बंधन भाग 103

sneha dongare blog sneha dongare

103

( गेल्या भागात बापुसाहेब कारखान्यावरती आंदोलन करतात. ज्यामुळे पुन्हा गोंधळ होतो. भाऊसाहेबांनी सुनेवरच्या अन्यायाकडे डोळेझाक केली हाच त्यांच्या बोलण्याचा रोख होता. यामुळे जितेंद्र, भाऊसाहेबांना त्रास नको म्हणून विक्रमने पत्रकार परिषद घ्यायची ठरवली. पाहूया पुढे )

          विक्रमसोबत बोलल्यानंतर जितेंद्र त्याच्या खोलीत निघून आला. रात्रही खूप झाली होती आणि दिवसभर जे काही घडलं होतं त्याने त्याचं मन अक्षरशः बधीर झालं होतं. त्याने बेडवरती अंग टाकलं. पण झोप काही डोळ्यात उतरेना.  विक्रमचं मघाचं बोलणं त्याच्या कानात घुमत राहीलं. तो पत्रकार परिषद घेणार! नक्की कशासाठी ? बापूसाहेबांनी आपल्यावर, भाऊसाहेबांवर टिका केली त्याचं उत्तर म्हणून कि कि...... वहिनींचं नाव यात ओढून त्याच्यावरती बापूसाहेबांनी जे आरोप लावले त्यासाठी. आणि तसंही त्याच्या हातून जे काही वैनींबाबतीत घडलं तेही काही कमी भयंकर नाहीय. अनेक उलटसुलट विचार त्याच्या मनात येत होते आणि अचानक त्याने मिटलेले डोळे खाडकन उघडले. तो तसाच उठून बसला. बेड वरती पडलेला मोबाईल हातात घेतला. त्याच्या चेहर्‍यावर काळजी सोबत आता भीतीही दिसत होती. त्याने पटकन एक नंबर डायल केला.

" हॅलो, मी जितेंद्र."  त्याने सगळा धीर एकवटून म्हटलं. आत्ता रात्री साडेबारा वाजता आपण फोन केल्याचं त्याला उचित वाटेना.

" हॅलो, भावोजी बोला."  पलिकडून अनघा नेहमीच्या सुरात बोलली. म्हणजे ती झोपली नव्हती तर! क्षणात त्याच्या मनात विचार आला.

" हॅलो बोला ना. ठीक आहे ना सगळ आता ?"  तो गप्प बसलेला पाहून पलीकडून तिने काळजीने विचारलं.

"अ.....हा हा  म्हणजे आता ठीक आहे."  तो म्हणाला. त्याला खरं तर उद्या विषयी बोलायचं होतं.

" मी पाहिल्या न्यूज दुपारी. भावोजी तुमच्या मागे उगीच हे सगळे आमच्या मुळे!"  ती थोड्याशा अपराधी भावनेने म्हणाली. विक्रमच्या चुकीच्या वागण्याचे परिणाम त्यांना भोगावे लागतायत याचं तिला शल्य होतं. शिवाय गेले दोन दिवस आपल्या नावाचं भांडवल करून विरोधक काहीही वक्तव्य करत सुटलेत याचंही वाईट वाटत होतं.

" नाही ओ वैनी. त्रास कसला!" 

" खरंतर ज्या व्यक्तीमुळे हे सगळं होतय ते मात्र.....त्यांच्या चेहऱ्यावरची एक रेषही हललेली नाही. काही दुःख नाही, गिल्टी वाटणं तर लांबची गोष्ट!" ती जराश्या रागीट सुरात बोलली. जितेंद्रने एक दीर्घ श्वास घेतला.

" वैनी, तो...... तो पत्रकार परिषद घ्यायची म्हणतोय तेही उद्या."  जितेंद्रने एका दमात बोलून टाकलं.

" काय! प्रेस कॉन्फरन्स."  तिला आश्चर्य वाटलं हे ऐकून.

" वैनी, उद्या तो काय बोलेल We don't know. खरं तर अजून घरीही कोणाला याबद्दल माहिती नाहीय. यामुळे अजून गुंतागुंतीचं होईल सगळं."

" पण हे असं परस्पर ठरवून कसे मोकळे झाले ते. कोणाला काही सांगणं, विचारणं हे आयुष्यात कधी करणार आहे का हा माणूस! की परस्पर आपल्याला वाटेल तसं वागायचं ठरवलंय."  ती चिडली तसं जितेंद्रला काय बोलावं सुचेना.

" वहिनी ऐका ना. तुम्ही प्लीज चिडू नका." तो तिला समजावत म्हणाला.

