बलिदान (भाग-३)

कथा स्वातंत्र्यासाठी लढलेल्या एका सैनिकाची
बलिदान (भाग-३)

दिवस सरत होते. आधीचं अवर्षण आणि मग दुष्काळ यांमुळे शेतकरी अगदीच हवालदिल झाले होते. जनावरांसाठी चारापाणी मिळणं अवघड झालं होतं. एक भाकरी खायची तिथं अर्धी, चतकोर भाकरी खाऊन भुवन आणि त्याचं कुटुंब कसंबसं जगत होतं. चाऱ्यापाण्याच्या अभावाने नंदलालजवळ असलेली एकमेव चन्द्री गायही दगावली होती. चन्द्री गायीच्या दुधावर मुलांचं कसंबसं पोषण होत होतं, आता तोही आधार गेला होता. गावही ओसाड वाटायला लागलं होतं. 


नंदलालजवळ असलेला शेतीचा तुकडा त्याने वर्षभरापूर्वी वतनदाराजवळ गहाण ठेवला होता. त्यामुळं तिथूनही आता काही पैशाची, धान्याची सोय होण्यासारखं नव्हतं. नंदलाल अगदी हतबल झाला होता. त्यातच ईस्ट इंडिया कंपनीच्या अधिकाऱ्यांनी जमिनीवरचा कर वाढवला. वतननदारांचे वतन जप्त केले. त्यांना मिळणारा सरकारी भत्ता बंद केला. या दरम्यान साम्राज्य विस्तारासाठी इंग्रजांनी जे काही युद्ध केले त्याची भरपाई त्यांनी जनतेकडून कर वसूल करून घेणं सुरू केली होती. त्यात सगळी जनता भरडल्या जात होती. नंदलाल आणि त्याच कुटुंब तरी यातून कसं सुटणार होतं.


"शेती नाही त्यामुळं शेतमाल नाही आणि शेतमाल नाही तर पैसा नाही. आजकाल या इंग्रजांनी आपल्या इकडं सुरू असलेले उद्योगधंदेसुद्धा बंद केलेत. कसं कमवायचं आणि कसं घरच्या लोकांचं पोट भरायचं? वतनदारांचे वतन गेले म्हणजे आपल्या जमिनीबाबतीत इंग्रजांची लुडबुड वाढणार. सगळंच कसं अवघड होत चाललंय." " गावाच्या चावडीवर बसून गावकरी बोलत होते. आज भुवन आपल्या बापूसोबत चावडीवर आला होता. इंग्रजांनी रयतेवर सुरू केलेला जुलूम ऐकून त्याचं रक्त सळसळत होतं. तेवढ्यात एक दवंडी पिटणारा तिथे आला. त्याच्या सोबत एका ब्रिटिश शिपाई देखील होता.


"ऐका, हो ऐका, ईस्ट इंडिया कंपनीत सैन्य भरती सुरू आहे. जे तरुण त्या सैन्यात जातील त्यांना दोन वेळचं जेवण आणि महिन्याला तनखा मिळत जाईल हो…" दवंडीवाला मोठ्याने आरोळी ठोकत पुढे निघून गेला. त्याच्यासोबत असणारा इंग्रज शिपाई सगळ्यांकडे बघून तुच्छ हसत होता. भुवनने रागाने हाताच्या मुठी आवळल्या आणि त्याला मारायला धावून जाऊ लागला. नंदलालने त्याला अडवलं. 


"आपलेच लोकं सैन्यात भरती करायचे आणि आपल्यावरच आक्रमणं करायची… ह्या इंग्रजांची ही खेळी लोकांच्या लक्षात कधी येईल?" चावडीवरचं एक अनुभवी व्यक्तिमत्त्व बोलून गेलं.


"तो एकटा इंग्रज शिपाई होता आणि आपण एवढे गावकरी… असंच त्याला ठेचून मोकळं झालो असतो." भुवन चिडून बोलला. त्याच्या बोलण्यावर मात्र कुणीही काहीच प्रतिक्रिया दिली नाही.


दिवस सरत होते. इंग्रजांचे जुलूम, दुष्काळ आणि त्यात वाढत्या कराच्या बोझ्याखाली हिंदुस्थानी जनता भरडत जात होती. अन्न धान्यासाठी मारामारी सुरू होती. देशातल्या घराघरातले तरुण केवळ तनखा मिळते म्हणून ईस्ट इंडिया कंपनीच्या सैन्यात भरती होत होते. भुवनला या सगळ्या गोष्टींची खूप चीड येत होती; पण त्याच काळात त्याच्या घरात एक अप्रिय घटना घडली. भुवनच्या लहान भावाचा उपासमारीमुळे मृत्यू झाला. भुवनही आता पेचप्रसंगात सापडला होता. एकीकडे परिवारातले सदस्य होते, त्यांचं आयुष्य होतं तर दुसरीकडे इंग्रजांची गुलामी करणं होतं. 


"देवा, इतका कसा रे निष्ठुर तू? सगळे रस्ते सोबतच कसे बंद केलेस पण काहीही झालं ना तरी मी त्या इंग्रजांची गुलामगिरी करणार नाही." भुवन मनाशीच बोलत होता. तेवढ्यात त्याच्या माईने त्याला जेवायला आवाज दिला. इच्छा नसूनही भुवन त्याच्या माईजवळ गेला. तिने शिजवलेले सगळं अन्न लेकरांच्या ताटात वाढलं. 


"माई, बापू तुमचं जेवण?" भुवनने विचारलं. दोघांनी दोन दोन घोट पाणी पिलं आणि एक ओला कपडा पोटाला गच्च आवळला.


"झालं आमचं जेवण… धान्य संपलं घरातलं. सावकाराजवळून मागून आणलेलही संपलं आता." भानू खिन्नपणे म्हणाली. भुवनच्या डोळ्यांत टचकन पाणी आलं.त्याच्या मनाची घालमेल वाढली होती. परिवारातल्या लोकांकडे बघून पुन्हा त्याला दोन वेळच्या भाकरीची भ्रांत सतावत होती. मघाची दवंडी त्याच्या कानात जणू घुमत होती. एकीकडे त्याला त्याचं उपाशी कुटुंब दिसत होतं आणि एकीकडे इंग्रजांची गुलामी करणं...

"मी सैन्यात दाखल झालो तर कमीतकमी घरच्या लोकांच्या पोटात दोन घास तरी पडत जातील." त्याने मनाशीच विचार केला आणि नाईलाजाने भुवन ईस्ट इंडिया कंपनीच्या सैन्यात भरती झाला. पण इंग्रजांबद्दल त्याच्या मनातली चीड अजून तशीच होती.

क्रमशः

© डॉ. किमया मुळावकर


🎭 Series Post

View all