#बंध रेशमी नात्याचे...भाग-8

अर्णवने गाडीकडे पाहिले तो गाडीजवळ पोहोचला.त्याच्या फेवरेट कलरची गाडी त्याला न्यायला एअरपोर्टवर उभी होती. गाडीत बसलेली ती सुंदर मुलगी त्याच्या फेवरेट कलरचा ड्रेस घालून त्याच्या आवडीचा परफ्युम मारून तोंडासमोर गुलाबाचा बुके घेऊन अर्णवला "वेलकम !" म्हणाली.


भाग-8…


"काय झाले अर्णव ? बॉस काही बोलले का तुला ? सांग ना प्लीज ! "ओवी हताश झाली होती.

अर्णव आपला हात बाईकवर मारत म्हणाला , "ओवी ,मला उद्याच निघावं लागेल. बॉसनी पासपोर्ट आणि तिकीटही बुक केले आहे. आज ते माझी एका कॉन्ट्रॅक्टवर साईन घेणार आहेत आणि त्यासाठी मला त्यांनी अर्जंट बोलावले आहे.

"वॉट ? अरे काय बिघडवले आहे आपण त्यांचे ? की ते अगदी हात धुवून आपल्या मागे लागले आहेत. अरे माणूस आहेत की कोण ? दोनच दिवस झालेत आपल्या लग्नाला आणि उद्याचे तिकीटही बुक केले त्यांनी. तेही तुला न विचारता ? थोडा उशिरा गेला असता तर असं किती नुकसान झालं असतं रे त्यांच्या कंपनीचं ? आणि ते माणूस म्हणूनही मला काही योग्य वाटले नाहीत. म्हणजे बघ ना , ऐन लग्नाच्या वेळी त्यांनी सगळ्यांसमोर तू मला इथे ठेवून अमेरिकेत जाणार आहेस हे सांगितले म्हणजे त्यांचा हेतू नेमका काय होता ? मला तर त्यांच्यावर चांगली शंका येत आहे. तू कॉन्टॅक्ट साइन करताना ते आधी वाचावस असं मला वाटतं आणि जर तुला त्यांचा हेतू चुकीचा वाटला तर आपण आपलं राहतं घरही सोडूया. तुझ्याशिवाय मला काही नकोय." ओवी अर्णवचा हात हातात घेत म्हणाली.

"हो ओवी , मलाही आता तेच वाटतेय. विनाकारण इतका त्रास सहन देणं यामागे त्यांचा नक्कीच काहीतरी हेतू‌ आहे. मी‌ कॉन्ट्रॅक्ट पेपर नीट वाचून मगच साइन करेल. चल निघूया का आपण ?" अर्णव म्हणाला.

"हो." म्हणून अर्णवच्या मागे बसली.

अर्णव आणि ओवी घरी पोहोचले. ते घरी पोहोचण्या अगोदरच अर्णवच्या सुशीला काकू त्यांच्या कुंती आणि प्राप्ती या दोन्ही मुलींसह चार महिन्याच्या मुक्कामासाठी अर्णवच्या घरी आल्या होत्या. घरी पोहोचल्यावर त्यांना समजले की , एक वर्षांपूर्वी कुंतीचे पहिले बाळ पोटातच दगावले होते. कुंतीही मृत्यूशी झुंज देत कशीबशी बचावली होती. गावी सुविधा नसल्यामुळे तिची डिलिव्हरी वेळेत होऊ शकली नाही आणि त्यातच बाळ पोटातच दगावले होते. कुंती अपंग असल्यामुळे आणि वडिलांचे छत्र नसल्यामुळे आईने त्यांच्याजवळ असलेली सगळी जमीन विकून कुंतीचे थाटात लग्न केले होते. आता परत त्यांना कुंतीचे बाळ गमावू द्यायचे नव्हते म्हणूनच त्यांनी कुंतीची डिलिव्हरी शहरात करण्याचा निर्णय घेतला होता.

वस्तुस्थिती कळल्यावर ओवीला फार वाईट वाटले.

काकू म्हणाल्या ,"ओवी बाळा , तुमच्या लग्नाला ही मला यायला जमले नाही. कुंतीला बेडरेस्ट सांगितली असल्यामुळे तिला एकटीला घरी ठेवून येणे शक्य नव्हते आणि आता तर तिला याही वेळी डिलिव्हरी होताना ती अवघड असेल असं सांगितलं आहे. तुझं ही नवीनच लग्न झालेय मी समजू शकते पण माझा नाईलाज आहे. कुंतीचं बाळ सव्वा महिन्याचं झालं की आम्ही निघून जाऊ. पण तोपर्यंत आम्हाला इथे राहू द्या." काकूंच्या डोळ्यातून अश्रू ओघळू लागले.

