Login

बल्लू राजा

A Story About Ballu Raja
कथेचे नाव-दीपावली-उत्सव नात्यांचा
शीर्षक-बल्लू राजा

बल्लू राजा दोन दिवसांपासून आजारी होता. 65 वर्षीय बल्लू राजाची प्रकृती अचानक बिघडली. दिवाळीच्या दोन दिवस आधीपासून तो फारच अस्वस्थ वाटत होता. बेघर निवारा केंद्रातील जे लोक की तेही बेघरच होते. ते त्याची काळजी घेत होते.
जवळच सरकारी दवाखान्यात त्याला भरती केल्या गेले.
या बेघर निवारा केंद्रात प्रत्येक जण आपली आपली व्यथा घेऊन जगत होता. प्रत्येक जण समदुखी असल्यामुळे त्यांचा आपसात जिव्हाळा निर्माण झाला होता. बल्लू राजा तर सर्वांचा लाडका! कारण तो होता ही तसाच मनमिळावू!
तो नेहमी राजासारखा ऐटीत बसायचा. ऐटीत त्याचं बोलणं! प्रत्येकाच्या मनाच्या, शरीराच्या दुखण्यावर फुंकर घालण्यात तो तरबेज होता. म्हणून तेथील सर्वजण त्याला बल्लू राजा म्हणून हाक मारायचे.
तसं प्रत्येकाचं मन संवेदनशील असतं. जवळच्या नात्यातल्या माणसांच्या संवेदनाच जर निष्ठुर झाल्या तर मनाला खूपच वेदना होतात. आणि तो जर घरातून बेदखल झाला तर मग त्याची अवस्था काय होते हे सांगणे न लगे!

बल्लू च ही तसंच झालं. आर्थिक परिस्थिती कमकुवत असल्यामुळे मुलाला व सुनेला तो डोईजड झाला. घरातली रोजची कटकट सहन न झाल्यामुळे बल्लूच्या मनावर परिणाम होऊन विमनस्क अवस्थेत रस्त्यावर भटकायला लागला. कुणीतरी सुज्ञ व्यक्तीने त्याला या बेघर निवारा केंद्रात आणून सोडले.

बेघर निवारा केंद्रात असणाऱ्या व्यक्तींनी त्याला आधार तर दिलाच पण त्याचं दुःख ऐकून त्याचं मन हलकं केलं. कारण कोणीही व्यक्ती असो, त्याचा मनातल्या मनात भावनांचा कोंडमारा होणं बरं नसतं.
त्याने कुणाजवळही व्यक्त होणंमहत्वाचं असतं. तिथे राहणाऱ्या व्यक्ती त्याच्या भाऊ, मामा, काका, काकू, मावशी, आत्या बनल्या. त्यामुळे त्याची विमनस्क अवस्था कमी होऊन तो त्यांच्यात मिसळला. आणि इथेच सुरू झाला उत्सव नात्यांचा!!
प्रत्येक दिवाळीला तेथे काही समाजसेवी संस्थेतील लोक येऊन त्यांना फराळ कपडे प्रदान करून त्यांच्यासोबत दिवाळी साजरी करायचे.
बल्लू राजा सुद्धा आपल्या विनोदी स्वभावाने सर्वांना हसवून वातावरणातल्या फराळाच्या गोडव्यासोबत सर्वांची मन हलकी करायचा.
बरं कां काका! बरं का मावशी! बरं का काकू! त्याचं असं झालं..... असं म्हणून सर्वांना तो हसवायचा.
दिवाळी सणाची तर या बेघर निवारा केंद्रात पर्वणी च असायची.

आज-काल बऱ्याच नागरिकांच्या संवेदना जागृत झालेल्या दिसून येतात. त्यामुळे अशा निवारा केंद्रात येऊन बरेच लोक दिवाळी साजरी करतात.
बल्लू आणि तेथील मंडळी अशा लोकांसोबत तात्पुरते का होईना काही तास नात्यांचा उत्सव साजरा करीत.
अशातच या दिवाळीला बल्लूची प्रकृती अचानक बिघडली. त्याच्यावर जीवापाड प्रेम करणाऱ्या तेथील सर्व मंडळींनी त्याची खूप काळजी घेतली. त्याच्या काकांनी तर दिवस-रात्र त्याच्याजवळ बसून त्याची सेवा केली.

ज्याप्रमाणे कधी कधी मोगऱ्याच्या फुलांच्या सुगंधा पेक्षाही बकुळ फुलांचा सुगंध मनाला भावतो. त्याप्रमाणे रक्ताच्या नात्यापेक्षाही इतर नात्याचा सुगंध च मनाला जास्त आल्हाददायी वाटतो.
बल्लूसाठी तिथल्या व्यवस्थापकाने सुद्धा खूप प्रयत्न केले.
पण शेवटी नियतीपुढे काही चालले नाही.......
या बेघर निवारा केंद्राला बल्लू राजाचं त्यांच्यातून कायमचं निघून जाणंतेथील प्रत्येकाच्या मनाला चटका लावून गेलं
आपला लाडका राजा गेला रे! असं म्हणून प्रत्येकाच्या डोळ्यातलं पाणी काही थांबत नव्हतं.
यावर्षीची दिवाळी त्यांनी कोणासोबतही साजरी केली नाही. प्रत्येकाच्या मना त या त्यांच्या राजाने आपल्या जाण्याने एक पोकळी निर्माण केली..... प्रत्येक जण दुखात होता....
असं हे नातं असतं......

कुणाला आपलंसं बनवायचं असेल,
तर मनाने बनवा!
फक्त मुखाने नाही!
कारण मुखाची नाती ही गरजेपुरती मर्यादित असतात...
आणि मनाची नाती ही
शेवटपर्यंत साथ देतात!!


म्हणूनच ही प्रार्थना!

हीच अमुचीप्रार्थना अन् हेच अमुचे मागणे!
माणसाने माणसाशी माणसासम वागणे!!


छाया राऊत