५. चापडा - बांबू पिट व्हायपर

संपूर्ण जगामध्ये फक्त भारतात सापडणारा हा साप, भारतातील बड्या चार विषारी सापांनंतर विषारी म्हणून गणला जातो.

चापडा - बांबू पिट व्हायपर



        मित्रांनो, आधीच्या लेखांमध्ये आपण भारतातील चार विषारी सर्पांबद्दल थोडक्यात माहिती पहिली. ज्यांच्या दंशामुळे मनुष्याचाच नाही तर कोणत्याही प्राण्याचा मृत्यू ओढावू शकतो. त्यामुळे या प्रमुख सापांना ओळखणं आणि त्यांच्यापासून आपण सावध राहणं, हे अतिशय महत्वाचं आहे.

        मुख्य चार विषारी सापांव्यतिरिक्त संपूर्ण जगामध्ये फक्त भारतात आढळणारा "चापडा" जातीचा साप, हा विषारी म्हणून गणला जातो. विशेष म्हणजे फक्त पूर्व आणि पश्चिम घाट परिसरामध्ये हा मुख्यत्वेकरून आढळतो. घोणस, फुरसे यांचा जातभाई असलेला "चापडा", हिरवा घोणस म्हणूनही ओळखला जातो. इंग्रजीमध्ये याला "बांबू पिट व्हायपर" असे म्हणतात. चापडा हा साप व्हायपर या सापांच्या प्रकारात मोडतो. व्हायपर शब्दाचा अर्थच घातकी, दगाबाज असा आहे. हे साप तसे रागीट, चिडखोर तसेच अत्यंत आक्रमक आणि चपळ असतात. आपल्या इथे मनुष्यवस्तीजवळ सापडणाऱ्या चार सापांपैकी दोन्ही व्हायपर ( रसेल्स व्हायपर - घोणस, सॉ स्केलड व्हायपर - फुरसे ) या प्रकारातलेच आहे.


        भारतामध्ये अनेक ठिकाणी आढळणारा हा साप त्या त्या भागानुसार विविध रंगात आणि आकारात पाहायला मिळतो. पोपटी, हिरवा, शेवाळी, हिरवट पिवळा रंगामध्ये याची संपूर्ण पाठ असते तर पोटाकडचा भाग पिवळ्या रंगाचा असतो. पाठीवर घोणशीसारखे काळे गोलाकार साखळी प्रमाणे असतात. डोके अगदी घोणस, फुरसे यांच्या सारखे बाणाच्या टोकासारखे त्रिकोणी आणि चपटे असते. लांबी एक ते तीन फुटांपर्यंत असते. हा साप घोणस प्रमाणेच पोटातच अंडी उबवून थेट पिल्लांना जन्म देतो. चापड्याचं विशेष म्हणजे याला अजगाराप्रमाणे डोळे आणि नाकाच्या मध्ये उष्माग्राही खळगे असतात. त्यातील ग्रंथींमुळे उष्णरक्तीय भक्ष्य टिपण्यास त्याला मदत होते. तापमानातील ०.००१ डिग्री सेल्सिअस एवढ्या फरकाने होणारा बदल जाणण्याची संवेदनशीलता चापड्यामध्ये आहे.


        पश्चिम भारतामध्ये शक्यतो कोल्हापूर, महाबळेश्वर, माथेरान, कोयना, अंबोली, कर्नाटकातील जंगले आणि डोंगराळ भागात लहान झुडपांच्या फांद्यांवर, वेलींवर रहातात. बांबूच्या वनात हा साप हमखास पहायला मिळतो. महाराष्ट्रापासून ते कन्याकुमारीपर्यंत चापड्या साप आढळून येतो. भारतात चापड्याचे दोन प्रकार आढळतात. तपकिरी शरीरावर हलक्या व गडद रंगाच्या खुणा असणारा "मलबारी चापड्या" तर राखाडी किंवा फिक्कट तपकिरी शरीरावर गडद पण छोटे तपकिरी पट्टे असणारा "नाकाड्या चापड्या" या दोन चापड्याच्या जाती आहेत. जाती वेगळ्या असल्या तरी त्यांचे स्वभाव आणि शारीरिक गुणविशेष सारखेच आहेत.

        चापड्याचे विष घोणस आणि फुरसे यांच्यासारखेच हिमोटॉक्सिक प्रकारचे असल्यामुळे दंशानंतर सारखीच लक्षणे दिसू लागतात. पण चापड्याचे विष घोणस / फुरसे यांच्या एवढे जहाल नसल्यामुळे मृत्यू सहसा झालेला ऐकिवात नाही. भारतामध्ये चापडा साप चावून मृत्यू होण्याचे प्रमाण अतिशय कमी, नगण्य आहे. तरीही चापडा साप चावल्यानंतर योग्य ती खबरदारी आणि लवकरात लवकर वैद्यकीय उपचार घेणे कधीही फायदेशीरच.

- पुढच्या भागात साप - समज, गैरसमज, दंश झाल्यानंतर घ्यावयाची काळजी याबद्दल सविस्तर माहिती.
- धन्यवाद

🎭 Series Post

View all