बंधन भाग 108

Love Social

भाग 108
( गेल्या भागात अनघाच्या आईबाबांनी तिच्याकडे आशिषचा विषय काढला. त्यांच्या मनातलं त्यांनी तिला सांगितलं पाहूया पुढे)

             अनघाचे सुट्टीचे दिवस जुन्या आठवणी आणि भविष्याचा असलेला पेच याचा विचार करण्यात संपले. घरी सदानकदा आशिषचं गुणगान सुरू असायचं. त्याचं हल्ली घरी येणंही वाढलं होतं. त्याचं कुमुद आणि रियासोबत छान जमायचं. श्रीधर विषयीही त्याला आदर होता. तो घरी आला की थोडा वेळ तरी श्रीधर सोबत गप्पा मारायचा. त्यांच्यासोबत कधीकधी बागेतल्या झाडांना पाणी घालणे, झोपाळ्यावरती बसून गप्पा ठोकणे, त्याच्या जॉब विषयी, कंपनी विषयी बोलणे असं सगळं सुरू असायचं. कधीकधी तो मुद्दामहून सगळ्यांसाठी आईस्क्रीम पॅक, पिझ्झा असं सुद्धा आणायचा मग रियाही खुश व्हायची. क्रिकेट मॅच असली तर तो, श्रीधर,रिया टीव्हीसमोर ठाण मांडून बसायचे आणि नुसता कलकलाट सुरू असायचा त्या तिघांचा! मध्यंतरी रियाचा पगार वाढला. त्याचं सेलिब्रेशनही त्याने करायचं ठरवलं मग तोच घरी आला. रियाचं अभिनंदन केलं. कुमुदने मस्त पाणीपुरीचा बेत केला होता त्याच्या सांगण्यावरून! कुमुद, श्रीधर, रिया सगळ्यांनाच आशिषने महिना-दीड महिन्यात अगदी आपलंसं केलं. तो घरी आला की आता पाहुण्यासारखा हॉलमध्ये बसायचा नाही. कधी बागेत श्रीधर सोबत गप्पा मारणे तर कधी स्वयंपाक घरात अगदी फ्रीजला टेकून कुमुदच्यासोबत गल्लीपासून ते दिल्लीपर्यंतच्या बातम्यांवरून गप्पा हाणणे, यूएसए बद्दल, तिथल्या राहणीमानाबद्दल तिला माहिती पुरवणे असं बरंच काही सुरू असायचं. तो घरी आला की कुमुदला सतत वाटायचं, विक्रम कधी असा आपल्या घरात मिसळून गेलाच नाही!  तो नेहमी जावई वाटला. तो आपला मुलगा आहे, आपल्या घरातला आहे असं कधी वाटलंच नाही उलट आशिष आपला वाटतो हक्काचा. आपल्या मुलासारखा! कुमुद अनावर होऊन श्रीधरला देखील हे बोलायची. त्यांनाही पटायचं. त्यांना उमगत होतं, विक्रम आणि आशिष दोघेही चांगले हुशार, सुशिक्षित, देखणे, आर्थिक स्थितीतही फार तफावत नाही पण दोघेही विरुद्ध स्वभावाचे! आशिष किती समजूतदार, संस्कारी मुलगा याउलट विक्रम इतक्या खानदानी घरात जन्म आणि भाऊसाहेबांसारख्या इतक्या भल्या माणसाच्या सावलीत वाढुनसुद्धा इतकं घाणेरडं कृत्य करणारा, विश्वासघातकी, खोटारडा. नवराच काय मुलगा, भाऊ, जावई म्हणून सगळ्याच पातळीवर अपयशी असलेला माणूस! असे विचार आले की श्रीधर आशिषचा विचार करायचे. त्याचं नी अनघाचं लग्न, अनघाचा छान संसार. त्याची दिवसाउजेडी स्वप्न पाहत राहायचे. घरात इतकं सगळं सुरू असताना अनघा मात्र या सगळ्यापासून स्वतःला अलिप्त ठेवायची. आशिषचं तिच्या घरातल्यांसोबतचं मिळून मिसळून वागणं, श्रीधरची काळजी करणं हे पाहिलं की तिला क्षणभरासाठी वाटायचं, विक्रम असा असता तर! आशिषचं वागणं तिला छान वाटायचं. पण तो समोर आला की तिला काय बोलावं सुचायचं नाही. त्याला सामोरं जाताना आई बाबांचं बोलणं तिच्या मनात घोळत राहायचं. अर्थात श्रीधर नी कुमुदही एकदा तो विषय बोलून गप्प बसले नव्हते. आडुन आडुन आशिषविषयी, त्याच्या चांगल्या वागण्याविषयी ते अनघा समोर बोलायचे. तिला त्याचा विचार करण्याबद्दल सुचवायचे.
...........................................................


