बंधन भाग 112

Love Social

भाग 112

( गेल्या भागात नीतू रक्षाबंधनाच्या दिवशीही त्याच्याशी बोलली नव्हती. आत्याने समजावलं तरी ती ऐकली नाही. अनघा जितेंद्रला आठवणीने भेटायला गेली. पाहूया पुढे)

           रक्षाबंधनाचा दिवस जितेंद्र साठी आनंदाचा गेला. दरवर्षी नीतू राखी बांधायची आता यावर्षी वहिनी सुद्धा होती! गेल्या वर्षभरात त्यालासुद्धा अनघाच्या घरभर वावरण्याची, आजूबाजूला असण्याची जणू सवय झाली होती. त्याने कधी कल्पनाही केली नव्हती की, आपल्या भावाच्या एका  दुष्कृत्यामुळे आपल्या वहिनीला घर सोडण्याची वगैरे वेळ येईल. इतकं सगळं घडलं होतं. भाऊसाहेबांनी तर विक्रम आणि त्याचं आयुष्य, त्याचं अनघा सोबतच नातं या गोष्टींमध्ये लक्ष घालणचं आता बंद केलं होतं. त्यांना अनघा सुनबाई म्हणून पसंत होतीच. पण आता असं सगळं असताना आणि त्यातून तिच्यावरती ओढवलेल्या प्रसंगांना आपला लेक जबाबदार असताना तिला कोणत्या तोंडाने झालं गेलं विसर असं सांगायच हा प्रश्न त्यांच्यासमोर असायचा शिवाय विक्रमला शिक्षा काय द्यायची हेही त्यांना समजत नव्हतं.  राजेशिर्के  ट्रस्टची  सगळी सूत्र त्यांनी विक्रम कडून पुन्हा आपल्या हातात घेतली होती. त्याला गुरुकुलच्या कामातून मोकळा करणं, प्रॉपर्टीतून बेदखल करणं, राजेशिर्के प्रशालेच्याबाबतच्या निर्णयांमधून त्याला वगळणं असल्या गोष्टींनी काहीही साध्य होणार नाही हे भाऊसाहेबांना माहीत होतं. त्यामुळे त्यांनी यातलं काहीच आतापर्यंत केलं नव्हतं! त्याच मन जरा जरी जिवंत असेल तरी आपलं त्याच्याशी संबंध तोडणं, एकाच छताखाली राहून त्याच्या सोबत न बोलणं याचा त्याला नक्की त्रास होईल आणि हीच आपल्याकडून त्याला शिक्षा या विचाराने ते वागत होते. जितेंद्रच्या हे लक्षात येत होतं. दुसरीकडे नीतू, ती तो समोर आला तरी त्याच्याशी बोलायची नाहीच. पण बोलली तरी तिच्या तोंडून त्याच्यासाठी तिखट शब्दच बाहेर पडायचे. भाऊसाहेबांसारखं शांत राहणं तिला जमायचं नाही. या सगळ्यामुळे मम्मा काळजीत असते, आपण समोर आलो तरी ती विक्रमचा विषय काढते. त्याच्याशी बोलायला आपल्याला सांगते हे जितेंद्रला माहीत होतं. अनघाचे आई-बाबा तिच्या आणि विक्रमच्या डिव्होर्स बद्दल विचार करतायत हे कळल्यावर ती अजूनच काळजीत पडेल म्हणून त्याने याबद्दल अाधी आत्याशी बोलायचं ठरवलं.

" आत्या काय doing ?"  

तो दुपारी कारखान्यातून आला तोच स्वयंपाकघरात आला आणि इकडे तिकडे नजर फिरवत त्याने आत्या सोबत बोलायला सुरुवात केली.

" काय करनार, तुज्यासाटी ताट वाढती. बाहीर बस की. येते म्या घेऊन जेवन."

 आत्या ताटात भाजीची वाटी ठेवत म्हणाली.

" हा कर काय ते."  त्याने पुन्हा नजर बाहेर टाकली.

" काय र डोळं का भिरभिरत्यात अासं ! काय बोलायचं व्हतं काय ?"  ती त्याच्याकडे पाहत म्हणाली.

