Jan 19, 2022
नारीवादी

बंधमुक्त माया - भाग 2 (अंतिम)

Read Later
बंधमुक्त माया - भाग 2 (अंतिम)

बाबांनी तिच्याशी बोलणं टाकलं होतं घरच्यांना हि तिच्याशी बोलायला बंदी केली होती. ऋचा लपून-छपून घरी फोनवर बोलत असे आई आणि बहिणी आणि छोट्या भावाशी. तेवढाच काय तो आधार. वेद बरोबर बोलणं ही चालूच होतं. थोड्या दिवसात वेदच प्रोजेक्ट संपलं आणि तो भारतात परत आला.

ऋचा अजून परत आली नव्हती. वेदने शेवटचा प्रयत्न म्हणून स्वतः ऋचा च्या बाबांशी बोलण्याचा प्रयत्न केला. पण त्यांनी त्याला स्पष्ट सांगितलं की मला तुझ्याशी काहीही बोलायचं नाही आणि तुझं तोंड देखील पहायचं नाही.

त्यांचा तो अवतार पाहून वेदने विचार केला की ऍटलिस्ट कोर्ट मॅरेज करून ठेऊ, म्हणजे जर कधी काही प्रसंग आलाच तर आपल्याकडे आपलं मॅरेज सर्टिफिकेट असेल आणि बाबा जबरदस्ती लग्न लावू शकणार नाहीत. हा त्यांचा शेवटचा पर्याय होता. त्याप्रमाणे त्यांनी त्यांचे लग्न कोर्टात उरकून घेतलं आणि कायदेशीर रित्या नवरा-बायको बनले. वेद च्या घरच्यांना यामध्ये काही आपत्ती नव्हती परंतु त्यांचे एकच म्हणणं होतं की धर्मशास्त्रानुसार त्यांचे लग्न हे व्हायलाच हवं.

वेद आणि रुचा पुढच्या कामांमध्ये गुंग झाले. शेवटी भविष्यासाठी त्यांना काही ना काहीतरी कष्ट अधिक करावे लागणार होते. तिकडे आईने बाबांना समजवण्याचा प्रयत्न सुरूच ठेवला होता. परंतु बाबा काही ऐकेना. शेवटी ती त्यांना म्हणाली,” माझे डोळे मिळण्याच्या आधी मला माझ्या मुलीचा संसार बघू द्या . आता पर्यंत तुमचा शब्द प्रमाण मानत आले मी या घरांमध्ये, एवढं सुख मला द्या.. तुमची विनवणी करते मी...” बाबांनी वैतागून सांगितलं ,” करा लग्न पण मी काही करणार नाही माझ्यासाठी फक्त हे एक कार्य असेल. माझा याच्याशी काहीही संबंध नसेल”. सगळ्यांना आनंद झाला . पडत्या फळाची आज्ञा मानून सर्वांनी त्यांच्या लग्नाची तयारी जोरदार सुरू केली आणि ठीक आहे, कमीतकमी लेकीला मनाजोगता जोडीदार तरी मिळेल.. जरी माहेर तुटलं तरी काही हरकत नाही.. आयुष्यभर मन मारून तिला जगावं तर नाही लागणार, मला तर जन्मभर असाच काढावा लागला आहे, निदान माझी मुलगी तरी सुखी होईल, असा विचार करुन आई समाधानी झाली.

वेद आणि ऋचा ने धुमधडाक्यात लग्न केलं, पण बाबा काही खुश नव्हते. ते एक शब्दही कुणाशी बोलले नाहीत. ऋचाला वाईट वाटत होतं पण नव्या आयुष्यासाठी ती तयार होती. अशातच वेदला युएसला जायची संधी मिळाली आणि ते दोघेही तिकडे शिफ्ट झाले.

संसार फार छान चालू झाला, पण माहेरी बोलायला बंदी असल्यामुळे ऋचा ला आई-बाबांची आणि भावाबहिणींची खूप आठवण येत असे.

अशातच एक दिवस ऋचा ला दिवसभर फार अस्वस्थ वाटत होतं.. काहीतरी चूक होत आहे असं तिला मनात सारखं वाटत होतं . तिला अजून जॉब मिळाला नसल्यामुळे ती घरीच असायची त्यामुळे तिला असं वाटलं की रिकामं असल्यामुळे माझ्या मनाचे खेळ चालू आहेत... तिने वेद ला फोन करून खात्री केली की तो सुखरूप आहे. पण तरीही तिच्या मनाची घालमेल सुरू होती.

दोन दिवस तिथे कशात लक्ष नव्हतं. तिचं चित्त थाऱ्यावर नव्हतं. आईला फोन केला तर तिचा फोन स्विच ऑफ, भावाला फोन केला, त्याचाही फोन लागत नव्हता. शेवटी न राहवून तिने तिच्या मोठ्या बहिणीला फोन केला. नंतर जे काय ऐकलं ते ऐकून तिला फार मोठा धक्का बसला. तिचा भाऊ आणि आई काही कामानिमित्त स्कुटी वरून बाजारात जात होते आणि एका दगडाला ठेच लागून त्यांची स्कूटी पलटली आणि आई आणि भाऊ दोघेही खाली पडले मागून आलेल्या ट्रकने तिच्या आईला फार मोठा धक्का दिला, ती जागीच मरण पावली. खूप मोठा आघात झाला, भावाचे हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू होते, पण तो वाचला. हे ऐकून ऋचा ला चक्कर आली. आपल्या आईशी आपल्याला शेवटच्या वेळ प्रसंगी बोलता नाही आलं याच तिला फार दुःख वाटत होतं. वेद लवकरच घरी आला, तिला बघून तो हि घाबरला, दोघे लगेच डॉक्टर कडे गेले. तशातच डॉक्टरांनी त्यांना एक आनंदाची बातमी दिली, की ते दोघेही आई-बाबा होणार होते. आई गेल्याच दुःख, आणि त्यातच आई होण्याची सुखद बातमी . तिला काहीच कळत नव्हतं की दुखी राहावं की आनंदी? शेवटी पोटातल्या जीवासाठी तिने समाधानी राहण्याचं ठरवलं आणि मनोमन प्रार्थना करू लागली की देवा.. माझ्या आईला माझ्या पोटी जन्माला घाल.

बाळ जन्माला आलं आणि ती मुलगी होती हे पाहून तिला तिच्या आईला भेटण्याचा आनंद झाला... एक नवीन जन्म मिळाला होता तिच्या आईला, बंध मुक्त असा!! शेवटी आईची माया ती निराळीच.... लेकी वर प्रेम करायला ती माऊली पुन्हा आली होती!!!! 

 

समाप्त!!!

(©सावली.. स्वतःची) 

ईरा वाचनाचा आनंद घ्या आता app मधून, आजच download करा. Download App Now