          कॉलेजच्या प्रवेश प्रक्रिया संपून कॉलेजही आता नेहमीप्रमाणे सुरू झालं होतं. एव्हाना जुलै संपत आला होता. मार्चदरम्यान जे काही न्यूज प्रकरण झालं त्यामुळे कॉलेजची बदनामी झाली त्याचा थोडासा परिणाम या वेळी गुरुकुलच्या प्रवेशप्रक्रियांवरती दिसला. पण विद्यार्थी, पालकांनी कॉलेज कडे काही अगदीच पाठ फिरवली नाही. त्यामुळे प्रवेश प्रक्रिया सुरळीत पार पडल्या. आधीच कॉलेजच्या बाबतीत असं सगळं घडलेलं असताना पुन्हा पालकांच्या तक्रारी भाऊसाहेबांना नको होत्या. त्यांनी यावेळी स्वतःहून सगळ्या बाबतीत लक्ष दिलं. विक्रमला त्यांनी ना काही विचारलं ना काही सांगितलं! कॉलेजच्या बाबतीतले आरोप ही एक वाईट गोष्ट होती असं समजून सगळे आता जोमाने कामाला लागले. पुन्हा नव वर्ष, नवे विद्यार्थी, नवे उपक्रम याचा सगळे उत्साहाने विचार करत होते.
..........................................

          अनघा नेहमीप्रमाणे कॉलेजला जात असली तरीही हे फार दिवस चालणार नाहीय. बाबा पुन्हा राजीनाम्याचा विषय काढतील याची तिला कल्पना होती तरी जूनपासुनचे दिवस तिने टाळाटाळ करण्यात घालवले होते. बरं, राजीनामा दिला तर पुन्हा इथेच नोकरी शोधून देणार नाहीत. आशिषबद्दल विचार करायला सांगतील. ती अशा पेचात सापडली होती. पण तिचं वागणं पाहून मग कुमुदला तिची काळजी वाटत राहायची़.

" काय ग अशी येरझाऱ्या का घालतेस?  येईल ती कॉलेज सुटलं की. वेळ आहे अजून. बरं, आपल्याला हरीश कडे जायचय आहे न लक्षात ?"  श्रीधरने म्हटलं.

" हं. तसं नाही हो आज जरा तणतणच झाली तिची." कुमुदने चिंताग्रस्त चेहऱ्याने म्हटलं.


" का ग?" 

"ते मी जरा आशिष बद्दल बोलले पुन्हा तिच्याशी."

" मग? " श्रीधरन विचारलं तसं तिने नकारार्थी मान हलवली.


" काही नाही नेहमीसारखी उडवाउडवीची उत्तरं. सकाळी नाश्ता पण केला नाही."


" ते चांगलं जमतं तिला! चिडायचं नी खाण्यापिण्यावर राग काढला की झालं." श्रीधर हताशपणे बोलले.

" मी केलेला मघाशी फोन..... म्हणालीय कॉलेज सुटलं की रियाला बोलावते. आज लेक्चर्स पण आहेत ना सलग. तिला कळत कसं नाही अशानं तब्येत बिघडेल बाकी काही नाही." कुमुद म्हणाली.


"हो ते आहेच ग. पण तिचा त्रास कमी व्हावा म्हणूनच आपण हा मधला मार्ग शोधलाय न. कुमुद, मी, तू किंवा भाऊसाहेब, आत्या आपण पिकली पानं कधीतरी गळायचीच. रियाचं एक दोन वर्षात लग्न होईल. मग मागे उरलो आपण दोघचं मग काय तिनं आपली दुखणीखुपणी काढत, आपल्या म्हातारपणाची काठी बनून जगायचं का नी ती घेईलही सगळी आपली जबाबदारी पण ग समजा समजा तुला किंवा मला काही झालं तर आपल्या मागे एकटी पडेल ग ती. नीतू, जितेंद्र काही आयुष्यभर पुरणार नाहीत तिला. आपल्या मागे हाल नको व्हायला तिचे. तिचे आनंदात जगायचे दिवस आहेत ते असे वाया नको जायला. एकटं जगणं असह्य करणार असतं त्यातून एकट्या मुलीने समाजात राहणं तर खूपच अवघड."   त्यांचे डोळे पाणावले.

" अहो, तिला पटायला हवं ना पण नी तिला कसं समजवावं तेच कळत नाही मला हल्ली."

" असो, कुमुद आपण तिला तिचा वेळ देऊया. होईल सगळं ठीक नी आपण काही लगेच तिला लग्नच कर नाही म्हणणार आहोत. जाऊ दे तो यु.एस. ला एक दोन वर्ष जाऊ देत मग बघू तस कानावरती घालू हरिशच्या पण तिची विक्रमपासून सुटका होउ दे एकदाची." श्रीधरने तिची समजूत घातली तशी तिने होकारार्थी मान हलवली.
......................................................


आदल्या दिवशीच्या कुमुदच्या बोलण्याचा विचार करत ती चालत चालत बाहेर आली. तासाभरापासून बरसणारा पाऊस आता जरा ओसरला होता. तिने रियाला फोन करण्यासाठी मोबाईल पर्स मधून बाहेर काढला तर कुमुदचा टेक्स मेसेज!

' आम्ही हरीश काकांकडे जाणार आहोत.  रियाला फोन कर. एकटीने येऊ नकोस. जेवण बनवलेलं आहे, जेवून घे आराम कर ' त्यावर तिने कंटाळवाण्या चेहऱ्याने बरं असा रिप्लाय देऊन टाकला.

 आई रात्री म्हणाली होती ते आज आशिष च्या घरी जाणार आहेत ते तिच्या लक्षात होतं. ती आपल्याच विचारात होती इतक्यात निकम सरांनी हाक मारली. ते पार्किंगच्या इथे त्यांच्या गाडीपाशी उभे होते. ती मग पार्किंगच्या दिशेने गेली.

