# बंध रेशमी नात्याचे.... भाग-1

Bandh Reshmi Natyache..



भाग-1

"सगळं अगदी मनासारखं झाल्यावर किती आनंद होतो नाही ? म्हणजे बघ ना , आपला बालपणीचा मित्र जेव्हा प्रियकर म्हणून एखाद्या मुलीच्या आयुष्यात येतो ना , तो आनंद काही निराळाच असतो." अर्णववर जीवापाड प्रेम करणारी ओवी एकटीच बडबड करत होती.

पण अर्णव मात्र अथांग सागराच्या तळाशी कुठेतरी हरवला होता. ओवी काय म्हणत आहे ? याकडेही त्याचे बिलकुल लक्ष नव्हते. लहानपणापासूनच ओवी अतिशय चुणचुणीत आणि सगळ्यांना आपलेसे करून घेणारी निरागस मुलगी होती. अर्णवही अगदी समजूतदार आणि गुणी मुलगा होता. म्हणून तर दोघांची मैत्रीचे नाते आजतागायत चोवीस वर्ष दोघांनीही अतोनात जपले होते पण आज असं काय घडलं होतं ? की ओवी बोलत असताना अर्णव मात्र स्वतःला कुठेतरी शोधत बसला होता.

नेहमीप्रमाणे अर्णवला समजून घेत ओवी म्हणाली ," अर्णव ऑफिसचं काही टेन्शन आहे का रे तुला ? नाही म्हणजे बघ ना , इतका वेळ झालं मी एकटीच बडबड करतेय आणि तू मात्र शून्यात डोळे लावून बसला आहेस."

" काहीही टेन्शन नाहीये अगं ." अर्णव

"अरे लग्न झाल्यावर मुलं बदलतात हे ऐकलं होतं पण तू तर लग्नाच्या आधीच बदलायला लागलास . मग लग्न झाल्यावर माझं कसं होणार ? ओवी म्हणाली.

"तू तर ना , काहीही उगाच उचलली जीभ लावली टाळेला असेच बोलतेस. बरं चल निघायचं का?" अर्णव

"लगेच निघायचं ? आता तर आलोय ना आपण. नक्कीच तुझं काहीतरी बिनसलय. \"म्हणूनच आज काय आहे ? हे ही तू विसरलास.\" हा मनात विचार करून ओवी पुढे म्हणाली, बसू यात ना थोडा वेळ. आज मी आई-बाबांना आणि काका काकूनाही तू आणि मी एकत्र डिनर करून येणार आहोत असं सांगून आलेय त्यामुळे घरचे काळजी वगैरे करत असतील हा विचार तू करत असशील तर तसे काही तू टेन्शन घेऊ नकोस."

खिशातले पाकीट ओवीला काढून दाखवत अर्णव म्हणाला ," हे एटीएम कार्ड पाहतेस ना यावर झिरो बॅलन्स आहे आणि हे बघ नेहमीप्रमाणे माझे पाकीट रिकामे आहे. कसे डिनर करणार आहोत आपण ? परवा बाबांना दवाखान्यात घेऊन जाताना त्या डॉक्टरांचे बील पेड केले आणि हे फक्त शंभर रूपये उरलेत आता. वरच्या खिशात ठेवलेली शंभरची नोट काढत अर्णव म्हणाला. माझ्याकडे आज पैसे नाहीत ओवी."

"असू दे रे ,डिनर म्हटल्यावर डिनर करावा असं थोडीच आहे. स्नॅक्सवरही भूक भागेल माझी. कारण सोबत तू असशील ना ? तुला पाहिलं की पोट भरतं माझं." ओवी अर्णवचा हातात घेऊन रोमँटिक मूडमध्ये बोलत होती. तरीही अर्णवच्या चेहऱ्यावरील एक रेघही बदलली नव्हती.

"ओवी तू लग्न करून घरी आल्यावर हे असं रिकामे पाकीट तुला दाखवताना मन उदास होईल माझे." अर्णव नजर चोरत म्हणाला.

