बंधन भाग 102

Sneha Dongare blog Sneha Dongare Bandhan


भाग 102

( गेल्या भागात राजेश त्याच्या पत्रकार मित्राच्या मदतीने कॉलेजच्या गैरव्यवहाराची बातमी पसरवतो. याचा फायदा भाऊसाहेबांचे विरोधक घेतात आणि विक्रमवरती बरेचसे आरोप लावतात. पाहूया पुढे )

        दुसऱ्या दिवशी सकाळी अनघा नेहमीप्रमाणे तयारी करून कॉलेजला पोहोचली. आदल्या दिवशीपासून न्यूज चॅनेल्सवरून ज्या उलटसुलट बातम्या येत होत्या, ज्या प्रकारे विरोधी पक्षांचे नेते, आमदार भाऊसाहेबांवरती टीका करत होते. याबाबत उलटसुलट बोलत होते ते सगळं एव्हाना कॉलेजमधल्या शिपायांपासून ते लाखो विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचलं होतं. ती कॉलेजच्या प्रवेशद्वारातून आत मध्ये आली .कुमुदला चैन पडेना म्हणून तिने रियाला अनघासोबत जायला सांगितलं होतं. रिया स्कूटीवरून तिला कॉलेजपर्यंत सोडायला आली होती. टेक केअर. हवं तर दुपारी मी घ्यायला येते असं सांगून रिया माघारी गेली.
..................................................
    
       तिने मन शांत केलं. आज कॉलेजमध्ये वावरताना सगळ्यांच्या नजरा आपल्याकडे वळणार. शिपाई, ऑफिस स्टाफ, बाकी प्राध्यापक सगळ्यांमध्ये कालच्या बातम्यांची कुजबुज सुरू असेल. त्यातून विक्रमच्या गैरहजेरीत तिने ऑफिसमधून जुने रेकॉर्ड मागून घेतलेले होते हे सगळ्यांनाच तेव्हा माहीत झालं होतं आणि त्याचा परिणाम म्हणून विक्रमने तिला मारहाण केली असेल का ? काय गरज होती यात नाक खुपसण्याची असं काहीतरी बोलून तिच्यावरती दबाव आणण्याचा प्रयत्न केला असेल का अशा शंका आता सगळ्यांच्या नजरेत असतील. चालता चालता तिला त्यांचं लग्न ठरल्याचं सगळ्यांना कळलं होतं आणि त्यानंतर ते दिवस आठवले. तेव्हा त्या बातमीने सुद्धा अशीच चर्चा कॉलेजमध्ये सुरू झाली होती. तेव्हा सुद्धा सगळ्यांच्या नजरेत प्रश्न होते आणि त्यानंतर हे आता पुन्हा तेच. तिला वाटलं किती आनंदात होतो आपण दोन-अडीच वर्षांपूर्वी जेव्हा आपण पहिल्यांदा येथे इंटरव्यू साठी आलो होतो. त्यानंतर इथे नोकरी मिळाली तेव्हा किती आनंद झाला होता घरी सगळ्यांना! आज खरंच नकोसं वाटतंय सगळच. राजीनामा देऊन मोकळं व्हावं असा विचार तिच्या मनात हल्ली उफाळून यायचा. पण नुसती नोकरी सोडल्याने इतर सगळ्यातून सुटका आहे का असाही प्रश्न तिचं मन विचारायचं मग ती पुन्हा शांत व्हायची. समोरच्या कट्ट्यावर  विद्यार्थ्यांचा घोळका बसला होता. चालता चालता त्यांचं आपसातील बोलणं तिच्या कानावर पडतं.

" यार त्या न्यूज कालपासून येतायेत. त्यातलं किती खरं असेल रे ?"  एकाने दुसऱ्याला विचारलं.

" सोड रे धीरज ते. इट्स ऑल अबाऊट पॉलिटिक्स! भाऊसाहेबांना टारगेट करायचं म्हणून काहीतरी आपलं."

 दुसरा मित्र म्हणाला.

