बंधन भाग 110

Love Social

भाग 110
( गेल्या भागात विक्रमने तिला घटस्फोटाचे पेपर्स पाठवले होते ज्यावरुन तिची बरीच चिडचिड झाली पाहूया ती आता काय उत्तर देते )

             विक्रमने घटस्फोटाची कागदपत्रं पाठवली त्या दिवसापासून तिचं चित्त थाऱ्यावरती नव्हतं. अर्थात हे असं काहीतरी होणार हे तर  श्रीधर आणि कुमुदला अपेक्षित होतं किंबहुना त्यांची ती सुप्त इच्छा होती. त्यामुळे त्याने पाठवलेल्या डिव्होर्स पेपर्स मुळे तिच्या आई-वडिलांना काही धक्का वगैरे बसला नव्हता. आणि आपण विक्रमपाशी डिव्होर्सचा विषय काढल्याचही कुमुदने श्रीधररावांच्या कानावरती घातलं होतं. पण विक्रम काही सहजासहजी घटस्फोटासाठी तयार होणार नाही उलट त्यांनी कितीही प्रयत्न केले तरी तो आडमुठेपणाची भूमिका घेईल. या प्रकरणात मच्युअल अंडरस्टॅडींगने डिव्होर्स कठीण आहे अस तिच्या आई-बाबांना वाटत होतं.पण त्याउलट सगळं घडलं होतं. डिव्होर्सचे कागद पाहून ती रडेल फार तर स्वतःला खोलीत कोंडून घेईल असं काहीतरी त्यांना अपेक्षित होतं. पण तिचा त्या दिवशीचा तो अनावर झालेला राग पाहून तर घरातल्या सगळ्यांची बोबडी वळण्याची वेळ आली होती. त्या दिवशीचं ताईच ते रुप रियाच्या डोक्यात चांगलंच बसलं. तीही आता अनघा समोर सांभाळूनच बोलायची. पण तिला आणि श्रीधर कुमदलाही अनघाची अजूनच काळजी वाटू लागली. तिचं रागावणं नेमका कशासाठी होतं तेच त्यांच्या लक्षात येत नव्हतं. तिच्या भूतकाळाला जबाबदार विक्रमच आहे हे तिला माहित आहे. त्यावरून ती त्याचा तिरस्कार करते, स्वाभिमानापायी तिने ते घर सोडलं, विक्रम सोबतचे सगळे कॉन्टॅक्ट संपवून टाकले. मग आता हा राग कशासाठी? घटस्फोटाचे कागद पाहणं मुलींसाठी त्रासदायक असतच. वाईट वाटणं सहाजिक पण स्वतःच्या नवर्‍याचं सगळं वागणं समोर दिसत असताना इतका त्रागा कश्यासाठी हे तिच्या घरातल्यांना पडलेलं कोडं होतं. पण सद्या तिची अवस्था पाहता तिच्यासोबत या विषयावरून काही बोलण्याच्या फंदात कुणी पडलं नाही. दुसरीकडे तिलाही यावरून घरात कोणाशी काही बोलण्यात रस नव्हता. घरचे मनातून खूश असतील नी उगीच नाना सल्ले देतील या विचाराने तिने घरी यावरुन बोलणं टाळलं. पण तिला विक्रमचा प्रचंड राग आला होता. त्याला नजरेसमोर उभं करायचं नाही असं तिने ठरवलं.पण कितीही झालं तरी तिचं कॉलेजला नियमित जाणं सुरू होतं, लेक्चर्स घेणं, मुलांच्या परीक्षांची तयारी, कॉलेजचं काम यात ती नेहमी सारखं लक्ष घालत होती.
...................................................