" काय मॅडम एकट्या का उभ्या मघापासून? सरांची मीटिंग सुरू आहे वरती. मी करू का ड्रॉप तुम्हाला?"  त्यांनी सहज म्हटलं.

" नाही..... नको थँक्स, मी....मी थांबते न थोडावेळ."

 तिने कशीबशी जीभ रेटत म्हटलं.

" ओके बरं मी निघू?"  ते गाडीचा दरवाजा उघडत म्हणाले.

" हा, शुअर थँक्स."  ती हसून म्हणाली.

" माय प्लेजर. " म्हणून त्यांनी गाडी स्टार्ट केली आणि ते बाहेर पडले.

.........................................................

तिने इकडे तिकडे पाहिलं. पुन्हा कोणीतरी इथे भेटेल त्यापेक्षा गेट बाहेर जाऊन थांबावं म्हणून ती कॉलेजच्या गेटमधून चालत बाहेर आली. आई-बाबा आशिष कडे का गेले असतील? काय करू?  विचारू का आईला फोन करून? काल तिने तो विषय काढला नी डोकचं सटकलं. का जाताय हे विचारलच नाही आईला. असो का चं कारण आपल्याला चांगलं माहीतच आहे. हरीश काका, बाबा, आई एकत्र आले की त्यांच्या बोलण्याचा एकच विषय असावा. आशिष ने आपलं लग्न! आशिषचं नाव घेतलं जात नाही असा एक दिवस नसतो. काय करावं काहीच सुचत नाहीये. आशिष चांगला आहे, बाबा म्हणतात तसा समजूतदार असेलही कदाचित पण......पण '  तिच्या डोक्यातलं विचारचक्र थांबेना.

 डोळ्यांसमोर अंधारी आल्यासारखं वाटायला लागलं. क्षणभर वाटलं, डोळे मिटावे आणि इथचं पाय दुमडून बसावं. तिने डोक्याला हात लावला. सगळं आपल्या भोवती गरगर फिरतय असं वाटू लागलं आणि आपण एकाच जागी खिळून उभे आहोत. आपलं आयुष्य डबक्यासारखं झालय. कधी सुटका व्हायची यातनं? प्रश्नांनी तिचं मन पोखरून निघालं होतं. तिने बाजूच्या भिंतीला कसाबसा हात टेकला. आपली झालेली अवस्था, आलेला एकटेपणा, विटलेल्या शरीरावरल्या जखमा आणि आता मनावरच्या जखमा सगळं सगळं नकोसं झालंय आता. ती भोवळ येऊन खाली पडणार इतक्यात पटकन कुणीतरी धावत आलं आणि आपल्या दोन्ही हातांनी तिला सावरलं.

"मॅडम, मॅडम बघा ना...... काय..... काय होतंय?"  त्याने पटकन एका हाताने गाडीचा दरवाजा उघडला आणि तिला कसं बसं आत मध्ये बसवलं. पटकन सिटबेल्ट लावला आणि गाडी सुरू केली.
.................................................


       पंधरा-वीस मिनिटात ते घरी पोहोचले. त्याने गाडीच्या काचा खाली केल्या तर बाहेर कुणी दिसत नव्हतं. त्याने तिच्याकडे लक्ष देत तिला शुद्धीवरती आणण्याचा प्रयत्न केला.

"अनु, अनु  काय होतंय..... बघ ना...." 

 त्याने बॉटल उघडून तिच्या चेहर्‍यावरती पाण्याचे शिंतोडे  मारले तसे तिने हळूहळू डोळे उघडले.

" वि.......क्र....म "

" हो आहे मी. आहे हा, चल तू आधी आत."  

त्याने तिच्या भोवतीचा सीट बेल्ट काढला. तिने डोकं मागे सीटला टेकलं. काही बोलण्याइतपतही तिच्यात त्राण नव्हतं. तो गाडीतून उतरला तर समोर दाराला कुलुप! त्याने तिच्या पर्समधून घराची चावी काढली आणि पुढे जाऊन घराचा दरवाजा उघडला.
"अनु, चल आत जाऊया." त्याने कारचा दरवाजा उघडला. तिने हातानेच नको म्हटलं.

" अशी बसून राहणार का? आत तरी जाऊया. बघ पाऊस आला तर भिजशील उगीच. चल आधी आत." 

 त्याने तिच्या हाताला धरून तिला गाडीतून खाली उतरवलं.

" तू........तू.......जा......" 

 तिने खांद्याभोवतीचा त्याचा हात थोडासा बाजूला करण्याचा प्रयत्न केला.

" मी कुठेही जाणार नाहीये. चल तू आधी." त्याने जरासा आवाज चढवून म्हटलं तसं ती गप्प झाली.

 दारापाशी आल्यावर ती पायरीवरती मटकन बसली.

" अनु, चल आत ये."

 तिचं डोकं गरगरत होतं. काही सुचतं नव्हतं. दोन पावलं चालण्याचीही तिची इच्छा नव्हती. त्याने खाली वाकून तिच्या सॅन्डल्स पायातुन काढल्या.

" चल "  त्याने दोन्ही हाताने तिला उभं राहायला मदत केली. त्याच्या आधाराने ती हॉलमध्ये आली.

" ये.....तू.....तू.... बस आधी इथे."  