" हो रे. आपल्या कॉलेजला हे असं काही होत नाही आणि झालं असलं तरी कॉलेज ऍडमिनिस्ट्रेशन बघेल काय ॲक्शन घ्यायची ते! बाहेरच्या लोकांनी यात पडायची काय गरज."


 तिसरा एकजण मोबाईल वरती गेम खेळता खेळता बोलला.

" पण खरंच विक्रम सरांनी मॅडम ना त्रास दिला असेल काय? I mean  physical abuse वगैरे."  त्यातली जिन्स - टॉपवाली पोरगी काळजीने म्हणाली.

" Come on श्रुती.  He's well- educated guy. हे असं मवाली टाईप का वागतील ते !" 

 तिची अजून एक मैत्रीण केसांचा पोनी टेल बांधता बांधता बोलायला लागली तसं बाकी दोघींनीही दुजोरा देत  माना हलवल्या. 

 अनघाच्या कानावर त्यांचे शब्द पडत होते. ती शांतपणे त्याकडे दुर्लक्ष करत चालू लागली. मुलं कॉलेजच्या आणि साहेबांच्या बाजूने आहेत त्याचा एकीकडे आनंद होता तर दुसरीकडे दुःख याचं होतं, की समाजात जेव्हा प्रतिष्ठित, सुशिक्षित पुरुष वावरतात तेव्हा त्यांच्याकडे पाहण्याचा इतर स्त्रियांचा दृष्टिकोन इतका उदात्त असतो की त्यांच्यापैकी कितीतरी जणी त्यांच्या गावीही नसतं की त्यांना सभ्य, सज्जन, द ग्रेट वाटणाऱ्या पुरुषाची दुसरीही बाजू असू शकते .जी काही वेळा त्याची बायको किंवा त्याच्या आयुष्यातल्या स्त्रियांनाच माहित असते. तिला क्षणभर वाटलं बापूसाहेबांनी कौटुंबिक हिंसाचारा ऐवजी बलात्कार असं जरी म्हटलं असतं तरी यावर कॉलेज मधल्या मुली, आपल्या सहकारी प्राध्यापिका यांनी विश्वासही नसता ठेवला कारण त्यांच्या नजरेत तो एक सज्जन, हुशार, सुशिक्षित आणि संस्कारी घरातला मुलगा आहे!  या विचाराने थोडंसं अस्वस्थ झालं तिचं मन. ती तशीच पायऱ्या चढत स्टाफरूममध्ये गेली .
..............................................................

        स्टाफरूमला गेल्यानंतर बर्वे सर भेटले. त्यांच्याकडून तिला कळलं आज सगळ्या प्राध्यापकांची मीटिंग विक्रमने बोलावली आहे. मग लेक्चरला न जाता ती  स्टाफरुमलाच थांबली. तोपर्यंत काळेसर, खंदारे मॅडम, निकम सर, बावधनकर सर, सामंत सर, वरदे मॅडम, रेगे मॅडम, कार्ले मॅडम असे सगळे सीनियर- ज्युनियर प्राध्यापक आत यायला लागले. काहींच्या चेहऱ्यावरती काळजी होती. काहींची कालच्या बातम्यांवरून कुजबूज सुरू झाली. तिने त्या तिघी जणींच्या घोळक्याकडे लक्ष देणं टाळलं. इतक्यात प्राचार्य, उपप्राचार्यांसोबत तो आतमध्ये आला तसेच सगळे आपापल्या खुर्च्यांवरुन उठून उभे राहिले.

" हॅलो, गुड मॉर्निंग."

 त्याने नेहमीप्रमाणे हसून मीटिंग करता आलेल्या सगळ्यांचं स्वागत केलं. औपचारिकपणे गुड मॉर्निंग म्हणून सगळे पुन्हा आपापल्या खुर्च्यांवरती आसनस्थ झाले. तोही त्याच्या खुर्चीवर बसला आणि त्याच्या बाजूच्या खुर्च्यांवरती करंबेळकर सर, निंबाळकर सरांनी पटकन बसून घेतलं. तो काय बोलणार याकडे त्या दोघांचे लक्ष होतं. त्याने एकवार बसलेल्या सगळ्या स्टाफ वरून नजर फिरवली. सगळे अगदी कान देऊन त्याचं बोलणं ऐकू लागले.

