश त्याच्याकडे पाहतच राहिले. सगळं जुळत आलेलं तुटू दे नको हीच त्यांची इच्छा होती.
....................................................
 

            त्या दिवशी रात्री तिला घरी सोडल्यापासून त्याच्या नजरेसमोर सारखा तिचा चेहरा यायचा. गेल्या तासाभरा पासून मॅनेजमेंटवरचं एक जाडंभरडं पुस्तक हातात घेऊन तो बसला होता. समोरच्या पानांवरची अक्षरं डोळे वाचत होते पण त्याचा अर्थ मेंदूपर्यंत पोहोचत नव्हता. मग ते पुस्तक वाचणंही त्याला नीरस वाटू लागलं. करायचं काय रात्री हा प्रश्न गेले कित्येक महिन्यांपासून त्याचा पिच्छा पुरवत होता. दिवसभरात काय काय झालं, दुसऱ्या दिवशी काय करायचं याचा विचार तो हल्ली करायचा नाही आणि विचार केला तरी बोलण्यासाठी समोर कोणी माणूस नसायचं. आत्या, अरुंधती किंवा जितेंद्र त्याच्याशी बोलायला यायचे. आत्याला स्वयंपाक घरातील कामं असायची शिवाय येणाऱ्या-जाणाऱ्यांकडे लक्ष द्यावं लागायचं. भाऊ साहेबांना भेटायला येणाऱ्या माणसांची बडदास्त ठेवण्याचही काम असायचं. जितेंद्रला दिवसभर कारखान्याची कामं असायची. तो रात्री निवांत झोपून जायचा. अरुंधती त्याच्याशी बोलण्याचा प्रयत्न करायची. एक दोनदा आडून आडून अनघाशी मी बोलून पाहू का काही हे सुद्धा तिने त्याला विचारून पाहिलं. पण तोच नको म्हणाला. आता तिला कोणी जाऊन, समजावणं, तिच्याशी बोलणं या पलीकडे सगळ्या गोष्टी पोहोचल्यात त्यामुळे तिला आपलं ऐकावसं वाटलं तर ती विचार करेल आपला अस आता त्याला वाटू लागलं होतं. आपण त्याच्या बाबतीत काही करायला गेलो तर ते फिस्कटतं याचा अनुभव अरुंधतीला होताच त्यामुळे त्याच्या म्हणणण्यावरुन ती शांत राहिली. असं एकटं बसलेला असताना त्याच्या मनात बरेच विचार सुरू असायचे. तिचे, घरातल्यांचे, कॉलेजचे. त्या घटनेनंतर जे काही घडलं ते सगळं त्याला आठवत राहायचं. त्याला त्या दिवशी रात्री सुद्धा तिच्याशी बोलायचं होतं. पण आपल्या बोलण्यावर ती काय बोललेलं हे ऐकण्याचं त्राण त्याच्यात नव्हतं. गेले सात-आठ महिने सगळ्यांच्या तोंडून टोमणे, शिव्याशाप निंदानालस्ती ऐकुन ऐकुन त्याचं मन बधीर झालं होतं. कितीही काहीही झालं तरी ती आपल्याला चांगलं ओळखते. तिचा राग निवळेल मग ती आपलं ऐकून घेईल हा विश्वास इतके महिने होता त्याला जो आता मोडून पडला होता. कॅफे मधला तो अंगठीचा प्रसंग त्याच्या नजरेसमोरून जात नव्हता. ती आपल्या जागी दुसर्‍या कोणाचा विचार करू शकते ही कल्पनाही त्याला करवत नव्हती. त्याने हातातलं पुस्तक बाजूला ठेवलं आणि समोरचा कोरा कागद घेतला आणि पेन स्टँड मधलं पेन उचललं.

