बंधन भाग 107

Social Love

भाग 107
( गेल्या भागात समिहा राजेश्वरीला विक्रमचं म्हणण सांगते त्यामुळे विक्रम - समिहा हे नातं काही पुढे जाणार नाही हे राजेश्वरी, अरुंधतीच्या लक्षात येतं. दुसरीकडे अनघाचे आई- वडिल मात्र तिच्या भविष्याबद्दल बरंच काही ठरवतायत. पाहूया पुढे)


        काकांच्या त्या दिवशी च्या घरी येण्यामुळे कुमुद आणि श्रीधरराव खूष होते. ' तुम्ही नका काळजी करू. मी त्यांचं आयुष्य पुन्हा सुंदर बनवेन ' या आशिषच्या शब्दांनी त्या दोघांना बरं वाटत होतं. त्यांना खात्री होती श्रीकांतच्या वेळी जे घडलं ते आता आशिष च्या बाबतीत होणार नाही. अनघाच्या बाबतीतल्या त्या दुःखद घटनेनंतर श्रीधर श्रीकांतच्या आई-वडिलांशी बोलले होते. पण समजुतीचा घोटाळा झाला आणि त्या वेळी श्रीकांतच्या आई-वडिलांनी आयत्या वेळी साखरपुडा मोडला होता. बरचसं उलट-सुलट ऐकवून ती मंडळी रागाने गेली होती. पण आता तसं काही होऊ नये यासाठी श्रीधरने हरीशला सगळी घडलेली हकीकत सांगितली होती. अगदी अनघा गुरुकुलला नोकरीवर रुजू झाल्यापासून ते ती राजेशिर्केंचं घर सोडून येण्यापर्यंत सगळ्याच गोष्टी त्यांनी हरीश आणि अाशिषच्या कानावर घातल्या होत्या. अर्थात तेव्हा अनघा साठी जोडीदार शोधणं, तिच्या पुनर्विवाहाचा विचार असं काही श्रीधरच्या डोक्यात नव्हतं. पण आपलं मन मोकळं करावं म्हणून ते हरिशपाशी बोलायचे. हरीश श्रीधरराव यांचे जुने मित्र होते तसं त्यांचं श्रीधरच्या घरी वरचेवर येणं-जाणं नसायचं. पण आपल्या  मित्राच्या लेकी गुणी आहेत, स्वभावाने चांगल्या आहेत याची हरीशला कल्पना होती. अनघाचं आणि विक्रमचं लग्न ठरलं तेव्हा उत्साहाने श्रीधरनी अनघाच्या लग्नाची पत्रिका हरिशला दिली. तेव्हा आपल्यासारख्या मध्यमवर्गीय घरातली मुलगी एका आमदारांची सुनबाई होणार याचा आनंद हरीशला सुद्धा झाला. त्यावेळी मात्र श्रीधरला अश्रु अनावर झाले नी अनघाच्या बाबतीतली घटना, त्यानंतर भाऊसाहेबांसमोर तिचा मोडलेला साखरपुडा, भाऊसाहेबांना झालेलं दुःख आणि त्यातून त्यांनी विक्रमशी जुळवलेलं तिचं लग्न हे सगळं त्यांनी हरीशला सांगितलं तेव्हा त्यांनाही हा धक्का बसला होता. त्या लग्नानंतर वर्षभरातच तिचं माहेरी येणं, त्यानंतर बापूसाहेबांनी कॉलेज वरती केलेले भ्रष्टाचाराचे आरोप,
 तिची पत्रकार परिषद हेसुद्धा सगळ्यांपर्यंत पोहोचलं तस ते हरीशपर्यंतही पोहोचलं. तेव्हा श्रीधरकडून त्यांना सत्य परिस्थिती कळली. लग्नानंतरही तिची फरफट सुरूच राहिली उलट विश्वासघाताचं दुःख पदरी पडलं त्यामुळे हरीशकाकांनाही वाईट वाटत होतं. 