" बोलायचं तर आहेच." 

" व्हय ना मग बोल की!"  

" परवा...... वहिनी आल्या होत्या कारखान्यात. ते रक्षाबंधन."

" बरं, मग म्होरं."

 त्याचं बिचकत बिचकत बोलणं ऐकून ती म्हणाली.

" ते...... विक्रम त्याने... त्याने घटस्फोटाचे कागद पाठवले त्यांना."

" काय!  अार पन त्यो...."   आमटी वाढताना तिचा हात क्षणभर थबकला.

" ऐक आधी, खरंतर वहिनींच्या आई-बाबांना आता हे नातच नकोय म्हणजे तसं त्यांना वाटणं काही चूक नाही ना! कुमुदकाकूंनी त्याला घटस्फोटाबद्दल......"

 जितेंद्र म्हणाला तसं सगळं लक्षात आल्याच्या अविर्भावात ती बरं म्हणाली.

" हं, मग तुज्या वैनीचं काय मत? ती काय म्हनती?"

" त्या काय म्हणणार! धर तोडताही येत नाही आणि जोडता पण येत नाही अशी गत झालीय."

 जितेंद्र उसासे टाकत म्हणाला.

" काही जोडण्या- तोडण्याचा विचार करायची गरज नाहीये." नीतू आत आली तस जितेंद्र मागे वळला.

" अगं अस कसं म्हणतेस तू! मग काय करायचं ?"

 जितेंद्र थोडासा चिडक्या सुरात म्हणाला.

" इतकं सगळं एका मुलीच्या बाबतीत घडल्यानंतरही तिने मनाचा मोठेपणा दाखवण्याची अपेक्षा का तुमची ?"

 ती चिडून म्हणाली.

"  अग तू "

" जितू, थांब जरा तू. नीते सगळं तोडनं अासं सोपं असतया काय!"  

आत्या आर्जवी आवाजात म्हणाली.

" वा! मला ना या पोकळ फिलोसोपी पटतच नाहीत. प्रत्येक फिलोसोफी बाईच्या जगण्याशी आणून जोडतात लोक! विनाकारण एखादीच्या डोक्याचा ताप अजुन वाढवायचा. बाईला तिच्या आयुष्यात निर्णय कसे घ्यायचे ते बरोबर कळतं पण या सगळ्यात या फिलोसोपी आणि आजूबाजूला असणारी कान टोचणारी माणसं यामुळे या वहिनी सारख्या बायका गोंधळतात, घाबरतात नी त्यांची मनं अस्थिर बनतात. स्वतःपेक्षा ही मग आजूबाजूच्या चार लोकांच्या म्हणण्याचा विचार आधी डोक्यात येतो."

"  नीते तसं नाहीये अगं वहिनींना खरंच....."

 जितेंद्र तिचं बोलणं थांबवत म्हणाला.

" बस पुरे आता आणि काही झालं तरी त्या माणसाबद्दलच माझं मत बदलणार नाहीये." 

 इतकं बोलून ती तरातरा निघून गेली. आत्या नी जितेंद्र एकमेकांकडे पाहत राहिले.

" आत्या हिला समजावण्यात अर्थच नाही."

" तू शान्त हो आधी..जा हातपाय धुन घे." आत्या शांतपणे बोलली तस तो हो म्हणाला.
..................................................................


         नीतू स्वयंपाकघरातून रागाने तिच्या खोलीत निघून आली. जितेंद्र विक्रम ची बाजू घेऊन नेहमी बोलायचा आज आत्या पहिल्यांदा उघडपणे त्याची बाजू घेऊन बोलली होती याचं तिला वाईट वाटत होतं. ' आत्या असं कसं त्या माणसाच्या बाजूने बोलू शकते! चूक ती चूकच आणि ही काही लहानसहान गोष्ट आहे का! जितूचं ठीक आहे पण आत्यासुद्धा तिच्या हो ला हो काय करते. अरे, इतकं सगळं झाल्यानंतर तिच्या आई-बाबांनी अजून काय करायला हवं होतं आणि वहिनी पण ना '
 
