Sep 23, 2023
प्रेम

#बंध रेशमी नात्याचे. भाग -९

Read Later
#बंध रेशमी नात्याचे. भाग -९
भाग-९

"हो मीच. ओळखलस ना ? मला वाटलं विसरला असशील. त्यादिवशी तू जो माझा अपमान केलास ना त्याची शिक्षा तर तुला मिळायलाच हवी होती ना ? तुझ्यासाठी केलं होतं मी ते सगळं नियोजन आणि तू काय केलंस? त्या सगळ्यावर पाणी फिरवलंस पण यापुढे माझ्यावर हसलेल्या तुला आणि त्या ओवीला आयुष्यभर रडायला नाही लावलं तर नावाची रिया नाही हे लक्षात ठेव."

"काय म्हणायचे काय तुला ? म्हणजे मी इथे आलोय हे सगळं तू घडवून आणलंस म्हणून." साशंक नजरेने अर्णव म्हणाला.

"मग इंजीनियरिंगच्या एका विषयात नापास झालेल्या तुला किती गरज होती नोकरीची ? तुला दिली असती का कोणी नोकरी ? पण मी माझ्या बाबांना सांगून तुला तिथे नोकरी लावली. तुला मी केलेली मदत आवडणार नाही म्हणून तुला तेही कळू दिले नाही. पण व्हॅलेंटाईन डेच्या दिवशी मी फाईव्ह स्टार हॉटेलमध्ये तुझ्यासाठी पार्टी ठेवली होती. तुझा होकार मिळाल्यावर मी तुला तू किती मोठ्या बिजनेसमनचा जावई होणार आहेस हे सांगणार होते पण तू मी दिलेला गुलाब पायदळी तुडवलास आणि काय म्हणाली होती ती ओवी ?" प्रेम मागून मिळत नसतं," आता तिला बघच म्हणावं मी काय करते ते ? आणि त्यासाठी पुन्हा मी मुद्दाम तुला तू माझ्या बाबांच्या इथेच गुलाम बनून नोकरी करतोयस हे सांगायचं टाळलं कारण मला तू हवा होतास ज्याच्यासाठी मी काहीही करू शकते." रिया रागाने लालबुंद होऊन बोलत होती.

"ओवी, (अर्णवच्या तोंडात त्याच्या ओवीचे नाव अलगद आले होते.) सॉरी रिया! अगं हा वेडेपणा करू नकोस. माझं ओवीसोबत लग्न झालय. तुला माझ्यापेक्षाही खूप श्रीमंत आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे तुझ्यावर भरभरून प्रेम करणारा नवरा मिळेल. ऐक माझं हा वेडेपणा सोड!" अर्णव रियाच्या खांद्यावरती हात ठेवत म्हणाला.

"तो माझ्यावर प्रेम करेल रे, पण माझं काय ? माझं फक्त तुझ्यावर प्रेम आहे. त्याचं काय ?"

अर्णवचा खांद्यावरील हात हातात घेऊन रिया पुढे म्हणाली, "उद्या याच हाताने तू माझ्या गळ्यात मंगळसूत्र घालणार आहेस.

"काय ? "अर्णवने आपला हात रागाने मागे खेचला.

"हो अरे, तू कॉन्ट्रॅक्ट पेपर वाचला नाहीस का ? तू इथे माझ्या परवानगीने आलास आणि इथून जातानाही तुला माझीच परमिशन घ्यायची आहे हे लक्षात ठेव. आता गाडीत बसलास तर बरं होईल कारण तू माझ्याशी लग्न करणार आहेस या कॉन्ट्रॅक्ट पेपरवर साइन केली हे बाबा अगदी शून्य मिनिटात ओवीला पाठवू शकतात पण तू जर माझ्यासोबत वर्षभर इथे माझा नवरा बनवून राहिलास तर मात्र आपल्या नात्याविषयी ओवीला काहीही माहिती होणार नाही." रिया म्हणाली.