त्याने तिला सोफ्यावरती बसवलं. धावतच किचनमध्ये गेला आणि ग्लासभर पाणी तिच्यासाठी आणलं.

" घे, हळू....."  त्याने समोर बसत ग्लास तिच्या ओठांसमोर धरला. ती गटागटा पाणी प्यायली.

 तिची अवस्था बघून आज बऱ्याच महिन्यांनी त्याला त्यांच्या लग्नानंतरचे सुरुवातीचे दिवस आठवले तेव्हा तर त्या घटनेतून सुद्धा ती धड सावरू शकली नव्हती. त्याला स्वतःच्या नाकर्तेपणाची कीव आली. किती आत्मविश्वासाने आपण तिच्याशी लग्न केलं होतं. तिच्या आयुष्यातले विरलेले सगळे रंग पुन्हा तिच्या आयुष्यात आणायचे असं ठरवलं होतं तेव्हा आपण. आणि आज दीड वर्षानंतरही तेच चित्र! तिचं पाणी पिऊन झालं तसं त्याने ग्लास टेबलवर ठेवला.

" बरं वाटतंय का ?  " त्याने तिच्या कपाळावरून हात फिरवत म्हटलं. तिने मानेनेच हो म्हटलं आणि डोकं सोफ्याला टेकलं. त्याने टेबलवरचा ग्लास उचलून किचन मध्ये नेऊन ठेवला. तिला थोडा वेळ आरामाची गरज होती.


" तू झोपतेस का थोडा वेळ ?"  त्याने तिच्या बाजूला बसत म्हटलं.

" हा......"   ती रूममध्ये जाण्यासाठी म्हणून उठली.

" You......Y...ou can go मी........मी " 

 त्याला जा म्हणण्याच्या भरात तिला पुन्हा गरगरल्यासारखं झालं.

" हळू, चल मी येतो."  त्याने पुन्हा तिचा हात धरला.

" पडलीस मग. इतकी कशी ग हट्टी तू !"  त्याने एक हात मागून तिच्या खांद्याभोवती लपेटला आणि दुसऱ्या हातात तिचा हात धरला. त्याच्या आधाराने तिने हळूहळू जिना चढला आणि ते तिच्या रूममध्ये थोड्या वेळात पोचले.
.......................................................


त्याने अख्ख्या खोलीवरून नजर फिरवली. आज दुसऱ्यांदा तो या खोलीत आला होता. त्याला आठवलं, त्यांचा साखरपुडा गेल्या वर्षीच्या फेब्रुवारीत झाला होता तेव्हाही तिची तब्येत ढासळली होती. ती घटना घडून महिना दीड महिना उलटला होता त्यानंतर लगेचच श्रीकांत सोबतचं तिचं लग्न त्यावरुन मोडलं होतं. त्याचीही त्यात भर पडली आणि आपल्या लग्नाच्या आठवडाभर आधी ती आजारी पडली होती. तेव्हा तिला भेटायला आपण असेच आलो होतो. तिला चक्कर आली तेव्हा अनाहूतपणे आपल्या खांद्याला तिने हात टेकवला. क्षणभर त्याला ते जुने दिवस डोळ्यासमोर तरळले. त्याने तिला बेड वरती बसवलं आणि तो तिच्या समोर बसला.


" झोपतेस का थोडा वेळ तू ? आई..... बाबा कुठेयत ? मी थांबतो हा बाहेर......Take rest."  त्याने तिच्या डोक्यावरून हात फिरवला तसा जोराचा हुंदका आला तिला! आणि आपले हात  चेहर्‍यासमोर धरून ती ढसाढसा रडू लागली.


" अरे काय झालं? डॉक्टरांकडे जाऊया का आपण ? " त्याने तिच्या खांद्यावर हात ठेवत म्हटलं तिने काही न बोलता नकारार्थी मान हलवली.


" मग..... काय काय होतय? काय झालं सांग ना. रडून कसं कळेल मला." 

" डोक....... दुखतंय खू.....पच. खूप खूप गरगरल्यासारखं  वाटतय. सगळं...... सगळं माझ्या भोवती फिरतय की काय असं वाटतं......"  ती रडत रडत बोलत होती. तिने हाताच्या मनगटाने शाळेतल्या मुलींसारखे डोळे पुसले.

" च्च......Don't cry ग. आईंना करू का कॉल? " 

ती रडायची थांबेचना. तिला आई बाबांचा ही राग आला होता. तिने त्याच्या या विचारण्यावरतीही मानेनच नाही म्हटलं.

" मग..... नको ग रडू."  

इतक्या महिन्यातलं मनात साचलेलं सगळं असं तिच्या मनातून उफाळून बाहेर आलं. मनातलं सगळं अश्रूंच्या रूपाने वाहू लागलं. सगळ्या परिस्थितीतून जाताना आजूबाजूला धीर देणारी, पाठीशी असणारी माणसं असूनही आलेले एकटेपण, आधारासाठी ज्याच्या खांद्यावर डोकं टेकवावं वाटेल अशा माणसाची आयुष्यात कमतरता असणं यामुळे ती मनातून कुढत राहिली होती. तिचे घळाघळा ओघळणारे अश्रू थांबेनात. त्याने तिचा हात हातात घेतला.

" जस्ट रिलॅक्स.......Calm down."


