बंध हे प्रेमाचे... ❤️ भाग 39

तुम्ही काळजी करू नका, कसलाच धोका होणार नाही, निशा नव्हती ते चार पाच दिवस आम्हाला अजिबात करमल नाही, सारखं वाटत होतं की आपण खूप चुकीचं वागतो आहोत, आणि आम्ही सोनल ची पण माफी मागणार आहोत


बंध हे प्रेमाचे... ❤️ भाग 39

कधीही न तुटणारे.....

©️®️शिल्पा सुतार
..............

आक्का वकिलांचा ऑफिसमध्ये गेल्या.." काय झालं पुढे तुम्ही काही कळवल नाही? लागला का त्या वरिष्ठ वकिलांना फोन?, दोन-तीन दिवस झाले आपण या गोष्टी बोलून, आज घरी नोटीसही आली कोर्टाची, अशी महत्त्वाची कामे आधी करायला हवी तुम्ही, आपल्या कडे वेळ कमी आहे ",

वकिलांनी फोन लावला, बऱ्याच वेळी ते बोलत होते फोनवर, त्यांनी फोनवर संतोषची केस समोरच्या वकिलांना सांगितली, त्यांच्या चेहऱ्यावर समाधान दिसत होत, त्यांनी फोन ठेवला,

आक्का वाटच बघत होत्या,.." काय झालं? काय म्हटले ते?, आहे का काही आशा ",..

"ते बोलले केस काय एवढी विशेष नाही, एक तर सोनल तुमच्या नात्यातली आहे, दुसरं म्हणजे संतोषने सोनलला काहीही केलेलं नाही, संतोष चे मित्र साक्षीदार आहेत, ते सांगू शकतात की संतोष एक चांगला मुलगा आहे, त्याने सोनल वर काहीही जबरदस्ती केलेली नाही, सोनल स्वतःच्या मनाने संतोष सोबत आली होती, तिथे ही ती खूप छान वागत होती संतोष सोबत प्रेमाने आणि नंतर घरच्यांना घाबरून तिने अपहरणाची केस दाखल केली",.

खरं तर ही गोष्ट आक्कांच्या त्यांच्या मनाला पटत नव्हती, कारण त्यांना माहिती होतं की सोनल अतिशय चांगली मुलगी आहे आणि हुशारही आहे ती खूप, आज तर संतोष सांगत होता की सोनल पहिली आली, त्या मुलीवर असे आरोप लावायचे कि ती स्वतःच्या मनाने संतोष सोबत आली होती, तिला खोट ठरवायचं, आक्कांना आवडत नव्हतं, पण काय करणार? जर संतोषची सुखरूप सुटका करायची असेल तर थोडेफार डावपेच खेळावेच लागतील, आपण गेलो होतो भाऊकडे त्याला सांगायला केस मागे घे, पण त्यांनी ऐकलं नाही, होउदे मग आता बदनामी, आपण काहीच करू शकत नाही,

वकिलांनी कोर्टाच्या नोटिस ला उत्तर दिलं,.. "त्यांच्या बाजूचे कोण वकील आहेत? त्यांचा नंबर मिळेल का आपल्याला? त्यांच्याशी बोललं तर, आपण सांगू त्यांना कि कोर्टाची केस मागे घेणार नाही तर तुमचीच बदनामी आहे",

" हो सांगून बघा, त्यांचे कोण वकील आहेत ते मला सांगता नाही येणार, त्यांचा नंबर संतोषला माहिती असेल कारण त्यादिवशी संतोषने त्यांना बघितलं होतं",.. आक्का

" तुम्ही विचारा ना संतोषला फोन करून ",.." वकील

आक्कांनी संतोषला फोन लावला, त्या साईडच्या वकिलांची माहिती मिळवून घेतली, त्यांचा फोन नंबर ही मिळाला

"ठीक आहे मी करतो त्यांना कॉन्टॅक्ट, लागलं तर पैसे द्यावे लागतील",.. वकील

"काही हरकत नाही, किती खर्च झाला तरी माझी तयारी आहे, फक्त संतोष आणि त्याच्या मित्रांची सुटका व्हायला हवी",.. आक्का

"हो तोच प्रयत्न आहे आपला ",.. वकील

आक्का समाधानाने घरी यायला निघाल्या, जाता जाता त्या बाजारात गेल्या, संतोष चे बाबा दुकानात बसलेले होते,

"आपला संतोष पास झाला बर का शेवटच्या वर्षात, आता तोही ग्रॅज्युएट आहे आणि मेन म्हणजे त्याचे सगळे मित्र पास झाले",.. आक्का