" सो लेट्स स्टार्ट. खरं तर कोणतीही सूचना न देता अशी तडकाफडकी ही आजची मीटिंग घेण्यामागचं कारण मला वाटतं तुम्हाला सगळ्यांना माहीतच आहे. त्या न्यूज आणि जे काही पोलिटीकल पार्टीजने म्हटलय. I don't wanna talk about it.  आपल्या कॉलेजमध्ये आजवर कुठल्याही पॉलिटिक्स ला जागा नव्हती. साहेबांनी आपली शाळा आणि गुरुकुल यांच्या कामात कधीच राजकारण येऊ दिलं नाही. आणि यापुढेही कॉलेजच्या गेटच्या बाहेरचं राजकारण आत येणार नाही याची दक्षता घेतली जाईल. आपण सगळ्यांनी तशी काळजी घेऊयात. आता राहिला मुद्दा तो काल जे काही आरोप वगैरे झाले तर सांगायची गोष्ट अशी की, हो हे खरंय. मध्यंतरी आपल्या कॉलेजच्या व्यवहारांमध्ये अफरातफर झाली होती. पण...... पण गेल्या वर्षापासूनचे अॅडमिशन, कॉलेजचे प्रोग्राम, ऍक्टिव्हिटी कशातही एक रुपयाचीही अफरातफर झालेली नाही."

 तो बोलत होता. पण त्याचं सगळं लक्ष त्याच्या समोरच्या खुर्चीवर बसलेल्या अनघाच्या चेहऱ्याकडे होतं. ती शांतपणे खाली मान घालून ऐकत होती. त्याने आपले दोन्ही हात टेबलवरती समोर टेकवले होते आणि तो अजिबात न गोंधळतात, चेहऱ्यावर ताण येऊ न देता आत्मविश्वासाने सगळ्यांच्या नजरेला नजर देत बोलत होता. जहाज समुद्रात बुडत चाललंय हे माहीत असूनही एखादा शुर खलाशी आपल्या सहकाऱ्यांना हिम्मत देतो, बुडणार्‍या जहाजाकडे पाहण्यापेक्षा वादळ शमेलही काही वेळात अशी आशा दाखवतो तसा वाटला विक्रम त्याक्षणी प्राचार्यांना! त्यांचं बोलणं ऐकून प्राचार्यांना जरा धीर आला. त्यांनी निंबाळकर सरांकडे पाहिलं त्यांच्या चेहर्‍यावरचा ताणही निवळला होता.

" तर जे काही म्हटलं गेलय कालपासून त्यात सत्य आहे. उगीच खोटं काही मला तुम्हाला सांगायचं नाही. इथून पुढे अशा इलिगल गोष्टींना कॉलेजमध्ये थारा नसेल."  त्याने निकम सरांच्या बाजूच्या चेअरवरच्या सामंत सरांच्या नजरेला नजर देत म्हटलं तसं ते ओशाळले.


" तर ओके हे झालं कॉलेज विषयी आणि अजून तुम्हाला शंका असतील तर जे काही याला जोडून आरोप झालेत तर मला वाटतं मी त्यात बोलणं संयुक्तिक नाही. ज्या व्यक्तीचे नाव घेऊन हे आरोप झालेत त्यांनी या विषयीचं मत मांडलं तर ते जास्त योग्य ठरेल."  त्याच्या या बोलण्याने तिने चमकून त्याच्याकडे पाहिलं पण त्याने तिच्याकडे लक्ष देणं टाळलं.

" So, now everything is clear to you all. आणि मी प्राचार्यसरांनाही काल म्हणालो होतो, तुम्हा सर्वांनाही हेच सांगेन, काहीही झालं तरीही No one will blame you. तुमच्यावरती, ऑफिस स्टाफवरती किंवा सरांवरती कोणीही काही आरोप लावणार नाही. या सगळ्याचा तुम्हाला त्रास होणार नाही याची जबाबदारी माझी. Ok, It's enough for today.  त्याने मनगटावरल्या वॉच मध्ये पाहत म्हटलं आणि मीटिंगची सांगता झाल्याचं सगळ्यांच्या लक्षात आलं. तो उठून उभा राहिला.

