Feb 29, 2024
ऐतिहासिक

बळी कर्तव्यचे

Read Later
बळी कर्तव्यचे
ही गोष्ट आहे एका  युद्ध कैद्याची आणि एका मेजरची. काळ आहे अमिरेका नी व्हिएतनाम वॉरचा  .

ती एक पावसाळी काळी रात्र होती...सिकल आणि त्याच्या तुकडीतील दहा जवान अंगावर युद्धाच्या सामानाची जड बॅग घेऊन कँम्प चेंज करण्याच्या हेतुने रानातुन जात होते.

व्हिएतनामी तुकडी चेहऱ्यावर काळे पट्टे लावुन झाडावर वाट पाहत होती. ते जंगलही त्यांच होतं जसा सह्याद्री मावळ्यांचा आणि अमेरिकी सैनिक म्हणजेच तिकडचे मुघल.

अचानक सिकलच्या तुकडीला पानांची सळसळ जाणवली मग प्रतिकार करण्यासाठी त्यांनी बंदुका रोखल्या, पण एवढ्यात हवेतून त्यांच्या तुकडीच्या माणासांवर विषारी टोके असलेले काटे आले आणि काही जणांच्या मानेत गेले. सिकल आणि इतरांनी गोळीबार केला खरा..पण रात्र आणि दाट गडद जंगलात ,पावसाळी चिखलात गोळ्या सावजाचा शोध न घेताच हवेत विरून गेल्या.

मग व्हिएतनामी तुकडीने उरलेल्या दोन तीन अमेरीकन सैनिकांना बंदी बनवून आपल्या कँम्पपर्यत आणलं. ज्यापैकी एक डॉक्टर सिकलही होता. प्रत्येक कैद्याला काही काम देण्यात आलेली होती, त्यात सिकलला काम मिळाल होतं, मेजर डेविड यांच्या घरचं साफ सफाईचं

पस्तिशीचे मेजर डेविड दिसायला किरकोळ शरीरयष्टीचे वाटत असले तरी डोक्याने शार्प आणि नजर तेवढीच थंड असलेले. ह्याउलट सिकल हा गोरा सहाफुट उंच विशीतील मुलगा आणि एक आर्मी डॉक्टर.

त्याचा पहिलाच दिवस होता मेजर डेविडच्या घरी. सगळं घर साफ करून पाणी भरून ठेवायची ऑर्डर होती त्याला. अमेरिकन लोकांमुळे आपल्यावर संकट आहे हा राग असलेली छावणीतील जवान उगाचच येता जाता त्याला व इतर कैद्यांना मारायचे. त्यातून सुटायचे असेल तर मेजर डेविडच काम परवडलं अस वाटून त्याने मन लावून घर साफ केलं. अव्यवस्थित पुस्तके, ग्रोमोफोन रिकाॅर्ड सगळ अगदी अक्षराच्या क्रमाने लावलं..त्याला तशी व्हिएतनामी यायची तिही तोडकी मोडकीच. त्यानुसार त्याने ते सगळं केले.

मेजर डेविड जेव्हा घरी आले तेव्हा त्यांना स्वच्छ घर पाहुन त्यांच्या घरच्यांची आठवण आली. ते घरी गेले की बायकोही त्यांची अशीच काळजी घ्यायची.

त्यांनी सिकलला गरम पाणी करायला सांगितलं आणि स्वत: नकाशा घेऊन पुढच्या हल्ल्यासाठी कसे नियोजन करायचे ते ठरवत बसले.

सिकल अजुनही तिकडेच आहे हे पाहुन त्यांनी विचारलं ..

"तुझ्या बेसला का नाही जात आहेस ? "

"रात्री मला कोणाची गरज नसते ",त्यांनी थंड स्वरात सिकलला म्हटलं.

सिकल निराश होऊन परत गेला, तिकडे त्याला माहित होतं. हे सोल्जर आता आपल्यावर राग काढणार म्हणून, पण दिवसा का होइना ह्या साऱ्यापासुन सुटका होइल हा आनंद होताच. मार खाल्ल्यावर रात्री अवकाशातील तारे पाहताना त्याला पहिला त्याचा अमेरीकन राष्ट्रध्वजच आठवायचा  आणि  मग आठवायची वाट पाहणारी त्याची आई नी रोझालिन, त्याची गर्लफ्रेंड .