एकदा बोलण्याच्या ओघात आपल्या मुलाच्या अाशिषच्या लग्नाचा विषय त्यांनी काढला. हरीश सांगलीतच राहणारे होते. मुंबईला एका मल्टिनॅशनल कंपनीत आशिष मोठ्या हुद्द्यावरती नोकरीला होता आणि त्याला कंपनीकडून आता यु एस ला जाण्याची संधी मिळाली होती. थोड्याच महिन्यांनी तो विदेशात जॉब साठी जाणार होता फक्त त्या आधी त्याचं लग्न व्हावं की मग नवरा-बायको दोघं आरामात, आनंदात तिकडे राहतील. त्यालाही तिकडे एकटं वाटणार नाही. काळजी घेणारं, सोबत असणारं हक्काचं माणूस असेल या विचाराने हरीशनेही आशिषच्या लग्नाचा विचार सुरू केला. अनघाच्या बाबतीत इतकं सगळं घडलं असलं तरी ती हुशार आहे, उच्चशिक्षित आहे, सुंदर आहे, गुणी आहे.  सुन म्हणून त्यांच्या अपेक्षा होत्या त्याला साजेशी होती अनघा. आणि म्हणून हरिशने श्रीधरकडे अनघा- आशिष याबद्दल विचार करण्यास सुचवलं. त्यांनी आशिषचं मत विचारात घेतलं. त्याने हिरवा कंदील दाखविल्यावर श्रीधरने कुमुदपाशी हा विषय काढला. अनघा या सगळ्या वातावरणापासून दूर जावी असं दोघांनाही वाटत होतं. म्हणून दोघेही आशिषचा आता भावी जावई म्हणून विचार करू लागले होते.
.........................................

        " श्रीधर आता आठवड्याभरात सुट्टी संपेल तिची." चहाचा कप श्रीधरच्या हातात देत कुमुदने म्हटलं.

" हो, आता तिच्याशी बोलायला हवं राजीनाम्या बद्दल आणि अाशिषबद्दल सुद्धा!" श्रीधर चहाचा घोट घेत म्हणाले.

" हं, आणि हरीश भाऊजी घरी येऊन झाले आता चार-पाच दिवस. आशिष येत राहिला अधून मधून आपल्याकडे तर बरं होईल. त्या दिवसापासून त्याचा काही फोन बिन नाही." कुमुद म्हणाली.

" हो मी बोलतो अाशिषला. तो तिच्याशी बोलायला लागला. त्यांची ओळख वाढली तर बरं होईल. तिचंही लक्ष दुसरीकडे जाईल." श्रीधर विचार करत म्हणाले.

" अहो पण ते ठीकय पण...... पण त्यांच्याशी बोलावं लागेल ."

कुमुद चाचरत म्हणाली.

" मी भाऊसाहेबांच्या कानावर घातलय."

" मी......मी सरांच्या म्हणतेय. त्यांना सांगावं लागेलच." कुमुद म्हणाली तस श्रीधरनी मान हलवली.

"हं. डिव्होर्सची प्रोसेस लवकर सुरू झाली तर बरं होईल."

 श्रीधर म्हणाले.

" मी बोलेन त्यांच्याशी."  कुमुद ठामपणे म्हणाली तस श्रीधरने पटकन तिच्याकडे पाहिलं.

" हो, मी बोलेन तसं मला बोलायचं होतं त्यांच्याशी. तिची आई म्हणून कळकळीने, हतबलतेने बोलून झालंय त्यांच्याशी. आता आई म्हणून कठोरपणे वागण्याची वेळ आलीय."

 ती निश्चयाने म्हणाली.
......................................................


