Feb 28, 2024
अष्टपैलू लेखक महासंग्राम

बलिदान (भाग-४ अंतिम)

Read Later
बलिदान (भाग-४ अंतिम)
बलिदान (भाग-४ अंतिम)भुवन बिरजुला आपला भूतकाळ सांगत होता.


"मित्रा, थोड्याफार फरकाने आपली कहाणी सारखीच आहे. संकटांची मालिका संपता संपत नाहीये. सगळे सोंग आणता येतात पण पैसा कुठून आणणार. माझा बापू मी लहान असतानाच देवाघरी गेला. माईच्या जीवावर आम्ही पाच भाऊ होतो, त्यात मीच मोठा. या दुष्काळानं कमी छळलं होतं का, त्यात भर या फिरंग्यांची… या फिरंग्याच्या धोरणामुळं शेतीवाडी, जनावरं, कामधंदे सगळंच गमावून बसलो. मग काय आता करा ह्यांची गुलामी…भुवन आपल्यासारखे सगळे सैनिक एकत्र आले तर आपण या फिरंग्यांना सहज हाणून पाडू शकतो." बिरजुच्या बोलण्यात चीड होती. अगदी उद्विग्न होऊन बिरजू आपली कहाणी सांगत होता. घरच्या लोकांच्या आठवणीनेने दोघांच्या डोळ्यांत पाणी जमा झालं होतं. तेवढ्यात एक फिरंगी ऑफिसर तिथं आला त्याने दोघांना दटावलं आणि दोघेजण परत सैन्याच्या तुकडीत गेले. ब्रिटिश ऑफिसर्सनी हिंदुस्थानी सैन्यात सैनिकांना एकमेकांसोबत बोलण्यावरही मज्जाव करायला सुरुवात केली होती.


"बस आता हे अत्याचार सहन करायचे नाहीत. ह्या फिरंग्यांच्या तावडीतून आपल्या मातीची, देशाची, आपल्या माणसांची सुटका करायलाच हवी. बिरजुसोबतही आजकाल काहीच बोलणं होत नाहीत." भुवन एका रात्री आपल्या पाडवात पडल्या पडल्या विचार करत होता. तेवढ्यात त्याला एक विचित्र आवाज आला.


"हा तर घुबडाच्या ओरडण्याचा आवाज आहे. काही अघटित तर होणार नाही ना." भुवन मनातल्या मनात स्वतःशीच पुटपुटला. घुबडाचा आवाज अजूनच तीव्रतेने येत होता. भुवन बाहेर आला.


"बिरजू… तू!" भुवननं आश्चर्यानं विचारलं. बिरजूने त्याला सोबत चालण्याचा इशारा केला. त्याच्यासोबत अजून दोन हिंदुस्थानी सैनिकही होते. चौघेही पाडावापासून दूर गेले.


"भुवन, ह्या फिरंग्यांविरुद्ध आपल्याला पावलं उचलायला हवीत आणि त्यासाठी आपण सगळ्यांना एकत्र यायला पाहिजे." बिरजू भुवनला म्हणाला.


"बरोबर बोललास मित्रा, आपल्याला सावधगिरीने हे काम करावं लागेल. इंग्रजांच्या गोटात राहून हे काम करणं सोपं नाहीये. कुणीतरी खबरी बनून सगळी माहिती काढली पाहिजे. आपल्या दोघांवर इंग्रज लगेच संशय घेतील.. म्हणून दुसऱ्याकुणी हे काम केलं तर…" भुवनने बिरजूसोबत आलेल्या दोन सैनिकांकडे बघून म्हणाला त्यापैकी एकजण इंग्रजांच्या सगळ्या खबरा भुवन आणि बिरजूला पुरवायला तयार झाला.


रात्री लपूनछपून भुवन, बिरजू आणि त्याचे काही सहकारी भेटत होते. इंग्रजांविरुद्ध लढण्यासाठी एकमेकांना प्रेरीत करत सैनिकांचा समूह वाढवत होते. एका रात्री भुवन, बिरजू आणि काही हिंदुस्थानी सैनिक भेटले होते. फिरंगी फौज आणि ऑफिसर्सप्रतीची चीड प्रत्येकाच्या बोलण्यातून दिसत होती. तेवढ्यात एक हिंदुस्थानी सैनिक तिथे धापा टाकत आला.


"का रे, काय झालं? एवढा का घबरला आहेस?" भुवनने त्याला विचारलं.


"आपल्याला ज्या नवीन रायफल दिल्या आहेत, त्याच्या गोळ्यांना काडतुसं लावलेली आहेत ना ती काडतुसं गाईच्या आणि डुकरांच्या मांसापासून तयार केलेले आहेत. बराकपूर छावणीत मंगल पांडे ह्यांनी याविरुद्ध आवाज उठवला, मंगल पांडे आणि ब्रिटिशांत चकमक झाली… फिरंग्यांनी मंगल पांडे यांना फाशीची शिक्षा दिली… आताच मी हे ऐकलं. ब्रिटिश सैनिकांत सगळेजण ह्याविषयी बोलत होते." तो सैनिक एक दमात बोलला. हे ऐकून भुवन आणि बिरजू रागाने लालबुंद झाले.


