" (मराठी कथा : marathi story) " बंध नात्यांचे

This story of mine is based on relations.

      माझी ही कथा कौटुंबिक विषयावरील कथालेखन स्पर्धेसाठी आहे.            

                 वेळ जसजशी जवळ येत होती तसतशी हृदयाची धडधड वाढु लागली. जीवापलीकडे जपलेल्या नात्यांचा, अनुभवाचा कसं पाहणारा हा प्रसंग होता. अमेयची खोली सजविण्यात आली होती. तशा सुचना डॉ. बापट ह्यांनी आपल्या स्टाफला दिल्या होत्या. एकदा खोलीभर नजर टाकून डॉ. आपल्या केबिनमध्ये परत आले. आजपर्यन्त अनेक गुंतागुंतीचे ऑपरेशन्स यशस्वीपणे करणारे डॉ. बापटांचे हात आज मात्र थरथरत होते. कारणही तसेच होते. त्यांना आपल्या मुलाचे ऑपेरेशन करायचे होते. नकळतच मागील नऊ वर्षांचा काळ त्यांच्या डोळ्यासमोर आला.

                    नऊ  वर्षांपुर्वी पेडिऍट्रिक आय सर्जन असणारे डॉ. सचिन बापट ह्यांचा विवाह पेशाने स्त्रीरोगतज्ज्ञ असणाऱ्या डॉ. राधा कारखानीस ह्यांच्याशी झाला. आपापले व्यवसाय सांभाळून दोघांचाही गोडीगुलाबीचा संसार सुरु होता. लग्नानंतर दीड दोन वर्षांनी डॉ. राधा गरोदर असल्याची चाहूल लागली. आनंदीआनंद झाला. दिवसभरल्यानंतर त्यांनी एका गोंडस मुलाला जन्म दिला. बाराव्या दिवशी थाटामाटात बारसं करून बाळाचे नाव ' अमेय ' ठेवण्यात आले. सगळे आनंदात सुरु होते. अमेय दिवसागणिक वाढत होता. त्याचे संगोपन आणि आपला व्यवसाय ह्याची सुंदर सांगड डॉ. राधाने घातली होती. पण नियतीच्या मनात वेगळेच होते. एक दिवस डॉ. राधाला आपल्या उजव्या स्तनात गाठ जाणवली. डॉक्टर असल्याने तिला शंका आली. लगेच सगळ्या चाचण्या करण्यात आल्या. त्यात ब्रेस्ट कॅन्सरचे निदान झाले. लास्ट स्टेजचा कॅन्सर होता. अख्ख्या कुटुंबावर आभाळ कोसळले होते. मोठमोठ्या डॉक्टर्सना दाखवून डॉ. राधावर उपचार सुरु करण्यात आले.व्यवसाय, घर, अमेय आणि राधा ह्या सगळ्यांमध्ये डॉ. सचिन ह्यांची फारच दमछाक होत होती. तरी अमेयची जबाबदारी त्यांची आई आणि सासु सासरे ह्यांनी घेतली होती. सहा सात महिने कॅन्सरशी झुंज देऊन आणि अवघ्या एक सव्वा वर्षाच्या अमेयला मागे सोडून डॉ. राधाने ह्या जगाचा निरोप घेतला.

                       डॉ. राधाच्या ह्या अश्या अवेळी जाण्याने डॉ. सचिन ह्यांच्या आयुष्यात एक रितेपण निर्माण झाले. आपल्या भावना बोलुन व्यक्त करता येत नसल्या तरी आईची कमी अमेयलाही जाणवत होती. तो सारखा रडरड, चिडचिड करायचा. दोन्ही आजी आणि आजोबा त्याला सांभाळत होते. अखेर अमेयकडे पाहुन डॉक्टरांनी स्वतःला सावरले. हॉस्पिटल आणि घर ह्यात गुंतवून घेतले. अमेयला आईची कमी  जाणवु नये ह्याचा ते कसोशीने प्रयत्न करायचे. सोबतीला आई आणि सासु सासरे होतेच. त्यांचा दुसऱ्या लग्नाचा प्रस्ताव देखील डॉक्टरांनी फेटाळून लावला. अमेय शाळेत जायला लागला होता  . डॉ. सचिन बापट ह्यांचे नाव आता प्रतिथयश डॉक्टरांमध्ये घेतले जात होते. डॉ. बापट ऑपेरशन करणार म्हणजे ते शंभर टक्के यशस्वी होणारच असे जणू समीकरणच झाले होते. त्यांच्या आणि अमेयच्या आयुष्याची गाडी आता रुळावर आली होती.

