#बंध रेशमी नात्याचे.. भाग-6

आपले सर्वस्व अर्णवला अर्पण करून ओवीला त्याच्या जाण्याची हुरहुर आणि परतण्याची ओढ लागली होती.


भाग- 6


बॉसने दिलेले तिकीट ओवीने नाकारले. ती म्हणाली ,"सर , माफ करा पण आम्हाला हे तिकीट नकोय."

" ठीक आहे. नको असेल तर राहिले. " म्हणून बॉसने तिकीट खिशात ठेवले.


"काय म्हणत होतात तुम्ही ? कोण जाणार आहे परदेशात ? हो ना ? म्हणजे तुम्हाला माहित नाही का ? काय रे अर्णव बोलला नाहीस का तू तुझ्या आई बाबांना ? आणि होणाऱ्या बायकोला तरी सांगितलेस आहे की नाही ? का मीच सांगू ? बरं थांब. मीच सांगतो. त्याचं काय आहे अर्णवचे प्रमोशन झालेय आणि तो आता पंधरा दिवसांनी लगेच माझ्या परदेशातील कंपनीचा ओनर म्हणून काम पाहणार आहे. सध्या तरी तो एकटाच चाललाय कारण काही कारणास्तव तो त्याच्या बायकोला सोबत घेऊन जाऊ शकत नाही."

ओवी आणि अर्णवचे डोळे भरून आले होते. \"एखाद्याच्या मजबुरीचा इतका फायदा कोणी घेते का ?\" हा मनात विचार करून ओवीने आपल्या डोळ्यातील अश्रू टिपले.

ओवीकडे पाहत ओवीचे बाबा म्हणाले ,ओवी तू रडू नकोस बरं."

"काय ?" अर्णवच्या आई म्हणाल्या.

अर्णवच्या आई बाबांना आणि ओवीच्या आई बाबांनाही बॉसचे बोलणे ऐकून धक्काच बसला होता.

ओवीचे बाबा म्हणाले , " अर्णव आम्ही हे जे काय ऐकतोय हे खर आहे का ?"

"हो बाबा." अर्णव म्हणाला. अरे ही शुद्ध फसवणूक आहे. तुला जायचेच होते तर लग्न कशाला करायचे ? आल्यानंतर केले असते तरी चालले असते ना. आमच्या जीवाला घोर लावलास तू." ओवीचे बाबा म्हणाले.

"बाबा अर्णवने कोणाचीही फसवणूक केलेली नाही त्याने या सर्व गोष्टींची मला पूर्वकल्पना दिली होती. अर्णव कंपनीत जॉईन झाल्यापासून मी पाहत होते की तो प्रमोशन नाकारत होता. ते केवळ तो परदेशात गेल्यावर आई-बाबांचे कसे होणार म्हणून ? म्हणूनच मी त्याची हक्काची बायको बणून आणि काका काकूंची मुलगी बनून तो इथे नसताना त्याची सर्व जबाबदारी पार पाडेल असा मी तिला शब्द दिला आणि मगच तो परदेशात जायला तयार झाला." ओवीने अर्णवची बाजू छान सावरली होती.

"पण ओवी.." ओवीचे बाबा पुढे बोलणार तोच अर्णव बाबांचा हात हातात घेऊन विश्वासाने म्हणाला , "तुम्ही काही काळजी करू नका. तुमचा विश्वास आहे ना माझ्यावर ? प्लीज बाबा , आता जरी ओवीला नाराज करत असलो तरी मी परदेशातून आल्यावर मात्र ओवीचे जीवन आनंदाने भरलेले असेल हा शब्द देतो मी तुम्हाला."

ओवीच्या बाबांचे डोळेही भरून आले होते. अर्णवचे आई बाबा ओवीच्या डोक्यावर हात ठेवून म्हणाले , "ओवी ,तुझ्या रूपाने मुलगी मिळाली बघा आम्हाला. तुझ्या या उपकाराची परतफेड कशी करावी ? हेच सुचत नाहीये."
अर्णवच्या डोळ्यासमोर पंधरा दिवसांपूर्वीचा साड्यांचा किस्सा आला.त्याला आपल्या कठीण प्रसंगात साथ देणाऱ्या ओवीचा मनापासून अभिमान वाटत होता.