 तिने अश्रुभरल्या डोळ्यांनी आपलं डोकं नकळतपणे त्याच्या खांद्यावरती टेकलं. त्याने आपल्या उजव्या हाताने तिच्या पाठीवरती हळुवारपणे थोपटलं. त्याचा दुसरा हात अजूनही तिच्या हातात होता.

" You're strong woman हो न. You've to fight for yourself. अस हातपाय गाळून कसं चालेल."


 ती त्याच्या मिठीतून बाजूला झाली. त्याने दोन्ही हातांनी तिच्या डोळ्यातुन ओघळणारे अश्रू पुसले. दोन सेकंदांसाठी त्याच्या मनात विचार आला, हीच योग्य वेळ. तिला सगळं खरं सांगूया. राजेश नताशाचा प्लॅन, नताशा तिला भेटायला का आली होती ते. त्या  गॅदरिंगच्या रात्री नेमकं काय काय घडलं होतं आणि राजेशही कसा आपल्यासोबत त्या प्लॅनमध्ये सामील होता. राजेशने हे सगळं फक्त तिच्या मनात गैरसमज तयार करण्यासाठी केलेलं आहे. पण त्याने गळ्यापर्यंत आलेले शब्द तसेच मागे घेतले. दुसरं मन म्हणालं , आता तो विषय नको. ती चिडेल, रागवेल, वाद होतील. रागाच्या भरात इथे थांबू द्यायची नाही ती आपल्याला. घरी पण कोणी नाही इथं. आपण गेल्यानंतर पुन्हा कुठे धडपडली तर उगीच....... नाही... नको. आपलं रडगाणं सांगण्याची ही वेळ नव्हे.

 त्याने याच विचारात हळूहळू तिचे डोळे पुसले आणि आपले ओठ तिच्या कपाळावरती अलगदपणे टेकवले.

"Don't  cry हा.. काही खाल्लयस का तू ?" 

 त्यावर तिने मानेनेच नाही म्हटलं.

" It's lunch time ना. सकाळपासून तू अशी न खाता....... जेवून घे थोडसं..... मी प्लेट आणतो." तो तिथून उठला आणि खाली किचनमध्ये निघून गेला. तिने डोक उशीला टेकलं नी डोळे मिटून घेतले.
......................................................
तो किचन मध्ये आला. कुमुदने घरून निघताना सगळं व्यवस्थित आवरून ठेवलं होतं. चहा नाश्त्याची भांडी घासून ट्रेमध्ये निथळत ठेवलेली होती.  ओट्यावरती, बेसिनमध्ये भांड्यांची गर्दी नव्हती. साध्या पाण्याचे थेंब सुद्धा ओट्यावरती सांडलेले नव्हते. स्वच्छ ओटा आणि जागच्या जागी ठेवलेल्या वस्तू पाहून त्याला भांड्यांची हलवाहलवी करण्याचं दडपण आलं. त्याने किचन ट्रॉली मधून तिच्यासाठी म्हणून एक रिकामी प्लेट काढली आणि ओट्यावर ठेवली. हात पाण्याने स्वच्छ धुतले नी फ्रीज उघडलं. भाजी, आमटीची भांडी बाहेर काढून ओट्यावरती घेतली.जेवण गरम केलं. प्लेटमध्ये भाताची मूद, एका वाटीत भाजी, दुसर्‍या वाटीत आमटी, एका बाजूला चपाती, कोपऱ्यात लोणच्याची फोड असं सगळं त्याने वाढून घेतलं. काही सांडलं, लवडलं तर नसती आफत! हलक्या हातांनी त्याने ताट वाढून घेतलं नी पाण्याची बॉटल असा सगळा लवाजमा घेऊन तो वरती रूम मध्ये गेला.
................................................

ती शांतपणे डोळे मिटून डोकं टेकून बसली होती. बाहेर अंधारून आलं होतं. तिचं रडणं शांत करण्याच्या नादात त्याने खिडकीचे पडदे सुद्धा उघडले नव्हते. त्याने खोलीतला लाईट सुरु केला तसं लख्ख प्रकाश खोलीभर पसरला. तिने डोळे उघडले. समोर तो उभा! 
" चला, जेवून घ्या." 

तो तिच्या समोर येऊन बसला आणि हातातलं ताट तिच्यासमोर धरलं.

" नको, इच्छा नाही मला."  तिने म्हटलं.

" असं कसं चालेल. "  त्याने बोलता बोलता एक घास तिच्यासमोर धरला.

" प्लीज."  आर्जवी नजरेने त्याने म्हटलं तस तिने त्याच्या हातून पहिला घास खाल्ला. तो किंचित हसला पण तिचं लक्ष नव्हतं. 

त्याने तिला घास भरवायला सुरुवात केली. तिला त्याच्या हातून जेवताना बरं वाटत होतं. पण आपल्याला छान का वाटतंय. मनाला बरं का वाटतय तेच तिला उमगत नव्हतं. दोन घास पोटात गेले म्हणून उत्साही वाटतंय का की तो असा पाच सहा महिन्या नंतर समोर आहे, आपल्या सोबत आहे, आपल्या जवळ आहे त्यामुळे बरं वाटतंय. काही का असेना प्लेट मधलं सगळं वाढलेलं ती जेवली याने त्याला बरं वाटलं.