"चला छान झालं",.. बाबाही खुशीत होते

"कुठे गेली होतीस तू?",.. बाबा

"मी वकिलांना भेटायला गेली होती",.. आक्का

"काय म्हटले वकील",.. बाबा

"ते बोलले की काही एवढी विशेष केस नाही, संतोष चे मित्र आणि संतोष काही गुंड नाहीत, होते थोडी चूक मुलांकडून, बघू ते काहीतरी आयडिया काढत आहेत",.. आक्का

" ठीक आहे, होते चूक मुलांकडून म्हणजे काय? , अश्या चुकी ने एखाद्याचा आयुष्य खराब होवू शकत एवढा विचार करत नाहीत हे मूल, ते काय लहान आहेत का ",... बाबा

" अहो मला तुमच्याशी थोडं बोलायचं होतं",.. आक्का

" बोल ना",... बाबा

" मला माहिती आहे की तुम्हाला संतोष चा खुप राग येतो , चूक झाली त्याची, नाही समजल त्याला, पण थोडे दिवस त्याला थोडा वेळ द्या, तुम्हाला नसेल बोलायचं त्याच्याशी तर नका बोलू, पण त्याला उलट सुलट बोलू नका, तो खूप टेन्शन मध्ये आहे, स्वतःला सुधारण्याचा प्रयत्न करतो आहे तो, जर आपण त्याला थोडा जरी सपोर्ट नाही केला तर तो परत हातचा वाया जाईल, घर सोडून जाईल हो तो, त्याला थोड्या विश्वासाची गरज आहे, आता मला ही राग आला आहे संतोष चा, यापुढे मी त्याला पैसे वगैरे देणार नाही पण गोड बोलता येतं आपल्याला, त्याच्याशी चांगलं बोललं पाहिजे आपण , अजून त्याने काहीही जग बघितलं नाही, आपल्या जवळ आहे तो तर चांगला आहे, आपल्या जवळच राहू देऊ, त्याला थोड्या सपोर्ट ची गरज आहे",.. आक्का

बाबा विचार करत होते, त्यांनी बघितल संतोष साठी आक्का खूप प्रयत्न करता आहेत, आणि सध्या खूप टेंशन ही घेता आहेत, अगदी थकून जाता आहेत आक्का, ठीक आहे ऐकुन बघु तीच ..." बरोबर बोलते आहेस तू, मी यापुढे लक्षात ठेवेन, संतोषला घालून पाडून बोलणार नाही, तू म्हणशील तर त्याला मदतही करेन, तू फक्त फक्त तू कुठल्याही गोष्टीचा टेन्शन घेऊ नको",..

आक्का आता खुश होत्या, त्यांना काहीही करून घरच वातावरण पूर्वी सारख सामान्य व्हायला हव होत,

" काय म्हटले वकील",.. बाबा

आक्कांनी ते वकील काय म्हटले ते सगळ सांगितल, करू या का तस? कोर्ट केस म्हटली की थोडे आरोप तर होणारच, जरा मन घट्ट कराव लागेल

" हो करू या संतोष ने लवकरात लवकर यातून बाहेर पडायला पाहिजे, मला आता कंटाळा आला आहे त्याच त्याच गोष्टीचा, सोनल च्या घरचे केस मागे घेत नाहीत ना" ,... बाबा

" नाही ना मी सांगून सांगून थकले",.. आक्का

"पण नंतर संतोष अजून त्रास देणार नाही ना आपल्याला, परत पाहिल्या सारखा नाही ना होणार तो",... बाबा

"नाही देणार त्रास संतोष मी शब्द देते, बदलला आहे हो तो ",.. आक्का
......

राहुल ने वैभव दादाला फोन केला,.. "सोनल पहिली आली सरप्राईज द्यायच का तिला?, काहीतरी छान करू पार्टी वगैरे ",.