          डिव्होर्स पेपर्स तिच्याकडे पोचून आता चार-पाच दिवस उलटून गेले होते. त्याने रावराणेंना तिच्या घरून त्यांच्या वकिलामार्फत काही उत्तर वा चौकशीकरता फोन आलेत का याबद्दल विचारलं. पण तसं काहीच नव्हतं. त्याच्या घरीही कुमुद, श्रीधर कडून आत्याला किंवा अरुंधतीला काही फोन आला नव्हता त्यामुळे त्याच्या घरी तरी अजून कोणाला त्याच्या या उपद्व्यापाबद्दल माहित झालं नव्हतं. यावर तिची काय प्रतिक्रिया असेल याची मात्र त्याला उत्सुकता होती. ती चिडून फोन करेल किंवा न राहून तणतणत का होईना पण भेटायला येईल आपल्याला! मग रागावून पण रडत रडत म्हणेल, ' विक्रम, तुला खरंच डिव्होर्स हवाय का? खरंच इतकी नकोशी झाले का तुला मी?'  मग आपण तिची समजूत घालू. त्याने चार-पाच दिवस वाट पाहिली पण तसं काहीच घडलं नाही. मग
त्याने तिला भेटायचं ठरवलं पण तिला निरोप कसा द्यायचा हा प्रश्न होताच अशावेळी हातातला मोबाईल सुद्धा त्याला बिनकामाचा वाटायचा. मग त्याने कॉलेजमध्ये तिला स्वतः भेटूनच निरोप द्यायचा ठरवलं. त्याने मग पुढचे एक-दोन दिवस तिच्या सकाळच्या लेक्चरच्या वेळा पाहून ठेवल्या. साधारणतः पहिल्या लेक्चर नंतर तिला वेळ असतो मग नऊ च्या सुमारास ती कॉलेजच्या लायब्ररीत न्युज पेपर वाचत बसलेली असते ते त्याच्या लक्षात आलं. ' लायब्ररी व्हिजिट' च्या नावाखाली एका सकाळी तो लायब्ररीत पोहोचला.

" अरे, सर तुम्ही! या ना." 

 काउंटर वरती स्वतः ग्रंथपाल उभे होते.

" हॅलो तांबे."  त्याने हसर्‍या चेहर्‍याने म्हटलं.

" आज सकाळीच इकडे! बरं झालं आलात! नवीन पुस्तकं आलीत. जरा बघून घेता का?"

 तांबे सरांनी असं म्हटल्यावरती त्याला नको आता असंही म्हणता येईना.

"  हो का! ओके चला मग." 

 तो म्हणाला तसं तांबे सर खुशीत त्यांच्या केबिन कडे वळले आणि मागून तोही त्यांच्यासोबत आत गेला. ते काम दहा-पंधरा मिनिटात आटोपेल असं त्याला वाटत होतं त्या कामासाठी तांबे सरांनी अर्धा तास खाल्ला. कुठल्या विषयांवरची नेमकी किती पुस्तकं, कोणत्या मार्केटमधून घेतली, किती सवलतीत मिळाली, गेल्या महिन्यात नवीन काय  आणलं होतं इथपासून बऱ्याच गोष्टी त्यांनी सांगितल्या. शेवटी साडेनऊ होत आले तसं ते स्वतःच त्याला म्हणाले, ' सॉरी हा, खूपच वेळ झाला नाही का! बाकी डिटेल्स नंतर देतो मी.' तांबे सर असं बोलले तसं त्याला त्यांच्या कचाट्यातून सुटल्यासारखं वाटलं. त्यांच्याशी बोलून तो केबिन बाहेर आला.


 आज काही भेट होत नाही. त्याने इकडे तिकडे नजर फिरवली. काही विद्यार्थी उभ्या -उभ्याच पुस्तकं उघडून पाहत होते. काही प्राध्यापक नोट्स काढत बसले होते. काही मुलं आपापला अभ्यास करत बसली होती. त्याचं लक्ष कोपर्‍यातल्या एका टेबल कडे गेलं. ती एकटीच शांतपणे बसून वाचत होती. तिला पाहताच त्याचे डोळे हसले. तो चालत पुढे गेला आणि तिच्या टेबल पाशी जाऊन उभा राहिला. ती पेपर वाचत होती. तिचं लक्षच नव्हतं.

" हॅल्लो मॅडम." 

 तो हसत म्हणाला त्याच्या आवाजासरशी तिने पटकन मान वरती वळवली. त्याला बघताच तिच्या रागाचा पारा चढला. 

" तू......लुक विक्र....."
खुर्चीत बसूनच चिडक्या सुरात बोलायला सुरुवात करणार तोच पलीकडच्या टेबलवरचे दोन प्राध्यापक ताडकन उठून उभे राहिले.


" गुड मॉर्निंग सर." 


 त्याने पटकन मागे वळुन हसऱ्या चेहऱ्याने त्यांना गुड मॉर्निंग म्हटलं. तोच आपण खुर्चीत बसून आहोत ते तिच्या लक्षात आलं ती पटकन उठून उभी राहिली.


" ग........ गुड मॉर्निंग सर!"  तिने खाली मानेनच म्हटलं.