         अनघा बेडवरती शांतपणे भिंतीला टेकून बसली होती. एक- दिड आठवड्याने सुट्टी संपणार होती आणि कॉलेज पुन्हा सुरू होणार होतं. बारावीला चांगले टक्के मिळवून आलेले विद्यार्थी, आपलं मूल खूप शिकेल आणि दारिद्र्यातलं आपलं जगणं संपेल, पोराला नोकरी लागेल, मोठ्या कंपनीत ऑफिसर होईल या आशेने येणारे सांगली आणि आजूबाजूच्या जिल्ह्यातल्या खेड्यापाड्यातील पालक आणि त्यांची मुलं. दरवर्षी सारखं चित्र यंदाही असेल. असेल का! ही शंका मनात आलीच. मार्च - एप्रिल च्या दरम्यान जे काही घडलं होतं. कॉलेजवरती जे आरोप झाले होते. त्याचा परिणाम प्रवेशप्रक्रियांवरती होईल असाही विचार मनात आला तसं दुसरं मन म्हणालं, भाऊसाहेबांनी केलेली इतक्या वर्षांची सेवा व्यर्थ नाही जाणार. बिचारे भाऊसाहेब. विक्रम मुळे त्यांच्यावर नको-नको ते पाहण्याची वेळ आली. तो  समोर येत असेल तेव्हा काय वाटत असेल त्यांना! या विचारातच ती उठली आणि कपाटाजवळ गेली. कॉलेज सुरू होणार म्हणून कपाट लावून ठेवावं तेवढाच वेळ जाईल म्हणून तिने कपाट उघडलं. हँगरला अडकवलेल्या स्कार्फ आणि दुपट्यांकडे तिचं लक्ष गेलं. त्याने जयपूरहून तिच्यासाठी आणलेल्या त्या रंगीबेरंगी दुपट्ट्याकडे तिची पटकन नजर गेली. तिने तो दुपट्टा हँगरमधून बाहेर काढला आणि हातात घेतला. त्यावरचे मरुन, पिवळा, हिरवा तीन रंग , दोन्ही टोकाला गोंड्याची डिझाईन. किती नाजूक आणि सुंदर! ती विषादाने हसली. लग्नानंतर पहिल्यांदा तो असा कामासाठी म्हणून इतक्या लांब गेला होता. आपण एकटे नाही आहोत. घरी कोणीतरी आपल्या वाटेकडे डोळे लावून बसणारं आहे हे लक्षात ठेवून अगदी आठवणीने तिच्यासाठी त्याने काहीतरी आणलं होतं. त्याच्याकडून मिळालेलं ते पहिलं गिफ्ट! तिच्या नजरेसमोर ती जुनी आठवण तरळली. तिची मानसिक अवस्था सुद्धा तेव्हा उत्साहाने तो बॉक्स उघडून पाहण्याइतकी नव्हती. तिने तेव्हा साधं थँक्सही नव्हतं म्हटलं त्याला!

" ताई, हे बघ कोण आलय तुला भेटायला!"

 रिया हॉलमधून ओरडली तसं ती भानावर आली. तिने हातातला दुपट्टा कपाटात तसाच ठेवला आणि कपाट बंद करून ती खाली आली.
..........................................................

" हॅलो " समोरच्या सोफ्यावरती बसलेला आशिष तिला पाहताच हसत उठून पुढे आला.

" हाय "  ती कसंनुसं हसत म्हणाली.

" काय करताय?  I mean बिझी आहात का ?"  त्याने विचारलं.

" अ....नो नाही......का ?" 

 तिने म्हटलं तस रिया पटकन पुढे आली.

" चल ना मग पिक्चरला जाऊया. आशिष म्हणाला....."

रिया उत्साहात बोलायला लागली तसं तिने रागाने कटाक्ष रियाकडे टाकला तशी ती नरमली. आशिषच्या नजरेतून ते सुटलं नाही.

" तसं नाही.......म्हणजे अॅक्चुयली.....ती माझी आयडीआ होती. सो......"    तो रियाची बाजू सावरत म्हणाला.

" जाऊया का मग आपण बाहेर?  तुम्ही, मी आणि रियापण येऊ दे हव तर."  तो असं म्हणाला म्हटल्यावरती रियाने उत्साहाने त्याला हाताने ठेंगा दाखवला.

