Feb 23, 2024
अष्टपैलू लेखक महासंग्राम

बलिदान (भाग-१)

Read Later
बलिदान (भाग-१)


बलिदान (भाग-१)


सदर कथा इतिहासातील सत्य घटनेवर आधारित एक काल्पनिक कथा आहे. या कथेतील सर्व पात्र काल्पनिक आहेत. 


दुपारचं उन अंगाची काहिली काहिली करत होतं. दिल्लीपासून काही कोसांवर असलेल्या मीरतला छावणीचं स्वरूप आलं होतं. ब्रिटिशांनी दिलेले सैन्यातला पोषाख, डोक्यावरची भलीमोठी टोपी आणि खांद्याला लागलेली जाडजूड रायफल सांभाळत हिंदस्थांनी सैनिक हातात ताट घेऊन जेवणाच्या रांगेत उभे होते.


"आज पुन्हा हे वाळलेले जाडेभरडे तुकडेच का?" भुवन समोरच्या ब्रिटिश सैन्यातल्या जेवण वाढप्यावर जवळपास ओरडूनच म्हणाला.


"हेच मिळतंय इथं… गपगुमानं गिळ." तो ब्रिटिश सैन्यातला वाढपी अगदी उद्धटपणे म्हणाला.


"त्या फिरंगी सैनिकांना द्या ना हे तुकडे… तिथे तर दुधा-तुपाच्या धारा आहेत. ते म्हणजे माणसं अन् आम्ही कोण? जानवरं का? लाज वाटते का रे तुला, हिंदुस्थानी ना तू, त्या ब्रिटिशांची गुलामी करतोय." भुवन त्या वाढप्यासोबत वाद घालत होता.


"तुसुद्धा त्यांच्याच सैन्यात आहेस हे विसरू नकोस." तो वाढपी छद्मी हसला. त्याचं बोलणं ऐकून भुवनच्या तळपायाची आग मस्तकात गेली आणि भुवन वाढप्याच्या अंगावर धावून गेला. तेवढ्यात एक ब्रिटिश ऑफिसर तिकडे येत असताना बिरजूने त्याला पाहिलं. भुवन आणि बिरजू सैन्यात सोबतच होते.


"भुवन, जे मिळतंय ते घे आणि चल इथून." बिरजू तो ब्रिटिश ऑफिसर जवळ येताना बघून भुवनला म्हणाला आणि त्याने भुवनला तिथून ओढत दूरवर नेलं. भुवनच्या डोळ्यात चीड स्पष्ट दिसत होती.


"बिरजू, कशाला थांबवलं मला, आज तर त्याला सोडलंच नसतं मी. आपलेच लोक, ते पण असा भेदभाव करत आहेत! तिकडे त्या गोऱ्या शिपायांना चांगलंचुंगलं खायला देतात आणि आपल्या ताटात मात्र हे असं… अरे, प्राणिमात्रांवर दया करणारी संस्कृती आपली, त्या वाढप्याने हे पण विसरावं का?" भुवन


"त्याला दोष देऊन काय उपयोग, तोसुध्दा आपल्यासारखा जबरदस्तीने आलाय इथं. त्याला जसं काम सांगितलं तसं तो करणार… ह्या इंग्रजांच्या सैन्यात सगळीकडं असंच आहे, आपल्याच सारख्या पदावर असणाऱ्या गोऱ्या शिपायाला आपल्यापेक्षा जास्त तनखा मिळते. सगळ्या सोई सुविधा त्यांच्यासाठीच आहेत…सगळे पदकं त्यांनाच मिळतात, आपण मात्र जानावरांसारखं राबायचं. आपण तर आपल्यासाठी राबणाऱ्या जानवराचीही काळजी घेतो, इथं तर तेही नाही." बिरजूने बोलता बोलता एक उसासा टाकला.


"मग आपण सगळे मिळून यावर आवाज का उठवत नाही? अरे मुठभर आहेत हे फिरंगी, आपण ठरवलं ना तर ह्यांच्या नाकात दम भरून ह्यांना देशाबाहेर हाकलू शकतो." भुवनच्या बोलण्यात अजूनही इंग्रजांप्रती चीड होती.


"तू आता, काही दिवसांपूर्वी आलास इथं. हळूहळू कळेल तुलाही…खरं तर जवळपास सगळ्या हिंदुस्थानी सैनिकांना तुझ्यासारखंच वाटतंय पण बोलायला कुणी पुढं येत नाही. सगळे मात्र मनोमन प्रार्थना करतात ह्या इंग्रजांच्या सैन्यात अजून हिंदुस्थानी सैनिक म्हणून आले नाही पाहिजे… मला सांग भुवन, तू का आला इथं?" बिरजूने ताटातला वाळलेला तुकडा पाण्याच्या घासासोबत अक्षरशः गिळला. भुवन मात्र ताटातल्या तुकड्यांना चिवडत होता. त्याच्या डोळ्यासमोर त्याच्या माईने केलेली चुलीवरची गोल गोल भाकर मात्र भूतकाळाचा हात पकडून जणू गोल गोल फिरत होती.


ईस्ट इंडियाच्या मीरत येथील छावणीत शिपायांचा युद्ध सराव सुरू होता. इंग्रजांनी आजूबाजूच्या छोट्या मोठ्या गावातून अनेक तरुण ईस्ट इंडिया कंपनीने जबरदस्तीने सैन्यात भरती करवून घेतले होते, तर काही तरुण केवळ नाईलाज म्हणून सैन्यात भरती झाले होते. भारतीय सैन्याच्या बळावर ब्रिटिश आपला साम्राज्य विस्तार करत होते. ह्याच छावणीत भुवन काही दिवसांपूर्वी आला होता. कोण होता भुवन? काय होता त्याचा भूतकाळ? जाणून घेऊया पुढच्या भागात.


क्रमशः


फोटो- गुगलवरून साभार


© डॉ. किमया मुळावकरईरा वाचनाचा आनंद घ्या आता app मधून, आजच download करा. Download App Now
ईराच्या कथांचे कुठलेही भाग मिस करू नका, आजच जॉईन करा ईरा वाचनालय. व्हाट्सएप: व्हाट्सएप:
Circle Image

Dr Kimaya Mulawkar

Doctor

माझ्यातली "मी" शोधण्याचा प्रयत्न

//