प्रिय अनु

 खरं तर सुरुवात कुठून करावी हे नाही समजतय. तुझ्या आयुष्याचा, तुझ्या भविष्याचा, सुंदर स्वप्नांचा जिथे मी शेवट केला तिथून आपल्या नात्याची सुरुवात झाली होती. तरीही आज त्या घटनेनंतर दीड वर्षांनी का होईना पण मला बोलायचं कारण आपल्या दोघांमध्ये बोलण्यासारखं बरंच काही आहे हो ना! तू कितीही नाकारलस ना तरी तुलाही माहीत आहे ते. आपल्या दोघांमध्ये काहीतरी स्पेशल होतं. आजही आहे निदान माझ्याकडून तरी! मघाशी म्हटलं ना, 'प्रिय ',  माझी प्रिया, सखी, साजणी तूच तर आहेस. आता तुला वाटतं माझ्या आयुष्यात दुसरी कोणीतरी आहे असं. पण खरं सांगू का, माझ्या दारात गुलाबाचं झाड असताना मी इतर फुलांकडे का बघेन. तुझ्या इतकं जवळचं तसं कधीच कुणी नव्हतं. हा I agree समिहा किंवा इतर कोणाच्यातरी रूपाने कुणीतरी आलं असतं माझ्या आयुष्यात आणि मम्मामुळे तर कोणी तरी भेटलंच असतं. तिने काही माझी पाठ सोडली नसती. पण त्या आधीच....... त्या आधीच माझ्या हातून हे असं काहीतरी घडलं आणि भाऊसाहेबांमुळे का होईना तु माझ्या आयुष्यात आलीस फक्त माझी दुसरी चुक हि की मी तुला गृहीत धरलं. तू माझ्या आयुष्यात, माझ्याजवळ कायमच असणार आहेस! मला तुला फसवायचं नव्हतं आणि तुला त्रास देण्यासाठी मी खोटं बोललो नव्हतो. तुला माझ्या आयुष्यात ठेवून मला काही मी जिंकल्याचा, तुला हरवल्याचा किंवा तुझ्यावरती उपकार केल्याचा आनंद बाळगायचा नव्हता. हा, पण मला योग्य वेळी खरं नाही सांगता आलं हे मान्य करतो मी. तू माझ्या आयुष्यात आलीस, मला प्रेमाचा अर्थ वगैरे कळला आणि मी बदललो अशा गोष्टी नाही सांगायचा मला कारण मलाही माहित आहे आणि तुलाही मी अजूनही तसाच आहे पूर्वीसारखाच! त्यामुळे मी आदर्श मुलगा झालो आहे किंवा मी खूप सुधारलोय तेव्हा तू माझा विचार कर असं माझं अजिबात म्हणणं नाही. फक्त माझी बाजू ऐकून घ्यावी हीच इच्छा होती आणि आहे. सतत खोटं बोलणारा, घरच्यांना अंधारात ठेवणारा, कसेही निर्णय घेणारा, अहंकारी पुरुष नवरा म्हणून कोणालाच नको असतो. तुझी ती अपेक्षा काही चुकीची नाही. पण एक सांगू का? नाही, मी समर्थन नाही करत आहे माझ्या चुकांचं. जगात खरच कोणी शंभर टक्के वाईट आणि शंभर टक्के चांगलं नसतं ना ! पण तुझा निर्णय घ्यायला तू स्वतंत्र आहेस. तू म्हणाली होतीस तसं आयुष्य तुझय त्यात माझी ढवळाढवळ नको. पण..... पण I....I really miss you. अनु, असं तुला विसरणं नाही ग शक्य. तुझ्या सोबत घालवलेले सगळे क्षण आता त्यांच्या आठवणी झाल्यात. अनु, अगदी आजही मला तुझ्याकडे पाहत रहावसं वाटतं. तू माझ्या आजूबाजूला असावीस असं वाटतं. तुला बरं वाटत नसलं की घास भरवावासा वाटतो. मला किती कामाला लावायची तू दिवसभर! किती दिवसात कोणी हट्टाने कॉफी नाही मागितली माझ्याकडे माझ्या हातची! आपल्या रूम ची गॅलरी पण सुनी सुनी असते हल्ली. ड्रेसिंगटेबलचा आरसासुद्धा हल्ली हसत नाही. माझ्या पाठी पडून सेल्फी घेणार कोणी नसतं. सेल्फी घ्यायचा तर आधी छान हौसेने सजावं लागतं.  वॉर्डरोब तर तसाच बंद असतो. वस्तू आहेत पण त्या हातात घेणारं कोणी नाही. सकाळ कंटाळवाणी असते आणि रात्र अशी एकटी! रात्री झोपायला उशीवरती डोकं टेकल्यावरती डोळे बंदच होत नाहीत. तू नसतेस ना माझ्या कुशीत येऊन गप्पा मारायला. अनु, आपल्यात जे होतं ते सुंदर होतं खूप आणि हे इतकंही पुरेसं असतं पुरुषांना. प्रत्येक वेळी तुम्हा मुलींना वाटते फक्त तितकीच अपेक्षा नसते आमची तुमच्याकडून. आणि तुम्ही ऐकवता ना तुमचं ते नेहमीचं वाक्य, ' सगळे पुरुष सारखेच ' असं नसतं ग प्रत्येक माणूस वेगळा असतो.  अनु , मला तुझ्याकडून कसल्याच अपेक्षा नव्हत्या. माझ्या हातून चुका घडलेल्या असताना, मी पुन्हा तुझ्याकडून अपेक्षा ठेवण्याच्या, तुझ्यावरती हक्क गाजवण्याच्या गोष्टी कश्या करेन. तू माझी होण्यापेक्षाही मला तुझा व्हायचं होतं. फक्त तुझा. असो, खूप बोललो पण..... आजही अनु मी तुझ्या उत्तराची वाट पाहतोय.