"असू दे रे , मी तुला कधी काय म्हणते का आणि यापुढेही कधीच म्हणणारही नाही. आपण दोघे कमावू ना एखाद्या वेळी माझे पॉकेट रिकामे असेल पण तुझे पॉकेट मी कधीच रिकामे होऊ देणार नाही. आय प्रॉमिस!" ओवी शांतपणे म्हणाली.

"सगळी सोंग करता येतात ओवी पण पैशाचं सोंग नाही करता येत." अर्णव आपल्याच विचारात मग्न होऊन बोलत होता.

"अरे आज असे काय झालेय तुला की , तू प्रत्येक गोष्ट निगेटिव्हिली घेतोय ? जे काही तुझ्या मनात असेल ते स्पष्टपणे सांग बघू." ओवी नाराज होऊन म्हणाली.

तेवढ्यात वेटर "काय ऑर्डर करायची?" हे विचारायला मेनू कार्ड घेऊन ओवी आणि अर्णवजवळ आला होता.

सगळे टेबल गुलाबाच्या ताज्या आणि सुगंधी फुलांनी गजबजले होते. प्रत्येक टेबलावरील कपल्स छान रोमँटिक गप्पांमध्ये रमले होते. शहरातील प्रेमीयुगलांसाठीच प्रसिद्ध असलेले ते हॉटेल आणि नेहमी त्याच हॉटेलमध्ये येणारे अर्णव आणि ओवी आज मात्र तिथल्या कॅन्डल लाईटचा किंवा मनमोहक सौंदर्याचा भाग नव्हते

नेहमीप्रमाणे ओवीने सगळे पदार्थ अर्णवच्या आवडीचे ऑर्डर केले पण यावेळी "तुझ्या आवडीचे काहीतरी मागव ना ." हे बोलायचे अर्णव विसरूनच गेला. ओवी मनातून फार उदास झाली होती.लग्नाची तारीख जाहीर झाल्यापासून गेली चार-पाच दिवस अर्णवमध्ये फारच बदल झालेला तिला जाणवत होता.

\"लग्न झाल्यावर मीच जरा समजूतदारपणे वागेल म्हणजे खर्चाचा लोड अर्णववर येणार नाही.\" हा मनात विचार करून ओवी परिस्थिती समजूतदारपणे हाताळत होती.

अर्णवची परिस्थिती बेताचीच होती. लहानपणापासून ओवीला अर्णवच्या परिस्थितीचे वाईट वाटायचे. पण तिच्या बाबांकडूनही मदत होईल असे तिचे बाबाही कोणी श्रीमंत माणूस नव्हते. तिचे बाबाही अर्णवच्या बाबांसोबत पोस्टातच नोकरी करायचे. ओवी आणि अर्णव दोघेही एकेकटे असल्यामुळे त्यांच्या पालकांना त्यांचे उच्च शिक्षणतरी पूर्ण करता आले होते. अर्णवचे बाबा पोस्टात नोकरी करायचे त्याकाळातच अचानक त्यांचा खूप मोठा एक्सीडेंट झाला होता. मग नोकरीचा राजीनामा देऊन सध्या ते बसले होते.त्त्यांना जास्त पेन्शनही मिळत नव्हती. त्यातच अर्णवच्या आईचे आजारपण सुरू झाले. एक्सीडेंट पासून बाबांना जास्त कामे होत नसत. अर्णव आईला आणि बाबांना सगळ्या कामांमध्ये मदत करायचा आणि त्यानंतर कंपनीतील नोकरीही अगदी चोख बजावायचा. त्यामुळेच त्याला हुशार असूनही कित्येक वेळा आई-वडिलांच्या काळजीमुळे परदेशात होणारे प्रमोशन त्याला टाळावे लागले होते. हे सर्व ओवीला माहीत होते.