" Good,  बघ आता बरं वाटेल. उपाशीपोटी लेक्चर्स घेतली की हे असं होतं." 

 त्याने प्लेट बाजूला ठेवली आणि पाण्याची बॉटल उघडून दिली. 
 

पाणी प्यायल्यानंतर तिला बरं वाटलं.

" तू कधी जेवणार ?" तिने न राहून विचारलं.


" नंतर...... You should take rest. "  तो तिथून उठला तसं तिने हं म्हणत डोक उशीला टेकलं.


        मघापासून बाहेर पाऊस सुरू होता. ती झोपली तसं त्याने टीपॉय वरची तिची पर्स उचलली. मोबाईल काढून ठेवून दिला. रिकामी ताट, बॉटल घेऊन तो पुन्हा किचनमध्ये आला. तिथं सगळं पुन्हा आवरून ठेवलं. दुपारचे दोन वाजत आले होते. तिला एकटीला कसं सोडून जायचं या विचाराने त्याला बेचैन वाटलं. बाहेर पाऊसही सुरू होता. तो पुन्हा वरती तिच्या खोलीत आला. ती शांतपणे झोपी गेली होती. तो बेड लगतच्या आर्मचेअरवरती बसला.

' आज किती दिवसांनी आपल्या हातून खाल्ल तिने! कितीही खंबीर असली, कणखर असली आणि कितीही रागवली असली आपल्यावरती तरी कधीकधी हतबल असते ती या सगळ्या परिस्थितीपुढे.मग ही अशी चिडचिड करत राहते.' त्याने तिचा हात हातात घेतला.

" मी माझा हात दुसऱ्या कुणाच्याही हातात नाही देणार. प्रॉमिस." 

 तिच्या चेहऱ्याकडे पाहताना त्याच्या चेहऱ्यावरती स्मितहास्य पसरलं.
.....................................................

दुपारचे साडेतीन वाजले घरासमोर एक स्कॉर्पियो येऊन थांबली.

" काकू चला घर आलं."  आशिष उत्साहाने गाडीचे ब्रेक दाबत म्हणाला.

" हो, पण किती लेट झाला. पाऊस आणि त्यात ट्रॅफिक. अनु एकटीच कंटाळली असेल."  गाडीतून लगबगीने उतरत कुमुद म्हणाली.

" हो, हो आता पोचलात ना. म्हणूनच आलो मी सोडायला." आशिषही हसत खाली उतरला.

" कुमुद ही कार!"   श्रीधर समोरच्या कारकडे बोट दाखवत बोलले तसं क्षणभर कुमुदला विक्रमची आठवण झाली.
आशिषलाही आश्चर्य वाटलं.

" त्यात काय काका,  त्यांच्या स्टाफ पैकी असेल कुणीतरी कामासाठी म्हणून."  अाशिष सहज बोलला.


 तिघे चालत दारापर्यंत आले तर दरवाजा बंद!

" अरे, दार तर बंद आहे आतून! तुम्ही मिस कॉल देऊन बघा."

 बंद दाराकडे पाहत कुमुद बोलली. श्रीधरने तिचा नंबर पटकन डायल केला. दोन तीन रिंग झाल्या तरी पलीकडून कॉल कोणी उचलेना.


" कॉल का उचलत नाही ही!"   त्यांनी पुन्हा कॉल ट्राय केला.


" का काय झालं ?"


" नाही ग, नो रिस्पॉन्स."  


श्रीधरनी  शेवटी ' दरवाजा उघड आम्ही आलो '  असा टेक्स्ट मेसेज टाकला.

" काहीतरी कामात असतील. नोट्स काढत असतील. काही तरी डिस्कशन सुरु असेल." आशिष ने म्हटलं तसं त्यांनीही बळेच हो म्हटलं.
..............................................

       त्याने डोळ्यांवरून हात फिरवला. हातावरील घड्याळात पाहिलं. " बापरे! तीन वाजले सुद्धा. इतकी कशी झोप लागली!" 

 त्याने घड्याळात पाहिलं. तिचा हात त्याने आपल्या हातातून हलकेच बाजूला केला. चेअरवरती बसल्या बसल्या त्याच्या डोळ्यांवरती सुद्धा झोप आली.  चेअरवरुन उठत त्याने आळस झटकला. टि-पॉयवरल्या तिच्या मोबाईल कडे त्याचं लक्ष गेलं. जवळ जाऊन पाहिलं तर श्रीधरचे पंधरा मिनिटांपूर्वी चे दोन-तीन मिस कॉल होते आणि मेसेज सुद्धा! फोन सायलेंट ला असल्याने त्याला ऐकू गेले नाही ना तिला जाग आली.  तिला न उठवता तसाच खोलीतून तो बाहेर गेला. जाताना त्याचं ब्लेझर मात्र बेडवरतीच राहिलं जे त्याने किचन मध्ये जाताना काढून बाजूला ठेवलं होतं.
................................................

    त्याने अतिशय सहजतेने दरवाजा उघडला. आपल्याला पाहिल्यावरती आई-बाबांची काय प्रतिक्रिया असेल याचा विचार सुद्धा त्याच्या डोक्यात नव्हता.

" विक्रम तुम्ही इथे !"  त्याला समोर पाहून श्रीधर अवाक झाले.

 श्रीधर आणि कुमुदच्या चेहर्‍यांवरचा रंगच उडाला.