तुझा विक्रम


           शेवटचे शब्द लिहून त्याने पेन बाजूला केला. त्याच्या डोळ्यातील थेंब कागदावरती पडले. पत्राची घडी घालून ते पत्र त्याने लिफाफ्यात भरलं नी त्यावरती To, Angha Karkhanis ' एवढं लिहून त्यावरून अलगदपणे हात फिरवला. तिथेच टेबलवरती ते ठेवलं आणि स्टडी टेबलच्या खुर्चीतून तो उठला. बऱ्यापैकी रात्र झाली होती. घरातले सगळे केव्हाच झोपी गेले होते. त्याने बेडवरच्या उशीला डोकं टेकलं. या कुशीवरून त्या कुशीवर करण्यात दहा एक मिनिटं गेली. पडल्या पडल्या हातानेच त्याने कॉर्नरपिसचा ड्रॉवर उघडला आणि गोळ्यांचं पाकिट बाहेर काढलं. गोळी घेतली आणि एक दीर्घ श्वास घेतला. खोलीतले दिवे बंद केले आणि तो झोपी गेला.
......................................................
 

         अनघा एफ.वाय.च्या वर्गातून बाहेर पडली. आता शेवटचं लेक्चर टि.वाय.च्या डिपार्टमेंन्टला होतं. हातातील पुस्तकं सावरत ती बाहेर पडली तर समोरून दिनेश येताना दिसला.

" दिनेश इकडे ये जरा."

" हा बोला मॅडम."    तो तसाच चालत पुढे येऊन प्रसन्न चेहऱ्याने तिच्यासमोर उभा राहिला.

" हे पुस्तक खंदारे मॅडमच्या केबिनमध्ये नेऊन दे."

 तिने हातातील मोठे पुस्तक त्याच्या हातात दिलं.

" हा, बरं मॅडम, एक मिनिट."  त्याने तिला हाताने थांबवलं आणि शर्टच्या खिशात हात घातला.

" मॅडम हे दिलय सरांनी तुम्हाला द्यायला. आजच दे म्हणाले होते. मी येणारच होतो द्यायला."

 त्याने लिफाफा तिच्या हातात दिला.

" हा, बरं."   ती लिफाफ्याकडे पाहात म्हणाली.

" हा अच्छा येतो."

" ऐक ना."  तिने न राहून त्याला थांबवलं.

" हा, बोला ना."

" आहेत का ते ?"   तिने विचारलं.

" नाही, ते गेले केव्हाच. घरी गेले की बाहेर कुठं काय माहित नाही बुवा."

" बरं जा तू." ती फार काही न विचारता म्हणाली तसा तो निघून गेला.

 ती हातातील लिफाफ्याकडे पाहतच राहिली.

क्रमशः

🎭 Series Post

View all