 " Get back to your work. Face the students with confidence. I'm with you all."  


खाली बसून सगळे शांतपणे त्याचं बोलणे ऐकत होते. सगळ्यांच्या चेहऱ्यावरचा तणाव आता दूर झाला आणि सगळं लवकरच ठीक होईल अशी आशा सगळ्यांना वाटू लागली.
...................................................

           सकाळच्या मीटिंग नंतर कॉलेजमधील तणाव आता बऱ्यापैकी सैलावला. अनघाने नेहमीप्रमाणे तिची सगळी लेक्चर्स आटोपली. विद्यार्थ्यांच्या नजरेत शंका होत्या पण लेक्चर दरम्यान कोणीही तिला त्रास दिला नाही. कसली कुजबुज कुठल्याच विद्यार्थ्यांमध्ये नव्हती. अर्थात मुलं मोठी आहेत. भलं - बुरं मुलांना कळतं हाच विचार बऱ्याचशा प्राध्यापकांनी डोक्यात ठेवून विद्यार्थ्यांसमोर जाणं पसंत केलं. त्यामुळे बऱ्यापैकी गोष्टी आजच्या पुरता तरी सोप्या झाल्या.
.....................................................

       ती दुपारी कॉलेज सुटल्यानंतर एकटीच चालत बाहेर आली. रियाला फोन करायला म्हणून तिने मोबाईल ऑन केला तसं न्यूजचे व्हिडिओज व्हाट्सअॅप वर धडाधडा आदळले. तिने व्हिडीओ क्लिप ओपन केल्या आणि आश्चर्याचा धक्का बसला.

 शारदादेवी सहकारी साखर कारखाना Exclusive बातम्या होत्या त्या. ' विरोधकांचं ठिय्या आंदोलन. जितेंद्र राजेशिर्केंच्या चेअरमन पदाच्या राजीनाम्याची मागणी '  त्या हेडलाईन्स पाहून तिच्या पायाखालची जमीन सरकली. विरोधी पक्षांनी तिच्यावरती अन्याय झाला याचं भांडवल इतक्या वेगवेगळ्या प्रकारे करून भाऊसाहेबांना कोंडीत पकडण्याचा प्रयत्न सुरू केला होता. तिला क्षणभर वाटलं, कुठल्याही स्त्रीवरच्या अत्याचाराचं भांडवल करून स्वतःचा फायदा कोण कसं बघू शकतं! तिला कीव आली या सगळ्या प्रकाराची. तिला क्षणभर वाटलं, खरंच सगळ्यांना कळेल आपल्या बाबतीत खरं काय घडलं हे तेव्हा भाऊसाहेबांचं जगणं मुश्कील करतील ही लोक! तिला सुचेना काय करायला हवं आपण. ती तशीच चालत राहिली.
....................................................