"वर्षभर मी तुझा नवरा बनून राहीलो तरी, माझ्या मनात कायम ओवी असेल. कोणत्याही प्रकारचे सुख तुला माझ्याकडून मिळणार नाही. मग काय उपयोग आहे अशा लग्नाचा ? नीट विचार कर. तू तुझ्या हाताने तुझं आयुष्य वाया घालवू नकोस." अर्णव रियाला प्रेमाने समजावत होता.

रिया म्हणाली," तुला सांगितले ना मी, त्या ओवीला तुझ्या प्रेमासाठी तडफडताना पाहायचे आहे मला. जे मी आजवर भोगले तेच सर्व तिलाही भोगावे लागेल. त्यातच मला आनंद वाटतो."

"तुला खरं सांगू रिया ? कॉलेजमध्ये असल्यापासून तुझ्या या स्वार्थी विचारांमुळेच मी तुझ्यापासून लांब राहत होतो आणि ओवीच्या दुसऱ्यांच्या मनाचा विचार करण्याच्या वृत्तीमुळेच मी तिच्या नकळत प्रेमात पडत गेलो." अर्णव ओवीचे भरभरून कौतुक करत होता..

"तुझं ओवी पुराण संपलं असेल तर गाडीत बस," म्हणत रियाने फ्रंट साईडचा गाडीचा दरवाजा उघडला. नाईलाजाने अर्णव गाडीत बसला. रियाने आपली कंबर हलकीच बेंड करत जोरात गाडीचा दरवाजा तिच्या स्टाईलने बंद केला.

अर्णव आणि रिया घरी पोहोचले, रियाने गेटपासूनच हॉर्न द्यायला सुरुवात केली. अर्णवला आपल्या आयुष्यात नेमके काय घडतेय आणि त्या देवाच्याही मनात नेमके काय आहे ? हेच कळत नव्हते. तितक्यात आरतीचे ताट घेऊन कोणीतरी दरवाजासमोर उभे असलेले अर्णवला दिसले. अर्णवला अगदी खेचतच रिया दरवाजाजवळ घेऊन आली.

"आई ओळखलस ? हाच तुझ्या रियाचा अर्णव, ज्याची कित्येक वर्षे ही रिया मनापासून वाट पाहत होती." रिया डोळ्यातील ओघळणारे आनंदाश्रू पुसत म्हणाली.

"खूप सुंदर आहे माझा जावई. अगदी लक्ष्मीनारायणाचा जोडा दिसतोय तुम्हा दोघांचा. कोणाचीही नजर नको लागायला." म्हणून आईने रियाला आणि अर्णवलाही काळा तीट लावला. रियाच्या आई औक्षण करताना सतत अर्णवचा चेहरा न्याहाळत होत्या पण अर्णव खुश दिसत नव्हता हे त्यांच्या अनुभवी नजरेने ओळखले होते.

अर्णवला फ्रेश व्हायला सांगून रियाच्या आईने सर्वंटला गरमागरम नाश्ता आणि चहा  बनवायला सांगितला. सर्वजण डायनिंग टेबलवर अर्णवची वाट पाहत होते. अर्णवणे ओवीला कॉल केला होता आणि अर्धा तास तो तिच्याशीच फोनवर बोलत होता. रिया रागाने खोलीत आली. अर्णवने पटकन फोन कट केला.


रिया म्हणाली, " मला माहितीय तू, त्या ओवीशीच बोलत असणार. लक्षात ठेव. तू तिच्याशी दिवसातून फक्त पंधरा मिनिट बोलू शकतोस."

"हो आता तुझा गुलाम बनून आलोय म्हटल्यावर, तुझ्या आज्ञेनुसारच वागावं लागेल मला." अर्णव खोलीच्या बाहेर गेला.

" अरे अर्णव, ये ना , ये ना. आम्ही केव्हापासून तुझीच वाट बघतोय. नाश्ता तयार आहे. " रियाची आई म्हणाली.