"अग सुशीला ,मला मोठी बहीण म्हणतेस ना ? मग असं परक्यासारखं काय बोलतेस ? आता अर्णव ही परदेशात जाणार आहे तेव्हा तुम्ही आला आहात म्हणून उलट ओवीला अर्णवची थोडीशी कमी भरून निघाल्यासारखी वाटेल. हो ना ओवी ?"

अर्णव काही बोलणार तोच ओवीने त्याचा हात पकडला. आणि ती म्हणाली ," हो काकू ,आई बरोबर बोलतायेत. तुम्ही निश्चित रहा. आपण कुंती ताईंची काळजी घेऊया म्हणजे त्यांचं बाळ अगदी निरोगी जन्माला येईल."

अर्णवने ओवीला "सगळ्यांना बॉस काय म्हणाला ते सांगण्यापासून का अडवले ?" असे विचारले.

तेव्हा ओवी म्हणाली , "अर्णव , पाहतोयस ना ? सुशीला काकूंचे दुःख आपल्या दुःखापुढे फारच मोठे आहे रे. त्या इथे आनंद शोधायला आल्यात आणि आपण परत आपले प्रॉब्लेम सांगून त्यांना दुःख कशाला द्यायचे ? म्हणून त्यांना लगेच काही सांगू नये असे मला वाटले."


अर्णवला ओवीच्या समंजस स्वभावाचे मनापासून कौतुक वाटत होते . तो स्वतःला नशीबवानही समजत होता. तो फ्रेश होऊन ऑफिसला निघाला.

आई म्हणाली ,"अर्णव ,तू तर रजा घेतली होतीस ना ? मग कुठे निघालास ?"

"आई बॉसने अर्जंट बोलावले आहे. लगेच परत येतो." अर्णव म्हणाला.

अर्णव ऑफिसमध्ये पोहोचला. घरी घडलेल्या या प्रसंगानंतर बॉसने जे पेपर समोर ठेवले त्यावर अर्णवणे न वाचता पटापट सह्या केल्या.

"अभिनंदन !" बॉस म्हणाला.

"कशाबद्दल ?" अर्णव.

"ते तुला उद्या तिथे पोहोचल्यावर कळेलच." बॉस म्हणाला.


अर्णव खिन्न होऊन म्हणाला ,"उद्या ?"

"हो. तुला उद्याच निघावं लागेल." बॉस.

अर्णवणे आता जे होईल त्याला धीराने सामोरे जायचे हे ठरवले होते.

"ठीक आहे सर ! मी उद्याच निघेन.." म्हणून अर्णव नाराज होऊन घरी परतला.

त्याने संध्याकाळच्या जेवणानंतर ओवीला आणि घरच्या सगळ्यांनाच त्याला उद्याच निघायचे आहे हे‌ सांगितले. मनातून कितीही वाईट वाटले तरी आलेल्या प्रसंगाला तोंड देण्याशिवाय गत्यंतर नव्हते म्हणून ओवीने अर्णवची बॅग भरायला सुरुवात केली.

ओवीने अर्णवसाठी आधीच शॉपिंग करून ठेवली होती. त्याच्या आवडीच्या रंगांचे टी-शर्ट , परफ्युम, दोघांचा फ्रेम केलेला फोटो आणि नॅपकिन सगळं काही तिने सरप्राईज गिफ्ट म्हणून अर्णवच्या बॅगमध्ये ठेवले. तितक्यात अर्णवच्या आईही एक रेशमी शाल ,स्वेटर ,लोणचे ,चटणी आणि अर्णवच्या आवडीचे लाडूही घेऊन आल्या.

"अग आई , मी गाडी भाड्याने करून जात नाहीये. विमानाने जायचेय मला. तिथे लगेजच वजन केलं जातं. इतकं वजन अलाउड नाहीये." आधीच अपसेट असलेला अर्णव थोडा रागानेच म्हणाला. आईला उदास झालेले पाहून ओवीने समजूतदारपणा दाखवत सगळे टी-शर्ट बॅगमधून बाहेर काढले.

ती म्हणाली ,"अरे यापेक्षा भारी टी-शर्ट तुला तिथे मिळतील. आईच्या हातच्या पदार्थांची चव तिथल्या कुठल्याही पदार्थांना नसेल.प्लीज घेऊन जा ना ह‌े सगळं."