     कारखान्याच्या आवारात सकाळी अकरा वाजल्यापासून विरोधी पक्षाचे कार्यकर्ते, नगरसेवक सगळ्यांनी कारखान्यावर मोर्चा काढला होता आणि आंदोलन सुरू केलं होतं. याचं नेतृत्व करत होते स्वतः बापूसाहेब! प्रत्येक वेळी भाऊसाहेबांना लोकांच्या नजरेत  कसं पाडता येईल याचा प्रयत्न ते करायचे अगदी भाऊसाहेबांनी राजकारणात प्रवेश केला तेव्हापासूनच. आता तीस वर्ष मध्ये गेली. बापू साहेबांचंही आता वय झालं होतं तरी त्यांची राजकीय महत्त्वाकांक्षा मात्र मिटली नव्हती. त्या पत्रकाराने येऊन बऱ्याच उलटसुलट गोष्टी बापूसाहेबांना सांगितल्या होत्या. काही पत्रकारांनी साध्या वेशात फिरवून पालकांकडून गुरुकुलची प्रवेश प्रक्रिया, वाढीव फी या सगळ्या संबंधीची माहिती काढली होती. अनघाने कॉलेजचे सगळे जुने रेकॉर्ड मागून घेतल्याची खबर ही काही पत्रकारांना मिळाली होती. आणि अनघा आता तिच्या माहेरी राहते हे सुद्धा बापूसाहेबां पर्यंत पोहोचलं होतं. त्यांनी त्या पत्रकाराला चार पैसे देऊन अजून खोलात जाऊन माहिती घेतली तेव्हा त्या पत्रकाराने राजेशचं नाव न घेता ऐकीव माहितीच्या नावाखाली त्यांना सांगून टाकलं की, लग्नाआधी भाऊसाहेबांच्या सुनेवरती त्यांच्या मुलानेच जबरदस्ती करण्याचा प्रयत्न केला होता! हे एवढं सगळं कळल्यानंतर बापूसाहेब गप्प बसणं शक्यच नव्हतं. याचा पुरेपूर वापर करून घ्यायचा असं त्यांनी ठरवलं. पण लगेचच हातात काही ठोस पुरावे नसताना विक्रम वरती अत्याचाराचे आरोप कसे लावायचे हा प्रश्न होताच मग त्यांनी अनघाचं घर सोडून जाणं या मुद्द्याचा आधार घेऊन कौटुंबिक हिंसाचाराचे आरोप केले. आणि मग त्याप्रमाणेच वृत्तपत्रांमधून, न्युज चॅनेल्सवरून बातम्या यायला लागल्या. पत्रकारांनी मग त्यांना हवं तसं हे प्रकरण रंगवण्याचा प्रयत्न सुरू केला. हे सगळं भाऊ साहेबांसाठी नवीन नव्हतं. विक्रमला गोष्टी हँडल करण्याची सवय होती. पण जितेंद्रचं तसं नव्हतं. कारखान्याचे चेअरमनपद मिळाल्यापासून फक्त तिथले कामगार आणि शेतकरी यांना सोबत घेऊन कसं प्रामाणिकपणे काम करता येईल याकडे त्याचं लक्ष असायचं. त्याच्यासाठी कारखान्या भोवतीच राजकारण, पॅनेल, निवडणूक या गोष्टी  गौण असायच्या. बाहेर विक्रम नी भाऊसाहेबांवरती विरोधक आगपाखड करत असताना कुणी कारखान्याकडे मोर्चा वळवेल असा अंदाजही त्याला नव्हता. त्याने एक दोनदा बाहेर येऊन आंदोलकांशी बोलण्याचा प्रयत्न केला. पण आता न्यूज चॅनेल्सवाले, पेपर वाले वेगवेगळ्या माध्यमांचे पत्रकार तिथे जमायला लागले तस सगळंच गोंधळाचं वातावरण तयार झालं. बापूसाहेबांना माहीत होतं गुरुकुल वरती मोर्चा नेणं सोप्प काम नाही! त्यापेक्षा कारखान्यावरती येणं बरं. बाहेर सगळे आंदोलनासाठी बसले होते आणि बापूसाहेब जितेंद्र ला भेटायला आत केबिनमध्ये येऊन पोचले.


" काय आहो जितेंद्र, तुमी पन असा त्रागा कशा करून घेताय ?"   ते केबिनचा दरवाजा लोटून आत मध्ये आले. त्यांना बघताच तो उठुन उभा राहिला. त्यांना समोर अस हसताना बघून त्याची तळपायाची आग होत होती.


" बापूसाहेब, काय तमाशा लावलाय हा ?"  तो चिडक्या स्वरात बोलत त्यांच्या समोर येऊन उभा राहीला.

" आहो तमाशा आम्ही कुठं लावलाय. अहो तुमच्या थोरल्या बंधूराजांनी दिवे लावलेत त्याचा प्रकाश पडला असं समजा की."  ते कुत्सिकपणे  जितेंद्र च्या खांद्यावर हात ठेवत बोलले.

" हे बघा, तुम्ही जे बोलताय तसं मुळात काही घडलेलं नाही. वहिनींना कोणीही कसला त्रास दिलेला नाही घरी."

 जितेंद्र साध्या-सरळ शब्दात म्हणाला.

