Feb 28, 2024
अष्टपैलू लेखक महासंग्राम

बलिदान (भाग-२)

Read Later
बलिदान (भाग-२)
बलिदान (भाग-२)

गोऱ्या अधिकाऱ्याला बघून बिरजुने भुवनला तिथून दूर ओढत नेलं. बिरजू पाण्याच्या घोटासोबत ताटातले वाळलेले तुकडे अक्षरशः गिळत होता. भुवन मात्र भूतकाळात हरवून गेला होता.


झुंजुमुंजु झालं होतं. सूर्याची सोनेरी किरणं पृथ्वीवर अलगद आपली पावलं ठेवत होती. चुलीवरच्या खमंग भाजलेल्या भाकरीच्या वासाने भुवनची झोप उडाली. नुकतंच मिसुरडं फुटलेला, सोळा वर्षाचा भुवन बाहेरच्या अंगणातून उठून घरात आला. घर कसलं ते, छोटीशी झोपडीच, शेणा-मातीने सारवलेली. मीरतपासून काही कोस अंतरावर त्याचं गाव होतं. भुवनचे वडिल नंदलाल शेतकरी होते. भुवनची आई भानू, भुवनच्या पाठीवर दोन भाऊ आणि दोन बहिणी एवढा परिवार होता. नंदलालच्या छोट्याश्या शेतीच्या तुकड्यावर सगळ्या कुटुंबाचा उदरनिर्वाह चालत होता. नंदलाल सधन शेतकरी नव्हता पण परिवारातले सगळे खाऊन पिऊन सुखी होते. मात्र दोन वर्षापासून असलेल्या अवर्षणामुळे सर्वांचेच खायचे हाल होत होते. कितीतरी दिवसांनी आज घरात भाकरी बनली होती. त्याच्या सुवासानेच भुवनची झोप चवताळली होती.

"माई, आज भाकरी?" भानू चुलीवर भाकरी शेकत होती. टम्म फुगलेली भाकरी बघून भुवन थोडा हरखून गेला.

"हो, ये बैस. भूक लागली असेल ना." भानुने छोट्या ताटात तव्यावरची भाकरी वाढली. भुवनचे बहीण-भावंड त्याच्या आधीच भानुजवळ भाकरी खात बसले होते.

"पण माई, पैशाची सोय कुठून झाली?" भाकरीचा एक घास खात भुवनने भानूला प्रश्न विचारला. सगळ्या भावंडांत तोच मोठा असल्याने घरच्या परिस्थिची त्याला जाण होती.

"बैलजोडी विकली." भानू हळूच म्हणाली.

"काय! माई, तू काल खोटं बोलली ना मला? शाम सुंदरला शेतावर बांधलं आहे म्हणून… मला आधी का नाही सांगितलं. माझे होते ना शाम आणि सुंदर? बापूनी माझ्यासाठी घेतले होते ना ते. माई तुला माहीत आहे ना, ते माझ्यासाठी बैल नव्हते, माझी शामसुंदरची जोडी होती ती…" भुवनचा आवाज रडवेला झाला होता. त्याने रागाच्या भरात भाकरीच ताट त्याच्या माईकडं सरकवलं.

"दोन वर्ष झाले, पाऊस नावालाच पडतोय. शेतात पीक नाही, घरात धन-धान्य नाही. आपण कसं जगतोय आपल्यालाच माहीत आहे. भुवन, अरे चारा पाणी मिळत नाहीये, पाण्यासाठी कोसभर दूर जावं लागतंय. आपल्या इथं त्या मुक्या जनावराचे हाल झाले असते रे…" भानू त्याला समजावत होती.

"मी आणलं असतं त्याच्यासाठी पाणी, मी आणला असता चारा… मी लगेच शोधून आणतो माझ्या शामसुंदरला… कुणाच्या तरी दारात उभे असतीलच ते..." भुवन अस्वस्थ झाला होता.

"मीरतेच्या बाजारपेठेत विकले रे…" भानूचे शब्द त्याने ऐकलेही नाही. भुवन तडक झोपडीच्या बाहेर निघाला.
गावातल्या सगळ्या घराघरात जाऊन त्याने शामसुंदरचा शोध घेतला पण त्याला ते कुठेच सापडले नाहीत. दुपार होत आली होती. सूर्य माथ्यावर येऊन आग ओकत होता.

"आता बापूलाच विचारतो, कुठं आहेत माझे शामसुंदर?" भुवन रडतच स्वतःशी बोलत होता. रखरखत्या उन्हात भुवन शेताकडे निघाला. बरंच अंतर चालून गेल्यावर तो शेतात पोहोचला. नंदलाल आकाशाकडे बघत शेतातच उभा होता. आकाश अगदीच निरभ्र होतं. काळा काय पांढराही ढग नव्हता आकाशात. जमीन भेगाळलेली, रखरखीत होती. यावर्षी तरी पाऊस पडेल या आशेवर नंदलालने जवळचं होतं नव्हतं ते बी शेतात पेरलं होतं. तीन नक्षत्र उलटून गेली होती पण पावसाचा थेंबही जमिनीवर पडला नव्हता.

"बापू…" भुवनने नंदलालला आवाज दिला.

"या वर्षी पावसाचा थेंबही नाही… म्हणजे दुष्काळ…." नंदलाल तोंडातल्या तोंडात पुटपुटला आणि भोवळ येऊन कोसळला. भुवन ताबडतोब त्याच्या जवळ गेला. नंदलाल मूर्च्छित होऊन पडला होता. काय करावं ते भुवनला सुचत नव्हतं. तो एकसारखं त्याच्या बापूला आवाज देत होता. आजूबाजूच्या शेतात चिटपाखरूही नव्हतं. भुवन खूप घाबरून गेला होता. तेवढ्यात त्याला त्याची माई आणि छोटी बहीण दोघी येताना दिसल्या. भानू नंदलालसाठी डोक्यावरच्या टोपलीत शिदोरी आणि पाणी घेऊन आली होती. एका कडेवर तिची लहान मुलगी होती. नंदलाल जमिनीवर पडलेला दृष्टीस पडताच ती धावतच तिथं आली. तिने नंदलालच्या तोंडावर सोबत आणलेल्या पाण्याचे शिपके मारले. त्याला थोडं पाणी पाजलं. पोटात पाण्याचा थेंब गेल्यावर नंदलालला थोडी हुशारी जाणवली. त्याने डोळे किलकिले केले.


"माई, बापूला काय झालं?" लहानग्या छवीने घाबरून विचारलं.

"चार दिवस झाले, पोटात अन्नाचा कण नाही… नुसतं पाण्यावर कसं भागणार." भानूने डोळ्याला पदर लावला. माय बापाच्या जीवाचे हाल बघून शामसुंदर ह्या बैलजोडीसाठीचा हट्ट मात्र भुवन क्षणात विसरून गेला.

क्रमशः
© डॉ. किमया मुळावकर
ईरा वाचनाचा आनंद घ्या आता app मधून, आजच download करा. Download App Now
ईराच्या कथांचे कुठलेही भाग मिस करू नका, आजच जॉईन करा ईरा वाचनालय. व्हाट्सएप: व्हाट्सएप:
Circle Image

Dr Kimaya Mulawkar

Doctor

माझ्यातली "मी" शोधण्याचा प्रयत्न

//