ती खोलीत येरझार्‍या घालत होती पण तिच्या डोक्यात मात्र हेच सगळं सुरू होतं. अत्याचारांनी ग्रासलेल्या, दीनदुबळ्या बायकांसाठी आपण काम करतो. बाहेर जाऊन त्यांना उपदेशाचे डोस देतो आणि आपल्या घरीही अशी व्यक्ती आहे . तिला मदतीची, आधाराची गरज होती हे आपल्या लक्षातही नाही आलं. या गोष्टीची तिला जास्त खंत वाटायची आणि त्यामुळे तिची चिडचिड व्हायची. तिने याच विचारात बेडवरचा मोबाईल उचलला नी अनघाला फोन केला.

" हॅलो, बोला नीतू मॅडम!" 

 पलीकडून लगेच तिने फोन उचलला.

" काय ग गप्प का अशी!"  ती गप्प बसलेली पाहून अनघानेच विचारलं. तिचा आवाज ऐकून नितुला जरा बरं वाटलं. तिने स्वतःचा राग शांत करण्याचा प्रयत्न केला आणि बोलायला सुरुवात केली.

" तू डिव्होर्स पेपर्स बद्दल काय......"

" अरे बातमी पोहोचली म्हणायची घरी! "    नीतूच्या गंभीर आवाजातल्या बोलण्यावरती तिने हसण्याचा प्रयत्न करत म्हटलं.

" वहिनी सिरीयसली विचारते मी आणि तू पण सिरीयसली विचार कर या सगळ्याचा आता."  नीतू तिला झापत म्हणाली.

" हा विचारच करत असते मी......"

" मग वहिनी किती दिवस अशी बसणार आहेस आणि तुझ्या आई बाबांचं तरी काय चुकतंय! दुसरे कोणी त्यांच्या जागी असते तरी त्यांनी हाच विचार केला असता की आपल्या मुलीचं आयुष्य मार्गी लागावं."

" हो तुझं बरोबर आहे पण..... पण मला समजतच नाहीये काय करावं." ती हताशपणे नीतुला म्हणाली.

" अगं इतकी स्ट्रॉंग आहेस तू. इतकी शिकलेली, स्वतःच्या पायावर उभी असणारी, जे चाललंय त्याला खंबीरपणे सामोरी जाणारी, ताठ मानेनं घर सोडलं होतस तू मग आता का अशी चलबिचल? वहिनी,माझं त्या माणसाशी किंवा तुझं त्या माणसाशी काय नातं आहे हा मुद्दाच नाहीये इथे. मला इतकंच कळतं, तो माणूस तुझा गुन्हेगार आहे. तुझ्याशी क्रुरपणे वागणारा तो फक्त एक पुरुष आहे नी तू स्त्री इतकच लक्षात ठेव. वहिनी तू काय करावं मी नाही सांगणार. तू त्याला कोर्टात खेचायचं की डिव्होर्स देऊन नवं आयुष्य सुरू करायचं तुझं तू ठरव. I'm with you इतकच."

ती निर्धाराने म्हणाली तसं अनघालाही बरं वाटलं.

" हो ग I know that  आणि हे आत्ताच तुम्ही जे लेक्चर दिलं ना ते लक्षात ठेवीन मी." अनघा थोडीशी हसत म्हणाली.

" हो, बरं ठेवू."

" ओके बाय."  म्हणून नीतूने फोन ठेवला. 

या क्षणी तू फक्त एक स्त्री आहेस हे शब्द तिच्या कानात घुमत राहिले इतक्यात हातातला मोबाईल पुन्हा वाचला तर आशिषचा फोन!

" हॅलो." तिने फोन उचलला.

" हॅलो अनघा, बिझी आहात का तुम्ही ?"

" नाही बोला ना."

" आपण भेटू शकतो का ? नाही म्हणजे आज असं नव्हे नेक्स्ट चार-पाच दिवसात आहे का तुम्हाला वेळ ?"
 त्याने विचारलं.

" आ.......हो पण काही काम ?"  तिने विचारलं.

" हो बोलायचं होतं जरा. भेटल्यावरती बोलूया का ?"