स्नॅक्स ऑर्डर तर केला होता पण ओवीच्या घशाखालून घास उतरत नव्हता कारण नात्यातला गोडवा कुठेतरी हरवला होता अर्णवच्या चेहऱ्यावरून तिची नजर हटत नव्हती आणि अर्णव मात्र अजूनही शून्यात नजर लावून बसला होता.
"तुला माहितीय अर्णव ? माझी आई नेहमी म्हणते मनामध्ये विचारांचा गुंता झाला की , बोलून मन मोकळं करावं माणसाने आणि मी तर आता तुझी होणारी अर्धांगिनी आहे. लग्नासारख्या पवित्र रेशमी बंधनात आपण बांधले जाणार आहोत." ओवी हट्टाने म्हणाली.

"योग्य वेळ आल्यावर नक्की सांगेन. तोपर्यंत धीर धरशील थोडा." सोहम रागाने का असेना काहीतरी बोलला यातच ओवीला समाधान वाटत होते. दोघांनीही कसा बसा स्नॅक्स संपवला.
वेटरलाही या दोन्ही प्रेमीयुगलांचे काहीतरी बिनसले आहे असे जाणवले असावे बहुतेक. म्हणूनच की काय ? तो ही पाण्याची बॉटल ठेवत ठेवत ओवी आणि अर्णव कडे पहात "आँख है भरी भरी और तुम मुस्कराने की बात करते हो…." हे गाणे गुणगुणत गेला.

आता तर ओवीचे डोळे डबडबले होते. \"तिच्या मनात अर्णवच्या बाबतीत जी शंकेची पाल चुकचुकत होती ती खरी आहे की काय ? अर्णवला काय सांगायचे असेल मला ?\" या नाना प्रकारच्या प्रश्नांनी तिला भांबावून सोडले होते.
इतका वेळ मनसोक्तम गप्पा मारणारी ओवी आता मात्र विचारांच्या गर्दीत स्वतःला हरवून बसली होती या गर्दीतून बाहेर आणायला ती ज्याचा आधार शोधत होती तो अर्णव केव्हाच हॉटेलच्या बाहेर पडला होता.
\"आता काही झालं तरी मी अर्णवला स्वतःहून बोलणार नाही. किती वेळा मस्का लावायचा त्याला? ऑफिसमधलं टेन्शन ही तो माझ्याशी शेअर करू शकतोच ना ? पण नाही , आज अगदीच परक्यासारखा वागलाय तो माझ्याशी. त्याने असं का केलं असेल ? नाही माहित त्याच्या मनात काय चालू आहे ते ? आज आई-बाबा , काका काकू सगळ्यांच्या लक्षात होतं . गेल्यावर्षी याच दिवशी त्यांने मला प्रपोज केलं होतं आणि ज्याने प्रपोज केलं तोच विसरला. एका वर्षात तो इतका बदलला. आज आवर्जून का बोलावले असेल मी त्याला या हॉटेलमध्ये हे ही नाही विचारले साधे त्याने.\" ओवी आपल्याच विचारात चालत येत होती.

तितक्यात हॉटेलच्या पायरीवरून तिचा पाय घसरला. लगबगीने अर्णव ने तिला सावरले आणि तिला सांभाळत तो म्हणाला, "हे काय ओवी ,लक्ष कुठे तुझं? पडली असतीस ना आता तू."

"आधी स्वतःच मारायचे आणि मग लागले का म्हणून विचारायचे ?" ओवी हिरमुसून म्हणाली.
"अच्छा ! म्हणजे माझ्यामुळेच पडत होतीस तू असे म्हणायचे आहे का तुला ? " अर्णव म्हणाला.
तितक्यात "ऑटो" म्हणत ओवीने ऑटो थांबवला. दोघेही ऑटोमध्ये बसून घरी जायला निघाले.

काय असेल अर्णवमधे अचानक झालेल्या बदलामागचे कारण ?
अर्णवला लक्षात असतील का यादिवशीच्या मागच्या वर्षीच्या आठवणी ?

पाहूया पुढील भागात क्रमशः
सौ.प्राजक्ता पाटील

🎭 Series Post

View all