बेरीज वजाबाकी आयुष्याची...भाग ३ (वर्षाराज)

शशांकच्या डोळ्यासमोर मागील काही वर्षांत घडलेल्या घटना एक एक करून येत होत्या. तो त्याच्याच धुंदीत धनंजयला सांगत होता."वीस वर्षांच्या संसारात किती चढ उतार बघितले आम्ही धनंजय. किती संकटांना सामोरे गेलो." शशांक भूतकाळात हरवला होता.
मागील भागात आपण बघितले…


"शशांक कसल्या विचारात हरवला आहेस? भार्गवी लवकर शुध्दीवर येईल. काळजी करू नकोस." धनंजय शशांकच्या पाठीवर हात ठेवत बोलला.


"का रे असं वागली असेल माझी भार्गवी?" ह्याच प्रश्नच उत्तर शोधतो आहे मी." शशांक भावूक झाला होता.


"तुला खरंच माहीत नाही का तुझ्या प्रश्नाचे उत्तर?" धनंजय प्रश्नार्थक नजरेने बघत होता.


आता पुढे…


"मागील काही वर्षातील घटनांकडे एकदा डोकावून बघ. तुला वाटतं तू जे वागत आलास, त्या नंतर भार्गवी ने काय करणे अपेक्षित होते?" धनंजय भूतकाळातील घटनांची आठवण करून देत होता.


शशांकच्या डोळ्यासमोर मागील काही वर्षांत घडलेल्या घटना एक एक करून येत होत्या. तो त्याच्याच धुंदीत धनंजयला सांगत होता.


"वीस वर्षांच्या संसारात किती चढ उतार बघितले आम्ही धनंजय. किती संकटांना सामोरे गेलो." शशांक भूतकाळात हरवला होता.


"पण त्या संकटांमध्ये तू!" धनंजय बोलताना थांबला.


"लग्ना नंतर दोन वर्षांनी साहिलचा जन्म झाला आणि त्या नंतर दोन वर्षांनी धवलचा. तो पर्यंत सगळं छान सुरू होतं. पण साहिल पाच वर्षांचा होता, तेव्हा त्याला न्युमोनिया झाला आणि त्यातून तो कधी बराच झाला नाही. किती डॉक्टर बदलले पण काही उपयोग झाला नाही. शेवटी ह्याच हातांनी त्याला माती दिली. पुरता कोलमडून गेली होतो. पण सुदैवाने धवल होता त्यामुळे सावरलो. साहिलची आठवण यायची, आता ही येते म्हणून मी कामात स्वतः ला गुंतवून ठेवत होतो." शशांकचे हात अजूनही पुढेच होते जणू त्याने पाच वर्षांच्या साहिलला उचलले होते.


"आणि भार्गवी?" धनंजयने भार्गवीची आठवण करून दिली.


"भार्गवी, ती धवल मध्ये साहिलला बघत होती. माझ्या समोर कधी रडत नसे, तरी सुजलेले तिचे डोळे सगळं सांगायचे मला. पण मी दुर्लक्ष केले तिच्याकडे. हळू हळू घाव जुना होत गेला. दरम्यान बिझनेस मध्ये मला नुकसान झाले आणि ते भरून काढण्यासाठी मी अजूनच कामात गुंतलो. जास्तं करून घराबाहेर होतो मी. धवलचे शिक्षण अभ्यास, मीटिंग सगळं भार्गवी बघत असे त्यामुळे मी बिनधास्त होतो.
ती बऱ्याच वेळा म्हणायची,\" शशांक मला ही वेळ दे जरा. मी फक्त धवलची आई नाहीये. तुझी बायको देखील आहे.\" पण तिच्याकडे मी कधीच लक्ष दिले नाही. मला वेळच नव्हतं इतका. मला माझी इमेज परत मिळवायची होती.


त्यानंतर असे बरेच प्रसंग आले आयुष्यात पण त्यावर मात केली. पण एक वर्ष आधी जे घडले त्यानंतर अमाचे आयुष्य बदलले. भार्गवी आणि माझ्यात प्रेम असले तरी एक दुरावा निर्माण झाला आहे.