असेच काही महिने निघून गेले. सिकल आता मेजर डेविड यांच्या घरातला स्पेशल नोकर झाला होता. त्याला कोणत्याही जागी जायची परवानगी होती. ह्याला कारण होतं त्याचे टापटीप काम आणि मेजर डेविडनी न बोलताही त्यांना त्यांच्या गरजेच्या वस्तु लगेच हजर करणे. मग ती सिगरेट असो किंवा कॉफी किंवा कधी ग्रामोफोनवरच मुझ्यीकही . मेजर डेविडच्या चेहऱ्यावरचा ताण सिकलला लगेच जाणवायचा जणू एक मुक संवाद जन्माला आला होता दोघांमध्ये.

एकदा असेच अमेरिकन सैन्याबरोबर झालेल्या गनिमी हल्ल्यात मेजर डेविड आणि काही जणांना खुपच मार बसला. जणू अमेरीकन सैन्यास त्यांच्या येण्याची खबर आधीच मिळाली असावी. हल्ला आवरता घेऊन जखमी अवस्थेतील सैनिकांना बेस कॅम्पवर आणल गेलं. मेजरच्या हृदयाच्या खालच्या बरगड्यात गोळी लागलेली होती. कँम्पचा डॉक्टर सर्जन नव्हता नि जंगलातून शहरात न्यायचा वेळही उरला नव्हता. अश्यावेळी सिकल पुढे आला .त्याने  डॉक्टरनां सागितले ,

"डॉक्टर मी जर्नल सर्जन आहे जर मला परमिशन दिली तर मी गोळी काढू शकेन. "

असही मेजर डेविड मरणारच होते, डॉक्टरांनी शेवटचा मग एक प्रयत्न म्हणुन सिकलला ऑपरेशनची परवानगी दिली. सिकलने प्रयत्नांची शर्थ लावून मेजरचे ऑपरशन केले आणि मेजरचा यांचा जीव वाचवला. मेजर डेविड जेव्हा शुद्धीवर आले तेव्हा त्यांनी सिकलला बोलावून घेतलं आणि विचारलं 

" मी तर तुझा शत्रु आहे, मग माझा जीव का वाचवला?" मी मेलो असतो, तर तुमची लोकं अजून काही दिवस जगली असती ? "

"सर ! मी सैनिक असलो तरी पहिला मी एक डॉक्टर आहे. माझ्यासमोर जर कोण मरत असेल तर मी डॉक्टर ओथप्रमाणे (शप्पथ) मी पेशंटचा धर्म नी जात नाही पाहू शकत. माझे कर्तव्य मला तसे करायची परवानगी देत नाही. " हे ऐकन मेजर यांनी पहिल्यांदा सिकलकडे पाहुन  स्मित हास्य दिलं.

आता हे सतत होत होते ..कुणीतरी त्यांच्या हल्ल्यांची बातमी अमेरिकन सैन्याकडे पोहचवत होतं. मेजर डेविड जरी आता प्रत्यक्ष फिल्डवर नसले तरी ह्या जंगलातील हल्ल्यांच्या योजनांसाठी त्यांचा सल्ला महत्वाचा असे कारण ते त्या भागातील जंगले कोळून प्यायले होते  त्यामुळे सगळ्या योजना त्यांच्या घरी बनत असतं. अश्यावेळी सिकलला जरी त्यांच्या स्टडी रूममध्ये यायची परवानगी नव्हतीच.

हे अस का होत आहे?,ह्याची चिंता मेजर डेविड यांना सतावत होतीच ,पण दुसऱ्या मेजर लोकांनी सिकलवर दाखवलेला संशय त्यांच मन मान्य करायला तयार नव्हतं. आता सिकल आणि त्यांच्यामध्ये साहित्यिक , ऐतिहासिक चर्चा व्हायच्या. डेविड यांच्या एकट्या मनाला आता एका मित्राची साथ मिळाली होती...पण,सिकल खरचं त्या लायकीचा होता का?

कारण एकेदिवशी सैऩिक मेजर साहेबांच्या घरी आले आणि सिकलला उचलुन नेलं . मेजर डेविड ह्यांनी  सैनिकांना अडवलं नि विचारलं,

" डॉक्टर सिकलनां का नेताय  तुम्ही ?काय केलय त्यांनी ?"