                     बघताबघता अमेय सात वर्षांचा झाला. आजकाल अचानक अमेय ' बाबा मला कधी कधी नीट दिसत नाही, डोळ्यांची आग होते, डोळे दुखतात, पाणी येतं ' अश्या तक्रारी करायला लागला. हळुहळु ह्या तक्रारींचे प्रमाण वाढत होते. शाळेतील मॅडम पण म्हणाल्या अमेयला फळ्यावरचं नीट दिसत नाही. अनुभवी डॉ. सचिनच्या मनात शंकेची पाल चुकचुकली. त्यांनी ताबडतोब आवश्यक त्या सर्व चाचण्या करून घेतल्या. शेवटी त्यांची भीती खरी ठरली. नियतीने पुन्हा एकदा आपला डाव साधला होता. अमेयला रेटिनल कॅन्सर हा लाखात काही मुलांमध्ये आढळणारा कॅन्सर झाला होता आणि तोही दोन्ही डोळ्यांमध्ये. डॉ. पुन्हा एकदा हादरले. त्यांनी मोठातल्या मोठ्या डॉक्टर्सना आणि आपल्या सिनिअर्सला अमेयचे केस पेपर्स दाखवले. लवकरात लवकर ऑपेरेशन करणे हा एकचं मार्ग आहे हाच सगळ्या डॉक्टर्स चा निष्कर्ष निघाला. पण ऑपेरेशननंतरही त्याला दिसेल कि नाही ह्याची काही शाश्वती नव्हती. कदाचित कायमचे अंध्यत्वपण येऊ शकेल. डॉ. सचिन पुरते कोलमोडून गेले. त्यांना त्यांच्या राधाची प्रकर्षाने आठवण येत होती. त्यांची कमी जाणवत होती. शेवटी बऱ्याच डॉक्टर्सशी चर्चा करून डॉक्टरांचे व्यावसायिक मित्र तसेच सिनियर डॉ. जोसेफ ह्यांनी ऑपेरेशन करायचे असे ठरले. डॉ. सचिन यांनी आपले काही सहकारी आणि समुपदेशकाच्या मदतीने अमेयची ऑपेरेशनसाठी मानसिक तयारी करवून घेतली. पण हे सारे करताना त्यांचे हृदय तीळतीळ तुटत होते. आपल्याच मुलाला तू आंधळापण होऊ शकतो हे सांगण्यासारखे दुसरे दुर्दैव एका बापासाठी नाही. मन घट्ट करून ते ह्या सगळ्याला सामोरे जात होते. लाडक्या नातवाची अशी अवस्था पाहुन आजी आजोबा देखील खचून गेले होते.

                         ऑपेरेशनचा दिवस ठरला. पण आदल्या दिवशीपासुनच पावसाला सुरवात झाली. जोर वाढतच होता. ज्यादिवशी ऑपेरेशन होतं त्यादिवशीतर सकाळपासुनच धुवाधार पाऊस होता. सगळीकडे पाणी भरलं होते. वाहने देखील अडकून पडली. त्यामुळे वाहतुकही जागच्या जागी थांबली होती. पावसाचा जोर पाहता आपण हॉस्पिटलमध्ये पोहचु शकणार नाही हे डॉ. जोसेफ ह्यांच्या लक्षात येताच त्यांनी तशी सुचना डॉ. सचिन ह्यांना दिली. आता ऑपेरेशनचं काय असा यक्ष प्रश्न उभा राहिला .तुम्हीच ऑपेरेशन करा असं डॉ. जोसेफ ह्यांनी सुचवलं. पण आपल्याच मुलाचं ऑपेरेशन आपण करायचं या विचाराने डॉ. सचिन ह्यांच्यातील वडील भांबावून गेले. शेवटी खूप विचार आणि हिम्मत करून आपणच ऑपेरेशन करायचं हे त्यांनी ठरवलं. कारण पाऊस ओसरून डॉ. जोसेफ येईपर्यंतचा वेळही त्यांना आता दवडायचा नव्हता. त्यांनी लगेच आपल्या स्टाफला अमेयची खोली सजावण्याबाबत सुचना दिल्या जेणेकरून त्याच्या भोवतालचं वातावरण प्रसन्न राहील.

                          इतक्यात केबिनच्या दारावर टकटक झाली आणि डॉ. सचिन आपल्या विचारांमधून बाहेर आले. हेड नर्स सांगायला आली होती की अमेयला ओ. टी. मध्ये नेण्यात आले आहे. डॉक्टरांच्या हृदयाची धडधड वाढली. नेहमीप्रमाणे त्यांनी देवाचे नामस्मरण केले आणि केबिन च्या बाहेर पडून ते ओ.टी. मध्ये आले. एकवार अमेयकडे पहिले. आपल्यातील वडील कुठेतरी वरचढ होत आहेत की काय असे त्यांना जाणवले. त्यांनी डोळे मिटले. आपण आपल्या मुलावर नाहीतर अमेयनावाच्या एका रुग्णाचे ऑपेरेशन करणार आहोत असं मनाशी पक्कं करून त्यांनी ऑपेरेशनला सुरवात केली. काही तासांच्या अथक प्रयत्नानंतर ऑपेरेशन यशस्वी झाले. पण अमेयची दृष्टी कायम आहे की नाही हे मात्र त्याच्या डोळ्यावरील पट्ट्या काढल्यानंतरच स्पष्ट होणार होते.

                             आज अमेयच्या डोळ्यांवरील पट्ट्या काढण्याचा दिवस असतो. डॉ. सचिन अमेयच्या समोर उभे असतात. बाजुलाच आजी आजोबा पण हजर असतात. हळुहळु अमेयच्या डोळ्यांवरील पट्ट्या काढायला सुरवात होते. डॉ. सचिन प्रचंड कासावीस होतात.सांगितल्याप्रमाणे अमेय डोळे उघडतो आणि समोर उभ्या असलेल्या आपल्या आनंदाश्रु  बाबांना पाहुन " बाबा " अशी हाक मारतो. ते ऐकताच डॉक्टरांच्या डोळ्यातून आनंदाश्रु वाहायला लागतात. ते धावत जाऊन अमेयला मिठीत घेतात. मुलगा आणि वडील ह्यांचे हे मिलन तिथे उपस्थित प्रत्येकजण डोळेभरून पाहत असतो.

         

                                                                                                                                                सौ. ऋचिता बोधनकर दवंडे

.