" ताई, चल ना ग. किती दिवसात आपण बाहेर नाही गेलो! चल ना चल ना. "


" ओके. " ती मग नाईलाजाने रियाला म्हणाली.

" हा.....मस्त मग मी येते हा रेडी होऊन." रिया उत्साहाने म्हणाली आणि वरती खोलीकडे पळाली.

 ती निघून गेली तसं अनघालाही तिथून जायचं होतं पण असं कसं त्याच्या समोरून निघणार. ती बोटांची चाळवाचाळव करत तशीच उभी राहिली.

" मग आता कॉलेज सुरू होईल तुमचं." 
ती गप्प उभी पाहून त्याने बोलायला सुरुवात केली.

" हो नेक्स्ट वीक."

" छान शिकवता तुम्ही! हा म्हणजे श्रीधरकाका म्हणाले तसं."
त्याने अंदाज घेत बोलणं वाढवलं.

" ते असंच. बाबांना उगीचच कौतुक."  तिने तोंडदेखलं उत्तर दिलं.

" नाही . उगीच कसं!  इतकं पर्सनल लाईफ डिस्टर्ब असतानासुद्धा तुम्ही रेगुलर कॉलेजला जाता. तुमचे रिझल्टही छान असतात." तो कौतुकाने म्हणाला.

" त्यात काय इतकं! माझी ड्युटी आहे ती. बरं मी येते आवरून. " ती जायला वळली.

" ओके ओके शुअर."  तो म्हणाला. त्याला वाटलं खूपच बोलणं ताणण्याचा प्रयत्न केला आपण!

" ऐका ना. मी...... मी काय म्हणू तुम्हाला ? I mean  तुम्हाला सगळ्यांसारखं ' मॅडम ' म्हणू की तुमच्या घरातले म्हणतात तसं ' अनु '? 

त्याच्या या प्रश्नाने ती  क्षणभर  थबकली. तिच्या कानात शब्द घुमले.

' अनु,  कधी कधी वाटतं. तुझ्या लेक्चरला येऊन बसावं. मला आवडेल तुझा स्टुडन्ट व्हायला, तुझा स्पेशल स्टुडन्ट. You're the best teacher in my life.'  

"  नको.... तुम्ही फक्त अनघा म्हणा!  माझे स्टुडन्ट म्हणतात मॅडम. तुम्ही काही माझे विद्यार्थी नव्हेत. आणि मला अनु म्हणणारी दोनच माणसं आहेत, माझे आई-बाबा!"  इतकं बोलून ती तरातरा पायऱ्या चढून वरती गेली.

" ओके अनघा." तो हसून म्हणाला.
......................................................
         