" ओह....व्हेरी गुड मॉर्निंग." तिच्याकडे पाहत त्याने स्मितहास्य केलं.
 त्याने तिच्यासमोरचा ' टाइम्स ऑफ इंडिया ' हातात घेतला आणि पेपरची पानं उघडली.

" Meet me at the park, 12.30 I'm waiting."


 पेपरच्या पानांवरून नजर फिरवत तो म्हणाला. तिने शांतपणे ऐकून घेतलं. मी नाही येणार असं तिला मोठ्याने सांगायचं होतं. पण आजूबाजूला मुलं आहेत ते पाहून ती शांत राहिली. त्याने पेपर पुन्हा टेबलवर ठेवला.


" बाय "  तिचं काही न ऐकता तो तिथून बाहेर पडला.

.....................................................

         सकाळी तो लायब्ररीत भेटल्यापासुन तिचं कश्यातच लक्ष लागत नव्हतं. काय करावं ? जावं भेटायला की जाऊ नये याच विचारात ती होती. ते डिव्होर्सचे पेपर पाहून तर उंच कड्यावरून कोणीतरी ध्यानीमनी नसताना अचानक ढकलून दिल्यासारखं तिला वाटत होतं. ती एक गॅदरिंग दिवशीची घटना आणि त्यानंतर झालेल्या आघातांची मालिका आज इथवर येऊन पोहोचली होती. सर्वसाधारण एखाद्या स्त्रीला पचवणं जे अवघड असतं ते सगळं गेल्या दीड वर्षात तिच्या समोर उभं ठाकलं होतं. शारीरिक अत्याचार, मोडलेला साखरपुडा, चारित्र्यावर शिंतोडे, फसवणुकीच्या पायावर उभं केलेलं लग्न, नवर्‍याचा खोटेपणा, त्याचं दुसऱ्या मुलीसोबत नाव जोडलेलं कानावरती येणं, तिने घर सोडणं, अनपेक्षितपणे आशिष च्या रूपात समोर आलेला नवा पेच न आणि यात अजून पडलेली घटस्फोटाची भर! त्यामुळे तिच्यासाठी अजूनच सगळं अवघड होऊन बसलं होतं.
 कधी कधी तिला वाटायचं हे सगळं आपल्या आकलना पलिकडचं आहे. पळून जावं या सगळ्यापासून कुठेतरी दूर! प्रेम, संसार, लग्न काही काहीच नको आता! हे सगळं इतकं भयंकर असेल तर काहीच नको हे! आपण दिवसेंदिवस यात अडकत चाललो आहोत सुटकेचा मार्ग मात्र दिसत नाही. कधी कधी तिला विक्रम समोर शरणागती पत्करावी वाटायची . मन म्हणायचं, तो चांगला नवरा आहे किंवा नताशा, समिहा सोबत त्याचं जोडलेलं नाव हे सगळ खोट आहे. पण ते काही क्षणांसाठीच वाटायचं तिला! लगेच मेंदू या सगळ्या गोष्टी नाकारायचा. कोणत्या अर्थाने चांगला नवरा? जो माणूस सप्तपदी घेतानाच खोटं बोलला, वर्षभर संसार करून जो सत्य बोलू शकला नाही, ज्या माणसाने भविष्याची गोड स्वप्न फक्त दाखवली मग का त्या माणसाला चांगला माणूस म्हणावं! भला माणूस म्हणून, चांगला नवरा चांगला जावई या कुठल्याच व्याख्येत हा माणूस बसत नाही. तिच्या मनाचा आणि मेंदूचा संघर्ष थांबता थांबायचं नाही. थकून जायची ती या सगळ्यात. काय योग्य काय अयोग्य तेच कळत नव्हतं तिला. कधी कधी आपण काय वागतो, काय प्रतिक्रिया देतो याचंही भान उरायचं नाही तिला. त्यातूनच तिच्या मनाचा बांध फुटला आणि त्या दिवशी विक्रमसमोर नकळतपणे रडून मोकळी झाली होती.

आताही तिला काय करायचं सुचत नव्हतं. स्टाफरूममध्ये बसल्या बसल्या ती याचाच विचार करत होती. तिने आपले हात समोर धरले. त्या दिवशी घटस्फोटाचे कागद जाळताना तिची बोटं भाजली होती. त्याच्या खुणा होत्या. तिने मनाशी ठरवले आता शांत बसायचं नाही! याचा जाब त्याला विचारायचा.
.................................................