नाश्ता करतानाही अर्णव उदास दिसत होता. 'प्रवासाने दमला 'असेल कदाचित.' रियाची आई मनात विचार करत होती.

"तुला माहिती आहे ना अर्णव ? रिया आमची एकुलती एक मुलगी आहे. तिने सगळे आयुष्य अगदी आनंदाने जगावे यासाठी आयुष्यभर आम्ही प्रयत्न केले आणि तू तिच्या आयुष्यात आलास आणि या प्रयत्नांना यश मिळाले असेच वाटतेय कारण तू लग्नाला नाही म्हणालास तर रियाने जीव देण्याची धमकी तिच्या बाबांना दिली होती. तू लग्नाला हो म्हणालास हे ऐकल्यावर माझ्या जीवात जीव आला. आमच्यानंतर तुम्हा दोघांनाच आयुष्यभर एकत्र राहायचे आहे. घेशील ना माझ्या रियाची काळजी ? देशील ना तिला साथ ?" निर्मळ मनाच्या रियाच्या आईनी जे सांगितले त्यानंतर अर्णवला बॉसच्या वागण्यामागचे खरे कारण समजले.

इच्छा नसतानाही अर्णव ने होकारार्थी मान हलवली. कसाबसा नाष्टा उरकून अर्णव खोलीत गेला. रिया ही त्याच्या पाठोपाठ खोलीत गेली.

"अर्णव तुला पाहायचं आहे आपल्या लग्नाचा हॉल कसा आहे ते ? रियाने अर्णवला लग्नाचा हॉल दाखवण्यासाठी लॅपटॉप उघडला.

"इनफ रिया ! तू मला शरीराने इथे घेऊन आली असली तरी माझे मन तू तुझ्याकडे नाही वळवू शकणार." लॅपटॉप बंद करून अर्णव खोलीबाहेर गेला.

'अर्णव तुला मी शरीर आणि मनानेही माझ्याकडे वळवून दाखवतेच की नाही ते बघ.' रिया मनात विचार करत आत्मविश्वासाने म्हणाली.

रात्रभर अर्णवच्या डोळ्याला डोळा डोळा लागत नव्हता; पहाटे कुठे त्याने डोळे मिटले होते. सतत त्याच्या डोळ्यासमोर ओवीचा निरागस आणि प्रेमळ चेहरा येत होता.

'आपण ओवीला फसवले. ओवी आपल्याला माफ करेल का ?'

हाच विचार त्याच्या मनात घोळत होता. असंख्य विचाराच्या गर्दीतून स्वतःला बाहेर काढणे त्याला असह्य झाले होते. सकाळी कुणीतरी दरवाजा ठोठावला. अर्णव खडबडून जागा झाला. प्रथम तो ओवीला आपल्या आजूबाजूला शोधत होता. वस्तुस्थिती लक्षात आल्यावर त्याच्या डोळ्यात पाणी तरळले. साश्रू तो दरवाजा उघडायला गेला. समोर रिया उभी होती.

"गुड मॉर्निंग अर्णव ! हा घे. मी तुझ्यासाठी माझ्या स्वतःच्या हाताने बेड टी बनवून आणला आहे." रिया प्रेमाने बोलत होती. अर्णवने तिच्याकडे ढुंकूनही पाहिले नाही. तो सरळ बाथरूममध्ये निघून गेला. रिया तिथेच बसून होती. अर्णव फ्रेश होऊन बाहेर आला. रिया अर्णवला जाऊन बिलगली. अर्णवने तिला चक्क ढकलून दिले.

तो म्हणाला, "रिया, तू कितीही प्रयत्न केलास तरी तुला हवे ते मी तुला नाही देऊ शकणार. अजूनही वेळ गेलेली नाही. भानावर ये."

पण अर्णवचे बोलणे रियाच्या कानापर्यंत पोहोचलेच नाही. काही घडलेच नाही असे रिऍक्ट करत अर्णवसमोर पुन्हा तिने बेड टी पकडला. अर्णवने आपल्या बॅगमधले कपडे काढून घेतले आणि तो पुन्हा अंघोळीसाठी बाथरूम मध्ये गेला.