"अरे ही काडतुसं आपण तोंडानी तोडतो… गोमातेची आपण पूजा करतो. हिंदू धर्मात गाय पवित्र तर मुसलमानांना डुक्कर निषिद्ध… ह्या इंग्रजांनी तर आता मुद्दामहून आपला धर्म भ्रष्ट करायला सुरुवात केली. आता मात्र शांत बसायचं नाही…आता वेळ आलीये आपणही आवाज उठवायची…" भुवन म्हणाला.


"पण आपण लढणार कसे? इंग्रजांजवळ बंदूका आहेत आणि आपल्याजवळ काहीच नाही." एक हिंदुस्थानी सैनिक बोलला."मग काय झालं… असू दे बंदुका… लक्षात ठेवा मित्रांनो आपण ह्या बंदूका वापरणार नाही… इंग्रजांविरुद्ध लढण्यासाठी आपल्याजवळ प्रबळ इच्छाशक्ती आहे. अरे ह्या मशाली आहेत ना, आग लावून टाकू सगळीकडे! आपले हात आहेत, ह्या काठ्या आहेत... ह्या इंग्रजांची गुलामी करण्यापेक्षा आपल्या देशासाठी, आपल्या मातीसाठी आपल्या प्राणाची आहुती देणं यासारखी अभिमानाची गोष्ट दुसरी नाही. चला, त्या इंग्रजांना त्यांच्या योग्य ठिकाणी पोहोचवू या… मंगल पांडे ह्यांचं बलिदान आपण वाया जाऊ द्यायचं नाही. मंगल पांडे अमर रहे…" भुवनने मोठ्याने गर्जना केली. त्याच्या डोळ्यांत एक वेगळीच चमक होती आणि बाकी सैनिकांनी त्याला अगदी स्फूर्तीने साथ दिली. त्या आवाजाने इंग्रजी सैनिक, ऑफिसर तिथे आले.


हिंदुस्थानी सैनिक आणि इंग्रजांमध्ये चकमक सुरू झाली. भुवनने आणि बिरजूने बऱ्याच फिरंगी सैनिकांना यमसदनी पाठवलं. हिंदुस्थानी सैनिकांनी ब्रिटिशांच्या इमारती जाळायला सुरुवात केली. भुवन आणि बिरजू प्राणाची बाजी देऊन लढत होते पण इंग्रजांनी भुवन आणि बिरजूला पकडलं. ह्या दोघांना पकडल्यावर बाकी सैनिक घाबरून जातील अशी इंग्रजांची आशा फोल ठरली. सैनिकांचं बंड सुरुच होतं. इंग्रजांनी भुवन आणि बिरजूला सर्व हिंदुस्थानी सैनिकांसमोर फासावर लटकवायचं ठरवलं.


"हा हिंदुस्थान आपला आहे. ह्या फिरंग्यांना इथून पळवून लावायचं आहे. सैनिकांनो लढत राहा… मंगल पांडे यांचं बलिदान वाया जाऊ देऊ नका... " भुवन आणि बिरजू दोघांच्या गळ्यात फास होता तरी मरणाला न घाबरता त्यांनी सैनिकांच्या मनातलं स्वातंत्र्याचं स्फुल्लिंग कमी होऊ दिलं नाही. दोघेजण हसतच फासावर चढले. हिंदुस्थानी सैनिकांनी मीरतकडून दिल्लीकडे कूच केली. तो काळ होता १८५७चा. स्वातंत्र्याची ही ठिणगी हळूहळू वणवा होऊन पसरत गेली. इंग्रजांविरुद्ध लढताना भुवन आणि बिरजूसारखे कितीतरी सैनिक शहीद झाले. 


इतिहास म्हटलं की डोळ्यांसमोर उभा राहतो तो भारतीय स्वातंत्र्याचा इतिहास! आणि भारतीय स्वातंत्र्याचा इतिहास म्हटलं की आठवतो तो १८५७ चा राष्ट्रीय उठाव. १८५७ मध्ये स्वातंत्र्य समराचा हा वणवा देशभर पसरला होता. यामध्ये हिंदुस्थानी सैनिकांबरोबर सामान्य जनता, जहागीरदार, वतनदार सर्वजण या स्वातंत्र्य समरात सहभागी झाले होते. भारतीय स्वातंत्र्याच्या गौरवशाली इतिहासात कितीतरी स्वातंत्र्य सैनिकांची, क्रांतिवीरांची नावं सुवर्ण अक्षरात लिहिली गेली आहेत पण इतिहासात असेही काही स्वातंत्र्य सैनिक असतील ज्यांची इतिहासात नोंद शक्य झाली नसेल.


प्रस्तुत कथेतून अशाच स्वातंत्र्य सैनिकांची कथा मांडण्याचा प्रयत्न केला आहे. सदर कथेतील पात्र पूर्णपणे काल्पनिक आहेत. भारतीय स्वातंत्र्यासाठी लढणाऱ्या, आपल्या प्राणाची आहुती देणाऱ्या समस्त स्वातंत्र्य सैनिकांना माझी ही पहिली ऐतिहासिक कथा समर्पित….


जय हिंद!

© डॉ. किमया मुळावकर

ईरा वाचनाचा आनंद घ्या आता app मधून, आजच download करा. Download App Now
ईराच्या कथांचे कुठलेही भाग मिस करू नका, आजच जॉईन करा ईरा वाचनालय. व्हाट्सएप: व्हाट्सएप:
Circle Image

Dr Kimaya Mulawkar

Doctor

माझ्यातली "मी" शोधण्याचा प्रयत्न

//