         कॉलेज सुटल्यावरती ती न रेंगाळता लगेच कॉलेजमधून बाहेर पडली. घड्याळात पाहिलं तर बारा चाळीस झाले होते. एव्हाना तो पोहोचला असेल! ती पटापट पावलं उचलत निघाली आणि थोड्याच वेळात पार्कपर्यंत पोचली. तिचं लक्ष नव्हतं पण पार्कच्या समोर च्या रस्त्याला आशिष त्याच्या गाडी समोर उभा राहून फोनवरून बोलत होता. आणि त्याचा सहज लक्ष रस्त्याच्या दुसऱ्या बाजूने चालणार्‍या अनघाकडे गेला म्हणून फोन ठेवून तो पटकन गाडीत बसला. त्याने गाडी वळवली आणि तितक्यात त्याची नजर समोर गेली तर ती आता पार्कच्या दिशेने चालली होती! काही सेकंदात ती आत मध्ये गेली सुद्धा! आशिषला काहीच समजेना. तो गोंधळलेल्या नजरेने गाडी थांबवून पाहू लागला आणि त्याचं लक्ष कोपऱ्यात उभ्या असलेल्या विक्रमच्या गाडीकडे गेलं. त्याला आश्चर्य वाटलं. क्षणभर त्याला वाटलं, गाडीतून उतरावं नी पाहावं काय चाललय ते पण असं एखाद्या ठिकाणी कोणाचा पाठलाग करत जाणं त्याला प्रशस्त वाटेना. त्याने तशीच गाडी सुरू केली आणि तो निघून गेला.
...................................................


ती आत मध्ये आली. मार्चमध्ये ते तिथे भेटले होते तो प्रसंग तिच्या नजरेसमोर तरळला.लग्नाच्या वाढदिवसानंतर तिने त्याला ते गोल्डन अँकलेट्स परत केले होते. त्यावरुन चिडून त्याने फोन करुन तिला पार्कमध्ये भेटायला बोलावलं होतं आणि ती भेटायला आली तेव्हा बरच काही सुनावलं सुद्धा होतं. त्यानंतर आज दुसऱ्यांदा ते भेटत होते. याहीवेळी भेटायचं हे त्यानेच ठरवलं होतं नी गेल्या वेळेसारखं ती येणारच हे त्याने गृहीत धरलं होतं. आज तो तिच्या आधी येऊन थांबला होता. ती समोरून येताना दिसली तसा आपला अंदाज बरोबर निघाला याचा त्याला मनातून आनंद झाला नी नाही म्हटलं तरी तो आनंद त्याच्या चेहऱ्यावरती दिसत होता. ती चालत पुढे आली आणि त्याच्या समोर येऊन उभी राहिली. दोन क्षण तिने त्याच्याकडे पाहिलं आपण इथे येणारच हे त्याने गृहितच धरलं होतं आणि त्याच्या मनाप्रमाणे झालं याचा त्याला झालेला आनंद तिच्या लक्षात आला.

" गुड आफ्टरनून, मला माहित होतं तुम्ही येणार. Yes I was right!"  तो खुशीत म्हणाला.

" का बोलावलं तुम्ही मला? मला काही बोलण्याची इच्छा नाहीये."   ती शांतपणे उत्तरली. आजूबाजूने ये-जा करणारी माणसंही आहे ते स्वतःला बजावत तिने तिचा राग शांत करण्याचा प्रयत्न केला.


" ओके ओके चिडू नका. मला...... मला हेच विचारायचं होतं की ते डिव्होर्स पेपर्स...... तुम्ही साईन करण्याबद्दल काय......"   

 त्याने धडधडत्या हृदयाने विचारलं. पाच-सहा दिवस उलटून गेले होते आज! अजूनही तिच्या घरून वकिलांमार्फत कायदेशीर रित्या तरी याबद्दल काही पाऊल उचललं गेलं नव्हतं याची त्याला कल्पना होती तरीही मनातून त्याला भीती वाटत होती.

" ओह, म्हणजे तुम्हाला डिव्होर्स हवाय तर!"  

 तिने हाताची घडी घालत त्याच्या नजरेला नजर देत बोलायला सुरुवात केली.

" नाही....... म्हणजे असं काही....."  ती अशी रागाने पाहू लागली तसं त्याला काय बोलावं सुचेना.