"हो चालेल तू रमेश दादा वाहिनीला घेवून ये, मी पुढच बघतो पार्टी च",.. वैभव

घरी आई, बाबा, राहुल, वैभव दादा, निशा वहिनी, रमेश दादा, वहिनी सगळे हजर होते, सोनलला याची कल्पना नव्हती, सोनल घरी आली, घरी केक, फुल, समोसे, पेढे सगळ आणल होत,

अभिनंदन सोनल ....... सगळे खूप खुश होते

आई बाबानी पुढे होवुन सोनल ला फुल दिले, सोनल त्यांच्या पाया पडली

"खूप शिकून मोठी हो",.. आई बाबा

सगळ्यांच्या डोळ्यात कौतुक होत, सोनल ने पेढे वाटले, वैभव दादा भारावून गेला होता,

"खूप हुशार आहे सोनल लगेच पुढे शिक्षणासाठी अ‍ॅडमिशन घे ",.. रमेश दादा

" हो दादा",.. सोनल

राहूल ला सोनल ने पेढे दिले,... "तुझ खूप अभिनंदन सोनल, मला तुझा खूप अभिमान आहे, आज इतक छान वाटत ना" ,

सोनल खूप खुशीत होती

" आता सगळे इथे आहेच तर जेवून जा आज आपण मस्त बाहेरुन जेवण मागवू ",.. वैभव

" आई बाबा आहेत, घरी मला जाव लागेल, स्वयंपाक नाही झाला घरी ",.. वहिनी

" वहिनी त्यांच जेवण बाहेरुन मागवू, मी देवून येईल घरी पार्सल, तुम्ही काळजी करू नका, आज एन्जॉय करू आपण",.. राहुल

" हो चालेल ",... वहिनी

दुसर्‍या दिवशी सकाळी राहुलचा ऑफिस चा पहिला दिवस होता,..." चला आम्ही निघतो आता",

सोनल बाहेर पर्यंत गेली राहुल शी बोलायला, रमेश दादा वहिनी अजून आत आई बाबांशी बोलत होते, खरेदी कधी करायची ते ठरवत होते

" तुझ खूप अभिनंदन, सोनल मला आज खूप आनंद झाला आहे, तू आहेस हुशार ",.. राहुल

" मी लगेच अ‍ॅडमिशन घेणार आहे राहुल",.. सोनल आनंदात होती

"हो घे आता आपण मागे बघायच नाही खूप प्रगती करायची, बर्‍याच दिवसांनी अशी छान बातमी मिळाली आहे आपल्याला ",.. राहुल

"हो ना तुझा रिजल्ट कधी आहे",.. सोनल

" पुढच्या आठवड्यात असेल बहुतेक",.. राहुल

" तेव्हा मला पार्टी हवी ह",.. "सोनल

राहुल ने खिश्यातून गिफ्ट काढल सोनल ला दिल,

"काय आहे यात",.. सोनल

"तूच बघ",.. राहुल

सोनल ने बॉक्स उघडला आता अतिशय सुंदर अशी अंगठी होती,.." बापरे राहुल ही अंगठी महाग वाटते आहे",

" तुझ्या साठी घेतली होती साखरपुड्याला, आता छान चान्स आहे तर तुला गिफ्ट दिली",.. राहुल

सोनल ने हात पुढे केला

काय..

"घाल मग माझ्या हातात अंगठी",.. सोनल

राहुल ने पुढे होवुन सोनल ला अंगठी घातली, तिचा हात हातात घेऊन त्यावर ओठ टेकवले, सोनल ने पटकन हात मागे घेतला, राहुल छान हसत होता, काय झालं सोनल, सोनल लाजली होती, सोनल.... सोनल थांब, सोनल थांबली, राहुल तिच्या जवळ आला,

" काय झालं?, लाजली का तू? ",.. राहुल

"काही नाही , कस असेल ना आपल पुढच आयुष्य" ,.. सोनल

" असच असेल गोड छान, पण मला एक गोष्ट आवडली नाही",.. राहुल

काय...

" आता आठ दिवस राहिले आपल्या लग्नाला, अस लाजून कस होणार" ,.... राहुल

सोनल ने राहुल ला मारल, काय रे....

"उद्या साठी बेस्ट लक किती वाजता आहे ऑफिस",.. सोनल

"साडे आठ वाजता, मी ऑफिस ला पोहोचलो की करतो फोन तुला",.. राहुल

रमेश दादा वहिनी घरचे बाकीचे बाहेर आले, सगळ्यांनी निरोप घेतला,

सोनल घरात आली, तिने निशा वाहिनीला अंगठी दाखवली,

"अरे वा सोनल मजा आहे, काय म्हटला राहुल? , खूप कौतुक सुरू आहे एका मुलीच ",.. निशा

"वहिनी काय ग ",.. सोनल लाजली होती
.....

सकाळी सोनल घरात आवरत होती, तेवढ्यात राहुलचा फोन आला,.. "आजचा पहिला दिवस आहे आता कामाला सुरुवातच करतो आहे म्हणून तुला फोन केला",.

"ऑल द बेस्ट तुला छान काम कर, अभ्यासाचे पुस्तक आणले आहेत ना सोबत ",.. सोनल

"हो टाइम टेबल प्रमाणे आणल आहे जे वाचायच ते ",.. राहुल
......