" नाही ओ, चिडत नाही मी. असो..... जस्ट लिव्ह इट. काय करायचं ते करु द्या त्यांना." ती सहजच स्वरात बोलली.

" वैनी असं शांत बसून नाही चालणार. उद्या जर सगळ्यांसमोर तो......"  पुढचे शब्द मात्र जितेंद्रने अावंढ्यासोबतच गिळून टाकले.

" सगळ्यांसमोर काय ?"   तिने शंकेने विचारलं.

" आ..... हेच हेच की सगळ्यांसमोर काही उलटसुलट बोलला तर पुन्हा बापूसाहेबांना आयती संधी मिळेल बोलायला!"  त्याने कशीबशी शब्दांची जुळवाजुळव करत म्हटलं.

" हं, तेही आहेच." 

" वैनी, उद्याची प्रेस कॉन्फरन्स होणारच नाही असं काही करता येईल का!"  तो हतबलतेने बोलला पण आपण काहीतरीच मूर्खासारखं बोलून गेलो असं त्याला वाटलं.

"  तुम्ही शांत व्हा आधी.  तुम्ही साहेबांशी बोला काहीतरी मार्ग निघेल. बाकी त्यांना समजावण्यात अर्थ नसतो हे तुम्हाला माहीत आहे."

" हं. बरं ठेवतो आता. सॉरी मी असं लेट....." तो पुन्हा म्हणाला.

"It's ok. बरं गुड नाईट. झोपा तुम्ही शांतपणे."  ती त्याला धीर देत बोलली..
.....................................................
      दुसऱ्या दिवशी सकाळी लवकर उठून तिने आवरलं. पण कॉलेजला जायची तयारी मात्र तिने केली नाही ! आज काय होणार हा विचार करुन डोक्याला मुंग्या यायची वेळ आली. शेवटी तिने कपाट उघडलं आणि इथे निघून येताना आणलेली बॅग बाहेर काढली. त्यात तिकडून आणलेल्या साड्या आणि काही ड्रेस होते जे तिने अजून बाहेर काढून कपाटात ठेवलेले नव्हते. तिने बॅगेच्या एका कोपऱ्यात हात घातला आणि ते गोल्डन लॉकेट बाहेर काढलं आणि हाताच्या तळव्यावर ठेवलं. त्या दिवशीच्या रात्रीचा एकमेव पुरावा! या लॉकेट बद्दल ती, तिचे बाबा आणि इन्स्पेक्टर यांच्याशिवाय कोणाला काहीच माहीत नव्हतं. त्याच्या घरी मात्र मी नीतूला त्या विषयी माहिती होतं. तिला आठवलं, इन्स्पेक्टर म्हणाले होते या अशा लॉकेट ने काही सिद्ध होत नाही. मुलं सर्रास हल्ली अशी लॉकेट्स वापरतात. पण तेव्हाची परिस्थिती आणि आता परिस्थिती वेगळी आहे. छोटे छोटे धागेदोरे जोडून पुरावे उभे राहतात. इन्स्पेक्टर साहेबांना सांगताना कॉलेजमधल्या पैशांच्या प्रकाराविषयी काही सांगितलं नव्हतं आपण. अचानक तेव्हा सगळ्यांना सगळं कळलं असतं तर कॉलेजची बदनामी झाली असती. पण आता हे भ्रष्टाचाराचे आरोप, त्यात आपण हे सगळं थांबवण्याचा प्रयत्न केला होता हे सुद्धा सगळ्यांना समजलेलं आहे आणि त्यात त्या वर्षीच आपल्यावरती हे असं..... यातून काय निष्पन्न होऊ शकेल याची कल्पना तिला आली. ते सगळं पुन्हा तिने बॅगेत भरलं नी बॅग कपाटात ठेवली. 

तिने इन्सपेक्टर सातवना फोन लावला.

 " हॅलो सातव साहेब, मी अनघा कारखानीस."

" हॅलो हा बोला मॅडम. मी गेले दोन-तीन दिवस तुम्हाला कॉन्टॅक्ट करायचा प्रयत्न करतोय."  ते अधीरतेने म्हणाले.

" हा.....तो नंबर जुना आहे पण काय झालंय ?"   तिने भीतीने विचारलं.

" नाही नाही काही झालं असं नव्हे. पण हे जे काही चाललेलं आहे. तुमचं कॉलेज आणि त्यावरून भाऊसाहेब आणि विक्रम साहेबांनावरती जी टीका होतेय." 

" हं "  ती  इतकचं म्हणाली. पण इन्स्पेक्टरना पुढे बरंच बोलायचं होतं.