" हो मीच."  त्याने हसून म्हटलं.

 ते दोघं अवाक होऊन विक्रमकडे पाहत होते. पण त्याचं तिथे असणं हे आशिष साठी अनपेक्षित होतं. आशिष ने मनगटावरल्या घड्याळामध्ये नजर टाकली.

" या ना आत." 

 विक्रम दारातून बाजूला होत म्हणाला. आशिषचं पाऊलही वरती उचलेना. त्याच्या पायाखालची जमीन एव्हाना सरकली होती त्याला अस तिथे पाहून! कुमुदने आशिषच्या चेहऱ्याकडे कटाक्ष टाकला.

" बाय द वे. तुम्ही कोण? आपण फर्स्ट टाइम भेटतोय I think."  विक्रमने म्हटलं तसा आशिष भानावर आला.


"हा... I'm Aashish आशिष जहागीरदार."

आशिष ने कसाबसा शेकहँन्ड साठी हात त्याच्यासमोर धरला.

" Ok, I'm Vikram. Glad to meet you!" 

 श्रीधर नी कुमुदने एकमेकांकडे पाहिलं.

" तुम्ही........ इथे आणि  असे पावसातून..... काही काम होतं का?" आशिषने बिचकत विचारलं नी कुमुदच्या हातांना अक्षरशः घाम सुटला.


" छे! काम कसलं ?"   विक्रमने त्या दोघांच्या चेहऱ्याकडे पाहिलं. त्याला मनातून बरच हसू येत होतं. त्याने चेहरा जरा ठीक करत म्हटलं.

" मी या घरचाच आहे ना! सो.......मी  कधीही येऊ शकतो. त्या तिथे मी! आता आई बाबा त्यांना एकटीला सोडून गेले मग मी कसा जाणार ना! हो की नाही हो आई."


 तो गालातल्या गालात हसत म्हणाला. आशिष ने पटकन वरती नजर वळवली. कुमुदने मान खाली घातली.

"आशिष या तुम्ही चहा घेऊनच जा."   श्रीधर विक्रम कडे दुर्लक्ष करीत हॉलमध्ये आले. आशिषनेही कशीबशी मान हलवली नी तो श्रीधरमागून आत आला.

" बरं, आई मीही निघतो आता.......एक एक मिनिट One more help हा, माझं ब्लेजर राहिलय वरती "

ते शब्द आशिषच्या कानावरती पडले पण त्याने दुर्लक्ष केलं. कुमुदने रागाने विक्रमकडे पाहिलं.

" मी........मी घेऊन येते." 

 कुमुद तशीच तरातरा वरती गेली आणि तो बाहेर जाऊन गाडीपाशी थांबला.
...................................................

        कुमुदला आशिष समोर अगदी अवघडल्यासारखं झालं होतं. विक्रम इथे असेल हे आशिष साठी जितकं अनपेक्षित होतं तितकं ते या दोघांसाठी सुद्धा होतं! विक्रमला समोर पाहून आशिषच्या चेहर्‍यावरचे भाव बदलले  जे कुमुदच्या लक्षात आलं होतं.

' आम्ही जेव्हा जेव्हा तिच्या बाबतीत काहीतरी चांगलं करण्याचा विचार करतो तेव्हा तेव्हा आमच्या सगळ्या प्रयत्नांवर पाणी फिरवता तुम्ही विक्रम! आज फार चुकीचं वागलात तुम्ही! आणि हे असं काही तुम्ही बोलायला नको होतं. तुमच्या वागण्याला कसलाच ताळतंत्र उरलेला नाहीये. त्यांचे ठीक आहे पण हिला कळायला नको का! त्यांना घरात घेतलं कसं हिने!'

 तिच्या मनातले विचार वाऱ्याच्या गतीने सुरू होते नी ती खोलीच्या दाराच्या समोर जाऊन थबकली. तिने हाक मारण्याआधीच आतून अनघाने दरवाजा उघडला.


" आई आलात सुद्धा तुम्ही! "   तिच्या हातात त्याचं ब्लेझर होतं.
 तिला जाग आली तर तो खोलीत कुठे दिसला नाही. त्याला सुद्धा घरी निघायचं असेल म्हणून ती पटकन उठली. त्याचं ब्लेजर दिसलं म्हणून ते द्यायला ती खाली येणार तोच कुमुद समोर उभी!

कुमुदने दारापाशी उभ्या - उभ्याच एक नजर रूम मध्ये टाकली. खिडकीचे पडदे लावलेले होते. बेडवरच्या उश्या सुद्धा व्यवस्थित नव्हत्या. तिच्या विस्कटलेल्या केसांकडे लक्ष गेलं.


"  आई, विक्रम गेले का ? त्यांचं ब्लेझर....."


 काहीही न बोलता कुमुदने तिच्या हातातलं ब्लेजर आपल्या हातात घेतलं. त्यावरचे तिच्या लिपस्टिक चे डाग सुद्धा कुमुदच्या नजरेतुन सुटले नाहीत. तिने अनघाकडे रागाने एक जळजळीत कटाक्ष टाकला. त्या एका नजरेत बरंच काही होतं. विक्रमबद्दलचा राग आणि काही प्रश्न सुद्धा! तिला काहीही न बोलता कुमुद तशीच निघून गेली.

