मना घडवी संस्कार
मानवाच्या जीवनाची जडणघडण ही त्याच्यावर होणाऱ्या संस्कारातून होत असते. संस्कार शिकवले जात नाहीत किंवा शिकता येत नाहीत. ते घडत असतात. लहान मुलाला मातीचा गोळा म्हणतात. कारण ज्यावेळी त्याचे मन निरागस असते, संस्कारक्षम असते त्या वयात त्याच्यावर संस्कार होतात, त्यातूनच त्याचे व्यक्तिमत्व घडते.
कुंभार मातीची भांडी बनवतो म्हणजेच ओल्या मातीला तो हवा तसा आकार देऊ शकतो. पण जेव्हा ती भांडी, ते मातीचे घडे भाजले जातात तेव्हा मात्र ते टणक बनतात. लहान मुलाला मातीच्या गोळ्याची उपमा दिली ती याच मुळे. कारण बालवयातले संस्कार त्याला आयुष्यभर साथ देतात.
झाडाचे छोटेसे रोपटे चिमटीत धरून आपण उपटून टाकू शकतो. तेच रोपटे थोडे मोठे झाले तर ते हाताने उपटावे लागते. त्याहून ते आणखी मोठे झाले तर त्याला उपटताना दोन्ही हातांची मदत घ्यावी लागते. आणि त्या रोपट्याचे झाडात रूपांतर झाल्यावर ते आपल्याला दोन्ही हातांनी सुद्धा उपटता येत नाही.
आपल्या मनावर दहा चांगले संस्कार असतील तर एखाद्या वाईट गोष्टीला ते चांगले संस्कार आपल्या मनात जागा देत नाहीत. इतके संस्काराचे महत्त्व आहे. लहान मूल आपल्या भोवती घडणाऱ्या गोष्टी पाहत असते. आणि त्याप्रमाणे त्याचे जीवन घडत असते. ज्या घरातील माणसे आपल्या वडीलधाऱ्या माणसांना आदराने वागवत असतात, त्या घरातील छोटी मुले सर्व वडील माणसांशी प्रेमाने, आदराने वागतात.
शास्त्रीय दृष्ट्या हे सिद्ध झाले आहे की मनुष्य काही गुण, काही सवयी आपल्या वाडवडिलांकडून घेऊन येतो. पण त्याच्या मनावर खोल परिणाम होतो तो परिस्थितीचा. दोन पोपटांची गोष्ट-विद्वान पंडिताकडे असलेला पोपट संस्कृत सुभाषिते बोलू लागला तर दरोडेखोरांच्या घरी वाढलेला पोपट अर्वाच्य शिव्या देऊ लागला. हे संस्काराचे महत्त्व.
पूर्वीच्या काळी संयुक्त कुटुंबात आजी आजोबा घरातील लहान मुलांवर सहजगत्या संस्कार घडवत. सत्यासाठी जीवन वेचणाऱ्या महापुरुषांच्या कथा, नीती कथा, बोधकथा सांगत. त्यातून मुलांचे मन संवेदनशील होऊन सकारात्मकतेकडे वळत असे. आज आजी आजोबांची जागा टी.व्ही., मोबाईल गेम्स यांनी घेतली आहे.
प्रत्येक मुलाच्या जीवनात शालेय शिक्षणाचे दिवस हे मंतरलेले दिवस असतात. शिक्षक ही त्यांची आदर्श मूर्ती असते. शिक्षकांच्या प्रत्येक गोष्टीचे अनुकरण कळत नकळत केले जाते. वेळेबाबत बंधने कटाक्षाने पाळणाऱ्या शिक्षकांचे विद्यार्थीही वेळेची बंधने पाळतात. उत्तम हस्ताक्षर, विनम्र संभाषण, विनयशील वर्तन याचे संस्कारही बालवयातच घडत असतात. आपल्याला मिळालेला खाऊ वाटून खावा ही लहानपणी लावलेली सवय मोठेपणीही दिसून येते.
म्हणून लहान वयातच मुलांना संस्काराचे बाळकडू पाजल्या जाणे आवश्यक आहे. जेणेकरून केवळ शिक्षित नाही तर एक सुसंस्कृत व्यक्ती म्हणून निश्चितच त्याची ओळख होईल.
मना उद्धरी संस्कार...
मना भूषवी संस्कार...
मना तेजवी संस्कार...
मना आकारी संस्कार...
मना आधार संस्कार...
मना घडवी संस्कार...
श्रीधर फडके यांनी गायिलेल्या या ओळींमधून संस्काराचे महत्त्व सिद्ध होते.
सौ. रेखा देशमुख
Download the app
आता वाचा ईराच्या कथा सोप्या पद्धतीने, आजच ईरा app इंस्टॉल करा