तो आईला म्हणाला , "आई , केवळ हाच उपकार नाही ओवीचा आणखी खूप उपकार केलेत तिने माझ्यावर." अर्णव पुढे काही बोलणार तोच ओवीने नकारार्थी मान हलवली. विषयाला बगल देत अर्णव म्हणाला , "वेळ आली की नक्की सांगेन."

"काकू , आत्ताच मला मुलगी म्हणालात ना ? मग हे असं उपकाराची भाषा बोलून तुम्ही मला परकी करणार आहात का ? प्लीज काकू मी जे काही केलं ते माझ्या सौभाग्यासाठी आणि माझ्या परिवारासाठी केलं तेव्हा आता मी तुझी अर्धांगिनी आहे अर्णव. तू ही आपल्या नात्यात यापुढे तुझं माझं केलेलं मी सहन करणार नाही."

सगळ्यांच्या चेहऱ्यावर स्मितहास्य होते. बॉसचा चेहरा मात्र पडला होता. त्यांना जे हवं होतं त्याच्या अगदी सगळं विरुद्ध घडलं होतं. ओवीच्या आई-बाबांना आपल्या लेकीचा अभिमान वाटत होता. मैत्री करणं सोपं असतं पण ती निभावणं फार कठीण असतं. ओवीने मैत्री तर अगदी प्रामाणिकपणे निभावली होती पण रेशीमगाठ बांधायच्या आधीच आपल्या नात्यांच्या गाठी अगदी पक्क्या बांधल्या होत्या.

ओवी आणि अर्णवने सगळ्यांचा आशीर्वाद घेतला. फुलांनी सजवलेल्या गाडीपेक्षा आज ओवीने गिफ्ट केलेली बाईक अर्णवसाठी लाखमोलाची होती. \"होन्डा सीबी बॉरनेट वन सिक्सटी आर\" ही बाईक आधीच ओवीने बुक केली होती. लग्नाच्या आदल्या दिवशीच ती कार्यालयात छान सजून उभी होती. गाडीचा पिवळा रंग लाल फुलांनी अजूनच आकर्षक दिसत होता. गाडीच्या समोर लावलेले शाहरूख आणि काजोलचे \"दिलवाले दुल्हनिया ले जायेंगे !\" खूपच रोमँटिक होते. आज पहिल्यांदा नवविवाहित जोडपे ही अशी बाईकवर गृहप्रवेश करणार होते. लग्नातील सर्व विधी यथासांग पार पडला होता.अर्णवचे आई बाबा ओवीच्या गृहप्रवेशाची तयारी करण्यासाठी घरी गेले होते.

सगळ्यांच्या नजरा ओवी आणि अर्णव वर खिळल्या होत्या. ओवीच्या घुंगटची आणि अर्णवच्या उपरण्याची रेशीम पक्की गाठ बांधली होती त्यामुळे अर्णवच्या मागे सावकाश पावले टाकत अर्णव आणि ओवी बाईक जवळ आले. व्हिडिओ शूटिंगवाला आणि फोटोग्राफर मस्त फोटो काढत होते. अर्णव लहानपणापासूनचा मित्र असला तरी त्याच्या इतक्याजवळ ओवी याआधी कधीही गेली नव्हती त्यामुळे लाजतच ओवी पोज देत होती.

अर्णव चटकन बाईकवर चढला पण ओवीला मात्र घागरा घातल्यामुळे तो सांभाळत बाईकवर बसणे फारच कठीण वाटत होते. अर्णवने आपला हात पुढे केला. ओवीने अलगद आपला हात अर्णवच्या हातात दिला.अर्णवच्या खांद्यावर हात ठेवत ओवी अर्णवच्या मागे बसली. त्यानंतर अर्णवच्या गाडीचा तो हाय स्पीड पाहून ओवीने डोळे घट्ट मिटून घेतले. ते दारात गाडी थांबल्यावरच उघडले.

"काय गं ओवी घाबरली होतीस की काय ? डोळे मिटून घेतलेले दिसले." मागून बाईकवर आलेली ओवीच्या ऑफिसमधली शर्वरी हळूच म्हणाली.

"हो ना ,अगदी जीव मुठीत धरून आलेय." हसून ओवी म्हणाली.