               रियाच्या आग्रहाखातर अनघा बाहेर फिरायला जायला तयार झाली. आशिष घरी आला आणि त्या निमित्ताने का होईना ते तिघं घराबाहेर पडले याचं कुमुदलाही  बरं वाटलं. तिला खरतर रियाला जाऊ नकोस तू असंच सांगावसं वाटत होतं. पण तिच्यामुळेच अनघा बाहेर पिक्चरला वगैरे  जायला तयार झाली होती. आशिष सोबत बाहेर जायला अनघाने आढेवेढे घेतले असते त्यामुळे तिने रियाला सुद्धा दोघांसोबत जाऊ दिलं. सावकाश या, बाहेरून जेवून आलात तरी चालेल असही कुमुदने सांगून टाकलं. मग तर रियाच्या उत्साहाला पारावार उरला नाही. पिक्चर, दुपारी रेस्टोरंन्टला जेवण, शॉपिंग सगळं हौस तिने भागवून घेतली. आशिषलाही बरं वाटलं. त्याला जास्तीत जास्त वेळ अनघासोबत घालवायचा होता त्यामुळे खिशाला कात्री लागली तरी चालणार होतं. रियाला हवं तितका वेळ ते भटकले. रियाला श्रीकांत जीजू म्हणून तेव्हा आवडला होता. पण ते नातं जुळता जुळता तुटलं.  त्यामुळे रियाची आणि श्रीकांतची फार दोस्तीच झाली नाही आणि आता विक्रम. विक्रम - अनघाचं लग्न होऊन वर्ष झालं असलं तरीही रियाची विक्रम सोबत फार गट्टी जमली नव्हती. 
भाऊसाहेबांचा मुलगा शिवाय ताई जिथं काम करते तिथे एका अर्थाने तो बॉस असणं या सगळ्यामुळे त्या दोघांत नेहमीच अंतर राहीलं. त्याला लाडाने जीजू म्हणून पिडणं, त्याच्याकडून लाड करून घेणं, आपल्या ताईचा नवरा म्हणून त्याची थट्टा मस्करी करणं हे काहीच त्या दोघांमध्ये नव्हतं. आपल्या ताईसमोर हट्ट करणारी,  तिच्या खोड्या काढणारी रिया विक्रमसमोर मात्र मोठी असल्यासारखी वागायची. इतकं की आजवर तिने कधी त्याला जीजू किंवा विक्रम म्हटलं नव्हतं. पण आता आशिष अनघासोबत असताना रियाला खूप छान वाटलं. अगदी शांत आणि मनमोकळेपणाने ती आशिषसोबत बोलत होती. तोही तिच्या सोबत हसत खेळत वागत होता. तिची मस्करी करत होता. तिला काय हवी ती शॉपिंग करू देत होता. तिला वाटलं खरंच, आशिषचं नी ताईचं लग्न झालं तर किती छान होईल! अनघाला मात्र त्या दोघांची दोस्ती होणं नको वाटत होतं. तिला कंटाळा आला होता. इच्छाच नव्हती बाहेर फिरण्याची. कसाबसा तिने वेळ ढकलला.
.....................................................


         रात्री जेवण आटोपल्यानंतर कधी एकदाचं शांतपणे खोलीत जाऊन बिछान्याला पाठ टेकते असं वाटत होतं तिला. त्यातून घरी आल्यापासून रियाने आशिषचं गुणगान गायला सुरुवात केली.  रियाचे किस्से कुमुदसुद्धा अत्यानंदाने ऐकत होती. कुमुद, श्रीधर आणि रियाने सतत आशिषचं कौतुक करणं तिला ऐकवेना. तिने पटकन जेवण आटोपलं आणि ती तिच्या खोलीत गेली. पण श्रीधर- कुमुदने ठरवलं होतं, आता तिच्याशी बोलायला हवं आशिष विषयी स्पष्टपणे म्हणून सगळी कामं आवरल्यानंतर ते तिच्या खोलीत आले.

" अनु, झोपलीस काय?"  आत येत श्रीधरन विचारलं. मागाहून कुमुदही आत आली.

"तुम्ही झोपला नाही अजुन."    तिने दोघांना म्हटलं.

" नाही झोपायला जात होतो. पण..... पण आलो. बाबांना तुझ्याशी बोलायचं जरा." श्रीधरच्या चेहऱ्याकडे पाहत कुमुदने म्हटलं.

" हा बोला ना. त्यात विचार करण्यासारखं काय इतकं!" श्रीधरच्या विचारात पडलेल्या चेहऱ्याकडे पाहत ती म्हणाली.

" तू काय ठरवलयस? म्हणजे आता कॉलेजला जाणार आहेस का?"

" म्हणजे ? मला नाही समजलं." ती गोंधळून म्हणाली.

" आता इतकं सगळं घडल्यानंतर......तू.....तू पुन्हा तिथे जॉब करणं......" श्रीधरनी बोलून टाकलं.

"हं."   तिची इतकीच प्रतिक्रिया. थोडावेळ शांतता पसरली तस कुमुदने बोलायला सुरुवात केली.