" मॅडम तुमच्या कॉलेजमध्ये जे काही प्रकार झाले त्याचा संबंध तुमच्या बाबतीत जे काही......" ते शंकेने म्हणाले.
 तसं त्यांना थांबवत ती बोलली.

" नाही....... नाही असं नाहीये. ऍक्च्युली मी..... मी त्यासाठीच कॉल केला होता तुम्हाला."

" हा बोला ना."

" साहेब खरं म्हणजे कॉलेजमध्ये थोड्याफार प्रमाणात ते पैशांची अफरातफर झाली होती. पण...... पण या जुन्या गोष्टी आहेत. आता फक्त भाऊसाहेबांना त्रास द्यायला म्हणून बापूसाहेबांनी हे "

" अच्छा! ओके ओके असा प्रकार आहे तर सगळा. पण ते म्हणाले की तुम्ही या प्रकारांना विरोध केला. तुमच्यामध्ये आणि सरांमध्ये वाद झाले.  तुम्ही राजेशिर्केच्या घरीही राहत नाही. सॉरी म्हणजे मी तुमच्या पर्सनल गोष्टींबद्दल विचारतोय ."

सातव बोलत होते.

 " नाही असं काही. वाद वगैरे नाही ओ झालेले."

"हं....पण मॅडम तुम्ही म्हणताय की बापूसाहेब कॉलेजबद्दल बोलले ते खरंय आणि तुम्ही म्हणताय की या सगळ्याचा तुमच्या त्या केसशी काहीही संबंध नाही. पण जर उद्या कधी तुमच्या बाबतीत जे झालं होतं ते जर उघडकीला आलं तर विरोधी पक्षाचे लोक याचा फायदा करून घेणार. आधीच विक्रम साहेबांबद्दल उलटसुलट बातम्या येत असतात त्यातून या सगळ्याचा संबंध त्यांच्याशी जोडला गेला तर खूपच प्रॉब्लेम मॅटिक होईल सगळं!"  ती ऐकत होती गप्पपणे.

" काय काय होऊ शकतं अंदाजे ?"  तिने धीर करुन विचारलं.

" मॅडम खऱ्याचं खोटं नी खोट्याचं खरं करता येतं. विरोधक आणतीलच की इकडून तिकडून पुरावे आणि सगळंच चित्र त्यांच्याविरोधात गेलं तर....."

" तर काय ? " 

" तर त्यांना अरेस्ट होऊ शकते."  सातव स्पष्टपणे बोलले. याची भीती तिला होती पण त्यांच्या तोंडून हे ऐकताना कसं तरी वाटलं.

"हं मग आता ? त्यांचा...... त्यांचा या सगळ्याशी काही संबंध नाही."   तिच्या तोंडून शब्द जात होते. आपण काय बोलतोय ते तिचं तिलाही कळत नव्हतं.

" मग एक करता येईल हे न्यूज प्रकरण थांबेल असं काहीतरी करा आता. तुम्ही इतकं पॅनिक व्हायची गरज नाही. तुमच्या हातात खरं तर सगळं आहे."


" म्हणजे ?"  तिने आश्चर्याने विचारलं.

" म्हणजे हेच कि, तुम्ही म्हणालात विक्रमनी तुम्हाला त्रास दिला या कॉलेजच्या प्रकारावरून तर गोष्टी जास्तच चिघळतील. नी तुम्हीच जर सगळं नाकारलं. तुमची काय भूमिका सगळ्यांसमोर मांडली तर गोष्टी सोप्या होतील. शेवटी कोणी काही दवंडी पिटो लोक तुमचच ऐकणार!   कोर्टात हा मॅटर गेला तर तेही तुमचं ऐकेल तेव्हा तुम्ही ठरवा. ओके मॅम." 

"हं. राईट सर. ओके थँक यु सो मच. बघते मी काय ते."  असं बोलून तिने फोन ठेवला.

.....................................................


ती शांतपणे खिडकीला टेकून उभी राहिली. काय करावं काहीच सुचत नव्हतं. इन्स्पेक्टरचं बोलणं मनातून जात नव्हतं. ' तुमच्याच हातात आहे सगळं ' हे त्यांचं वाक्य तिच्या कानात घुमत होतं. तिला वाटलं ज्या माणसाला शिक्षा व्हायला हवी, मरणयातना मिळायला हव्यात, त्याचा जीव तडफडावा अशी आपली इच्छा होती एके काळी. आणि आज आज....... आपण पोलिसांशीही खोटं बोललो. का नाही झाली आपली हिंमत सांगण्याची की, होय. आपल्याला हवा असणारा तो गुन्हेगार हाच आहे. गेले दोन ते तीन दिवस विरोधक बोलतायत. आपलं नाव घेऊन सांगतायत की राजेशिर्केंच्या सूनबाईंनी चुकीच्या गोष्टींना विरोध केला होता पण कोणी जुमानलं नाही. मग आपली बोबडी का वळलेली ? का नाही आपण आता येऊन समोर सांगत की हो हे खर आहे. उलट आता सगळेच आपल्या बाजूने उभे राहतील. या प्रकरणात विक्रम नक्की अडकेल मग तरीही...... 

तिच्या मनात विचार सुरु होते. तिने दोन्ही हातात डोकं धरलं. अगदीच बेचैन झाली होती ती. दुसरं एक मन म्हणालं, विक्रम आणि त्याची शिक्षा एका बाजूला पण या सगळ्यात घरादाराला शिक्षा नको. खरंच भाऊसाहेबांचा यात काय दोष ? त्यांचा मुलगा नालायक निघाला यात त्यांची काय चूक . या गोष्टीमुळे त्यांचा आयुष्यभराचा मान - सन्मान, त्यांचं काम सगळं धुळीला मिळेल आणि भावोजी ते तर दुसऱ्या ग्रहावरचे असल्यासारखेच! ते कारखान्यात इतकं प्रामाणिकपणे काम करतात आणि आमच्या दोघांमधल्या वादात उगीच भरडले जातायत. नाही, बस झालं आता. आता जे काय बोलायचं ते आपण. असं तिने मनाशी ठरवलं. आणि ती खाली दिवाणखान्यात गेली.

"अनु, ये आज कॉलेजला बुट्टी मारलीस. चल ब्रेकफास्ट  एकत्र करु."   श्रीधर सोफ्यावर बसून वर्तमानपत्र वाचत होते. अनघा पायर्‍या उतरून खाली आली तसं तिच्या चाहुलीने ते वृत्तपत्रांची पानं चाळता चाळता बोलले.

" हं, ताई ये की बस ना." रिया केव्हाची डायनिंगटेबलच्या खुर्चीत जाऊन मांडी घालून बसली होती.


"काय ग गप्प का ?" कुमुद स्वयंपाक घरातून बाहेर आली. तिने कांदेपोहे प्लेटमध्ये वाढायला सुरुवात केली.

" आई-बाबा तुम्हाला एक सांगायचं होतं."  तिने बोलायला सुरुवात केली तसे सगळे तिच्याकडे लक्ष देत तिचं ऐकु लागले.

" आई बाबा गेले दोन दिवस हे जे सुरू आहे. ह्या न्यूज वगैरे त्यातून काल तर कारखान्यावरती आंदोलन झालं. भावोजींचा राजीनामा सुद्धा मागितला."

"हो ग I know  पण आपण तरी काय करणार आता. जितेंद्रंची यात चूक नसताना उगीच त्यांच्यामागे हे सगळं लागलं. त्यात भाऊसाहेबांवर पण दररोज बापूसाहेब टीकाटिपणी करतच असतात."  श्रीधरही आत्मीयतेने बोलले .

" हो बाबा पण या सगळ्याला त्यांच्याच घरातली व्यक्ती कारण आहे." श्रीधरराव नी अनघाचं कळवळून बोलणं ऐकून रिया म्हणाली.

" हो ग रिया पण आता ते सगळं बोलण्याची ही वेळ आहे का ?"   अनघा रियाकडे वळून म्हणाली.

" म्हणजे ?" कुमुदने आश्चर्याने विचारलं.

" म्हणजे हेच की या सगळ्यामुळे भाऊसाहेबांना, भावोजींना आणि घरातल्या बाकीच्यांना डोक्याला ताप नको. यामुळे घराचं नाव खराब होतय, कॉलेजचं नाव खराब होतय शिवाय परीक्षांचे महिने आहेत मुलांनाही त्रास नको."

" मग तू काय करायचं म्हणतेस ?"   कुमुदने शंकीत नजरेने म्हटलं. ती काही भलता- सलता निर्णय घ्यायला नको असं तिला वाटत होतं. 


"  मी....... मी दुपारी काही पत्रकारांसोबत बोलणार आहे. "

 तिने निर्धाराने म्हटलं.


" काय बोलतेस हे ?" श्रीधर ताडकन उठले आणि तिच्याकडे वळले.

" ताई आर यु मॅड ?  अग कश्यासाठी ? म्हणजे ज्या माणसाने तुझ्या लाईफची वाट लावली. तुझ्या इमोशन्सचा असा गैरफायदा घेतला त्या माणसाची तू साईड घेणार!" 

" अस नाहीय ग.....साईड अस नव्हे."  ती काकुळतीने बोलली.

" मग.....मग कसं आहे ? "  श्रीधर कडक सुरात बोलले तस ती नरमली.

" मी कुठे साईड घ्यायचं म्हणते ? मी बोलले तर हे सगळं थांबेल आणि सध्या या सगळ्यामुळे तुम्हाला आणि त्यांच्या घरातल्या सगळ्यांना सुद्धा मनःस्ताप होतोय म्हणून मी बोलून हे संपवणार आहे."  ती पुन्हा म्हणाली. आता ती सांगत नव्हती. तिच्या बोलण्याचा सूर आता ठाम निर्णय घेतल्यासारखा सगळ्यांना वाटला. इतकं बोलून काहीही ऐकून न घेता ती तिच्या खोलीत निघून गेली.

" हीचं मला कळतच नाही हल्ली ! काय चाललेलं असतं तिच्या डोक्यात ते!"   रिया वरती गेलेल्या तिच्याकडे अचंबित नजरेने पाहत राहिली.

" अहो मला वाटतं पुरे झालं हे.  आता काहीतरी ठरवावं लागेल." कुमुद काळजीने बोलली.

" हो बरोबर आहे पण आत्ता लगेच काही तिला सांगायला नको. हे न्यूज प्रकरण एकदा संपू दे. त्यांच्या परीक्षा होऊ देत मग बोलूया तिच्याशी." ते शांतपणे म्हणाले तसं तिने होकारार्थी मान हलवली.
....................................................

 दुपारी काही न्यूज चॅनेल्सच्या पत्रकारांना तिने घरी बोलावलं होतं.  कुमुद आणि श्रीधरना काळजी वाटू लागली. त्यांच्यासाठी हे सगळं नवीन होतं. उभ्या आयुष्यात एकदाही असं पत्रकार, वकील, पोलिस यांच्याशी त्यांचा संबंध आला नव्हता. जावयाने काय काय दाखवलं आयुष्यात असं वाटू लागला आता त्यांना! ते लोक तिला काय काय विचारतील ती काय बोलेल. बोलेल की गोंधळेल, घाबरेल. हजार शंका त्यांचं मन कुरतडत होत्या. तिच्या आजच्या बोलण्याने एक गोष्ट मात्र होणार होती ज्या दिवशी तिच्या बाबतीत हे घडलं त्या दिवसापासून ते आजतागायत गेले दीड वर्ष ते वाट पाहत होते. आपल्या पोरीची अशी अवस्था करणारा नालायक माणूस गजाआड जाईल यासाठी ते प्रार्थना करत होते तीच आज त्याचा शिक्षेपर्यंत जाण्याचा मार्ग कायमसाठी आपल्या हातानेच बंद करणार होती आणि याची श्रीधरना जास्त खंत वाटत होती.
..............................................................
दुपारी ठरलेल्या वेळेप्रमाणे पत्रकार तिच्या घरी येऊन धडकले. त्यांच्या हातातले माईक, कॅमेरे, मोबाईल्स, कागद पेन आणि प्रश्नांचा भडीमार करणारी तोंडं आणि कुतुहल असणार्‍या नजरा पाहून कुमुदला काय बोलावं सुचेना.

" तुम्ही त्यांच्या आई का ?"  एकाने नाकावरचा चष्मा सावरत हातातला लांबलचक माईक कुमुद समोर धरला.

 " हा" ती  कशीबशी बोलली. ते दाराबाहेरच घोळक्याने उभे होते आणि त्यांनी त्यांचं काम सुरू सुद्धा केलं होतं.

" मॅडम कुठे आहेत ? आम्हाला बोलायचय त्यांच्याशी. त्यांना या प्रेस कॉन्फरन्स साठी कुणी प्रेशराइज्ड केलं का?" 

 दुसऱ्या एका जीन्स - कुर्ती वाल्या पोरीने विचारलं.

"हा सगळे म्हणतायतत, त्यांच्यावर दबाव असतो गुरुकुलच्या डायरेक्टरचा !"  आता हे सगळे म्हणजे तुम्ही असं कुमुदला सुनवावसं वाटलं  पण ती गप्प बसली.

" तुम्ही या आत सगळे."  

 कुमुद दारातून बाजूला झाली तसा तो घोळका धावत आत आला. त्यांनी आपापल्या कॅमेर्‍यांचे अँगल नीट केले. कुणी कागदावर पटकन विचारायचे प्रश्न लिहून टाकले. कोणी तेवढ्यातच अख्ख्या घरावरून नजर सुद्धा फिरवली. बाहेरचा गोंधळ पाहून रिया, श्रीधर बाहेर दिवाणखान्यात आले इतक्यात अनघा खाली आली. तिने कॉटनची ऑफ व्हाईट रंगाची साडी नेसली होती. केसांचा व्यवस्थित अंबाडा बांधला होता. गळ्यात मोत्यांचा एकसरी नेकलेस आणि कानात छोटेसे रिंग्स होते. चेहऱ्याला हलकासा मेकअप. तिने पदर पाठीमागून लपेटून खांद्यावर घेतला होता.

" नमस्कार."  तिने खाली येत सर्वांना औपचारीकरित्या हात जोडून नमस्कार केला. तिला पाहताच त्या सगळ्यांच्या नजरा तिच्यावरती स्थिरावल्या. त्यांना वाटलं राजकारणातली एखादी महिला नेताच आपल्यासमोर उभी आहे. काही महिला वार्ताहरांच्या मनात क्षणभर आलं, भाऊसाहेबांच्या थोरल्या सुनबाई राजकारणात आल्या तर! या कल्पनेत काहीजणी होत्या.

"  नमस्कार, तुम्हा सगळ्यांचे स्वागत आमच्या घरी."

 तिच्या या बोलण्याने सगळ्या हॉलमध्ये शांतता पसरली. ती समोरच्या कोचावरती बसली तसे सगळ्यांच्या कॅमेऱ्यांनी तिचे पटापटा फोटोज घेऊन टाकले.

" तुम्ही इथे आलात त्याबद्दल सर्वप्रथम धन्यवाद तुमचे."

" अहो आम्ही येणारच अन शेवटी आमदार भाऊसाहेब राजेशिर्केंच्या थोरल्या सुनबाई आहात आपण. आपण आम्हाला बोलवण्याची तसदी घेतली म्हणजे काहीतरी महत्त्वाचं असणार."  

 तिच्या अगदी समोर उभ्या असणार्‍या एका चाणाक्ष पत्रकारांने हातातल्या नोटपॅड वरती पेन टेकवत म्हटलं. ती त्याच्या स्मार्ट उत्तरावर किंचित हसली. कुमुद - श्रीधर मात्र तिला अशा रूपात पहिल्यांदाच बघत होते. त्यांना नवल वाटलं हे सगळं पाहून.


"  ओके. तर मॅडम आपण सुरू करूयात का ? तुम्ही बोलताय की क्वेश्चन आंन्सर करूयात." 

 दुसर्‍या एकाने मागच्या कोपऱ्यातून म्हटलं.

" मला वाटतं मी काही बोलले तर तुम्ही म्हणाल, कुणीतरी स्क्रिप्ट लिहिलं आणि माझ्याकडून पढवून घेतलं मग उद्याची हेडलाइन होईल ती."  

 तिच्या या बोलण्याने काहींचे चेहरे ओशाळले.

" बरं आता वेळ वाया घालवूया नको. सुरू करू. तुमचे जे प्रश्न आहेत ते तुम्ही विचारू शकता." ती शांतपणे म्हणाली. लेडीज फर्स्ट याप्रमाणे मग त्यांच्यातल्या महिला रिपोर्टनी प्रश्न विचारायला सुरुवात केली.

" मॅडम, गुरुकुल मध्ये गैरव्यवहार झाले हे खरे आहे का?" 

" हो खर आहे पण ही गोष्ट जवळपास दिड एक वर्षांपूर्वीची आहे. त्यानंतर तसं काही घडलेलं नाही. आता इतकी मोठी एज्युकेशन इन्स्टिट्यूट म्हटल्यानंतर अशा गोष्टी घडतात. विद्यापीठांमध्ये वेगवेगळे घोळ होत असतात मग आम्ही तर त्या मानाने लहानच नाही का आणि भाऊसाहेबांनी आजवर स्वतःच्या फायद्यासाठी अशा संस्थांचा कधी वापर केला नाही. इथून पुढेही कॉलेज मध्ये तसं काही होणार नाही."


" म्हणजे तुम्ही समर्थन करता या प्रकाराचं असा अर्थ होतो याचा."   दुसर्‍या एकाने वादाच्या सुरात म्हटलं.

" ऑफ कोर्से नॉट. मी समर्थन करत नाही आणि भाऊसाहेब सुद्धा नाहीत. इनफॅक्ट या सगळ्या प्रकाराची त्यांना वेळीच कल्पना आली असती तर वेळेत कारवाई झाली असती. पण  त्यानंतर हे असं काही घडलेलं नाही."