अर्णवच्या आईने ओवीच्या गृहप्रवेशाची सगळी तयारी केली होती. धान्याने भरलेले माप ओलांडून नवविवाहित जोडप्यांनी उखाणे घेऊन गृहप्रवेश केला. ओवी आणि अर्णव फ्रेश होऊन आले. त्यांनी घरातील देवाला , तुळशीला आणि मोठ्यांना नमस्कार करून एकमेकांच्या सुखासाठी प्रार्थना केली. ओवी आणि अर्णवचे दोघांचेही एकमेकांवर जीवापाड प्रेम होते. बराच उशीर झाला होता. शर्वरी आणि तिचे मिस्टर ओवीच्या घरच्यांच्या आग्रहाखातर एक रात्र ओवीच्या सासरी मुक्कामी राहिले होते.

अर्णव सतत बायकोच्या मागोमागे करत होता. शर्वरी म्हणाली ,"जीजू , आजची एक रात्र जरा आमच्यासोबत घालवू देत ओवीला. उद्यापासून तुमच्या लाडक्या बायकोला आणि तुम्हाला कोणीच डिस्टर्ब नाही करणार."
अर्णव हसून आपल्या खोलीत गेला. अर्णवच्या आईच्या खोलीत ओवी आई आणि शर्वरी झोपल्या होत्या. हॉलमध्ये शर्वरीचे मिस्टर आणि अर्णवचे बाबा झोपले होते.

बेडरूम तिच होती बेडही तोच होता पण अर्णवला काही केल्या आज झोप येत नव्हती. आपण जाण्याआधीचा एक क्षणही ओवीशिवाय अर्णवला व्यतीत करायचा नव्हता. \"प्रश्न एका रात्रीचाच तर आहे नंतर मात्र माझी ओवी सतत माझ्या जवळ असेल.\" हा मनात विचार करून अर्णव खुश झाला.

ओवीची परिस्थितीही काही वेगळी नव्हती. तिला सतत अर्णव तिच्या डोळ्यांसमोर हवा होता. मनभरून त्याला पाहायचे होते त्या आठवणींवर तर तिला त्यानंतर जगायचे होते. एक वर्ष जरी म्हणताना लहान अंक असला तरी तिला एक क्षणही वर्षासारखा भासेल हा मनात विचार करत ओवीचे डोळे भरून आले.

ओवी रडतेय हे पाहून सासूबाई म्हणाल्या ,"ओवी , मुलगी लग्न करून सासरी आल्यावर आई-वडिलांच्या विरहाने तिच्या डोळ्यात पाणी येते. पण तू नशीबवान होतीस की तुला हाकेच्या अंतरावर आई बाबा असल्याने कधीही जाता येऊ शकत होते पण ज्याच्या सुखासाठी तू या घरात आलीस तोच थोड्या काळापुरता दुरावेल म्हणून मी ही स्वतःला नाही सावरू शकत. अर्णवने नाही गेले तर नाही का चालणार?"

"नाही आई , अर्णवला जावेच लागेल यातच आपले भले आहे. एका वर्षात तो येईल ना परत आणि मी आहे ना मग रडू नका बरं. रडून आपल्याला आजारी नाही पडायचंय हे लक्षात ठेवा." स्मितहास्य करत ओवी म्हणाली.


"हो. सगळे ठीक होईल म्हणून आनंदाने निरोप द्यायला हवा आपल्याला." अर्णवची आई म्हणाली. शर्वरी सासूसुनेचे अनोखे नाते प्रत्यक्षात पाहून मनातून विचार करत होती. \"सासू आणि सून असावी तर अशी!\"

मानेनेच होकार देत तिघीही झोपी गेल्या. सकाळी लवकर उठून ओवीने सर्वांसाठी चहा नाश्ता बनवला. संध्याकाळी सत्यनारायणाची पुजा संपन्न झाली. ओवीची ओटी भरून ओवी दुधाने भरलेला ग्लास घेऊन अर्णवच्या खोलीत गेली.
एकमेकांवर जीवापाड प्रेम करणारे दोन जीव आज शरीर व मनाने एकमेकांचे झाले होते. आपले सर्वस्व अर्णवला अर्पण करून ओवीला त्याच्या जाण्याची हुरहुर आणि परतण्याची ओढ लागली होती.

कसा असेल लग्नानंतरचा अर्णव आणि ओवीचा जीवनप्रवास ? जाणून घ्यायला तुम्हीही उत्सुक असाल ना ? मग त्यासाठी पुढील भाग नक्की वाचा…
क्रमशः
सौ. प्राजक्ता पाटील

🎭 Series Post

View all