" हो ठीक आहे."  तिने भेटायला हो म्हटलं तसा त्याचा चेहरा आनंदाने खुलला.

" बरं, ठेऊ का मी ?"  त्याने पुन्हा विचारलं.

" हो, बाय. "

ओके बाय म्हणून त्याने फोन ठेवून दिला.
.............................................

           अनघाचं पार्कमधल्या भेटीतला बोलणं, त्यानंतरच्या काही दिवसातच नीतूचं रक्षाबंधनाच्या दिवशी त्याच्याकडे पाठ फिरवून निघून जाणं यामुळे तो उदास होता. अनघा फेब्रुवारीत घर सोडून गेल्यानंतरचे काही दिवस तो जसा उदास, बेचैन आणि शांत असायचा तशी स्थिती आता पुन्हा झाली होती. मध्यंतरी ऐन परीक्षांच्या तोंडावरती बापूसाहेबांनी केलेले कॉलेज वरती आरोप, भाऊसाहेबांचे नाव खराब करण्यासाठी केलेले राजकारण आणि त्यामुळे गोंधळून गेलेले कॉलेजमधले सगळेजण अश्यावेळी आपण पुढे होऊन सगळं हाताळायला हवं, सगळ्यांना विश्वास द्यायला हवा असं वाटून त्याने पुन्हा आपल्या वैयक्तिक गोष्टी बाजूला ठेवून वागायचं ठरवलं होतं. त्यातच अनघाची पत्रकार परिषद झाली आणि त्यात तिने सगळ्यांसमोर आपली तरफदारी करणं, कॉलेजमधल्या भ्रष्टाचारांच्या प्रकरणातून तिच्यावरती नको तो प्रसंग ओढावला ही गोष्ट तिने पूर्णपणे नाकारणं यामुळे त्याला पुन्हा आशा वाटू लागली होती की काहीतरी चांगलं घडेल. ती जरी घर सोडून गेली असली, आपल्या सोबतचा संपर्क आणि संवाद मिटवला असला तरी तिच्या मनात मात्र आपली जागा आहे तशीच आहे आणि ही गोष्ट त्याच्यासाठी खूप होती. त्यामुळे तो कितीही बेचैन किंवा दुःखी असला तरीही अजून त्याने परिस्थितीपुढे हात टेकले नव्हते. त्याचा विश्वास अजूनच वाढला होता. गेल्या महिन्यात अचानक तिच्या घरी जाण्याची आणि तिच्यासोबत थोडा वेळ घालवण्याची मिळालेली छोटीशी संधी, त्यानंतर त्याने पाठवलेल्या डिव्होर्स पेपर वरती तिचं चिडणं यामुळे त्याला काहीतरी चांगलं होण्याची अपेक्षा वाटू लागली होती अशातच एके दिवशी नताशाचा भेटूया बोलायचेय असा मेसेज आला. त्याला वाटलं ती अनघाला भेटून बोलली असेल आणि कदाचित अनघाने तिचं ऐकूनही घेतलं असेल नी याबद्दलच सांगायला ती भेटणार असेल! ठरल्यावेळी ते भेटणार होते त्या रेस्टॉरंटला तो जाऊन पोचला तर तिचा पत्ताच नव्हता! इकडे तिकडे नजर फिरवत तो एका टेबलची खुर्ची सरकवून बसला. थोड्याच वेळात एक मुलगी त्याच्या समोर येऊन उभी राहिली. तिने चेहरा स्कार्फ ने पुर्णतः गुंडाळला होता फक्त डोळे तेवढे दिसत होते.

" हाय "  ती म्हणाली आणि पटकन त्याच्या समोरची खुर्ची सरकवून बसली.

" नताशा What's this."  त्याने आश्चर्याने विचारलं. तिने अजूनही चेहर्‍याभोवतीचा स्कार्फ सोडला नव्हता.

" विक्रम तुने यहा क्यू बुलाया? बाहर कही भी मिल सकते थे हम लोग।" ती हळू आवाजात म्हणाली.

" रिलॅक्स..... इतकं पॅनिक......" तो पुढे बोलणार तोच ती बोलायला लागली.

