बालपण पुन्हा अनुभवले

लघुकथा


बालपणचा काळ आमुचा
मौजमजेचा आनंदाचा

अहो, काय करता? नाच वगैरे काय हे? शोभते का या वयात आपल्याला?

"अगं, आनंदाला वयाच बंधन नसतं."

एका नातेवाईकांच्या लग्नाला रागिणी आणि तिचा नवरा विनोद गेले होते. सगळ्यांच्या आग्रहाखातर तो डान्स करायला गेला. सोबत रागिणीलाही नेले. पण, या वयात तिला तिचीच लाज वाट होती. सोबत आनंदही वाटत होता.
रागिणीचा डान्स संपताच सगळ्यांनी टाळ्या वाजवल्या. फार कौतुक केले गेले.
तिच्या मनात विचार आले. अरे,आपण लहानपणी केलेल्या सगळ्या हौस, मौज जणु विसरूनच गेलो होतो. वयाच भान, कोण काय म्हणेल याचे भान हरपून ती आज नाचली होती. वाढत्या वयाचं पांघरून ओढून इतके वर्षे आपण जगत होतो.
परिस्थिती कशीही असो पण बालपणी जगलेले ते थोडे थोडके क्षण न विसरता येण्यासारखे आहे. आजी आजोबांच्या कुशीत शिरून आकाशात चमकणाऱ्या चांदण्यांचा अनुभव घेत गोष्टी ऐकत झोपी जाणे. एका चाॅकलेटला रुमालात ठेवून दाताने त्याचे चार ते पाच तुकडे करून मित्रांना देऊन खाण्यातला आनंद काही वेगळाच होता. गल्ली बोळात विटी दांडू , लघोरी, नदी का पहाड. आंधळी कोशिंबीर असे अनेक विविध खेळ खेळतांना अपूर्व आनंद मिळायचा. तो आजच्या मोबाईल मध्ये गुंतलेल्या मुलांना कधीच कळणार नाही. उन्हाळ्यात एका पाळण्यावर बसून कविता,पाढे म्हणतानांची मजा न्यारीच होती. एखाद्या पायरीवर बसून चालणारी रिक्षा असो किंवा झुकझुक गाडी थेट मामाच्या गावाला जायची. पत्ते असो किंवा नाव, गाव वस्तू, प्राणी आडनाव हा खेळ तर बुध्दीमत्तेला तर चालना देणारा असायचा. एक फुगा मिळला तरी गगन ठेंगणे व्हायचे.

पण, तेव्हा ना कोणती स्पर्धा होती ,ना ईर्षा. कोणीही जिंकलो तरी आनंद वाटायचा. मान ,अपमान तर आजुबाजुला फिरकायचा सुध्दा नाही. कोणालाही उलट बोलण्याचा प्रश्नच नव्हता.

संस्कार, संस्कृती आणि परंपरा यांचे बाळकडू तेव्हाच पाजले गेले होते. नात्यांचा गंध दरवळल्यामुळे तुझे माझे ही भावनाच मनाला शिवत नव्हती. त्यामुळे आज काही गोष्टी मनाला पटत नसल्या तरीही डोळे झाकून घ्यावे लागते.

बालपण पुन्हा मिळणार नाही
म्हणून भरभरून जगा
जेवढे आकाश कवेत घेऊन जगता येईल
ते आनंदाने जगा


गेलेले क्षण परत मिळणार नाही
म्हणून जपून ठेवा स्मृती बालपणीच्या
नसे चिंता आणि हाव कशाची तेव्हा
म्हणून आठवणी कायम आहे सोबतीच्या

आज घरोघरी असलेल्या रागिणीची ही कथा वाटते.


©® अश्विनी सुहास मिश्रीकोटकर