" मग कसं! नी नाही देणार मी सह्या. काय करणार तुम्ही?"

" पण....... पण तुम्ही सह्या करू नये असंच वाटत होतं मला! I know you very well. मला माहीतच होतं तुम्ही साईन करणार नाही ते!" 

 मी तुला किती चांगला ओळखतो या आविर्भावात तो हसून म्हणाला तशी ती अवाक झाली.

" काय? काय बोलताय! तुमचं तुम्हाला तरी कळतय का? मग हा नसता उद्योग करण्याची काय गरज होती?"

"तुम्ही प्लीज ऐकून घ्या ना माझं......."  
तो आर्जवी नजरेने बोलायला लागला.

" अरेवा!  आता यावरतीही एक्सप्लेनेशन आहे का? हे बघा मला आता काही ऐकायचं नाहीये तुमचं. दरवेळी काहीतरी चुकीचं वागायचं आणि त्यावर समर्थन करायचं तेवढं चांगलं जमतं तुम्हाला!"

" आईंनी म्हटलं होतं की डिवोर्स......."  तो नाईलाजाने कुमुदचं नाव घेऊन म्हणाला.
तसा तिच्या रागाचा पारा अजून चढला.


" वा! माझी आई म्हणाली नी तुम्ही ऐकलं. एवढे आज्ञाधारक कधीपासून झालात तुम्ही! नाही फक्त आई म्हणाली म्हणून नाही तुम्ही हे केलं तर तुम्हाला माहित होतं मी काही सह्या वगैरे करणार नाही मग पाठवून तर बघूया हिची रिअॅक्शन! तुम्हाला कॉन्फिडन्स भारी होता हा बाकी मी काही डिव्होर्सला तयार होणार नाही. पण तुमच्या या ओव्हर कॉन्फिडन्सपायी मला किती मनःस्ताप झाला याची कल्पना तरी आहे तुम्हाला? गोष्टी अजूनच कॉम्प्लिकेटेड करून ठेवल्या तुम्ही माझ्यासाठी!"

तो शाळकरी मुलासारखा खाली मानेनं तीच सगळं बोलणं ऐकत होता.

" विक्रम तुमचा प्रॉब्लेम काय माहितीये? तुम्ही मला गृहित धरता नेहमी!" 

 ती असं बोलली तसं त्याने पटकन मान वरती वळवली

" नाही नाही असं नाहीये माझा तुमच्या वरती विश्वास....."

" समोरच्या वरती विश्वास असणं आणि गृहीत धरण्यात अंधुक रेषा असते जी तुम्ही कधीच पार केलीत  आणि स्वतः विश्वासघात करणार्‍यांनी विश्वासाच्या बाता मारू नयेत."

" पण मी केव्हा गृहीत धरलं तुम्हाला?"  ती आज जो आरोप करत होती तो त्याच्यासाठी नवीनच होता. त्याला लक्षात येत नव्हतं ती असं का म्हणतेय.

" मी डिव्होर्स हा शब्द काढला होता का ?"

" पण मी आईंच्या......."


" हो किंवा नाही एकाच शब्दात सांगा." तिचा आवाज थोडासा चढला.

"  नो....... नाही."

"  मग माझे निर्णय मला घेऊ द्या ना. कोण समजता तुम्ही स्वतःला?  माझे पालक कि माझ्या आयुष्याचे सर्वेसर्वा. आज डिवोर्स पेपर्स पाठवलेत. मागे पत्रकार परिषद घ्यायची होती तुम्हाला. बापूसाहेबांनी माझं नाव घेऊन राजकारण केलं होतं ना मग मी पाहिलं असतं ना काय उत्तर द्यायचं ते! त्यावेळी पण तुम्ही परस्पर निर्णय घेऊन मोकळे झालात. लग्नाआधी सुद्धा मी तुम्हाला भेटायला आले होते मी सगळं माझ्या बाबतीतलं खरं सांगितलं होतं तरीही तुमचा मात्र त्यादिवशीचा तो अटीट्युड आणि आत्मविश्वास त्याला खरंच तोड नव्हती!  ' तुम्ही नका काळजी करू. आपलं लग्न होणारच ' असं ठासून बोलून गेलात तुम्ही बरं तुम्हाला तर तेव्हा माहित होतं ना तुम्ही काय वागला होता ते! पण तेव्हाही हिला कुठे खरं कळणार आहे अशाच विचाराने त्या दिवशीसुद्धा गृहीत धरलं तुम्ही मला. मी तर काय आंधळ्या सारखं प्रेम करत होते तुमच्यावर त्यामुळे हिला कळलं तरीही कुठे जाणार आहे ही या विचाराने लग्नानंतरही गृहीतच धरलं तुम्ही मला."