" आई ऐक तर......."   अनघा मागून हाका मारत होती. पण कुमुदनी तिचं काहीही ऐकलं नाही.
....................................................

कुमुद रागाच्या भरात खाली हॉलमध्ये आली. श्रीधर आणि आशिष किचनमध्ये गप्पा मारत होते. तिला जरा हायसं वाटलं. ती तशीच बाहेर विक्रमच्या गाडीपाशी आली.
" हं "
तिने हात पुढे केला.

" थँक्स, थँक्यू......."  त्याने हसत ब्लेझर आपल्या हातात घेतलं.

" खूप आनंद झालाय का तुम्हाला? एका परक्या मुलासमोर आम्हाला मान खाली घालायला लावली तुम्ही!"


" त्यात मान खाली घालण्यासारखं काय! मी काही तुमच्या मुलीचा बोयफ्रेंड नाही जे असं लपून-छपून भेटायला आलो चार चौघांना कळलं आणि तुम्हाला मान खाली घालावी लागली. आणि तसंही मी इथे केव्हाही येऊ शकतो. मी मला हवा तितका वेळ थांबू शकतो. I'm her husband. विसरलात का ?"
 तो म्हणाला.


" नाही. आहे ना चांगलंच लक्षात आहे. तुम्ही तिचा नवरा आहात. आमचे जावई आहात हेच तर दुर्दैव आहे आमचं!"

" आहे तर आहे ना! त्याला आता कोण काय करणार!"

 तो छद्मीपणे हसला.

" तेच तर. आता पुरे झालं हे सगळं. अजून किती काळ सुरू राहणार आहे! तिला तिच्या भविष्याची चिंता नसेलही. ती काय अजून दहा वर्ष सुद्धा राहिलं अश्या अधांतरी परिस्थितीत! आम्हाला काळजी आहे तिची म्हणूनच काहीतरी निर्णय घ्यावा लागेल. हे पहा, तुम्ही......तुम्ही तिचे गुन्हेगार आहात आणि त्यात हे असं फसवून तुम्ही लग्न...... तिचे बाबा तुम्हाला माफ करणं शक्य नाही आणि तिला सुद्धा पुन्हा माघारी तुमच्याकडे येणं मन:स्ताप देणार असेल. एक अस सत्य जे आता तिला माहिती आहे. त्याच्याशी सामना करत कसं आयुष्य काढणार ती तुमच्या सोबत! आणि ती अशी घरी रडत तरी किती महिने बसणारय! कधी ना कधीतरी नवी सुरुवात करावी लागेल." कुमुद असं बोलत होती.


" मग, मी काय करावं अशी अपेक्षा?" त्याने एका ओळीत मुद्द्याला हात घातला.

" आशिष चांगल्या कंपनीत मोठ्या पोस्ट वरती आहे. तो काही महिन्यांनी यु.एस.ला जाईल. आम्हाला.......आम्हाला....." ती

 थोडीशी दबकत बोलणार तोच तो म्हणाला,

" हं मग ?"

"तुम्ही..... तुम्ही तिला या नात्यातनं ऑफिशियली मोकळं करा." ती म्हणाली.

" कधी आणि कुठे सह्या करायच्या तेवढ फक्त सांगा."

 त्याने गाडीचा दरवाजा उघडला. त्याच्या मागे ती उभी होती. त्याने मागे वळून पाहणं टाळलं. इतक्या शांतपणे तो उत्तरला यावर. तिला बरं वाटलं. ती ही आता समजुतीच्या स्वरात बोलू लागली.


" पेपर्स नाहीयेत तयार अजून...... पण......"

 ती पुन्हा म्हणाली तोच तो म्हणाला,

"हं, आणा. पेपर्स आणा. स्थळं शोधा. कितीही कागदी घोडे नाचवा. काहीही करा. I don't care या असल्या गोष्टींनी मला फरक पडत नाही. because I know I'm the best.  आणि तुम्हाला माहित नाही तुमची मुलगी माझ्यासाठी किती वेडी आहे हे!  गुडबाय."

 त्याने दरवाजा बंद केला आणि गाडी स्टार्ट केली. क्षणात गाडी तिच्या नजरेसमोरून निघून गेली आणि कुमुद रागाने नुसती पाहत राहिली.


क्रमशः

आजच्या भागातून तिच्या आईबाबांची बाजू बर्‍यापैकी तुमच्यापर्यंत पोचली असेल. एक साधी गोष्ट लक्षात घ्या, तिचं लग्न करुन देणं म्हणजे ती त्यांना ओझं झालीय किंवा एकदाचं ती कशीतरी लग्न करुन जाऊ दे म्हणून ते विचार नाही करत आहेत. तस असतं तर एखादा विधुर, डिव्होर्सी मुलगा पण चालला असता पण त्यांना तस नकोय. आणि ती एका सिनियर कॉलेजला लेक्चरर आहे म्हणजे तिचं वय हे साधारणतः तिशीच्या आसपास असणार आहे. या वयात आपल्या मुलीचा संसार छान सुरु असावा ही सगळ्याच आईवडिलांची इच्छा असते कारण आईवडिलांचीही वय होत चालली असतात अश्यात आपल्याला जर काही झालं तर ती एकटी पडू नये म्हणूनसाठी त्यांचा खटाटोप सुरु आहे. 
See you in next part
Happy Reading, Thank You

🎭 Series Post

View all