धनंजय, त्याच्या जाण्याने जीवनात पोकळी निर्माण झाली रे माझ्या, अर्थात आमच्या. धवल असा अचानक सोडून गेला आम्हाला. दहावीत अपेक्षेहून कमी टक्के मिळालेत. म्हणून शाळेच्या जवळ बांधकाम सुरू असलेल्या एका बिल्डिंगच्या दहाव्या मजल्याहून उडी मारली त्याने. आम्हाला कल्पना पण नव्हती. आम्ही रागावलो नसतो रे त्याला. पण तो काही न सांगता बोलताच असा निघून गेला. मागे सोडली ती एक चिठ्ठी. आम्हाला कायमचा सोडून, एकटं करून गेला. आधी साहिल, नंतर धवल आणि आता भार्गवीने असे केले.


तुला सांगतो धनंजय धवलच्या जाण्याने स्वतः ला सावरणे कठीण झाले होते. म्हणून मी संपूर्ण वेळ कामात घालवतो. घरी जावं वाटत नाही रे. भार्गवीशी तर आठवड्यातून एकदा भेट होते. कारण ती देखील तिच्या खोलीतून बाहेर पडतच नाही. धवल गेल्या नंतर तिने ऑफिसला येणे बंद केले. सुरवातीला म्हणायची की, \"ऑफिसला नको जाऊ, किंवा लवकर ये.\" पण मीच घरी जाणं टाळत होतो. काही ना काही कारण काढून. घरी गेलो की, धवल डोळयांसमोर दिसायचा. घर खायला उठतं ते. कालांतराने तिने बोलणं सोडलं आणि मी विचारणं. ती तिच्याच कोषात गुरफटत गेली आणि मी माझ्या विश्वात गुंतत गेलो." शशांक भूतकाळात गुंतला होता.


"आता मिळालं तुला तुझ्या प्रश्नच उत्तर?
शशांक साहिल म्हण किंवा धवल दोघे ही, फक्त तुझी मुलं नव्हती ती. भार्गवीची देखील मुले होती. त्यांच्या जाण्याचे दुःख जितके तुला होते. तितकेच तिला देखील होते. ज्यावेळी तिला तुझ्या आधाराची गरज होती, तेव्हा तू तिला आधार न देता एकटीला सोडले. तुझे दुःख ते दुःख आणि तिचे काय? आई होती रे त्यांची ती. तुझ्या पेक्षा नक्कीच जास्त वेळ तिने मुलांसोबत घालवला होता. तिला किती यातना होत असतील? ह्याचा विचार केलाच नाहीस तू. तेव्हा एकमेकांना समजून घेत एकमेकांसोबत वेळ घालवला असता तर भार्गवी देखील तिच्या दुःखातून सावरली असती.


मुले गेल्याचे दुःख त्यात, तुझ्या आयुष्यात तिची गरज नाही हेच तिला वाटत होते. सांग कोण जबाबदार आहे ह्या गोष्टीला." धनंजय बोलला.


"खरं आहे तुझं. मीच जबाबदार आहे ह्याला. खूप गृहीत धरले मी भार्गवीला. तिच्या मनाची घालमेल मी समजू शकलो नाही. परेश्वरा एक संधी दे मला. मला भार्गवीची माफी मागायची आहे. तिला आधार द्यायचा आहे." शशांकच्या डोळ्यातून अश्रू धारा वाहत होत्या.


तितक्यात समोरच्या वॉर्डातील एक नर्स धावत गेली आणि लगेच डॉक्टरची पळापळ सुरू झाली. थोडावेळ धावपळ झाल्यावर सगळे शांत झाले. सगळ्यांच्या चेहेऱ्यावर एक दुःखाची छटा होती, सोबत काळजीची लकिर.



पुढील भागात बघू काय झाले असेल डॉक्टर कसल्या धावपळीत असतील? काय असेल त्यांच्या काळजीचे कारण? वाचत रहा बेरीज वजाबाकी आयुष्याची.


क्रमशः

©वर्षाराज

🎭 Series Post

View all