" घरात कशापायी! घराच्या बाहिर पन त्रास असू शकतो की. जितेंद्र तुमी काय आम्हासनी मूर्ख समजता. तोंड उघडाया लावू नका आम्हासनी. आहो घरातल्या सुनेबरोबर तुम्ही अासं वागत असाल ते पन एवढी शिकली सवरलेली पोरं तर इथं कामाला येनार्‍या गरिब पोरीबाळींचं काय! त्यांच्यासोबत बी उद्या तुमी." 

" बापूसाहेब जीभ  आवरा. तुमच्या वयाचा मान ठेवून गप्प बसलोय मी."    तो रागाने बोलला.

" जितेंद्र खरं तेच बोलतोय आमी. आमच्या गरीब पोरींसोबत  काही गैर घडाया नको. असं पन एवढ्या विद्येच्या मंदिरात पैशांचा गैरव्यवहार केला तुम्ही लोकांनी! तर ह्यो तर कारखाना हाय. इथं सगळं शक्य हाये." 

 असं बोलून बापूसाहेब जितेंद्रच्या पडलेल्या चेहऱ्याकडे पाहून खो-खो हसत बाहेर पडले. आपला आंदोलनाचा हेतू अर्धा तरी सफल झाल्याचा आनंद त्यांच्या चेहऱ्यावरती होता.
.......................................................


दिवसभरात इतकं सगळं घडल्यानंतर जितेंद्रचं मन बेचैन झालं होतं. काय करावं, कोणाशी काय बोलावं तेच सुचत नव्हतं. नीतू ,अरुंधती सोबत त्याने बोलून पाहिलं तरी मन शांत बसत नव्हतं. सारखी कारखान्यावरली ती आंदोलनाची दृश्य डोळ्यांसमोर यायची. भाऊ साहेबांशी बोलून बरं वाटेल म्हणून तो त्यांना भेटायला स्टडी रूम ला आला.

" जितेंद्र बरं झालं तुम्ही आलात. मी निरोप पाठवणारच होतो ."  

त्याला पाहून भाऊसाहेब म्हणाले.

" साहेब, आय एम सॉरी. दुपारी तो सगळा गोंधळ मला नीट हाताळता आला नाही." जितेंद्र त्यांच्यासमोरच्या खुर्चीत बसला. ते आराम खुर्चीला टेकले. जितेंद्रच्या चेहऱ्यावरचा ताण त्यांना दिसत होता.

" असू द्या आता. जे घडलं ते घडलं. तसेही यात तुमची काहीही चूक नव्हती. विनाकारण तुमच्या मागे कटकट लागली."

" पण काही असू द्या. आता मी काय करू ते नाही कळतय मला."  तो गोंधळलेल्या चेहऱ्याने बोलला.

" नका तुम्ही चिंता करू. बघू काय होतंय ते. थोडी वाट पाहू बापूसाहेब अजून काय काय करतायत त्याची. खरंच तुमच्या राजीनाम्याचा काय प्रश्न!  कारखान्याचे काम तुम्ही चोख करत आहात. खरं तर हे सगळं खरं आहे हे आपल्यालाही माहीत आहे. या सगळ्याची नैतिक जबाबदारी घेऊन मीच आमदारकीचा राजीनामा द्यायला हवा."   ते शांतपणे म्हणाले .

"काहीही काय बोलताय. प्लीज असं असं काही नका करू."  जितेंद्र अजीजीने म्हणाला.

" कुठेतरी वाटतं मला ही, या सगळ्याला मी ही जबाबदार आहेच की. डोळ्यांवर पट्टी बांधून सगळं विक्रमच्या हातात देऊन मी मोकळा झालो. ते नक्की काय करतायेत, बरोबर करत आहेत का काही चुकीचं वागत आहेत याची पडताळणी केली नाही. ते लग्नाला तयार झाले. का तयार झाले याचा विचार केला नाही. नी आता तरी सुनबाईसाठी काय केलय मी उलट माझ्या मुलामुळे अजून त्रास होतोच आहे तिला."