इथे आल्यावर अर्णवचे वागणे कसे असेल ? तो इथे आल्यावर कसा रिऍक्ट होईल ? याची रियाला पूर्ण कल्पना होती त्यामुळे तिने तिच्या मनाची पूर्ण तयारी केली होती. कारण तिने अर्णवसोबत सात वर्षे घालवली होती. अर्णव इतक्या सहजासहजी आपल्याला स्वीकारणार नाही हे तिला ठाऊक होते.

अर्णव खाली आला. रियाच्या आई देवासमोर आरती करत होत्या. त्यांनी अर्णवला आरती घ्यायला बोलावले.

"नाही काकू, मी नास्तिक आहे. माझा देवावर विश्वास नाही. आजवर संघर्षाशिवाय त्याने मला काहीच दिले नाही आणि मी त्याला कधी काही मागणारही नाही." अर्णव खिन्न होऊन बोलत होता.

" अरे संघर्ष सहन करण्याची धमक ज्यांच्यात असते अशाच लोकांना देव संघर्षाची झळ पोहचवतो. हा पण त्यांच्या संपर्कात येणाऱ्या व्यक्तींना मात्र तो नेहमी सुखात ठेवतो. मग आपल्या जवळच्या व्यक्तींच्या सुखासाठी तर काही मागशील की नाही देवाकडे ? आणि यापुढे तुझ्या आयुष्यात कधीच संघर्ष येणार नाही बघच तू." रियाच्या आई म्हणाल्या.

आपल्या आवडत्या व्यक्तीचे नाव ऐकताच ओवीचा चेहरा अर्णवच्या डोळ्यासमोर आला. स्मितहास्य करत आपल्या बायकोच्या सुखासाठी अर्णव देवासमोर हात जोडून उभा राहिला. फ्रेश होऊन आलेली रिया नास्तिक असलेल्या अर्णवकडे आश्चर्याने पाहत होती. अर्णवमध्ये पहिला सकारात्मक बदल झाला म्हणून रिया देवाचे मनापासून आभार मानत होती.

अर्णवला बॉसने रात्रीच ऑफिसचे सगळे काम समजावून सांगितले होते. अर्णवला स्वतःची गाडी आणि ड्रायव्हरही होता. त्यामुळे अर्णव नाश्ता करून ऑफिसला निघून गेला.

रिया आईला म्हणाली, "तुला माहितीय आज मी खूप आनंदी आहे. नास्तिक असलेला माझा होणारा नवरा अर्णव चक्क आज देवासमोर हात जोडून उभा होता. "

"हो कारण मीच त्याला म्हणाले, तुझ्या आवडत्या व्यक्तीला तुला सुखात पाहायचे असेल तर देवासमोर हात जोड आणि त्याची प्रिय व्यक्ती त्याची होणारी बायकोच असेल ना ? म्हणूनच त्याने हात जोडले असे मला वाटते. खूप प्रेम करतो ग तो तुझ्यावर." आई म्हणाली.

रियाचा चेहरा पूर्णपणे उतरला होता. तिला अर्णवने कोणासाठी हात जोडले ? हे बरोबर समजले होते. पण तरीही "हो आई, खूप प्रेम आहे त्याचे माझ्यावर." असे म्हणून रिया ऑफिसला निघून गेली.

अर्णव आणि रियाचे लग्न होईल का ? ओवी आणि अर्णवच्या आयुष्यात दुरावा तर येणार नाही ना ? पाहूया पुढील भागात क्रमशः

सौ. प्राजक्ता पाटील.

कथा कशी वाटतेय ते कमेंटमध्ये नक्की सांगा….


ईरा वाचनाचा आनंद घ्या आता app मधून, आजच download करा. Download App Now
ईराच्या कथांचे कुठलेही भाग मिस करू नका, आजच जॉईन करा ईरा वाचनालय. व्हाट्सएप: व्हाट्सएप: