बंध प्रेमाचा भाग १

One Lovestory
बंध प्रेमाचा भाग १

“कोपरगाव बस किती वाजता आहे?” आदेशने कंट्रोलरला विचारले.

रजिस्टर मध्ये असलेलं डोकं वर करून आदेशकडे बघून कंट्रोलर म्हणाला,
“पंधरा मिनिटांत लागेल. बसचं टायर पंक्चर झाल्याने थोडा वेळ लागू शकेल.”

तिथेच बाजूला असलेला मुलगा, त्याच्या कपड्यांवरून तो शाळकरी असेल असं दिसत होतं, तो म्हणाला,
“इथं मी केव्हापासून बस केव्हा लागेल हे विचारतोय, तर मला उत्तर दिलं नाही. सूट बूट घातलेला माणूस दिसला तर लगेच सांगितलं. मी सवलतीत प्रवास करत असेल तरी महामंडळाला पैसे देतो म्हटलं.”

त्याने जाताना आदेशकडे एक तिरपा कटाक्ष टाकला.

“हल्लीच्या मुलांना वळणं राहिली नाहीयेत.” कंट्रोलर शेजारी एक कंडक्टर होता, तो म्हणाला.

यावर आदेश मिश्किल हसून म्हणाला,
“भोसले मामा, तो जे बोलला त्यात त्याला वळण नाही असं होत नाही. सकाळपासून उठून गर्दीत बसमध्ये चढून, जागा मिळाली तर ठीक नाहीतर उभं राहून प्रवास करायचा, मग धावतपळत शाळेत जायचं, तेथून भुकेलेला होऊन स्टँडवर येऊन बसची वाट बघायची, बस वेळेवर का येत नाही हे विचारल्यावर उत्तर मिळालं नाही म्हणून त्याची ती चिडचिड होती. पहिल्याच शब्दात कंट्रोलरने उत्तर दिलं असत तर त्याने ही बडबड केली नसती. असो, मी शाळेत जायचो तेव्हाही हेच होतं आणि आताही तेच आहे.”

कंट्रोलर व भोसले मामा त्याचं बोलणं मन लावून ऐकत होते.

“तुम्हाला माझं नाव कसं माहीत?” भोसले मामांना प्रश्न पडला होता.

“भोसले मामा, मी पोहेगावचा आदेश कांडेकर. मी शाळेत जायचो तेव्हा तुम्ही साडेतीनच्या बसला असायचे.” आदेशने चेहऱ्यावर स्माईल ठेऊन उत्तर दिले.

“अरे हो, तेच म्हटलं, तुला कुठेतरी बघितल्यासारखं वाटत होतं. आता कुठे असतोस? काय करतोस?” भोसले मामांनी आपुलकीने विचारपूस केली.

“मी शिक्षणासाठी दुसऱ्या देशात गेलो होतो. आता काही दिवसांपूर्वी पुण्यात आलो आहे. कंपनीचं काम सुरू असल्याने घरी जायलाच मिळाल नव्हतं. आता तीन-चार दिवसांची सुट्टी आहे तर घरी चाललोय.” आदेशने सांगितले.

अजून थोड्याफार गप्पा मारून भोसले मामा त्यांच्या कामाला गेले आणि आदेश एका बाकड्यावर जाऊन बसला. त्याच्या पुढे फिकट पिवळ्या रंगाची साडी नेसलेली बाई येऊन उभी राहिली व ती म्हणाली,
“हाय आदेश, ओळखलं का?”

आदेशने तिच्याकडे बघून मान हलवून नकार दिला.

“हं बरोबर आहे, आता तू मोठा साहेब झालास, तर आम्हाला गरीबाला कसा काय ओळखशील.”

आदेश प्रश्नार्थक चेहऱ्याने तिच्याकडे बघत म्हणाला,
“सॉरी, पण खरंच मी तुम्हाला ओळखलं नाही.”

“मी शिवानी चौधरी, आपण एकाच शाळेत शिकत होतो.” शिवानीने तिची ओळख करून दिली.

“अरे हो, आता आठवलं. तुझं लग्न झालं?” आदेश.

“गळ्यात मंगळसूत्र फॅशन म्हणून घालण्याची पद्धत अजून आली नाहीये. जोक्स अ पार्ट सहा महिन्यांपूर्वी माझं लग्न झालं.” शिवानी बोलत असतानाच बस आल्याने दोघेही बसच्या दिशेने गेले.

गर्दीतून वाट काढत आदेश बसमध्ये चढला. एक रिकामं सीट बघून तो बसला, त्याने शिवानी साठी जागा पकडली होती. शिवानी त्याच्या शेजारी येऊन बसल्यावर म्हणाली,
“शाळेत असताना कधी जागा पकडली नाहीस. आत्ता बर पकडली.”

यावर आदेश हसून म्हणाल्या,
“गेले ते दिवस, गेल्या त्या आठवणी.”

“हो ना. तेव्हा आपण जे वागायचो त्याचा विचार केला तर आता हसायला येतं. आपण खरच किती बालिश होतो.” शिवानी म्हणाली.

“मी शिक्षणामुळे बाहेरच राहिलो, त्यामुळे माझा पुन्हा त्या मित्रांशी फारसा काही संबंध आलाच नाही. तुझ्या संपर्कात कोण कोण आहे?” आदेशने विचारले.

“तुला ती हर्षाली आठवते का? माझ्यासोबत नेहमी असायची बघ.” शिवानी.

आपल्या स्मरणशक्तीवर जोर देत आदेश म्हणाला,
“ही तीच का, जिच्याकडे गुलाबी रंगाची कंपासपेटी होती. ती कोणत्याच मुलाशी बोलायची नाही. बघायला गेलं तर आमच्याच गल्लीत रहायची पण साधी एखादी स्माईल सुद्धा तिने दिली नव्हती.”

“हो बरोबर तीच. काही दिवसांपूर्वी ती भेटली होती. बाकी तू ज्यांना ओळखत असशील अश्या कोणाच्याच संपर्कात नाहीये मी.” शिवानीने सांगितले.

कंडक्टर आल्यावर दोघांनी आपापले तिकीट काढले.

“हर्षाली कुठे असते आता?” आदेशने विचारले.

“ती पुण्यात असते.” शिवानीने उत्तर दिले.

आपलं गाव येईपर्यंत आदेश व शिवानी मध्ये इकडच्या तिकडच्या गप्पा झाल्या. एकमेकांचे नंबर घेतले. घरी आदेशचे जंगी स्वागत झाले.

आदेश रात्री आईसोबत गप्पा मारत बसलेला होता.

“आदू बाळा, आयुष्याचं काही खरं राहिलं नाहीये. कधी काय घडेल, काही सांगता येत नाही.” आई उदास होती.

“आई, तू नेमकं कशाबद्दल बोलत आहे?” आदेशला आईच्या बोलण्याचा अर्थ लागत नव्हता.

“तू शाळेत जात असताना आपल्या गल्लीत हर्षाली नावाची मुलगी रहायची बघ. तिचे आई-वडील तिच्या लहानपणी वारल्याने ती तिच्या मामाकडे रहायची. अगदी गरीब स्वभावाची सुसंस्कारी मुलगी होती बघ.”

“हो, तिचं काय झालं?” आदेशला हर्षाली बद्दल जाणून घेण्याची उत्सुकता लागली होती.

“हर्षालीची बारावी झाली, तिने कॉलेजला ऍडमिशन घेतले होते. ती दुसऱ्या वर्षात असताना तिचं लग्न झालं. लग्नाला दोन वर्ष होऊनही तिला मूलबाळ होत नसल्याने तिच्या सासरचे सगळेजण त्यांच्या कुलदेवीला गेले होते, येताना वाटेत त्यांच्या गाडीला अपघात झाला. त्यात तिचा नवरा जागेवर गेला. हर्षालीलाही खूप लागलं होतं, त्यात तिच्या गर्भाशयाला मार लागल्याने ती कधीही आई होऊ शकणार नाही, असे डॉक्टरांनी सांगितले होते.

नवरा गेलाय म्हटल्यावर तिच्या सासरच्यांनी काही महिन्यांनी तिला माहेरी पाठवून दिले. त्यावेळी तिच्या मामाची बदली संगमनेरला झाल्याने ते तिकडे राहत होते. हर्षालीला आयुष्यभर सांभाळावे लागेल म्हणून तिच्या मामाचा मुलगा सतत घरात भांडत होता. यावर तिच्या मामा-मामीने उपाय शोधला, तिला पुण्यातील एका महिलाश्रमात दाखल केले.

दोन-तीन दिवसांपूर्वी तिची मामी मला भेटली होती, तिच्याकडून हर्षालीची करुणकथा मला समजली. बिचाऱ्या पोरीला जवळचं, मायेचं असं कोणीच उरलं नाही.” आई हळहळ व्यक्त करत होती.

त्यावेळी आदेश त्या विषयावर काहीच बोलला नव्हता. रात्री झोपण्यासाठी तो अंथरुणावर पडला, त्याने डोळे मिटले तेव्हा दोन वेण्या घातलेली, पायात काळ्या रंगाचे बूट, कपाळावर काळा गंध, एका हातात चॉकलेटी बेल्टचे घड्याळ आणि पाठीवर दप्तर घेतलेली हर्षाली त्याच्या डोळ्यासमोर आली.

‘हर्षाली, तुझ्यासोबत काय झालं ग हे. माझं पहिलं प्रेम होतीस ग तू, पण तुझ्याशी बोलण्याची हिंमतच झाली नाही. एकदातरी तुझ्याशी बोलायला मिळावे असं वाटायचं, पण कधीच ते शक्य झालं नाही. एकदातरी तुला माझ्या मनातल्या भावना सांगाव्या असं वाटत होतं, पण एक दिवशी एका मुलाने तुला प्रेमपत्र दिले होते, तर सगळ्यांसमोर तू त्याला कानाखाली मारली होतीस, ते बघून तर मी तुझ्यावर मनातल्या मनात खूप प्रेम केलं, पण ते ओठांपर्यंत येऊच दिलं नाही.

शिक्षणाच्या निमित्ताने मी बाहेर गेलो. मोठी झाल्यावर तू कशी दिसत असशील याचा अनेकदा विचार केला. मनात तुझं एक चित्रही तयार केलं होतं, तू तशीच दिसत असशील का?

दुपारी जेव्हा शिवानी कडून तुझं नाव ऐकलं तेव्हाच तिच्याकडून तुझा फोन नंबर घ्यावा वाटला, पण हिंमत झाली नाही ग. आता आईच्या तोंडून तू कुठल्या त्रासातून गेली असशील. आताही तुझी मनस्थिती कशी असेल.

अजूनही डोळे मिटले की फक्त तुझा निरागस चेहरा डोळ्यासमोर उभा राहतो.’

हर्षालीच्या काळजीने त्याच्या डोळ्यातून अश्रू वाहू लागले होते.

क्रमशः

©®Dr Supriya Dighe

🎭 Series Post

View all