" मग तुम्ही अलीकडेच कॉलेजचे लेखी रेकॉर्ड्स मागवले तशी चर्चा आहे त्याचं काय?"

 तो मघाचा कोपऱ्यातल्या पुन्हा म्हणाला.

" हो मागवले ते याच साठी की पुन्हा असं काही घडू नये म्हणून ही गोष्ट होती.  काही कामांसाठी काही कागदपत्रं मागवली, काही रेकॉर्ड मागवले तर त्यात बातमी होण्यासारखं काय आहे आणि तेव्हा विक्रम सर कामानिमित्त बाहेर होते त्यामुळे त्यांची कॉलेजमधील कामं मी करूच शकते ना."  
         


" हो पण विरोधी पक्ष नेते बापूसाहेब धनावडे ते म्हणतायत की तुम्ही या इलिगल गोष्टींना थांबवण्याचा प्रयत्न केला. बरेचसे व्यवहार स्वतःच्या हातात घेतले म्हणून विक्रम साहेबांनी तुम्हाला........" 

त्याला हाताने थांबवत ती म्हणाली," आमच्या घरातल्या गोष्टी मी तुम्हाला जास्त चांगल्या पद्धतीने सांगू शकते नाही की बापूसाहेब!" त्यावर तो गप्प बसला.

" तर हे असं काही घडलेलं नव्हतं. डायरेक्टर सरांनी  माझ्यावर कोणत्याही प्रकारे दबाव आणला नाही. माझा शारीरिक-मानसिक छळ केलेला नाही तसं काही झालं असतं तर माझ्या चेहऱ्यावरती, हातांवरती जखमा दिसायला हव्या होत्या नाही का!"   या शब्दांनी श्रीधर - कुमुदनी एकमेकांकडे पाहिलं. रिया रागाने निघून गेली.

" मग तुमचं म्हणणं अस आहे का की बापूसाहेब उगीच काहीतरी टीकेची झोड उठवतायत?"  


"आता इतकं सगळं ऐकल्यानंतर काय ते तुम्ही ठरवा. भाऊसाहेब आणि विक्रम त्यांचा या सगळ्याशी संबंध नाही. आणि विक्रम आणि माझ्यामध्येही वाद नाहीत. त्यांना विनाकारण या सगळ्याचा त्रास झाला."

" माझ्या माहितीनुसार आज संध्याकाळी साडेसहाला ते प्रेस कॉन्फरन्स घेणार होते. ही बातमी अजून बाहेर गेलेली नाही."

 एका हुशार रिपोर्टरने आपली आतल्या बातम्या काढण्याची चतुराई तिच्यासमोर दाखवली.

" ते याच साठी. गेले काही दिवस जे काही चित्र तयार झालं आहे ते पाहता त्यांना वाटलं तुमच्या सोबत बोलावसं पण मला वाटतं बापूसाहेबांनी माझं नाव घेतलं होतं त्यामुळे मी बोलणं भाग होतं."


 आता जवळपास सगळ्यांच्या प्रश्नांची उत्तरे मिळाली होती. तिने सगळ्या घोळक्यावरून एक नजर फिरवली. त्यांच्या शंकांचे समाधान झाल्याचे तिच्या लक्षात आलं तशी ती उठली. सगळ्यांना नमस्कार केला.

" धन्यवाद तुमचे." 

 सगळे पुन्हा तिचे फोटोज काढण्यासाठी सरसावले. काहींनी उभ्या- उभ्याच अजून एक दोन प्रश्न विचारून टाकले. पण एकूणच पत्रकार परिषद व्यवस्थित पार पडली. आता उद्यापासून भाऊसाहेबांच्या विरोधातील चित्र बदलणार होतं. बापूसाहेबांचं तोंडही उद्यापासून गप्प होणार होतं. कॉलेजच्या मुलांना, तिच्या सहकाऱ्यांना धीर येणार होता. आणि पुढच्या चार-पाच दिवसात पुन्हा सगळं सुरळीत होणार होतं. या सगळ्या गोंधळात इथे आई-बाबा मात्र एका बाजूला नाराजीनेच उभे होते. त्यांना हे काहीच पसंद नव्हतं. ती त्या सगळ्यांसोबत हसून बोलत होती पण मनात वेगळचं काहीतरी सुरु होतं.

' मिस्टर विक्रम राजेशिर्के आज कायद्याच्या कचाट्यातून सुटला तुम्ही. पण मी सहजासहजी सोडणार नाही तुम्हाला! खूप वेदना दिल्या तुम्ही मला आता पुन्हा तुम्हालाही तितक्याच वेदना मिळतील. मी सुद्धा अनघा राजेशिर्के नाही!'
......................................................