सकाळी लवकर आई बाबा रेडी झाले

"कुठे निघाले आई बाबा? ",.. सोनल

" आम्ही निशा च्या घरी जाऊन येतो, बघतो तरी ते लोक काय म्हणत आहेत, उद्यापासून आपल्याला खरेदी सुरू करायचे आहे, परत वेळ मिळणार नाही ",.. बाबा

वैभव दादा निशा वहिनी ऑफिसला जायला निघाले होते ते थांबले

"आई-बाबा मला तुमच्याशी थोडं बोलायचं आहे",.. निशा

" बोल ना बेटा",.. बाबा

" तुम्हाला तर माहिती आहे माझे आई-बाबा ऑलरेडी माझ्यावर खूप चिडलेले आहेत, जर तुमचा तिकडे काही अपमान झाला तर मला खूप भीती वाटते आहे ",.. निशा

" काही होणार नाही बेटा, तू काळजी करू नकोस, एकदा आम्हाला त्यांच्याशी बोलायलाच पाहिजे आणि झाला तर झाला अपमान त्याने आपल्या नात्यावर काहीच परिणाम होणार नाही, तू अजिबात काळजी करू नकोस",.. बाबा

" हो निशा अग ते जर काही बोलले तर आम्ही तुझ्यावर का रागवू, आम्ही मनाची तयारी करून जातो आहोत तिथे ",.. आई

निशा आता निश्चिंत होती

आई बाबा निशाच्या घरी पोहचले, निशा च्या आई-बाबांना आश्चर्य वाटल, त्यांनी त्यांचे व्यवस्थित स्वागत केलं, बसायला सांगितलं, निशा ची आई पाणी घेऊन आली

" कशी आहे आमची निशा? ",..

" कशी असणार? तुमच्या लोकांची खुप आठवण काढते आहे निशा, तुम्ही राग सोडा, पोरीच्या खुशीत सामील व्हा",.. आई

निशा चे बाबा पण शांत बसून सगळं ऐकत होते,

"आजपासून एका आठवड्याने राहुल सोनल... निशा वैभव यांच लग्न आहे आणि तुम्हाला त्या लग्नाला यायचं आहे",..बाबा

निशाच्या आईच्या डोळ्यात पाणी होतं, निशाचे वडीलही खूप गप्प होते

" आमचं खूप चुकलं, आम्ही उगाच ताणून धरल्या सगळ्या गोष्टी, तुम्हाला एक रिक्वेस्ट करू का? अजून एक आठवडा आहे लग्नाला, निशाला इकडे पाठवा आणि तुम्ही पण वैभव निशा च्या लग्नाला इकडे या, आम्ही करून देतो लग्न आमच्या मुलीच",.. बाबा

सोनलचे आई बाई एकमेकांकडे बघत होते,

"तुम्ही काळजी करू नका, कसलाच धोका होणार नाही, निशा नव्हती ते चार पाच दिवस आम्हाला अजिबात करमल नाही, सारखं वाटत होतं की आपण खूप चुकीचं वागतो आहोत, आणि आम्ही सोनल ची पण माफी मागणार आहोत",.. बाबा

सोनलची आई बाबांना खूप आनंद झाला होता,... "आम्ही हे सगळं सांगतो वैभव आणि निशा ला शेवटी ते दोघं डिसिजन घेणारे आहेत, निशा तयार असेल तर आज संध्याकाळी ती येईल घरी तुमच्याकडे ",..

" हे असं झालं तर खूपच चांगलं होईल, आम्ही उगीच हट्टाला पेटलो होतो, आता आमचे डोळे उघडले आहे, हे वैभवच स्थळ निशा साठी योग्य आहे ",.. बाबा

व्यवस्थित पाहुणचार झाला, बऱ्याच गप्पा मारल्या त्या चौघांनी, लग्नासाठी काय काय खरेदी करावी लागेल याची चर्चा केली,

"तुमच्या किती लोकांचा मानपान करावा लागेल",..

" आमच्याकडून कोणी नाही, अशी कुठलीही गोष्ट आम्हाला नको आहे, फक्त तुम्ही सगळे राग सोडा आणि कार्यात आनंदाने व्यवस्थित सहभागी व्हावे एवढीच आमची इच्छा आहे",.. बाबा

" आमच्या बाजूने आता तुम्ही काहीच काळजी करू नका, आमचा राग गेला आहे ",.. निशा चे बाबा

🎭 Series Post

View all