" मॅडम काय बोलताय! अस असं खरंच काही नाही हो."

" मग कसं, आज आई बोलली तुम्ही पेपर्स पाठवलेत. उद्या बाबा म्हणतील आशिष ला सांगा की, बाबा रे तिचा माझा काही संबंध उरलेला नाही आता मग तेही करणार का तुम्ही?"

 तिच्या या प्रश्नावर तो गप्प झाला.

" तुम्हाला काय दाखवायचं असतं विक्रम? हेच की बघा मी कोणत्याही सिच्युएशन मध्ये कसे पटापट डिसिजन घेतो. मला नाही कोणाची गरज! ना कोणाच्या आधाराची, ना कुणाच्या सल्ल्यांची. डिव्होर्सचं तुमच्या घरी तरी माहिती आहे का ओ? मी जितकं ओळखते तुम्हाला त्यावरून नसेलच!  कारण म्हटलं ना, कोणाला काही विचारणं, सांगणं तुम्हाला तर ठाऊकच नाही. तुम्हाला तुमच्या आयुष्यातल्या माणसांना फक्त गृहीत धरता येत. आपण घेऊ तोच निर्णय फायनल नाही का! मग बाकी कोणाला काय वाटतं याच्याशी तुम्हाला देणघेणं नसतं."

" तसं तसं नाहीये." तो म्हणाला.

" हे पहा, तुमची मॅनेजमेंट स्किल्स तिकडे कॉलेजमध्ये वापरायची. माझ्या आयुष्यात नाही. आजवर जे काही केलं ते तुम्ही तुमच्या मर्जीने केलात. आता मी बघेन मला काय करायचं ते! त्यात तुमची ढवळाढवळ नकोय मला."


तिने निक्षून सांगितलं नी ती जायला वळली.

तिचं इतकं भडाभडा बोलणं ऐकुन त्याचे डोळे पाणावले. तिला काय नि कसं समजवावं तेच त्याला कळत नव्हतं.

" मला नाही बोलायचं यावर काही. पण मी पूर्णपणे चुकीचा नाही हे कळेल एक दिवस तुम्हाला."  तो धीराने म्हणाला त्यावर ती विषादाने हसली.

" सगळं सूर्यप्रकाशाइतकं स्वच्छ असताना....." तिने म्हटलं.

" सूर्याच्या प्रकाशालाही थोड्या वेळासाठी ग्रहण लागतं. आपल्याला वाटतं काळोख झाला पण ते फक्त झाकोळ असतं नंतर येतोच ना डोळे दिपवणारा प्रकाश."  तो म्हणाला.


" मग माझे डोळे दिपून गेले त्या प्रकाशाने तरी चालतील मला ! या अशा झाकोळा पेक्षा डोळ्यात अंजन घालणारा प्रकाश परवडेल मला!" 

 इतकं बोलून तरातरा ती निघून गेली. तो पाणावलेल्या डोळ्यांनी पुढे जाणाऱ्या तिच्याकडे नुसता पाहत राहिला.

क्रमशः

टिप:

कथेत पहिल्या भागापासूनच अनुक्रमे महिने आणि त्यानुसार घटना दाखवल्यात. कॉलेजच्या परीक्षा, अंतर्गत कामकाज हा कथेचा भाग आहे म्हणून तशी रचना केलेली आहे. तथापी सणवार, इतर समारंभ, पात्रांचे वाढदिवस, इतर पात्रांच्या लव्हस्टोरीज हे सगळं मुद्दामहून टाळलेलं आहे. या सगळ्या सिनारिओ पेक्षाही मुळ विषयाचे वेगवेगळे कंगोरे, नायक - नायिकेचं नातं नी विषयाचं गांभीर्य टिकवणं महत्त्वाचं त्यामुळे काही बाबी प्रकर्षाने टाळलेल्या आहेत.
आता भाग पुढे जातायत पण काहीच घडत नाहीय अस वाटु शकतं.....पुढे येणार्‍या मोठ्या घटनांची पार्श्वभूमी तयार करणारे हे भाग आहेत....Keep reading

Thank Youuuu

🎭 Series Post

View all