      तिच्या पत्रकार परिषदेची बातमी लगेच न्युज चॅनेल्सवरून सगळीकडे पसरली. ते पाहून बापूसाहेबांना धक्काच बसला आणि तोंडावर पडल्यासारखं वाटायला लागलं त्यांना. आता आपण सगळ्यांना काय उत्तरं द्यायची हा एकच प्रश्न आवासून त्यांच्यासमोर होता. तिला हे असं बोललेलं पाहून अरुंधती, आत्या, नितू सगळ्यांनाच आश्चर्य वाटलं. नीतूने तर लगेच तिला फोन करून झापलं सुद्धा! भाऊसाहेबांनी ही दुपारी आभार मानायला तिला फोन केला त्यांना वाटलं आपल्याकरता म्हणून तिला आज खोटं बोलावं लागलं. पण तिने त्यांची समजूत घातली.

 तिच्या या वागण्याने प्राचार्यांनाही बरं वाटलं. त्यांनीही तिला थँक्स म्हणण्यासाठी फोन केला. बाकी प्राध्यापकांनाही तिच्या या भूमिकेचं कौतुक वाटलं. या सगळ्यात आनंदी जितेंद्र होता. त्याला मनातून शांत वाटलं. तिच्या बोलण्या मुळे आता विक्रमला बोलण्यासाठी काही उरलं नव्हतं. ती कॉलेजबद्दल बोलली. भाऊ साहेबांवर जे आरोप झाले ते खोडून काढले होते आणि अप्रत्यक्षपणे विक्रमवरचेसुद्धा !जितेंद्रने आनंदाच्या भरात आधी विक्रम ला फोन केला.


" Congrats bro."

" का रे?"  

 " वहिनींची प्रेस कॉन्फरन्स. आहा जबरा एकदम."

 तो आनंदाने म्हणाला त्यावर त्याने फक्त हं एवढीच प्रतिक्रिया दिली.

" अरे त्यांनी तुझ्यासाठी इतकं आणि तुझा चेहरा पडलेला "

" अरे त्यांनी जे केलं ते त्यांच्या सासरेबुवांसाठी केलं. तुझ्यासाठी केलं नोट फॉर मी. असो काही असेल ते. मी थँक्स म्हणण्यासाठी बोलायला गेलो तर चार शब्द ऐकून घ्या कशाला ते!"  तो म्हणाला तसं जितेंद्रनेही फार न ताणता अरे बाबा जशी तुझी मर्जी म्हणून फोन ठेवला.


 त्याला मात्र आज शांत झोप लागणार होती. हे सगळं प्रकरण एकदा संपलं होतं आणि विक्रमची पत्रकार परिषदही त्यामुळे रद्द झाली होती. विक्रमने सगळ्यांसमोर कॉलेजच्या गैरव्यवहारांची कबुली दिली असती सोबतच अनघासोबत तो जो  वागला  त्याचा त्याने उल्लेख केला तर किती उलट-सुलट परिणाम होतील याचा विचार करून जितेंद्र घाबरलेला होता. आता शांत झालं होतं त्याचं मन. अनघाच्या या सगळ्या बोलण्याने विक्रमला होणाऱ्या कायदेशीर शिक्षेचा मार्ग मात्र बंद झाला होता. आता या दिवसानंतर अनघाने कधीही काहीही येऊन लोकांना सांगितलं तरीही तिच्या वरती विश्वास ठेवण्यापूर्वी लोकांनी आधी तिला दहा प्रश्न विचारले असते, जितेंद्रला वाटलं आपल्या वहिनींच्या स्वभावाचा आपण फायदा घेतला का? दुसरं मन म्हणालं, नाही आपल्याला वहिनी आणि तो दोघेही आपल्या समोर हवेत. या विचारानं त्याचं अपराधी असलेलं मन शांत झालं.

क्रमशः

कथेच्या गमतीजमती :

भाग 87 मध्ये दोघं सांगलीतच एका इटालियन रेस्टॉरंन्टला डिनरला जातात जिथे ती पहिल्यांदाच त्यांचं रिलेशन पुढे नेण्यासाठी त्याच्यासोबत बोलते. Winterfall Italian Finest हे काल्पनिक नाही. सांगलीत ते प्रत्यक्षात आहे जिथे ओरिजनल इटालियन फूड मिळतं. सांगलीतल्या वाचकांनी जरुर जाऊन पहा..... ( मी अजून सांगली पाहिलेलं नाही ) 

भेटूया नव्या भागात.

🎭 Series Post

View all