ओवी टी-शर्ट घेऊन ते कपाटात ठेवायला निघाली. तोच अर्णवने तिचा हात पकडला आणि ओवीने प्रेमाने आणलेले ते टी-शर्ट अर्णवने बॅगमध्ये ठेवले. सगळ्यांचे डोळे पाणावले होते.

"वहिनी तू खूप चांगली आहेस !" छोटी प्राप्ती ओवीजवळ येऊन म्हणाली.

"का बरं ?" ओवी आश्चर्याने म्हणाली.

"म्हणजे बघ ना , गावी हा प्रसंग घडला असता तर.. सुनेनी मी खरेदी केलेल्या वस्तूच न्यायला हव्यात असा आग्रह धरला असता आणि सासूनेही मुलाकडे तोच आग्रह धरला असता आणि त्या मुलाची पंचायत करून सोडली असती."

सगळेजण मोठ्याने हसत होते. अतिशय गंभीर असलेले वातावरण प्राप्तीच्या या वाक्याने अगदीच हलके झाले होते.

प्राप्ती पुढे म्हणाली ,"ताईच्या सासरची माणसं असू देत किंवा आमच्या शेजारची. सतत सासू सुना भांडणच करत असतात. पण इथे तू आणि काकू सासू सुन वाटतच नाहीत. त्यापेक्षा मुलगी आणि आई वाटताय."

"हो प्राप्ती बरोबर बोलतीय. तू खूप चांगली आहेस वहिनी!" कुंती म्हणाली.

"हो ओवी ,माझी लेकच आहे!" अर्णवच्या आई म्हणाल्या.

अर्णवला एअरपोर्टवर सोडायला ओवी आणि प्राप्ती जाणार होत्या.दुपारची फ्लाईट असल्याने दोघीही आवरून तयार झाल्या. अर्णवचे घराला आणि त्यातून आपल्या लाडक्या बायकोला सोडून जायचे जराही मनात नव्हते पण प्रसंग तसे उभे राहत होते की , त्याला जावेच लागणार होते. अर्णवने कॅब बुक केली. ओवी आणि प्राप्ती कॅबमध्ये बसून अर्णवसोबत निघाल्या होत्या. अर्णव ओवीच्या डोळ्यातील भाव टिपत होता. ओवीला आल्यानंतर अगदी सुखात ठेवण्याचा त्याने मनापासून निर्धार केला होता. ओवीलाही अर्णववर पूर्ण विश्वास होता. फ्लाईटची वेळ होईपर्यंत दोघेही एकमेकांना भरभरून गप्पा मारत होते. फ्लाईटची वेळ झाल्यावर अर्णव गेला. ओवी मात्र त्याच्या पाठमोऱ्या आकृतीकडे पाहून आसवे गाळत होती.

अर्णवही मधून मधून ओवीला जड अंत:करणाने "बाय!" म्हणत होता.

अर्णवला निरोप देऊन ओवी आणि प्राप्ती कॅब मध्ये बसून घरी आल्या. अर्णव मात्र काही तासातच परदेशात पोहोचला. तो तिथे पोहोचला आणि त्याला स्वप्नातही वाटले नव्हते असा धक्का बसला.

एका अनोळखी व्यक्तीने अर्णवला त्याच्यासाठी गाडीत कोणीतरी वाट पाहत आहे आणि तीच व्यक्ती अर्णवला पिकअप करायला आली आहे हे सांगितले.
अर्णवने गाडीकडे पाहिले तो गाडीजवळ पोहोचला.
त्याच्या फेवरेट कलरची गाडी त्याला न्यायला एअरपोर्टवर उभी होती. गाडीत बसलेली ती सुंदर मुलगी त्याच्या फेवरेट कलरचा ड्रेस घालून त्याच्या आवडीचा परफ्युम मारून तोंडासमोर गुलाबाचा बुके घेऊन अर्णवला "वेलकम !" म्हणाली.

"थँक्स !" अर्णव साशंक नजरेने म्हणाला.

त्या मुलीने बुके चेहऱ्यापासून दूर केला आणि अर्णवला धक्काच बसला.

" तू ,तू इथे कशी ?" अर्णव म्हणाला.

कोण असेल ती मुलगी ?
अर्णवचा आणि तिचा काय संबंध ?

पाहूया पुढील भागात क्रमशः
सौ. प्राजक्ता पाटील
कथा आवडल्यास अभिप्राय द्यायला विसरू नका..

🎭 Series Post

View all