सैनिक मेजर डेविड यांना सॅल्युट करत म्हणाले ,

"सर हे पहा! हा सिकल ,तुमच्या घरातील टेलिग्राफ मशिनद्वारा हल्ल्याच्या योजनांची सगळी माहीती अमेरीकी सैनिकांना तारेनी पाठवत होता ,आम्ही त्याला हातोहात हे करताना पकडलयं ..हा पहा मजकुर ."

सिकल काहिच न बोलता तसाच उभा होता, मेजर डेविड यांना तर विश्वासघाताचा धक्काच बसला. आपला प्राण वाचवणारा माणूस, आपल्याच घरातुन हेरगिरी करत होता. ते काहीच बोलले नाही फक्त त्यांनी सिकलला घेऊन जायचा इशारा दिला.

दुसऱ्या दिवशी मेजर डेविड यांनी सिकलशी बोलायचं म्हणुन परवानगी मागितली.परवानगी मिळाल्यावर ते सिकलच्या  टायगर पिजंऱ्यात गेले. तो पिंजरा एवढा छोटा होता कि त्यात असलेला माणूस धडपणे हलूच शकणार नाही.
त्यांनी पाहिल, सैनिकांनी सिकलकडुन अजून काही माहिती मिळते का हे पाहण्यासाठी त्याचे हाल केले होते.
त्यांनी फक्त सिकलला एवढेच विचारलं

" सिकल का केलं असं ? "

सुजलेल्या तोंडाने व घशातून खोल स्वर काढत जड शब्दात सिकल एवढचं म्हणाला ,

"कर्तव्यं.. ! माझ्या देशासाठी. "

मग त्याने मोठ्या मुष्किलीने आवंढा गिळला आणि पुढे म्हणाला,

"ज्यादिवशी तुमच्या घरात मला कामाची ड्युटी दिली, त्याच दिवसापासून मी संधी मिळेल तेव्हा हे करत गेलो कारण मला माझेही जवान वाचवायचे होते. मला माफ करा माझा नाईलाज होता. मला तुमचा विश्वासघात नव्हता करायचा."

सिकलला हे बोलतानाही खुप त्रास होत होता़ .

"सिकल, तुला माहित आहे तू काय केल आहेस ?"

हे बोलताना मेजर डेविड यांच्या शब्दात राग, असहायता, ह्या सगळ्या भावनांच मिश्रण होतं.

"मी तुला घरी जायला द्यावं म्हणून शिफारस करत होतो हेड क्वॉर्टरला, पण....I am sorry......" 

एवढं बोलून मेजर डेविड यांनी सिकलच्या प्रतिसादाची वाट न पाहता सिकलच्या डोक्यात गोळी घातली. सिकल एका फटक्यात शांत मेला नाहीतर व्हिएतनामी सैनिकांनी त्याचे मरण्यापूर्वी अजुनच हाल हाल केले असते.

युद्ध खरचं माणसाला काय देतं? हीच दोन लोक जर शांत वातावरणात एकमेकांना भेटली असती तर चांगले मित्र म्हणुन एक.मेकांबरोबर वावरली असती. पण देश प्रेमापोटी डॉक्टर सिकलने मेजर डेविडचा विश्वासघात केला आणि माणुसकीपोटी मेजर डेविड यांना आपल्या जीव वाचवण्याऱ्यालाच मारावे लागले.

मग चुक कोण ? डॉक्टर सिकल ,मेजर डेविड ,का कुरघोडी नि वर्चस्व करण्यासाठी रचलेली युद्धे ,ज्यामुळे माणुसकी हरते आणि कर्तव्यं जिकंतात.


नोट.:बावीस वर्षे व्हिएतनामी वॉर चालू होते अमेरिकेबरोबर...कितीतरी दोन्ही बाजूचे निष्पाप सैनिक हकनाक मारले गेले पण अमेरिका जिंकू नाही शकली. त्याच श्रेय जाते शिवाजी महाराजांच्या गनिमी काव्याला. ज्याचा अभ्यास करूनच व्हिएतनामी सैनिकांनी हे युद्ध जिंकलं. ही खऱ्या युद्धावरती आणि  तिकडच्या हेरगिरीवर रचलेली  काल्पनीक कथा आहे
ईरा वाचनाचा आनंद घ्या आता app मधून, आजच download करा. Download App Now
ईराच्या कथांचे कुठलेही भाग मिस करू नका, आजच जॉईन करा ईरा वाचनालय. व्हाट्सएप: व्हाट्सएप:
//