" अरे वो राजेश और उसका चमचा वो.....वो क्या नाम उसका...... हा वो संदीप.... उनकी वजह से अलर्ट रहना पडता है..... और......"

" काय ?" त्याने विचारलं.

" और.... ना जाने किसी ने हमे साथ मे देख लिया तो...." ती बिचकत बिचकत म्हणाली.


" हा पण....."

" पनबिन  काय नायी विक्रम, तुम जैसे बडे घर के इंसान का मेरे साथ हो ना ये बात अगर किसी को पता चली ना तो तुम्हारी बडी बेइज्जती होगी।"

" नताशा, शांत हो आधी. ओके ओके आय कॅन अंडरस्टँड. तू काय सांगणार होतीस?"  त्याने विचारलं तसे दोन क्षण शांतता पसरली.

" वो मुझे..... मुझे मुंबई जाना पडेगा।"

" Why? I mean.... पण..."  

 तिचं बोलणं त्याच्यासाठी अनपेक्षित होतं.

" देखो, तुम चिंता मत करना मे फिर से आऊंगी और इस बार अनघा को सब सच्चाई बताकर ही वापस जाऊंगी। लेकिन अब मुझे जाना पडेगा।" 

" ओके."  त्याच्या तोंडून फक्त इतकेच शब्द बाहेर पडले.

" विक्रम तू इस तरह मत हारना। तुम ही कहते हो अनघा सिर्फ तुम्हारी है फिर उसके समज मे आयेगी ना ये बात।"

 ती आश्वासकपणे त्याला म्हणाली तसं त्याने होकारार्थी मान हलवली.

" अरे सब कुछ ठीक होगा ओके." ती त्याच्या हातांवरती हात ठेवत म्हणाली आणि जायला उठली.

" विक्रम, अब तो उसे सब कुछ बताने के लिए ही आऊंगी। सब..... मुझसे राजेश कहा मिला,  क्या कहा उसने और.... और मेरी सच पहचान भी जो सिर्फ तुमे और राजेश को ही पता है।"  

तस त्याने पटकन मान वरती वळवली.

" ओके बाय टेक केअर...." ती निघताना म्हणाली.

" हं, Same to you."   तो कसंनुसं हसत म्हणाला.

" ओके चलती हूँ मैं. See you soon. "  

म्हणून ती निघून गेली. तो मात्र शांतपणे तिथे बसून राहिला.

        नताशा च्या रूपाने असणारी आशाही आता संपली होती. या सगळ्यात अनघा सोबत जाऊन बोलू शकेल आणि तिच्या बोलण्याने खरच काहीतरी फरक पडेल असं त्याला वाटत होतं ती व्यक्तीच निघून गेली होती. नताशाच्या असण्याचा, तिच्या आशावादी बोलण्याचा त्याला दिलासा वाटायचा. परिस्थिती हाताबाहेर गेली तर नताशा काहीतरी करेल हे मनात कुठेतरी असायचं. स्वतःच्या परिस्थितीवरती त्याला हसावं वाटलं. आपण आयुष्यात सर्वार्थाने असे एकटे पडू अशी कल्पना कधी केली नव्हती त्याने! आजूबाजूला असतानाही मदतीला कोणी नसतं किंबहुना आपला आवाज आजूबाजूच्या माणसापर्यंत पोहोचत नाही तेव्हा काय वाटत असतं ते आता कळत होतं.

 त्या रात्री तिला सुद्धा किती एकटं वाटलं असेल! कुणीतरी मदतीला यावं आणि आपल्याला त्या अंधार्‍या जागेतन सोडवावसं वाटलं असेल.' अनघाचा विचार त्याच्या मनात आला तसे त्याने डोळे बंद केले. मन म्हणालं, ' होईल ठीक सगळं. तिच्या उत्तराची वाट पाहूया.' तसे त्याने डोळे उघडले. जोपर्यंत मन हार मानत नाही तोपर्यंत आपण थांबायचं नाही या विचारात तो आत्मविश्वासाने उठला.

क्रमशः

Next part अनघा - आशिष भेट

🎭 Series Post

View all