 ते असं हतबल होऊन बोलले तसं जितेंद्र उठून त्यांच्या पायापाशी बसला. त्यांचे हात हातात घेतले आणि आश्वासक पणे बोलला.

" तुम्ही नका काळजी करू. होईल ठीक सगळं. कॉलेज बाबतीत जे घडलं ते कारखान्याच्या बाबतीत अजिबात होणार नाही." त्याच्या त्या शब्दांनी त्यांना थोडं बरं वाटलं.
..................................................

दिवसभर कारखान्यावरच्या आंदोलनाच्या बातम्या येत होत्या. तिथला गोंधळ विक्रमला कळला तेव्हा त्याला वाईट वाटलं. अनघा घर सोडून गेल्यानंतर कोणीही त्याच्याशी नीट वागत नव्हतं अपवाद अरुंधती आणि जितेंद्र! त्यामुळे जितेंद्रचा त्याला आधार वाटायचा. पण आपल्यामुळे अप्रत्यक्षरित्या तरी त्याला त्रास झाला, त्याला चार शब्द ऐकून घ्यावे लागले त्यामुळे आता तोही आपल्यावरती नाराज होईल की काय असं त्याला वाटू लागलं. तो गच्चीत एकटाच उभा होता इतक्यात बाजूला जितेंद्र येऊन उभा राहिला.

" विक्रम काय  रे झोपला नाहीस."

" नाही, इतकं सगळं कालपासून घडलं. झोप येणं शक्य आहे का! "  जितेंद्रकडे पाहत तो बोलला त्यावर जितेंद्र शांत राहिला. 

" जितू, सॉरी माझ्यामुळे........"  जितेंद्रला अचानक गप्प बसलेलं पाहून तो बोलला.

"It's ok. तसही बापूसाहेब काहीतरी करणारच होते. कॉलेजमध्ये गोंधळ घालणं झेपलं नाही म्हणून तिथं आले." जितेंद्र म्हणाला.

" जित्या, Don't Worry. "

 " विक्रम, त्यांनी मनाला लावून घेतलय हे सगळंच. राजीनामा द्यायचा वगैरे विचार करत आहेत ते."

" काय? No, It's not right आणि तुम्ही कोणीही काही स्वतःवर घ्यायची गरज नाहीये. चुका माझ्या आहेत मग मी बघेन काय ते."   तो थोड्याशा रागाने बोलला.

" म्हणजे ? काय ठरवलयस तू ?  "  जितेंद्रने प्रश्नार्थक चेहऱ्याने विचारलं. 

" मी बोलेन सगळ्यांसमोर जाऊन काय ते! सगळ्यांच्या प्रश्नांना मी सामोरा जाईन. मी उद्या संध्याकाळी प्रेस कॉन्फरन्स घेणार आहे."

" What ! विक्रम नी हे तू आत्ता सांगतोयस.  अरे घरात माहिती तरी आहे का हे कोणाला ! तू उगीच तडकाफडकी "

" जितेंद्र स्वतःच्या चुकीच्या वागण्याने क्रिएट झालेली सिच्युएशन स्वतः सावरायची असते. दुसऱ्या कोणी येऊन सगळं सुरळीत करून द्यावं ही अपेक्षा का करायची ? या सगळ्याला मी रिस्पॉन्सिबल आहे. सो मीच त्याला सामोरा जाईन. "  त्याच्या या ठामपणे बोलण्याने जितेंद्रची चिंता अजून वाढली. त्याला माहीत होतं तो ऐकणार नाही. आणि तो काय बोलणार याचा त्याला अंदाज येईना. त्याच्या मनाला आता आजच्यापेक्षा पुढे काय होणार याची चिंता जास्त सतावू लागली.

क्रमशः

कथेच्या गमतीजमती :

शंभर भागात एकदाही विक्रम अनघाला I Love You म्हणत नाही समोरही नाही आणि मनातून सुद्धा नाही!.....त्याने I Love You अनु न म्हणताच तिला प्रपोज केलं होतं....आहे न गम्मत! भेटूया पुढील भागात विक्रमची प्रेस कॉन्फरन्स आणि अशीच नवी गम्मत.
Happy Reading

🎭 Series Post

View all