" अनु, खरं तर आम्हाला वाटतं की तू ती नोकरी सोडावी आणि हे शहर सुद्धा! कारण या वातावरणात राहिलीस ना तर कुठेही जा तुझं शिकवण्यात लक्ष लागणार नाही. नी जुनं सगळं मागे टाकता येणार नाही. इथे राहून करिअरची, आयुष्याची माती करून घेण्यापेक्षा........"

 आता कुमुद क्षणभर बोलायची थांबली. तिने मागे वळून त्या दोघांकडे पाहिलं.


" त्यापेक्षा काय? " तिने त्यांच्या नजरेला नजर देत विचारलं.


" त्यापेक्षा तू इथून बाहेर पड. आशिष यु.एस. ला जाणार आहे. तिथे जॉब साठी चान्स मिळाला आहे त्याला." कुमुद म्हणाली.


"  मग मी काय करू? नी त्याचा काय संबंध आता ?" तिचा स्वर थोडासा चढला.


" हेच की या नात्यातनं मोकळी हो! आशिष अनमॅरिड आहे. हरिश त्याच्या लग्नाचा विचार...... आणि आम्हाला असं वाटतं तु नी आशिष...... आणि हो आशिष नी हरीशला सगळ्या गोष्टींची कल्पना आहे आणि त्याला मान्य आहे सगळं." श्रीधरने एका फटक्यात सगळं तटस्थपणे सांगितलं.


" काय! काही काय बाबा. इथपर्यंत तुम्ही लोकांनी ठरवलं!"  ती चिडली.


" त्यात काय! आणि हे कुठवर चालणार आहे असं? कधी ना कधीतरी काहीतरी ठरवाव लागेलच." श्रीधर म्हणाले.


" पण ही वेळ नव्हे." ती उत्तरली.

" मग केव्हा? हे बघ अनु, जितकं झालं ते खूप आहे. आणि या सगळ्याची सुरुवात गुरूकुलपासून झाली होती. तिथून बाहेर पड. इथून लांब जा. एवढी एज्युकेटेड आहेस तू. त्याशिवाय एम.बी.ए. एखाद्या कंपनीत जॉब मिळेल तुला सहज. चांगलं करिअर असेल आणि तुझ्या विषयी इतकं सगळं समजूनही आशिष सगळं विसरून इथवर येत असेल तर म्हणजे त्यालाही हे रिलेशन पुढे न्यायचे आहे ना! आज पाहिलसं ना रियासोबत पण तो किती छान वागला!"


" म्हणून काय झालं बाबा!" ती त्रासिकपणे बोलली.

" अहो."  कुमुदने श्रीधरला नजरेने थोडं शांतपणे बोलायला सांगितलं.

" अनु, बाळा आम्ही काही तुझ्या वाईटासाठी नाही करत ना! बरं, टेक युवर टाईम. कॉलेज सुरू झालं की जा तू. पण यावर विचार कर. काही महिन्यांनी आशिष यु.एस.ला जाईल. त्या आधी त्यांना आपला निर्णय सांगावा लागेल." श्रीधर बोलले आणि जायला वळले.

" अनु गुड नाईट झोप लवकर."  कुमुदही कसबसं बोलून लगेच श्रीधर मागून खोलीबाहेर पडली.


      ती स्तब्ध उभी होती. ' दुसरं लग्न ' हा विचारच सहन होईना तिला. बाबा जे बोलले ते स्वप्न होतं असं वाटायला लागलं तिला. गुरुकुल नी सांगली सोडून इतक्या दूर जायचं या कल्पनेने तिच्या डोळ्यात अश्रू उभे राहिले.

क्रमशः

Next Part आशिष विक्रम भेट. कुठे भेटतील ते कॉलेजला, रस्त्यावरती अचानकपणे. की ठरवून एखाद्या कॅफे, रेस्टॉरंन्टला! भांडतील की शांतपणे बोलतील जस्ट इमॅजीन...
Happy Reading, Thank You

🎭 Series Post

View all